|| श्री स्वामी समर्थ ||
२०२६ मध्ये अनेक गोष्टी करण्याचे मानस आपले सर्वांचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे वाटते ते खंडित झालेली संवादाची शृंखला . मोबाईल , कॉम्पुटर ह्या माध्यमांशी आणि ह्या माध्यमांच्या माध्यमातून होणारे संवाद ह्यानेच आपले आयुष्य आज व्यापलेले आहे . एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चहा घेत टाळ्या देत दिलखुलास संवाद मित्रांसोबत कधी केला होता आठवावेच लागेल. सध्या संवाद दूर राहिला आहे आणि एकमेकांपासून सर्व लपवण्याकडे कल असतो. आजकाल कुणी कुणाच्या घरी जात नाही . लोकांना टाळतो आपण . का? कश्यासाठी ?? .एकमेकांना “ मी किती सुखी आहे “ हा मुखवटा घालून आपल्या सुखी नसलेल्या आयुष्याचे गोडवे रसभरीत वर्णन करणारे आपण किती केविलवाणे दिसतो , सुखाचे प्रदर्शन करत आपले दुक्ख लपवण्याचा निरर्थक प्रयत्न करत का जगतोय आपण ? असे वागणारे आपले नातेवाईक , मित्र पाहिले कि मन वेदनांनी भरून येते. कश्याला हवा हा सर्व देखावा . जे आहे ते आहे . पण मनमोकळे बोलावे मनातील शैल्य सांगावे आणि दुक्ख हलके करावे असे खरच बोटाच्या अग्रावर मोजण्या इतके लोक राहिले आहेत .
पूर्वीचा नात्यातील मोकळेपणा , खेळकर पणा कुठेच दिसेनासा झाला आहे. मनातील गोष्टी जोवर बोलल्या जात नाहीत तोवर आपण खळखळून हसणार सुद्धा नाही आणि मनमोकळे रडणार सुद्धा नाही . नात्यातील दुरावा , मत्सर , संशय , कुणाचीही प्रगती न बघवणे , सर्व गोष्टीत गुप्तता हे आज समाजाचे चित्र आहे .
आज प्रवास करताना कुणी एकमेकांच्या कडे मान वर करून बघत सुद्धा नाही. सगळे मोबाईल घेवून बसलेले त्यात शिक्षित अशिक्षित सगळेच असतात . ह्या सर्व electronic माध्यमांचा आपल्या शरीर मन बुद्धी ह्यावर नकारात्मक परिणाम होत आहे . मेंदू पोखरला जात आहे . विचार प्रवाहित होण्यापेक्षा साचले जात आहेत आणि त्यामुळे अनेक नानाविध आजार आपले आपणच जन्माला घालत आहोत .
आवश्यक्ता नसेल तर मोबाईल चा वापर टाळा. मोबाईल नव्हते तेव्हाही जगत होतो कि आपण . एकमेकांना भेटत होतो आता whatsapp च्या माध्यमातून बोलणे होते . प्रत्यक्ष भेटी खाणे गप्पा हे whatsapp च्या माध्यमातून अशक्य आहे त्याचा आनंद क्षणिक असतो. प्रत्यक्ष भेट आपल्याला जगवते .
जीवनशैली बदलणे अतिशय आवश्यक आहे आणि हाच २०२६ चा संकल्प असला पाहिजे जो आपल्याला आजारांच्या पासून दूर आणि आपल्याच माणसांच्या जवळ आणेल. धबधब्या सारखे बोलले पाहिजे . आपल्याच लोकांपासून पळून जात आहोत आपण . आपण आपल्या पासूनही दूर जात आहोत . जेवणाच्या टेबलावर पण मोबाईल. काही लोकांच्या घरी सतत टीव्ही चालू असतो कारण घरात संवाद नसतो .
एकमेकांशी बोलणे हि आपली काळाची गरज आहे. आनंदी जीवनाची तीच खरी गुरुकिल्ली आहे. मनातील विचार मनातून बाहेर पडले तर मन हलके होईल सगळी औषधे बंद होतील. एकमेकांसाठी जगता आले पाहिजे . ह्या सर्व मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानावर राहूची सत्ता आहे. जग जवळ येत आहे पण आपण एकमेकांच्या पासून दुरावत आहोत . घरात निवांत सगळे मिळून चहा जेवण घेणे शेवटचे कधी केले होते ते आठवा तेही मोबाईल जवळ न ठेवता ... आठवा बर ..तुमचे उत्तर तुम्हालाच मिळेल .
आज ३-४ वर्षाच्या मुलांना चस्मा आहे. तरुणाई BP च्या गोळ्या घेत स्ट्रेस मध्ये जगत आहे. माणसाचा माणसाशी संवाद महत्वाचा आणि तो करायचा असेल तर Restrict Screentime हा एकमेव पर्याय आहे. मी सतत कामात असतो मला वेळ नसतो हे म्हणणे म्हणजे काही श्रेष्ठत्व नाही आणि ह्यात कसलाच मोठेपणा हि नाही. पैसा मिळवण्यासाठी व्यस्त आणि आयुष्याच्या शेवटी हाच पैसा आपणच निर्माण केलेल्या आजारांच्यावर घालवायचा . मग गोळाबेरीज काय . मिळवले तरी काय आपण ?
ना मुलांसाठी वेळ न कुटुंबासाठी ना स्वतःच्या छंदांसाठी , आनंदासाठी ....वेळेने जणू आपल्याला वेढा घातल्यासारखे आपण आज उद्या परवा नुसते जगत आहोत .नुसते दिवस वर्ष पुढे पुढे जात आहे आणि एक दिवस हे आयुष्य असेच संपूनही जाणार आहे . आपण आपल्यासाठी जगतच नाही आहोत . भावना नाहीत पैसे मिळवायची मशीन झालो आहोत . “ मला वेळच नसतो “ हे सांगताना आता पुन्हा नव्याने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे अशी आज अवस्था आहे. अनेक आजार उंबरठ्यावर आहेत . कमी वयातील तरुणाई मुक्त पणाने जगायचे सोडून मानसिक क्लेश , EMI चे दडपण , नोकरी टिकवण्याची धडपड , पोटाला सात्विक अन्न नाही , दिसेल ते हवे तेव्हा खायचे , अपुरी झोप ह्यात अडकलेली आहे . कुठे जायचं आहे नक्की आपल्याला आणि काय मिळवायचे आहे. पैसा वैभव गरजेपुरते हवे कुणाला दाखवायला नको. आणि ह्या गरजा वाढवल्या कुणी ? आपणच. स्पर्धा कुणाशी आणि कश्याला ??? ह्याने हे केले मग मी पण त्याच्या दोन पावले पुढे जाणार हे सर्व कश्यासाठी ?कश्याला हा अट्टाहास ? भावनारहित आयुष्य तसेही उपयोगाचे नाही .
२०२६ एकमेकांसाठी वेळ द्या . मोबाईल आणि इतर माध्यमातून भेटी नकोत प्रत्यक्ष भेटी वाढवा , दिलखुलास हसा आणि हसवा , आपले छंद , प्रवास , देवदर्शने आणि त्यासोबत हरवलेल्या प्रेमाला शोधा . मैत्री जपा त्याला खतपाणी घाला आणि २०२६ मध्ये स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुद्धा कसे बहरेल ह्यासाठी प्रयत्नशील रहा .
घर काम कार्यालय ह्या विषचक्रातून स्वतःला सोडवा आणि आयुष्य नव्या अर्थाने जगायला सुरवात करा .
घरात प्रत्येकाने आपला screentime restrict करा . आपण सगळेच संवाद विसरलो आहोत त्याचाच पुनश्च हरिओम करायचा आहे. सुरवात करुया आजपासून अगदी ह्या क्षणापासून ..एकमेकांच्या सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आयुष्य जगायला बळ देतात .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment