Wednesday, 7 January 2026

एकटेपणा

 || श्री स्वामी समर्थ ||


अनेकदा मुलांची लग्न होतात ती आपापल्या घरी जातात किंवा परदेशी स्थायिक होतात . कालांतराने जोडीदार आपल्या पुढील प्रवासाला निघून जातो आणि वाट्याला  येतो तो एकांत किंवा एकटेपणा . आपण ओढवून न घेतलेला परिस्थिती मुळे आलेला एकटेपणा अनेकदा असह्य होतो. माणूस हा समाज प्रिय आहे आणि माणसांशिवाय तो राहू शकत नाही . वय वाढत जाते तसे एकटेपणाची भीतीही वाटू लागते . कुणीतरी बोलायला लागते आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी समोर कुणीतरी हवेच .

अनेकदा हा एकटेपणा परिस्थिती मुळे आलेला नसतो तर तो आपण आपल्या स्वभावामुळे , अहंकारी वर्तनाने ओढवून सुद्धा घेतलेला असतो. आयुष्यातील एकटेपणा हे आपल्या माजोरी स्वभावाला शनीने दिलेलं प्रत्युत्तर असते जे समजायला खूप वेळ लागतो . आपल्या ऐन उमेदीच्या काळात आपण अनेक गोष्टी करत असतो , शरीरसंपदा उत्तम असते , आर्थिक पाठबळ असते . अर्थात सगळी सुबत्ता असते तेव्हा खुपदा आपल्याला कुणाचीच गरज नाही अश्या अविर्भावात आपण वावरू लागतो तेही आपल्याही नकळत . पैशाची नशा आणि आयुष्यातील यश आपल्याला बेधुंद करते , आपण सर्वाना कमी लेखू लागतो , मी म्हणजे कोण हि भावना मोठ्या वेगात आपल्यात शिरू लागते , पण हे सर्व खुजे असते आणि ते आपल्या लक्ष्यात येते जेव्हा वेळ निघून गेलेली असते.

पैसा हा प्राप्त परिस्थितीनुसार सगळ्यांकडे कमी जास्ती असतो पण तो असतो. कुणाकडे कमी आहे म्हणून त्याला कमी लेखण्याचा मूर्ख पणा आणि माजोरीपणा भविष्यात आपल्याला भोगावा लागतो. माणसात माणुसकी किती आहे त्यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरते निदान माझे तरी तसे मत आहे. संपत्ती मिळवावी पण माणुसकी आणि आपले जमिनीवरील पाय मात्र कधीही सोडू नये.

आपले कर्म करत असताना कारण नसताना उगीच कुणाला दुखवू नये कारण त्यांनी आपण आपलीच कर्म वाढवून घेत असतो. कुणाला कमी लेखणे , हिणवणे , त्याच्या उणीवांवर बोट ठेवून त्याला दुखावणे हे शिक्षित असल्याचे लक्षण नक्कीच नाही.

आयुष्याच्या शेवटी शनी सगळे हिशोब करतो तेव्हा ह्या सगळ्याचे फळ पदरात जसेच्या तसे नव्हे तर दाम दुपटीने  घालतो आणि ते म्हणजे “ एकटेपणा “ .  सगळ्यांना आयुष्यभर दुखावलेस ना बस आता एकटाच असेच कदाचित त्याला म्हणायचे असेल. शेवटी आपण माणसासाठी तरसतो , आपण बोललेले कठोर शब्द , केलेल्या चुका आणि केलेले अपमान आपले आपल्यालाच खात राहतात , झोप उडते ती कायमची .

शनी आपल्या कष्टांचे फळ सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही . मोठी घरे , महागड्या वस्तू वाहने सर्व भौतिक सुखे प्रदान करेल पण त्या घरात नुसतेच फर्निचर असेल आणि सोबत जीवघेणा एकटेपणा . काय उपयोग ह्या सर्वाचा जेव्हा आपल्या सोबत कुणीच नसावे तेही अश्यावेळी जेव्हा आपल्याला माणसाची सर्वात अधिक गरज असते.

आजवर जितके आयुष्य जगले आणि पाहिले त्यातून एकच निष्कर्ष काढला तो म्हणजे कुठल्याही गोष्टीचा माज नको , आपण काहीही घेवून आलेलो नाही आणि नेणारही नाही. इथे क्षणाचे सोबती आहोत त्यामुळे कुणाला कमी लेखू नका , दुखवू नका. असा हा जीवघेणा एकटेपणा फार वाईट असतो . जे अनुभवत आहेत त्यांना हे नक्कीच पटेल. साधे घर असावे पण माणसांनी भरलेले असावे .  

आपल्या चुकीच्या कर्माचे फळ म्हणून मिळालेला एकटेपणा ओढवून घेवू नका . आयुष्य फार सुरेख आहे आणि ते उपभोगण्यासाठी जोडलेली नाती , मित्र टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करा . कधी दोन पावले मागे या पण माणसे जोडून ठेवा .

शेवटी आपल्याला अंतिम प्रवासाला जाताना चार माणसे लागतात आणि ती जोडण्याची कला अवगत असणे हेच खरे जीवन आहे.


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment