|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिका म्हणजे आपल्या स्वतःचा आरसा आहे. आपल्या पत्रिकेतून आपले संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित होत असते. आपल्या सवयी , आवडी निवडी , देहबोली , शिक्षण , आयुष्यातील चढ उतार , आपला जीवनाकडे ,प्रत्येक व्यक्ती आणि घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन , हार जीत , आर्थिक उलाढाली , आशा निराशा , स्थित्यंतरे अश्या अनेक अनेक गोष्टींचा बोध पत्रिका आपल्या समोर आणते . म्हणूनच पत्रिका हि अत्यंत पवित्र मानली जाते .
एक पत्रिका म्हणजे एक अखंड आयुष्य म्हंटले तर वावगे ठरायला नको. ज्योतिष हा एक व्यासंग आहे. प्रचंड खोल जावूनही अनेकदा काहीही हाती लागत नाही अश्यावेळी निराश न होता पुन्हा उडी मारावी लागते अगदी तसेच हे शास्त्र आहे. आपण ग्रंथातून शिकलेले , वाचलेले अनेक नियम , सूत्रे ह्यांचा अभ्यास करून ते जेव्हा पत्रिकेला लावतो तेव्हा ते कसे लावायचे हे समजले नाही तर सर्व फोल आहे. अर्थ त्रिकोणातील कन्या राशीतील शुक्र हा कदाचित वैवाहिक सौख्यात उणीव देयील पण आर्थिक स्थिती मजबूत करेल. वंध्या राशी किंवा ग्रह पंचमात विशेष बहरणार नाहीत आणि संततीचा प्रश्न निर्माण करतील . तृतीय भाव हा नेहमीच घटस्फोटाचा कसा असू शकेल ? कारण तो काम त्रिकोणातील प्रथम भाव सुद्धा आहे.
चतुर्थ आणि भाग्य भावाच्या दशा उच्च शिक्षण प्रदान करतील पण नोकरी देतील का? IT मध्ये असलेल्या व्यक्तीला ९ १२ ची दशा काय देयील? प्रगती कि अधोगती ? त्यामुळे ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. आपण कितीही ग्रंथ वाचले , सोशल मिडिया कोळून प्यायलो तरी जोवर आपल्याला स्थिर बुद्धीने समोरच्या पत्रिकेतील ग्रहांचा जातकाने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मागोवा घेता येत नाही तोवर आपले ज्ञान तुटपुंजे आहे हे लक्ष्यात आले पाहिजे आणि ते खुल्या दिलाने मान्यही करायला पाहिजे. हेच अंतिम सत्य आहे .
आज पत्रिका दाखवून विवाह केले जातात मग ते काही काळाने कोर्टाची पायरी कशी चढताना दिसतात . म्हणूनच ह्या शास्त्राचा अभ्यास हा सतत केला पाहिजे . वेगवेगळे पेहलू , दशा काय फळ देयील हे अभ्यासता आले पाहिजे . आपल्याच आयुष्याचा वेगवेगळा खेळ वेळोवेळी मांडणारे ग्रह त्यांची बोलीभाषा समजली पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधता आला पाहिजे . सरसकट एकच नियम सगळीकडे लागत नाही . शुक्र दशा २६-२८ वर्षाच्या मुलाला आणि ७० वर्षाच्या माणसाला तेच फळ देयील का? शुक्र षष्ठात असेल तर दोघानाही आता तुमचे वैवाहिक जीवनाचे बारा वाजणार हे आपण सांगू शकू का? नाही .
उत्तम फोडणी , धने जिरे पावडर , नेमके मीठ तिखट , नारळ कोथिंबीर घालूनही आमटी जेव्हा खाणार्याच्या चेहर्यावर अपेक्षित तृप्तता देत नाही तेव्हा आपले प्रमाण चुकले हे समजले पाहिजे ते मोठ्या मनाने स्वीकारताही आले पाहिजे.
शास्त्राचा अभ्यास करताना अध्यात्माची जोड असेल तर व्यासंग द्विगुणीत होतो. त्यातील मेख समजू लागते कारण गुरुकृपा . कुठलीही विद्या आत्मसात होण्यास गुरुकृपा हवी , आपली स्वतःचीही शिकण्याची तळमळ असली पाहिजे . आपल्या चुका मोठ्या मानाने स्वीकारण्याचे धाडस सुद्धा हवे. पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याची जिद्द हवी .
इथे कुणीही परिपूर्ण नाही , सगळे चुकतात आणि चुकत राहणार पण त्यातून शिकण्याची वृत्ती हवी . सगळ्या गोष्टीना जशी मर्यादा आहे तशी ह्या शास्त्राला सुद्धा . पण सतत मनन चिंतन करून अगदी ध्यास घेवून केलेला अभ्यास अचूक फलादेशा पर्यंत नेऊ शकतो .
आज फलज्योतिष , उद्या कृष्णमुर्ती , परवा जैमिनी असे न करता एकाचीच कास धरावी पण त्यात पारंगत व्हावे असे मला वाटते. गोचर ग्रहस्थितीचा अभ्यास हा महत्वाचा आहे. सकाळी उठल्यावर पंचांग पहिले पाहण्याचा सराव असला पाहिजे. गोचर ग्रह , वक्री मार्गी अस्तंगत ग्रहांच्या अवस्था , ग्रहांचे राशी परिवर्तन , नक्षत्र ह्या सर्वावर लक्ष्य हवे . आपले स्वतःचे नियम सूत्र सुद्धा अनुभवातून तयार होत असतात . मुळात पत्रिकेत विवाहाचा योग नसेल तर लग्नी गुरु आला सप्तमातून गुरु रविचे भ्रमण विवाह देयील हे सांगून जातकाला खोटी आशा दाखवू नये . जे आहे ते आहे . कुठेतरी आयुष्यात कोपरा रिता आहे म्हणून देवाचे महत्व आहे आपल्या आयुष्यात . एखादी गोष्ट घडली नाही म्हणून आयुष्य संपत नाही आपला श्वास सुद्धा थांबत नाही. देव जगवतो आपल्याला तशी कारणे सुद्धा समोर आणतो जगण्याचे बळ देतो आणि ज्योतिषाने जातकाला उपासनेच्या माध्यमातून जगायला शिकवावे असे वाटते. पुढे महाराज समर्थ आहेत सर्व बघायला.
पैसा मिळण्याचे , केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून ह्या कडे पाहू नये हे माझे मत आहे. एखादा घटस्फोट आपण जेव्हा वाचवतो तेव्हा मिळणारे समाधान हे मिळालेल्या मानधना पेक्षा कित्येक पटीने मोठे असते . घटस्फोट झाला म्हणजे ती दोघे वाईट असतात का? नाही तर चुकीच्या व्यक्तीला बरोबर ठरवून ( जो त्यांचा भ्रम असतो )ते एकत्र आलेले असतात असे म्हणूया हवे तर .
वर्षभर अभ्यास करून शेवटच्या ३ तासात विद्यार्थी जे जसे आठवेल तसा पेपर सोडवणार तेव्हा ते ३ तास खरे . मग मी किती क्लास लावले वगैरे विसरा . अगदी तसेच इतके ग्रंथ वाचून समोर पत्रिका आल्यावर जर अचूक उत्तर शोधता आले नाही तर सर्व फोल आणि हे उत्तर शोधायला अपार कष्ट आहेत . साधना , अध्ययन ह्याचा एकत्रित मेळ तर्कापर्यंत नेत असतो आणि त्यात सिहाचा वाटा म्हणजे गुरुकृपा .
ग्रहांचे अंश , नक्षत्राचे चरण , त्याच्या जवळ असणारे शुभ अशुभ तारे , दृष्ट्या इतर बारकावे गुरुकृपेशिवाय समजणे अशक्य . प्रत्येक वेळी राहू शनीवर बिल नाही फाडू शकत आपण . गोड गोड चंद्र सुद्धा आयुष्याची जी वाट लावतो ती कुणा इतर क्रूर ग्रहालाही जमत नाही .
ज्योतिष शिकणे हे तप आहे. हि एक साधना आहे , इथे समर्पण लागते . ग्रह असे फिरवतात आपल्याला कि बस , नाही समजली असे वरवर वाटत असले तरी वास्तवात पत्रिका उलगडत नाही आणि अचूक उत्तर सापडणे हे एक आव्हान होते हे नक्की . प्रत्येक पत्रिका म्हणजे ज्योतिषा साठी आव्हान आणि शिकण्याची संधी सुद्धा . गुगली टाकणाऱ्या पत्रिका आयुष्यात येतात ते कसोटीचे क्षण असतात अश्या वेळी आपला अभ्यास जो आपल्याला परिपूर्ण वाटत होता तो किती खुजा आहे हे समजते.
ह्या सन्मानीय शास्त्रास आणि शास्त्राच्या सर्व अभ्यासकांना सादर अभिवादन .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment