|| श्री स्वामी समर्थ ||
आज ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जगभर अनेक अभ्यासक करत आहेत , रोज नवनवीन शोध सुद्धा लागत आहेत . आज आपण खूप वाचतो (अनेकदा आपल्याला असलेले ज्ञान हे अर्धवट असते हे आवर्जून सांगावेसे वाटते ), ऐकतो आणि आपली मते त्या वरून तयार करतो. आपली पत्रिका म्हणजे जन्मस्थ आकाशात असलेल्या ग्रहस्थितीचे प्रतिबिंब जे बदलत नाही . आपल्या पत्रिकेत शुक्र इथेच का आणि शनी तिथेच का हा अभ्यासाचा विषय आहे कारण ते आपले पूर्व प्रारब्ध आहे. अतिशय मनापासून जर ज्योतिष शास्त्राचा खोलवर विचार आणि अभ्यास केला तर आपल्या आयुष्यातील अनेक गणिते सुटायला निश्चित मदत होईल. एखादी घटना आयुष्यात का घडली ह्याचा मागोवा घेता येयील किंवा भविष्यात काय घडू शकते आणि कधी त्याचा अंदाज येयील . हा अभ्यास अत्यंत सखोल आहे त्यामुळे वरवरचे वाचन इथे चालणार नाही , ह्यात फलादेश चुकण्याचीच भीती अधिक आहे. पृथ्वीपासून कित्येक मैल दूर असणारे ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत आहेत इथेच आपण त्या ग्रहांची ताकद ओळखून त्यांना सलाम केला पाहिजे. त्या ग्रहांची बोली शिकलो आणि त्यांचे कारकत्व समजून घेतले तर जीवन सुकर होईल.
व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे मिथुन राशीचे ह्या आठवड्यातील भविष्य असे आहे हे सगळ्या मिथुन राशी वाल्यांना लागु होईल का तर अर्थात नाही कारण ते मेदनिय भविष्य आहे . प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे आहे. प्रत्येक ग्रहाचे थोडक्यात पण महत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे ग्रह तुमच्या पत्रिकेत कसे आहेत हे तुमचे तुम्हालाच समजेल आणि ज्ञानप्राप्ती सुद्धा होईल.
रवी हा सृष्टीचा निर्माता आहे .पितृसुखाचा कारक आहे. आयुष्य , अधिकार , राजकारण , रक्तदोष , पित्तविकार ,आरोग्य सोने अग्नी तीर्थयात्रा रवीच्या अमलाखाली येतात . रवीचा अंमल हृदयावर आहे. नेत्र तसेच शरीरातील शिरा ह्यावर रविचा अंमल आहे. रवी सर्व प्राणीमात्रांचा प्राणवायू आहे. शरीरातील शक्ती आणि प्रतिकार शक्तीचा कारक रवी आहे. नितीमत्ता , अलौकिक ,ईश्वरभक्ती , उच्च विचार , सात्विकता ,अंतर्ज्ञान , अंतर्स्फुर्ती , मनाचा खंबीरपणा ,स्पष्टपणे बोलणे ,तर्कशुद्धता , स्थिर स्वभाव , ध्यानधारणा , धैर्य ह्याचा कारक रवी आहे.
ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीत भ्रमण करून म्हणजेच एक संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे. सूर्यामुळे आपल्याला सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.
आपल्या उदय आणि अस्तामुळे एकाच दिवसात ३ भिन्न अवस्था दाखवणारा रवी आपल्याला भिन्न राशीतून प्रवास करत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सुद्धा दाखवतो. चैत्र वैशाखात रवी नेतून मेषेत येतो त्यावेळी पृथ्वी सूर्याच्या निकट आलेली असते म्हणून आपल्याला असह्य उन्हाळा जाणवतो.काही काळाने रवी मेषेतून वृषभेत आणि पुढे मिथुनेत जातो . कर्केत गेल्यावर जणू असह्य उन्हाळ्याचा त्याला पश्चाताप होवून तो धरती आणि सृष्टी जलमय करतो .पुढील प्रवास करत कन्येतून तुलेत आपल्या नीच राशीत येतो तेव्हा सृष्टी आणि निसर्ग सुद्धा आनंदाने डोलू लागतो.
सूर्याच्या भोवती सर्व ग्रह एका कक्षेत आपापल्या गतीने फिरत असतात ज्याला आपण क्रांतीवृत्त म्हणतो . सूर्याचे अस्तित्व अबाधित आहे आणि म्हणूनच तो राजा आहे. आता हा राजा पत्रिकेत चांगला असेल तर अर्थात राजासारखी राहणी , मानमरातब , सरकारी नोकरी , प्रसिद्धी , MBA चे उत्तम प्रशिक्षण , नेतृत्व , सरकारी यंत्रणा , वडिलोपार्जित धंदा , खाद्य पदार्थांचा धंदा , वडिलांचे सौख्य प्राप्त होते . रवी आत्मकारक आहे आणि रवी पत्रिकेत चांगला असेल तर प्रकृती उत्तम असते अनेक आजार बरे होऊ शकतात . मनोधर्य किंवा मनाची उमेद व्यक्तीकडे असते . सूर्योदय झाला कि उजाडते आणि ते आपण आपल्या डोळ्यानीच पाहतो त्यामुळे आपल्या डोळ्यातील तेज दृष्टीचा कारक सुद्धा रवी आहे. सूर्याची आराधना केली , गायत्री मंत्राची नित्य उपासना केली आणि सूर्याला सकाळी अर्घ्य घातले तर सूर्य बलवान होण्यास मदत होते . रवी म्हणजे इच्छाशक्ती , आत्मिक बळ , नितीमत्ता , अधिकार गाजवण्याची वृत्ती , नावलौकिक , प्रतिष्ठा , स्पष्ट बोलणे , परखड पणा , घमेंड , खंबीर , धोरणी , बेपर्वाई, न्यायी , दाता . रवी हा आत्मविश्वास देणारा ग्रह आहे. तो कमकुवत असेल तर कुठल्याही कार्यात यश येणार नाही किंवा आत्मविश्वासात कमतरता भासते आणि असुरक्षित वाटत राहते . रवीची ऋण बाजू म्हणजे नको तितका पराकोटीचा अहंकार आणि उद्धटपणा . रवी कमकुवत असलेल्या व्यक्तींची जराशी स्तुती सुद्धा त्यांचा अहंकार फुलवते . ग्रह बलवान असेल तर अश्या खोट्या स्तुतीला कधीच भुलणार नाही तसेच टीकेला पण खिलाडू वृत्तीने घेतील. पण कमकुवत ग्रह जराश्या स्तुतीने व्यक्तीला हवेत नेयील.
ज्या घरात चंद्र गेला तिथे तुमच्या emotions, मन , भावना गेल्या हे लक्ष्यात ठेवायचे. चंद्र हा शीतल नैसर्गिक शुभ ग्रह सर्वाना हवाहवासा वाटणारा , कवी मनाला भुरळ पाडणारा आहे . चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही . सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच परावर्तीत होवून पृथ्वीवर येतो ज्याला आपण चांदणे पडलेय असे म्हणतो. म्हणजे चंद्रकिरण हे खर्या अर्थाने सुर्याचेच किरण असतात . चंद्र आणि सूर्य जेव्हा पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात तेव्हा अमावास्या असते आणि पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी स्थिती असते त्याला पौर्णिमा म्हणतात . पृथ्वी हि वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत येताना सूर्याच्या आकर्षणामुळे तिला एक मोठी भरती आली आणि त्यात तिचा एक मोठा भाग तिच्यापासून वेगळा आला जो तिच्याभोवती फिरत राहिला . अशी चंद्राची जन्मकथा आहे.
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या भावात असतो ती आपली जन्मरास असते. चंद्राच्या जन्माच्या अनेक पौराणिक कथा वाचायला मिळतात. चंद्र हा कृष्णपक्षात क्षीण होत जातो . समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे हा संदर्भ विष्णू पुराणात आढळतो. समुद्रातील पाणी वास्तविक कमी अधिक होत नाही पण चंद्राच्या आकर्षणामुळे तसे वाटते. चंद्राच्या आकर्षणामुळे पाणी ओढलेले दिसते .
भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून त्यालाच ओवाळते. कालपुरुषाच्या कुंडलीत चंद्र हे मूळ मानले आहे आणि इतर ग्रह ह्या शाखा आहेत . जर चंद्राचे इतर ग्रहांशी योग चांगले नसतील तर शुक्र गुरु कितीही चांगले असतील तरी काहीही उपयोग नाही. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री हे एक विलक्षण कोडे आहे.
विश्वाचा गाडा अखंड चालू ठेवण्याचे महान कार्य देवाने स्त्रीकडे सोपवले आहे. अखंड विश्वात जे जे सुंदर आहे पवित्र आहे, मंगल आहे ते स्त्रीमध्ये आहे .रवी हा आत्म्याचा तर चंद्र मनाचा कारक आहे.
मातेचे सुख चंद्रापासून बघतात . प्रेमळपणा , संपत्ती ,नैराश्य , आनंद , शरीरावरील शिरा , शरीरातील जलतत्व ,कुटुंब प्रेम ,जलाशय , पर्यटन , नौकाविहार , फळे फुले , चांदी ,पेये , फळांचे रस , तसेच घशाचे आजार , स्वादुपिंड , स्तन , लाळ, दमा ह्यावर चंद्राचा अंमल आहे. विसरणे , मानसिक कमकुवतपणा,मेंदूची क्रिया ,पुरुषाचा उजवा तर स्त्रीचा डावा डोळा , वेड, प्रवासाची आवड , तीर्थयात्रा , विवेक स्त्रीसुलभ लज्जा ,गौरवर्ण,अती चंचलता चंद्रावरून पहिली जाते.
चंद्र मनाची स्थिती दर्शवतो , वनस्पती , पाणी , खाद्यपदार्थ , आई ह्यावर अंमल करतो. पौर्णिमा आणि अमावस्या प्रमाणे मनाची स्थिती सुद्धा आनंदी आणि दुखी असते. मन किती प्रकारे आणि कश्या प्रकारे सतत बदलत राहते हे चंद्राच्या पत्रिकेतील स्थितीवरून ज्ञात होते . चंद्र चांगला असेल तर व्यक्ती कुठल्याही परीस्थित शांत राहून विचार करेल, वेळ बदलण्याची वाट बघेल पण चंद्र कमकुवत असेल तर जराजराश्या गोष्टीनी सुद्धा सगळे घर डोक्यावर घेईल. एखाद्या वेळी ट्रेन उशिरा आली तर व्यक्ती शांत बसून पेपर वाचेल पण एखादी सतत येरझार्या घालेल , १० वेळा ट्रेन आली का ते डोकावून बघत राहील. चंद्र बिघडला तर कश्यातच रस नसतो , व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगते . चंद्रमा मनसो जातः म्हंटले आहेच . चंद्र कमकुवत असेल तर व्यक्ती मानसिक विकारांना बळी पडते तसेच व्यसनाच्या आहारी सुद्धा जावू शकते .
आज आपण रवी आणि चंद्र ह्या दोन ग्रहांच्या काही छटा पहिल्या . बघा तुमच्या पत्रिकेत हे दोन ग्रह कसे आहेत ? चंद्र आणि रवी कुठल्या भावात आहेत त्यावर राहू केतू शनी मंगल ह्यांच्या दृष्टी आहे का? चंद्र वृषभ राशीत आणि रवी मेष राशीत उच्च फळे देतो. लहानपणापासून डोळ्यांचे विकार दृष्टीदोष आहे म्हणजे रवी कुठेतरी बिघडला आहे अश्या प्रकारे ह्या दोन ग्रहांचा अभ्यास करा. पुढील लेखात पुढचे दोन ग्रह घेवूया .
सूर्यमालिकेत रवी राजा आणि चंद्र राणी मानले तर बुध हा राजकुमार आहे. पण तो किशोर वयातील आहे. बुध म्हणजे शब्द , भाषा , वक्तृत्व त्यामुळे बुध ज्यांचा चांगला असतो ते बोलण्यात हुशार , अनेक भाषा जाणणारे बोलणारे असतात . शब्दांच्या कोट्यां करणारे आणि नकलाकार असतात . म्हणूनच बुधाला ग्रहांत बिरबल म्हंटले आहे . अत्यंत हजरजबाबी असतात . उत्तम सवांद शैली असणारे. चिरतरुण व्यक्तिमत्व असणारा आणि हुशार , उत्कृष्ठ स्मरणशक्ती आणि असामान्य शब्द सामर्थ्य . पण किशोरवयीन असल्यामुळे थोडासा अल्लड आणि कधी बालिश सुद्धा . बुध प्रधान व्यक्ती त्यांचे वय चोरतात म्हणजे ५० वर्षाचा माणूस ४५ चा दिसेल. कन्या राशीत बुध उत्तम फलित देतो. बुध आणि सोबत गुरु सुद्धा पत्रिकेत चांगले असतील तर व्यक्तीची शैक्षणिक पात्रता उत्तम असते , उच्च शिक्षण होते . बुध विष्णूचे प्रत्यक असल्यामुळे बुधाचे उपाय म्हणून विष्णूची आराधना , जप , सत्यनारायण व्रत करता येते . बुधाच्या राशी निसर्ग कुंडलीत 3 6 ह्या भावात येतात . 6 व्या भावावरून आपण आपले पोट पाहतो. आपले वितभर पोट आणि पोटाची भूक आपल्याला काम करायला लावते. बुधाकडे हात आणि बाहू आहेत . पाहिलेत ना काम करण्यासाठी आपल्याला तृतीय भावातील हात आणि बहु लागतात . तृतीय भाव पराक्रम आहे. पराक्रमाने , कर्तुत्व गाजवून आपण आपले पोट भरतो आणि काम करण्यासाठी हात लागतात . बुध हा नर्व्हस सिस्टीम दर्शवतो , बुधाकडे पृथ्वीतत्व आहे आणि आपली त्वचा ( पृथ्वीला जसे आवरण असते ). आपल्या त्वचेला एक प्रकारचा सुगंध असतो जसा पहिला पाऊस पडला कि मातीचा सुगंध येतो तसाच . बुधाला चंद्राने बिघडवले तर स्कीन म्हणजे त्वचेचे आजार होवू शकतात . चंद्र बुध मनाचे चांचल्य दर्शवतो. बुधाकडे थोडे नपुंसत्व आहे. म्हणूनच पंचम भावात बुधाच्या राशी किंवा पंचमेश बुधाच्या राशीत असेल तर संतती साठी पत्रिका अभ्यासावी लागते अर्थात त्याचसोबत जीवकारक गुरु सुद्धा. बुधाची मिथुन राशी तृतीय भावात येते जिथे करार मदार , लेखणी आहे , जाहिरात क्षेत्र . बुध दूत आहे म्हणूनच सगळी प्रसार माध्यमे तृतीय भावावरून पहिली जातात . शिवाजी महाराजांच्या काळात दूत खलिता घेवून इथून तिथे जात असत. थोडक्यात इथली बातमी तिथे ( दोन्ही अर्थाने ) हा बुध त्यात प्रवीण आहे. एखादा फालतू बडबड किंवा अर्थहीन बोलत असेल तर त्याचा बुध बिघडलेला आहे आणि एखादा मार्मिक , वैचारिक बैठक असणारा बोलत असेल तर त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते , लिखाण वाचावेसे वाटते . बुध ठीक करण्यासाठी विष्णूची पूजा जप करावा .
राजाच्या राज्याला सेनापती मंगळ ह्याची नितांत गरज आहे . जोश , उत्साह , लढाऊ वृत्ती , आरे ला कारे करण्याची प्रवृत्ती , असामान्य धैर्य आणि शौर्य , नेतृत्व , अग्नीतत्व त्यामुळे भडका उडणे ( अनेकदा स्वभाव ) , शक्तीचे प्रदर्शन त्यामुळे समुद्रात पोहणारे , अग्निशामक दल , अनेक खेळ , पोलीस यंत्रणा , सैन्य दल , सर्जन ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा मंगळ नक्कीच महत्वाचा आहे. श्री गणेश , हनुमानाची पूजा करावी . श्री गणेशाची आणि हनुमानाचे पूजन उपयुक्त होईल. मंगळ स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक मानला आहे. मंगळ हा अनेकदा अमंगळ करणारा असू शकतो जर तो राहू शनी ह्या ग्रहणी दुषित असेल तर . सुस्थितीत असलेला मंगळ स्वतःवर ताबा मिळवेल उठसुठ चिडणार नाही. भावनांवर विजय मिळवेल. रक्ताचा कारक असल्यामुळे BP , रक्तदाब , असुरक्षित पणाची भावना मनात येते. मंगळाकडे अजिबात धीर नाही तर तो प्रत्येक गोष्टीत अधीरता दर्शवतो. सेनापती ला इतकेच माहित आहे कि समोर शत्रू आहे आणि त्याचा निपात करायचा आहे. त्यामुळे तो फारसे डोके न चालवता कृती करतो तीही क्षणाचाही विलंब न लावता . असे हायपर पेशंट अनेकदा आपल्यालाच त्रास करून घेतात .रक्ताचा कारक असल्यामुळे राक्तासंबंधी आजार . मंगळाची पत्रिका हा विषय तर अत्यंत चुकीच्या दृष्टीने मांडला जातो. मंगळाच्या मुलामुलीत दोष आहे असे काही नसते , त्यांनी विवाह करू नये असे तर अजिबात नाही. बुधाच्या मिथुन आणि कन्या राशीतील मंगळ तितकासा धाडसी नसतो. शनी मंगल युती हि घातक , त्रासदायक मानलेली आहे .हनुमान चालीसा , गणपती स्तोत्र म्हणावे.
शक्र हा आयुष्यातील सर्व आनंदाची बरसात करणार ग्रह आहे . वक्तशीरपणा , निट नेटके राहणे , टापटीप राहणीमान , पेहराव , दागदागिने , कविता करणे , प्रवासाची आवड , प्रत्येक गोष्टीत असणारी सकारात्मकता आणि आकर्षण . शुक्राचार्य हे ऋषी होते आणि ते दैत्यांचे गुरु होते . ते शिवाचे भक्त होते. शिवाची प्रखर साधना करून त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली ह्या कथा आपण वाचतो ऐकतो . शुक्र आयुष्यातील passion आवड दर्शवतो तसेच कामसुखाच कारक सुद्धा शुक्रच आहे. शुक्र हा नैसर्गिक शुभग्रह आणि जलतत्व आहे. शुक्र म्हणजे महालक्ष्मी . प्रसिद्धी सुद्धा शुक्रा मुळे मिळते . वाहन सौख्य , अनेक विध भौतिक सुखांची प्राप्ती , संतती , सर्व प्रकारची रत्न शुक्राकडे आहेत . सर्व कला सुद्धा शुक्राकडे आहेत जसे चित्रकला , रांगोळी , स्वयपाक , कलाकुसर ई. नाटक , सिनेमा , चेहऱ्यावरील लज्जा , सुगंधी द्रव्ये आणि पेय , प्रवास आणि पर्यटन संस्था , बागायती , छानछोकी , नित्नेतके राहणे , तारुण्य , उत्साह , समाधान शुक्राच प्रदान करतो. व्यसने बिघडलेला शुक्र तर पेर्म प्रकरणे शुक्र मंगळ .
गुरु सुद्धा शुक्रसारखाच नैसर्गिक शुभग्रह आहे. ज्ञान , वेदांत , वेद , ज्योतिष ,अध्यात्म गुरूकडे आहे . गुरु हा जीवकारक असल्यामुळे संततीचा कारक ग्रह सुद्धा गुरु आहे. बँक , अपर संपत्ती , चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती गुरूकडे आहे. गुरु हा राजमार्गाने जाणारा असल्यामुळे राजमार्गाने मिळवलेला पैसा गुरु देयील.
गुरु म्हणजे भव्य दिव्य. विद्या , ज्ञान , नवनिर्मिती , धर्म , धार्मिकता , अंतर्मन , अध्यात्मिकता , रूढी परंपरा .
गुरु बलवान असेल तर शिक्षण क्षेत्र , मंदिर मठ ह्या सारख्या धार्मिक ठिकाणी नोकरी , न्याय व्यवस्था , बाल सुधार केंद्र , डॉक्टर , दवाखाना , पुरोहित , कीर्तनकार , विश्वस्थ , ट्रस्टी .वकिली , दूरचे प्रवास , परदेशी कंपन्या. आपल्याला ऐनवेळी मदत मिळते ती गुरूमुळे . मानसन्मान , समाजकार्य , गुरु व्यवहारी नाही पण त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. , देवघर , पूजा , पोथी वाचन , नामस्मरण , समाधान , मांगल्य , परोपकार , उच्च विचार , प्रगल्भता .
गुरु हा प्रसरणशील आहे . संयमी सात्विक आहे. प्रापंचिक आयुष्यात संयम लागतो .न्यायी आहे आणि समाधानी आहे.संकटात दुसर्याला मदत करणारा आणि आस्तिक सर्वाना बरोबर घेवून जाणारा आहे.
शनी आणि राहू केतू ह्यांच्याबद्दल अनेक वेळा लिहून झाल्यामुळे पुन्हा त्यांचा उल्लेख करत नाही.
आपल्या पत्रिकेतील ग्रह आपल्याला समजले तर आयुष्य सोपे होते , दिशा मिळते . आपण कुठे उभे आहोत आणि कुठवर जाणार आहोत ह्याचे मार्गदर्शन करणारे हे ग्रह आहेत . त्यांच्या अभ्यास आयुष्य दिशाहीन होण्यापासून वाचवतो हे नक्की .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment