Friday, 30 May 2025

संकेत

 ||श्री स्वामी समर्थ ||

 

काल गुरुचे नक्षत्र आणि कालच मला माझ्या ओळखीचे एक जण म्हणाले दत्ताच्या दर्शनाला जात जा गुरुवारी . काल गुरुवार नव्हता पण योगायोगाने दत्ताच्या देवळात दर्शन झाले. काल मी ज्या ठिकाणी गेले असताना समोरच्या गल्लीत जुने मोठे प्राचीन दत्त मंदिर दिसले. आत गेले पण ते बंद झाले होते तरीही शेजारच्या दरवाज्याने आतमध्ये गेले आणि  श्री दत्त , मारुती आणि देवीच्या मूर्तींचे सुरेख आणि शांतपणे दर्शन घेतले . ध्यानी मनी नसतानाही आज हे दर्शन झाले.  ह्या ठिकाणी मी ह्याहीआधी २-३ वेळा गेले होते पण इथे दत्ताचे देऊळ आहे हे मला कालच समजले. रस्ताच मला त्या देवळाशी घेऊन गेला कारण मी नेहमी वेगळ्या रस्त्याने जाते . निसर्ग अनेक संकेत आपल्याला देत असतो आणि डोळसपणे पाहिले तर ते आपल्याला अनुभवता येतात त्याचा  प्रत्यय आला. ज्या कामासाठी गेले होते ते काम होणार ह्याची ग्वाही माझ्या आतल्या आवाजाने मला दिली होती आणि त्याच आनंदात माझा सगळा दिवस गेला. 

देवळात एक विलक्षण उर्जा जाणवत होती . खोलवर विचार करता हा अनुभव साधा नाही तर ह्यात काहीतरी शुभ संकेत आहे हे नक्की. माझा आनंद आपल्याशी शेअर करावासा वाटला म्हणून ह्या दोन ओळी. आनंद आणि जगण्याचे निम्मित्त नेहमीच अश्या लहान गोष्टीत दडलेले असते त्याची पुनश्च प्रचीती आली .

श्री स्वामी समर्थ 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Thursday, 29 May 2025

500 ब्लॉग

 || श्री स्वामी समर्थ || 




महाराजांच्या कृपेने आज “ अंतर्नाद “ ह्या माझ्या ब्लॉग वरती ज्योतिष आणि अध्यात्म ह्या विषयावर 500 ब्लॉग लिहून झाले त्याबद्दल कृतकृत्य वाटते आहे. एक वेगळेच समाधान अनुभवत आहे. सर्व वाचक वर्गाने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे लिखाणात सातत्य राहिले हे सोळा आणे खरे . महाराजांची कृपा आणि आशीर्वाद जीवनात स्थैर्य , आनंद आणि समाधान देतात हे पदोपदी अनुभवत आहे. त्यांच्याच प्रेरणेने समाजाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करणारे लिखाण अविरत व्हावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


पुनर्वसु नक्षत्र –देणे माहित आहे घेणे माहित नाही .

 || श्री स्वामी समर्थ ||


ह्या वर्षातील पुनर्वसु नक्षत्राच्या सर्व तारखा लेखाच्या अंती दिलेल्या आहेत त्याचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. 


श्रीरामाचा जन्म हा पुनर्वसु नक्षत्रावर झालेला आहे. ह्या नक्षत्राची ओतप्रोत वैशिष्ठे श्री रामात सातत्याने पाहायला मिळतात .मिथुन राशीत १० अंशात विस्तारलेले असून कर्क राशीत 3 अंश 20 कला एक चरण आहे. गुरु आणि रवीची नक्षत्रे त्रिपाद आहे. रविचे नक्षत्राचे प्रथम पाद अग्नितत्वाच्या राशीत असून शेवटचे ३ चरण पृथ्वीतत्वाच्या राशीत आहेत . गुरुचे ३ चरण वायुतत्वाच्या राशीत असून शेवटचा पाद हा जल तत्वाच्या राशीत आहे.  गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे. आकाशाचे मोजमाप करता येत नाही .

आकाश म्हणजे एक पोकळी ज्याला आपण स्पेस म्हणतो. मला माझी स्पेस हवी आहे असे आजकाल जो तो म्हणत असतो . आकाश इतके असीम आहे अमर्याद आहे .आकाश हे पाण्यात मिसळलेले दिसते . आकाश कधी पाण्यात तर भूमीवर टेकलेले दिसते  आणि तिथे संपलेले दिसते . गुरु ह्या शब्दातच गुरुतत्व आहे. ह्या नक्षत्राचा स्वामी गुरूच आहे. 

गुरु म्हंटले कि ज्ञानाचे विद्वत्तेचे तेज . गुरु म्हंटले कि सुशील ज्ञानी देणारा शांत सुस्वभावी सगळ्यांचा विचार करत जीवनात पाऊल टाकणारी गुरुतुल्य व्यक्ती . ह्या सर्व गुणांची रेलचेल ह्यात असणारच . पुनर्वसु हे गुरुचे पहिले नक्षत्र देवगणी आहे. विशाखा हि आकाशातील वीज आहे आणि पूर्वा भाद्रपदा हे सुद्धा पुनर्वसु ची बरोबरी करू शकणार नाही. 

नक्षत्राची देवता अदिती आहे ती आदिशक्ती आहे जगन्माता आहे. ती सर्वांची माता आहे. अदिती म्हणजे न भंग पावणारी न तुटणारी आहे. निश्चल अखंड विशाल विस्तृत अश्या प्रकारचे प्रेम म्हणजे अदिती म्हणजे माता आणि माताच देवू शकते . अदिती सोशिक सहनशील स्वतः त्रास सहन करणारी गुरु तत्वाची देवता आहे. अदिती हि देण्याच्या मनोवृत्तीची आहे. 

पुनर्वसू ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाची मनोवृत्ती कशी असेल . ह्या नक्षत्रात विश्वव्यापकता आहे. मनापासून देण्याची वृत्ती आहे. दया ओलावा आहे. जेजे आपल्याशी ठावे तेते दुसर्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकलजन . हे साधेभोळे आहे. कृत्रिमता नाही. विचार वागणे स्वछ्य आहे.  नैसर्गिक सौंदर्याची आवड आहे मेकअप करणार नाहीत . सुशीलता ,  मांगल्याचे पावित्र्याचे सौंदर्य इथे आहे.  कृत्रिम काहीच नाही तर originality आहे. 

ह्या नक्षत्राचे ३ चरण बुधाच्या आणि १ चरण चंद्राच्या राशीत आहे. कर्क राशीमध्ये येणारे पुनर्वसुचे चौथे चरण पुष्कर योगात आहे . गुरु तत्वाचे नक्षत्र आणि चंद्राची रास आहे. पहिले ३ चरण हे बुधाच्या नक्षत्रात येतात . नक्षत्र बुधाचे म्हणू बुध ,वायू तत्वाची रास आहे. वायुगतीचा ह्या नक्षत्रावर परिणाम दिसतो. स्वामी बुध नक्षत्र गुरुचे , देवता अदिती , पुष्कर योग आहे. बुधाची बुद्धिमत्ता चलाख पणा ,त्याशिवाय तो व्यापारी होऊ शकत नाही , बुद्धिमान आहे. 

ह्या नक्षत्रात गुरूचे ज्ञान आणि जोडीला बुधाची बुद्धी आहे .  माता अदिती देवता आहे. मेष वृषभ मिथुन हे चरण स्वामी आहेत . राशी बुधाची नक्षत्र गुरुचे चरण मेषेचे वृषभ मिथूनेचे. योनी मार्जार आहे . मांजर कसेही पडले तरी पटकन उडी मारून उभे राहते तशीच वृत्ती ह्या लोकांचीही असते , काहीही संकटे आली तरी त्यातून उडी मारून पूर्वपदाला येतात , मार्ग काढतात .

पहिल्या ३ चरणावर बुधाने शिक्का मारला आहे आणि चौथ्या चरणावर चंद्राचा सहवास मिळाला आहे. माणूस भावनेच्या आहारी जातो तेव्हा तो फक्त भावनेत डूबतो.

रामाचा जन्म पुनर्वसू च्या चवथ्या चरणात झालेला आहे. गुरुतत्व म्हणजे देण्याची मनोवृत्ती . घेणे माहित नाही .पुनर्वसू नक्षत्राला देणे माहित आहे घेणे नाही हे महत्वाचे आहे .

वेळू म्हणजे बांबू वृक्ष हे त्याचे प्रतिक आहे. कृष्णाने बांबूची बासरी केली आणि त्यातून उमटणारे स्वर त्या क्षिद्रातून सर्वत्र जातात .बांबू हि वनस्पती पाण्यासारखी आहे. बासरीत जे सूर भरू ते ती प्रगट  करील. आकाशतत्वाची हि वनस्पती आहे. अदिती आणि गुरु सुद्धा स्वागत आदरातिथ्य करणारे आहे. जिथे देण्याला वाव आहे divotion आहे तिथे असतात . देताना घडवणे आणि शिकवणे हे वैशिष्ठ आहे. आई काय करते सदैव देते ,तशीच अदिती माता आहे आणि तश्याच मुलांना जन्म दिला आणि त्यांना घडवले.

बुधाचे बौद्धिक तेज , गुरूच्या सात्विक मनोवृत्तीचे आणि अदितीचा मातृत्व भाव बुधाच्या पहिल्या ३ चरणातून प्रगट होते.  चौथे चरण राशी स्वामी चंद्र इतरांच्या सुखासाठी काम करतो कारण हि चर राशी आहे सारखी फिरत असते. जीवनात चढ उतार असतातच . परिणामांचे भोग भोगायला लावतो. 

पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा वसवणे ,स्थापन करणे.  श्री रामाचे चौथे चरण होते गुरुचे , वर्गोत्तम नवमांश पुष्कर नवमांश होता आणि तरीही लग्नात लग्नेश होता रामाचे जीवन इतके कष्टप्रद दुक्खमय होते. 

हे गुरुचे नक्षत्र आहे . निसर्ग कुंडलीत गुरु भाग्याचा कारक आहे. बहुप्रसव असून अत्यंत सन्मानित असे हे नक्षत्र आहे. गुरूच्या सर्व वैशिष्ठ्यांचे मूल्य ह्यात आपल्याला जाणवते. मेष राशीचा नवमांश पुनर्वसू नक्षत्रात मंगळ आणि बुधाची जोड गणितज्ञ आणि त्यावर गुरुचे वर्चस्व . अशी माणसे व्यवहारी असतात ,गणित उत्तम असते .मातृत्वाची जाणीव असते . तपाचरणी असतात . निष्ठावान कर्तव्यनिष्ठ असतट , देणे माहित असते पण शांत असतात . रागवत नाहीत . निंदा करणारे स्तुती करणारे सगळे त्यांना आवडतात . व्यवहारी असतात बुधाच्या राशीत असतो. एखाद्या ज्ञानपीठाचे ते उपासक असतात . व्यापाराचे ज्ञान असते. मिथुन राशी हि बडबडी आहे. मेष राशी गुरुचे नक्षत्र आणि आदिती सारख्या देवतेचा वरदहस्त अत्यंत devotional व्यक्तिमत्व . मेष राशीत असणारे प्रथम चरण जरा तापट व्यक्तिमत्वाचे पण मंगळ आणि गुरु आहेत त्यामुळे इलेक्ट्रोनिक इंजीनियर, बँकेत काम करणारे गणित उत्तम असते. 


कुटुंबवत्सल असतात . ह्या नक्षत्राला इतर पापग्रहांची मिठी पडायला नको . त्यांनी ह्या नक्षत्रात आपले पाय पसरले तर ह्या लोकांना कुबुद्धी आणि कुमार्गाचा स्पर्श होतो.  जीवन जगायचे असेल तर जीवन त्यांना कळले हो मी पण पापग्रह आले तर जीवन प्राजक्त फुलापरी गळले हो.

बुधाजवळ अग्नितत्वा जवळ अहंकार आहे घमेंड आहे. इतरांना मी काय समजतो मी श्रेष्ठ आहे. मेष नवमांशातील लोक अहंकारी असतात ,करून दाखवीन अशी वृत्ती आहे. 

मंगळाच्या संपर्कात आलेला गुरु शुभ फळे देत नाही असे पाराशरीनी सांगितले आहे. एखाद्या मुलीच्या जिवनाची सेसेहोलपट थांबवायची असेल तर बुध आणि मेषेचे गुण लक्ष्यात ठेवून विवाह करावा लागेल.

पहिले चरण आव्हानात्मक आहे. करायचे आहे पण होत नाही अश्या अनेक गोष्टी प्रथम चरणात आढळतात . द्वितीय चरणात शुक्राचे नक्षत्र . हळूहळू भौतिक जगाकडे शुक्राचा कल जातो .ह्या राशीत येणारा ग्रह बुध शुक्र आणि गुरु ह्यांचे एकत्र जोड आहे. मंत्र विद्येचा कारक . शुक्राची कठोर परिश्रम करण्याची वृत्ती नाही जी प्रथम चरणात मंगळाची आहे. शुक्र हा गाद्यांवर लोळणारा ग्रह आहे ऐशोआरामात राहणारा आहे. पण हे गुरुचे नक्षत्र आहे त्यामुळे सत्शील मनोवृत्ती आणि निष्पाप असणारे कृत्य आहे. 

तिसर्या चरणात मिथुन नवमांश आहे. वायू तत्वाच्या राशीत वायू तत्वाचा किंवा आकाश तत्वाचा ग्रह म्हणजे नैसर्गिक कुंडलीतून मिळणारे फायदे .अलीकडे ग्रहांची भ्रमणे आणि त्यातून होणारी विनाशाची सूत्रे पृथ्वीवर घडताना दिसतात . दुसर्या चरणात स्वार्थ सुटत नाही. स्वतःच्या गरजा पूर्ण करून मग दुसर्याला देण्याची मनोवृत्ती आहे, शुक्राची वृषभ रास हि भौतिक सुखाची रास भौतिक जगाशी निगडीत आहे. बुध मित्र आहे शुक्राचा .अदिती देवता जरी असली तरी ऐशोआराम मजा मस्ती  सर्व आहे. 

पुनर्वसू नक्षत्र म्हणजे देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे .अश्या स्वभावाचे म्हंटले तर वावगे ठरू नये.

देण्याची वृत्ती अधिक आहे. गुरुचे नक्षत्र आहे आणि पहिले १० अंश बुधाच्या राशीत आहेत . बुध थोडा मिश्कील खोडकर बुद्धिमान पण टोपी बदलणारा ,लबाड आहे . योग्य वेळेला काय करायचे ह्याची चलाखी पण त्याच्याकडे आहे. बुध आणि गुरूचा संगम ज्ञान आणि बुद्धी . एखादे महत्वाचे कार्य करायचे असेल आणि मतभेद होणारे लोक एकत्र आले तरी सूर जुळवून त्या कार्याची यशस्विता साधण्याचे गमक निर्माण होते. ज्ञानी माणसे अंतर्मनाने एकमेकांचा आदर करतात . आपुलकी असते आतून . बुधाबद्दल तिरस्कार वाटत असला तरी त्याचे सौंदर्य मोहकपणा हे गुरूला भावला आणि त्याने बुधाला आपलेसे केले. गुरु हा ग्रहच असा आहे कि गुरु ह्या शब्दातच त्याचे गुरुत्व साठलेले आहे. गुरुचे हे पहिले नक्षत्र आहे . दुसर्याला आनंद देणारे आणि पुन्हा पुन्हा तेच काम करणारे.

कर्णाचे  व्यक्तिमत्व आहे. दानशूर आहे. देण्याची वृत्ती आहे. देवता आदिती आहे तिच्या मात्वृत्वाची भावना जास्ती आहे. गुरुतत्व असून चालणार नाही पण त्यात असलेला सखोलतेच किंवा विस्तृत शक्तीचा भाग समजून घ्यायला पाहिजे.म्हणून पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये अनेक गुण आहेत पण कुठल्या वेळेला कुठल्या गुणांचा वापर करून व्यक्तिमत्वाची समृद्धता वाढवायची ह्यासाठी गुरु तत्वाच्या व्यक्तीचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.योग्य दिशा दाखवणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस भरकटत राहतो.  वाल्मिकी ऋषींच्या अंगी जी क्रूरता होती त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी चिकाटी , जिद्द सहनशीलता , श्रद्धा आत्मविश्वास संयम होता म्हणून नारदासारखा गुरु मिळाला आणि म्हणून त्याचेही एखादे पुनर्वसू नक्षत्र असेल म्हणून अत्यंत निष्ठेने राम हा शब्द माहित नसूनही मरा  मरा म्हणून आपल्या जीवनाची पूर्तता केली. 

अश्या प्रकारे एका खालच्या स्थरातून तो उच्च कोटीच्या स्थरापर्यंत जाऊन पोहोचला. पुनर्वसू नक्षत्रातील लोकांना हि गोष्ट सहज साध्य होण्यासारखी आहे. समाज सेवेत सुद्धा कार्य करणारे महान व्यक्तिमत्व ह्यात आहेत . देणे हे ज्या नक्षत्राला माहित आहे ते नक्षत्र त्या व्यक्ती मत्वाला उंचीवर घेवून जावे. 

ह्या जगात आपण आलेलो आहोत तर जे आपल्या व्यक्तिमत्वातील देता येयील ते द्यावे. अमर व्हायचे असेल तर देता यायला हवे.  ज्ञान द्या सेवा द्या विचार द्या . अंतकरणातले प्रेम द्या.  कुणाचेही कल्याण करा .पुनर्वसू नक्षत्र आदिती ह्या देवतेकडे गेले आहे. अदितीची श्रद्धा पुत्र साठी केलेली तपश्चर्या , संयम , सारासार विचार , धार्मिकतेचा सुगंध , प्रत्येक गोष्टीच्या निर्मिती मागे असलेली तत्वज्ञानाची बैठक तिच्यात आहे. ती देवांची पुत्री आहे तिने देव निर्माण केला म्हणजेच पुनर्वसू. फुल गळते बीज तयार होते आणि त्यातून असंख्य वृक्ष पुन्हा तयार होतात . 

म्हणूनच एखाद्या कार्याची पुनरावृत्ती जर आपल्याला हवी असेल तर जसे गाडी घेणे भाषण देणे , घर घेणे . गुरुचे हे पहिले नक्षत्र ,मोहक आकर्षक आणि सर्वांसाठी हितकारक आहे. देवगणी नक्षत्र आहे. विशाखा  पूर्वाभाद्रपदा ह्या तुलनेने कमी पडतात . प्रत्येक नक्षत्राच्या अंतकरणात जावून त्याचे काय स्वरूप आहे ते समजून घेतले पाहिजे त्याशिवाय त्याला आपण वाईट म्हणून शकत नाही. 

गुरु हि व्यक्ती नाही तर हे एक तत्व आहे. तत्त्वातून व्यक्तिमत्व निर्माण झाले. इतके मोठे अंतरीक्ष त्याने कवेत घेतले आहे त्याचा तो राजा आहे गुरु . 

गुरु तत्वाच्या नजरेतून जगाकडे बघू तेव्हा मनोरम असे शांत व्यक्तिमत्व दिसेल.  बुधाच्या राशीतील हे ३ चरण अतिशय बुद्धिमान आहेत . वेगवेगळे शोध लावणे. ग्रह्परत्वे, ग्रहांच्या दृष्टी प्रमाणे त्यात वेगवेगळे पदर उलगडले जातात हे निश्चित. मोठ्या विस्तृत प्रमाणात एक नक्षत्र किंवा ग्रह पूर्ण फलित देवू शकत नाही त्याला इतरांचीही साथ असावी लागते.  ह्याला इतरांनी चांगली साथ दिली तर त्याचे गुणांना प्रकाशाचे वलय प्राप्त होईल.

ज्यांच्याकडे हे नक्षत्र आहे त्यांची स्मरणशक्ती तीव्र आहे. अश्या लोकांच्या वयाला बुद्धीचे बंधन नाही . ३ वर्षाची मुलगी गीता पाठ म्हणून दाखवते. उत्तम स्मरणशक्तीला दिलेला गुरूचा आशीर्वाद . ह्या नक्षत्राचे वैभव किती मोठे आहे बघा . व्यावहारीकता असली तरी दुसर्यासाठी झिजणे हि गोष्ट इथे आहे. हे अमर्याद आहे त्याला बंधन नाही चौकटी नाही सिमाविहीन आहे. अनंत हस्ताने देणारे हे नक्षत्र आहे. अशी माणसे भारतात किती होवून गेली .संत एकनाथ तुकाराम हे गुरुतत्वाचे आहेत. 

ह्या नक्षत्राला आत्म्याचे नक्षत्र म्हंटले जाते. गुरु आणि गोविंद दोन्ही खडे आहेत मी प्रथम कुणाला नमस्कार करू. प्रत्यक्ष गोविंद सांगतो कि गुरूला नमस्कार कर कारण तोच तुला घडवणार आहे.

तोच तुला माझ्यापर्यंत कसे यायचे ह्याची वाट दाखवणारा आहे म्हणजे तू पटकन माझ्यापर्यंत येशील नाहीतर आधांतरी राहशील. किती मोठी उदात्त भावना आहे हि. म्हणूनच गुरुचे नक्षत्र हे आत्म्याचे ,मोक्षाचे नक्षत्र आहे कारण आत्म्याच्या मधूनच वाट जाते ती पारलौकिक जगापर्यंत देव तत्वापर्यंत , गोविंदापर्यंत . हे नक्षत्र प्राप्त झाले तर देवाची कृपा समजा. 

वेळू हि वनस्पती दिली आहे. वेळू हा गरिबांची झोपडी बांधायला उपयोगी येणारा तर जाताना आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली साथ देणारा . गुढ्या तोरणे बांधणारा ,गरीब आणि श्रीमंत सर्वांसाठी कृपाछत्र धरणारा असा हा वृक्ष आहे. वेळू हा वृक्ष हा दिला आहे वाढतो किती उंच त्याला खात पाणी लागत नाही एकदा लावला कि वाढत जातो आभाळाला स्पर्श करायची त्याची मनोकामना असते.  पुनर्वसू नक्षत्राची लोक अशीच असतात त्यांना ना कुणाचे प्रेम हवे ना कुणाची स्तुती नाही मिळाली तरी रडत बसणारी माणसे नाहीत . स्वतःच्या व्यक्तिमत्वाची उंची हि स्वतःच्या कर्तुत्वाने अशी आभाळाला स्पर्श करण्याची त्यांच्या ह्या नक्षत्राच्या गुणांमुळे ताकद असते .

हि माणसे कुणाची निंदा नालस्ती करत नाहीत ,हर्ष उल्हासित होत नाहीत. जो आवडतो सर्वाना तो आवडे देवाला. हाच आहे पुनर्वसू नक्षत्राचा देवदूत आहे. परमेश्वर म्हणजे काय ? जी दिसत नाही तो कसला देव . मग कश्याला देव मानायचा आम्ही मानीत . हे तत्व आहे माणुसकीचे उद्धाराचे , चांगुलपणाचे आणि तोच आहे देव आणि तेच आहे पुनर्वसू नक्षत्र आहे. ज्याच्याकडे आले आहे तो समृद्धता घेवून आला आहे ,लक्ष्मी घेवून आला आहे. कर्क राशीत एक चरण वर्गोत्तम होवून पुष्कर नक्षत्रात गेले आहे. ह्या २ पदांना वर्गोत्तम होण्याचा मान मिळाला आहे. तिसरे पद मिथुनेत आणि चौथे पद पुष्कर नवमांशात कर्केत वर्गोत्तम आहे. कुठल्याही नक्षत्राला हा बहुमान मिळाला नाही.

उत्तम बुद्धीने लेखन करून उत्तम उत्कृष्ट साहित्य निर्माण करणारे ज्ञानी लोक कवी साहित्यिक आहेत. साहित्य निर्माण करणारे ज्ञानी लोक आहेत .  उत्त्पन्न निर्माण करून सृजनशीलता  , सहनशीलता निर्माण करणारे लोक इथे आहेत .ज्याला मुले होत नाहीत त्यांना अपत्य होत नाही त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरवात ह्या नक्षत्रावर करायला हरकत नाही. पुनर्वसू नक्षत्र हे देणारे आहे ,अपत्य प्राप्तीचे आहे. समतेचा भाव आणि आनंदाचा परमोत्कर्ष देणारे हे नक्षत्र आहे. 

चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माची पताका फडकवणारे 18 पगड जातीचे लोक एकत्र आले आणि माऊलींचा गजर करू लागले. मुक्ताबाई होती ज्ञानेश्वर होते गोरा कुंभार , सावतामाळी , पितांबर शिंपी , जनाबाई होती, कान्होपात्रा होती.हे सर्व एकत्र एकाच धाग्याने बांधले होते हे आहे पुनर्वसू नक्षत्र . देणे आणि समतेचा भाव असणारे . हि आहे पुनर्वसू नक्षत्राची खरी थीम.हे त्याचे खरे अंतकरण.हि आहे प्रेमाच्या उत्पन्नाची शक्ती हि आहे एक एकमेकाच्या आदराची आणि एकमेकासाठी समर्पित भावना निर्माण करणारी शक्ती. इतके सुंदर नक्षत्र मानवतेच्या जागी जगणारे नक्षत्र मिळाले तर स्वतःला धान्य मानायला हरकत नाही.

इथे मांजरीचे प्रतिक आहे हे चर नक्षत्र आहे. मांजर कशी आहे जो विनाश करतो धनधान्याची वाट लावतो त्याचा विनाश करणारी आहे. समाजात वाईट कृत्य करून समाजाचा विनाश करणारी जी लोक आहेत त्यांचा विनाश करणारी लोक इथे आहेत . गुरुतत्व आहे . इथे पापग्रह असतील तर दुर्घटना घडेल.

वसुदेव कुटुंबकम ह्या भावनेने प्रेरित झालेले हे गुरुतत्व.अंतकर्णातून समाज घडवणे हे पुनर्वसू आहे. हे नक्षत्र म्हणजे दया क्षमा शांती अध्यात्माचा धागा , ज्ञान ग्रहण करून ज्ञान देण्याची वृत्ती.  प्रबोधनकार कीर्तनकार हे ह्या नक्षत्राचे आहेत . बुधाच्या नवमांशाला विचक्षनांश म्हंटले आहे म्हणजे अति बुद्धिमान .

इथे मुख्य गुरु आहे. एखादा अवयव वाढणे , गाठी वाढणे. जिथे वाढ होत असेल तिथे गुरूचा प्रभाव असतो. कावीळ होणे. घशाचे विकार कफ होणे नुमोनिया होणे फुफुसाचे विकार होणे. tonsil सुजणे. हे नक्षत्र बिघडले तर हे आजार होतात. पापग्रहाच्या सोबत , पाप ग्रहांच्या दृष्टीत हे आजार विकार उत्पन्न होतात. 

संगती संग दोषेण. पुनर्वसू नक्षत्राचे उत्तम फळ मिळण्यासाठी महादेवाची सेवा करावी. जप करावा. हे लोक अंतर्स्फुर्तीने बोलतात त्यांना ६थ सेन्स असतो.ते बोललेले खरे होते. 

पुनर्वसू नक्षत्र पुन्हा वसणे , ह्या नक्षत्रावर केलेली एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होते म्हणूनच आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना ज्या पुन्हा अनुभवायला आवडतील जसे घर खरेदी , परदेशगमन , वास्तू , वाहन , जमीन विकत घेणे , दागिने , FD करणे ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावर कराव्यात ज्या पुन्हा पुन्हा होतील . विवाहाला हे नक्षत्र वर्जित आहे . विवाह म्हणजे शुक्र आणि गुरु अध्यात्म मोक्ष त्यामुळे ह्या नक्षत्रावर विवाह करू नये . एखादी सर्जरी केली तर पुन्हा होईल म्हणून तीही करू नये. 

२०२५ सालातील पुनर्वसू नक्षत्र ज्या दिवशी आहे त्यांचे दिवस वेळ देत आहे म्हणजे त्या दिवसाचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता जसे एखादा संकल्प करणे , दानधर्म करणे , घर वाहन दागिने खरेदी वगैरे .

२९ मे- रात्री १०.३८ ते ३० मे रात्री ९.२८ पर्यंत २६ 

२६ जून – सकाळी ८.४६ ते २७ जून सकाळी ७.२१ पर्यंत 

२३ जुलै  - संध्याकाळी ५.५४ ते २४ जुलै संध्याकाळी ४.४३ पर्यंत 

२० ऑगस्ट -  पहाटे १.०७ ते २२ ऑगस्ट १२.२७ ( मध्यरात्री ) पर्यंत 

१६ सप्टेंबर  - सकाळी ६.४६ ते १७ सप्टेंबर सकाळी ६.२५ पर्यंत 

१३ ऑक्टोबर - दुपारी १२.२६ ते १४ ऑक्टोबर सकाळी ११.५३ पर्यंत  

९ नोव्हेंबर  रात्री ८.०४ ते १० नोव्हेंबर संध्याकाळी ६.४७ पर्यंत 

७ डिसेंबर  सकाळी ६.१३ ते ८ डिसेंबर  पहाटे४.११ पर्यंत

पुनर्वसू ह्या गुरूच्या शुभ पवित्र नक्षत्रावर आपल्या कुलस्वामिनी , सद्गुरू , इष्ट देवतेचे नामस्मरण सुरु करावे म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत राहील. कुठल्याही शुभ गोष्टी वृद्धिंगत व्हाव्यात हीच सदिछ्या . 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


  


Sunday, 25 May 2025

कर्म कसे असावे

 || श्री स्वामी समर्थ ||


वर्तमानकाळात जगायला शिकवणारा शनी आहे. संसाराची जबाबदारीने स्वीकार करून  पुढे चालत राहणे हा शनीचा विचार आहे. भोगा आणि मुक्त व्हा हा मानवाला त्याचा संदेश आहे. जीवनात जे जे म्हणून अटळ आहे त्याच्याशी शनीचा संबंध जोडला जातो . जन्म जन्मांतरीच्या प्रवासात  शाप , वरदान आणि शपथ ह्या गोष्टींचा हिशोब ठेवणारा शनी आहे.  शनीचे वडील म्हणजे रवी ,शनी सूर्यपुत्र आहे.  रवी  हा आत्म्याचा कारक असून शनी आत्मनिरीक्षण करतो. एकलकोंडेपणा हे शनीचे  कार्येकत्व आहे. शनीच्या अमलाखालील व्यक्ती मितभाषी असतात , वायफळ बडबड करणार नाहीत . बुध चंद्र शुक्राचा माणूस गप्पा मारेल. त्रासाचे अंतिम टोक शनी देतो तसेच ऐश्वर्याची खैरात करणारही शनीच आहे . साडेसातीत शनी माणसाला जागेवर आणतो नव्हे त्याची लायकी दाखवून देतो . कामापुरते वापर करणार्यांना चांगलाच धडा शिकवतो .

चंद्र म्हणजे मन आहे. त्या मनाला जगाचा पूर्ण अनुभव देवून सत्याच्या दुनिया दाखवणारा शनी आहे. चंद्र म्हणजे माया आणि शनीला मायेचा तिटकारा आहे आणि म्हणून तो चंद्राला साडेसाती लावतो. कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य लक्ष्यात घेवून काम करावे हे शनीचे सूत्र आहे.  चिकाटी संयम चिवटपणा चिकित्सा प्रगल्भता शनीकडे आहे आणि प्रत्येक गोष्ट का आणि कशी ते शनीच आपल्याला दाखवत असतो . शनी हा थंडपणाचा ग्रह आहे . गुरूसारखा हा ज्ञानी नसून तत्वनिष्ठ आहे.  साडेसातीला सगळेच घाबरतात . साडेसाती म्हणजे  चंद्राचा शनीकडून झालेला अस्त आहे . साडेसातीत मनाचा अस्त होतो , पुद्धीचा पराभव होतो आणि अहंकाराचा नाश होतो . संपूर्ण मन ढवळून टाकणारा शनी साडेसातीत परीक्षा घेतोच . साडेसातीत आपण आपले कर्म कसे करतो ह्यावर बरेच काही अवलंबून असते . साडेसातीत माणूस अक्षरशः नव्याने घडताना दिसतो..साडेसातीत सद्विचार करून  नितीमत्तेने चांगले आचरण केले तर नक्कीच भरभराट होते आणि चुकीचे अनीतीने घेतलेले निर्णय अधोगतीस कारणीभूत ठरतात , माणूस रसातळाला जातो जे नक्की . स्थानबदल  शनीच करू शकतो . 


आज आळस केला तर उद्या चा दिवस शनी तुम्हाला दैन्य देणारच . दैन्य आणि आळस ह्यावर शनीचा अंमल आहे. त्याच्याकडे आपला सगळा लेखाजोखा असतोच . उकिरडा म्हणजे पण शनीच आहे. नको असलेल्या गोष्टी आपण कचर्यात टाकतो . शनीला नेमके हेच तर हवे असते . आयुष्यात अनेक मोहाचे क्षण समोर येतात त्या क्षणांच्या मोहात  न पडता राजमार्गाने आयुष्य व्यतीत करणे ज्याला जमते तो शनी महाराजांच्या कृपेचा धनी ठरतो . आपण ह्या प्रलोभनांना फसतो का ह्याचे निरीक्षण दूर उभे राहून शनी महाराज करत असतात आणि आपल्या प्रत्येक कर्माचा हिशीब ते ठेवत असतात .जाणते आणि अजाणते पणी केलेल्या कर्माचा हिशोब चुकता करणारा असा हा शनी आहे. आपल्या हातातील मधले बोट हे शनीचे आहे आणि ते सर्वात उंच आहे. म्हणजे आपली कर्मे कशी असायला हवीत हे आपल्या हातानीही आपल्याला सूचित केले आहे. म्हणजेच कर्म हे सगळ्यात महत्वाचे आहे हेच तर सूचित करायचे असते ह्याला .

पत्रिकेत ६ ८ १० आणि १२ ह्या स्थानाचे कारकत्व शनीकडे आहे.  षष्ठ हे दशमाचे भाग्य आहे .म्हणजेच कर्माचे भाग्य म्हणून षष्ठ स्थानाकडे पहिले जाते . कर्माची सुरवात इथेच आहे. शत्रू इथेच निर्माण होतात पण इथेच आपल्या संयमाची कसोटी लागते . कामगारांवर आपली प्रगती असते, घरातील बाई एक दिवस आली नाही तर ढीगभर कामाचा डोंगर आपल्यावर पडतो आणि तिचे महत्व समजते. 

आपल्या हाताखालच्या लोकांना खुश ठेवाल तर शनी खुश राहणार आहे कारण चतुर्थ श्रेणी शनीच्या खाली येते. षष्ठ स्थान हे रोगाचे स्थान आहे . मनुष्याला आजार रोग होतो याचाच अर्थ त्याचे चुकीचे कर्म त्याच्यासमोर आजाराच्या रुपात उभे राहते.  आजार झाला तर त्या यातना ज्याच्या त्यालाच भोगाव्या लागतात . त्यात कुणीही वाटेकरी होऊ शकत नाही . अष्टम स्थानाचा कारक शनी आहे आणि मृत्यूचा कारकही शनीच आहे.  अध्यात्माचा कारकही शनीच आहे. मोक्ष त्रिकोणातील मध्य म्हणजे अष्टम स्थान आहे. आसक्तीचा नाश शिकवणारे हे स्थान आहे.  सहज मिळालेला , चुकीच्या मार्गाने घेतलेला , भ्रष्टाचार करून घेतलेला पैसा ,वाम मार्गाने मिळवलेला पैसा , लाच लुचपत इथे येते . कमी श्रमात कष्टात मिळालेल्या पैशाचे धिंडवडे काढून त्याचा व्यय करण्याचे काम शनीच करतो . दुसर्याला त्रास देवून दुखी करून योग्य मोबद्ल्यापेक्षा जास्ती मिळालेला पैसा  हा आरोग्य बिघडवून दवाखान्यात  जिरवण्याचे  काम शनीच करतो . दशम स्थान हे लग्नाच्या खालोखाल असलेले स्थान . आपले कर्तुत्व आणि कर्तव्य जपायला सांगणारे हे स्थान आहे. प्रत्येक माणसाची कार्य करण्याची  धमक इथूनच आपल्याला समजते.

आयुष्यातील यशापयश , अधिकार  योग , पितृसौख्य हे आपल्या कर्मावर अवलंबून असते आणि ते अवलंबून ठेवणारा शनी ह्या दशम स्थानाचा कारक आहे आणि म्हणूनच  दश्माच्या समोर सुखस्थान येते . झोपेसह सर्व सुख मनुष्याला द्यायची कि नाही हे ठरवणारा शनीच आहे कारण हे सर्व तुमच्या दशमातील कर्मावर अवलंबून असते. 

शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि वैराग्याशिवाय  मोक्ष नाही.  परलौकिक  आणि परदेशी नेण्याचा कारक शनीच आहे. मृत्यू मोक्षापर्यंत नेण्याचे कार्य अष्टमस्थानातून  आणि व्ययातून होते . व्ययस्थान तसेच  गुंतवणुकीचे स्थान आहे. गुंतवणूक पैशाची असो अथवा पुण्याची ती करावीच लागते .


पैशाची योग्य गुंतवणूक आयुष्य सुरक्षित करते .तसेच योग्य ठिकाणी केलेले दान आपले पुढील जन्माचे संचित सुरक्षित करत असतो आणि हे शनीच करत असतो . जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळवण्यासाठी ह्या स्थानांकडे डोळसपणे बघावे लागते . शनीच्याच डोळ्याने पहिले तर आपण मोक्षापर्यंत नक्कीच पोहोचू आणि म्हणूनच शनीच्या दोन्ही राशी ह्या उदित गोलार्धात आहेत . कर्माच्या शेजारीच लाभ आहेत . जसे कर्म करणार तसे फळ मिळणार हे सांगणारे म्हणून दशमाच्या शेजारी लाभस्थान ठेवलेले आहे. हा संदेश देणारा शनीच आहे.  शनी हे कालपुरुषाचे दुक्ख आहे. सृष्टीतील कुठलीही गोष्ट त्याच्या इच्छेशिवाय नाश पावत नाही . जे जे अटळ आहे त्याच्याशी शनीचा संबंध आहे.  स्वकर्म आपल्याला शनीमहाराज शिकवतात . स्वकर्म केले नाही तर साखळदंडानी बांधलेल्या हत्तीसारखी स्थिती होते . 


सिंह मेंढरासोबत राहिला तर त्यांच्यासारखाच वागायला लागतो , त्याच्यातील क्षमता त्याला समजत नाहीत किबहुना  त्यांचा विकासच होत नाही .हत्तीला साखळ्यांनी बांधले तर त्याची क्षमता विकसित होणारच नाही . त्याला आपले शौर्य काय आहे हे समजत नाही . कर्म योग हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला . कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कर्ममार्ग हा राजमार्ग आहे . कुणीही ह्या मार्गावरून चालून मोक्षापर्यंत नक्कीच जावू शकतो . शनीला भावना नाहीत असे अजिबात नाही .  शनी कठोर आहे ,मृत्यूचा कारक आहे, वाईट आहे , दिसायलाही चांगला नाही ,मोक्षाचा कारक आहे हे सर्व ठीक पण त्याला भावना नाहीत असे नाही . काम त्रिकोणातील पूर्णत्वाला पोहोचलेली कुंभ रास हि शनीचीच आहे . सेवा करणे , जबाबदारी स्वीकारणे तसेच कर्तव्य निभावणे ह्यासाठी माणसाच्या गुढघ्यात शक्ती लागते ती शनी देतो . ज्यांचे गुडघे दुखतात ज्यांना पावलागणिक  चालता येत नाही त्यांना यातना होतात . गुडघा म्हणजे मकर रास आणि गुडघे दुखतात तिथे शनी असतो . म्हणूनच शनीचा कर्मयोग समजून घेतला पाहिजे . एखाद्या उत्तम प्रवचन करणाऱ्या व्यक्तीकडे अफाट ज्ञान असते ,त्याने उत्तम प्रवचन केले आणि घरी येवून गार चहा किंवा जेवण दिले म्हणून पत्नीला मारले तर त्या प्रवचनाचा काहीच उपयोग नाही .आपण जे जे बोलतो ते कृतीत आले पाहिजे . नुसते बोलून उपयोग नाही तर व्यवस्थित कर्म केले पाहिजे हा शनीचा संदेश आहे. 

क्रीयेविणा वाचाळता व्यर्थ आहे. कर्तव्यातून आपले कर्मही फुलायला पाहिजे आणि ह्या सर्वाची सुरवात म्हातारपणी नाही तर समज आल्यापासून झाली पाहिजे. उत्तम कर्मयोगाचे बाळकडू मुलांना लहानपणीच पाजले पाहिजे .

पत्रिकेमधल्या शनीच्या चांगल्या वाईट स्थितीवरून जातकाच्या अंतकरणाचे दालन समजते . शनी पत्रिकेचा समतोलपणा बिघडवतो .जितका शनी शुभ तितके दुक्ख कमी आणि जितका शनी अनिष्ट तितके दुक्ख अधिक हे समीकरण आहे. जेव्हा जन्म शनी स्तंभी असतो तेव्हा तो व्यक्तीला स्थिरत्व देतो ,जातक कुठलाही बदल करण्यास तयार होत नाही.  जेव्हा एखादा ग्लास भरलेला आहे आणि शनी सांगत आहे कि तो उचलून ठेव आणि आपण ठेवत नाही तेव्हा शनी तिथे शासन करायला तयार आहे. 

ज्यावेळी गोचर भ्रमण करताना शनी आपल्या जन्म अंशावरून जातो तो काळ अनिश्चिततेचा असतो हे नक्की. शनीवरून शनी जाणे, चंद्रावरून रविवरून शनीचे भ्रमण तसेच चंद्राच्या समोरून शनी जाणे हे त्रासदायक असते. शनी जेव्हा वक्री असतो तेव्हा तो त्याच्या कारक गोष्टीना चालना देत नाही  त्यामुळे जातकाला असुरक्षित वाटते. 

बाह्य स्थितीविषयी जातकाच्या मनात संशय निर्माण होतो आणि जातक चुकीच्या मार्गाने जावू शकतो ज्याचे परिणाम त्याला दीर्घकाळ भोगायला लागतात . वर्षातून 4 महिने शनी वक्री असतो . म्हणून  नशिबावर अंमल करणारा आणि perfection कडे नेणारा आणि दिरंगाई केली तरी त्यातून संधी देणाराही शनीच आहे. 

शनी हा नारदाचा अवतार आहे , अध्यात्म विद्येचा कारक आहे. आपल्या सामर्थ्याने मानवाला काळाची सुस्पष्ट ओळख करून देणे हे शनीचे कारकत्व आहे . स्तुतीला किंवा खोट्या आराधनेला शनी कधीही भुलत नाही आणि भीतीपोटी केलेल्या नमस्कार त्याला रुचत नाही. कुठल्याही गोष्टीचे मर्म जाणून ,त्या गोष्टीचे गांभीर्य जाणून काम करावे हे त्याचे सूत्र आहे . कालभैरव हे शनीच्या मंत्रालयातील सचिव आहेत . अहंकारयुक्त कर्म करणार्यांच्या फाईली पहिल्यांदा शनीच्या मंत्रालयात जातात आणि त्याचा एक PAN Number तयार होतो. काही फाईली गुरूच्या मंत्रालयाकडे जातात कारण त्यांना गुरुकृपेचा स्पर्श असतो . शनीचा जन्म हा अमावास्येला झाला हे लक्ष्यात घेतले तर तिन्हीसांजेला किंवा प्रदोष समयी केलेली शिवाची आराधना हि नक्कीच प्रभावी ठरते .

गोचरीचा शनी हा त्याच्या ६ व्या भावाला नेहमी त्रास देत असतो .सेवा करणे , जबाबदारी स्वीकारणे आणि कर्तव्य निभावणे ह्यासाठी शनीमहाराज सारखे काहीतरी सांगत असतात कि कर्म कसे करा .शनीमहाराज निर्णय घ्यावा अशी स्थिती निर्माण करतात . कित्येक पिढ्यांना पुरेल इतके पुंजी देण्याच सामर्थ्य त्यांच्याकडे  आहे.  सर्व अडचणींवर मात करणे, सहनशीलतेचा कळस गाठणे आणि मोठ्या समुदयाचे नेतृत्व करणे हे शनीकडे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचे यजमानत्व हे शनीकडे आहे . एकत्र कुटुंब पद्धतीत जो घरातील मोठा माणूस असतो तो आपल्याला कठोर भासतो ,त्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात त्याच्याकडे एक शिस्त असते आणि तो मनुष्य कुणाला आवडत नाही हे कारकत्व शनीचे आहे. शनीचे वय ३५ हे आहे पण वय वर्षे ५२ नंतर शनीचा अंमल आपल्याला दिसतो .३५ ते ४२ हि शनीची वर्षे आहेत . 4 8 12 ह्या राशीमध्ये शनीची स्वतःची नक्षत्रे आहेत .शनी आपल्या स्वतःच्या राशीत जितके फळ देत नाही तितके फळ शनी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात देतो . ४ ८ १२ मध्ये शनी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात उत्तम फळ देतो . तरुण पिढीने शनीच्या संदर्भात काही विचार घेतले पाहिजेत .जास्ती विचार जीवनात त्रासदायक असतात . जीवनाचा पूर्ण स्वीकार हा ईश्वरी साक्षात्काराकडे आपल्याला नेत असतो . खरतर आपले आयुष्य साधे सोपे असते पण आपणच ते गुंतागुंतीचे करत असतो . आपण कुणावर प्रेम करतो आई मुलांवर पती पत्नीवर प्रेम करतो . हे प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही तर समोरच्याचा पूर्णत्वाने केलेला स्वीकार आहे हे आपल्याला समजावून सांगणारा शनीच आहे.  जीवनाला चांगली दिशा द्या हे सांगणारा शनी आहे. जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जीवन जगायला पाहिजे.  दुसर्याच्या अनुभवाने माणूस शिकतो पण स्वतःच्या अनुभवाने तो शहाणा होतो. जीवन म्हणजे अद्भुत वर्तमान आहे हे सांगणारा शनी आहे. आपल्या उदरात पोटामध्ये शनी आहे आणि आपल्या नाभीत रवी आहे. त्यामुळे उदाराचा संकोच म्हणजे शनीचा संकोच आहे. जेव्हा मनुष्य लयबद्ध कपालभाती करतो तेव्हा शनीचा संकोच होतो आणि रविचे नाभितील तत्व हे ऊर्ध्वमुख होते आणि मनाचा चंद्रमा आहे तो अंतर्मुख होतो . त्यामुळे कपालभाती हा साडेसातीवरील एक उत्तम उपाय आहे.  आपल्या शरीरातील रावितत्व चेतवणे हे काम कपालभाती करते. शनीचा संबंध जीर्णोद्धाराशी आहे.  वाताहातीतून निर्माण झालेले साम्राज्य हे शनीचे साम्राज्य आहे. शनी हा माणसाला कधीही आत्महत्या करायला लावत नाही . मात्र तत्कालीन स्वार्थाला , सुखाला चटावलेले इतर ग्रह  जेव्हा शनीच्या तात्त्विक विचारांना झुगारून देतात तेव्हा मनुष्य निराशेतून  आत्महत्येला प्रवृत्त होतो.जीवन एक जबाबदारी आहे आणि हि जबाबदारी स्वीकारायला माणसे तयार नसतात .सध्याच्या सद्य स्थितीत लोकांना लग्न करायचे आहे  पण मुलांची जबाबदारी नको फक्त मजा करायची . अश्या माणसांना कृतघ्न म्हणतात . तरुणींना विवाह करायचा आहे पण त्यांना घरच्यांची जबाबदारी नकोय . थाटात सप्तपदी करायची आहे , fashan म्हणून कुंकू लावायचे आहे  पण जीवनात समर्पण भाव आणायचा नाही . संसारात सतत तुझे माझे करायचे आहे त्याला जीवन म्हणत नाहीत . साडेसाती आली म्हणून ओरडणाऱ्या मंडळीना  जीवनातील जबाबदारी स्वीकारून पुढे चालत राहणे हाच शनीचा तत्व विचार आहे. पृथ्वीच्या ७०६ पट शनी मोठा आहे.  सूर्याभोवती २९ वर्षे आणि ६ महिन्यात तो प्रदक्षिणा करतो आणि एका महिन्यात तो एक अंश जातो . वर्षातून १४० दिवस तो वक्री असतो आणि वक्री अवस्थेतून मार्गी होताना ५-६ दिवस  तो स्तंभी असतो .  तो भित्रा ,लाजाळू आहे .समाजापासून दूर राहणारा आहे.  विचारवंत आहे तितकाच हट्टी आणि दुराग्रही आहे, निराशावादी आणि खिन्न प्रकृतीचा पण धूर्त आहे. फसवेगिरी करणारा , स्वार्थाला जपणारा आहे.  धनु राशीमधील शनीला कोदंड शनी म्हणतात .तो तत्वज्ञानी आणि सहनशील ,काटकसरी आहे. 

ज्या क्षणी जीवन नकोसे वाटते त्या क्षणी ते संपवता येत नाही आणि ज्या क्षणी जीवनाचा खरा अर्थ समजतो तेव्हा जगायचं क्षण सुद्धा संपलेला असतो म्हणून आपला जन्म नक्की कश्यासाठी झाला आहे ह्याचा विचार माणसाने केला पाहिजे . निसर्ग हा शिस्तबद्ध आहे ,ऋतुमागून ऋतू येतात .सगळे वेळेत असते . करोनामुळे माणसे घरात आहेत पण सूर्य उगवतोच आहे आणि त्याह्या वेळेत मावळतो सुद्धा आहे.  त्याच्या वेळेत फळे फुले पिके देणारा हा निसर्ग आहे. हा निसर्ग शिस्तीचा आहे इथे शनी महाराज आपल्याला सांगतात कि निसर्गाकडे बघा  .म्हणूनच निसर्गात सकाळी फिरायला जा. आपल्या आचरणाला  आनंद दायी चौकट जर आखून घेतली तर  आपले जीवन आनंद दायी होणार आहे. 

कर्मयोग हा संतानी आणि त्यांच्या सहचारिणीनी सुद्धा आचरणात आणला होता . गोरा कुंभार आणि त्यांची पत्नी  कामासाठी गेले होते.  गोरा कुंभार पुढे चालत होते आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यामागून चालत येत होत्या . चालताना गोरा कुम्भाराना मातीत एक सोन्याचे कडे दिसले .त्यांच्या मनात आले कि माझ्या मागून येणाऱ्या बायकोला  हे कडे दिसले तर ती नक्की उचलून घेयील आणि असे व्हायला नकोय म्हणून त्यांनी त्या कड्यावर पायाने माती लोटली .आपल्या पुढे इतक्या झपाझप चालणारा आपला नवरा क्षणभर थांबला आणि त्याने मातीत काहीतरी केले हे त्यांच्या पत्नीच्या नजरेतून सुटले नाही .तिने पुढे जावून ती माती काढली आणि तिला ते कडे दिसले .घरी आल्यवर तिने त्यांना म्हंटले कि हे काय आपण मातीवर माती टाकली .हा अध्यात्माचा विचार पत्रिकेत शनी चांगला असल्याशिवाय powerful  असल्याशिवाय  मनात येणारच नाही.  तिच्या मनातील ह्या विचाराला खरच  सलाम आहे.

टिळकांच्या मुलाची गोष्ट . दहावीत नापास झाला पण ते म्हणाले जोडे शिवलेस तरी लोक म्हणाले पाहिजेत कि जोडे हवे असतील तर टिळकांच्या मुलाकडे जा. इतके आपले कर्म चांगले असले पाहिजे तरच शनी महाराज आपल्यावर प्रसन्न असतात . शिशुपालाला श्री कृष्णाने ९९ वेळा संधी दिली आणि १०० व्या वेळेस मात्र सुदर्शन चक्र चालवले .

अशी संधी पण आपल्याला खूप वेळा देत असतात जे आपल्याला समजत नाही .पण १०० व्या अपराधापर्यंत आपण जायचे नाही हेच शनी महाराज आपल्याला शिकवतात .

एका बाईला १० लाखाची लॉटरी लागली .हे नवर्याला कसे सांगू त्याला हार्ट चा प्रोब्लेम आहे. ती क्रिस्ती धर्मगुरूंकडे गेली त्यांनी  सांगितले कि मी तुला सांगतो कि नवर्याला कसे सांगायचे पण मला काय देणार  त्यावर ती म्हणाली कि मी ह्यातले अर्धे पैसे तुम्हाला देयीन ते ऐकून त्या धर्मगुरूना हार्ट अताक आला. त्यांनी कश्याला मागितले पैसे तिच्याकडे? हे अयोग्य आहे. 

कर्म उत्तम पाहिजे हे शिकवणारा शनी आहे.  एक ऑटोमोबाईल इंजिनिअर प्रवासाला निघालेला होता .त्याची गाडी बंद पडली आणि त्याला दुरुस्त करता येयीना . एका सध्या मुलाने ती दुरुस्त करून दिली .त्याने त्याला १०२ रुपये बिल सांगितले . तो त्या मुलाला म्हणाला कि एका सेकंदात तू गाडी दुरुस्त करून दिलीस  इतके बिल कसे सांगितलेस ?तेव्हा तो म्हणाला कि बिल २ रुपये आहे पण नक्की घाव कुठे घालायचा ह्याचे १०० रुपये आहेत .तुमची गाडी चालू झाली जी तुउम्हला जमली नाही ती मी करून दिली.  हे कार्मातले कौशल्य श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले आहे. 

प्रत्येक ज्योतिषाने प्रथम भगवत गीता वाचायला पाहिजे कि त्यात काय सांगितले आहे.  दासबोध वाचवा मग सगळे ग्रंथ आणि मग शेवटी तुकारामांची गाथा वाचली पाहिजे. 

एक शेतकरी ओंजळीने पाणी पीत असतो तिथे एक प्राध्यापक येतो आणि तिथल्या पाण्यात एक दगड टाकतो. शेतकरी म्हणतो हे काय केलेत . गीतेच्या ४थ्या अध्यायात कर्मयोग सांगितला आहे तो अवश्य वाचवा .तिथे शनी दिसतो . ५व्या अध्यायात कर्म सन्यास सांगितला आहे. कर्म करत असताना त्यात विरक्त कसे राहायचे हे शिकवणारा शनी आहे.  एक पाऊल उचलले तर दुसरे जमिनीवर टाकल्याशिवाय चालता येत नाही.

श्रीकृष्ण हे स्वतः महान कर्मयोगी होते पण युद्ध भूमीवर रथाच्या घोड्यांची चाकरी ते स्वतः करत असत .आपले संत आहेत ते निर्भय होते कारण आपण जे कर्म करतो त्यात वाईट काही नाही हा त्यांचा विश्वास होता आणि हाच विश्वास शनी आपल्याला शिकवत असतो .  स्त्री आणि पुरुषांची कर्तव्ये आहेत ती शनी आपल्याला सांगत असतो .

अश्या ह्या कर्मयोग शिकवणाऱ्या शनी महाराजांना  साष्टांग दंडवत . शनीची ताकद वेळीच ओळखून  , त्याला आपल्या चांगल्या वागणुकीने आपलेसे करा आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हा हेच सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


स्वभाव – आपला आणि ग्रहांचा

 || श्री स्वामी समर्थ ||



मंडळी एकदा एका मुलाने आई आलेली असताना दरवाजा उघडायला उशीर केला तेव्हा आई त्याच्यावर खूप चिडली. मोबाईल मध्ये डोके खुपसून बसला असेल , ऐकू आला नाही बेलचा आवाज ह्याला असे म्हंटल्यावर लगेच बाबा पण म्हणाले त्या दिवशी छत्री दुरुस्त करायला सांगितली गेला नाही , आतून आजी म्हणाली घराची सगळी शिस्त गेली आहे. तर थोडक्यात म्हणजे मुलाच्यातील सगळ्या दुर्गुणांचा पाढा एका सेकंदात वाचला गेला . 

हाच मुलगा पण प्रसंग वेगळा . शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या अहो तुमचा मुलगा गुणी आहे त्याने मला आज रिक्षा करून दिली . परवा भाजीच्या पिशव्या पण घरी आणून दिल्या दमले होते मी म्हणून . लगेच आजी म्हणाली संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला कि सगळ्यांना नमस्कार करतो , गुणी आहे अगदी त्यावर बाबा ..मग मुलगा आहे कुणाचा . तर एका क्षणात त्या मुलातील सर्व चांगल्या गुणांचा अगदी पाऊस पडला .


आपण प्रत्येक प्रसंगात वेगवेगळे वागतो पण त्यावरून आपण चांगले कि वाईट ठरत नसते. बदलत जातो तो आपला दृष्टीकोण. विचार करा .पटतंय का? 

मुलाने दरवाजा उघडायला उशीर केला त्यावेळी त्याचे चांगले गुण नाही आठवले का आपल्याला ? असे आहे सर्व .

ग्रहांचेही तसेच आहे . काही चांगले झाले कि शुक्र बुध , नोकरी मिळाली कि अहो तो छान बोलतो बुध छान आहे त्याचा. आयुष्यात काहीही अगदी बस ट्रेन चुकली कि खापर फोडायला एकमेव शनी आहेच कि . दिसेल त्या ग्रहाला धरून त्यावर ताशेरे मारायचे काम आपल्याला अगदी सहज जमते. बोलायला कुठे पैसे पडतात त्यामुळे आपले बोलत राहायचे. शनीला तर अगदी नावडत्या सुनेचा दर्जा दिलेला आहे. अनेकदा राहू दशा म्हणून नोकरी मिळालेली नाही म्हणून राहुला अगदी काळाकुट्ट अगदी वाईट करून टाकतो . पण नोकरी राहूमुळे नाही तर तुमची दशा पंचम किंवा ९ १२ ची आहे म्हणून नोकरी मिळत नाहीय . धनस्थान पैसा टिकून देत नाहीय अशी ग्रहस्थिती त्याला राहू काय करणार .

राहू शनी दिसले कि पकडा त्यांना आणि करा त्यांची धुलाई , बोल लावा त्यांना हे आता पुरे झाले नाही का? मनुष्य जसे चांगल्या वाईट गुणांचे मिश्रण आहे तसेच ग्रह सुद्धा त्यामुळे अपुरा अभ्यास आणि अर्धवट ज्ञानाने आपण आपले आणि इतरांचेही नुकसान करतो. ज्योतिष शिका आणि ज्ञानी व्हा परिपूर्ण सखोल अभ्यास करा पण उठ सुठ कुठेतरी काहीतरी वाचून निष्कर्ष काढू नका. शनीला दोष ठेवायचा अहो तोच घेवून गेलाय तुमच्या मुलाला सातासमुद्रापलीकडे नोकरीसाठी ते कसे विसरलात . पण चांगले झाले कि आमच्या मुलाचे कर्तुत्व आणि वाईट झाले कि पापग्रह . 

कर्तुत्व अनेकांच्या मध्ये आहे पण परदेशी फार थोडेच जातात कारण शनी किंवा राहू किंवा अजून कुठल्या ग्रहाची कृपा होते म्हणून . तेव्हा त्या ग्रहाचे राज्य मान्य करा . 

मनुष्य हे सर्व गुण अवगुणांचे रसायन आहे अगदी तसेच ग्रह सुद्धा , त्या दशेत , स्थितीत राशीत इतर ग्रहांच्या गोचर भ्रमणात ग्रह नेहमीच वेगवेगळी फळे देतात . ते अनुकूल असतात तेव्हा ते आपले आवडते होतात आणि आपल्या मनासारखे झाले नाही कि आपण त्यांना नावे ठेवायला मोकळे.

खरतर ग्रह काहीच करत नाहीत . ते ओळखतात का कोण कुलकर्णी , साठे , आपटे आहेत त्यांना ? नाही . ते ओळखतात ती फक्त आपली कर्म  आणि त्यानुसार ते फळे देण्यास बांधील असतात . ते त्यांचे काम विनम्रतेने , निमुटपणे करतात . आता इतके ज्ञानामृत मिळाल्यावर तरी सोच बदलो... पटतंय का???

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Wednesday, 21 May 2025

शनी च्या कृपेस पात्र व्हा

 || श्री स्वामी समर्थ ||

लहान पण आपण एक खेळ खेळत असू आठवतंय ? डोंगराला आग लागली पळा पळा पळा.... त्या शनी देवांची अशीच अवस्था करून ठेवली आहे ह्या पृथ्वीवर . शनीची इतकी बदनामी करून ठेवली आहे . साडेसाती पनवती दशा आली कि नुसती पळापळ , दिसेल त्या मारुतीच्या मंदिरात बरणी भरून तेल , ह्या ज्योतिष कडून त्या ज्योतिषाकडे धाव ,काय चाललाय काय हे ?  शनी काय खाणार आहे कि काय आपल्याला ? शनी साडेसाती पनवती आली कि मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या ऐवजी ज्योतिषाच्या घराच्या पायर्या झिजवतात . नुसती पळापळ चालली आहे. आयुष्यात कधी त्या मारुतीकडे पहिले नाही त्याच्या डोक्यावर तेलाच्या बाटल्या आता कश्याला ओतायच्या ?  कारण आपण केलेल्या सर्व चुकांची छबी आपल्याच चेहऱ्यावर उमटते आहे . आपण गेल्या ३० वर्षात काय दिवे लावले आहेत ते सगळे आठवते आणि मग उडते ती घाबरगुंडी आणि रात्रीची झोप. आता आपली खैर नाही हे बरोबर त्यांना माहित असते त्यांनी गेल्या ३० वर्षात अगणित चुका केलेल्या आहेत . चुकीची कर्म केलेली आहेत . जे सरळमार्गी उपासना करणारे आणि कुणालाही न फसवता अहंकार विरहित जीवन जगणारे आहेत त्यांना घाबरण्याचे करणच नाही आणि ते शनीला शरण आहेत त्यामुळे त्यांना शनी देव कश्याला त्रास देतील . उलट आता त्यांना ते बक्षीसच देतील नाही का?

मारुती काय आणि शनी काय आपल्याला कुणीही नीट समजलेच नाही किबहुना त्यांना आपण समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केलाच नाही . असाल तिथे नाम घेणे हीच साधना आहे, खर सांगा करतो का आपण ती ? जरा वेळ मिळाला कि मोबाईल हातात आणि मग insta , फेसबुक सगळे दिमतीला हजर. उपासक जन्माला यावे लागतात असे म्हंटले जाते. देवासाठी वेळ नाही आपल्याला . देवाशी व्यवहार करणारे साधक त्याला कसे आवडतील. मुलाचे लग्न व्हावे म्हणून हनुमान चालीसा कुलदेवीची ओटी ..पुढे काय ? लग्न झाले हुश्य सुटलो एकदाचे आता कसा मारुती नि कसली देवी . ऐकवायला वाचायला आवडणार नाही पण हे कटू सत्य आहे. 

ताप आला कि कशी चार दिवस औषधे घेतो तसेच काम झाले देवतेला टाटा. अनेक उदा अशी बघितली आहेत . काल एका जातकाने फोन केला तुम्ही सांगितले होते १५ मे नंतर सर्व चांगले होईल अजून काही नाही झाले . मी म्हंटले 15 मे ला किती दिवस झाले अवघे 5 . कठीण आहे. देव जणू घड्याळ लावूनच बसले आहेत १६ च्या सकाळी ह्याचे काम करायला.

आपण केलेली उपासना नामस्मरण जे काही करू ते कधीही अनाठाई जात नाही .आपली आधीची काही चुकीची कर्मे  ती धुण्यासाठी ती उपयोगी पडते . उपासनेचे मर्मच मुळी संयम आहे. शनी च्या कृपेला मी पात्र कसा ठरेन असे विचार आपल्याला उपासनेची महाद्वारे उघडून देतील. मुळात जे काही करू ते मनापासून . 

देवता आपण केलेली उपासना , मन नाही बघत तर आपला हेतू पाहते . हेतू स्वछ्य स्पष्ट असेल तर ती फलित होणारच. चांगल्या हेतूने मागितलेल्या कुठल्याही गोष्टीच्या पूर्ततेसाठी परमेश्वर अनंत हाताने मागे उभा राहतोच राहतो. 

अखंड विश्वात एका धुळीच्या काणाचेही अस्तित्व नाही आपले मग गमजा किती आपल्या. मोठमोठ्या वल्गना , मी असा मी तसा . सतत मनात द्वेष , मत्सर ,निर्भत्सना , राग , दुसर्याचे वाईट करण्याची वृत्ती .पण हे सर्व परतून आपल्याच कडे परत येणार आणि म्हणूनच मग घर अशांत कारण मनात अशांतता . सतत दुसर्यावर जळण्याची , कुणाचेही चांगले न बघण्याची वृत्ती मग आपले तरी कसे चांगले होणार .

शनी आपल्या आत आहे . शनी आणि गुरूच्या राशी बघा आयुष्याच्या संध्याकाळी भेटतात आपल्याला , कारण वयाच्या पन्नाशी नंतर  मनाने वृत्तीने जरा परिपक्व व्हा हेच त्यांना सुचवायचे असते . पण आपण बालीशच राहणार . आपल्याला ह्या अध्यात्माची खोली कधी न उमजणार न कधी ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार म्हणूनच म्हंटले आहे ना मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण. 

नामस्मरणाची मजा लुटता आली पाहिजे , त्या परमेश्वराला आपल्यात सामावून घेता आले पाहिजे निदान तसा प्रयत्न पाहिजे , सतत नाम घेत राहणे आणि आयुष्यातील बदल अनुभवणे हेही प्रारब्धात असावे लागते. योग खेचून आणावे लागतात , महाराजांना आपल्याला एखादी गोष्ट द्यावीच लागते अर्थात ती योग्य असेल तर पण तितकी श्रद्धा बळकट करावी लागते. सारखे त्या शनीवर आग पाखडून कसे चालेल ? जे चंद्र नाही देवू शकत ते शुक्र देयील आणि शुक्र नाही देणार ते बुध . ग्रहांची खासियत वेगवेगळी आहे म्हणूनच आपल्या आयुष्यात हि नवग्रहांची पालखी मिरवत आली तर आयुष्याचा सोहळा होणारच होणार . कुठलाही ग्रह आपल्याच पाप पुण्याचा आरसा आहे. मग त्यांना दोष का? एकदा का साडेसाती संपली कि शनी ला विसरून पुन्हा आपण वाटेल तसे वागायला मोकळे असेच चित्र आणि व्यवहार असतो आपला. 

कलियुगात देवाचे अस्तित्व जाणवण्यासाठी मनापासून प्रयत्नशील राहणे सतत नाम घेणे हा एकच पर्याय आहे आणि तो सहज सोपा आहे. पुन्हा करोना किंवा त्याचा भाऊ आला काय करणार आपण . सतत भीतीच्या छायेत वावरणार का आपण , सततचे दडपण आपले शरीर पोखरून अनेक रोगांना आश्रय देतय हे लक्ष्यात येतंय का आपल्याला ? नामाने विचारांची शुद्धता होईल , भीती दडपण , पडणारी वेडी वाकडी स्वप्ने बंद होतील . कुणाच्या अश्रुना कारणीभूत ठरू नका , कुणाची निंदा नालस्ती , अत्यंत खालच्या दर्ज्याचे राजकारण नको , सुडाची बुद्धी नको , कुणाला हसू नका चेष्टा नको , पुढील वळणावर आपल्याही आयुष्यात काय घडणार माहित नाही आपल्याला . 

हनुमान चालीसा २१ दिवस रोज २१ वेळा म्हणा आणि अनुभव घ्या. कुठलाही आजार असो त्याचे मुळासकट उच्चाटन होईल., आत्मविश्वास द्विगुणीत होईल. प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि जगायचे सामर्थ्य मिळेल . इतकुसा जीव आपला किती उड्या मारणार आपण . श्रीरामाचा जप करा त्याना आणि मारुती रायाला समोर बसवा आणि मनापासून शरणागती पत्करून हनुमान चालीसा आनंदाने तालासुरात म्हणा . जीवन बदलून जायील ह्यात शंका नको . 

शनी च्या एका कृपा दृष्टीसाठी आयुष्य त्याच्या चरणावर समर्पित करा ... ओम शं शनैश्चराय नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिका मार्गदर्शन : 8104639230

    

Tuesday, 20 May 2025

शापित कुंडली

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण जन्माला येतो तेव्हा अंतराळात असलेली ग्रहस्थिती म्हणजे आपली पत्रिका ज्याला आपण जन्मलग्न कुंडली असेही म्हणतो आणि ती बदलत नाही . ग्रह गोचर करतात तेव्हा ते आपल्या पत्रिकेतून फिरतात पण मूळ पत्रिकेतील ग्रह हे कधीच बदलत नाही .आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे आपल्याला हा जन्म असतो. 

बाल्यावस्थेपासून ते वृद्धापकाळापर्यंत अनेक मानसिक अवस्थातून आपण जातो , यश अपयश सर्व काही पाहतो म्हणूनच मला आपल्या आयुष्याला Cardiogram ची उपमा द्यावीशी वाटते. अनेक वेळा अत्यंत कष्ट करूनही यश पदरी पडत नाही आणि मग निराश व्हायला होते. आयुष्यात सतत धननाश , आप्तस्वकीयांकडून त्रास , त्यांच्या प्रेमाला पारखे होणे , लहान वयातच मातृ पितृ छत्र हरपणे , व्यसनाधीनता , गृहसौख्य नसणे , वास्तुदोष ,चांगली नोकरी न मिळणे , विवाहात अनेक अडचणी ,विवाह न टिकणे , संतती सौख्य नसणे ,आयुष्याची संध्याकाळ त्रासात , दुक्खात व्यतीत होणे ह्या सारख्या असंख्य गोष्टी घडताना दिसतात.

अश्या अनेक पत्रिकांचा अभ्यास केल्यावर ह्या सर्वांची मुळे पत्रिके मधील अनेक ग्रहयोगांमध्ये आहेत हे ध्यानात येते . ह्या ग्रहयोगांमुळे पत्रिका शापित होतात .आज अश्या काही ग्रहयोगांचा अभ्यास करुया .

आपले शरीर हे जरी नश्वर असले तरी आत्मा हा अमर आहे . वस्त्राप्रमाणे आत्मा शरीर बदलत असतो आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपले प्रारब्धकर्म भोग भोगत असतो .आपण ह्या पृथ्वीवर घेतलेला जन्म हा काही उद्दिष्टाने असतो ,आपले कार्य झाले कि आपण इथून पुढील प्रवासाला म्हणजेच पुढच्या योनीत जाणार ,हे चक्र अव्याहत चालूच असते .

वराह मिहीरांनी आत्म्याच्या अवस्थेबद्दल कथन करताना म्हंटले आहे कि शरीर मृत झाल्यावर आत्मा हा कुठल्या लोकातून येवून पुन्हा शरीर धारण करतो. आणि हा आत्मा कुठल्या लोकातून येतो ह्याचा बोध प्रथम स्थानातील ग्रहांवरून होतो.

गुरु लग्नी असणारी व्यक्ती देवलोकातून येते . दानधर्म ,परोपकार , ईश्वरभक्ती, अन्नदान , सृजनशील मन , धार्मिक ग्रंथांचे पठण ,उपासक अशी हि व्यक्ती असते. नरकलोकातून भूलोकी जन्म घेणार्या व्यक्ती कश्या असतात तर निंदा , दुराचार , कुकर्म करणारी , जुगार व्यभिचार ,सट्टा , मदिरापान , दुर्जनांची सांगत , कोपिष्ठ स्वभाव असे दुर्गुणी गुण असलेला आत्मा हा अनेक यातना भोगून भूतलावर जन्म घेत असतो . भगवतगीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे कि आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला कुठल्या योनीत जन्म प्राप्त होणार ते ठरते .

दुसर्याच्या संपत्तीचा ह्रास केलेल्या व्यक्ती तिर्यक योनीत म्हणजेच पशुपक्षांच्या योनीत जन्म घेतात. गीतेमध्ये पूर्वजन्माचा स्पष्ट उल्लेख आहे . पूर्वकर्माप्रमाणे आपले भोग आहेत हे नक्की. अश्या व्यक्तींच्या कुंडल्या ह्या शापित असतात . पितृशाप , घराण्यातील दोष ह्या संज्ञा आपल्याला माहित आहेत .तसे पाहायला गेले तार आपलेच आजीआजोबा ,पणजोबा आपल्याला ज्यांनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला , संस्कार केले ते आपल्याला कश्याला त्रास देतील ,त्यांची आपल्यावर कश्याला अवकृपा होईल . पण त्यांच्यामृत्यू पश्चात त्यांचे शरीर मृत पावते आणि पंचतत्वात विलीन होते पण आत्मा अमरत्व पावतो ,वस्त्राप्रमाणे शरीर बदलतो आणि म्हणूनच तो आपल्या मुलानातवंडांशी भावनिक दृष्टीने बांधला गेलेला नसतो. तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हापुन्हा जन्म घेत असतो . 

आपण आपली पिढीजात वास्तू उपभोगतो ,जमीनजुमला , दागदागिने, DNA ,नाव , संपत्ती ह्यावर हक्क सांगतो पण अश्या पूर्वजांचे श्राद्धकर्म करताना कचरतो ,त्यांच्या तिथीला पान ठेवणे ,त्यांच्या आवडत्या गोष्टींचे दान करणे ह्याचा आपल्याला विसर पडतो. पर्त्येक मुलाने आपल्या आईवडील आणि पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा आशिर्वाद मिळवणे हे आपले कर्तव्यच आहे. अश्या प्रकारे त्यांच्या आत्म्यास शांती मिळते पण हे सर्व केले नाही तर मग त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळत नाही , इच्छा अपुर्या राहिल्याने आत्मा भटकत राहतो आणि पुढील पिढ्यांना त्यांचे शाप लागतात. निसंतान योग ,संतती चांगली न होणे ह्यासारखी फळे मिळतात. पितृशाप , मातृशाप ,मामाचा शाप , कुलदेवतेचा शाप , ब्रम्ह शाप ,पत्नीचा शाप , प्रेतशाप ह्यासारखे शाप लागतात हे पाराशरी ह्या ग्रंथात वाचण्यास मिळतील.

प्रथम दर्ज्याचा प्रखर पितृदोष म्हणजे शनी राहू युती . ज्या कुंडल्यामध्ये आपण रवी केतू , रवी राहू ,शनी केतू ,रवी केतू असे ग्रहांचे योग असतात तिथे पितृदोष असतो. चंद्र जर पंचमेष असून शनी राहू केतू मंगळ ह्यांनी युक्त असेल आणि गुरु एकटाच पंचमात किंवा नवमात असेल तर संतती सुखात अडचणी येतात . ह्या दोषापासून मुक्त होण्यासाठी गोदान , ब्राम्हण भोजन ,तर्पण करावे .वस्त्रदान ,पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणे हे उपाय करता येतात . 

शापित कुंडलीतील महत्वाचे ग्रहयोग म्हणजे  

१ लग्नाच्या चतुर्थात राहू 

२ चंद्राच्या चतुर्थात राहू

३ चतुर्थेश राहुने युक्त 

४ कुंडलीत कुठेही शनी राहू युती 

५ धनस्थानात राहू

६ धनेश राहुयुक्त

तृतीय स्थान बिघडले असेल म्हणजे मंगळ राहुयुक्त असून पंचमेश लग्नात किंवा पंचमात अष्टमात असतात . विष्णूचा जप फलदायी ठरतो. पंचमात राहू असेल आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल तर सर्पशाप असतो. मुले विकृत, मतीमंद  होतात किंवा त्यांच्यापासून पालकांना त्रास होतो. अश्यावेळी ब्राम्हण भोजन करावे .ब्राम्हण शाप म्हणजे धनु किंवा मीन राशीत गुरु असेल ,पंचमात मंगळ गुरु शनी असताना किंवा नवमेश अष्टमात असताना ब्राम्हण शाप लागतो आणि तो संततीस त्रासदायक असतो .ह्या शापातून मुक्त होण्यासाठी ब्राम्हण दान करावे. 

मातुलशाप असेल तर पंचमात मंगळ राहू बुध गुरु असता मामाच्या शापाने संततीची हानी होते. 

एकंदरीत पाहता हयात असलेल्या आपल्या घरातील जेष्ठ मंडळींचे हाल केले त्यांची सेवा केली नाही आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे श्राद्ध केले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही .त्यामुळे आपले आईवडील हयात असताना त्यांची सेवा केली , त्यांना काय हवे नको पहिले तर त्यांचे आशीर्वाद खर्या अर्थाने फळतील. 

पूर्वजन्मातील आपली कर्म म्हणजे संचित. पंचम आणि नवम भावातून आपल्या लक्ष्यात येते कि आपण काय काय आपल्या सोबत घेवून आलो आहोत . स्वतःच्या कर्मामुळे जन्म घेत असतो आणि त्याप्रमाणे फळे भोगत असतो. आपल्या मागील जन्मातील चुकीच्या कर्मांची फळे भोगणे हे क्रमप्राप्त होते आणि ती भोगावयास लावतो तो शनी .अर्थात ह्यापासून कुणाचीच सुटका नाही .प्रारब्ध भोग कुणासही चुकले नाहीत आणि चुकणारहि नाही.

घराण्याचा दोष सुद्धा असतो जेव्हा राहू हा कारक असतो . ३ पिढ्या राहू भोग भोगायला लावतो . संतती वेडसर असते , स्त्री पुरुषाची लग्ने  होत नाहीत परिणामी त्यांचा वंश पुढे वाढत नाही .

मातृकर्म म्हणजे चंद्र शनी युती ज्यास आपण विषयोग सुद्धा म्हणतो. चंद्रमा मनसो जातः. चंद्र म्हणजे आपली माता . चंद्र शनी युती अपयश ,मानसिक आंदोलने ,कष्ट दर्शवते. 

रवी हा पित्याचा कारक आहे. रवी म्हणजेच आत्मा .शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आणि आत्मा पुनश्च जन्म घेण्यासाठी शरीराचा वापर करतो त्यासाठीही  एखाद्या घरात जन्म घेतो आणि नशीब भोगण्यासाठी तयार होते. रवी शनी प्रतियोग वाईट फळे देतो .पित्याशी पटत नाही तसेच पित्यापासून दूर गेल्याशिवाय भाग्योदय सुद्धा होणार नाही .

शनी आणि शुक्र प्रतियोग अत्यंत वाईट असतो .शनी शुक्र युती बरी आहे. पत्नीचा कारक शुक्र आहे. 

गुरु हा संततीचा कारक आहे. गुरु राहू युतीही वाईट असते. शनी गुरु युती हि वंश पुढे वाढवत नाही .

आपल्या मित्रमंडळींचा कारक बुध आहे आणि तो बिघडला असेल तर संगत वाईट असते . सहवासात असलेल लोक हे वाईट विचारांचे असतील किंवा बुध मंगळाने बिघडला असेल तर वाईट सवयी लागू शकतात.

मंगळ हा भौम म्हणजे भूमी पुत्र आहे. अनेकांच्याकडे वैभव असूनही वास्तू होत नाही . मंगळ चांगला असेल तर वास्तूचा लाभ होतो. काही घरात उत्कर्ष होतो तर काही घरात उतरती कळा लागते ,घरात सतत नैराश्य राहते ,अपयश येते. मंगळ बिघडला असेल तर हे शाप दिसून येतात.

एखाद्या व्यक्तीला आपण त्रास दिला असेल , त्याची संपत्ती लुबाडलेली असेल तर अश्या व्यक्तीचे मन दुखावते आणि परिणामी त्याचे शाप आपल्याला भोगायला लागतात . राहू हा शापाचे कारक ग्रह आहे ,तो शाप भोगावयास लावतो. शापांपासून मुक्त होण्यासाठी शास्त्रात शांत करणे हा उपाय सांगितला आहे. तूप साखर तांदूळ चांदी शुक्रवारी दान केल्यास वैभव प्राप्त होते.पितृदोष असेल तिथे लघुरुद्र करावे. शनी साठी चप्पल , छत्री , गोडेतेल , लोखंड ,उडीद वाडे इत्यादी दान करावे .गुरुचरित्राचे पारायण करावे . श्री दत्त महाराज हे उत्पती ,स्थिती आणि लय म्हणजे ब्रम्हा ,विष्णू आणि महेश ह्यातून निर्माण झालेले असल्याने दत्ताची उपासना करावी .शास्त्रात प्रत्येक शापातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचवले आहेत . पण आपण हे उपाय केले नाहीत तर भोग पाठ सोडत नाहीत .

मुळातच आपले कर्म सात्विक , उत्तम ठेवणे हे तरी निश्चित आपल्याच हाती आहे आणि ते करू शकतो. दुसर्याने केले म्हणून मग मीही तसेच करणार , हा विचार हि सुडाची शृंखला खंडित होवू देत नाही . म्हणूनच आपली उपासना भक्कम केली तर ह्या विचारातून आपण परावृत्त होऊ आणि अनेक चुकीच्या कर्मातूनही ..

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230



Thursday, 15 May 2025

शिक्षण एक प्रभावी शस्त्र ( कुठले शिक्षण घ्यावे ?? )

 || श्री स्वामी समर्थ ||


१० वी १२ वी चे निकाल लागले कि पुढे काय करायचे सायन्स कि अजून काही ह्याची चर्चा आजकाल अपत्य चौथी पाचवी मध्ये असतानाच केली जाते . एक उदा आवर्जून द्यावेसे वाटते . माझ्या ओळखीत एका मुलाने १० वी नंतर सायन्स ला प्रवेश घेतला . मी त्याला सहज विचारले सायन्स घेवून पुढे काय करणार तर म्हणाला “ आईने सांगितले आहे तू इंजिनिअर व्हायचेस “. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच आनंद ते सांगताना मला दिसला नाही . असो त्या वर्षी हा मुलगा सलग १० दिवस सुद्धा कॉलेज ला गेला नाही . पुढील वर्षी कॉमर्स घेतले आणि पुढे  BCom झाला . पालकांचा पैसा फुकट गेला तेही एकवेळ ठीक पण त्या मुलाचे आयुष्यातील एक वर्ष गेले त्याला कोण जबाबदार ? आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांनी पूर्ण कराव्यात हा अट्टाहास का? 

अनेकदा बाळ जन्माला आले कि लगेच त्याला कुठल्या शाळेत आणि माध्यमात घालायचे इथपासून ते त्याने काय व्हावे डॉक्टर कि इंजिनिअर इथवर घरच्यांमध्ये जणू चर्चेला ऊत येतो. पण काहीही म्हणा शिक्षण आणि शैक्षणिक वर्ष हि आयुष्यातील फार महत्वाची वर्षे असतात . उत्तम शिक्षण व्यक्तीला माणूस म्हणून घडवत असते. 

आई जशी आपल्याला लहानपणी मनाचे श्लोक ,रामरक्षा म्हणायला शिकवते , अंक आणि पर्यायाने गणित शिकवते त्यातून आपण आयुष्याचे बरेच धडे गिरवत माणूस म्हणून घडत जातो , व्यवहार ज्ञान शिकतो , जगाची ओळख होते आणि माणसांची सुद्धा . संस्कृत श्लोक ह्यामुळे आपली वाणी आणि उच्चार शुद्ध होतात .  स्पष्ट बोलणे त्यातून अपोआप शिकतो. आपल्या श्लोकांतून , स्तोत्रातून आपल्या रूढी परंपरा ह्यातील चैतन्य अनुभवतो . आपली आपल्याच मातीशी ओळख होणे गरजेचे असते. थोडक्यात आपले घर आपले गुरुकुल असते आणि त्यातून होणारा व्यक्तिमत्व विकास त्याची शिदोरी आयुष्यातील प्रत्येक वळणावर उपयोगी पडतेच . 

शिक्षण माणसाला प्रगल्भ करते, पोटापाण्याचा व्यवसाय किंवा नोकरीचे बीज आपण घेतलेल्या शिक्षणातच असते कारण त्यातून होणार असते जगण्यासाठीचे अर्थार्जन . आजकाल राहूमुळे जग जवळ आले आहे आणि आता शिक्षणाची महाद्वारे अगदी सप्त खंडात उघडली गेली आहेत . अगदी घरबसल्या कुठल्याही विषयाचे ज्ञान आपण नेट च्या माध्यमातून आत्मसात करू शकतो. कुठल्याही महाविद्यालयात , विद्यापीठाची प्रवेश परीक्षा online माध्यमातून देवू शकतो. आजकाल परदेशी शिक्षण महाग असले तरी त्यासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध आहे.


ह्या सर्वात जर आपण आपल्या पत्रिकेतील ग्रहांचा किती सपोर्ट आहे किंवा त्यांना कुठली दिशा आपल्याला दाखवायची आहे हे समजून घेतले तर पुढील सर्वच अगदी सोपे होवून जाते. मध्यंतरी एका ओळखीच्या मुलाला उत्तम मार्क मिळाले आणि अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी तो रवाना झाला. पण काहीच दिवसांनी त्याला तेथील हवामानाचा त्रास होवू लागला आणि मनाविरुद्ध त्याला मायदेशी परत यावे लागले. फी फुकट , वेळ गेला , वर्ष फुकट आणि मनस्ताप .असो .

निसर्गाने माणसाला दिलेली देणगी म्हणजे “ बुद्धिमत्ता “ . बुद्धी म्हंटली कि बुध आलाच. बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे आणि धरून ठेवणे किंवा संचय करणे हे पृथ्वी तत्वाचे प्रमुख अंग आहे. बुध हे पृथ्वीचे आवरण आहे तसेच शरीराचे सुद्धा. पृथ्वी आपल्या पोटात असंख्य गोष्टी साठवून ठेवते . बुधाकडे असलेली हि धारणा  शक्ती त्याला शब्द संचय , आशय , माहिती  ह्याचा संचय करण्यास उपयोगी होते. बुधाकडे अंक , चातुर्य , शब्द , संवाद आणि लेखणी असल्यामुळे बुध पत्रिकेत उत्तम असेल तर व्यवहार ज्ञान , आकलन शक्ती असते. गुरु हा ज्ञानाचा कारक असल्यामुळे आणि त्याची व्यापकता प्रचंड ( आकाश तत्व ) असल्यामुळे चिंतन , ज्ञान , विवेक आणि प्रगल्भता गुरु देतो. आधुनिक काळातील हर्शल उत्तम संशोधक तयार करेल तर शनी सातत्य , शोध , सखोल ज्ञान देयील. ह्या सर्वासाठी मानसिकता चंद्र प्रदान करेल.  राहू ध्यास , अमर्याद कल्पनाशक्ती देईल . शनी राहू केतू बिघडले तर बुद्धीही बिघडू शकते . 

कुंभ , कन्या , मिथुन , तूळ आणि धनु ह्या राशीत ग्रह शुभ फळे देतील. अश्या लोकांची शैक्षणिक पातळी उत्तम असेल. उत्तम शैक्षणिक स्त्रोत बुध , गुरूच तयार करू शकतात . 

लग्न आणि लग्नेश बलवान असावेत . पंचम भाव हा नवनिर्मितीचा , कल्पनाशक्तीचा आहे त्यामुळे पंचम भाव आणि त्यात केंद्रकोणाचे मालक आले तर सोने पे सुहागा . पंचमेश बुध , गुरु स्वराशीत उच्च नवमांशात असणे उत्तम . केंद्रात बुध गुरु कायद्यातील प्राविण्य देतील असे लोक उत्तम न्यायाधीश होतील.

आज १० वी आणि १२ वीचे निकाल लागत आहेत अश्यावेळी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना पालकांनी विद्यार्थ्यांच्या पत्रिकेतील ग्रहांची कशी साथ आहे ते पहिले तर अधिकस्य अधिकम फलं .

घेतलेल्या शिक्षणाचा आणि करत असलेल्या नोकरीचा अनेकदा सुतराम संबंध नसतो त्यामुळे घेतलेले शिक्षण तसे व्यर्थच जाते . आजकाल अनेक पालकांना पाल्यासाठी शैक्षणिक विचार करताना खिसाही पाहावा लागतो इतके ते आवाक्याच्या बाहेर आहे .अनेकदा लोन घ्यावे लागते पण आपल्या पोटच्या मुलांना आयुष्यात उभे करण्यासाठी अनेकदा PPF चा आधार घेताना दिसतात . कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा ह्यावर एकमत नसते आणि मुलानाही तो आत्मविश्वास नसतो . अश्यावेळी हे ग्रह आपल्या मदतीला निश्चित धावून येतात . सारासार विचार करा ज्याच्या पत्रिकेतील बुध बिघडला आहे तो CA होवू शकेल का? आपल्यातील अनेक गुण आपण काय शिक्षण घेवू शकतो ह्याकडे ग्वाही देतात . कुटुंब भावातील किंवा तृतीयातील राहू मिडिया , फोटोग्राफी , digital माध्यम ह्यात जाहिरात क्षेत्रात उत्तम काम करू शकतो . 

डॉक्टर व्हायचे आहे ? डॉक्टर हा समाजासाठी काम करतो म्हणजे पत्रिकेत सेवाभावी मातृत्व भाव देणारा लोकात लोकप्रिय असणारा म्हणून चंद्र बलवान हवा . सर्जरी म्हणून धैर्य आणि साहस देणारा मंगळ जोडीला हवा . बुद्धीचा कारक गुरु , सेवाभाव आणि लोक कल्याणाची वृत्ती देणारा गुरु , चिकाटी , सर्व स्थरात काम करण्यासाठी शनी हवाच हवा . रोगाचे निदान करण्यासाठी षष्ठ , अष्टम हवे . दशम भाव उद्योग शीलता , व्यावसायिक वृत्ती तसेच आरोग्य देणारा रवी बलवान हवा. मंगळ रवीचा दश्माशी संबंध तसेच ६ ८ १२ ह्या भावेशांचाही दशमाशी संबंध हवा . हर्शल संशोधन वृत्ती देयील, संशोधन करवेल. मानसोपचार तज्ञाला दुसर्याचे मन समजले पाहिजे त्यासाठी चंद्र , बुध गुरु पंचम भाव हवेत . ३ ९ १० ह्या भावांचा एकमेकांशी संबंध असेल तर प्रसिद्धी मिळते . केस स्टडी म्हणजेच संशोधना  साठी हर्शल हवा . 

चतुर्थ भाव हा शिक्षण दर्शवतो तिथे आई आहे. प्राथमिक धडे आपल्याकडून आईच गिरवून घेत असते . शाळा महाविद्यालयीन शिक्षण चतुर्थ , पंचम आणि उच्च शिक्षण नवम भाव . पंचम हे ज्ञान आहे . ज्याला बुद्धी आहे त्याचे शिक्षण झालेले असेलच असे नाही आणि जो शिक्षित आहे तो ज्ञानी असेल असेही नाही. पंचमाची वेगळी ओळख हि अनुभूती देणारी आहे , पूर्व जन्म आणि ईश्वरी अनुसंधान म्हणजे पंचम भाव. इथे फक्त पुस्तकी ज्ञान नसून इथे परमेश्वराचे सानिध्य आहे. परमात्म्याशी एकरूपता पंचम सूचित करते .

शिक्षण चालू असताना त्या वयात चतुर्थ , पंचम , नवम , लाभ ह्या भावांच्या दशा असतील तर शिक्षणासाठी पूरक अत्यंत अनुकूल ग्रहस्थिती असते. षष्ठ भाव हा आजकालच्या स्पर्धात्मक परीक्षांचा आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात तृतीय  भावाशी संबंधित दशा अंतर्दशा शिक्षणात अडथळे आणतात . मुले सतत घराबाहेर राहतात , शिक्षणाकडे दुर्लक्ष्य होते . त्यात राहूची दशा असेल तर मोबाईल हेच त्यांचे जीवन असते . अनुभव येतच असतील अनेक वाचकाना ह्याचे .

एरो स्पेस मध्ये इंजिनिअरिंग हा आजचा करिअर ऑप्शन आहे. त्यासाठी वायुतत्व आणि त्याच्या राशी मिथुन तुळा कुंभ पत्रिकेत बघा , बुध शुक्र मंगळ आणि अर्थात शनीही त्याचसोबत ह्या ३ ९ १२ ८ भावांच्या दशा हव्यात . तबला शिकायचा आहे मग कला दर्शवणारे पंचम ,तबल्या वरून फिरतात ती बोटे म्हणजे बुध आणि मिथुन राशीही आली , तृतीय भाव तसेच ह्या कलेतून लाभ मिळवून देणारे लाभ स्थान पाहिजे आणि त्यानुसार दशा . कॉम्पुटर सायन्स  गुरु शनी बुध आणि मिथुन धनु कन्या मीन राशी आणि ३ ९ ११ ४ दशा पहा . नाट्य चित्रपटात काम करायचे आहे तर प्रथम पंचम कला आणि तृतीय प्रसिद्धी मिळवून देणारे भाव तसेच प्रामुख्याने चंद्र शुक्र बुध पाहावेत . बांधकाम क्षेत्रात काम करायचे असेल तर मंगळ शनी बुध चंद्रही हवा कारण जनसंपर्क आहे सोबत आणि ४ १० ११ भाव हवेत .

प्रत्येक ग्रहाचे आणि भावाचे कारकत्व माहिती असेल तर कुठल्या क्षेत्रात कुठले भाव आणि ग्रह उत्तम काम करतील ते सहज लक्ष्यात येयील.  एखादी घटना घडवण्याचे संपूर्ण अधिकार दशा स्वामीकडे आहे . म्हणूनच पूरक दशा नसेल तर कितीही डोके आपटले तरी काहीच होणार नाही कारण दशा स्वामीची नसलेली मंजुरी . म्हणूनच आयुष्यात योग्य वेळी योग्य दशा असणे हे भाग्याचेच लक्ष्यण असते . 

आपले स्वतःचे ज्ञान स्वानुभवातून फुलत जाते हे नक्की . लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या शिक्षणातून योग्य अर्थार्जन झाले पाहिजेच पण समाजासाठी सुद्धा आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे .डॉक्टराना समाजात एक दर्जा मान असतो आणि त्यासाठी सुद्धा त्यांचे तृतीय दशम भाव उत्तम हवा .

रवी हा राज्यकर्ता आहे म्हणजेच प्रशासक आहे म्हणून MBA करायचे असेल तर दशम भाव तसेच रवी उत्तम हवा . उच्च शिक्षणासाठी नवम भाव आणि परदेशात जावून शिक्षण घेण्यासाठी ९ १२ हे भाव हवेत . दशम भावात रवी असेल किंवा षष्ठ भावात दशमेश रवी असेल तर सरकारी नोकरी मिळण्याचे योग असतात . 

थोडक्यात घेतलेले शिक्षण हे आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होते . प्रत्येक वेळेस पदवी मिळालेले शिक्षण ह्यासाठी लागते असेही नाही. एखादी गृहिणी खूप शिकलेली नसेल पण उत्तम स्वयंपाक येत असेल तर घरातून  खानावळ चालवू शकते , कला असेल तर उत्तम रांगोळी , कलेच्या वस्तू बनवून विकता येतील. प्रत्येक गोष्टीसाठी निर्णायक ग्रहांची मांदियाळी जमली तर स्वकष्टार्जित धन मिळवून स्वावलंबी होण्यास मदत होते .

आजकालची पिढी समंजस आहे , शिक्षित आहे , स्वतंत्र विचारसरणी आहे ज्याचा आपण विचार आणि स्वागत केले पाहिजे नाहीतर त्या ३ idiot मधल्या मुलाचे झाले तसे व्हायचे . सचिन तेंडूलकरच्या  घरच्यांनी त्याचे खेळातील स्कील , त्याची आवड ,  त्यातील कौशल्य वेळीस जाणले आणि त्याला खतपाणी घातले , प्रोत्साहन दिले म्हणून आज जगाला एक उत्तम क्रिकेट पटू मिळाला ज्याने भारत देशाचे नाव जगात मोठे केले . मुलांना त्यांचे आयुष्य जगू द्या , त्यांची आवड , कल लक्ष्यात घ्या , शेवटी शिक्षण आणि आयुष्य त्यांचे आहे . मी डॉक्टर झालो नाही म्हणून माझ्या मुलाने डॉक्टर झाले पाहिजे हा मुर्ख अट्टाहास सोडून द्या` . आपल्या इच्छा मुलांवर लादू नका. मुलांना त्यांच्या विचाराने जगू द्या , २ वेळा पडतील त्यांना आधार द्या पण पडले तर गधड्या माझे ऐकले नाही म्हणून मुक्ताफळे उधळू नका . आपणही चुकून चुकून शिकलो आहोत तशीच तीही शिकतील. पडतील ठेच लागेल  पण ह्यातून एक उत्तम माणूस म्हणून घडतील ज्याचा पुढे जावून तुम्हालाच अभिमान वाटेल , आनंद होईल. मग त्याला गधड्या म्हंटल्याचा पश्चात्ताप सुद्धा होईल. “ मुलाकडे चाललो अमेरिकेला “ असे अभिमानाने भविष्यात तुम्हीच बोलणार आहात मग . 

नुसते शिक्षण नाही तर त्यातून अर्थार्जनाचे मार्ग मिळाले पाहिजेत . अनेकदा शिक्षण वेगळे आणि नोकरीचे कार्यक्षेत्र वेगळे असे होते . ९०% लोक आज जी नोकरी करतात त्याचा घेतलेल्या शिक्षणाशी सुतराम संबंध नसतो. म्हणून अनेकदा ज्या विषयात नोकरी मिळेल ते शिक्षण घ्या असे होते आणि आपली आवड , आपले स्कील बाजूला राहतात .

पण आज शिक्षणाचे क्षितीज रुंदावले आहे. रोज नवनवीन कोर्सेस , अभ्यासक्रम येत आहेत , परदेशी जावून शिकण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी बँका सुद्धा विद्यार्थ्यांच्या ह्या स्वप्नपूर्ती साठी , लोन देण्यास सज्ज आहेत. मुलांना गरज आहे तुमच्या सकारात्मक दोन शब्दांची , मानसिक आधाराची आणि आभाळा इतक्या आशीर्वादांची पण त्यांना त्यांच्या भविष्याची दिशा स्वतःच्या आवडीने ठरवायला मदत करा , त्यांच्यावर हेच कर तेच कर हि जबरदस्ती नको . नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणा व्यतिरिक्त मुलांमध्ये अनेक कला गुण असतात त्यातूनही पुढे ते अर्थार्जन करून स्वतःचे विश्व निर्माण करू शकतात आणि नेमके ह्याच गुणाकडे आपले दुर्लक्ष्य होते . एखादा उत्तम फोटोग्राफर होवू शकतो , स्पोर्ट मध्ये प्राविण्य मिळवू शकतो . योग्य वयात योग्य शिक्षणाची संधी मिळाली तर  आपल्या मुलांना आत्मविश्वासाचे पंख मिळतील उंचच उंच भरारी घेण्यासाठी . 

आपल्या मुलांचे आयुष्य घडवा पण इतर गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेण्यास आर्थिक हातभार लावला तर समाजाचा चेहराच बदलून जायील.   

आयुष्यातील प्रत्येक पावलावर ज्योतिष आहे कारण माणसाचे आयुष्य आणि ज्योतिष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक क्षणी आपण हे शास्त्र जगत असतो आपल्याही नकळत . सहमत ????????????

१० वी , १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आभाळ भरून शुभेछ्या .

शुभं भवतु 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

     

  


Wednesday, 14 May 2025

डोळसपणे जगूया

 || श्री स्वामी समर्थ ||


काल मला एका सद्गृहस्थांचा फोन आला होता त्याआधी त्यांनी मला मेसेज केला होता . त्यांच्या घराण्यातील प्रत्येक पिढीतील समस्या आणि अडथळे हे पितृ दोषामुळे कसे आले आहेत हे त्यांनी मला सांगितले. घरातील १०-१५ पत्रिका बघाव्या लागतील का . किती पैसे पाठवावे लागतील विचारात होते. अनेकांच्या कडे जावून आलो पण उत्तर अजूनही सापडले नाही असे त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना म्हंटले काही वेळात फोन करते.


फोन केल्यावर त्यांना एकच प्रश्न विचारला कि आत्ताची ह्या क्षणाची समस्या कुठली आहे तेव्हडे सांगा . त्यावर म्हणाले मुलाचा विवाह आणि नोकरीतील स्थिरता . म्हंटले त्याचे फक्त डिटेल पाठवा . दुपारी त्यांना फोन करून मुलाविषयीच्या सर्व शंकांचे समाधान केले. विशेष म्हणजे गुरु कृपेने त्यांच्या मुलाचा विवाह आणि नोकरीतील अडचणी ह्या दोन्ही गोष्टींवर समाधान ह्याच वर्षात होणार हे नक्की. 

सांगायचे तात्पर्य काय कि प्रत्येक पिढीत प्रत्येक घरात काहीतरी वैगुण्य असले तरी प्रत्येकालाच तो दोष लागत नाही हे महत्वाचे लक्ष्यात ठेवा. आजकाल जरा काही झाले कि पितृदोष आहे म्हणून हजारो रुपये घेवून अनेक प्रकारच्या शांती केल्या जातात . 


दोष तुमचा आमचा आहे कारण आपण भावनेच्या आहारी वाहवत जातो जराही विचार करत नाही. काय अयोग्य आणि योग्य ह्याचा विचार करण्याची सारासार बुद्धी घालवण्या इतपत काही जगबुडी झालेली नसते पण आपल्याला प्रश्नातून लवकर बाहेर पडायचे असते म्हणून कुणीही काहीही विचारले सांगितले कि डोळे मिटून त्या शांती वगैरे करून घेतो . शेवटी पदरी काहीच पडत नाही पण पैशाच्या अपव्यात मात्र होतो. आपल्या अडलेल्या प्रश्नासाठी नक्की काय उपाय असणे आवश्यक आहे हे पहिले पाहिजे .

आजकाल दोन पुस्तके वाचून घरोघरी ज्योतिषी झाले आहेत , पण त्यांचे ज्ञान किती आहे? असो .

आपण फसायचे योग आपल्या पत्रिकेत असतील तर आपण फसणार आणि असे पैसे खर्चही होत राहणार .उठ सुठ प्रत्येक पत्रिकेत पितृ दोष असेल तर बघायलाच नको. उपासना हा त्यावर औषधी जालीम उपाय आहे पण आम्ही तो करणार नाही. देवानेच आता खाली येवून आमच्याच नामाचा जप करावा इतकी नको तितकी प्रगल्भता आमच्याकडे असताना कश्याला हवाय तो देव आणि तो जप.

सांगायचे तात्पर्य , मुळात मनुष्याने आपले उत्तम कर्म करत राहावे , जे काही भोग असतील तर ते निमूटपणे भोगूनच संपवावे पुढील जन्मासाठी काही शिल्लक ठेवू नये आणि सर्वात मुख्य म्हणजे डोळसपणे डोळे कान नाक उघडे ठेवून जगावे, निसर्ग सुद्धा संकेत देतो. स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे , अडल्या पडलेल्याला मदत करावी आणि आपल्या मार्गाने राजमार्गाने आयुष्य व्यतीत करावे. 

कुठलीही समस्या अशी नाही ज्याला पर्याय नाही , आणि कुठलाही देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याला पैशाचे किंवा अन्य कुठलेही आमिष चालणार नाही. मनापासून केलेली प्रार्थना , श्रद्धा नक्कीच फळते . अहो ज्याने घडवले आहे त्याला कसले आमिष दाखवता ? अखंड नामस्मरण आपले जीवन अगदी पितृ दोष सुद्धा नष्ट करेल . करत राहा फळ कधी द्यायचे ते त्याला ठरवूदेत . देव तुमच्या तालावर नाचणार नाहीत . कुठल्याही शास्त्राला वेठीस धरू नका . जे आहे ते स्वीकारा . सगळ्यावर उपाय नाहीत . विवाह झाला नाही नोकरी मिळाली नाही संतती नाही कि लगेच तो पितृदोष नसतो. प्रत्येक वेळी शनी राहू तुमच्या वाईटा साठी कारणीभूत नसतात , एखादा असा ग्रह असतो ज्याकडे तुमचे दुर्लक्ष्य झालेले असते. महादशेपेक्षा विदशा बलवान असते. साडेसाती , पनवती , पितृदोष हे शब्द आपल्याला माहित आहेत म्हणून कुठेही ते वापरणे आणि कुठल्यातरी योगाला किंवा ग्रहाला वेठीस धरणे योग्य नाही. 

जे जे मनापासून कराल ते सर्व पोहोचणार आहे त्यांच्या पर्यंत हे नक्की. एका मुलाच्या पत्रिकेसाठी हि व्यक्ती १०-१५ पत्रिका आणि त्याचे मानधन देण्यास तयार होती पण मी ते घेतले नाही कारण आपल्याला चुकीच्या गोष्टी करून आपली कर्म वाढवून ठेवायची नाहीत . ज्योतिष हा धंदा नाही . शास्त्राला वेठीस धरू नका आणि त्याचा योग्य तो मान ठेवा . प्रत्येकाचे प्राक्तन भोग वेगवेगळे आहेत जे तो घेवून आलेला आहे त्यात कुणीही बदल करू शकत नाही .  कुठलीही शहानिशा न करता कश्यातही भावनानिवाश होवून वाहवत जाणे चूक ठरेल.  डझनभर ज्योतिषी आणि दोन डझन शांती ह्या फेर्यातून बाहेर या आणि परमेश्वराच्या चरणी त्याच्या सेवेत डोळसपणे रुजू व्हा. सर्वस्व त्याला अर्पण करा , आत बाहेर काहीच उरले नाही पाहिजे इतके त्याच्याशी एकरूप व्हा . जपाचे अधिष्ठान भक्कम असुदे कि त्या देवतेला येऊन तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल.

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230



Tuesday, 13 May 2025

आपले व्यक्तिमत्व “ गुरुतुल्य “ असावे हाच ह्या गुरु बदलाचा संकेत

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या पत्रिकेत १२ भाव असतात आणि गुरु महाराज प्रत्येक राशीतून साधारणतः १२-१३ महिने भ्रमण करत असतात .प्रत्येक वर्षी ते राशी बदल करतात . सोशल मिडिया प्रगत झाल्यामुळे आज आपण ह्या विषयावर असंख्य video बघत असतो. अनेक अभ्यासक त्याबद्दल आपला अभ्यास आपल्यासमोर मांडत असतात .

गुरु आज वृषभ ह्या शुक्राच्या राशीतून बौद्धिक अश्या बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे . गुरु आता अतिचारी असल्यामुळे फक्त पाच महिन्यात पुन्हा राशी परिवर्तन करत कर्क ह्या राशीत  उच्च सिंहासनावर विराजमान होणार आहे. गुरुचे पत्रिकेतील कारकत्व अत्यंत विशाल आहे. गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह असून त्याच्याकडे पत्रिकेतील नवम , व्यय हे भाव येतात . गुरु पुढील 8 वर्ष अतिचारी म्हणजे नेहमीच्या गतीपेक्षा अधिक गतीने त्याच्या कक्षेतून  मार्गक्रमण करणार आहे . ह्या काळात जगाचा चेहरा मोहरा बदलून जायील आणि अनेक आव्हाने सुद्धा समोर उभी राहतील. कुठलातरी व्हायरस डोके वर काढण्याची शक्यता आहे. करोनाचा काळ आपण अनुभवला आहे.

सोन्याचे भाव आजच आकाशाला भिडले आहेत ते अजून अधिक होत राहतील. बुधाकडे आकलन आहे तर गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर . आकाशतत्व असल्यामुळे स्पेस म्हणजे अंतराळात सुद्धा काहीतरी प्रगती होईल आणि संपूर्ण जगाचे लक्ष्य तिथे वेधले जायील. गुरु प्रसरण पावणारा गोष्टी मोठ्या करणार असल्यामुळे एकंदरीत जनमानसात अहंकार फुलेल ,आणि नेमके तिथेच मनुष्याचा घात होईल. गुरूला अहंकार आवडत नाही त्यापासून तो परे आहे .अर्थव्यवस्थेत अतिरिक्त नियम लागू होतील , कायदे बदलतील अधिक कडक होतील. न्यायव्यवस्था नवीन बदलांचे संकेत नक्कीच देयील. शनीही गुरुच्याच राशीत आहे. शिक्षण क्षेत्र नवीन रुपात बघायला मिळेल. बुधाच्या राशीतील गुरु स्किल विकसित करेल. 

गुरु कुठल्याही राशीतून भ्रमण करीत असला तरी गुरु तत्व बदलेल का? नाही. हाच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे वाईट करणार नाही. आई आपले कधी वाईट करते का? नाही. गुरु ज्या भावात असेल त्याप्रमाणे फळ बदलेल पण तत्व कायम राहील. 

गुरु बदल गुरु बदल झाला म्हणून गावभर नुसती बोंबाबोंब चालली आहे तसेच शनी बदल झाला तेव्हाही असेच . अहो ते ग्रह त्यांच्या मार्गाने जाणारच कि .गुरु बदलून कुठल्या राशीत जाणार ह्यासाठी ज्योतिष कश्याला हवे??? तुम्ही स्वतःच ह्याचे उत्तर देवू शकाल . गुरु शनी हे परमार्थाचे ग्रह आहेत , नीतीने आचरण करा हे सांगणारे , माणसातील देव ओळख आणि माणसाशी माणुसकीने वागा हेच सर्व ग्रंथाचे सार आहे. घरातील वडीलधार्या व्यक्तींशी आज जसे वागाल तसेच तुमची मुले तुमच्याशी वागणार हे निश्चित कारण हे कर्म तुम्हीच स्वतः तयार केले आहे.

म्हातारपणी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार करणार्यांनी स्वतः शाळेत असताना का नाही हा विचार करत ? कारण तेव्हा फी भरायला चांगले चुंगले खायला करून घालायला आणि घर सांभाळायला ते हवेत . वा वा बघा किती समजला आहे गुरु आपल्याला . देव न करो उद्या आपल्यावर काय प्रसंग ओढवेल ? अनेक घरात वडीलधार्यांची पेन्शन हाच घराचा कणा आहे असे असताना काय आणि कितीसा समजलाय तो गुरु आपल्याला हे विचारमंथन आवश्यक आहे. 

गुरु मिथुन राशीत जाणार मग मुलाचा विवाह ठरणार . अगदी बरोबर पण मुळात पत्रिकेत विवाहाचा योग असेल तर होणार ना? हा विचार कुणीही करत नाही. आज एकजण मला विचारत होते पुष्कराज घालू का ? बघा घ्या हाही एक अहंकार आहे जेव्हा सोने लक्ष किमतीत आहे. पण गुरूंचे नामस्मरण करू का ते नाही विचारणार कारण ते तितकेच अवघड आहे. रत्न घालायचे आहे ना? जरूर घाला त्यातील तज्ञांचा सल्ला घेवून पण आधी ह्या क्षणापासून नामस्मरण सुरु करा कारण तेच एकमेव जालीम औषध आहे .सब दुखोकी एक दवा. इतकेच म्हणावेसे वाटते.

ऋषीमुनी रत्न घालून फिरत होते का? रत्न म्हणजे खर्च आला त्यापेक्षा नाम घ्या कि ते फुकट आहे बिनखर्चिक आहे. पण ते इतके कठीण आहे आणि आपल्याला डोळ्याची पती लवते न लवते त्यात काम झालेले हवे आहे. कष्ट करायला नको. बरे रत्न घातले कि मिरवता येयील दीड लाखाची अंगठी केली हे दिसेल , पण नाम घेतलेले नाही दिसणार . मी रत्नशास्त्राच्या विरोधात अजिबात नाही . प्रत्येक शास्त्र त्याच्या जागी श्रेष्ठ आहे पण नामस्मरण सहज करता येण्यासारखे असूनही रत्न घालू का हा प्रश्न विचारणारा स्वतः जेव्हा कर्जात असतो तेव्हा मात्र अचंबित व्हायला होते. 

गुरु आपल्याला आपल्या आतला आवाज ऐकायला शिकवतो मग तो कुठेही असो. खरतर गुरु शनी ह्यांची तुमच्या पत्रिकेतील ओळख म्हणजे तुमचे नित्य कर्म . कर्म श्रेष्ठ तर आयुष्य सन्मार्गावर आणि तसे असेल तर हीच गुरुकृपा म्हंटली पाहिजे. गुरु काहीही वेगळे करणार नाही . वेगळे करायचे आहे ते तुम्ही तुमच्या कृतीतून. गुरूचा वरदहस्त अर्थकारणावर असल्यामुळे शेअर मार्केट सारख्या पटकन लाभ देणाऱ्या गोष्टीकडे डोळस पणे पहिले पाहिजे. गुंतवणूक जपून कारण गुरु अतिचारी आहे. 

मोठमोठ्या वल्गना न करणे बरे . थोडे लो प्रोफाईल राहणे गुरूला आवडेल. नित्याच्या कर्माला उपासनेची जोड हवी . जितक्या तत्परतेने मोबाईल चा स्क्रीन स्क्रोल करता त्याहीपेक्षा तत्परतेने मनापासून जपाच्या माळे वरून  आपली बोटे फिरली पाहिजेत . बुध म्हणजे संवाद . आपण बोलण्याने माणसे तोडत जातो इतका माज आहे आपल्याला अगदी मला कुणाचीच गरज नाही . त्यामुळे स्वार्थापोटी आज माणसे जपून  ठेवली पाहिजेत .माणूस म्हणजे गुरु आणि ते तत्व प्राणीमात्रात सुद्धा आहेच कि . गुरु म्हणजे ज्ञान म्हणून एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावणे , औषधांचा खर्च करणे ह्यासारखी मदत अनमोल फळे देयील. काहीतरी मिळवण्यासाठी प्रत्येक कृती नको तर त्यातून सामाजिक बांधिलकी माणुसकी आणि समाधान मिळाले पाहिजे . आपण केलेल्या कुठल्याही मदत किंवा कृतीचा उल्लेख सुद्धा नको हे सर्वात महत्वाचे नाहीतर कुणालातरी डझनभर वह्या देतानाचा फोटो सोशल मिडीयावर यायचा म्हणजे सगळे मुसळ केरात .

गुरु बदल झाला , हो गेल्या वर्षीही झाला त्याच्या आदल्या वर्षीही झाला पण माझ्यात किती बदल झाला. मी माझी व्यसने सोडली का? सोशल मिडीयावर तासंतास बसून काय केले मी काय मिळवले आणि काय गमावले? ह्या सर्वच हिशोब केला तर माणसे दुरावली , सोडून गेली , अनाठायी पैसा खर्च झाला, किती वेळा शो ऑफ करण्यासाठी लक्ष्मी खर्च झाली , हि सर्व गणिते मनावर ओरखाडे काढतील. कुणाची स्तुती करायची एखाद्याच्या कामाची प्रशंसा करायची तर तेही आपल्याला जमत नाही कारण मन मेले आहे आपले. उरले आहे ते फक्त मी मी आणि मी . त्या महाराजांना सुद्धा ह्या मी चा कंटाळा आला असेल. मी आणि माझे ह्यापलीकडे जगच उरलेले नाही आपल्याला तिथे कुठले गुरुतत्व आणि कसले काय ? मनावर सतत दडपण घेवून गोळ्या घेवून झोपतो आपण. बघा पटेल विचार केला तर. 

गुरुतत्व आपल्याला आपल्या आत बघायला शिकवते. पण बघणार कोण???  कारण बाह्य सुखांची भुरळ इतकी जबरदस्त आहे कि आपल्याच आतील एका सुंदर व्यक्तीचा म्हणजेच आपला स्वतःचाच आवाज ऐकायला वेळ नाही आपल्याकडे . 

बुधाच्या ह्या राशीतील गुरु समंजस व्हा हेच सांगत आहे . बालीशपणा सोडून आचार विचारात प्रगल्भता आवश्यक आहे. आज एखाद्या चांगल्या विचारांना , सध्या पोस्ट ला सुद्धा पाठींबा देत नाही आपण. संकुचित विचारसरणी आणि स्वतः पुरतेच जगायची सवय . 

पूर्वीच्या काळी कुठे होते मधुमेह आणि बायपास ? पण आता परवलीचा शब्द झाल्यासारखे जीवनाचा भाग झाले आहेत . एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे नाही , मनात कुढत राहणे , जीवन जगायला लागते त्याहीपेक्षा कित्येक पटीने भौतिक सुखे हात जोडून आहेत पण गेली आहे ती रात्रीची शांत झोप आणि समाधान . अगदी लहान मुलांना सुद्धा डोळ्याला चष्मा , अनेक आजार विकलांग करत आहेत . आयुष्याचा भरवसा नाही कि कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीवर विश्वास नाही . माणूस माणसाला नको आहे.    

हे सर्व आहे कारण साधनेला आपण परान्मुख झालेले आहोत . स्वतःचा अहंकार जोपासत आपण काय केले आहे तर अनेक व्याधींनी आपलेच शरीर पोखरून घेतले आहे आणि माणसे तोडून एकटेपणा जवळ केला आहे. 

एक दिवस एका कागदावर आपले वय लिहा आणि आजवर काय कमावले आणि काय गमावले त्याची गोळा बेरीज करा उत्तर तुमचे तुम्हालाच मिळेल पण ते स्वीकारायचे धाडस मात्र हवे . 

साधने शिवाय जीवन नाही हेच हा गुरु सांगत आहे . ज्या ज्या गोष्टींवर आपण वेळ वाया घालवत आहोत त्या नाही उपयोगाला येणार शेवटी . शेवटी येणार ती साधना आणि जोडलेली माणसे. 

आपले व्यक्तिमत्व “ गुरुतुल्य “ असावे हाच ह्या गुरु बदलाचा संकेत समजायला हरकत नाही . उगीचच ह्या राशीला काय मिळणार आणि त्या राशीला गुरु कसा ह्यामध्ये तासंतास वेळ घालवण्यापेक्षा माझ्या कडून गुरूला काय अपेक्षित आहे ? माझी कर्म मी कशी सुधारू आणि नामस्मरणाचा वेग कसा वाढवू . कुठे आणि किती कसे अन्नदान करू , घरातील लोकांची मने जपत घराला कसे अधिक चांगले घरपण देण्याचा प्रयत्न करू ?  आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा उत्तम करू ह्या विचारांचे खतपाणी आपणच घातले पाहिजे. 

गुरूबदल झाला पण गेल्या वर्षात माझ्यात काय बदल झाला ह्याचा विचार  कुणीच नाही करत . आपण घरात जसे एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो तसे गुरु नेही त्याची राशी बदलत आहे. इतकी स्तोत्र वाचतो , इतकी देवदर्शने करतो , नामस्मरण प्रदक्षिणा काही ठेवत नाही पण तरीही आमचे प्रश्न सुटत नाहीत ह्याचे कारण जे करतो त्यात जीव ओतत नाही किबहुना जितके असायला पाहिजे तितके तर नाहीच नाही. सतत संभ्रम कारण गुरुवर विश्वासच नाही . अध्यात्म जगण्याची कला आहे रोजच्या जीवनातील जगणे हाच गुरूबद्दल आहे.  मागील चुका सुधारणे , नवीन जीवनशैली स्वीकारणे , मदतीचा हात पुढे करणे आणि दुसऱ्यातील चांगले आत्मसात करणे .

गुरु आकाशतत्व आहे . आकाशासारखे मन मोठे करा सर्वाना त्यात सामावून घ्या, कुणाची उणीदुणी नकोत ...एकमेकांच्या उपयोगी पडूया आणि शेवटचा क्षण आनंदाचा कसा करता येयील ते पाहूया. गुरूला हेच अभिप्रेत आहे. आपला उभा संसार , जे जे काही आहे ते सर्व गुरु चरणांवर समर्पित करूया ,त्यांच्या सेवेची मोहिनी पडू दे आपल्याला आणि त्यात इतके रममाण होवुया कि गुरु बदलला कि शनी, साडेसाती सुरु झाली कि पनवती संपली कश्याचाही फरक आणि भान राहणार नाही. कसलेही भय नाही आणि चिंता तर त्याहून नाही . काही मिळवायचे नाही आणि कुणाशी कसली स्पर्धाही नाही. अशी मनाची अवस्था हा खराखुरा गुरु बदल असेल. 

आपले व्यक्तिमत्व “ गुरुतुल्य “ म्हणून घडले पाहिजे हाच संकेत देत आहे “ मिथुन राशीतील गुरु “.

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230 

  


Monday, 12 May 2025

ग्रहांचे उच्चत्व

 || श्री स्वामी समर्थ ||


निसर्ग कुंडलीचा अभ्यास सखोल आहे , जितके खोलात जाऊ तितकी ग्रहांची गुपिते उलगडत जातात . त्यांचे अस्तित्व आपल्याशी सरळ सरळ जोडले जाते म्हणूनच त्यांच्या विविध अवस्था आपल्या जीवनावर सुद्धा अनेक विध परिणाम करताना दिसतात . 

कुंडली पाहताना जातक अनेक वेळा ( आजकाल सोशल मिडियाचे ज्ञानामृत पिऊन आलेले ) विचारतात , माझ्या पत्रिकेत हे दोन ग्रह उच्च आहेत , हा ग्रह केंद्रात आहे आणि तमका ग्रह स्वराशीत आहे पण तरीही आयुष्य एका उंचीनंतर वरती गेलेच नाही. आर्थिक स्थर उंचावला नाही , मान नाही , फार काही मिळवता आले नाही आयुष्यात असे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करुया .

नवमांश कशी पहावी आणि त्यावरून सारासार विचार करून फलादेश कसा द्यावा हे समजले नाही तर फलित चुकू शकते . अभ्यास कमी पडतो,  म्हणूनच वरवरचा अभ्यास फलित कथन करण्यासाठी उपयोगाचा नाही . 

कुठल्याही ग्रहाचे बळ हे आपल्याला नवमांश मधूनच समजते .ग्रहाची ताकद ओळखणे महत्वाचे असते ती ओळखता आली तर ग्रह किती उच्चीचे फळ देऊ शकेल ह्याचा अंदाज येतो. नवमांश ला डावलून भाकीत करता येणारच नाही . 

आपला आत्ताचा जन्म हा मागील अनेक जन्मातील चांगल्या वाईट कर्माचे प्रतिबिंब आहे आणि त्यानुसार फळ देण्यास ग्रह सुद्धा बांधील आहेत . जेव्हा एखादी घटना घडते मग ती चांगली असो अथवा वाईट , ते तुमच्याच कर्माचे फळ असते त्यामुळे दुसर्याला दोष देणे किंवा खुद्द ग्रहांना धार्यावर धरणे बंद केले पाहिजे . तुम्ही जे जे गतजन्मात केले आहे त्याचे परिणाम देणारे ग्रह हे एक मध्यम आहे हे सर्वप्रथम समजून घ्या. ग्रह तुमचे शत्रू नाहीत .

ग्रहांच्या अनेक अवस्था जसे नीच , उच्च , अस्तंगत , वक्री , स्तंभी . उच्च अवस्थेला दीप्त अवस्था म्हंटलेले आहे. हा उच्च ग्रह ज्या भावांचा कारक आहे त्या भावांचे उच्च फळ देतो इतकी ताकद त्यात आहे. प्रत्येक ग्रह किती डिग्रीवर म्हणजेच अंशावर असताना त्याला उच्चत्व मिळेल आणि त्या प्रमाणे तो फळ सुद्धा देयील हे पंचांगात दिलेले आहेच. पूर्व जन्मात ह्या ग्रहाने दर्शवलेल्या भावात काहीतरी चांगले कर्म केल्यामुळे ह्या जन्मात तो ग्रह त्याच भावात उच्च झालेला आहे . त्यामुळे त्या भावांसाठी खूप कार्य न करताही त्यातून उत्तम फल मिळणारच आहे. 

शुक्र गुरूच्या मोक्षाच्या राशीत जेव्हा उच्च होतो तेव्हा तो भौतिक सुखाची रेलचेल न करता मनापासून प्रेम करायला शिकवतो पण त्याच्या बदल्यात जोडीदाराकडून अपेक्षा ठेवत नाही. निखळ अपेक्षा विरहित प्रेम करत राहतो . मीन राशी मोक्षपदाला नेणारी आहे तिथे भौतिक सुखांची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. देवगुरु बृहस्पती प्रमाणे शुक्र सुद्धा गुरूच आहेत .म्हणूनच मोक्षाच्या राशीतील हा उच्चीची लेणी परिधान केलेला शुक्र व्यक्तीला भौतिक सुखाकडून परास्त करून परमार्थाची गोडी लावतो . तिथे फक्त जातकाला ईश्वरी पाऊलांचा आणि अध्यात्माचा साक्षात्कार होतो .

जगाचा चालक मालक पालक रवी म्हणजेच राजा हा सर्वगुणी असला पाहिजे , सर्वांचे भले आणि हित जपणारा , वेळप्रसंगी कडक शासनकर्ता आणि कधी क्षमाशील , उदार , गुरूंची आज्ञा पालन करणारा . असा हा रवी केतूच्या विरक्तीकडे नेणाऱ्या अश्विनी नक्षत्रात मेष राशीत १० अंशावर उच्च होताना दिसतो. तिथे अहंकाराचा लवलेश नसतो पण पुढील अंशावर चित्र बदलते अहंकार असू शकतो. 

मन प्रसन्न असेल तर अजून काहीच लागत नाही . चंद्रमा वृषभेत उच्च होतो . वृषभ राशी हि कुटुंब भावातील राशी जिथे आपले मन आपल्या कुटुंबात असते. सगळ्यात परमोच्च आनंद आपण आपल्या घरात असतानाच मिळतो आपल्या लोकांसमवेत जीवन सुखावह होते. उत्तम भोजन केले आणि त्याची प्रशंसा भोजन करणाऱ्या व्यक्तीने केली तरी मन सुखावते म्हणूनच चतुर्थ भावाला सुखस्थान म्हंटले असावे.  मुलांचे यश किंवा कुठलीही आनंदाची बातमी ऐकून आनंदाश्रू येतात . म्हणूनच चंद्र इथे समृद्धी देताना दिसतो .  निसर्ग कुंडली मध्ये चतुर्थ भाव कर्क चंद्राचीच राशी दर्शवतो आणि चंद्र स्वतः कुटुंब भावात उच्च होतो. घरात आल्यावर जगातील सर्व सुखे मिळतात आणि डोक्यावरील मणामणाच्या चिंताही दूर होतात कारण घरात असते आई जी चंद्राचेच रूप आहे. आई पूर्ण घराचा विचार करते . कर्माचा समतोल ठेवा , सामंजस्य ठेवून वर्तन करा हेच सांगणारा शनी तूळ राशीत २० अंशावर उच्च होतो. तुळा राशीत उच्च शनी असलेले अनेक लोक न्यायाधीश , जज्ज असलेले आढळतात . दशम भाव हा आपली कर्मभूमी आहे कारण निसर्ग कुंडलीत दशम भाव शनीकडे आहे. मंगळ हा सेनापती आहे. युद्ध होते तेव्हाच सेनापती आपले कौशल्य दाखवू शकतो , त्याला नुसताच बसवून ठेवला तर त्याच्यातील शक्ती जोम उत्साह निघून जायील आणि तो निराश होईल . म्हणूनच ह्या कर्माच्या मकर राशीत मंगळ उच्चत्व पावतो. रोज काहीतरी आपली नवनवीन स्कील , क्षमता दाखवण्याची संधी मंगळाला मकर राशीतच मिळते . 

बुध बालक आहे पण त्याच्याकडे गणित , संवाद , भाषा आहे. कन्या हि निसर्ग कुंडलीत षष्ठ भावात येणारी राशी आहे जिथे पोट आहे. पोटाची भूक शमवण्यासाठी अन्न लागते आणि ते मिळवण्यासाठी अर्थार्जन करण्यास माणूस काम करायला बाहेर पडतो . हे आपले रोजच्या नित्य व्यवहाराचे स्थान आहे. आपल्याला नोकरी आपल्या कौशल्याने गोड बोलूनच टिकवावी लागते . रोजच्या जीवनातील गणिते बिघडवून चालत नाही, रोज प्रत्येक क्षणी नवनवीन आव्हाने येत राहतात  म्हणून ह्यात पारंगत बुध कन्या राशीत १५ अंशावर उच्च होतो .  आप्तेष्ठांशी संबंध बोलण्यामुळेच जोडले किंवा तोडले जातात . 

प्रत्येक ग्रहाची आपल्या जन्मस्थ पत्रिकेत एक अवस्था असते त्याप्रमाणे त्याचे फलित असते. ते बदलत नाही. एखादा ग्रह लग्न कुंडलीमधे उच्च असेल पण त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल किंवा नवमांश मध्ये तो बलहीन असेल तर अपेक्षित असणारी उच्च फळे मिळणार नाहीत . त्यामुळे पत्रिकेत एखादा ग्रह उच्च दिसला तर त्याचा सखोल अभ्यास आणि वरील सर्व गोष्टी तपासल्या शिवाय त्याबद्दल भाकीत केले तर चुकीचे ठरेल. ग्रह आणि आपले आयुष्य ह्यांचे मिळते जुळते नाते आहे जणू . ग्रह आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्या पूर्व सुकृताचे प्रतिबिंब आहे. 

हा अभ्यास सखोल आहे आणि तो करायचा कंटाळा नसावा नाहीतर फलादेश चुकेल. प्रत्येक राशीत सव्वा दोन म्हणजे ३ नक्षत्र येतात . त्या पैकी नक्षत्राच्या कुठल्या चरणावर ग्रह आहे आणि तोच ग्रह नवमांश मधेही कुठल्या स्थितीत आहे हा अभ्यास फलादेशाकडे नेणारा असतो.  ग्रह फळ देतात ते त्यांच्या दशेत , अंतर्दशेत  हेही विसरून चालणार नाही. जसे ३ ९ १२ ची दशा लागली तर भटकंती , प्रवास होतात . एखाद्या उच्च ग्रहाची दशाच आली नाही तर ? त्याची उच्च फळांची गोडी चाखता , अनुभवता येणार नाही . अंतर्दशेत काही प्रमाणात फळे मिळतील .

एखादा ग्रह उच्च होतो तेव्हा तो त्या भावाची राशीची काहीतरी चांगलीच फळे प्रदान करेल पण ती किती प्रमाणात ? हाच अभ्यास आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230 

  






Saturday, 10 May 2025

कुठली ग्रहस्थिती करेल तिला “ सुगरण “ ??

 || श्री स्वामी समर्थ ||


खाद्य संस्कृती हि भारतीयांची खास ओळख आहे. हृदयात जाण्याचा मार्ग पोटातून असतो असे म्हंटले जाते . माणूस काम करत नाही तर त्याचे वितभर पोट काम करते. भूक लागली कि अन्न हवे आणि ते मिळवण्यासाठी म्हणजेच उदर निर्वाहासाठी मनुष्य कर्म ( काम ) करण्यास बाहेर पडतो . आपल्या निसर्ग कुंडली मध्ये षष्ठ भाव हा नोकरीचा आहे आणि तिथे शरीराचा अवयव पोट सुद्धा आहे . पोट , पोटाला लागलेली भूक आणि काम ह्याचे उत्तम समीकरण आहे हे लक्ष्यात आले असेल.

वरिष्ठांच्या कडून रजेचा अर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर नेहमी लंच ब्रेक नंतर जावे .जेवण झालेले असते म्हणजेच पोट भरलेले असते आणि मग मेंदूही चालतो. भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात . उपाशी पोटी शब्दांचे खेळ होतात . असो . म्हणून लंच नंतर साहेब जरा निवांत असतात तेव्हा रजेचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते . 

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि हे अन्न शिजवणे , वाढणे हि सुद्धा एक कला आहे. इतर अनेक शास्त्रांच्या सारखे स्वयंपाक करणे म्हणजेच “ पाकशास्त्र  “ हे सुद्धा एक शास्त्र आहे. साधे ताक करणे ह्यात सुद्धा प्रकार आहेत आणि ते प्रत्येकाला जमतील असेही नाही. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आई किंवा आजी उन्हाळ्यात वाळवणीचे पदार्थ करतात तेव्हा गच्चीत साहित्य डबे नेण्यासाठी आपण केलेली धावपळ आठवते आहे का ? आणि मग चोरून खालेल्या त्या पापडाच्या लाट्या ? गेलात ना भूतकाळात ? पापड , कुरडया सांडगी मिरच्या , चित्र आले ना डोळ्यासमोर ?

बाहेरून दमून आल्यावर स्वयंपाक घरातून आलेला खमंग फोडणीचा वास आपली भूक चेतावतो आणि पोटभर जेवल्यावर मन सुखावते . उत्कृष्ट स्वयंपाक करणे हि एक कला आहे. भारताच्या विविध प्रांतात अनेक विध पदार्थांची नुसती रेलचेल आहे . अनेक पदार्थ हे वातावरण, ऋतू ह्यांना धरूनही केले जातात जसे चैत्रात कैर्यांचा मोसम आला कि थंडगार पन्हे , आंबेडाळ करून स्त्रिया हळद कुंकू करतात . उन्हाळ्यात आंब्याचा मोरंबा , कडक ऊन असल्यामुळे लोणची ,वर्षाचे साठवणीचे पापड  , कडधान्ये वाळवणे , बटाट्याचा कीस ह्या गोष्टी घराघरात होत असतात .

प्रत्येक स्त्री मग ती कुठल्याही वयाची असो “ स्वयंपाक “ घरावर तिची खास हुकमत असते , तिचा ठसा असतो . तिथे तिचा राणीसारखा थाट आणि प्रेमाचा हात वर्षानुवर्ष फिरत असतो . स्वयंपाक घरात स्त्रियांना इतरांनी लुडबुड केलेली खपत नाही. वस्तू जागच्या जागी ठेवा हे सांगणारी आई आज्जी घरोघरी आहेच कि.

उत्कृष्ठ स्वयंपाक करणे हे एका कुशल सुगरणीचे लक्षण आहे. साधी फोडणी पण तीही जमावी लागते . फोडणी खमंगजमली कि ९० % काम झाले म्हणून समजायचे . पदार्थात तिखट मीठ मसाल्यांचे प्रमाण योग्य असेल तर पदार्थाची लज्जत वाढते . नाश्त्याला काय पदार्थ करायचा , दुपारी  काय आणि दोन्ही जेवणात काय करायचे ह्याचे वेळापत्रक  घरातील मंडळींच्या आवडीनिवडी लक्ष्यात घेवून तयार करावे लागते . त्याशिवाय अधून मधून हजेरी लावणारे  सणवार. 

काळ बदलला तसा वाढदिवसाचा मेनू बदलला . पूर्वीची गवल्याची खीर , पुरणपोळी , सांज्याची पोळी आणि श्रीखंडाची जागा आता पाणीपुरी मोमोज , पास्ता ह्यांनी घेतली अगदी जागा सुद्धा बदलली . परवाच ऐकले आजकाल वाढदिवस मॉल किंवा म्याकी मध्ये होतात म्हणे. अर्थात काही अपवाद आहेतच .असो .

आपण कितीही आधुनिक पणाचे मुखवटे धारण केले तरी घरच्या जेवणाची सर कश्यालाच नाही हे सगळेच मान्य करतील. घरच्या स्त्रीच्या हातचा सुग्रास भोजनाचा घास आणि त्यावर दिलेली तृप्तेची ढेकर हाच सुखी संसाराचा खरा मूलमंत्र आहे. पूर्वीच्या काळी बाहेरचे पदार्थ आणून खाणे हे माहितच नव्हते कारण  “ बाहेरचे जेवण “ ह्या संकल्पना नव्हत्याच . जे काही आहे ते घरी करून खायचे कारण तेव्हा हे सर्व लाड खिशालाही परवडणारे नव्हते . त्यामुळे पूर्वीच्या पिढीत स्त्रिया स्वयपाक घरात अधिक वावरताना दिसत त्याचे कारण हेच .

आता नोकरी व्यवसाय ह्यामुळे आयुष्यात अनेक बदल झाले आणि ते आपण स्वीकारले त्यातील एक मोठा बदल म्हणजे घरात असलेली “ स्वयंपाक करणारी बाई “ . असो. कालाय तस्मै नमः . आम्ही लहान असताना आचारी घरी यायचे मदतीला पण तेही फक्त सणवार असेल तेव्हाच . कालानुरूप स्त्री आता नोकरीसाठी बाहेर पडल्यामुळे मनात असूनही आता अनेक पदार्थ करायला पुरेसा वेळ मिळत नाही . त्यामुळे आता दिवाळीचा फराळ , संकष्टीचे मोदक करणाऱ्या स्त्रियांचे व्यवसाय जोमाने फुलत आहेत . ह्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाले आहे. आपले घर सांभाळून घरी  वड्याचे , तांदुळाचे , ज्वारीचे पीठ घरघंटी वर दळून देणे , वेगवेगळे मसाले तयार करून विकणे हे पुणे मुंबई सारख्या शहरात दिसून येते आणि ह्या तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रदर्शनांचे आयोजन सुद्धा केले जाते . 

तर मंडळी  असा हा सुग्रास  स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीच्या पत्रिकेत असे काय ग्रह योग असतात ज्यामुळे ती इतका सुंदर स्वयंपाक बनवते त्याबद्दल आज विचार करुया .

मुळात मला स्वयंपाक करायचा आहे तो माझ्याच घरातल्या माणसांसाठी आणि त्यात विविधता सुद्धा आणली पाहिजे हा विचार मनात यायला मुळात कुटुंबातील माणसे आणि आपले घर ह्याबद्दल स्त्रीला प्रेम , आपलेपणा हवा. म्हणजेच पत्रिकेतील द्वितीय चतुर्थ भाव आणि चंद्र चांगला हवा. इच्छा असली पाहिजे . घरात पाहुण्याची उठबस करणे सोपे नसते, कुणाला चहा लागतो तर कुणाला कॉफी , ह्या सर्व गोष्टी हसतमुखाने कराव्या लागतात . 

स्वयंपाक आपण हाताने करतो. हात म्हणजे बुध आला . पदार्थाचे रंग आणि त्याची मांडणी जसे कांदे पोह्यावर घातलेली कोथिंबीर , ओले खोबरे आणि लिंबाची फोड बघूनच पदार्थ खावासा वाटतो . पदार्थ गोड असो अथवा तिखट त्यात दोन चमचे प्रेम घालावे लागते नाहीतर हॉटेल मधील वेटर आणि आई ह्यात फरक उरणार नाही. कुठल्याही पदार्थाची चव आणि त्याची मांडणी , रंगसंगती ह्यासाठी शुक्र ग्रह बलवान लागतो . चंद्र शुक्र हे रस आहेत म्हणून त्यांच्याशिवाय पदार्थाची चव लागणार नाही. वेगवेगळ्या पदार्थांच्या कृती वाचून शोधून त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंचम भाव हवा. स्त्री स्वतः स्वयंपाक करणार म्हणजे तिचा लग्न आणि जोडीला लग्नेश चंद्र बुध शुक्र सुस्थितीत हवेच. 

पदार्थ बनवण्यासाठी तासंतास शेगडी जवळ उभे राहावे लागते आणि त्याला शारीरिक उर्जा बळ लागते त्यामुळे मंगळाची हजेरी हवीच हवी . स्वयंपाक हा एक दोन दिवस नाही तर वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबासाठी करायचा असतो म्हणजे त्यात सातत्य हवे . सातत्य चिकाटी संयम देणारा शनी हवा. नाविन्य हवे म्हणून अनेकदा खाबुगिरी करणारा राहूही हवा . एखादा पदार्थ बिनसला किंवा मनासारखा चांगला झाला नाही तर सोडून न देता चिकाटीने पुन्हा प्रयत्न करण्याची मानसिकता सुद्धा लागते . प्रगत जगातील वैविध्य आणि तोच तोच पणा टाळणारे काहीतरी नाविन्याचा शोधात असणारे ग्रह म्हणजे  हर्शल राहू ज्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मग फालुदा , वेगवेगळ्या भाज्यांच्या नवनवीन रेसिपी करण्याचे कसब असणे आणि हि कौशल्य पणाला लावणे हे “ आधुनिक  सुगरणी “  पुढील चक्क आव्हान म्हंटले पाहिजे . 

कुठल्याही घटना किंवा गोष्टीसाठी नवग्रहांची पालखी लागते त्याशिवाय घटना घडणार नाही अगदी तोच नियम इथेही आहे. नवग्रहांची कृपादृष्टी होते तेव्हाच “ सुगरण “ जन्माला येते. पत्रिकेतील तृतीय भावाची दशा /अंतर्दशा असेल तर सोशल मिडीया च्या माध्यमातून अशी सुगरण युटूब च्या किंवा अन्य सोशल platform च्या माध्यमातून घराघरात पोहोचते आणि प्रसिद्धीस पावते .  तृतीय भावावर , बुधवार गुरूची दृष्टी किंवा चंद्रासारखा ग्रह ३ ९ स्थानांशी संबंधित असेल तर  “ पाकशास्त्र  “ ह्या विषयावर एखादी पदवी किंवा त्यावरील पुस्तकाचे लेखन ,अनावरण होवून प्रसिद्धी मिळते . आजकाल खाद्य संस्कृतीचे जतन करण्यासाठी विविध खाद्य जत्रांचे आयोजन सुद्धा केले जाते . 


जगभरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये मोठे शेफ असणारे बहुतांश पुरुष सुद्धा आढळतात . त्यामुळे स्वयंपाक फक्त स्त्रियांचीच मत्तेदारी आहे असेही नाही. उत्तम स्वयंपाक बनवण्यासाठी जीव ओतावा लागतो त्यामुळे मनाची तयारी हवी. मनाने साथ दिली तर अजून काय हवे . कुठलीही गोष्ट माणूस जेव्हा मनापासून करतो तेव्हा ती नितांत सुंदर होते . पदार्थ पाहून खावासा वाटला पाहिजे आणि तो पोटात गेल्यावर त्याची पोचपावती तृप्तता चेहऱ्यावर दिसली पाहिजे , ते पाहून अपार कष्ट घेतलेल्या त्या गृहिणीला आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटते . सगळा थकवा क्षणात निघून जातो आणि समाधान मिळते . अश्या ह्या खवय्यांची शाबासकी मिळवणे खचितच सोपे नाही . 

नुसतेच उत्तम पदार्थ करता आले म्हणजे सुगरण नाही तर स्वयंपाक घरात कुठले धान्य कुठल्या मोसमात भरून ठेवावे , मुंबई सारख्या शहरात जिथे हवेत आर्द्रता असते त्या ठिकाणी मसाले , साठवणीचे , नाशिवंत पदार्थ कधी करावेत , ते भरताना , करताना कुठली विशेष काळजी घ्यावी . उदा. लोणची हि पारंपारिक काळापासून चिनीमातीच्या बरणीत दादरा बांधून ठेवली जात . आजकाल विविध प्रकारच्या काचेच्या बरण्यात भरून त्यावर दादरा म्हणजे सुती कापड बांधून ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून लोणच्याला हवा लागून ते नासणार नाही . धान्य खरेदी करताना काय काळजी घ्यावी , कडधान्ये कशी घ्यावी त्याला किती उन्हे दाखवावी , इत्यादी गोष्टींतील बारकावे घरातील गृहिणीला माहिती असतील तर घरच्या घरी अनेक मसाले आणि वर्षाचे धान्य भरून आर्थिक बचत सुद्धा होते . ऐनवेळी पैपाहुणा आला तर त्याला निदान गरम गरम आमटी भात किंवा पिठले भात आणि लोणच्याचा खार वाढता येतो. 

आपल्या सर्वांच्या घरी दुध , तूप दही हे पदार्थ सदैव हजेरी लावतात त्यामुळे कवडी दही कसे लावावे , विरजण कसे करावे हेही माहित असले पाहिजे . स्वयंपाकाची पूर्वतयारी जसे खरवडलेला नारळ , धने जिरे पावडर ई गोष्टी प्रमाणत आणि हाताशी असल्या कि पदार्थ उत्तम होतो. पदार्थ करण्यापूर्वीचे नियोजन असले कि धावपळ होत नाही . माझी आज्जी नेहमी म्हणायची स्वयंपाक घरात कुणी आले तर स्वयंपाक झाला आहे किंवा करायचा आहे हे समजले नाही पाहिजे इतके स्वयंपाक घर स्वछ्य नीटनेटके असावे. पदार्थ वाढताना उत्तम भांड्यात सजवून ठेवला तर त्याचे रंगरूप पाहूनच भूक लागते . १० पदार्थ करण्यापेक्षा चार पदार्थ करावेत जेणेकरून प्रत्येक पदार्थ मनसोक्त चाखता येयील. कुठल्या पदार्थासोबत कुठला पदार्थ केला पाहिजे जेणेकरून पचन संस्थाही बिघडणार नाही ह्याचाही अभ्यास असला पाहिजे . आपल्या घरातील व्यक्तींच्या आवडीनिवडी माहिती असल्याच पाहिजेत . उठसुठ सगळ्यात बटाटा घुसवला म्हणजे भाजी चांगली होत नाही किंवा घरात असतील नसतील तेव्हडे सगळे मसाले त्या भाजीत घातले म्हणजे सुद्धा भाजी चांगली होत नाही. प्रत्येक गोष्ट प्रमाणात घातली तर नक्की भाजी कुठली आहे तेही समजते आणि पदार्थाची लज्जत सुद्धा नक्कीच वाढते . 

सोशल मिडिया मुळे आज कुठलीही माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होते . नव विवाहिता सुद्धा ( आवड असेल तर ) यु टूब वर बघून एखादा वेगळा पदार्थ करते आणि सासरच्या माणसाना अचंबित करते . पिढी बदलली तरी खाण्यापिण्याची आवड , चोखंदळ वृत्ती जाणार नाही. मुलीना निदान बेसिक गोष्टी जसे कुकर लावणे , आमटी भात , पोळ्या  भाजी ,दही लावणे हे तरी यायला हवे. उच्च शिक्षण कितीही घ्या घरातील स्त्रीचा उत्तम स्वयपाक नेहमीच  संसार सुखाचा करण्यात मोलाचा हातभार लावत असतो . शिक्षण नोकरी तुम्हाला आत्मनिर्भर करेल पण घरातील स्त्रीचा स्वयपाक उत्तम असेल तर हाच प्रेमाचा धागा  तिच्या घरावर आणि घरातील माणसांना सदैव एकत्रित बांधून ठेवेल. सहमत ??? कालानुरूप पोळ्या करणारी बाई असेलही पण वेळप्रसंगी हॉटेल मध्ये खाण्यापेक्षा स्त्रीने घरात एखादा पदार्थ , जेवण बनवले पाहिजे. स्वयंपाक घराशी स्त्रीचे नाजून बंध विणलेले असतात आणि दिवसागणिक ते अधिक घट्ट होत जातात . 

स्त्रीचा वावर प्रामुख्याने स्वयंपाक घरातच अधिक असतो , तिथे तिचे मानाचे स्थान असते . घरच्या स्त्रीच्या हातचा सुग्रास भोजनाचा घास आणि त्यावर दिलेली तृप्तेची ढेकर हाच सुखी संसाराचा खरा मूलमंत्र आहे. कित्येक पिढ्या गेल्या आणि आल्या , वेश केश भूषेत बदल झाला पण हा मूलमंत्र घराघरात अजूनही अभिमानाने जपला जात आहे आणि पुढेही असाच जपला जाणार ह्यात दुमत नसावे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230