|| श्री स्वामी समर्थ ||
काल मला एका सद्गृहस्थांचा फोन आला होता त्याआधी त्यांनी मला मेसेज केला होता . त्यांच्या घराण्यातील प्रत्येक पिढीतील समस्या आणि अडथळे हे पितृ दोषामुळे कसे आले आहेत हे त्यांनी मला सांगितले. घरातील १०-१५ पत्रिका बघाव्या लागतील का . किती पैसे पाठवावे लागतील विचारात होते. अनेकांच्या कडे जावून आलो पण उत्तर अजूनही सापडले नाही असे त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना म्हंटले काही वेळात फोन करते.
फोन केल्यावर त्यांना एकच प्रश्न विचारला कि आत्ताची ह्या क्षणाची समस्या कुठली आहे तेव्हडे सांगा . त्यावर म्हणाले मुलाचा विवाह आणि नोकरीतील स्थिरता . म्हंटले त्याचे फक्त डिटेल पाठवा . दुपारी त्यांना फोन करून मुलाविषयीच्या सर्व शंकांचे समाधान केले. विशेष म्हणजे गुरु कृपेने त्यांच्या मुलाचा विवाह आणि नोकरीतील अडचणी ह्या दोन्ही गोष्टींवर समाधान ह्याच वर्षात होणार हे नक्की.
सांगायचे तात्पर्य काय कि प्रत्येक पिढीत प्रत्येक घरात काहीतरी वैगुण्य असले तरी प्रत्येकालाच तो दोष लागत नाही हे महत्वाचे लक्ष्यात ठेवा. आजकाल जरा काही झाले कि पितृदोष आहे म्हणून हजारो रुपये घेवून अनेक प्रकारच्या शांती केल्या जातात .
दोष तुमचा आमचा आहे कारण आपण भावनेच्या आहारी वाहवत जातो जराही विचार करत नाही. काय अयोग्य आणि योग्य ह्याचा विचार करण्याची सारासार बुद्धी घालवण्या इतपत काही जगबुडी झालेली नसते पण आपल्याला प्रश्नातून लवकर बाहेर पडायचे असते म्हणून कुणीही काहीही विचारले सांगितले कि डोळे मिटून त्या शांती वगैरे करून घेतो . शेवटी पदरी काहीच पडत नाही पण पैशाच्या अपव्यात मात्र होतो. आपल्या अडलेल्या प्रश्नासाठी नक्की काय उपाय असणे आवश्यक आहे हे पहिले पाहिजे .
आजकाल दोन पुस्तके वाचून घरोघरी ज्योतिषी झाले आहेत , पण त्यांचे ज्ञान किती आहे? असो .
आपण फसायचे योग आपल्या पत्रिकेत असतील तर आपण फसणार आणि असे पैसे खर्चही होत राहणार .उठ सुठ प्रत्येक पत्रिकेत पितृ दोष असेल तर बघायलाच नको. उपासना हा त्यावर औषधी जालीम उपाय आहे पण आम्ही तो करणार नाही. देवानेच आता खाली येवून आमच्याच नामाचा जप करावा इतकी नको तितकी प्रगल्भता आमच्याकडे असताना कश्याला हवाय तो देव आणि तो जप.
सांगायचे तात्पर्य , मुळात मनुष्याने आपले उत्तम कर्म करत राहावे , जे काही भोग असतील तर ते निमूटपणे भोगूनच संपवावे पुढील जन्मासाठी काही शिल्लक ठेवू नये आणि सर्वात मुख्य म्हणजे डोळसपणे डोळे कान नाक उघडे ठेवून जगावे, निसर्ग सुद्धा संकेत देतो. स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे , अडल्या पडलेल्याला मदत करावी आणि आपल्या मार्गाने राजमार्गाने आयुष्य व्यतीत करावे.
कुठलीही समस्या अशी नाही ज्याला पर्याय नाही , आणि कुठलाही देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याला पैशाचे किंवा अन्य कुठलेही आमिष चालणार नाही. मनापासून केलेली प्रार्थना , श्रद्धा नक्कीच फळते . अहो ज्याने घडवले आहे त्याला कसले आमिष दाखवता ? अखंड नामस्मरण आपले जीवन अगदी पितृ दोष सुद्धा नष्ट करेल . करत राहा फळ कधी द्यायचे ते त्याला ठरवूदेत . देव तुमच्या तालावर नाचणार नाहीत . कुठल्याही शास्त्राला वेठीस धरू नका . जे आहे ते स्वीकारा . सगळ्यावर उपाय नाहीत . विवाह झाला नाही नोकरी मिळाली नाही संतती नाही कि लगेच तो पितृदोष नसतो. प्रत्येक वेळी शनी राहू तुमच्या वाईटा साठी कारणीभूत नसतात , एखादा असा ग्रह असतो ज्याकडे तुमचे दुर्लक्ष्य झालेले असते. महादशेपेक्षा विदशा बलवान असते. साडेसाती , पनवती , पितृदोष हे शब्द आपल्याला माहित आहेत म्हणून कुठेही ते वापरणे आणि कुठल्यातरी योगाला किंवा ग्रहाला वेठीस धरणे योग्य नाही.
जे जे मनापासून कराल ते सर्व पोहोचणार आहे त्यांच्या पर्यंत हे नक्की. एका मुलाच्या पत्रिकेसाठी हि व्यक्ती १०-१५ पत्रिका आणि त्याचे मानधन देण्यास तयार होती पण मी ते घेतले नाही कारण आपल्याला चुकीच्या गोष्टी करून आपली कर्म वाढवून ठेवायची नाहीत . ज्योतिष हा धंदा नाही . शास्त्राला वेठीस धरू नका आणि त्याचा योग्य तो मान ठेवा . प्रत्येकाचे प्राक्तन भोग वेगवेगळे आहेत जे तो घेवून आलेला आहे त्यात कुणीही बदल करू शकत नाही . कुठलीही शहानिशा न करता कश्यातही भावनानिवाश होवून वाहवत जाणे चूक ठरेल. डझनभर ज्योतिषी आणि दोन डझन शांती ह्या फेर्यातून बाहेर या आणि परमेश्वराच्या चरणी त्याच्या सेवेत डोळसपणे रुजू व्हा. सर्वस्व त्याला अर्पण करा , आत बाहेर काहीच उरले नाही पाहिजे इतके त्याच्याशी एकरूप व्हा . जपाचे अधिष्ठान भक्कम असुदे कि त्या देवतेला येऊन तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल.
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment