|| श्री स्वामी समर्थ ||
आपण जन्माला येतो तेव्हा अंतराळात असलेली ग्रहस्थिती म्हणजे आपली पत्रिका ज्याला आपण जन्मलग्न कुंडली असेही म्हणतो आणि ती बदलत नाही . ग्रह गोचर करतात तेव्हा ते आपल्या पत्रिकेतून फिरतात पण मूळ पत्रिकेतील ग्रह हे कधीच बदलत नाही .आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे आपल्याला हा जन्म असतो.
बाल्यावस्थेपासून ते वृद्धापकाळापर्यंत अनेक मानसिक अवस्थातून आपण जातो , यश अपयश सर्व काही पाहतो म्हणूनच मला आपल्या आयुष्याला Cardiogram ची उपमा द्यावीशी वाटते. अनेक वेळा अत्यंत कष्ट करूनही यश पदरी पडत नाही आणि मग निराश व्हायला होते. आयुष्यात सतत धननाश , आप्तस्वकीयांकडून त्रास , त्यांच्या प्रेमाला पारखे होणे , लहान वयातच मातृ पितृ छत्र हरपणे , व्यसनाधीनता , गृहसौख्य नसणे , वास्तुदोष ,चांगली नोकरी न मिळणे , विवाहात अनेक अडचणी ,विवाह न टिकणे , संतती सौख्य नसणे ,आयुष्याची संध्याकाळ त्रासात , दुक्खात व्यतीत होणे ह्या सारख्या असंख्य गोष्टी घडताना दिसतात.
अश्या अनेक पत्रिकांचा अभ्यास केल्यावर ह्या सर्वांची मुळे पत्रिके मधील अनेक ग्रहयोगांमध्ये आहेत हे ध्यानात येते . ह्या ग्रहयोगांमुळे पत्रिका शापित होतात .आज अश्या काही ग्रहयोगांचा अभ्यास करुया .
आपले शरीर हे जरी नश्वर असले तरी आत्मा हा अमर आहे . वस्त्राप्रमाणे आत्मा शरीर बदलत असतो आणि त्या शरीराच्या माध्यमातून आपले प्रारब्धकर्म भोग भोगत असतो .आपण ह्या पृथ्वीवर घेतलेला जन्म हा काही उद्दिष्टाने असतो ,आपले कार्य झाले कि आपण इथून पुढील प्रवासाला म्हणजेच पुढच्या योनीत जाणार ,हे चक्र अव्याहत चालूच असते .
वराह मिहीरांनी आत्म्याच्या अवस्थेबद्दल कथन करताना म्हंटले आहे कि शरीर मृत झाल्यावर आत्मा हा कुठल्या लोकातून येवून पुन्हा शरीर धारण करतो. आणि हा आत्मा कुठल्या लोकातून येतो ह्याचा बोध प्रथम स्थानातील ग्रहांवरून होतो.
गुरु लग्नी असणारी व्यक्ती देवलोकातून येते . दानधर्म ,परोपकार , ईश्वरभक्ती, अन्नदान , सृजनशील मन , धार्मिक ग्रंथांचे पठण ,उपासक अशी हि व्यक्ती असते. नरकलोकातून भूलोकी जन्म घेणार्या व्यक्ती कश्या असतात तर निंदा , दुराचार , कुकर्म करणारी , जुगार व्यभिचार ,सट्टा , मदिरापान , दुर्जनांची सांगत , कोपिष्ठ स्वभाव असे दुर्गुणी गुण असलेला आत्मा हा अनेक यातना भोगून भूतलावर जन्म घेत असतो . भगवतगीतेमध्ये श्री कृष्णाने सांगितले आहे कि आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला कुठल्या योनीत जन्म प्राप्त होणार ते ठरते .
दुसर्याच्या संपत्तीचा ह्रास केलेल्या व्यक्ती तिर्यक योनीत म्हणजेच पशुपक्षांच्या योनीत जन्म घेतात. गीतेमध्ये पूर्वजन्माचा स्पष्ट उल्लेख आहे . पूर्वकर्माप्रमाणे आपले भोग आहेत हे नक्की. अश्या व्यक्तींच्या कुंडल्या ह्या शापित असतात . पितृशाप , घराण्यातील दोष ह्या संज्ञा आपल्याला माहित आहेत .तसे पाहायला गेले तार आपलेच आजीआजोबा ,पणजोबा आपल्याला ज्यांनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला , संस्कार केले ते आपल्याला कश्याला त्रास देतील ,त्यांची आपल्यावर कश्याला अवकृपा होईल . पण त्यांच्यामृत्यू पश्चात त्यांचे शरीर मृत पावते आणि पंचतत्वात विलीन होते पण आत्मा अमरत्व पावतो ,वस्त्राप्रमाणे शरीर बदलतो आणि म्हणूनच तो आपल्या मुलानातवंडांशी भावनिक दृष्टीने बांधला गेलेला नसतो. तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हापुन्हा जन्म घेत असतो .
आपण आपली पिढीजात वास्तू उपभोगतो ,जमीनजुमला , दागदागिने, DNA ,नाव , संपत्ती ह्यावर हक्क सांगतो पण अश्या पूर्वजांचे श्राद्धकर्म करताना कचरतो ,त्यांच्या तिथीला पान ठेवणे ,त्यांच्या आवडत्या गोष्टींचे दान करणे ह्याचा आपल्याला विसर पडतो. पर्त्येक मुलाने आपल्या आईवडील आणि पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा आशिर्वाद मिळवणे हे आपले कर्तव्यच आहे. अश्या प्रकारे त्यांच्या आत्म्यास शांती मिळते पण हे सर्व केले नाही तर मग त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळत नाही , इच्छा अपुर्या राहिल्याने आत्मा भटकत राहतो आणि पुढील पिढ्यांना त्यांचे शाप लागतात. निसंतान योग ,संतती चांगली न होणे ह्यासारखी फळे मिळतात. पितृशाप , मातृशाप ,मामाचा शाप , कुलदेवतेचा शाप , ब्रम्ह शाप ,पत्नीचा शाप , प्रेतशाप ह्यासारखे शाप लागतात हे पाराशरी ह्या ग्रंथात वाचण्यास मिळतील.
प्रथम दर्ज्याचा प्रखर पितृदोष म्हणजे शनी राहू युती . ज्या कुंडल्यामध्ये आपण रवी केतू , रवी राहू ,शनी केतू ,रवी केतू असे ग्रहांचे योग असतात तिथे पितृदोष असतो. चंद्र जर पंचमेष असून शनी राहू केतू मंगळ ह्यांनी युक्त असेल आणि गुरु एकटाच पंचमात किंवा नवमात असेल तर संतती सुखात अडचणी येतात . ह्या दोषापासून मुक्त होण्यासाठी गोदान , ब्राम्हण भोजन ,तर्पण करावे .वस्त्रदान ,पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणे हे उपाय करता येतात .
शापित कुंडलीतील महत्वाचे ग्रहयोग म्हणजे
१ लग्नाच्या चतुर्थात राहू
२ चंद्राच्या चतुर्थात राहू
३ चतुर्थेश राहुने युक्त
४ कुंडलीत कुठेही शनी राहू युती
५ धनस्थानात राहू
६ धनेश राहुयुक्त
तृतीय स्थान बिघडले असेल म्हणजे मंगळ राहुयुक्त असून पंचमेश लग्नात किंवा पंचमात अष्टमात असतात . विष्णूचा जप फलदायी ठरतो. पंचमात राहू असेल आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल तर सर्पशाप असतो. मुले विकृत, मतीमंद होतात किंवा त्यांच्यापासून पालकांना त्रास होतो. अश्यावेळी ब्राम्हण भोजन करावे .ब्राम्हण शाप म्हणजे धनु किंवा मीन राशीत गुरु असेल ,पंचमात मंगळ गुरु शनी असताना किंवा नवमेश अष्टमात असताना ब्राम्हण शाप लागतो आणि तो संततीस त्रासदायक असतो .ह्या शापातून मुक्त होण्यासाठी ब्राम्हण दान करावे.
मातुलशाप असेल तर पंचमात मंगळ राहू बुध गुरु असता मामाच्या शापाने संततीची हानी होते.
एकंदरीत पाहता हयात असलेल्या आपल्या घरातील जेष्ठ मंडळींचे हाल केले त्यांची सेवा केली नाही आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे श्राद्ध केले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही .त्यामुळे आपले आईवडील हयात असताना त्यांची सेवा केली , त्यांना काय हवे नको पहिले तर त्यांचे आशीर्वाद खर्या अर्थाने फळतील.
पूर्वजन्मातील आपली कर्म म्हणजे संचित. पंचम आणि नवम भावातून आपल्या लक्ष्यात येते कि आपण काय काय आपल्या सोबत घेवून आलो आहोत . स्वतःच्या कर्मामुळे जन्म घेत असतो आणि त्याप्रमाणे फळे भोगत असतो. आपल्या मागील जन्मातील चुकीच्या कर्मांची फळे भोगणे हे क्रमप्राप्त होते आणि ती भोगावयास लावतो तो शनी .अर्थात ह्यापासून कुणाचीच सुटका नाही .प्रारब्ध भोग कुणासही चुकले नाहीत आणि चुकणारहि नाही.
घराण्याचा दोष सुद्धा असतो जेव्हा राहू हा कारक असतो . ३ पिढ्या राहू भोग भोगायला लावतो . संतती वेडसर असते , स्त्री पुरुषाची लग्ने होत नाहीत परिणामी त्यांचा वंश पुढे वाढत नाही .
मातृकर्म म्हणजे चंद्र शनी युती ज्यास आपण विषयोग सुद्धा म्हणतो. चंद्रमा मनसो जातः. चंद्र म्हणजे आपली माता . चंद्र शनी युती अपयश ,मानसिक आंदोलने ,कष्ट दर्शवते.
रवी हा पित्याचा कारक आहे. रवी म्हणजेच आत्मा .शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आणि आत्मा पुनश्च जन्म घेण्यासाठी शरीराचा वापर करतो त्यासाठीही एखाद्या घरात जन्म घेतो आणि नशीब भोगण्यासाठी तयार होते. रवी शनी प्रतियोग वाईट फळे देतो .पित्याशी पटत नाही तसेच पित्यापासून दूर गेल्याशिवाय भाग्योदय सुद्धा होणार नाही .
शनी आणि शुक्र प्रतियोग अत्यंत वाईट असतो .शनी शुक्र युती बरी आहे. पत्नीचा कारक शुक्र आहे.
गुरु हा संततीचा कारक आहे. गुरु राहू युतीही वाईट असते. शनी गुरु युती हि वंश पुढे वाढवत नाही .
आपल्या मित्रमंडळींचा कारक बुध आहे आणि तो बिघडला असेल तर संगत वाईट असते . सहवासात असलेल लोक हे वाईट विचारांचे असतील किंवा बुध मंगळाने बिघडला असेल तर वाईट सवयी लागू शकतात.
मंगळ हा भौम म्हणजे भूमी पुत्र आहे. अनेकांच्याकडे वैभव असूनही वास्तू होत नाही . मंगळ चांगला असेल तर वास्तूचा लाभ होतो. काही घरात उत्कर्ष होतो तर काही घरात उतरती कळा लागते ,घरात सतत नैराश्य राहते ,अपयश येते. मंगळ बिघडला असेल तर हे शाप दिसून येतात.
एखाद्या व्यक्तीला आपण त्रास दिला असेल , त्याची संपत्ती लुबाडलेली असेल तर अश्या व्यक्तीचे मन दुखावते आणि परिणामी त्याचे शाप आपल्याला भोगायला लागतात . राहू हा शापाचे कारक ग्रह आहे ,तो शाप भोगावयास लावतो. शापांपासून मुक्त होण्यासाठी शास्त्रात शांत करणे हा उपाय सांगितला आहे. तूप साखर तांदूळ चांदी शुक्रवारी दान केल्यास वैभव प्राप्त होते.पितृदोष असेल तिथे लघुरुद्र करावे. शनी साठी चप्पल , छत्री , गोडेतेल , लोखंड ,उडीद वाडे इत्यादी दान करावे .गुरुचरित्राचे पारायण करावे . श्री दत्त महाराज हे उत्पती ,स्थिती आणि लय म्हणजे ब्रम्हा ,विष्णू आणि महेश ह्यातून निर्माण झालेले असल्याने दत्ताची उपासना करावी .शास्त्रात प्रत्येक शापातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचवले आहेत . पण आपण हे उपाय केले नाहीत तर भोग पाठ सोडत नाहीत .
मुळातच आपले कर्म सात्विक , उत्तम ठेवणे हे तरी निश्चित आपल्याच हाती आहे आणि ते करू शकतो. दुसर्याने केले म्हणून मग मीही तसेच करणार , हा विचार हि सुडाची शृंखला खंडित होवू देत नाही . म्हणूनच आपली उपासना भक्कम केली तर ह्या विचारातून आपण परावृत्त होऊ आणि अनेक चुकीच्या कर्मातूनही ..
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment