|| श्री स्वामी समर्थ ||
खाद्य संस्कृती हि भारतीयांची खास ओळख आहे. हृदयात जाण्याचा मार्ग पोटातून असतो असे म्हंटले जाते . माणूस काम करत नाही तर त्याचे वितभर पोट काम करते. भूक लागली कि अन्न हवे आणि ते मिळवण्यासाठी म्हणजेच उदर निर्वाहासाठी मनुष्य कर्म ( काम ) करण्यास बाहेर पडतो . आपल्या निसर्ग कुंडली मध्ये षष्ठ भाव हा नोकरीचा आहे आणि तिथे शरीराचा अवयव पोट सुद्धा आहे . पोट , पोटाला लागलेली भूक आणि काम ह्याचे उत्तम समीकरण आहे हे लक्ष्यात आले असेल.
वरिष्ठांच्या कडून रजेचा अर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर नेहमी लंच ब्रेक नंतर जावे .जेवण झालेले असते म्हणजेच पोट भरलेले असते आणि मग मेंदूही चालतो. भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात . उपाशी पोटी शब्दांचे खेळ होतात . असो . म्हणून लंच नंतर साहेब जरा निवांत असतात तेव्हा रजेचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते .
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि हे अन्न शिजवणे , वाढणे हि सुद्धा एक कला आहे. इतर अनेक शास्त्रांच्या सारखे स्वयंपाक करणे म्हणजेच “ पाकशास्त्र “ हे सुद्धा एक शास्त्र आहे. साधे ताक करणे ह्यात सुद्धा प्रकार आहेत आणि ते प्रत्येकाला जमतील असेही नाही. लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आई किंवा आजी उन्हाळ्यात वाळवणीचे पदार्थ करतात तेव्हा गच्चीत साहित्य डबे नेण्यासाठी आपण केलेली धावपळ आठवते आहे का ? आणि मग चोरून खालेल्या त्या पापडाच्या लाट्या ? गेलात ना भूतकाळात ? पापड , कुरडया सांडगी मिरच्या , चित्र आले ना डोळ्यासमोर ?
बाहेरून दमून आल्यावर स्वयंपाक घरातून आलेला खमंग फोडणीचा वास आपली भूक चेतावतो आणि पोटभर जेवल्यावर मन सुखावते . उत्कृष्ट स्वयंपाक करणे हि एक कला आहे. भारताच्या विविध प्रांतात अनेक विध पदार्थांची नुसती रेलचेल आहे . अनेक पदार्थ हे वातावरण, ऋतू ह्यांना धरूनही केले जातात जसे चैत्रात कैर्यांचा मोसम आला कि थंडगार पन्हे , आंबेडाळ करून स्त्रिया हळद कुंकू करतात . उन्हाळ्यात आंब्याचा मोरंबा , कडक ऊन असल्यामुळे लोणची ,वर्षाचे साठवणीचे पापड , कडधान्ये वाळवणे , बटाट्याचा कीस ह्या गोष्टी घराघरात होत असतात .
प्रत्येक स्त्री मग ती कुठल्याही वयाची असो “ स्वयंपाक “ घरावर तिची खास हुकमत असते , तिचा ठसा असतो . तिथे तिचा राणीसारखा थाट आणि प्रेमाचा हात वर्षानुवर्ष फिरत असतो . स्वयंपाक घरात स्त्रियांना इतरांनी लुडबुड केलेली खपत नाही. वस्तू जागच्या जागी ठेवा हे सांगणारी आई आज्जी घरोघरी आहेच कि.
उत्कृष्ठ स्वयंपाक करणे हे एका कुशल सुगरणीचे लक्षण आहे. साधी फोडणी पण तीही जमावी लागते . फोडणी खमंगजमली कि ९० % काम झाले म्हणून समजायचे . पदार्थात तिखट मीठ मसाल्यांचे प्रमाण योग्य असेल तर पदार्थाची लज्जत वाढते . नाश्त्याला काय पदार्थ करायचा , दुपारी काय आणि दोन्ही जेवणात काय करायचे ह्याचे वेळापत्रक घरातील मंडळींच्या आवडीनिवडी लक्ष्यात घेवून तयार करावे लागते . त्याशिवाय अधून मधून हजेरी लावणारे सणवार.
काळ बदलला तसा वाढदिवसाचा मेनू बदलला . पूर्वीची गवल्याची खीर , पुरणपोळी , सांज्याची पोळी आणि श्रीखंडाची जागा आता पाणीपुरी मोमोज , पास्ता ह्यांनी घेतली अगदी जागा सुद्धा बदलली . परवाच ऐकले आजकाल वाढदिवस मॉल किंवा म्याकी मध्ये होतात म्हणे. अर्थात काही अपवाद आहेतच .असो .
आपण कितीही आधुनिक पणाचे मुखवटे धारण केले तरी घरच्या जेवणाची सर कश्यालाच नाही हे सगळेच मान्य करतील. घरच्या स्त्रीच्या हातचा सुग्रास भोजनाचा घास आणि त्यावर दिलेली तृप्तेची ढेकर हाच सुखी संसाराचा खरा मूलमंत्र आहे. पूर्वीच्या काळी बाहेरचे पदार्थ आणून खाणे हे माहितच नव्हते कारण “ बाहेरचे जेवण “ ह्या संकल्पना नव्हत्याच . जे काही आहे ते घरी करून खायचे कारण तेव्हा हे सर्व लाड खिशालाही परवडणारे नव्हते . त्यामुळे पूर्वीच्या पिढीत स्त्रिया स्वयपाक घरात अधिक वावरताना दिसत त्याचे कारण हेच .
आता नोकरी व्यवसाय ह्यामुळे आयुष्यात अनेक बदल झाले आणि ते आपण स्वीकारले त्यातील एक मोठा बदल म्हणजे घरात असलेली “ स्वयंपाक करणारी बाई “ . असो. कालाय तस्मै नमः . आम्ही लहान असताना आचारी घरी यायचे मदतीला पण तेही फक्त सणवार असेल तेव्हाच . कालानुरूप स्त्री आता नोकरीसाठी बाहेर पडल्यामुळे मनात असूनही आता अनेक पदार्थ करायला पुरेसा वेळ मिळत नाही . त्यामुळे आता दिवाळीचा फराळ , संकष्टीचे मोदक करणाऱ्या स्त्रियांचे व्यवसाय जोमाने फुलत आहेत . ह्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाले आहे. आपले घर सांभाळून घरी वड्याचे , तांदुळाचे , ज्वारीचे पीठ घरघंटी वर दळून देणे , वेगवेगळे मसाले तयार करून विकणे हे पुणे मुंबई सारख्या शहरात दिसून येते आणि ह्या तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रदर्शनांचे आयोजन सुद्धा केले जाते .
तर मंडळी असा हा सुग्रास स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीच्या पत्रिकेत असे काय ग्रह योग असतात ज्यामुळे ती इतका सुंदर स्वयंपाक बनवते त्याबद्दल आज विचार करुया .
मुळात मला स्वयंपाक करायचा आहे तो माझ्याच घरातल्या माणसांसाठी आणि त्यात विविधता सुद्धा आणली पाहिजे हा विचार मनात यायला मुळात कुटुंबातील माणसे आणि आपले घर ह्याबद्दल स्त्रीला प्रेम , आपलेपणा हवा. म्हणजेच पत्रिकेतील द्वितीय चतुर्थ भाव आणि चंद्र चांगला हवा. इच्छा असली पाहिजे . घरात पाहुण्याची उठबस करणे सोपे नसते, कुणाला चहा लागतो तर कुणाला कॉफी , ह्या सर्व गोष्टी हसतमुखाने कराव्या लागतात .
स्वयंपाक आपण हाताने करतो. हात म्हणजे बुध आला . पदार्थाचे रंग आणि त्याची मांडणी जसे कांदे पोह्यावर घातलेली कोथिंबीर , ओले खोबरे आणि लिंबाची फोड बघूनच पदार्थ खावासा वाटतो . पदार्थ गोड असो अथवा तिखट त्यात दोन चमचे प्रेम घालावे लागते नाहीतर हॉटेल मधील वेटर आणि आई ह्यात फरक उरणार नाही. कुठल्याही पदार्थाची चव आणि त्याची मांडणी , रंगसंगती ह्यासाठी शुक्र ग्रह बलवान लागतो . चंद्र शुक्र हे रस आहेत म्हणून त्यांच्याशिवाय पदार्थाची चव लागणार नाही. वेगवेगळ्या पदार्थांच्या कृती वाचून शोधून त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी पंचम भाव हवा. स्त्री स्वतः स्वयंपाक करणार म्हणजे तिचा लग्न आणि जोडीला लग्नेश चंद्र बुध शुक्र सुस्थितीत हवेच.
पदार्थ बनवण्यासाठी तासंतास शेगडी जवळ उभे राहावे लागते आणि त्याला शारीरिक उर्जा बळ लागते त्यामुळे मंगळाची हजेरी हवीच हवी . स्वयंपाक हा एक दोन दिवस नाही तर वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबासाठी करायचा असतो म्हणजे त्यात सातत्य हवे . सातत्य चिकाटी संयम देणारा शनी हवा. नाविन्य हवे म्हणून अनेकदा खाबुगिरी करणारा राहूही हवा . एखादा पदार्थ बिनसला किंवा मनासारखा चांगला झाला नाही तर सोडून न देता चिकाटीने पुन्हा प्रयत्न करण्याची मानसिकता सुद्धा लागते . प्रगत जगातील वैविध्य आणि तोच तोच पणा टाळणारे काहीतरी नाविन्याचा शोधात असणारे ग्रह म्हणजे हर्शल राहू ज्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मग फालुदा , वेगवेगळ्या भाज्यांच्या नवनवीन रेसिपी करण्याचे कसब असणे आणि हि कौशल्य पणाला लावणे हे “ आधुनिक सुगरणी “ पुढील चक्क आव्हान म्हंटले पाहिजे .
कुठल्याही घटना किंवा गोष्टीसाठी नवग्रहांची पालखी लागते त्याशिवाय घटना घडणार नाही अगदी तोच नियम इथेही आहे. नवग्रहांची कृपादृष्टी होते तेव्हाच “ सुगरण “ जन्माला येते. पत्रिकेतील तृतीय भावाची दशा /अंतर्दशा असेल तर सोशल मिडीया च्या माध्यमातून अशी सुगरण युटूब च्या किंवा अन्य सोशल platform च्या माध्यमातून घराघरात पोहोचते आणि प्रसिद्धीस पावते . तृतीय भावावर , बुधवार गुरूची दृष्टी किंवा चंद्रासारखा ग्रह ३ ९ स्थानांशी संबंधित असेल तर “ पाकशास्त्र “ ह्या विषयावर एखादी पदवी किंवा त्यावरील पुस्तकाचे लेखन ,अनावरण होवून प्रसिद्धी मिळते . आजकाल खाद्य संस्कृतीचे जतन करण्यासाठी विविध खाद्य जत्रांचे आयोजन सुद्धा केले जाते .
जगभरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये मोठे शेफ असणारे बहुतांश पुरुष सुद्धा आढळतात . त्यामुळे स्वयंपाक फक्त स्त्रियांचीच मत्तेदारी आहे असेही नाही. उत्तम स्वयंपाक बनवण्यासाठी जीव ओतावा लागतो त्यामुळे मनाची तयारी हवी. मनाने साथ दिली तर अजून काय हवे . कुठलीही गोष्ट माणूस जेव्हा मनापासून करतो तेव्हा ती नितांत सुंदर होते . पदार्थ पाहून खावासा वाटला पाहिजे आणि तो पोटात गेल्यावर त्याची पोचपावती तृप्तता चेहऱ्यावर दिसली पाहिजे , ते पाहून अपार कष्ट घेतलेल्या त्या गृहिणीला आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटते . सगळा थकवा क्षणात निघून जातो आणि समाधान मिळते . अश्या ह्या खवय्यांची शाबासकी मिळवणे खचितच सोपे नाही .
नुसतेच उत्तम पदार्थ करता आले म्हणजे सुगरण नाही तर स्वयंपाक घरात कुठले धान्य कुठल्या मोसमात भरून ठेवावे , मुंबई सारख्या शहरात जिथे हवेत आर्द्रता असते त्या ठिकाणी मसाले , साठवणीचे , नाशिवंत पदार्थ कधी करावेत , ते भरताना , करताना कुठली विशेष काळजी घ्यावी . उदा. लोणची हि पारंपारिक काळापासून चिनीमातीच्या बरणीत दादरा बांधून ठेवली जात . आजकाल विविध प्रकारच्या काचेच्या बरण्यात भरून त्यावर दादरा म्हणजे सुती कापड बांधून ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून लोणच्याला हवा लागून ते नासणार नाही . धान्य खरेदी करताना काय काळजी घ्यावी , कडधान्ये कशी घ्यावी त्याला किती उन्हे दाखवावी , इत्यादी गोष्टींतील बारकावे घरातील गृहिणीला माहिती असतील तर घरच्या घरी अनेक मसाले आणि वर्षाचे धान्य भरून आर्थिक बचत सुद्धा होते . ऐनवेळी पैपाहुणा आला तर त्याला निदान गरम गरम आमटी भात किंवा पिठले भात आणि लोणच्याचा खार वाढता येतो.
आपल्या सर्वांच्या घरी दुध , तूप दही हे पदार्थ सदैव हजेरी लावतात त्यामुळे कवडी दही कसे लावावे , विरजण कसे करावे हेही माहित असले पाहिजे . स्वयंपाकाची पूर्वतयारी जसे खरवडलेला नारळ , धने जिरे पावडर ई गोष्टी प्रमाणत आणि हाताशी असल्या कि पदार्थ उत्तम होतो. पदार्थ करण्यापूर्वीचे नियोजन असले कि धावपळ होत नाही . माझी आज्जी नेहमी म्हणायची स्वयंपाक घरात कुणी आले तर स्वयंपाक झाला आहे किंवा करायचा आहे हे समजले नाही पाहिजे इतके स्वयंपाक घर स्वछ्य नीटनेटके असावे. पदार्थ वाढताना उत्तम भांड्यात सजवून ठेवला तर त्याचे रंगरूप पाहूनच भूक लागते . १० पदार्थ करण्यापेक्षा चार पदार्थ करावेत जेणेकरून प्रत्येक पदार्थ मनसोक्त चाखता येयील. कुठल्या पदार्थासोबत कुठला पदार्थ केला पाहिजे जेणेकरून पचन संस्थाही बिघडणार नाही ह्याचाही अभ्यास असला पाहिजे . आपल्या घरातील व्यक्तींच्या आवडीनिवडी माहिती असल्याच पाहिजेत . उठसुठ सगळ्यात बटाटा घुसवला म्हणजे भाजी चांगली होत नाही किंवा घरात असतील नसतील तेव्हडे सगळे मसाले त्या भाजीत घातले म्हणजे सुद्धा भाजी चांगली होत नाही. प्रत्येक गोष्ट प्रमाणात घातली तर नक्की भाजी कुठली आहे तेही समजते आणि पदार्थाची लज्जत सुद्धा नक्कीच वाढते .
सोशल मिडिया मुळे आज कुठलीही माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होते . नव विवाहिता सुद्धा ( आवड असेल तर ) यु टूब वर बघून एखादा वेगळा पदार्थ करते आणि सासरच्या माणसाना अचंबित करते . पिढी बदलली तरी खाण्यापिण्याची आवड , चोखंदळ वृत्ती जाणार नाही. मुलीना निदान बेसिक गोष्टी जसे कुकर लावणे , आमटी भात , पोळ्या भाजी ,दही लावणे हे तरी यायला हवे. उच्च शिक्षण कितीही घ्या घरातील स्त्रीचा उत्तम स्वयपाक नेहमीच संसार सुखाचा करण्यात मोलाचा हातभार लावत असतो . शिक्षण नोकरी तुम्हाला आत्मनिर्भर करेल पण घरातील स्त्रीचा स्वयपाक उत्तम असेल तर हाच प्रेमाचा धागा तिच्या घरावर आणि घरातील माणसांना सदैव एकत्रित बांधून ठेवेल. सहमत ??? कालानुरूप पोळ्या करणारी बाई असेलही पण वेळप्रसंगी हॉटेल मध्ये खाण्यापेक्षा स्त्रीने घरात एखादा पदार्थ , जेवण बनवले पाहिजे. स्वयंपाक घराशी स्त्रीचे नाजून बंध विणलेले असतात आणि दिवसागणिक ते अधिक घट्ट होत जातात .
स्त्रीचा वावर प्रामुख्याने स्वयंपाक घरातच अधिक असतो , तिथे तिचे मानाचे स्थान असते . घरच्या स्त्रीच्या हातचा सुग्रास भोजनाचा घास आणि त्यावर दिलेली तृप्तेची ढेकर हाच सुखी संसाराचा खरा मूलमंत्र आहे. कित्येक पिढ्या गेल्या आणि आल्या , वेश केश भूषेत बदल झाला पण हा मूलमंत्र घराघरात अजूनही अभिमानाने जपला जात आहे आणि पुढेही असाच जपला जाणार ह्यात दुमत नसावे.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment