॥ श्री स्वामी समर्थ॥
आमरण वारी घडो....
“ज्ञानोबा माउली तुकाराम....हा गजर आसमंतात दुमदुमतो तेव्हा जणू
प्रत्यक्ष माऊलीच प्रत्यक्ष वारीसोबत असल्याचा भास होतो.
मंडळी , अगदी बरोबर ओळखलत..आजचा आपला विषय आहे “वारी....आषाढी एकादशीची “ आणि त्याचे याची देही
याची डोळा कथन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पंढरपूर वारीच्या “ग्रंथ
भांडाराचे प्रमुख “श्री. श्रीधर यशवंत जोशी”.
जोशी काकांनी त्यांच्या वयाची ७२ वर्षे पूर्ण केली असून महिंद्र &
महिंद्र ह्या कंपनीत Accounts Department मध्ये
कार्यरत होते. त्यांनी पंढरीच्या २९ वाऱ्या केल्या असून गेली २५ वर्षे ते ह्या
ग्रंथ भांडाराचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
जोशी काकांच्या सासूबाई ,श्रीमती सुधाताई दत्तात्रय दिघे ह्या शिक्षिका
होत्या आणि १९८५ सालात त्यांनी पहिली वारी केली. त्या वारीचे सुधाताईनी केलेले
वर्णन ऐकून जोशीकाका अत्यंत सद्गदित झाले आणि आपणही ह्या वारीचा आनंद प्रत्यक्ष
घ्यावा ह्या विचाराने भारावून त्यांनी १९८६ साली पहिली पंढरपूरची वारी
केली ...माऊलींची अखंड कृपा लाभलेल्या जोशी काकांनी त्यानंतर अविरत वारीचा
जणू ध्यास घेतला आणि आज आपल्याला त्यातील काही अनुभव ते कथन करत आहेत.
विठूराया मुळात कर्नाटकातील दैवत आणि त्यामुळे कर्नाटकातील भाविकांचा ह्या
वारीत विशेष सहभाग असतो...ह्या वारीचे कुठल्याही स्वरूपाचे कुठलेही आमंत्रण नसूनही
तनामनावर राज्य करणाऱ्या माउलींच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी तसेच बहुतांश शेतकरी
वर्ग मोठ्या संखेने वारीत सामील होतो.
वारीत अनेक दिंड्या सामील असतात ,परंतु सलग ५ वर्षे एखादी दिंडी
वारीला येत असेल तर त्याची अधिकृत नोंदणी आळंदी संस्थानात केली जाते. अश्या आजवर
२७० दिंड्यांची अधिकृत नोंदणी संस्थानात झाली आहे. कर्नाटकातील शितोळे सरकार , हैबत बाबा ज्यांना मालक म्हणूनही संबोधले जाते आणि आळंदी संस्थानातील ट्रस्ट
एकत्रित पणे संपूर्ण वारीचे नियोजन पाहतात. हैबत बाबा ,शितोळे सरकार यांचे वैशज यांची आजही मोठ्या संखेने वारीत उपस्थिती असते.
एकूण १८ दिवस चालणाऱ्या ह्या वारीत दिंडीमधील २ लाख तर इतर एक लाख लोक
हजेरी लावतात. योगिनी एकादशीच्या २ दिवस आधी माऊलींचे आळंदीहून प्रस्थान होते आणि आळंदीतील
गांधीवाडा जे माउलींचे आजोळ आहे तिथे त्यांचा मुक्काम होतो. टाळ मृदुंगाच्या गजरात आळंदीहून माउलींची पालखी
निघताना मंदिराचा कळस हलतो अशी आख्यायिका आहे. जणू प्रत्यक्ष माउलीच आनंदाने डोलत वारीला “Go
Head “ देत
असावी. गांधी वाड्यातील मुक्कामानंतर दुसर्या दिवशी पुण्याला प्रस्थान
होते जिथे २ रात्री भवानीपेठ ,पुणे येथे माऊलींचा मुक्काम असतो. तिसर्या दिवशी
सकाळी म्हणजेच योगिनी एकादशीला “ज्ञानेश्वर माऊली “ आणि “संत तुकाराम महाराज”
ह्यांच्या पालख्या लाखो वारकर्यांनी विठ्ठलाच्या केलेल्या नामघोषात निघतात आणि
पुढे हडपसर येथे त्या वेगळ्या होतात . सासवड मार्गे माऊलींची तर बारामती मार्गे
तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत चालणाऱ्या
वारीत वारकरी रोज १२ ते १५ km चालतात .सुरवातीचे २ दिवस म्हणजे आळंदी ते पुणे २२
km आणि पुणे ते सासवड ३२ km चालावे लागते. वारकऱ्यांच्यासाठी आपत्कालीन सेवा म्हणून
संस्थानाची वैद्यकीय सेवा असलेली Mobile Van हि सोबत असते .
दिंडीतील रिंगणाच्या खेळात
सामील होणारे २ अश्व, ज्यातील एक माऊलींचा तर दुसरा त्यांचे गुरु “निवृत्तीनाथ”
यांचा ,हे हुबळीहून येतात.
जोशी काका वारीबद्दल बोलताना सद्गदित होवून म्हणाले ,माझे साडू श्री
सुधाकर वामन जोशी,उत्कर्ष प्रकाशन,पुणे यांचे मालक तेव्हा आळंदी वारकरी ट्रस्ट
मध्ये काम पाहत होते . जोशीकाकांचा सेवाभाव आणि प्रामाणिकपणा त्यांनी जोखला आणि
त्यांची नियुक्ती “ग्रंथ भांडाराचे प्रमुख “ म्हणून करण्यात आली. जोशीकाका व त्यांचे ४
सहकारी सांभाळत असलेल्या ग्रंथभांडाराचे काम जोखमीचे आहे. ग्रंथ भांडारात , अर्थाची आणि
पारायणाची म्हणजेच ओव्यांची अश्या २ प्रकरच्या ज्ञानेश्वरी तसेच संतांचे हरिपाठ,
तुकाराम गाथा इ चा समावेश असतो. अंदाजे रुपये २०-२५ पासून ३०० रुपया पर्यंत ग्रंथ
,पुस्तके उपलब्ध असतात .एकंदरीत दीड ते २ लाखांची विक्री होते पण शेवटच्या २ -३ दिवसात
त्याचे प्रमाण अधिक असते.
प्रातःसमयी माऊलींच्या ,चांदीच्या पादुकांची पूजा हि चांदीच्या
चौरंगावर होते .पुजेस सर्व चांदीचीच उपकरणे वापरली जातात. त्यावेळी वारकरी भोवती
फेर धरून नित्यापाठाचे अभंग म्हणतात त्यात जोशीकाकाही कित्येक वेळा सामील होतात.
१८ दिवस चालणाऱ्या ह्या वारीची सांगता चंद्रभागेतीरी असलेल्या
पंढरपुरात आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी होते. गेले १८ दिवस आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या आणि डोळ्यात पंचप्राण आणून विठ्ठल दर्शनाचा आभिलासी असलेल्या भक्तांचा पांडुरंग चरणी बांध फुटतो .माऊली आणि विठुनामाचा गजर ,टाळमृदुंग चंद्रभागेतीरी उपस्थित भाविकांना जणू आसमंत ठेंगणे होते. जोशीकाकाना त्यांचा
पांडुरंगाच्या दर्शनाचा अनुभव विचारता ते म्हणतात “ हा अनुभव शब्दांकित करणे केवळ
कठीण...डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत....पांडुरंगा काय मागू तुझ्याकडे ??..आमरण वारी
घडो आणि सदैव तुझेच चिंतन राहो.....”
खरच , आज जोशीकाकांकडून वारीचा वृतांत ऐकताना माझ्यासारखेच तुम्हालाही एकदातरी आयुष्यात वारीला जावे असे वाटले नाही तरच नवल. आज एकादशीच्या दिवशी
हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचवताना मनास विशेष आनंद होत आहे.
जोशीकाकांकडून उत्तरोत्तर अशीच माऊलींची सेवा घडो अशी प्रार्थना करून हा लेख
मी आज चैत्र एकादशीस माउलींच्या चरणी अर्पण करते....