Showing posts with label अध्यात्म. Show all posts
Showing posts with label अध्यात्म. Show all posts

Sunday, 13 September 2020

माझे जपजाप्य ..अनुभव कथन

||श्री स्वामी समर्थ ||

श्वासागणिक जप

अध्यात्मातील पहिले पाऊल म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण. आज २१ वर्ष पोथी वाचूनही महाराज समजले नाहीत इतके हे अध्यात्म कठीण आहे असे मला वाटते .माझ्या सासूबाई एकदा घरी आल्या आणि म्हणाल्या अग, पोथी वाचतेस आनंदच आहे पण जप ? तो कुठवर आलाय? त्याची सुरवात कर. काही दिवसांनी अक्षय तृतीया होती. मी त्यांना म्हंटले तेव्हापासून करते .त्या हसल्या आणि म्हणाल्या आज आपण बोलत आहोत ना? ज्या क्षणी जप करावा हा विचार मनात आलाय तोच मुहूर्त.वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज काय? मला पटले .
दुपारी जेवण झाले आणि मग म्हंटले चला जप करुया. मग मनात विचार आला चहा पिऊन करूया म्हणजे अगदी फ्रेश वाटेल. त्यानंतर घरातील कामवाली बाई आली तिला चार गोष्टी ,कामे सांगण्यात वेळ गेला. तेव्हड्यात बाहेरील एक काम आठवले म्हंटले ते आधी करून आले पाहिजे.
संध्याकाळी स्वयपाक आणि प्राण गेला तरी चालेल पण TV वरच्या मालिका पहिल्याच पाहिजेत. रात्री झाली आणि चक्क झोपलेही. पण झोप लागेना काहीतरी राहून गेल्याची मनाला चुटपूट लागली. मग आठवले..जप राहिला. सासुबाईना सांगितले आहे करीन आजपासून. अगदी महाराजांवर जणू काही उपकार केले अश्या थाटात उठून माळ घेतली आणि जप केला . केला कसला अर्धवट झोपेत जांभया देत कसा तरी उरकला. पण युरेका, आपण अगदी जगावेगळे काहीतरी केले ह्या आनंदात झोपले. 


दुसर्या दिवशी सासुबाईचा फोन ,काय ग ? त्या बोलायच्या आधीच माझे जपाचे प्रगतीपुस्तक तयार होते. होहो झाला कि. त्या अंतर्यामी होत्या समजलं त्यांना काय ते. मग आता तुला काहीतरी बक्षीस द्यायला हवे. दुसर्या दिवशी त्या आल्या आणि त्यांनी मला जपाचा बोटात घालायचा counter दिला. भाजी आणायला जाताना ,मालिका बघताना ,घालत जा हा counter तोच तुला जपाची आठवण करून देयील. मी त्याना नमस्कार केला पण मनातून खजील झाले. त्यांच्याकडे बघायची सुद्धा लाज वाटली आणि आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली.पण तो दिवस माझ्या आयुष्यातील turning point होता. 


श्री.गजानन विजय पारायण चालूच होते कधी एक अध्याय तर कधी ३, ७ कधी ९ तर कधी संपूर्ण पोथी. मी माझ्या वाचनाला कधीही कसलेही निर्बंध घातले नाहीत . ऐकावे जनाचे करावे मनाचे . आजही मी माझे सर्व घर ,व्यवसाय सांभाळून पोथी वाचते. आज इतकेच वाचायचे असे काहीही नाही. पण हो, जे वाचीन ते मनापासून आणि श्रद्धेने. महाराज माझी मोरंब्याची बरणीच आहेत .त्यांना समजते मी मनापासून वाचते. वाचन आणि त्यानंतर जो अध्याय वाचला त्यावर मनन आणि चिंतन . नुसतेच वाचन उपयोगाचे नाही त्यात महाराजांनी दिलेला उपदेश अंगी बाणला, प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणला तर त्या पोथी वाचनाला अर्थ आहे नाहीतर ते एक पुस्तक वाचण्यापलीकडे काहीही नाही असे माझे मत आहे. बघा पटतंय का.


अनेक धर्मिक ग्रंथांचे माझे वाचन चालू होते आणि त्यात मी रमत होते. पण जप ? अधेमध्ये करत होते पण इतका नाही . करावासा वाटतच नाही असेही काही नव्हते पण होत नव्हता हे मात्र निर्विवाद सत्य होते.


म्हणतात न आयुष्यात प्रत्येक गोष्टींची वेळ ठरलेली असते. माझा मुलगा तेव्हा शाळेत जात होता आणि एक दिवस अचानक १०० वरून एकदम १०४ ताप भरला आणि कमीच होत नव्हता . माझा धीर सुटत चालला होता , सगळे जण होते घरात पण मन अस्थिर झाले आणि का कोण जाणे महाराजांच्या समोर उभी राहिले, मनात खूप बोलायचे होते पण शब्द फुटेना . जपाची माळ घेतली आणि आयुष्यात कधीही इतके काहीही मनापासून केले नव्हते तितक्या मनापासून श्री गजानन जय गजानन हा जप सुरु केला. काहीही कुणाशी बोलले नाही सर्व लक्ष जपावर केंद्रित केले. पहाटे ४ वाजता ताप उतरला आणि त्या दिवसापासून पुन्हा आला नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले ,आजही मला तो दिवस आठवतो. महाराजांच्या समोर पुन्हा उभी राहिले. मला काहीच बोलायला लागले नाही त्यांना माझ्या मनातले सर्व समजले होते. दुखे गळयापर्यंत आल्याशिवाय देव दिसत नाही,त्याची आठवण सुद्धा होत नाही. अध्यात्मात shortcut नाहीत आणि सहज तर काहीच नाही हे आज समजले.अहंकार गळून पडल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही .श्रद्धेचा , भक्तीचा अगदी कस लागतो आणि महाराज सारखी परीक्षा पाहतात .सगळे पेपर एकापेक्षा एक कठीण असतात .पण खरा भक्त त्यांच्या सगळ्या परीक्षांवर खरा उतरतो .
त्या दिवशी मला जपाचे महत्व समजले. त्या दिवसापासून आजवर जप सोडला नाही. कुणी सांगून जप होत नसतो . सासुबाईनी मार्ग दाखवला पण त्यावर चालायचे  होते मात्र माझे मलाच. पण ह्या प्रसंगानंतर मागे वळून पहिले नाही.

 कालांतराने जप कसा करावा ह्यावर बरेच वाचन आणि माझे स्वतःचेही लिखाण झाले. जपाचे महत्व मनात खोलवर रुजले. पूर्वी मी counter घेवून जप करत असे .मग कधी माळ घेत असे . मी कधीही संकल्प सोडून जप केला नाही आणि केलेला जप कधी मोजलाही नाही. मनुष्य हा स्वार्थी आहे, मला काहीही देवाकडून नको असे होत नसते. आपण प्रापंचिक साधीसुधी माणसे ,इच्छा , आकांक्षा न संपणार्या आहेत. मीपण स्वार्थीच आहे कि. मला शांत मरण हवय तेही त्यांच्याच सेवेत असताना. 

अनेक लेख वाचून मी ह्या निर्णयाला आले कि जप हि सुद्धा एक सर्वश्रेष्ठ सेवा आहे. प्रत्येक जण जप ,पारायण ,प्रदक्षिणा अश्या अनेक उपचारातून आपल्या गुरूंची ,आराध्याची सेवा करत असतोच ,पण जप म्हणजे मुखातून सदैव त्याचे नाम आणि ते नाम तुम्हाला आपल्या गुरूंच्या अधिक समीप नेते. जितका वेळ जप तितका वेळ तोंड बंद, म्हणजे त्या वेळात आपण कुणाशी बोलणार नाही आणि कुणी आपल्याशी . म्हणजे पहा ना कितीतरी कर्म वाचली आपली. मुखातून फक्त गुरूंचे नामस्मरण . सगळ्या आजारांवर एकच औषध आहे... नाम.


नामाची महती खूप आहे. सुरवातीला ते अत्यंत कठीण आहे. करायला सुरवात केली कि सगळे आठवते ..कपाट लावायचे आहे, कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत, तांदूळ संपले आहेत, शेजारणीने हळदीकुंकवाला बोलावले आहे ...एक ना दोन..सगळे करणे सोप्पे पण जप करायला बसूच शकत नाही तेव्हाच ते किती कठीण आहे हे जाणवते. जप म्हणजे चौफेर उधळलेल्या आपल्या मनास एका जागी स्थिर बसवणे, हे ज्याला जमले त्याला सर्व जमले. हे कठीण आहे पण अशक्य नाही आणि ह्यास हवा तो मनाचा निर्धार, दृढनिश्चय . मनच काय आपले शरीर सुद्धा एकाजागी स्थिर राहू शकत नाही. २ क्षण बसलो तरी आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होतो. मग विचार करा आपले ऋषीमुनी वर्षानुवर्ष किती आणि कसा जप करत असतील. पण एकदा त्याची गोडी लागली कि त्याची मधुर फळे चाखणे हे सौभाग्यच. 


माझा जपाचा कालावधी कालांतराने वाढू लागला. आता मी जपासाठी वेळ काढू लागले, जप करण्यात गोडी वाटू लागली आणि महाराजांसोबत गप्पाही वाढू लागल्या. घरातील प्रत्येक गोष्ट आज भाजी आमटी काय केली इथवर आज नवीन चादरी आणल्या इथवर सर्व गप्पा महाराजांशी होत होत्या त्या आजतागायत आहेतच. जसजसा वेळ गेला तसे कुठ्लेही जपाचे साधन न घेता जप होवू लागला. घरातील नित्याची कामे जसे झाडांना पाणी घालणे, केर काढणे , कपड्यांच्या घड्या घालणे ई करताना मनात जप होवू लागला. जप मोजून अहंकार येतो आणि मी इतका जप केला ह्यातच आपण अडकून राहतो म्हणून मी जप कधीच मोजत नाही. जप करा हे कुणी कुणावर लादू शकत नाही तो आपणहून झाला तर त्यात अर्थ आहे. 


जप हा आपल्या आत्मिक समाधानासाठी , आनंदासाठी आणि अर्थात गुरुसेवेसाठी करायचा. महाराजंची सेवा करतानाचा आनंद अवर्णनीय असाच असतो त्यासाठी त्यांच्याशी मी अमुक एक केले आता मला अमुक एक द्या असे होत नाही, किबहुना ते करणेही उचित नाही. महाराजांकडे काहीच मागायची गरज नाही ते वेळ आली कि सगळे देणार आपल्याला अर्थात आपल्याला पेलेल तेच. आपण जप केल्यावर आपल्या मनाला कसे वाटते ,आपला दिवस कसा जातो ,त्यातून किती उर्जा सकारात्मकता मिळते, किती उत्चाहाने आपण आपल्या कामाला लागतो त्याचा अभ्यास करा म्हणजे समजेल कि जपाचा प्रत्येक्ष दिसून न येणारा पण होत असणारा सकारात्मक परिणाम जाणवल्याशिवाय राहत नाही.

म्हणूनच महाराजांना कुठल्याही अटींमध्ये अडकवण्यापेक्षा आपण आपला नित्याचा जप करत राहावा. माझा स्वतःचा अनुभव आहे कि ध्यानी मनी नसतानाही सर्व गोष्टी होत राहतात.

जप कसा करावा ? कुठल्या माळेवर करावा ? रुद्राक्षाच्या कि तुळशीच्या कि स्फटिकाच्या ?कुठल्या समयी करावा ? सकाळी का संध्याकाळी ?अंघोळ करूनच करावा ? बस ,ट्रेन मध्ये करावा ?एकाच आसनावर एकाच ठरलेल्या जागी बसून करावा का ?काहीही न खातापिता करावा कि कसे ?जपासाठी कुठले आसन घ्यावे ?ह्या आणि अश्या कित्येक न संपणार्या प्रश्नांत आपण फक्त गुरफटत राहतो आणि जप मात्र करायचा राहूनच जातो. 


वरील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे कश्यातही अडकून न पडता श्वासागणिक जप करा .
श्वास घेवू का ,कसा घेवू ,कितीवेळा घेवू ,कुठे बसून घेवू हे विचारतो का आपण कुणाला .अगदी तस्सेच श्वासागणिक जप करा ,करत राहा आणि बघा काय अद्भुत चमत्कार करतील महाराज आपल्या आयुष्यात.म्हणतात ना , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.


वेळ कमी आहे आपल्याकडे .आपले एकेक पाऊल मृत्यूच्या दिशेने असताना नुसता विचार करण्यात वेळ घालवणे परवडणारे नाही हो आपल्याला .विचार करणे सोडून जपास प्रारंभ करा तोही आत्ता ह्या क्षणाला ...जप आपल्याला सद्गुरूंच्या समीप नेतो. तो आनंद खचितच निर्भेळ आहे. 


अमुक एका ग्रहाचा जप करायचा असेल तर तो निश्चित संकल्प करून माळेवर करायला लागतो कारण तिथे मोजमाप आले. पण आपल्या सद्गुरूंचा , कुलदेवतेचा जप करताना मोजमाप कश्याला ? त्यांच्या प्रेमासाठी ,सेवेसाठी आणि भक्तीसाठी आपण जप करतो. आपण जप केला असेही म्हणणे हा एक अहंकाच आहे . त्यामुळे “ महाराजांनी माझ्याकडून आज जपरूपी सेवा करून घेतली ”असे म्हणणे अधिक उचित ठरेल.


सर्व जमेल पण जप नाही ह्यावरूनच तो किती कठीण आहे ते समजेल. नामस्मरणात सर्वात महत्वाचे आहे ते " समर्पण " .माझ्या मागील लेखातून मी लिहिलेली गोष्ट कदाचित आपल्यापैकी कुणी वाचली नसेल म्हणून पुन्हा लिहिते.


एक गृहस्थ इतका जप करत कि त्यांच्या हातावर हात ठेवला तरी त्यांच्या मनात चाललेला जप ऐकू येई. काय वर्णावी अश्या भक्ताच्या भक्तीची थोरवी आणि त्यांच्या सद्गुरु चरणाशी असलेली त्यांची निष्ठा. संपूर्ण शरणागत होवून अंतर्मनाने केलेला जप त्यांच्यापर्यंत जाणारच ह्यात दुमत नाही. अखंड नामस्मरण आपला जन्म सार्थकी लावणारच आणि सद्गती देणारच.

मी अनेक ठिकाणी जपाबद्दल विचारलेले प्रश्न वाचते तेव्हा वाटते , आपले आपण ठरवावे . एखादा गरीब माणूस असेल आणि त्याला जप करायचा असेल आणि त्याच्याकडे आसन नसेल तर त्याने जप करायचा नाही का? असे नसते .प्रत्येक्ष महाराजांची इच्छा असेल तर अजून काय हवे ? अहो जपासाठी कुठल्याही बाह्य सोपस्कारांची गरजच नाही. जप करावासा वाटत आहे ते सर्वात महत्वाचे. दिवसभर अत्यंत कष्ट करून घाम गळून रस्त्यावरील मजूर दगड डोक्याशी घेवून एका क्षणात शांत झोपतात आणि आपण मऊमऊ गादिवर सुद्धा कूस बदलत राहतो. कालांतराने मनाला जपाची सवय लागते आणि पुढे ह्याचेच रुपांतर साधनेत होते. 


चराचरात भरलेल्या ह्या शक्ती आपल्या अवकलनाच्याही बाहेर आहेत, जप करुया हा विचार मनात यायलाही त्यांची कृपा लागते आणि ज्यास हि कृपा लाभली त्याने कुठलाही अन्य विचार न करता जपास प्रारंभ करावा आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा अनुभवत राहावा.

टीप: आजकाल तरुण पिढीत बर्यापैकी व्यसने , सैरभैर वागणे , वडीलधार्यांचा मान न राखणे आणि पैसे खर्च करणे ह्या गोष्टी बहुतांश पाहायला मिळतात. म्हणून घरात नामस्मरण केले तर वास्तूतील उर्जा सकारात्मक राहते. मुलांना लहानपणापासूनच जपाची सवय लावावी. आपण केलेले पुण्य मुलांच्याही कामी येणारच. महाराजांवर विश्वास ठेवावा आणि जप करत राहावा. जपाचा परिणाम आपल्या स्वतःवर तर होतोच पण वास्तू शुद्ध पवित्र राहते ,संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम जाणवल्याखेरीज रहात नाही. अनुभव घेवून बघा आणि कळवा.


ह्यावर्षी अश्विन आणि अधिक अश्विन ह्या दोन्ही महिन्यात श्री विष्णुंची आराधना करावी ..
जप : ओंम नमो भगवते वासुदेवाय
         विष्णवे नमः

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा.


Antarnad18@gmail.com


#antarnad#chanting#rudraksh#tulshimaal#spirituallife#sadhna#aasan#youth
#अंतर्नाद#जप#नामस्मरण#रुद्राक्ष#तुळशीमाळ#अध्यात्म#साधना#आसन#तरुणपिढी

Friday, 4 September 2020

साधकाची दिनचर्या

|| श्री स्वामी समर्थ ||


साधकाचा दिनक्रम कसा असावा ? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आज त्याबाबत जाणून घेवूया. आजचे जीवन अत्यंत धकाधकीचे आहे. सकाळची ८.२ ची लोकल पकडली म्हणजे जीवनाचे सार्थक झाले आणि मग युरेका असे ओरडून नाचावे ,असेच काहीसे जीवन आजचे आहे.

अगदी रोज पुणा-मुंबई प्रवास करणारे लोक आहेत.असो तर ह्या सर्व धावपळीत आपण आपली साधना करावी कशी हा प्रश्न पडतो आणि मग वेळ नाही ,जमत नाही असे उत्तर देवून सारवासारवी केली जाते. वेळ नसतो तो काढायचा असतो आणि सत्कारणी लावायचा असतो. आयुष्याच्या संध्याकाळी जसे मुद्दलावरच्या व्याजावर आपण जगतो,त्याची सोय आयुष्यभर करून ठेवतो अगदी तसेच आपल्या साधनेचेही रांजण भरून ठेवले तर त्यातील अमृतावर आपल्या अखेरचे दिवस निश्चितपणे आनंदात जातील ह्यात शंकाच नाही. 

आपल्या दिवसभराच्या साधनेचे विभाजन केले तर काहीच कठीण नाही. सकाळी घरातील नोकरदार मंडळींची आणि सर्व कामांची घाई असते तसेच आजकाल पाण्याचे प्रश्नही असतात. आपल्याला खुलभर दुधाची गोष्ट माहितच आहे,त्यामुळे आपळे सर्व प्रातःविधी आटोपले कि आपली साधना करावी.

साधना विभागून करावी, आपल्या वेळेप्रमाणे त्याचे विभाजन असावे.

१. नामस्मरण ( जप )
२. पोथी वाचन(पारायण)
३ मानसपूजा 
४ ध्यानधारणा 
५ नामस्मरण

प्रातःसमयीच्या नामस्मरणाची सुरवात नेहमीच कुलस्वामिनीच्या नामजपाने करावी. कुलस्वामिनी आपली नस ओळखते आणि तिच्या कृपाप्रसादाशिवाय सर्व फोल आहे. प्रत्येक वर्षी खरतर श्रावण /मार्गशीर्षात आपल्या देवीची ओटी भरायला सहकुटुंब जायला पाहिजे . पण कुलदेवतेचे दर्शनास जायला सुट्टी मिळत नाही जी सिंगापूरच्या ट्रीप साठी अगदी लगेच मिळते. माफ करा पण जे दिसते समाजात आजकाल तेच लिहिले आहे. आपल्या आयुष्यातील Priorities आपणच ठरवायच्या आहेत. हे चित्र सगळीकडे असतेच असे नाही . काही लोक सहकुटुंब सहपरिवार कुलस्वामिनीच्या दर्शनाला आवर्जून जातात , तो त्यांचा न चुकता केलेला नियम असतो.

कुलस्वामिनीच्या जपानंतर कुलदैवत त्यांचाही जप केला पाहिजे. प्रातःकाली सूर्य पूर्व क्षितिजावर येताना गायत्रीमंत्र किंवा सूर्याची ११ नवे घेवून सूर्यास अर्घ्य देणे हे तर घरातील सर्वांनी करावे. सूर्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधरण महत्व आहे. सूर्यामुळे आपल्याला सकारात्मक उर्जा मिळते आणि आपले आरोग्यही चांगले मिळते . सूर्यामुळे तर सृष्टी आहे,तेव्हा सूर्यप्रकाश अतिमहत्त्वाचा आहे.सूर्योपासना म्हणजे सूर्यास अर्घ्य, गायत्री मंत्राचे नित्य पठण आणि सूर्यनमस्कार . घरातील मुलांना लहानपणापासून ह्याचे बाळकडू पाजले पाहिजे.


आपल्या सद्गुरूंचा जप त्यानंतर करावा. बरेचवेळा जप करताना झोप येते असे प्रश्न येतात. कारण आपल्या वास्तूतील नकारात्मक शक्तींच्या प्रभावामुळे ह्या गोष्टी घडत असतात. काहीही झाले तरी जप सोडू नये. इथेच आपली खरी परीक्षा असते. जप करताना ज्या देवतेचा जप करत आहोत तिला शरण जावून सद्भावनेने ,आत्यंतिक प्रेमाने तो जप करावा . खाली भाजी आणायला जायचे आहे त्याआधी १० मीन जप करून घेते असा तो उरकून टाकू नये. जप हा साधनेचाच एक भाग आहे. आपले मन शांत असेल तेव्हाच तो करावा . जप कसाही करावा रोज एकाच ठिकाणी एकाच आसनावर करावा असे काहीही नाही. सुरवातील जपाची माळ लागते कारण मन सैरभैर होते पण एकदा सवय झाली कि कुठल्याच माळेची गरज भासत नाही. मी तर म्हणीन श्वासागणिक जप करावा . जप न करण्यासाठी आपल्याला १००० करणे सुचतात. मनात नसेल तर खर्च करू नये पण निदान ज्याचा जप करतो त्या देवतेवर उपकार केल्यासारखा “ केला एकदाचा जप ” असा भाव नसावा.आपली घरातील कामे करताना , केर काढताना , भांडी लावताना ,कपड्यांच्या घड्या घालताना जप केला तर जपासाठी वेगळा वेळ काढायची गरज उरणार नाही.

दुपारच्या वेळी जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर आपले पोथीवाचन करावे. काहीच नाही तर ब्रम्हचैतन्य महराजांच्या प्रवचनातील एक पान वाचावे आणि त्यावर मनन चिंतन करावे.जमेल तशी मानसपूजा करावी.
ध्यान हे प्रत्येकाने करावे. ध्यानाचे असंख्य फायदे आहेत.


ध्यानाचा वेळ हळूहळू वाढवत न्यावा . आपल्या सैरभैर झालेल्या मनाला एका जागी खिळवून ठेवणे म्हणजे “ध्यान”. सुरवातीला आपण २ क्षण सुद्धा ध्यानस बसू शकणार नाही ह्यावरूनच ते किती कठीण आहे ते समजेल. शेजारणीशी गप्पा मारायला , TV वरील मालिका पाहायला जितके सहज जमते तितकेच ध्यान करणे कठीण आहे . ध्यान हि एक तपश्चर्याच आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. ध्यानाने आपले चंचल मन स्थिर होते, जितका वेळ ध्यान तितका वेळ तोंड बंद ,म्हणजे आपण बोलणारही नाही आणि ऐकणारही नाही. तितकीच आपली कर्म कमी होण्यास मदत नाही का? पटतंय का? मन एकाग्र ,शांत झाले कि रक्ताभिसरण व्यवस्थित होते , आरोग्य चांगले राहते कारण मन शांत होते .मन आजारी पडले तर मग शरीरही आजारी पडते म्हणूनच ध्यानाची महती अपार आहे.


तीन्हीसंजेस देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती ,देवाची आरती करावी .ज्यांना शनी ,राहू केतू दशा चालू असेल त्यांनी त्यांचा जप संध्याकाळ नंतर करावा कारण शनी केतूचे साम्राज्य संध्याकाळ नंतरच असते. दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यावा. आपण ठरवलेली सर्व कामे झाली कि नाही, आपण कुणाचे पैसे द्यायचे राहिलो आहोत का? कुणाला कारण नसताना दुखावले आहे का ? त्यांची मनोमन क्षमा मागावी. काही वेळ ध्यान करावे आणि झोपावे.दिवसभराच्या साधनेमुळे नामस्मरणामुळे मनावरील ताण दूर होवून झोपही चांगली लागते .सकाळी उठल्यावर आपल्याला जगण्याची अजून एक संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावे आणि पुनश्च दिवस आनंदात घालवावा.


एकदाच सलग तास दोनतास मिळत नाहीत म्हणून हि अशी साधनेची विभागणी केली तर सर्व साधना , नित्योपचार व्यवस्थित होतात .घरातील कुणालाही आपल्याबद्दल तक्रार करायला जागाच उरणार नाही.
थोडक्यात काय तर दिवसभरात आपल्याकडून देवाची नित्य आराधना कुठल्या ना कुठल्या रूपाने व्हावी इतकच. आपण केलेली साधना आपल्या वस्तूला आणि कुटुंबियांनाही लाभतेच. वास्तूमध्ये सकारात्मक उर्जा प्रवाहित होते ,लक्ष्मीचा चिरकाल वास राहतो.वास्तू अगदी “ Happening ” होते.सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावलेल्या दिव्याने जीवनातील अंधकार दूर होतो ,घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे लक्ष्मी येते आणि टिकते ,अनाठायी पैसा जात नाही , घरातील गृहलक्ष्मी आनंदी राहते आणि घर नांदते राहते. 

आपल्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे आपल्या साधनेचे विभाजन करून ती करावी . पण नित्यक्रम चुकवू नये. हळूहळू आपण त्यात इतके रमतो कि साधनेसाठी वेळ आपोआपच काढला जातो .साधना हि कुणी आपल्यावर लादून किंवा मारूनमुटकून करायची गोष्ट नाही तर परमेश्वरावरील भक्ती त्यास कारणीभूत होते. ईश्वरासाठी असलेली तळमळ ,आंतरिक ओढ साधनेत रुपांतरीत होते.शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक त्यालाच जोडायचे आहेत.

साधना कुठेही कशीही करा ,साधनेला काळावेळाचे , स्थळाचे बंधन नसते, आपला भाव सोळा आणे खरा हवा .आपली श्रद्धा आपल्याला आपल्या आराध्याच्या समीप नेते. तद पश्चात मात्र “जेथे जातो तेथे तु माझा सांगाती ” असा त्यासोबत आपला एकत्र प्रवास सुरु होतो तो आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत .



सहभोजन ... मगाशी लिहिताना घरातील सकारात्मकतेचा उल्लेख झाला. त्याला अनुसरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. कलियुगात आपल्या आजूबाजूला अनेक मंथरा वावरत असतात. त्यांना आपले कौटुंबिक सुख पाहवत नाही. घरातील सर्व कुटुंबीयांनी मिळून दिवसातून एकदा तरी एकत्रित सहभोजन करावे. हसतखेळत केलेल्या ह्या भोजनामुळे एकमेकांचे बंध (Bonding)घट्ट होतात ,विचारधारा एक राहते, अन्न उरत नाही आणि एकमेकांबद्दलची भावनिक ओढ वाढीस लागते .



ज्या ठिकाणी घरातील सर्वजण आवर्जून एकमेकांसाठी थांबून  सहकुटुंब सहपरिवार भोजन करतात , त्या कुटुंबात कलह होत नाहीत आणि आनंद चिरकाल टिकतो.करून पहा.


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय लिहायला विसरू नका .


antarnad18@gmail.com



#antarnad#lunchdinner#meditation#chanting#positivity#gayatrimantra#familybonding#अंतर्नाद#सहभोजन#साधना#नामस्मरण#पारायण#सकारात्मकता#गायत्रीमंत्र#कुटुंब#प्रेम#भक्ती


Tuesday, 1 September 2020

अजूनही... अध्यात्माच्या पहिल्याच पायरीवर

|| श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यात संकटे गळ्यापर्यंत आली कि आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो. दुखांचा दाह वाढतो तसे नास्तिकाचे आस्तिक होत जातो . कुठून का होयीना संकटांची होळी व्हावी म्हणून मग जो कुणी सांगेल ते करत जातो. मग अंगारेधुपारे करा, मठाच्या मंदिरांच्या पायर्या चढा , नवस बोला ,काहीही करायचे ठेवत नाही. हळूहळू संकटे कमी होत जातात, दिलासा मिळतो आणि आयुष्य पूर्ववत होते. मधल्या काळात केलेल्या उपासनेमुळे अध्यात्माकडे कल वळतो. संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात कृतज्ञता वाटते आणि मनात भक्तीचा मळा फुलू लागतो. आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ते आधीच ठरलेले असते ,प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण प्रत्यक्ष परमेश्वरानेच ठरवलेला असतो.

हृदयात भक्तीचा अंकुर फुटला कि मग अजून काय हवे. अध्यात्मिक वाचन त्याबद्दल माहिती वाचावीशी वाटते. मग कुठल्या नातेवायिक किंवा मित्रांसोबत शिर्डी , अक्कलकोट ,शेगाव येथे जाणे होते. तेथील वातावरणाने भारावून जातो ,त्या शक्तीसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या प्रापंचिक जीवनाला पारमार्थिक जोड लागते.उभे आयुष्यच बदलून जाते.


मग नामस्मरण , पारायण , सामुदायिक कार्यक्रम सुरु होतात आणि आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात परमभक्त भास्कर पाटील ह्यांना महाराजांनी प्रचीती दिल्यावर त्यांनी आपला प्रपंच महाराजांच्या चरणावर वाहिला “ आता भक्तीचाच मळा फुलविन “ असे वचन त्यांनी महाराजांना दिले आणि आपल्या सर्व निष्ठा त्यांच्या चरणी वाहिल्या.

नामस्मरण , पोथी वाचन, पारायण ह्या सेवेमुळे आपले मन हळूहळू महाराजांच्या चरणी स्थिर होते, मन शांत होतो , विश्वास वाढतो आणि रागावर नियंत्रण येते..आपल्यात षडरिपू ठासून भरले आहेत. ते जाता जात नाहीत पण त्याचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होते. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भक्ताला आता महाराजांचे वेड लागते ते कायमचे. माझ्या पुढे मागे तूच उभा अशी अवस्था होते .आपल्या जीवनात आता कितीही चढउतार आले तरी आता भीती वाटत नाही. “ महाराज आहेत ते पाहतील ” हे उद्गार आपोआपच बाहेर पडतात , भक्ती अभेद्य राहते , विश्वास वाढतो. संकटातून मार्ग निघतो आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी विलीन होतो.

भक्तीवीणा प्रचीती नाही आणि प्रचीती शिवाय भक्तीही नाही . जशीजशी सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचीती येऊ लागते. महाराजांचा फोटो घरातील देवघरात स्थानबद्ध होतो. नामस्मरण , पारायण ह्यात मन रमू लागते. पण इतके सर्व होवूनही एक गोष्ट मात्र जात नाही ती “ मी पणा ”. अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही. अहंकाराचा वारा न लागो म्हणतात ते सार्थ आहे. मी पारायण केले , मी नामस्मरण केले ह्यामध्ये असलेला “ मी ” फार घातक असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरुंमध्ये दरी निर्माण करतो. हा “ मी ” आपल्याला त्यांच्यापासून दूर नेवू शकतो. त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी कृतकृत्य झाले. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले , त्यांनीच मला शेगाव ला बोलावले म्हणून दर्शन घडले ,हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनास शिवणार सुद्धा नाही. अहो आपण कोण पारायण आणि नाम घेणारे . त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही .

ब्रम्हचैतन्य महाराजांचे रोजचे प्रवचन हे आपल्या आयुष्यभर पुरणारा प्रसाद आहे. रोज फक्त एकच पान वाचायचे आहे आणि त्याचे मनन ,चिंतन करायचे आहे. आपण जे वाचतो ते आपल्यात उतरले तर त्याला काही अर्थ प्राप्त होयील, आपले आचरण तसेच राहिले तर सर्व फोल आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथ किंवा अजून कुठलाही ग्रंथ ह्याची असंख्य पारायणे करतो ,पण आपल्यात तिळमात्र बदल घडून येत नाही, ह्याचा अभ्यास आपण आपलाच करायला नको का. म्हणूनच वरवर दिसतो तितका अध्यात्मिक प्रवास साधा सोप्पा खचितच नाही. आंतरिक मनाने , अपेक्षाविरहित सतत सेवेत राहिले तर काकणभर बदल होईल आपल्यात.


 इतका जप करूनही आपण निस्पृह मनाने कुणाला मदत करत नसू, घरातील वडील मंडळीना उद्धटपणे बोलत असू, घरातील अन्न फुकट घालवत असू, बढाया मारत असू तर खरच ह्या सर्व सेवेला अर्थ आहे का? आणि आपले गुरु आपल्याला किती समजले आहेत ? आपण वाचत असलेल्या पोथीतील अर्थ आपल्याला नक्की किती समजला आहे ?त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण चालत आहोत का ?स्वतःशी प्रामाणिक आहोत का? हे सर्व अभ्यास करण्यासारखेच आहे.

कुठल्याही देवस्थानाला गेलो कि तिथून फोटो ,पोथी मूर्ती कितीतरी गोष्टी आणतो ,ह्या सर्वच संचय करतो पण आपल्या नामस्मरणाचा ,भक्तीचा संचय किती झालाय ?ह्याचा हिशोब कोण ठेवणार ?बरेचदा एखद्या वेळी आपल्या संकटाचे निवारण झाले नाही तर सरळ आपण आपले सद्गुरूच बदलतो . मग आज काय गजानन महाराज तर उद्या साईबाबा . कुठेही एका ठिकाणी निष्ठा नाही. इतके करूनही मनाची हि चंचल अवस्था असेल तर आपण नाम घेताना आपले लक्ष्य कुठे होते ? गुरु बदलून प्रश्न सुटत नाहीत हे कालांतराने समजते आपल्याला , मग पुढे येरे माझ्या मागल्या.

मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही. अध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडतर आहे. इथे “ पी हळद हो गोरी ” हा नियम लागू पडत नाही. इथे लागतो तो संयम. म्हणतात ना “ सब्र का फल मिठा होता है “. गोष्टी अपोआप घडत जातात . आपण आपल्या साधनेत तसूभरही चुकायचे नाही आणि काही मागायचे तर त्याहूनही नाही . आपल्याला काय द्यायचे ते आपल्या गुरुना माहित आहे आणि वेळ आली कि ते आपल्याला दिल्याशिवायाही रहात नाहीत .

 अध्यात्मातील मार्ग खडतर तर आहेच पण महाराज खूप परीक्षाही पाहतात ,अगदी टफ पेपर असतो त्यांचा पण आपण एक दिवस नक्कीच पास होतो. काहींचा संयम सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो .महाराज आपले पोरखेळ पाहत राहतात .  आपण उठसुठ महाराजांना वेठीस धरतो ..चार दिवस नाही झाले , २ माळा नाही ओढल्या तर किती गर्व होतो आपल्याला ,आपल्यासारखा कुणी भक्तच नाही ह्या भावनेने दिमाखात वावरू लागतो ,महाराजांवर हक्कही सांगायला लागतो. पण महाराज आपल्यावर कधीच रागवत नाहीत कारण ह्या सर्वातून तावून सुखावूनच आपण एक उत्तम भक्त होणार असतो. मनापासून केलेली उपासना फळते ,त्यांच्या सगळ्या कसोट्यांवर खरे उतरलो कि महाराजांचे दर्शनही घडते आपल्याला. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे नाम आहे तिथे मी आहे.

 म्हणूनच आपण श्वासागणिक नाम घेतले पाहिजेत. कुठली माळ घ्यावी स्फटिकाची कि रुद्राक्षाची ,आसन कुठले आसवे ,कुठल्या दिशेला तोंड करून बसावे, पारायण किती दिवसांचे करावे ,प्रसाद काय करावा , ह्या सर्व दुय्यम गोष्टी आहेत , आपले सद्गुरू ह्या सर्वांच्या पार आहेत . त्यांना हवाय आपला अंतरीचा खरा भाव , आपले समर्पण , आपली तळमळ ,आपली त्यांच्याविषयी असलेली ओढ आणि आपला प्रामाणिकपणा. आपल्या सेवेचे बाळकडू आपण आपल्या पुढील पिढीलाही द्यावे .हा वारसा आपल्या मुला नातवंडाना द्यावा. पारमार्थिक जोड असेल तर प्रापंचिक सुखांची गोडीही अवीट असते.

पण वर्षानुवर्षाचा अध्यात्मिक प्रवास करूनही एक प्रश्न स्वतःला विचारला  “अध्यात्मातील कुठल्या पायरीवर आहे मी ?” तर त्याचे उत्तर आहे ...अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी .

हा लेख तुमच्या आमच्या सर्व गुरुना अर्पण करत आहे ..... 

अस्मिता 


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका 


antarnad18@gmail.com



#antarnad#spirituality#sadhguru#tredition#chanting#faith#generation#Inheritance#parayan#अंतर्नाद#अध्यात्म#सद्गुरू#दर्शन#परंपरा#जपमाळ#आसन#भक्ती#वारसा#प्रपंच#परमार्थ#पारायण#फलश्रुती


Saturday, 29 August 2020

महालय ( पितृपक्ष )

|| श्री स्वामी समर्थ ||


हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे . भाद्रपदातील कृष्णपक्ष ,पौर्णिमा ते अमावस्या हा काळ म्हणजेच “पितृपक्ष ”. ह्याला महालय असेही संबोधले जाते. आपल्या कुटुंबातील पितरांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ. आपल्याकडे अनेक रीतीरिवाज आहेत तसेच पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे ,पिंड ठेवणे ह्याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आलो आहोत.

आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य ह्यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला पान ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी आहे.

मनुष्याने कश्यातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास करू नये नाहीतर पितृदोष लागतो.
आपण जन्माला आल्यापासून आपले आईवडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोडकौतुक करतात,  संस्कार करून आपल्याला  एक उत्तम माणूस  म्हणून घडवण्यात हातभार लावतात . आयुष्यभर आपल्यामागे उभे राहतात. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतात , ह्यातील एखाद्याच्याही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओहोटी लागते. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कितीही काहीही केले तरी परतफेड होवू शकत नाही. शरीराने जरी ते आपल्यात नसले , तरी त्यांनी केलेल्या संस्कारांच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभवतीच असतात .म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडेतरी उतराई होवू शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावे.




ज्योतिष शास्त्रात पितृदोषाला महत्व दिले आहे. राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो. आपले आईवडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले, ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील ह्यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही .पण आपल्या म्हातार्या आईवडिलांचे म्हातारपणी हाल केले ,त्यांच्या औषधपाण्याकडे न पाहता त्यांना मृत्युसम पिडा दिल्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला, आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून दिला नाही, वडिलोपार्जित इस्टेट बळकावली , खोट्या सह्या करून लुबाडली,आपल्या नावावर केली ,किंवा आईवडील  असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडाना धूर्तपणाने कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले , आपल्या आईवडिलांनी त्यांच्या मृत्यपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे ,अश्या गोष्टीनी आपल्या हातून पातक घडते . आपल्या भावंडांचा , कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला ,त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवले तर मात्र त्यांचे शिव्याशाप ,पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाहि लागतो. संपत्तीचा वाटा समोरून देवू केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नाकारला तर शाप कधीही लागणार नाही .जीवंतपणी भावंडांचे शाप मृत्युसम पीडा देतात . व्यवसायात कश्यातही प्रगती होत नाही . आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्याचा त्याला तो देणे हेच सर्वार्थाने होतावह आहे.संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमवावी तीच लाभेल अन्यथा नाही .

आज घरातील वडील मंडळी घरातील अडगळ झाली आहे  आणि म्हणूनच वृद्धाश्रम हि संकल्पना उदयास आली . पुर्विच्या काळी कुठे होते वृद्धाश्रम .  घरात आईवडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा वेगळे ठेवले जाते .ऐकून सुद्धा कसेतरी होते. पण आईवडिलांची संपत्ती मात्र हवी .आपल्या म्हातार्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदी सोन्याच्या वस्तू दागिने ते मात्र हवेत . इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कश्याला घ्यायचे. म्हणूनच मग अश्या व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद फळतील कि शाप ? ह्याचे उत्तर आपणच देवू शकतो. आईवडिलांचे करताना सुद्धा तोंडातून "ब्र " सुद्धा काढू नये. दुनियेला दाखवायला आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही. आपण काय करतो हे १० लोकांना सांगितले तर पुण्या ऐवजी भले मोठ्ठे पापच पदरी पडेल.

घरात सतत कलह, संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे , रात्रीची शांत झोप नसणे, घरात आर्थिक स्थिरता नसणे ,घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे ,संसारसुख नसणे , नोकरी धंद्यावर गदा येणे ,आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे, व्यवसायात स्थिरता न येणे ,घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे, अनाठायी पैसा खर्च होणे, व्यसनाधीनता होणे ,संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे , घरातील सासूसासरे दीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा नालस्ती ह्या प्रकारामुळे  संकटाना आयुष्यभर सामोरे जायला लागते. हि सर्व पितृदोषाची कारणे आहेत . म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीतकमी वाईट तरी करू नये. कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देयील. साधना ,उपासना करावी त्याने मन शांत होते आणि दुसर्याच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखे विचारही मनास शिवत नाहीत.


आपल्या कुटुंबियांचे मन जपणे , त्यांना हवेनको ते पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे,त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याच राहत्या घरातून हाकलून देवून त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे हि पुढील मोठ्या संकटाना आणि पितृदोषांस पोषक अशीच कारणे आहेत. हे सर्व करताना एकदिवस आपल्यालाही वृद्धावस्था येणार आहे हे मात्र विसरू नये. मुले लगेच अनुकरण करतात. आपण जे आपल्या आईवडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाही कश्यावरून. म्हणूनच आईवडिलांची सेवा करून ,तसेच त्यांच्या पश्च्यात त्यांचे योग्य ते क्रियाविधि करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा. अश्याने आपलेही प्रारब्ध चांगले होते.


आज शहरात राहणारा नोकरवर्ग घरातून लवकर निघतो त्यांना इच्छा असूनही पान ठेवता येत नाही असा एकंदरीत सूर दिसतो. पण निदान थोडा भात त्यावर दही (मीठ घालायचे नाही) असे रोज ठेवावे आणि सर्वपित्री अमावास्येला मात्र संपूर्ण जेवणाचे पान ,आपल्या पूर्वजांच्या आवडीचा स्वयंपाक करावा . मी गेले कित्येक वर्ष पितृपक्षात रोज घरात सकाळी जे काही अन्न शिजवले असेल ते ठेवते. मनास शांतता लाभते. आपणही करून पहा.

आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे कि आपल्या दुष्कार्मातून त्यांचे तळतळाट घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे .फक्त एक लक्ष्यात असुदे कि अखेर आपल्याला परमेश्वरा समोर उभे राहायचे आहे तेव्हा आपला सगळा लेखाजोखा समोर असणार आहे, तेव्हा कृती करताना विचारपूर्वक करावी.


थोडक्यात पितृदोष आपण आपल्याच चुकीच्या कर्माने निर्माण करतो. कुणाचा द्वेष ,मत्सर करणे ,एखाद्याला पाण्यात पाहणे ह्याने खरच काही साध्य होते का ? तर नाही. उलट आपल्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होवून आपल्यालाच आजारपण येते ,मानसिक संतुलन बिघडते . पूर्व संचीताप्रमाणे आपले आयुष्य आहे ,त्यामुळे उगीचच दुसर्याची बरोबरी आणि हेवेदावे करण्यापेक्षा उपासनेच्या मार्गावर चालणे आणि आपले आयुष्य आनंदी करणे हे सर्वार्थाने चांगले .पटतंय ना?

व्यक्ती हयात असताना तिला वाईट वागणूक देवून तिचे क्लेश ओढवून घ्यायचे आणि ती गेल्यानंतर तिच्यासाठी पान ठेवायचे हे केल्याने त्या व्यक्तीचे किती आशीर्वाद मिळतील माहित नाही . त्यापेक्षा हाडामासाच्या माणसाची हयात असतानाच सेवा केली तर ते निश्चित फलदायी ठरेल हे सांगायला कुणाचीच गरज नाही. शेवटी आपली कर्म बोलतात ..चांगली वाईट कशीही असोत.

गेलेल्या व्यक्तीचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे क्रमप्राप्त आहे. पण ज्यांना ह्यातील काहीच जमत नसेल त्यांनी दानधर्म करावा आणि आपल्या पितरांना सद्गती  मिळावी म्हणून  श्री दत्त गुरुंचा  जप करावा. बरेचदा आपल्याला एखाद्या नातेवायिक किंवा स्नेह्याची संपत्ती किंवा वास्तू भेट म्हणून मिळते . त्यांचेही त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षात श्राद्ध करणे क्रमप्राप्त आहे .

 मृत्यू पश्चात  शास्त्रात सांगितल्याप्रमाणे  आपण १३ दिवस दुखवटा ( सुतक ) पाळतो तसेच १० वे - १३ वे सर्व क्रियाविधि करतो . त्यातील मुख्य विधी म्हणजे १० व्या दिवशीचा पिंड दानाचा . ह्या दिवशी आपण पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो. ह्या दिवशी पिंड ठेवल्यावर जेव्हा कावळा पिंडास शिवतो तो दिवस खरा . कावळा  पिंडास शिवला म्हणजे गेलेल्या व्यक्तीची काहीही इच्छा राहिली नाही ती शांतपणे पुढील प्रवासास गेली असाच अर्थ आहे. ह्यावितिरिक्त अगदी पितृपक्षात सुद्धा जेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पानास शिवतो त्याबद्दल आपण म्हणूया कि कावळाच काय इतर पक्षीही येतात ,त्यांना भूक लागते ते  अन्न  ग्रहण करतात इतकाच त्याचा अर्थ आहे. खरा कावळ्याने आपल्या ठेवलेल्या पिंडास शिवणे हे १० व्या दिवशीच होते आणि तेच फक्त महत्वाचे आहे.
शेवटी पितर आपल्याला आकाशातून सोने दागिने नाही देणार ते फक्त आशीर्वादच देतील. पण त्यांच्या आशीर्वादानेच आपले आयुष्य सुकर होयील हे नक्की.

पितृपक्ष येतोय ,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीस धरून ,पितरांची क्षमा मागुया आणि पितृपक्षात त्यांच्या सेवेत राहून ऋणमुक्त होऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सर्वार्थाने उजळून टाकूया, कृतकृत्य होऊया.


अस्मिता

 लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.


antarnad18@gmail.com



#antarnad #pitrupaksh #mahalay #hindusanskruti #generations #prayers #blessings
#अंतर्नाद #पितृपक्ष #महालय #श्राद्ध #हिंदूसंस्कृती #पिढीरूढीपरंपरा #ऋणमुक्त #आशीर्वाद #पिंडदान

Saturday, 22 August 2020

मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवू नका

|| श्री स्वामी समर्थ ||





अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह भक्त
प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय.


लाखो भक्तांचा श्वास असणारे संत शिरोमणी श्री. गजानन महाराजांनी भाद्रपद शुक्ल पंचमीला सन १९१० ,गुरुवारी ऋषी पंचमीच्या दिवशी आपला देह ठेवला आणि लाखो भक्त जणू पोरके झाले. आपण देह ठेवणार हा दिवस महाराजांनी निश्चित केला होता आणि तसे त्यांनी आपल्या भक्तांना सुचीतहि केले होते. महाराजांची प्राणज्योत मालवली आणि शेगाव भकास झाले . वातावरणात एकप्रकारची उदासीनता आली. शेगावातील आबालवृद्धांनी मठाकडे घाव घेतली . भक्तांच्या आक्रोशाने आसमंत भरून गेला. तेव्हा आजच्या सारखी फोनची सोय नव्हती. महाराजांनी आपल्या दिव्या दृष्टीने लाखो भक्तांच्या स्वप्नात जावून आपण देह ठेवल्याचे सांगितले आणि भक्तांनी शेगावची वाट धरली..आपल्या गुरूंचे अभिलाषी असणार्या भक्तांना अखेरचे दर्शन घेता यावे म्हणून महाराजांच्या टाळूवर लोणी ठेवले ,ते वितळू लागले म्हणजेच अजून शरीरात थोडी धुगधुगी होती. भक्तांनी दर्शन घेतल्यावर शेवटी भुयाराचे द्वार लावण्यात आले. भक्तांवर दुक्खाचा डोंगर कोसळला. महाराजांची प्राणज्योत मालवली आणि शेगाव भकास दिसू लागले.

ह्यापुढे महाराजांचे दर्शन होणार नाही हि कल्पनाही मनास पटणारी नव्हती. वस्त्राप्रमाणे शरीर बदलावे लागते असे महाराज म्हणत. आज महाराज आपल्यात शरीराने नसले तरी क्षणोक्षणी आपल्या भक्तांना प्रचीती देवून आपले अस्तित्व त्यांनी दाखवून दिले आहे.


आज महाराजांचा महानिर्वाण दिन आहे.महाराजांनी आपल्या भक्तांना आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी “श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथाच्या माध्यमातून दिली आहे. ह्या ग्रंथातील प्रत्येक अध्याय हा एक शिकवण आहे. महाराज उष्ट्या पत्रावळीवरील अन्न वेचून खाताना बंकटलाल आणि पितांबर ह्यास दिसले. फेकून दिलेल्या अन्नावरही एकजण जेवू शकतो ह्याची जाणीव  आपल्याला प्रथम अध्यायात महाराजांनी दिली आहे. पण आपण त्याचे पालन करतो का? नाही . आपल्या घरात रोज काहीतरी अन्न फुकट जाते आणि फेकून दिले जाते . गजानन विजय हा ग्रंथ आपल्या आयुष्यासाठी अत्यंत पूरक आहे . आपण त्याची असंख्य पारायणे करतो ,नेवैद्य करतो पण त्यातील दिलेल्या शिकवणीचे पालन करतो का ?स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार ..उत्तर मिळेल .

महाराजांची सेवा हि फक्त ग्रंथाची पारायणे करणे नसून त्यातील उपदेशांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करणे हि होय. महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे. इतरत्र कुठेही त्यांना शोधायची गरज नाही कारण ते आपल्या श्वासात आहेत . महाराजांचे स्थान आपल्या हृदयात आहे.त्यांचे आपल्या प्रत्येक कृतीवर ,आपण बोलत असलेल्या प्रत्येक शब्दावर आणि विचारांवर लक्ष आहे हे विसरायचे नाही . प्रत्येक कृती करताना हि त्यांना आवडेल का हा विचार करून केली तर आपल्याकडून चूकच होणार नाही. आपण प्रपंचात आहोत त्यामुळे अगदी आखीवरेखीव जीवन जगू शकत नाही . सर्व षडरीपु आपल्यात ठासून भरलेले आहेत पण तरीही महाराजांच्या धाकाने चुका निशितच कमी होतील. आपले विचार ,कृती ह्यावर संयम येयील.


मुळातच माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हि साधी सोप्पी शिकवण संतानी आपल्याला दिली आहे .त्यानुसार वागले तार संतसेवा होईलच पण जीवनही सार्थकी लागेल. महाराजांना आपल्याकडून प्रेमाशिवाय काहीही नको. देव खर्या भक्तीभावाचा भुकेला असतो.आपल्यातील भाव तो नक्कीच ओळखतो . आपल्या संकट समयी आपले महाराज नक्कीच धावून येतात आणि मार्ग दाखवतात ,संकट हरण करतात अशी उदाहरणे पावलोपावली आहेत. “ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर ठेवू नका ” हे सांगून महाराजांनी भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा दाखलाच दिला आहे. श्री गजानन विजय पारायणाचे भक्तांना असंख्य अनुभव आहेत. हा अद्भुत तितकाच रसाळ ग्रंथ महाराजांच्या लीलांनी भरलेला आहे.

भक्तांनी अपेक्षाविरहित फक्त सेवा करावी . आपल्याला कधी काय द्यायचे ते त्यांना माहित आहे.योग्य वेळ आली कि सर्व होणार फक्त आपला विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही. महाराज खूप परीक्षाही पाहतात पण “ भक्तीत अंतर ठेवू नका ” ह्या उक्तीला धरून फक्त सेवा करत राहावी.

महाराज सर्वज्ञ आहेत ,त्रिकालज्ञानी आहेत आपला त्यांच्यावर टाकून शांत राहावे इतकेच.महाराज आपण दिलेल्या हारतुर्यांचे मोजमाप करत नाहीत.  आपला अंतरीचा भाव जाणतात आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात.

आपले रोजचे जीवन आणि श्री गजानन विजय ग्रंथ ह्यांचे अतूट नाते आहे, हे ज्यास उमगेल त्याचे जीवन सार्थकी लागेल.आनंदाचे डोही आनंद तरंग अश्याच अवस्थेत तो कामा असेल . भक्तीचा आनंद वेगळाच असतो तो शब्दांकित करता येत नाही तो फक्त ज्याचा त्याने अनुभवायचा असतो.


आपला प्रपंच सांभाळून महाराजांच्या सेवेत आपल्याला झोकून द्यावे आणि त्यांच्या आशीर्वादास पात्र व्हावे.जप किती करता ,पारायणे किती करता ह्यापेक्षा ती किती भक्तीने करता हे महत्वाचे आहे. कुणी माना अथवा मानु नका ,महाराजांचे अस्तित्व आहे आणि ते अबाधित आहे. महाराजांची सेवा करणे हे पूर्वसंचिताशिवाय अशक्य आहे. ज्यास हा आनंद मिळाला तो त्याने लुटावा .महाराजांच्या समोर नतमस्तक व्हावे. अनेकांच्याकडे पोथी आहे पण त्यातील एक शब्दही न वाचणे हे त्यांचे प्राक्तन आहे. ह्या सर्वस गुरुकृपा लागते आणि ज्यास हि प्राप्त झाली तो ह्या भक्तिरसात अखंड बुडतो. ज्याला ह्या भक्तीचे वेड लागले त्याला निसंशय कधीच कमी पडणार नाही. प्रपंच वेशीवर टांगून केलेली सेवा मान्यच होणार नाही कारण कुठल्याही संतानी प्रपंच सोडून परमार्थ करा असे कधीच सांगितले नाही उलट प्रपंच करता करता परमार्थ करा हेच त्यांना अभिप्रेत आहे.  उठसुठ लहानसहान गोष्टींसाठी महाराजांना वेठीस धरणे हे भक्तांसाठी योग्य नाही .एखादी जटील समस्या आली तार आपण हाक मारायच्या आतच महाराज धावून येणार हा विश्वास अभेद्य ठेवावा.

आज माझ्या ब्लॉगवर 100 लेख लिहून पूर्ण झाले. अर्थात ह्या सर्वाचे श्रेय माझे गुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांनाच, कारण लेखणी जरी माझ्या हाती असली तरी लिहायची बुद्धी देणारे , लिहून घेणारे सर्वेसर्वा तेच तर आहेत .म्हणूनच प्रत्येक लेख लिहून झाला कि मी तो त्यांच्याच चरणी ठेवते आणि पुढील लेखाकडे वळते .

ह्यापुढील माझ्या ब्लॉग ची वाटचाल त्यांच्याच कृपेने होयील ह्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.


Antarnad18@gmail.com


#antarnad #shri gajanan maharaj #shegaon #spiritual life #100 articles @depth and surrender  #adhyatm #sadhna #shri gajanan vijay granth
#अंतर्नाद #श्री गजानन महाराज #शेगाव #समाधी #महानिर्वाण #100 लेख #समर्पण #अध्यात्म
#प्रचीती #भक्ती #गजानन विजय ग्रंथ

Tuesday, 4 August 2020

अविस्मरणीय प्रचीती

|| श्री स्वामी समर्थ ||


माझ्या पुढे मागे सगळीकडे उभा तूच स्वामीराया |
किती काळजी वाहशील ,सर्वच तुझ्या ह्या लीलया |

आज सकाळी मी दादरला एका महत्वाच्या कामासाठी जाणार होते. चार दिवसापूर्वीच आज जायचे हे पक्के झाले होते आणि त्यासाठी माझी तयारी चालू होती. गाडी हायवे वरून जाणार होती आणि तशीच मी दुपारपर्यंत परतही येणार होते. काल रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. आज चंद्राचे श्रवण नक्षत्र होते त्यात काळ पौर्णिमाही होती. रात्रभर पाऊस खूप झाला होता.

पहाटे ३ वाजल्यापासून मी जागीच होते. आज पाऊस कोसळतोय आणि तो जाण्याचे नाव घेणार नाही हे जाणले आणि आपल्याला कदाचित जाता येणार नाही म्हणून मनात खट्टू झाले. सगळा योग जुळून आला होता पण म्हणतात ना स्वामींच्या इच्छे शिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही .

मनात जायचे हे इतके ठाम होते कि माझ्या जाण्याला ह्या पावसाने लावलेली नकारघंटा मला सहन होत नव्हती. मन चलबिचल होत होते आणि सगळा मूड गेलाच होता. सगळा स्वयंपाक केला आणि पुन्हा बाहेर पहिले तर पाऊस जरा कमी झाला होता . मनात म्हंटले चला आता काही वेळाने पाणी ओसरल्यावर निघूया .

आमच्या घराजवळचा परिसर जलमय झाला होता. तेव्हड्यात विचार आला TV लावून पाहूया म्हणजे बाहेर काय स्थिती आहे ते समजेल. TV लावला आणि कांदिवलीला दरड कोसळल्याची बातमी आली. माझ्या हृदयात धस्स झाले. माझी गाडी तिथूनच जाणार होतो . सगळे अवसान गळून पडले , हातपाय कापू लागले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले जाणे का रहित झाले हे आता मनोमन मला समजले आणि स्वामींच्या समोर डोके ठेवून नतमस्तक झाले.

स्वामी हे त्रिकालज्ञानी आहेत. आपल्याला दोन क्षणांनी काय होणार हेही माहित नसते पण ते सर्व जाणतात आणि आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अखंड पाठीशी असतात.

तारक मंत्रातील ओळी आठवल्या “ कितीदा दिला बोल त्यांनीच हात , नको डगमगू स्वामी देतील साथ ”. डोळ्यातून अश्रू थांबेनात इतकी सद्गदित झाले. सर्व काही शब्दांच्या पलीकडे गेले होते .खरच हे सर्व लिहितानाही माझे हात कापत आहेत . नको तो प्रसंग ओढवला असता पण स्वामिनी तारले. महाराजांच्या कडे पहिले तेव्हा जाणवले ,फोटोतून महाराज प्रेमाने सांगत होते “आजचा दिवस आपला नव्हता जणू ”. देवासमोर साखर ठेवली. तुम्ही म्हणाल ह्यात काय ? हा निव्वळ योगायोग. माझ्यासाठी आज जीवावर बेतणार होते कदाचित ,पण मला

घरातच थांबून ठेवण्याची जबाबदारी स्वामिनी खुबीने निभावली हे मी अंतर्मनाने जाणले . आयुष्यात आजवर त्यांनीच सांभाळले आहे आणि पुढेही तेच सांभाळतील. आपण राहिलो तर सर्व आहे नाही का?


असाच राहूदे माझ्यावर तुझा हस्तक |
तुझ्या समोर प्रत्येक क्षणी मी नतमस्तक ||


अस्मिता 

Antarnad18@gmail.com


#antarnad # spirituality #shri swami samarth # surrender #trust #spiritual path #faith
#अंतर्नाद # प्रचीती # स्वामी समर्थ #गुरु माऊली # नतमस्तक #भक्ती #त्रिकालज्ञानी #अध्यात्म #शरणागत

Wednesday, 22 July 2020

प्रारब्ध शुद्धी

||श्री स्वामी समर्थ ||


आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.

||संचित||

मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला 'संचित' असे म्हणतात.

||प्रारब्ध||

संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते.

||क्रियामाण||

या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात 'क्रियामाण'.
आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.

||दान||

आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे. धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते.

||निरपेक्षता||

अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.....

ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||अथवा देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक ||

संग्रहित

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

#antarnad #destiny #spiritual life #expectations #selfless #origin #meditation #donate
#अंतर्नाद #प्रारब्ध #अध्यात्मिक #अपेक्षा #अपेक्षाविरहित #दुखःचे मूळ # ध्यान # साधना #दानधर्म

Monday, 20 July 2020

सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?

||श्री स्वामी समर्थ ||




आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात , चांगल्या, वाईट.आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची.आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते , संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.

सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय.ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते.प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?

सदगुरू कोणावर अनुग्रह करतात , तर ज्याला इच्छा असते त्यावर.ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ? किंवा “डॉक्टर” जरी “आजरी” माणसा कडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर ?
म्हणूनच जो जागा होतो,शरणागत होतो , ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.

अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही.जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा” “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते.आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून,कृपादृष्टीने होऊ शकतो.

हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.त्याची उतराई त्यांची किती हि जन्म सेवा केली तरी हि होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही.ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान , त्याचे जिवन सफल झाले.

सदगुरू हे दिसायला जरी एक देह असले तरी ते देहातीत असतात,”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही.आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वा पर्यंत पोहोचायचे आहे.आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग,किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.

अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे.महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता , त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस , मी तुझे सारथ्य करतो,म्हणजेच दिशा दाखवितो.

अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.

संग्रहित

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


#antarnad #sadhana #spiritual life #yoga #happiness #sadhguru #krishna #saint #anugrah
#अंतर्नाद #साधना #अध्यात्म #अध्यात्मिक प्रगती #आनंद #सद्गुरू #उपासना  #कृष्ण #सत्संग #अनुग्रह

 
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

Tuesday, 14 July 2020

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

||श्री स्वामी समर्थ ||




सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे. तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो.

गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही' मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त 'गुरुर्वाक्यं प्रमाणं' असे व्हावे लागते. म्हणूनच तर 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..' असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास.

पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां ??? कुणीही उठावे आणि कधीही मागावा ??? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं ।

गमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूक लागली, तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, न करा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घाला की १/- ₹ चा घाला. त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता. दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू शकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा पाळाव्याच लागतात.

‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां ??? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे " आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर देह आया" या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय. सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.

 संग्रहित

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

संचय

||श्री स्वामी समर्थ ||



जन्माला आल्यापासून आपला सगळा वेळ संचय करण्यातच जातो ...सगळे जमवून ठेवायचे ...ओतप्रोत आपल्या गरजेपुरते असावे हा विचारच नसतो ...नुसती हाव ...हे हवे ते हवे .एका पायाला किती ते चपला बुटांचे जोड, कपडे ,सोनेनाणे..प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टींचा नुसता भडीमार करतो ..न संपणारे आहे हे सर्व .

कुठे थांबायचे ते कळतच नाही आपल्याला ..म्हणूनच ह्याला संसार म्हणत असावेत ..सार जे कधीच आटत नाही माया ,प्रेम,लोभ ह्या सगळ्या पोटी आयुष्यभर सतत "संचय " करत राहतो ...शेवटी हे सर्व इथेच सोडून जायचे आहे हे माहित असूनही ..स्वामिनी भक्तांना सांगितले आहे.अरे किती जमा करशील ? किती आणि कश्यासाठी ? हि हाव बरी नाही ..हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ...जितके तूप अधिक घालत जाशील तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत जायील .

संचय करुया पण तो " अखंड नामाचा " कारण तेच शेवट आपल्याला ह्या भवसागरातून तारून नेणार आहे आणि शेवटचा क्षण सुखाचा करणार आहे ...श्री स्वामी समर्थ


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

अवघा रंग एक झाला

|| श्री स्वामी समर्थ ||




आपल्याकडे काश्मीर , सिमला ,सिंगापूर ,युरोप साठी आर्थिक सुबत्ता असते पण देवदर्शन ,कुलाचार ,कुलदर्शन ह्यासाठी आपल्याला वेळ नसतो आणि आपले बजेट नेमके तेव्हाच कोलमडते .

तीर्थयात्राना जाण्याबद्दल अनेक तर्कवितर्क असतात . घरातल्या देव्हार्यातहि देव आहेत मग उठून तीर्थयात्रेस कश्याला ? त्यांची पूजा करतोच कि रोज यासारखे अनंत प्रश्न विचारले चर्चिले जातात .ह्या अश्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्याचा हा लहानसा प्रयास .

आपण आपल्या प्रापंचिक जीवनातील सुखदुख्खे, कामकाज ,इतर प्रापंचिक अडचणी ह्यात इतके गुरफटलो जातो कि मनात असूनही आपल्याला उपासनेस , साधनेस वेळ देता येत नाही. त्यासाठी लागणारी शांतता आपल्याला आपल्या घरात मिळत नाही बरेचदा . तसेच शेवटच्या प्रवासात इथून बरोबर काहीही नेता येणार नाही हे पुरते माहित असूनही सर्व आसक्ती , भोगामध्ये अडकतो ,त्यापासून परावृत्त होवू शकत नाही, म्हणूनच प्रपंचातून काही काळ दूर राहून ईश्वरी सान्निध्य लाभावे आणि सेवा घडावी ह्या उद्दात्त हेतूने तीर्थाटन करावे .

देवदर्शन पदरी पडते हाही एक धार्मिक दृष्टीकोन आहेच, प्रपंचापासून काही काळ दूर गेल्याने आणि केलेल्या साधनेने ,उपासनेने आपल्याला काही अडचणीतून मार्ग मिळतो .संसारिक आसक्ती कमी होवून षडरिपूनवर मात करता येते. मानसिक शांतंता मिळून अध्यात्मिक सेवा घडते आणि पापक्षालन होते.

आपल्या शरीराच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणाची प्रक्रिया ह्यातूनच होते म्हणून तीर्थयात्रा महत्वाची. आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनाची सांगड घालून आपले मन हळूहळू विरक्तीकडे वळते.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे , संस्कार मनात खोलवर रुजले आहेत ,त्याचे जतन करणे आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे ह्यासाठी तीर्थाटन आवश्यक आहे .

तीर्थक्षेत्री असलेल्या देवतेच्या मूर्तीवर हजारो वर्षे केल्या गेलेल्या अभिषेक , पूजा, व्रते ह्यामुळे त्या देवतेचा जागृत अविष्कार तेथील प्रत्येक स्पंदनात असतो ,आणि म्हणूनच त्या वातावरणातील ऊर्जेमुळे ,लहरींमुळे प्रसन्न वाटते ,सकारात्मक वाटते ,मन शांत होते आणि परमेश्वरी सान्निध्याची, अस्तित्वाची अनुभूती मिळते .

मनात समर्पणाची भावना निर्माण होते आणि श्रद्धा बळकट होते. क्षणभर का होयीना आपण प्रापंचिक समस्या विसरून परमेश्वरी चिंतनात रममाण होतो ,आपले दुक्ख विसरतो आणि परमेश्वर चरणी लीन होतो .

कायेने , वाचेने आणि मनाने कळत नकळत झालेल्या पापांचे क्षालन होते हा धार्मिक आधारही तीर्थाटनामागे आहे.

तार अश्या ह्या तीर्थाटनाचा लाभ हा केल्याशिवाय कसा कळेल .

तीर्थक्षेत्री जाणे म्हणजे घरातील वडील मंडळींचे काम ,आमचे काय वय आहे का तीर्थयात्रा करण्याचे? हा प्रश्न तरुण मंडळी सर्रास विचारतात . पण खरतर आयुष्यभर आपण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करतो , खूप चढउतार येतात आयुष्यात ,आताचे युग तर किती स्पर्धात्मक आहे . पण हे सर्व करत असताना जसा वेळ मिळेल तसे देवदर्शन घेतले तर ह्या स्पर्धेत टिकून राहायला मानसिक बळ मिळेल ह्यात शंकाच नाही.आयुष्याच्या शेवटी देवदेव न करता सुरवाती पासून केले तर तो देव शेवटच्या काळात तुम्हाला नक्कीच सांभाळेल .मी तर म्हणीन सहकुटुंब यात्रा करावी म्हणजे घरातील सर्व पिढ्यांना त्याचे महत्व समजेल आणि घरातील मुलांवरही त्याचे उत्तम संस्कार होतील. भौतिक सुखेही प्राप्त करावी पण तीर्थाटन विसरू नये . देवदर्शनास वयाची अट नसते .देवदर्शनास जायचे आहे हे लहानपणापासून मानत रुजले पाहिजे . आपल्या कुलदेवीचे दर्शन निदान वर्षातून एकदा किंवा जमेल तसे नक्कीच करावे . आपल्या वृद्ध आई वडिलांचे शेगाव ,शिर्डीचे तिकीट काढून दिले म्हणजे काही मोठा पुरुषार्थ नाही केला किंवा उपकारही नाही पण उलट त्यांच्यासोबत गेलात तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल.नक्की विचार करा .

तीर्थक्षेत्री असलेल्या भक्तिरसात न्हावून निघणे हि एक पर्वणीच आहे.

म्हणूनच मग म्हणावेसे वाटते “ अवघा रंग एक झाला.... ”.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.


।।श्री स्वामी समर्थ कृपा तीर्थ तारक मंत्र।।

|| श्री स्वामी समर्थ ||



स्वामिनी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे “संजीवनी “ आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामिना साद घातली तार तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन ,प्रचीती देतात हा भक्तांचा अनुभव आहे .स्वामी म्हणजे स्वः मी ,माझ्याजवळ येताना तु तुझ्यातील “ मी “ ला सोडून ये ,तरच मी तुला दिसेन असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती . स्वामिनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझे नाम घेयील ,खर्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम ,चरितार्थ मी चालविन ,पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला . प्रपंच सांभाळून (खुलभर दुधाच्या गोष्टीसारखा) परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामिना .

निशंक हो ! निर्भय हो! मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।

अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी ,अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी ।।१।।

कुठलीही शंका घेउन माझे नाम घेवू नकोस माझी सेवा करू नकोस ,अत्यंत निर्भय हो कारण आता तु माझ्यावर सर्व सोपवले आहेस . पण आपण खरच तसे करतो का? नाही किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो . ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणून त्याचवेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वमिबळ इतके प्रचंड आहे, कि त्यावर आपण निर्धास्त होवून मार्गक्रमण करू शकतो . त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात ,त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे . प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण ते कधी ? जर त्यांना ते वाटले तर आणि तरच .उठसुठ सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात .

जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।।

आज्ञेविना काळ ना नेई त्याला,परलोकीही ना भिती तयाला ।।२।।

आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणार्या आपल्यावर मायेची पखरण करणार्या स्वामिना त्रिवार वंदन .हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञे शिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेवू शकणार नाही अशी हि अलौकिक शक्ती आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी .

उगाची भितोसी, भय हे पळू दे ,जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे।

जगी जन्म-मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ।।३।।

प्रपंचातील लहानसहान गोष्टीनी आपण सशासारखे घाबरतो ,भय आपली पाठ सोडत नाही ,आपल्या जीवाला शांतात मिळत नाही .म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टीना उगाच कश्याला भीतोस ? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक . हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वमिसेवेत आहोत त्यांचे बालक आहोत ह्याची खुणगाठ मनी ठेव.

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।

कितीदा दिला बोल! त्यांनीच हात,नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।

स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला “ स्वामी “ ह्या २ शब्दांचा अर्थ समजू शकेल ,आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तु स्वामीभक्त होवूही शकणार नाहीस . आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत . कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत ,त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर , अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा.

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।

हे तीर्थ घे ,आठवी रे प्रचिती ,न सोडी कदा, स्वामी ज्या घेई हाती।।५।।

प्राण , अपान, उदान ,व्यान ,उदान ,समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत. स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच .हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि कितीवेळा बाहेर काढले ,प्रचीती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत हि खुणगाठ मनाशी ठेव .

|| श्री स्वामी समर्थ ||

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

परमेश्वर प्राप्ती

|| श्री स्वामी समर्थ ||






परवा एकाने छान प्रश्न विचारला .जप करत असताना मधेच काही काळ मी जपमाळ घेतो ,काही वेळा असाच करतो ,काही वेळा बोटातील counter वरती जप करतो पुन्हा माळ मग कधी असाच करतो .तर अस चालेल ?

उत्तर अगदी सहज सोपे आहे .मी त्यांना म्हंटले आपण कुठल्याही प्रकारे केलेला जप हा आपल्या देवते पर्यंत पोहोचतो. आपण जपास काय माध्यम वापरतो कि फक्त मुखाने जप करतो, ह्याहीपेक्षा तो किती प्रेमाने ,भावनेने करतो ते महत्वाचे .सुदाम्याने दिलेले पोहे सुद्धा कृष्णाने मिटक्या मारत खाल्ले कारण त्यात प्रेमाचा खर्या भक्तीचा अंश होता . परमेश्वर आपल्या भक्तांना ,त्यांच्या मनातील भाव ओळखतो, त्यामुळे भाव महत्वाचा. कसाही जप करा पण करा .


जप करण्याची बुद्धी झाली तिथेच समजा परमेश्वर प्राप्ती झाली .


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

प्रचीती ..अनुभवली ह्याची देही ह्याची डोळा

|| श्री स्वामी समर्थ ||



काल अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग जुळून आला..स्वामींकडे जायचे म्हणून आधी चार दिवस किती लगबग सुरु होती .स्वामिना कायकाय न्यायचे ,त्यांच्याशी कायकाय बोलायचे ,कसे भांडायचे ? स्वामी दिसताच क्षणी आधी काय बोलायचे मग काय बोलायचे किती आणि कसे रुसयाचे ह्याचे मनोमनी आराखडे बांधणे सुरु होते .”माझी आई अक्कलकोटी भिऊ नको ती आहे पाठी ” ह्याचा प्रत्येक क्षणी प्रत्यय देणारी माझी स्वामी माऊली. का कोण जाणे मनात महाराजांशी हट्टच धरला कि आज इथून काहीतरी प्रचीती दिल्याशिवाय मी जाणारच नाही ..तो अद्भुत क्षण आला आणि पहाटेच्या प्रहरी मी स्वामीचरणी रुजू झाले. चार दिवस ठरवलेले सगळे कुठे मनी विरून गेले कळलेच नाही ....शब्द सुचेनात ...

फक्त डोळ्यातून घळघळा पाणी येवू लागले..मन भरून आले. खर सांगू का आपण कितीही ठरवले तरी शेवटी स्वामींसमोर गेल्यावर तिथे आपण काहीतरी वेगळेच बोलतो किबहुना त्यांना जे हवे तेच आपल्या मनात येते आणि बोलून जातो. महाराजांच्या डोळ्यात पहिले आणि जणू महाराज “ मुली किती दूरचा प्रवास करून माझ्या ओढीने आलीस ,बाळ दमली असशील ना? मीही तुझी आतुरतेने वाटच पाहत होतो ग .” असेच मला म्हणत आहेत असा भास झाला. महाराजांच्या शिवाय ना दुसरे काही दिसत होते न दुसरा मनी कुठला विचार होता. आपल्या गुरूंचे दर्शन आणि तेही प्रत्यक्ष अक्कलकोटी ह्यावर माझा खरतर विश्वासच बसत नव्हता इतका हा योग सहज जुळून आला. गाभार्यात अजिबात गर्दी नसल्याने महाराजांच्या समोर बसून शांतपणे ध्यानस्थ झाले आणि मानसपूजा ,नामस्मरण ह्यात रममाण झाले. त्यांनी इतके दिलेय कि काही मागणे उरलेच नाहीय तरीही आपण सामान्य माणसे काही नको काही नको म्हणून काहीतरी मागणारच ...म्हणून सांगितले आज मला इथे काहीतरी प्रचीती द्या नाहीतर मी जाणारच नाही . पण खरे सांगू मी हक्काने त्यांच्याशी कितीही भांडत बसले तरी ते सर्व क्षणार्धात विसरूनही जाते.

दुपारी अन्नछत्रात अप्रतिम प्रसादाचा लाभ घेवून पुन्हा स्वामी दर्शनाला गेले .खरतर आता काही वेळात अक्कलकोट सोडून पुन्हा परतीचा प्रवास सुरु होणार होता ...म्हणतात ना दुःखाचे दिवस आणि आनंदाचे क्षण असत्तात अगदी तसेच मी आनंदाच्या उच्च शिखरावर असल्याने हे समाधानचे ,आनंदाचे क्षण कसे भुरकन निघून गेले ते समजलेच नाही आणि आता काही वेळातच परतीचा प्रवास सुरु होणार ह्याची जाणीव झाली. मनापासून परत जायचेच नव्हते त्यामुळे पुन्हा मन गहिवरून आले आणि अश्रू वाहू लागले...महाराजांच्या समोर किती काळ बसले तरी आपले भक्तांचे थोडेच पोट भरणार आहे .मनात भांडण चालूच होते ,तुमचे माझ्याकडे लक्षच नाही तुम्हाला काय लाखो भक्त तुम्ही कश्याला बघाल माझ्याकडे असा लटका राग नाकावर घेवून मनाचे द्वंद्व चालू होते. तेव्हड्यात गुरुजींनी माझ्या मुलाला अनमोल ला हाक मारली आणि सांगितले आज महाराजांना तुम्ही अर्पण केलेली शाल पांघरली आहे.आणि त्याला प्रसाद ,श्रीफळ दिले. माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल त्यासाठी माझ्याकडे शब्दसंपदा नाही . अनमोल CET छान मार्क मिळवून पास झाला तेव्हा त्याने महाराजाना मी शाल अर्पण करीन असे सांगितले होते आणि तो नवस आज पूर्ण झाला होता .पण आपल्या समोर त्यांनी ती शाल महाराजांना पांघरावी ह्यासारखी आनंदाची आणि भाग्याची दुसरी गोष्टच काय ? अक्कलकोट येथे रोज महाराजांना कुठली शाल अर्पण करावी ह्याचे रंग ठरले आहेत त्याचप्रमाणे तिथे शाल अर्पण केली जाते.

काल बुधवार असल्याने पांढरा किंवा ग्रे , बिस्कीट रंग होता. आमची शाल ग्रे रंगाची असल्याने त्यांनी ती लगेच अर्पण केली हा योगायोग आहे कारण ह्या ठराविक रंगांच्या बाबत मला काहीच कल्पना नव्हती . खाडकन डोळे उघडले . मी हट्ट केला ,अर्थात चांगल्याच गोष्टीचा , आणि महाराजांनी मला देवस्थानात अखंड प्रचीती दिली आणि मी ती ह्याची डोळा ह्याची देही पहिली .महाराजांच्या समोर नतमस्तक झाले. आपण प्रेमाने आणलेली शाल महाराजांनी पांघरली आहे ह्यासारखी दुसरी प्रचीती काय असू शकते ? महाराज कधीच भक्तांमध्ये भेद करत नाहीत ,त्यांना हवी असते कळकळीची हाक आणि मनापासून केलेले प्रेम. महाराजांना म्हंटले आज माझे आईवडील हयात नाहीत पण तुम्ही प्रत्येक क्षणी सांभाळत आहात....माझ्या जन्माचे खरच सार्थक झाले आहे..

आपला भाव सदैव गुरु चरणी असावा पुढे काहीही मागावयास उरतच नाही, नाही का? आपला जन्म सेवेसाठी आहे आणि आपण तेच करायचे आहे .

आपण स्वतः महाराज व्हायला जायचे नाही हे भक्तांनी सदैव स्मरणात ठेवले पाहिजे . 

आज हि लाख मोलाची प्रचीती माझ्या तोडक्या मोडक्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहचावी म्हणून हा लेखन प्रपंच आज देहाने घरी असले तरी तनमनधन स्वामी चरणीच आहे.

अक्कलकोट सोडले शेवटी आपण प्रापंचिक माणसे पण मन आनंदाने नाचत गात होते.

तुझे रूप चित्ती राहो 
मुखी तुझे नाम 
देह प्रपंचाचा दास 
सुखे करो काम...


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.