Showing posts with label योगा. Show all posts
Showing posts with label योगा. Show all posts

Monday, 27 July 2020

मेडिटेशन( Meditation)

||श्री स्वामी समर्थ ||



तुमच्यासोबत असं कधी झालयं, की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि तो समोर प्रत्यक्ष हजर… किंवा बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी..

कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं.

असं का होतं माहितीय. आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे, ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं, म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो. जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच.

मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन (सुप्त मन). तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.

बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली म्हणजे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – १४ ते ३० हर्ट्झ.
अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. फ्रिक्वेन्सी – ७ ते १३ हर्ट्झ
थीटा अवस्था – आपली झोपेची स्थिती, चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरुच.. फ्रिक्वेन्सी – ३.५ ते ७ हर्ट्झ

डेल्टा अवस्था – गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी – ०.५ ते ३.५ हर्ट्झ
फक्त माणुसच नाही तर ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडत्येत. आपल्या आजुबाजुला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयनमंडल. विचारांचे आदानप्रदान करणारं हे माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे ६.८ हर्ट्झ.

आता वरच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे आकडे पडताळुन पहा. वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे. म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं, तर वातावरणच्या माध्यमाचा वापर करुन आपण आपल्याला हवं ते घडवु शकतो……अल्फा स्टेट म्हणजेच ध्यानाची अवस्था…

प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं, काही क्षणासाठी तरी सर्व विचार दुर सारुन स्वतः मध्ये डुंबुन जायला हवं. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं. मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं.

आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाला मनापासुन ‘थॅंक यु’ म्हणायचं….. आणि जोमाने रोजच्या कामाला लागायचं…. बस!………निर्धास्त रहा, विश्वास ठेवा!…

आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल………

अशा ध्यानाचा इफेक्ट म्हणजे याने स्मरणशक्ती प्रचंड वाढते. मन चिंतामुक्त होतं. मनात साचलेली जळमटं आणि कचरा स्वच्छ होतो, ताजतवानं वाटतं, नवनव्या कल्पनांची कारंजी मनात उसळी मारायला लागतात.

कामाचा आवाका वाढतो, आत्मविश्वास वाढतो. काम करण्यात आनंद मिळतो, मोठीमोठी इतरांना अवघड वाटणारी कामं आपल्याकडुन चुटकीसरशी होतात आणि आपलं मन आनंदाने नाचत बागडत गाणं गायला लागतं.

संग्रहित

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

#antarnad #dhyan #meditation #meditation effect #happiness #bita mode #worries #memory
#अंतर्नाद #ध्यानधारणा #सत्संग #आनंद #फ्रिक्वेन्सी #बीटा अवस्था #ब्रम्हांड #स्मरणशक्ती #चिंतामुक्त #आत्मविश्वास #चंचल मन 

Thursday, 16 July 2020

साधना / ध्यान कसे करावे ?

|| श्री स्वामी समर्थ ||




“ श्रावणमासी हर्ष मानसी ” ह्याचा प्रत्यय देणारा श्रावण महिना खरोखरच नेत्रसुखद , सकारात्मक उर्जेने भरलेला असतो. पावसाळी वातावरण, बहरलेली सृष्टी ,पहाटेच्या निरव शांततेतील पक्षांची किलबिल आणि ओल्या मातीचा सुगंध अध्यात्मिक प्रगतीस अत्यंत पोषक असतो. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणात अनेक व्रत वैकल्ये , उपासना केल्या जातात . नामस्मरण , अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन सामूहिकरीत्या केले जाते.

साधना /ध्यानधारणा कशी करावी ह्या संबंधी हा लेख स्वानुभवातून आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे.

साधना करण्यापूर्वी काही दिवस श्वासावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सराव करावा. एकदम साधनेस सुरवात करू नये. आपल्या शरीरास आणि मनासही एका जागी स्थानबद्ध होण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे .पद्मासन घालून ध्यानमुद्रा ,गुरुमुद्रा करावी आणि हळूहळू श्वास सोडणे आणि घेणे ह्यावर म्हणजेच श्वासावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करावे.

साधना अनेक प्रकारे केली जाते.  ओमकार साधना , त्राटक अश्या अनेक प्रकारे साधना केली जाते. लहान मुलांची एकाग्रता वाढावी आणि मन स्थिर व्हावे तसेच आयुष्यात विचारपूर्वक निर्णय घ्यायची सवय लागावी म्हणून त्यांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आत्यंतिक गरजेचे आहे. आजकाल शाळा महाविद्यालयातून योग शिक्षणाचे धडे दिले जातात जे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. “आमची मुले एका जागी स्थिर बसत नाहीत ” अशी तक्रार पालक नेहमीच करत असतात . अश्या मुलांसाठी साधना हि संजीवनीच आहे.


साधना कशी , कधी , किती वेळ आणि कुठे करावी ते आता पाहूया. खरतर ह्यावर अनेक ग्रंथ , पुस्तके आहेत पण स्वतःचे अनुभव आपल्या सोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल आणि म्हणून हा सर्व खटाटोप.
आज आपली जीवनशैली अत्यंत व्यस्त आहे.प्रत्येक ठिकाणी जीवघेणी स्पर्धा. अनेक प्रकारची माणसे त्यांचे स्वभाव , इर्षा सगळ्यांना तोंड देत आपला इवलासा जीव थकून जातो आणि मग कधीतरी मनाचाही समतोल ढळतो . ह्या स्पर्धात्मक युगात तरायचे असेल तर आपले मन संतुलित असणे गरजेचे आहे आणि तिथेच आपल्याला ध्यानाची साधनेची महती कळते.

आपले शरीर यंत्रवत काम करत असते तसेच आपले मनही . विचारांनी सैरभैर झालेल्या आपल्या मनाला एका जागी शांत बसवणे म्हणजेच साधना किंवा ध्यान.

पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे 3.20 ते 3.40 साधनेसाठी सर्वोत्तम काळ समजला जातो . पण तो जमत नसेल तर निदान पहाटे ५ वाजताची वेळ योग्य आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घरी यायची वेळ निश्चित नसते अश्यावेळी सकाळी जमेल तशी साधना करावी. मुख्य म्हणजे साधना अंतर्मनापासून करावी.साधना उरकून टाकू नये, त्यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.

साधना करताना आपल्या कुलस्वामिनी , इष्ट गुरू ह्यांना नमस्कार करून पद्मासनात बसावे. गायत्री मंत्र म्हणून सुरवात करावी . त्यानंतर ओमकाराचा जप करावा . त्यामध्ये तोंडाने “आ” चा उच्चार लांबवावा ,मग ओठाचा चंबू करावा आपोआपच “ ओ” चा उच्चार होयील आणि मग ओठ मिटून तोच आवाज “म” मध्ये परिवर्तीत होयील. ह्यामध्ये आ ओ म ह्या हे तिन्ही ध्वनी ची लय एकाच असावी. थोडक्यात आपल्याला ओम म्हणायचं आहे पण तो “ आ ओ म ” असा फोडून म्हणायचा आहे. ह्या ओमकारामुळे आपल्या शरीरातील ७ चक्रेही कार्यरत होतात आणि शरीरात नाभीपासून गळ्यापर्यंत एक कंप जाणवू लागतो.

किमान ७ ते ११ वेळा तरी जा ओमकार झाला पाहिजे. पश्च्यात डोळे मिटून शांत बसायचे आहे. दीर्घ श्वास घेवून संपूर्ण सोडून द्यायचा असे ३ वेळा करून आणि पद्मासनात गुरुमुद्रा करून ह्याच अवस्थेत बसायचे आहे. श्वासावर लक्ष्य केंदित असावे. डोळे बंद करून शांतपणे आपल्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न करायचा आहे .


सुरवातीला डोळे जड होणे ,दोन भुवयांच्या मध्ये दुखणे होवू शकते . ह्या आसनात मन शांत ठेवायचे आहे ,कपाळावर आठ्या नकोत. मनात अनेक विचार येत राहतील ते येवुदेत, येतील आणि जातील.आपण त्यांना थांबवू नयेत किबहुना त्यांना थांबवता येणे आपल्या हाती नाहीच. कालांतराने ह्या साधनेचा जसजसा परिणाम होईल मनातील विचारांचे काहूर कमीकमी होवू लागतील आणि कालांतराने ते पूर्ण थांबेल पण हि खूपच पुढची स्टेप आहे. साधनेची परमोच्च अवस्था म्हणजेच समाधी.

साधना करत असताना आपल्या दैनंदिन जीवनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करावा. आपण एखाद्या शांत ठिकाणी नदी किंवा समुद्राच्या ठिकाणी बसलो आहोत ,पक्ष्यांची किलबिल, समुद्राची गाज ऐकू येत आहे ,मन शांत आहे , कसलीच आसक्ती नाही . आपणच आपल्याशी संवाद करत आहोत असे विचार करावेत. आपल्या अस्तित्वाचा शोध आपण घेत आहोत . मी इथे का आहे , माझ्या असण्याला काय अर्थ आहे ? ह्या सर्वचा शोध साधनेत होऊ लागतो. काही जणांना समोर पांढरा प्रकाश दिसतो तर काहीना काहीच नाही.काही दिसेल ह्यासाठी साधना नाही तर मनाची निस्सीम शांतात अनुभवण्यासाठी साधना आहे.

आपण गप्पा मारायला , TV बघायला ,whatsapp university साठी तासंतास बसू शकतो पण साधनेसाठी आपण २ क्षणही बसू शकत नाही ह्यातच साधनेचे महत्व समजते. आपल्या मनाला आणि शरीरालाही साधनेची सवय लावायची आहे. एकदा सवय झाली कि साधना हळूहळू वाढवायची आहे . मग अर्धा तास , १ तास २ तास, ६ तासापर्यंत किबहुना त्याहीपेक्षा कितीतरी जास्त असा वेळ वाढवत न्यायचा आहे.

साधनेचे असंख्य फायदे आहेत. राग शांत होतो , मनात येणारे कल्पविकल्प कमी होतात,अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते . सर्वात मुख्य म्हणजे आपली कर्म कमी होतात . साधना करताना आपण ना बोलणार ना ऐकणार त्यामुळे आपला संवाद कमी होणार , आपल्या मुखातून आपण कुणाला काहीच बोलणार नाही. आपली जीव्हाच आपली कर्म वाढवत असते त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा जितका वेळ साधना तितका वेळ आपण प्रपंचा पासून मुक्त ,कर्मांपासून मुक्त.

आपण बाह्य जगात वावरतो पण आपल्या आतमध्ये त्याहीपेक्षा सुंदर जग आहे ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. साधना ह्या नितांत सुंदर जगाचे महाद्वार उघडणारी अद्भुत शक्तीच आहे.

साधनेचे अनुभव अविस्मरणीय असतात आणि त्याचा आनंद चिरकाल टिकणारा असतो . कात टाकल्याप्रमाणे आपणच आपल्याला नव्याने भेटत जातो आणि मग एकदा साधनेची गोडी लागली कि तासंतास आपण साधनेत रमतो. आपल्या आयुष्यातील बराच वेळ आपण अर्थहीन गोष्टीत घालवत असतो , TV, What Sapp, gossips एक ना दोन. पण ह्या गोष्टींचा अखेर काहीच उपयोग होत नाही.

साधना मात्र फळते ह्यात वाद नाही. मुख्य म्हणजे मनाचे संतुलन राहते .साधनेची बैठक भक्कम असेल तर अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो. ज्योतिष कथन करण्यास सुद्धा साधना आवश्यक आहे. आपल्या शरीरात असलेल्या ७ चक्रांवर सुद्धा साधना, ध्यान करता येते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर , अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सह्स्त्रार हि चक्रे एनडोक्राईन ग्रंथीना जोडून काम करत असतात . प्रत्येक चक्र आणि त्याचा रंग डोळ्यासमोर ठेवून त्यावर लक्ष्य केंद्रित करून साधना करता येते , अश्याप्रकारे ते चक्र जागृत होण्यास मदत होते .


साधना सुरु झाली कि व्यक्तीत अमुलाग्र बदल होतात ,परंतु त्यासाठी संयम हवा, कुठल्याही गोष्टी क्षणात होणार नाहीत .आजकाल instant चा जमाना आहे पण साधनेत संयम हवाच तसेच सातत्य हवे. आपल्यातील बदल आपणच अनुभवायचे आहेत. साधना एका विशिष्ठ जागी केली तर उत्तम पण आज मुंबई पुण्यासारख्या शहरात प्रत्येक ठिकाणी जागेची समस्या असल्याने साधनेची जागा बदलली तरी चालेल . पण करताना ती मन ओतून करावी तरच फलद्रूप होते.

साधना करत असताना मध्ये बोलू नये किंवा कधी मी उठतेय हि भावना मनात असू नये. साधना आपल्या आंतरिक समाधानासाठी आपण करतो त्याचे फायदे आपल्यालाच आहेत ,नाही का?
मला साधना जमेल का?हा प्रश्न नेहमी विचारला जातो, त्याचे उत्तर अर्थातच “ हो ” असेच आहे.
दोन्ही हाताची गुरुमुद्रा करावी म्हणजे अंगठा आणि त्याशेजारील बोटांची अग्रे जुळवून हात आपल्या मांडीवर ठेवावेत.

साधनेमुळे आयुष्य बदलते,मन शांत ,एकाग्र होते. प्रत्येक गोष्ट आपण अधिक विचारपूर्वक करू लागतो. बोलण्यावर नियंत्रण राहते तसेच शरीर रोगमुक्त होण्यास मदत होते. सकारात्मकता वाढीस लागते आणि आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते.आयुष्यात अशक्य असे काहीच नाही.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड आपल्याला साधनाच काय समाधी अवस्थे पर्यंत नेवू शकते. 

मला साधना करायची आहे हा विचार ज्या क्षणी मनात येतो तोच शुभ मुहूर्त असतो . मला हे जमेल का? माझ्याच्याने हे होईल का? असल्या अर्थहीन प्रश्नात स्वतःला अडकवून ठेवू नका.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून साधनेला सुरवात करुया आणि एक निरोगी , चिंतामुक्त आयुष्य जगण्यास प्रारंभ करुया. 

अस्मिता

#sadhana #Dhyan #Shravan #upasana #namasmaran #SadhanaKashiKaravi #SadhanecheFayde 
#साधन #ध्यान #श्रावण #उपासना #नामस्मरण #साधना-कशी-करावी #साधनेचे-फायदे #ध्यानकाकरावे
लेख आवडल्यास खालील लिंक वरती Click वर अभिप्राय जरूर द्या आणि आपले साधनेचे अनुभव सुद्धा शेअर करा.

Antarnad18@gmail.com

लेखाशेजारी आपला Email द्या आणि Follow वर Click करायला विसरू नका.

Tuesday, 14 July 2020

मेडिटेशन ,अध्यात्म आहे एक लाइफस्टाइल.

|| श्री स्वामी समर्थ ||






प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं! काही क्षणासाठी तरी सर्व विचार दुर सारुन स्वतः मध्ये डुंबुन जायला हवं. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं. मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं....

मेडिटेशन

तुमच्यासोबत असं कधी झालयं, की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि तो समोर प्रत्यक्ष हजर किंवा बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्यालाही एकदम सुचावी...कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं...

असं का होतं माहितीय....खरं तर आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे,

ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं, म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो.

जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच.....

मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन (सुप्त मन). तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.

बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली म्हणजे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था.

ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – १४ ते ३० हर्ट्झ.

अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. फ्रिक्वेन्सी – ७ ते १३ हर्ट्झ

थीटा अवस्था – आपली झोपेची स्थिती, चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरुच.. फ्रिक्वेन्सी – ३.५ ते ७ हर्ट्झ

डेल्टा अवस्था – गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी – ०.५ ते ३.५ हर्ट्झ

फक्त माणुसच नाही तर ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडत्येत....आपल्या आजुबाजुला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयनमंडल. विचारांचे आदानप्रदान करणारं हे माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे ६.८ हर्ट्झ.

आता वरच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे आकडे पडताळुन पहा. वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे.म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं, तर वातावरणच्या माध्यमाचा वापर करुन आपण आपल्याला हवं ते घडवु शकतो……

अल्फा स्टेट म्हणजेच ध्यानाची अवस्था…

प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं! काही क्षणासाठी तरी सर्व विचार दुर सारुन स्वतः मध्ये डुंबुन जायला हवं. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं. मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं....

आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाला मनापासुन ‘थॅंक यु’ म्हणायचं…..

आणि जोमाने रोजच्या कामाला लागायचं…. बस!………

निर्धास्त रहा, विश्वास ठेवा!…

आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल………

अशा ध्यानाचा इफेक्ट म्हणजे याने स्मरणशक्ती प्रचंड वाढते. मन चिंतामुक्त होतं. मनात साचलेली जळमटं आणि कचरा स्वच्छ होतो, ताजतवानं वाटतं, नवनव्या कल्पनांची कारंजी मनात उसळी मारायला लागतात....

ध्यानामुळे कामाचा आवाका वाढतो, आत्मविश्वास वाढतो. काम करण्यात आनंद मिळतो, मोठीमोठी इतरांना अवघड वाटणारी कामं आपल्याकडुन चुटकीसरशी होतात.....

आणि आपलं मन आनंदाने नाचत बागडत गाणं गायला लागतं…..

“मेरा मन कहने लगा, आज तो बहोत, ‘हलकाफुलका’ लगने लगा!…”

सर्वांनी दिवसांतून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी मेडिटेशन ,ध्यान करायलाच हवं हं....


पंकज कोटलवार( संग्रहित )

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

Friday, 19 June 2020

And Now, Yoga

|| श्री स्वामी समर्थ ||






महर्षी पतंजली ह्यांच्या योगसूत्र सांगणार्या “ Atha-Yoganusasanum ” मध्ये पहिलीच ओळ आहे ...And Now , Yoga.

योग, प्राणायाम हे शब्द आज नवीन नाहीत .हजारो वर्षांपासून आपल्याकडे योग प्रचलित आहे. आजच्या अत्यंत तणावयुक्त जीवनशैलीला “ योग ” हे एक वरदान ठरले आहे. पाश्चिमात्य देशातून अनेक अभ्यासक योगाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.योगाचे महत्व आज संपूर्ण विश्वाने मान्य केले आहे आणि योगाचा प्रसार अखंड विश्वात जोमाने होत आहे .

भूतकाळात जे झाले ते बदलता येणार नाही आणि भविष्य आपल्याला माहित नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे तो आत्ताचा क्षण आणि तोच क्षण आनंदाने कसा जगायचा ते आपल्याला शिकवणारे शास्त्र म्हणजे “ योग ”. योग हि एक जीवनशैली आहे .

आपल्याला कुठलाच आजार नाही म्हणजे आपण आरोग्यसंपन्न आहोत असे नाही. शारीरिक , मानसिक ,सामाजिक आणि अध्यात्मिक सुस्थितींचा अनुभव घेणे म्हणजे “आरोग्य ". 

शरीर , बुद्धी आणि मनाचे आपल्या आत्म्याशी जोडणे जाणे म्हणजेच “योग”. आपले कुटुंबाशी , समाजाशी ,राष्ट्राशी आणि संपूर्ण सृष्टीशी जोडणे जाणे म्हणजे “ योग ” अशीही एक व्याख्या महर्षी पतंजली ह्यांनी सांगितली आहे. 

आपले जीवन शारीरिक आणि मानसिक , बौद्धिक दृष्टीने संतुलित करण्यासाठी योग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. योग केल्याने जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो, सकारात्मकता वाढते आणि एक संतुलित व्यक्तिमत्व तयार होते .महामुनी पतंजली ह्यांनी ह्यास अष्टांग योग म्हंटले आहे . ह्यातील महत्वाचा भाग म्हणजे हि सर्व अंगे एकाच वेळी एकमेकांशी जोडली गेली आहेत .
योग साधनेबद्दल अनेक पुस्तके उपलब्ध आहेत तसेच आज शास्त्रीय पद्धतीने योग शिकवण्यासाठी अनेक शिबिरेही आहेत .

कुठलीही पुस्तके बघून योगासने करणे अत्यंत चुकीचे ठरू शकते . अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योग शिकणे गरजेचे असते .

सुरवातीला सहज सोपी काही आसने करून योगाभ्यासाला सुरवात करावी. आसने खूप आहेत पण आपल्या क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आसने करावीत. आसनांची शरीरास सवय झाली कि प्राणायामाचा अभ्यास करावा .आसनाने सिद्ध झालेलं शरीर प्राणायामामुळे अधिक कार्यक्षम होते .प्राणायामामुळे शरीर आणि शरीरातील नाड्या शुद्ध होतात तसेच  भावनात्मक समतोल राहण्यास मदत होते 
.
मला स्वतःला आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा लेखनप्रपंच. आपल्याकडे lockdown सुरु झाले आणि आपण सगळे बघता बघता घरात अगदी बंदिस्त होवून गेलो , हे इतके अचानक झाले कि आपल्याला ह्या परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यायला थोडा काळ नक्कीच लागला. मी रोज पहाटे ५ वाजता चालायला जाते  तेही ह्यामुळे बंद झाले आणि मनाची चिडचिड सुरु झाली. चालणे होत नसल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले . एक आठवडा गेला  तेव्हा जाणवले कि फारच मरगळ आली आहे, उदास वाटत आहे आणि कश्यातच आनंद वाटत  नाही आहे. त्यात रोज TV वर दिसणाऱ्या सर्व नकारात्मक बातम्या ह्यामुळे संपूर्ण विश्वातली सकारात्मकताच नष्ट झाली आहे कि काय असे वाटू लागले .

मग ठरवले कि आपल्या जीवनपद्धतीत बदल करायचा . रोज करतो त्या आसनांमध्ये अधिक वेळ द्यायचा . चालायला मिळत नाही म्हणून काय झाले अन्य योगाभ्यास वाढवायचा .मी रोज सकाळी ७ आणि दुपारी ४ हि वेळ निश्चित केली आणि ठरल्याप्रमाणे आसने आणि प्राणायाम करू लागले. सर्वात जास्ती वेळ मी ध्यानास देवू लागले .आजवर इतका वेळ मला मिळत नव्हता पण आता मिळालेला वेळ सत्कारणी लागत होता .

मंडळी आपण तासनतास फोनवर बोलू शकतो , सिनेमा पाहू शकतो पण ध्यान करायचे म्हंटले तर आपण २ मिनिटेही एका जागी स्थिर राहू शकत नाही हे तुम्ही अनुभवले असेल. पण जी गोष्ट जितकी कठीण त्याचे फायदेही तितकेच जास्ती असतात.

मी माझी ठरलेली नित्याची आसने करत राहिले . त्यात अजिबात बदल केला नाही आणि संपूर्ण लक्ष ध्यानावर केंद्रित केले. सुरवातीला मनात असंख्य विचारांची गर्दी होवू लागली . कपाळावर आठ्या जसे काही मला कुणी शिक्षाच केली आहे. मनात स्वतःशीच द्वंद्व . कुकर लावायचा आहे , आता काय बाई नाही आपल्यालाच करायचे आहे सर्व, भाजी मिळेल का बाहेर ,पण जाणार कसे ..हे सर्व कधी थांबणार ..एक न दोन अनेक विचार मनात थैमान घालत होते पण मी निश्चय केला होता त्या प्रमाणे हे विचार आले तरी शांतपणे ध्यानावर संपूर्ण लक्ष ठेवले. हळूहळू त्यातील कालावधी वाढवला , मनातील विचार हळूहळू कमी होत गेले आणि त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम मला जाणवू लागला. ह्या आधीही मी ध्यान करत असे पण त्यास खूप वेळ देता येत नसे . आज lokdown मुळे ध्यानासाठी वेळ देता येवू लागला आणि त्याची गोडी लागली .प्रचीतीविना भक्ती नाही तसेच कुठल्याही गोष्टीचे  चांगले परिणाम दिसू लागले कि आपल्याला त्यात आनंद वाटू लागतो. आज जवळजवळ ३ महिने मी हा अभ्यास करत आहे आणि आज माझे आयुष्य बदलून गेले आहे हे मला प्रकर्षाने जाणवत आहे. योगाभ्यास , साधना मला एका वेगळ्याच उंचीवर घेवून गेली आहे हा आनंद मी अंतर्यामी अनुभवते आहे .

ध्यानामुळे मला शांत वाटत आहे, दिवसभर उर्जा टिकून राहते आणि ताजेतवाने वाटते . शरीर आणि मन दोन्ही हलके झाले आहे. वजन कमी झाले आहे एक संपूर्ण सृष्टी आपल्यात समावल्याचा अद्भुत,अद्वितीय आनंद मी अनुभवते आहे. 

आपण सतत बाह्य जगाकडे पाहत असतो आणि त्यातूनच मानसिक शारीरिक ताण घेत असतो . पण कधीही आपण आपल्या मनात आपल्या आतमध्ये डोकावून पाहताच नाही . जो आनंद आणि मनाची शांतता आपण बाहेर शोधात असतो ती तर खरी आपल्या आतच असते पण नेमके त्याकडे आपण दुर्लक्ष्य करतो .

मंडळी गेल्या ३ महिन्यात माझी मला मी नव्याने भेटत गेले . योगासन तर करावीत पण ध्यान केल्याचे अनेकविध फायदे आहेत जे आपले जीवन एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात , किती संकटे आली तरी आपण शांतपणे त्यातून न डगमगता मार्ग काढू शकतो ,कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होण्यापासून आपण दूर राहतो , चटकन येणारा राग काबूत येतो ,आपल्या भावनांवर विजय मिळवतो असे अनेक ध्यानाचे परिणाम आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाहीत . आज ह्या योग दिवसाचे औचित्य साधून मला माझा हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावासा वाटला.

योग आणि ध्यानधारणा कुणीहि करू शकतो त्याला वयाची अट नाही पण प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी...
तसेच तुम्ही जी आसने निवडाल त्यात सातत्य असायला हवे . आज हि ४ केली मग उद्या दुसरी असे नको . ऑमकार साधना , अनुलोम विलोम , कपालभाती , सिंह मुद्रा , भ्रामरी, वक्रासन ,पवनमुक्तासन ,हलासन हि आसने वर सांगितल्याप्रमाणे योग शिक्षकाकडून शिकून घ्यावीन आणि मगच करावीत . आपल्याला काही आजार असतील तर शिक्षक त्यानुसार आपल्याला आसने सुचवू शकतात. ह्यात कुणालाही कॉपी करायला अजिबात जावू नये. प्रत्येकाची शारीरिक क्षमताही वेगळी असते त्यामुळे दुसरा हे आसन १० वेळा करतो म्हणजे आपणही केलेच पाहिजे हा अट्टाहास नको. आपल्याला जमेल तशी सुरवात करून हळूहळू त्यात वाढ करावी .

शक्यतो सकाळची वेळ निवडावी कारण तेव्हा आपले पोट रिकामे असते . नियमित योग, ध्यान , चालणे  ह्यासोबत आपण जर आपला आहारही नियंत्रित ठेवला तर आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुद्धा तितक्याच  सकारात्मक उर्जेने भरलेली असेल ह्यात दुमत नाही .
मंडळी , आत्ताचा हा क्षण महत्वाचा आहे आणि तो खर्या अर्थाने आनंदाने जगणे आपल्या हाती आहे . योग आपल्याला ह्याच क्षणाची अनुभूती घ्यायला शिकवतो.

कदाचित ह्या आधी तुम्हीसुद्धा अनेक संकल्प सोडले असतील ...हसायला येतंय ना मनोमनी ? येणारच कारण आपण सगळे तसेच करत असतो .पण आज दृढ निश्चय करुया ..


आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निम्मित्ताने आपल्या आयुष्यातील योग आनंदयात्रेस  प्रारंभ करुया .


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा. 

Antarnad18@gmail.com


अस्मिता

Monday, 5 August 2019

मौनं सर्वार्थ साधनम..

|| श्री स्वामी समर्थ ||








मौन ? छे छे  हे काय भलतच , काहीही करायला सांगा पण गप्प बसायला सांगू नका कारण बोलणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही प्रत्येक क्षणी बजावणारच . गमतीचा भाग सोडा पण खरच आहे कि नाही हे आपल्या सर्वाना लागू ? सगळे गालातल्या गालात हसत आहेत . अहो आपल्या भावना व्यक्त करायला ,संवाद साधायला बोलणे तर हवेच कि ,फक्त ते प्रमाणात आणि मुद्देसूद , विषयाला धरून हवे हा मुद्दा आहे. ध्वनीप्रदुषणाबद्दल अनेक लेख आपणा वर्तमानपत्रातून वाचत असतो . आपल्याकडील अनेक  प्रदुषणा पैकी सर्वात महत्वाचे आणि आवर न घालता येणारे प्रदूषण म्हणजे “ ध्वनी प्रदूषण ”. शहरात तर गाड्यांच्या होर्न चे प्रदूषण प्रमाणाबाहेर आहे.

स्वयपाकघरात काम करत असताना हातातून साणशी जरी खाली पडली तरी तिचा आवाज सहन होत नाही. घरात TV सुद्धा मोठा झाला तर घरातील मोठ्या मंडळींचे डोळे मोठे होतात . अर्थात बरेचदा काही जेष्ठ मंडळीना कमी ऐकायला येते त्यामुळे तेच TV मोठा ठेवतात हा अपवाद असू शकतो . घराबाहेर पडले कि ध्वनीचे, आवाजाचे साम्राज्य सुरु होते .वाहने , रस्त्यावरील विक्रेते , ट्राफिक , रिक्षावाले , भाजी मंडई .न संपणारी यादी आहे. ट्रेन मध्ये तर आम्ही बायका इतके बोलत असतो जसे काही नाही बोललो तर आम्हास TC येवून दंड ठोठावेल. गप्प राहणे ,कमी बोलणे आणि कधी काय बोलणे किंवा न बोलणे हे सर्व ज्याला जमले तो जिंकला .उदाहरण द्यायचे झाले तर. हळदीकुंकू किंवा इतर कुठल्याही ठिकाणी समारंभास अनुपस्थित व्यक्तीबद्दल बरीच चर्चा रंगलेली असते ,पण सगळेच त्यात भाग नाही घेत . सगळे सगळ्यांना माहित असते पण काही गप्प राहून “ मी त्यातला नाहीच ” असे राहून “ काय सांगता ?” असा प्रश्नार्थिक चेहरा ठेवून त्यातून सहज निसटतात . सगळ्यात राहून आपला रंग वेगळा हे त्यांना जमते. सोसायटीच्या मिटिंगला तेच .नेहमीची ४-५ डोकीच बोलणार आणि बाकीचे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून  स्थितप्रद्न्य अवस्थेत श्रोत्याची भूमिका बेमालूनपणे निभावणार आणि कुठलाही वाईटपणा घेणार नाही . हेच चित्र सर्वत्र असते. तर हे सर्व असे आहे .

सारांश सतत कानावर पडणारा हा आवाज,ध्वनी अनेक आजार निर्माण करणारा असतो. सर्वात मोठा आजार म्हणजे डोकेदुखी. कुठेतरी शांत ठिकाणी निघून जावेस वाटतंय अशी वाक्य म्हणूनच ऐकायला मिळतात . 

असो विषयांतर नको. आपल्याला २ मीन सुद्धा मौन पाळता येत नाही मग आपले ऋषीमुनी कसे वर्षानुवर्ष मौन पाळून जप ,साधना करत असत याचा विचार करुया . मौन पाळण्याचे अनेक फायदे आहेत. कमी बोलण्याने आपण आपली शक्ती वाचवतो. बोलण्याचा वेळ विचार करण्यात सत्कारणी लागल्या मुळे आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतात . आपल्या उतावळ्या स्वभावावर थोडा धरबंद येतो. कमी आणि चुकीचे बोलणे टाळल्यामुळे माणसे कमी दुखावली जातात . मौनव्रताचा फायदा म्हणजे आपण आपल्याच विश्वात रममाण असतो ते जरा बाहेर येवून दुसर्याचा विचार करायला शिकतो .मन शांत होते , अनेक गुंते सुटतात, मार्ग सापडतात आणि जीवन सुखकर होते. सतत चालू असणार्या जिभेस आराम मिळतो.व्यर्थ जाणारी शक्ती सत्कारणी लावता येते .

खरतर आपल्या भावना सांगण्यासाठी  नेहमीच शब्दांची गरज नसते . एकदा माधवराव पेशव्यांच्या मातोश्रींनी रमाबाईना सांगितले ,” आपण स्त्रिया नुसत्या वाट पाहत असतो नाहीतर टिपे गाळत असतो. सर्वाना आपल्या डोळ्याच्या धाकात ठेवायला शिकले पाहिजे. ” डोळ्यांनी बोलण्याचे कसब आपल्याला जमले पाहिजे .खरतर ती कला आपल्याला उपजतच आहे फक्त त्याचा वापर अधिकांश रित्या केला पाहिजे. अनेक ज्योतिषाना हि कला अवगत असणारच कारण त्यांच्याकडे येणारा जातकास काय बोलू आणि काय नको असे होवून गेलेले असते ,प्रश्नांची सरबत्ती त्यामुळे आपोआपच मौनव्रताची साधना घडत असते.

मौन ज्याला जमले तो आयुष्याची लढाई जिंकला . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . चला “ श्रावणमास ” सुरूच आहे . सुरवात करुया “मौनव्रतास ”.

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

antarnad18@gmail.com


Sunday, 4 August 2019

“ शाश्वत आनंद ”

|| श्री स्वामी समर्थ ||


                          


आयुष्यात जसे योग्य आचारविचार , वागणे ,सामाजिक बांधिलकी अनेक गोष्टींचा सुयोग्य मेळ घालायला लागतो, अगदी तसेच त्याहीपेक्षा जास्ती आपल्या आरोग्याचा विचार करायला लागतो . ह्या सर्वाची एकत्रित होड बांधण्याची सुवर्णसंधी म्हणजे चातुर्मास . परमेश्वरी आराधना ,साधना ,व्रत, नामस्मरण करण्यासाठी चातुर्मासाच अतिमहत्त्वाचा .

हिंदू संस्कृतीत श्रावण मासास पवित्र मानले गेले आहे . उन्हाळा संपून सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे तप्त झालेली धरणी शांत होते आणि सृष्टीही विविध रंगानी कात टाकल्यासारखी फुलते .हे संपूर्ण वातावरण अध्यात्मिक साधनेस ,उपासनेस परिपूर्ण ,पोषक असेच असते . ह्या काळात सिंहावलोकन करून आपले गुणदोष स्वीकारूया आणि त्या दोषांचे परिमार्जन करुया . त्यासाठी परमेश्वरी आराधना ,भक्ती ह्यासारखा नामी आणि जालीम उपाय दुसरा नाही. सेवेअंती आपलीच आपल्याशी नव्याने भेट होईल हे नक्की.

यथासांग पूजन

ह्या उपासनेतून आपल्याला देणगी मिळेल ती “संयमाची ” . आयुष्यात जो संयम ठेवतो तोच जिंकतो .आयुष्यात अनेक चढ उतार ,नानाविध प्रलोभने येतात पण मनावर ,इंद्रियांवर ,आणि मुखत्वे जिभेवर जो संयम मिळवतो तो निश्चितच निरोगी आयुष्य जगू शकतो. चातुर्मासात अनेक लोक नानाविध संकल्प करतात .आपल्याला प्रिय असलेल्या भगवंतासाठी अनेक व्रतेही करतात .आपणही एखादा संकल्प नक्कीच करा पण तो दुसरे करतात म्हणून नाही तर स्वतःच्या मानस पटले तर आणि तरच आपण जे व्रत ,संकल्प करणार आहोत ते मनोभावे ,मनापासून केला तर फळ नक्कीच मिळणार पण त्याचबरोबर मी हे केले आणि ते केले ह्याची  वाच्यताही न करणे महत्वाचे . आपल्या आराध्यावर आपण संकल्प करून जणू काही उपकारच करत आहोत असा भाव जराही येवू देवू नये . मनी योजलेला संकल्प पूर्णत्वास नेण्याची विनंती, आर्जव भगवंतास करून संकल्प करावा . शेवटी आपला “ मी ” घातकच नाही का?
नामस्मरण 


आपली अध्यात्मिक प्रगती व्हावी , विचारांची बैठक नीट बसावी ,मन शांत व्हावे आणि शरीर आणि मनाची योग्य सांगड घालता यावी ह्यासाठी आपल्या जीवनशैलीत चपलख बसेल  झेपेल ,रुचेल आणि पटेल असा संकल्प केलात तर तो नक्कीच पूर्णत्वाला जायील.उगीचच कुणीतरी दुसरा करतो म्हणून मी रोज एक हजार जप करीन असे अजिबात करू नये .                                                         
चातुर्मासात आपल्या इष्ट देवेतेसाठी एखादा आवडीचा पदार्थ सोडवा किवा त्याचेच दान करावे ,ह्यातून आपण सोडून द्यायला शिकतो . काहीजण एक वेळेस जेवतात तर काही एकदा जेवून संध्याकाळी फलाहार घेतात . आपल्या प्रकृतीस जे झेपेल तेच करावे . सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी आणि आवश्यक तेव्हडेच बोलावे म्हणजे आपले जास्तीतजास्त लक्ष ध्यानाकडे, नामस्मरणा मध्ये केंद्रित होते. कमीतकमी बोलण्याने बोलण्यावरही नियंत्रण येते ,कुणाची निंदा अपशब्द आपोआपच टाळले जातात . सूर्यनमस्कार घालूनच दिवसाची सुरवात करावी .आजकाल आपल्या जीवन पद्धतीला हे मानवणारे नाही तरीही प्रयत्न करून एखादा दिवस मौनव्रत करावे आणि अनुभव नक्कीच शेअर करावा.  हॉटेल आणि मॉल मध्ये जेवणे आपले नित्याचेच झाले आहे त्याला पूर्णविराम देता आला तर उत्तमच कारण अशक्य काहीच नाही . आपली स्वतःची कामे स्वतःच करावी जसे आपले जेवणाचे ताट धुवून ठेवणे, कपडे धुणे ,घरातील  इतर कामे जी आपण इतरवेळी  नाही करत .काहीतरी दानधर्म करावा. 

सात्विकता


काही वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडता येत नाही मग त्यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीस किंवा गरजूस दर सोमवारी साखर किंवा धान्य दान करावे हे ,निसर्गाचेही देणे लागतो आपण त्याची जपणूक करणे हेही आपले कर्तव्यच आहे म्हणून तुळशीच्या रोपाचे दान करावे. एक उदाहरण झाले तत्सम काहीही करावे जे आपल्याला सुचेल. एखाद्या गरजू व्यक्तीस एकवेळचे तरी भोजन, शिधा द्यावा . एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणास मदत करणे हे तर पुण्याचेच काम. शक्यतो जेवणाच्या वेळा पाळाव्यात आणि अर्थातच सात्विक आहार घ्यावा. कुटुंबातील सर्वांनी दिवसातून एकवेळचे जेवण एकत्र करावे त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार होवून भावनिक बंध घट्ट होतात. आपल्या एखाद्या माहेरवाशिणीस आवर्जून जेवायला बोलवावे ,त्यानिम्मित्ताने तिला माहेरी येत येयील. नाहीतर हल्ली माहेर आणि सासर एकाच शहरात ,त्यात सर्वांच्या नोकर्या अगदी व्यस्त आयुष्य त्यामुळे येणेजाणे कमीच होते .कुणाचीही निंदा करायची नाही ह्याची मनात खुणगाठ बांधायची.

ग्रंथाचे पारायण

श्रावण महिन्यात जास्तीतजास्त “ श्रवण ” करावे. कानावर सतत काहीतरी चांगले विचार पडावेत ज्याचे चिंतन ,मनन व्हावे. त्यासाठी कीर्तन , भजन ,प्रवचन ऐकण्याची संधी सोडू नये . रोज आपल्या मनात असते पण ते प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी म्हणजे रोज चालणे ,धावणे ह्या गोष्टीना सुरवात करावी आणि त्यात सातत्य ठेवावे. तात्पर्य काय तर एखाद्या अश्या गोष्टीस सुरवात करावी जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणील. नामस्मरणाने परमेश्वरा समीप जाता येते आणि ईश्वरी कृपेची प्राप्त होईल. कुठल्यातरी धार्मिक ग्रंथाचे जसे  “ गुरुचरित्र ”, “ श्री साई चरित्र ”, “ श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथांचे पारायण करावे.  सामुदायिक उपासनेस सुद्धा महत्व आहे त्यामुळे एकत्र येवून चक्रीपारायण करावे. आपल्या कुलस्वामिनीचा जप करून ,श्रीसूक्त म्हणावे . अनेकजण ह्या काळात नर्मदा परीक्रमाही करतात .वरील नमूद केलेल्या गोष्टींपैकी किमान एखादीतरी गोष्ट करून शाश्वत आनंदाची दालने खुली करावीत. ह्याहीपेक्षा आपल्याला काही चांगले सुचले तर तेही आचरणात आणावे. जे कराल त्यात सातत्य असावे.

थोडक्यात काय तर समर्पण म्हणजेच “चातुर्मास ”. 



लेख आवडला तर जरूर अभिप्राय कळवा.


antarnad18@gmail.com





Thursday, 17 January 2019

अंतर्बाह्य अनुभूती

|| श्री स्वामी समर्थ ||

   




                मंडळी ,आजचा आपला विषय “ध्यान ,योगाभ्यास " हा सर्वपरिचित आणि बहुचर्चित असला तरीही त्याचा गाभा खूपच खोल आहे. ह्या लेखाद्वारे त्यातील काही भाग जाणून घ्यायचा हा लहानसा प्रयत्न.

                आज आपले आयुष्य घड्याळ्याशी बांधले गेले आहे .रोजची कामे करतानाच जीव मेटाकुटीला येतो मग व्यायाम ,योगासने करायला वेळ आणायचं तरी कुठून असा प्रश्न आपल्याला नवीन नाही.आज मनःशांती, अनेक व्याधींवर योगाचा उपयोग होताना दिसून येतो आहे. त्यामुळे योगाचा प्रसारही तितक्याच जोमाने भारतातच नाही तर अखंड विश्वात होतो आहे. भारताबाहेरील अनेक देशातून विद्यार्थी “योग” ह्या विषयाचा भारतात येवून अभ्यास करत आहेत मग आपणही ह्यास वंचित का राहायचे?

             मंडळी ,योगमहर्षी पातंजली ह्यांनी २२०० वर्षापूर्वी ह्या विषयावरील सर्वात पहिला ग्रंथ लिहिला. ह्या विषयावरील सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आज योग विद्या निकेतन चे सर्वांचे लाडके सर श्री मुकुंद वासुदेव बेडेकर यांच्याशी सुसंवाद साधला. 1995 सालापासून ते ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. योगाचार्य श्री. निंबाळकर ह्यांच्याकडे त्यांनी ह्याचे प्राथमिक धडे गिरवले.

श्री. मुकुंद वासुदेव बेडेकर सर
              योगासनाचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते विषद करताना सर म्हणाले कि व्यायामाचा संबंध हा केवळ शरीराशी आहे पण योगाचा संबंध हा शरीर आणि मन ह्या दोघांशीही आहे. योगामुळे मनाचे शुद्धीकरण होते ,मनाची एक बैठक तयार होवून वारंवार विचलित होणारे मन एकाग्र होण्यास मदत होते.
योगाभ्यासाने मन स्थिर होते आणि व्यसनांवर हि मात करता येते.योगासनाचे बीज जनमानसात रोवण्यासाठी सरांनी २००५ मध्ये प्राणायामाची ओळख करून देणारे खास वर्ग सुरु केले ज्याला उदंड प्रतिसादही मिळाला. ह्या वर्गास ६५ वयाच्या वरील लोकांनी सर्वात जास्ती प्रतिसाद दिला. Meditation आणि योगातील फरक काय ह्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगताना दिवसाची सुरवात सर्वांगसुंदर व्यायामाने म्हणजेच सूर्य नमस्काराने करावी हेही नमूद केले.

                  योगाभ्यास करताना शरीरातील Anatomy चे ज्ञान असणे तितकेच गरजेचे आहे. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे काय तर पाठीचा कणा आणि तो सुधृढ ठेवण्यासाठी हस्तपादासन , धनुरासन,परिवर्तीत चक्रासन ,वक्रासन ,ताडासन आणि सर्वांगासन हि आसने नित्य करावीत..कपालभाती ह्या आसनाने पचनक्रिया सुधारते त्यामुळे तेही रोज केले पाहिजे. आपल्या शरीरात ७२००० नाड्या आहेत आणि त्यातील मुख्य ३ म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या होत. नाडी म्हणजे काय ते आधी समजून घेवूया .नाडी म्हणजेच नलिका जी आपल्या शरीरातील प्राणशक्ती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेते .ह्या नाड्या जेव्हा आतून ब्लॉक होतात तेव्हा आपण आजारी पडतो ,त्या आतून मोकळ्या राहण्यासाठी प्राणवायू योग्य प्रकारे फिरता राहण्यासाठी अनुलोम विलोम हे प्राणायाम अतिशय प्रभावशाली आहे मानले गेले आहे . नियमित योगाभ्यासाने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. 


                              “शरीरातील चक्रे” हा विषयही अभ्यासक्रमात असल्याने त्याविषयी आपण काही सांगावे अशी विनंती मी त्यांना केली. ह्या चक्रांना Power Centers म्हणूनही संबोधले जाते. मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्याच ह्या चक्रांमधेही असतात.ह्यातील ५ चक्रे हि पाठीच्या कण्यात ६ वे दोन्ही भुवयांमध्ये आणि ७ वे टाळूच्या ठिकाणी असते.कमळाचे फुल हे ह्या चक्रांचे बोधचिन्ह  असून प्रत्येक चक्राला विशिष्ठ पाकळ्या दिल्या आहेत .
"मूलाधार चक्र" पाठीच्या कण्याच्या टोकाशी असते . हे शक्तिस्थान समजले जाते आणि  तांबडा रंगाच्या कमळाच्या ४ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर ते जागृत होते. त्याच्यावर २ इंचावर sex organs च्या मागे पाठीच्या कण्यात असते ते "स्वाधिष्ठान चक्र" ज्याकडे मलमूत्र विसर्जनाचा कंट्रोल असतो .नारिंगी रंगाच्या ६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते.बेंबीच्या मागील बाजूस कण्यात "मणिपूर चक्र" आहे .ह्या चक्राचा पोटातील स्वादुपिंड ,लिव्हर,लहान आणि मोठे आतडे ह्यावर कंट्रोल असतो .पिवळ्या रंगाच्या १० पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या तर हे चक्र जागृत होते.

                 आपल्या हृदयाच्या मागे असते ते अनाहत चक्र. दोन वस्तू एकमेकांवर आपटल्यावर जो ध्वनी निर्माण होतो त्यास संस्कृत मध्ये “आहत” म्हणतात .पण इथे दोन वस्तू एकमेकांवर आपटत नसूनही “ ठक ठक ” असा आवाज ऐकू येतो म्हणून त्यात “अनाहत चक्र " म्हणून संबोधले जाते.हिरव्या रंगाच्या १२ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. आणि म्हणूनच Operation करताना सर्वत्र हिरव्या रंगाचा उपयोग करतात जसे डॉक्टरांचा मास्क ,तेथील पडदे ई. त्यानंतर येते ते “विशुद्धी चक्र” जे आपल्या घश्याच्या मागील बाजूस असते आणि त्याचा कंट्रोल “Endocrine , Thyroid , Parathyroid glands ” वरती असतो ज्याच्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया ज्याला आपण Metabolism  म्हणतो व्यवस्थित पार पडतात .आकाशी निळ्या रंगाच्या १६ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. वरील उल्लेखलेली ५ चक्रे पाठीच्या कण्यात असतात. ६ वे चक्र “ आज्ञा चक्र " हे दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच शंकराचा तिसरा डोळा म्हणतो त्या जागेवर असते. पारवा म्हणजे Ash रंगाच्या २ पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते, ह्याचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे.

मंडळी ,वर उल्लेखलेल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या नाड्या मूलाधार चक्रापासून सुरु होवून प्रत्येक चक्राशी एकत्र येतात..इडा हि नाडी शरीराच्या डाव्या भागातून, पिंगला हि उजव्या आणि सुषुम्ना हि पाठीच्या कण्यातून वरती येते. ह्या सर्व नाड्या आज्ञा चक्राशी येवून थांबतात आणि फक्त सुषुम्ना हि नाडी पुढे टाळूपर्यंत जाते जिथे असते “सहस्रार चक्र”. जांभळ्या रंगाच्या हजार पाकळ्या डोळ्यासमोर आणल्या कि हे चक्र जागृत होते. हे चक्र हा मेंदूचाच एक भाग असून ते आपले संपूर्ण शरीर कंट्रोल करते. आपल्याला जे अतिंद्रिय ज्ञान मिळते ते ह्याच चक्रातून. मंडळी हि चक्रे रोजच्या नित्य सरावाने ध्यानाने जागृत होतात. योगासनामध्ये गरज असते ती संयमाची आणि एकाग्रतेची.
              
                बरेचदा गल्लत होते ती प्राणधारणा आणि ध्यानधारणा ह्यात. आपल्या शरीरात ५ प्राण आहेत. प्राण, अपान ,व्यान, समान, उदान. हे ५ प्राण ज्याला आपण पंचप्राण म्हणतो .ते आहेत तोवर आपण जिवंत आहोत.हे शरीरात वायुरूप अवस्थेत असतात. हे शरीरात राहण्यासाठी ३ गोष्टींची प्रामुख्याने गरज असते ती म्हणजे पाणी ,अन्न आणि Oxygen. काही क्षण जरी आपल्या शरीरास श्वास बंद झाला तर Oxygen मिळत नाही. ह्या Oxygen मधेच प्राण आहे म्हणून त्यावर मन एकाग्र करणे म्हणजेच “प्राणधारण


कुठल्यातरी Object किंवा आपल्या आराध्याच्या चित्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करणे म्हणजे ध्यान करणे. ध्यानाने आपल्या शरीरातील ७ चक्रे जागृत होत जातात  आणि आपल्याला अंतर्बाह्य अनुभूती प्राप्त होते. मूलाधार चक्राशी निर्दिस्त अवस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती हि प्रयत्नांतीच जागृत होते आणि त्याला नित्य साधनेची गरज असते .ध्यानधारणा करताना काही दिवस पहिल्या चक्रावर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करावे .कालांतराने ते जागृत होते आहे हे जाणवले कि मग पुढील चक्राकडे वळावे . ध्यानधारणा ,योगासने हि आपल्या मनाने किंवा पुस्तके वाचून न करता योग्य शिक्षकाकडून शिकून घेणे चांगले. योगासने ,ध्यान करताना शरीरावर आणि मनावर कुठलाही ताण असू नये ,मन शांत असले पाहिजे. योगासने हि उरकून टाकण्याची गोष्ट नाही. ती शांतपणे ,संथ ,लयबद्ध असली पाहिजेत ,हालचालीत सुसूत्रता आणि मोहकता असली पाहिजे तरच त्याचा योग्य परिणाम अपेक्षित आहे.

शरीरातील ७ चक्रे

      मंडळी, प्रातः समयी उठून योगासानासाठी काही वेळ दिला तर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित राहील ह्यात वादच नाही .आजकाल आपल्या बिघडलेल्या जीवनपद्धतीमुळे सर्व वयाच्या लोकांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे “ मधुमेह”. आपल्या शरीरातील स्वादुपिंडातील बीटासेल इन्शुलीन ची निर्मिती करतात आणि ते पुरेसे तयार झाले नाही तर “मधुमेह” होतो. कपालभाती च्या नियमित सरावाने बीटासेल ची निर्मिती होवून मधुमेह टाळता येवू शकतो ,तसेच आपल्या शरीरातील Joints मधेही काही प्रमाणत इन्शुलीन तयार होते त्यामुळे नियमित व्यायाम , चालणे ह्यामुळे हे सर्व आजार आटोक्यात आणता येतात.

                  शास्त्रात आरोग्याची पंचसूत्री सांगितलेली आहे ती म्हणजे आनुवंशिकता , आहार, विहार ,विश्रांती , वातावरण. अनुवांशिकता आणि वातावरण हे आपल्या सर्वार्थाने हातात नाहीत पण आहार ,विहार आणि विश्रांती आपल्या नक्कीच हातात आहे. अत्यंत सात्विक ,परिपूर्ण पोषक असा आहार घेणे, दिवसभरातील सर्व क्रिया करताना निदान काही वेळ व्यायामास आणि स्वतःसाठी देणे म्हणजेच विहार आणि निदान ६ ते ८ तास पुरेशी झोप घेणे हे केले तर आपले आरोग्य उत्तम राहायला नक्कीच मदत होते. योगसाधनेच्या रोजच्या सरावामुळे बुद्धी एकाग्र होते ,प्रत्येक काम कुशलतेने होते हे सांगताना सर म्हणले कि प्रत्येकाने अगदी लहानपणापासून योगाला आपल्या जीवनात महत्व दिले पाहिजे.ह्यामुळे आपले आयुष्य संतुलित राहते.

                     सरांची इतक्या वर्षाची साधना म्हणजे एक तपस्याच आहे. प्रचंड ज्ञानाचा जणू सागरच आहेत. आज त्यांच्याशी भेटून अमुल्य अश्या ज्ञानाचा लाभ झाला जो ह्या लेखाद्वारे आपल्यासर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.


                तर सारांश असा कि आपल्याला विधात्याने दिलेले हे सुंदर आयुष्य जर अखेरपर्यंत आनंदात जगायचे असेल तर आपली तब्येत उत्तम असणेही तितकेच गरजेचे आहे, आयुष्याची सुरवात जितकी आनंदात तितकीच आयुष्याची संध्याकाळ सुद्धा त्याहीपेक्षा आनंदात, शांततेत जावी ह्यासाठी आपल्याला योगाभ्यास नक्कीच उपयुक्त ठरतो. चालातर मग आजपासूनच साधनेस सुरवात करुया ..शुभस्य शीघ्रम.

लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा
antarnad18@gmail.com