Showing posts with label सणवार. Show all posts
Showing posts with label सणवार. Show all posts

Sunday, 16 August 2020

गणरायासोबत देऊया करोनाविरुद्ध लढा


||श्री स्वामी समर्थ ||

चरणी ठेवितो माथा

भाद्रपद शु. चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. गणपती हे हिंदूंचे आराध्य दैवत असून ते सर्वांच्याच मनावर अधिराज्य करते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे ११ दिवस तनमन धनाने आपण श्रीं गणेशाची विविध प्रकारे आराधना करतो. गणेशाच्या मूर्तीची मनोभावे प्रतिष्ठापना करून त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. गणपतीला मोदक फार प्रिय असल्याने त्याला मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीची आरास करण्यासाठी घरातील बच्चे कंपनीला वेळ अपुराच पडतो. एकंदरीतच बाप्पाच्या येण्याने वातावरण आनंदी होते. पुणे मुंबई सारख्या शहरात गणपतीच्या मोठ्या मूर्ती आणि डोळे दिपवणारी आरास असलेला विलोभनीय सोहळा  पाहायला लाखो भाविकांची हजेरी लागते.

ह्या वर्षी म्हणजे 2020 ह्या गणेशोत्सवावर सावट आहे ते कोरोनाचे. संपूर्ण जगाला विळखा घालून होत्याचे नव्हते करणाऱ्या ह्या विषाणूने आपल्याला गेले कित्येक महिने घरात बंदिस्त करून ठेवले आहे. गणेश चतुर्थीचा देखणा सोहळा अगदी ४ दिवसांवर आला आहे ,पण एकंदरीतच बाह्य परिस्थितीमुळे दर वर्षीच्या उत्चाहावर थोडे विरजण पडले आहे, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागताच रस्ते विविध प्रकारच्या सजावटीच्या ,पूजेच्या वस्तूंनी गजबजू लागतात. फुल मार्केट मध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. मिठायीच्या ,पूजेच्या सामानाच्या दुकानात वर्दळ वाढू लागते. पण आज तितके रम्य चित्र नाही.


संपूर्ण जगावरील करोनाच्या संकटाने उद्योगधंद्यांची चक्रे थांबली आहेत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत lifeline म्हंटली जाणारी रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे . अर्थचक्रावर परिणाम झाल्याने कित्येकांच्या नोकर्या गेल्या आहेत तर कित्येक जण अर्ध्या वेतनावर काम करत आहेत . हातावर पोट असणार्यांचे तर हाल सहन होण्यापलीकडचे आहेत. कधीही कुणी विचारही केला नसेल अशी परिस्थिती उद्भवल्याने प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. अनेकांनी हा धक्का न पचवता आल्याने आत्महत्याही केल्या आहेत . ह्या विषाणूने अनेकांचा बळी घेतला आणि कुटुंबे उध्वस्त झाली. हळूहळू आपण ह्या परिस्थितीशी दोन हात करत बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न करत असलो तरी ह्या सर्वातून बाहेर यायला आपल्याला बराच अवधी लागणार आहे. अश्या ह्या पार्श्वभूमीवर गणरायांचे आगमन होत आहे. आपण सर्वजण विघ्नहर्ता ह्यातून आपल्या सर्वाना बाहेर काढेल हा विश्वास मनी बाळगून आहोतच आणि म्हणूनच ह्याही स्थितीत प्रत्येक जण मोरयाच्या स्वागतास सज्ज होत आहे .

खर सांगू का? आपला प्रत्येक दिवसही पूर्ण चांगला किंवा वाईट नसतो. आपण रोज पूजा करतो तेव्हा क्षणभर तरी आपल्याला प्रसन्न वाटते, देवघरातील दिव्यासमोर उभे राहिले कि शांत वाटते ,आत्मविश्वास येतो अगदी तसेच मयूरेश्वराच्या आगमनाने आपल्यातील जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत ,सगळ काही आता पूर्ववत होयील हा आशेचा किरण घेवूनच जणू हा सिद्धिविनायक येत आहे.


आज आपल्याला हा उत्सव साजरा करताना ,सरकारने आपल्या सुरक्षिततेसाठी घातलेल्या अनेक बंधनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. प्रामुख्याने जिथे सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे तिथे तर काटेकोर पणे नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या २ क्षणांच्या आनंदासाठी नियमांचे उल्लंघन केले ,परिस्थितीचे तारतम्य बाळगले नाही तर पुढील स्थिती आत्ताच्या पेक्षा भयंकर होवू शकते ह्याचे भान असायलाच हवे  .गणपतीची आरास आपण दरवर्षीच करतो पण ह्यावर्षी अगदी साध्या सोप्प्या पद्धतीने घरातच आरास करुया .गणरायाला फुलेही हवीत मान्य आहे, पण त्यासाठी सर्व नियम तोडून आपण फुल मार्केट ,पूजेच्या दुकानात गर्दी केली तर ती प्रत्यक्ष बाप्पालाही आवडणार नाही.

आपल्यावरील करोनाचे संकट पूर्णतः निश्चितच टळलेले नाही त्यामुळे हा ११ दिवसाचा सोहळा साजरा करताना कुठल्याही गोष्टीचे भान सोडून चालणार नाही. आज मुंबईसारख्या शहरात ट्रेन बंद आहेत त्यामुळे रस्त्यावरील ट्राफिक प्रमाणाबाहेर वाढला आहे. अश्या स्थितीत आपल्या नातेवाईक ,मित्रमंडळींकडे जाण्याचा अट्टाहास आपण थोडाकाळ बाजूला ठेवला पाहिजे. घराबाहेर कमीतकमी पडून गर्दी टाळणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. बाहेरील परिस्थिती संवेदनाशील असली तरी आपण सर्वच ती सुज्ञपणे हाताळू ह्यात दुमत नाही.

आपण शरीराने कुठेही गेलो नाही तरी घरात बसून गणपतीची सेवा श्री गणेश स्तोत्र ,अथर्वशीर्षाचे पारायण ,गणपतीचा जप अश्या सर्व माध्यमातून करू शकतो .शेवटी श्रद्धा महत्वाची. जास्तीतजास्त गणेश उपासना आपल्या वास्तूत केली तर ती आपल्या वास्तूलाही लाभेल.

आपल्या घरातील देव्हार्यात असलेल्या श्रीगणेश मूर्तीची पूजा , अभिषेक ,महानेवेद्य करून गणपती उपासना केली तर ती अधिक फलदायी ठरेल. ह्या वर्षी कदाचित खूप मोठी वाजतगाजत मिरवणूक निघणार नाही , ढोलताशांच्या आवाजात बाळगोपाळांचा जल्लोष होणार नाही पण आपण ठेवलेला संयम, शिस्त ,करोनाविरुद्धचा लढा , आपल्या असंख्य पोलिसांनी दिलेली प्राणांची आहुती , आपल्या डॉक्टर ,नर्सेस आणि सर्वच मेडिकल क्षेत्रातील लोकांनी “करोना ” नामक यशस्वीरीत्या पेललेले शिवधनुष्य गणरायाला मनापासून आवडेल. माणसाने माणसातील माणुसकी जीवन ठेवल्याचा हा केव्हडा मोठा दाखला आहे आणि तो पाहून आपल्या असंख्य भक्तांवर गणराज आपली कृपादृष्टी टाकेल आणि करोना सोबतच्या लढ्यात आपल्यासोबत उभा ठाकेल हे नक्की.



आजची हि स्थिती कायम थोडीच राहणार आहे ? हेही दिवस जातील . पुढे कित्येक गणेशोत्सव येतील आणि ह्यावर्षीची सर्व उणीव आपण पुढील वर्षी भरून काढू. पण ह्यावर्षी गरज आहे ती संयमाची , गणरायावरील आपल्या असीम भक्तीची. गणेशावरील भक्तीचा ह्या वर्षी अगदी कस लागणार आहे. त्यामुळे कुठेही दर्शनासाठी ,खरेदीसाठी गर्दी करू नका ,सगळ्यांना सर्व मिळणार आहे पण नियमांचे उल्लंघन कदापि नको . हा सोहळा ह्याही परिस्थितीत तितक्याच दिमाखात , विलोभनीय साजरा करणे हे आपल्या सर्वांसमोर खरेखुरे आव्हान आहे आणि तीच गणरायाची खरीखुरी पूजाहि आहे.

गणेशभक्तांसाठी गणरायाचे आगमन , प्रतिष्ठापना ,सजावट , षोडशोपचार पूजा ,नेवैद्य ,आरती ह्या हृदयाच्या समीप असणार्या गोष्टी आहेत .त्या होणारच ,फक्त ह्या वर्षी त्या आपल्या वास्तू पुरत्या मर्यादित राहणार आहेत इतकच . आपण ह्याचे कुठल्याही स्थितीत उल्लंघन केले तर आपल्याला बुद्धी देणाऱ्या ह्या विघ्नहर्त्या ,बुद्धीच्या देवतेस म्हणजेच गणपती बाप्पासही ते आवडणार नाही.
परिस्थिती काहीही असो पण आपल्याला लंबोदरा विषयी वाटणारे प्रेम, श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. आपली श्रद्धा , मनापासून केलेली पूजा आणि भक्तीमुळेच बाप्पा प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देवून ,ह्या करोना महामारीचा समूळ नाश करील हा विश्वास प्रत्येक भक्ताने मनात अभेद्य ठेवला पाहिजे.

हिंदू संस्कृतीत सणावारांची रेलचेल आहे आणि प्रत्येक सण नेहमीच काहीतरी शिकवण देवून जात असतो . असाच हा अमंगलाचा नाश करून सर्वत्र मंगल करणारा ,आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारा विघ्नहर्ता आपल्याला आशेचा किरण दाखवेल ह्यात शंकाच नाही. नुसत्या त्याच्या आगमनाची चाहूल सुद्धा आपल्याला पुनर्जीवित करत आहे. ह्याही परीस्थितीत आपण ह्या महागणपतीचे जमेल तसे श्रद्धेने ,प्रेमाने स्वागत करत आहोत. आपला हा भक्तीचा सोहळा पाहून बाप्पा त्याचा वरदहस्त आपल्यावर ठेवणारच.

चला तर मग गणेशाच्या आगमनास सारेजण सज्ज होऊया , उभ्या ११ दिवसाच्या ह्या सोहळ्यात मनापासून त्याच्या सेवेत रुजू होऊया आणि एका नवीन युगाची सुरवात करुया. समाज आणि पुढील पिढ्यांसमोर एक चांगला गणेशभक्त कसा असतो ह्याचा एक उत्तम आदर्श ठेवूया .

“अंतर्नाद ” च्या सर्व वाचकांना श्री गणेशचतुर्थी च्या मनापासून शुभेछ्या . विघ्नहर्ता सर्व विघ्ने दूर करून सर्वाना सुबुद्धी , आरोग्य ,यश देवुदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना  .गणराज आपल्या भोळ्या भक्तीचा भुकेला आहे. भक्तांच्या हाकेला धवून येणारा आहे, तो आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करेल हा विश्वास ठेवा.


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.


Antarnad18@gmail.com


#antarnad #shri ganesh chaturthi #modak #ashtvinayak #vighnharta #aarti #celebration #lord ganesha #ganesh festival
#अंतर्नाद #श्री गणेश चतुर्थी #मोदक #आरास #अष्टविनायक #विघ्नहर्ता #आरती #पूजा #हिंदूंचा सण


Monday, 10 August 2020

गंध श्रावणाचा

||  श्री स्वामी समर्थ ||


इंद्रधनुष्याचे विलोभनीय रंग


निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. निसर्गाचे आपल्याशी अतूट नाते आहे. वसंत, ग्रीष्मात झाडांना नवीन पालवी फुटते आणि वृक्ष डेरेदार होतात कारण ह्याच काळात सूर्यकिरण प्रखर होतात आणि अश्या वेळी हे बहरलेले वृक्ष आपल्याला सावली देतात .तसेच शिशिरात थंडीचा मौसम असल्याने सूर्यकिरणे आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी  कात टाकल्याप्रमाणे झाडांची पाने गळतात. विधात्याने सर्व कसे अचूक केले आहे कुठेही चूक नाही. तर अश्या ह्या श्रावण  मासात निसर्ग मुक्त हस्ताने सौंदर्य उधळत येतो आणि सर्व प्राणीमात्रात नवचैतन्य निर्माण करतो.
उंचावरून होणारा पाण्याचा शिडकावा


श्रावणातील हिरवाई विलक्षण असते ,वसुंधरा नव्या नवरीसारखी अनेकविध रंगात न्हावून तृप्त होते , वृक्षही  बहरून जातात, पक्षांचा किलबिलाट ,हिरवागार गालिचा पांघरलेल्या पर्वतरांगा, त्यात फुललेली विविध रंगांची फुले आणि त्यावर नाचणारी फुलपाखरे ,नुसत्या कल्पनेनेही कवीला काव्य सुचावे. श्रावणातील हा मनमोहक निसर्ग , कोसळणाऱ्या श्रावण सरी , मधूनच चाललेला ऊनपावसाचा लपंडाव ,वातावरणात भरलेला हवाहवासा वाटणारा मातीचा सुगंध , त्यात भर म्हणून मधूनच आपल्या भेटीला येणारे इंद्रधनुष्य.. अहाहा. दर्याखोर्यातून पाऊलवाटातून खळखळणारे पाणी , ओलसर धुके , आपला आब कायम राखून मोठ्या दिमाखात उंचावरून कोसळणारे धबधबे असे  किती आणि काय डोळ्यात साठवायचे.  शहरात नाही पण कोकणातील श्रावणाचे रूप तर खूपच विलोभनीय असते.

विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या कि त्यात डुबकी मारणारी मुले ,पाटाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी शाळकरी मुले , हिरव्यागार शेतात झाडांना झोका बांधून त्यावर झोके घेताना त्यांच्याही नकळत आपल्या पुढील आयुष्याची स्वप्ने मनात रंगवणाऱ्या मुली ह्या सर्व आनंदास शहरातील लोक खरच पारखी होतात . साधना , नामस्मरणासाठी आणि मनाच्या एकाग्रतेसाठी हे वातावरण अत्यंत पोषक.  चातुर्मासातील श्रावण हा खरच मेरुमणी आहे कारण ह्या महिन्यात सणांची नुसती रेलचेल असते पुढे गणपती आणि मग पितृपक्ष ,नवरात्र असल्याने खर्या अर्थाने व्रत वैकल्ये श्रावणातच केली जातात. बहरलेला निसर्ग ,श्रावणसरींचा शिडकावा आणि त्यात अनेक सण घेवून श्रावण दारी उभा ठाकतो. एकंदरीतच काय तर श्रावणातील निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेताना आणि व्रतवैकल्ये करताना आपण पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगू लागतो ,उंचावरून वाहणाऱ्या धबधब्यातील पाण्याचे तुषार अंगावर घेताना तनमन रोमांचित होते आणि मनात जगण्याची उमेदही .

पाण्यात बोटी सोडण्याचा निखळ आनंद
वर्षभर आपल्याकडून काही कारणाने देवाधर्माचे करायचे राहून गेले असेल तर त्याची पूर्तता ह्या महिन्यात संकल्प करून करता येते. श्रावणात सणांची शृंखला सुरु होते . श्रावण सोमवारी शंकराला अर्पण करणारी शिवामूठ ,मंगलागौरी पूजन ,नागपंचमी, बृहस्पती पूजन ,जिवती पूजन,श्रावणी शनिवार ,नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन कृष्णजन्म-गोपाळकाला ,पोळा ,पिठोरी अमावास्या ह्या सर्व सणांना आख्यायिका ,अधिष्ठान लाभले आहे. श्रावणमासास “ सृजनशील ” म्हंटले आहे कारण श्रावण संपला तरी तो आपले  आणि निसर्गाचे अतूट नाते निर्माण करून जातो ,निसर्गही आपल्या सानिध्यात डोलू लागतो आणि अनंत हाताने आपल्याला भरभरून देत राहणाऱ्या ह्या निसर्गाचे संगोपन आपल्यालाच करायचे आहे हा कानमंत्रही देवून जातो .उठसुठ आपण झाडे कापतो , जंगलतोड करतो आणि उभ्या सृष्टीचा ,वातावरणाचा समतोल घालवून बसतो. 


ह्या सृष्टीच्या पंखाखालीच आपले जीवन आनंदी ,सुरक्षित ,सुसह्य होणार आहे हे सांगण्यासाठीच तर विधात्याने श्रावणाची रचना केली असावी . अश्या ह्या परिपूर्ण ,भावपूर्ण आनंदी श्रावणात आपणही व्रत वैकल्ये ,साधना करून मिळवूया ईश्वरीकृपा आणि चिरकाल राहणारा आनंद. 

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
antarnad18@gmail.com


#antarnad #shravan #chanting #nature #spiritual #navratra #pitrupaksh #meditation
#अंतर्नाद #श्रावण #नामस्मरण #जप #निसर्गचक्र #अध्यात्म #नवरात्र #सण #पितृपक्ष #ध्यानधारणा 


Sunday, 2 August 2020

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन


|| श्री स्वामी समर्थ ||


श्रावणातील पौर्णिमा हि “ नारळी पौर्णिमा ” म्हणून सर्वत्र साजरी होते. समुद्र हे उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने समुद्रकिनारी राहणारे आपले कोळी बांधव हा सण खास मोठ्या उत्साहात साजरा करतात. पावसाळ्यात उसळलेला आणि बेभान झालेला समुद्र आपले रौद्ररूप दाखवतो, त्यामुळे कोळी बांधव समुद्रात आपली नाव घालताना थोडे कचरतात .समुद्र शांत व्हावा आणि त्यांच्या बोटी सुखरूप किनारी लागाव्यात म्हणून समुद्रात श्रद्धेने नारळ अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करणे हि प्रथा आहे. ह्यानंतर पावसाचा जोर कमी होवून शांत झालेल्या समुद्रात कोळी बांधव आपली होडी मासेमारीसाठी उतरवतात. ह्या दिवशी घरोघरी करंज्या , नारळाच्या वड्या , नारळी भात असे नारळाचे गोड पदार्थ करून देवाला नेवैद्हाय दाखवून सण साजरा होतो.




रक्षाबंधन हा भाऊबहिणीतील नाजूक आणि विश्वासाचे बंधन उलगडणारा सण. आपल्या लाडक्या भावाला ओवाळून त्याच्याकडून हक्काने ओवाळणी घेण्यासाठी बहिणी अगदी नटूनथटून तयार होतात आणि डोळ्यात प्राण आणून आपल्या भावाची वाट पहात असतात. आयुष्यात काहीही झले, कितीही मोठे संकट आले तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी खंबीर उभा राहणार हा विश्वास दृढ करणारा हा सण.


अंतर्नाद च्या सर्व वाचकांना “ रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या ” मनापासून शुभेछ्या.

अस्मिता


लेख आवडल्यास कॉमेंट सेक्शन किंवा खालील लिंकवर Click करून अभिप्राय द्या.

antarnad18@gmail.com


Monday, 20 July 2020

सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?

||श्री स्वामी समर्थ ||




आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात , चांगल्या, वाईट.आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची.आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते , संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.

सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय.ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते.प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?

सदगुरू कोणावर अनुग्रह करतात , तर ज्याला इच्छा असते त्यावर.ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ? किंवा “डॉक्टर” जरी “आजरी” माणसा कडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर ?
म्हणूनच जो जागा होतो,शरणागत होतो , ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.

अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही.जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा” “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते.आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून,कृपादृष्टीने होऊ शकतो.

हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.त्याची उतराई त्यांची किती हि जन्म सेवा केली तरी हि होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही.ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान , त्याचे जिवन सफल झाले.

सदगुरू हे दिसायला जरी एक देह असले तरी ते देहातीत असतात,”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही.आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वा पर्यंत पोहोचायचे आहे.आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग,किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.

अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे.महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता , त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस , मी तुझे सारथ्य करतो,म्हणजेच दिशा दाखवितो.

अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.

संग्रहित

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


#antarnad #sadhana #spiritual life #yoga #happiness #sadhguru #krishna #saint #anugrah
#अंतर्नाद #साधना #अध्यात्म #अध्यात्मिक प्रगती #आनंद #सद्गुरू #उपासना  #कृष्ण #सत्संग #अनुग्रह

 
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

श्रावण सोहळा

|| श्री स्वामी समर्थ ||




आषाढ अमावस्या झाली कि श्रावण सुरु होतो. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला आहे. बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो आणि हवेत सुखद गारवा असतो. झाडे झुडपे हिरवीगार होवून आपल्याच नादात डोलत असतात . आसमंत आणि संपूर्ण जनजीवन चैतन्यमय होवून जाते. हि उर्जा अध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच ह्या महिन्यात व्रत वैकल्यांची जणू रेलचेल असते. हा श्रावण आबालवृद्ध सर्वांनाच भुरळ पडतो. मातीचा सुगंध ,पानांवरील दव आणि हवेतील सुखद गारवा, मरगळलेल्या मनास उभारी देतो . सृष्टी कात टाकून पुन्हा नव्याने उल्हसित होताना पाहून , कवी मनांना कविता लिहिण्याचे स्फुरण चढले नाही तरच नवल.
श्रावणी सोमवार ,शनिवार विशेष मानले जातात. नवविवाहित मुलींना मंगळागौरी निम्मित्त माहेरी यायची ओढ लागते. पशु पक्षीच काय तर संपूर्ण निसर्ग आनंदाने डोलू लागतो. सृष्टीचा हा अप्रतिम नजरा डोळे भरून पाहणे हे सुख काही औरच असते.

श्रावणातील रिमझिम पाऊस धरणीलाच नव्हे तर मनालाही ओलेचिंब करतो.  थोडक्यात काय तर एक वेगळीच उर्जा घेवून आलेल्या ह्या श्रावण मासाचे सर्वत्र मोठ्या दिमाखात स्वागत होते. मंगलागौरी पूजन , नाग पंचमी , नारळी पौर्णिमा , रक्षाबंधन ,श्रावणी सोमवारची शिवामूठ ,श्रीकृष्ण जयंती , गोपाळकाला ह्या सणांची हजेरी लागते.
महिला वर्गही सणांच्या स्वागतास सज्ज होतो. श्रावणात अनेक व्रते आणि सणांमुळे घरात विविध पक्वान्ने केली जातात आणि त्यामुळे बालगोपाळ मंडळीही खुश असतात . जिभेचे चोचले पुरवणारया  ह्या श्रावणाची सर्वच  आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण लहानथोर सर्वांचाच आहे. घरातील वडिलमंडळी व्रते वैकल्यात मग्न होतात तर बच्चे कंपनी गोपाळकाला येणार म्हणून खुश असतात. शेतकरी वर्ग नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करतो आणि पाऊस चांगला झाला म्हणून सुखावतोही.
आपल्या हिंदू धर्मात सणांची रेलचेल आहे आणि प्रत्येक सणाला होणारे पदार्थही वेगळे आहेत. आज गतिमान झालेल्या जगाने कुटुंबे विभक्त केली आहेत . घड्याळ्याच्या काट्यासोबत बांधलेल्या जीवनात वेळे अभावी  आणि  इच्छा असूनही अनेक गोष्टींचे पालन होवू शकत नाही .काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. पूर्वी एकत्र कुटुंबे होती . स्वयपाक घर जावा , नणंदा, सासू,  ,लेकीसुनांच्या हसण्याने आणि बांगड्यांच्या किणकीणीने भरून गेलेले असायचे .

 माहेरवाशिणींचे कोडकौतुक व्हायचे पण आता एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होत चालली आहेत. त्यामुळे पूर्वीसारखे एकत्र पंक्तीभोजन , पुरणपोळी वर ताव मारणे काळाच्या पडद्याआड गेले आहे .काही घराण्यात  सवाष्णीस गोडधोडाचे  भोजन करून तिची ओटी भरण्याची प्रथा आहे.
श्रावणाची खरी मजा लुटायची तर ती कोकणात.  हिरवागार शेला नेसलेल्या डोंगरदर्या, पाटातून वाहणारे झुळूझुळू पाणी, आल्हाददायक निसर्ग , हवेतील गारवा , सारवलेली जमीन आणि मातीचा सुगंध मन मोहून टाकतो. पाटाच्या पाण्यात कागदी बोटी सोडून आनंद घेणे खरच नशिबी असावे लागते . झाडाच्या
पारंब्याना झोका बांधून गाणी म्हणत  उंचच उंच झोका खेळताना मुलीना आकाश जणू ठेंगणे होते. असा हा श्रावणाचा गंध अनुभवणे आणि त्यात हरवून जाणे ह्याची मजा  ज्याची त्यांनीच अनुभवायची ,हे सर्व शब्दांकित करणे केवळ अशक्य.  गावातील आणि शहरातील जीवनशैली भिन्न असल्याने हि मजा शहरात पाहायला मिळणे विरळाच. केळीच्या पानावरील गरम वरणभात , सुक्या बटाट्याची भाजी, नुकतेच घातलेले कैरीचे लोणचे ,लिंबाची फोड आणि त्यावर साजूक तुपाची धार ,जोडीस कुरडया ,पापड , खीर पुरण आणि आलेमीठ लावलेले ताक हे जेवण म्हणजे खरोखरच स्वर्गसुख. मंगळागौरी पूजन आणि फुगड्या घालत रात्र जागवण्याची मजाही खासच .नागपंचमीला दिंड षष्ठीला पातोळे केले जातात .शिळा सप्तमीला सांदणी ह्या गोड पदार्थासोबत अळूची भाजीही केली जाते.गोकुळाष्टमीला दही, पोहे ,लाह्या एकत्र करून गोपाळकाला केला जातो तर नारळी पौर्णिमेला नारळी bhat , करंज्यांचा खास असा मेनू असतो .श्रावण अमावास्येला म्हणजेच पिठोरीला खीर पुरी केली जाते.अनेक घरातून जिवतीपूजनही केले जाते.आजकाल मुलांना पारंपारिक पदार्थांची नावे सुद्धा माहित नसतात त्यामुळे न्ह्या निम्मित्ताने त्यांचीही तोंड ओळख होते.

ह्या सर्व सणांच्या निम्मित्ताने अनेक पिढ्यातील लोक एकत्र येतात,घरातील स्त्रीवर्गाची दागदागिने घालून मिरवण्याची हौस फिटते , एकमेकांच्या हातचे पदार्थ खायला मिळतात आणि कुटुंबातील एकोपा वाढतो. पुढील पिढीस आपल्या रीतीरिवाजांची ओळख होते , कुटुंबातील नात्यातील वीण घट्ट होते आणि प्रेम वृद्धिंगत होते.
सर्वार्थाने आपल्याला समृद्ध करणारा साजिरा श्रावण आपल्या दरवाज्यावर दस्तक देत आहे.

चलातर मग श्रावणसरी अंगावर घेवून त्याचे स्वागत करुया आणि श्रावणाचा खरा आनंद लुटुया.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर अभिप्राय जरूर द्या.

Antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.
#antarnad #shravan #rain #generations @nagpanchami  #festivals #krishnjanm #family
#अंतर्नाद  #श्रावण #पाऊस #पिढ्या #नापंचमी #रूढी #सणवार #श्रीकृष्णजन्म #कुटुंब #नारळाची वडी




Wednesday, 25 March 2020

गुढी उभारू “ निरोगी आयुष्याची ”

|| श्री स्वामी समर्थ ||








मंडळी नमस्कार ,

भारतीय संस्कृतीत सणांची रेलचेल असते . इंग्रजी नवीन वर्ष सुरु झाले कि संक्रांत , होळी आणि मग अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे “ गुढी पाडवा “. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस अनन्यसाधारण असून अनेक कारणांनी विशेष लक्षवेधी आहे. चैत्र महिना आला कि चाहूल लागते वसंत ऋतूची. साडेतीन मुहूर्तातील हा मुहूर्त असल्याने गुढी उभारून मोठ्या उत्चाहात आणि आनंदमयी वातावरणात हा दिवस साजरा केला जातो.
प्रतिपदेला सूर्योदयानंतर गुढी उभारली जाते . बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कडूलिंबाची, आंब्याची पाने ,फुलांची माळ , रंगीत साखरेच्या गाठ्यांची माळ बांधून त्यावर टोकाला तांब्याचे भांडे उपडे ठेवून गुढी तयार केली जाते. दारात रांगोळी काढून, फुले अक्षता वाहून , गोडधोडाचा नेवैद्य दाखवून, गुढीला ओवाळून पूजा करण्याची प्रथा आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वांगीण प्रगतीचे सूचक म्हणजे हि गुढी. ह्या दिवशी आपले नवीन वर्ष सुरु होत असल्याने सर्व मंगल व्हावे आणि अधिकाधिक यश मिळून आपल्या प्रगतीचा आलेख उंचच उंच जावा ह्याचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभारतो .
ह्यादिवशी सरस्वती पूजन करून पंचांगाची पूजा करावी आणि संवत्सर फलाचे वाचन करावे आणि त्यानंतर कडुलिंबाची चटणी प्राशन करावी अशी प्रथा आहे. ओवा ,हिंग , मीठ ,साखर आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून केलेली हि चटणी आरोग्यदायी असते. आपल्या आहारात गोड ,तिखट ह्यासोबत कडू रसाचाही समावेश असणे आवश्यक आहे. अनेक आयुर्वेदिक गुणांनी संपन्न असा कडुलिंब हा बहुगुणी असून तो पित्तशामक ,थंडावा देणारा , आरोग्य प्रदान करणारा आहे.
मंडळी , गुढी सूचक करते “आनंद ,सौख्य, मांगल्य आणि भरभराट”. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळावे म्हणून गुढी उभारून त्याचे पूजन करण्याचे प्रयोजन. पण ह्या सर्वांच्याही आधी आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे ते आपले आरोग्य.
२०२० च्या अगदी प्राथमिक महिन्यापासून “ Corona Virus ” ने जगभर धुमाकूळ घातला आणि आपल्या सर्वाना सळो कि पळो करून सोडले. ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस “गुढी पाडवा ” साजरा करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे किबहुना क्रमप्राप्त आहे. आज ह्या समस्येतून आपण नक्कीच बाहेर येवू पण अश्यासारखे प्रसंग पुन्हा भविष्यात उद्भवू नयेत म्हणून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे ..निसर्गाचा कोप आपल्याला महागात पडू शकतो .आधुनिकीकरणाच्या नावावर आज टोलेजंग इमारती उभारताना केलेली जंगलतोड आणि प्रवाहाच्या विरुद्ध केलेल्या अश्या अनेक गोष्टीस आपणच जबाबदार आहोत ..निसर्गही आता त्याच्या तंत्राने वागत आहे आणि त्याचे जिवंत उदा. म्हणजे वेळीअवेळी पडणारा पाऊस ... आज निसर्गानेच आपल्याला “स्वच्छतेचा धडा गिरवण्यास भाग पाडले आहे. आजच्या परिस्थितीने नुसतेच आपल्या डोळ्यात अंजन घातले नाही तर त्यात  भविष्यातील घटनांची समर्पक सूचनाही आहे.  स्वच्छता पाळा ” हाच तर संदेश निसर्ग आपल्याला देत नसेल का ह्याचा विचार व्हावा.
आज दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, फक्त मी आणि माझे असा स्वार्थी विचार न करता आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांचा , आजूबाजूच्या लोकांचा , सहकार्यांचा तसेच संपूर्ण समाजाचा विचार करणे आज गरजेचे आहे आणि त्याची पहिली पायरी म्हणजे घराबाहेर न पडणे. आज सोशल मिडिया तसेच अनेक द्रुकश्राव्य माध्यमातून सतत कोरोना विषयी जनजागृती करणारे संदेश दिले जात आहेत पण अजूनही संपूर्णतः त्याला यश आलेले दिसत नाही .. हे संकट जीवावरचे आहे आणि त्याचे गांभीर्य आज समजले नाही तर उद्या आपलेच आयुष्य धोक्यात येवू शकते. आज इटली किंवा चायना मधील परिस्थिती झोप उडवणारी , अंगावर काटा आणणारी आहे. बिनधास्त राहणे आपल्याला प्रचंड महाग पडू शकते . सरकार उत्तमरीतीने परिस्थिती हाताळत आहे, जनसामान्यापर्यंत सर्व सुविधा कश्या पोहोचतील हे सर्व जातीने पाहत आहे ,माननीय मुख्यमंत्री , प्रधानमंत्री कळकळीने विनंती करत आहे तेव्हा आता नागरिक म्हणून आपण आपल्या कर्तव्यात कुठेही न चुकता प्रशासनाला सहकार्य करुया .आपल्याला आवश्यक तितक्याच गोष्टींचा साठा करा कारण इतरांनाही त्याची गरज लागू शकते. आपल्याला नवीन वर्षात असाच सतत भयभीत राहायचे आहे का? नाही ना? मग आज थोडी कळ काढा, घरातून बाहेर पडू नका आणि इतरांनी तसे केल्यास त्यानाही समजावून सांगा. भविष्यातही अनेक गुढी पाडवे येतील आणि आपण ते नक्कीच आनंदाने साजरे करू जर आज स्थिती नियंत्रणात राहिली तर नाहीतर भारताचा इटली व्हयायला कितीसा वेळ लागणार आहे ? हे वास्तव आहे, तेव्हा डोळे उघडा , संयम बाळगा ,परिस्थितीचे भान ठेवा आणि अर्थात परमेश्वराची आराधना करा.
आपले स्वतःचे आरोग्य आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे नक्कीच आपल्या हाती आहे आणि ह्याची सुरवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे. आपण परदेश दौरे करतो ,जगभर फिरतो. तेथील स्वछ्यता , शिस्त ,नीटनेटकेपणा ह्याची तोंडभरून स्तुती करताना आपण थकत नाही मग ह्याचे अनुकरण आपल्याकडे करावे असे का नाही वाटत आपल्याला ? परदेशात रस्त्यावर थुंकायची किंवा सिग्नल नसताना रस्ता क्रॉस करायची आपली हिम्मत होत नाही आणि आपल्या देशात ?
भारत भूमी हि संतांची भूमी समजली जाते . आपल्या देशाला अनेक भौगोलिक , ऐतिहासिक परंपरा, संस्कृतीचा लाभला आहे आणि निसर्गानेही आपल्याला भरभरून दिले आहे . कमतरता आहे ती फक्त शिस्तीची. शिस्त पाळण्यात आपला सुशिक्षित पणा कुठे जातो ?  परदेशातील लोकांनीही आपली शिस्त वाखाणावी असे वाटत नाही का आपल्याला ? आपल्याला एक सक्षम, आरोग्यसंपन्न समाजाची निर्मिती करायची असेल तर घरोघरी आज
“ आरोग्याची गुढी ” उभारण्याची गरज आहे. संपूर्ण जगाला सळो कि पळो करून सोडणाऱ्या ह्या “Corona Virus” च्या मागे विधात्याने भविष्यासाठी दिलेली आगाऊ सूचना आपल्याला आजच समजली तरच ह्या देशाचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे आरोग्य आणि भविष्य उज्वल असेल ह्यात शंकाच नाही. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...तेव्हा आजच सावध होऊन झाल्या प्रसंगातून शिकणे गरजेचे आहे .
आज ह्या मंगलमय दिनी आपण अनेक शुभ कार्यांना प्रारंभ करतो, अनेक संकल्प करतो. तसेच आज आपल्या स्वतःची आणि आपल्या परिसराची ,देशाची स्वच्छता राखणे, आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास प्रयत्नशील राहणे हि आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठीच आज एकत्र येवून “निरोगी आयुष्याची गुढी ” उभारू आणि हा आरोग्याचा , स्वच्छतेचा वारसा पुढील पिढ्यांना सुपूर्द करू.
आज गुढी उभारताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवूया तसेच ह्या स्थितीत ज्यांना आपले प्राण गमवायला लागले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थनाही करुया.
आपल्या सर्वाना हे नवीन वर्ष सुखाचे , भरभराटीचे, संकल्प पूर्तीचे आणि उत्तम आयुआरोग्याचे जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .


antarnad18@gmail.com

Friday, 2 August 2019

पंचामृत

|| श्री स्वामी समर्थ ||








पयोदधिधृतं चैव मधु च शर्कारायुतम |
पंचामृतं मयानीतं स्नानार्थ प्रतीगृह्यताम ||

कुठल्याही पूजेतील मुख्य उपचार म्हणजे “पंचामृत ”. त्याशिवाय पूजा अपूर्णच .पंचामृत हे दुध ,दही ,तूप , मध आणि शर्करा एकत्र करून केले जाते. ह्यातील प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ठ प्रमाण आहे. पंचामृतातील प्रत्येक घटकास शास्त्रीय ,अध्यात्मिक कारणही आहे. पूजा म्हणजेच सात्विकता.
पंचामृत हे सात्विकतेचे प्रतिक आहे. ह्यातील दुध हे शुभ्रतेचे प्रतिक आहे जे  आपले चरित्र , जीवन शुभ्र असावे हेच सुचवते. आपण नेहमीच चांगले कर्म करत राहावे ,पवित्र आणि शुद्ध मनाने परमेश्वरी सेवेत राहावे. दुध हे वात्सल्या चे प्रतिक आहे. दही 

हे स्नेहांकित आहे ,प्रवासास जाताना दही हातावर ठेवण्याची प्रथा आहे. दूर जाणार्या व्यक्तीचा स्नेह दुरूनही राहावा हि त्यामागील भावना . दह्यात दुसर्याला बदलण्याची क्षमता आहे . प्रवासास जाणार्या व्यक्तीने जायील तिथे आपल्या संस्कृतीचा प्रसार करावा . परदेशी अनेक प्रलोभने असतात पण ह्या सर्व रंगात रंगुनही आपला रंग म्हणजेच आपली संस्कृती ,अस्तित्व टिकवून ठेवण्याचा उद्देश ह्यामागे आहे . ज्याप्रमाणे दही दुधाचे परिवर्तन करू शकते त्याचप्रमाणे अल्पसंखेत असणारी चांगल्या विचारांची ,सद्विवेक बुद्धी जागृत असणारी माणसे जगात परिवर्तन करू शकतात. आपल्याप्रमाणे दुसर्याला सात्विक बनवणे हा उद्देश असणारे दही परमेश्वर चरणी म्हणूनच वाहिले जाते.


तूप दाखवी रूप हे अगदी खरे आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे,आपण एकटे एकटे नाही जगू शकत. आपल्या भोवतीच्या प्रत्येक नात्यामध्ये मायेची उब ,स्निग्धता नसेल तर जीवनातील रस निघून जातो .पण नात्यांमध्ये स्नेह ,वात्सल्य असेल तर आपण संकटांचे डोंगरही पार करतो. म्हणूनच तुपातील स्निग्धता स्नेहाचे प्रतिक आहे. आजकाल आहारतज्ञ सुद्धा रोज एक चमचा तूप खा असे सांगतात, आपल्या शरीरात ते वंगण म्हणून कार्य करते आणि हाडांना बळकटी देते . बुटी पार्लर मध्ये सुद्धा घरच्याघरी पंचामृताचे फेशिअल करायला सांगतात . पंचामृतातील सर्व गुणांमुळे त्वचा उजळते. तर अश्या ह्या बहुगुणी तुपाचा समावेश पंचामृतात आहे

मधात गोडवा आहे .आपण कित्येक वेळा एखाद्याच्या बोलण्याचा उल्लेख मधाळ बोलणे असाही करतोच. पण नुसता गोडवा नाही तर मध शक्तिवर्धक आहे. आयुर्वेदातील अनेक चाटणे हि मधातून घेतली जातात. आपल्याला सामर्थ्यवान बनायला हे शक्तिवर्धक मध उपयुक्त ठरते . आजकाल पंचामृताचा साबण सुद्धा मिळतो.


सरतेशेवटी जिवनात अवीट गोडी निर्माण करणारी शर्करा म्हणजेच साखर. जीवनात गोडवा नसेल तर जीवन बेचव, निरस होवून जायील . पण नुसतेच गोडगोड बोलणारी माणसे विनाशासाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच “ दुग्द्शर्कारा “ हा शब्द प्रचलित आहे . जसे दुधात साखर विरघळली तरच दुधाला गोडवा निर्माण करते त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीत आपला “ मी ” जोवर पूर्णपणे मिसळून विरून जात नाही तोवर त्याची कृपा होणे निव्वळ कठीणच .

तर अश्या ह्या बहुगुणी पंचामृताच्या सेवनेने आपले आरोग्य उत्तम राहते. आणि म्हणूनच ह्या पंचामृताचा अभिषेक प्रत्येक पूजेत अग्रभागी असतोच.

पंचामृताचे सर्वमान्य प्रमाण खालील प्रमाणे .

एक कप दुध , चार चमचे दही , दोन चमचे तूप , एक चमचा मध आणि एक चमचा साखर .

विशेष सूचना : घरच्या दुधाचे दही लावावे ,ऐन वेळी बाजारातून अमूल किंवा अन्य पावडरीच्या दुधाने बनवलेले दही ह्यात वापरू नये .


 लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.


antarnad18@gmail.com









Wednesday, 31 July 2019

उगम चातुर्मासाचा

|| श्री स्वामी समर्थ ||






मंडळी ,आपल्या घरात मुलांना चातुर्मास म्हणजे काय ? असे विचारले तर आपणच चक्रावून जाऊ अशी उत्तरे मिळतील. त्यात मुलांची तरी काय चूक म्हणा ,कारण कलियुगात अनेक कारणांनी ह्या गोष्टी आता काळाच्या पडद्याआड जातील कि काय अशी भीतीच आहे. आपले सण , रूढी ,परंपरा जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे . नुसते तेव्ह्डे करून न थांबता त्याचा वारसा आपल्या पुढील पिढ्यांकडे सुद्धा सुपूर्द केला पाहिजे. आपल्या पुढील पिढ्या ह्या गोष्टी किती उत्चाहाने करतील ह्याबद्दल बरेचदा शंका व्यक्त केली जाते ,म्हणूनच आपण करत असलेली व्रत ,वैकल्ये ,उपवास आणि तत्सम गोष्टींचा आपल्या जीवनाशी, मानसिकतेशी आणि आरोग्याशीही किती जवळचा संबंध आहे ह्याचे महत्व त्यांना पटवून दिले पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट डोळसपणाने केली पाहिजे हेही महत्वाचे .कधीकधी एखाद्या गोष्टीची अर्धवट माहिती असताना आपणही आंधळेपणाने काही गोष्टी करत असतो म्हणून डोळसपणा महत्वाचा . आता हेच पहा संध्याकाळी अंधार झाल्यावर नखे कापू नये हे आईने, आजीने सांगितले म्हणून आपणही आपल्या मुलांना सांगतो .पूर्वी आजच्या इतके शहरीकरण झाले नव्हते ,गावातून वीज नव्हती आणि अंधार झाल्यावर घासलेट चे दिवे ,मेणबत्या लावल्या जात ,त्याचाच काय तो मिणमिणता प्रकाश ,मग अश्या तुटपुंजा प्रकाशात नखे कापताना कुठे लागू नये म्हणून ती दिवसा कापावीत हा उद्देश पण आपण उगीचच त्याला परंपरा वगैरेची वेष्टने देतो आणि मग नवीन पिढी विश्वास ठेवत नाही ह्याची खंत करतो .


चातुर्मास हा आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी पासून सुरु होतो आणि कार्तिकी एकादशीस समाप्त होतो. आषाढी एकादशीस देव निद्रिस्त होतात म्हणून त्यास देवशयनी एकादशीही म्हणतात पुढे कार्तिकी शुद्ध एकादशीस देव उठतात असा हा चातुर्मास. देवानाही विश्रांती हवीच कि पण मग आता भक्तांनी करायचे काय ? 

भक्तांनी ह्या काळात आपल्या आराध्याची जास्तीत जास्त सेवा करायची . परमात्मा झोपला म्हणून
आपण हतबल न होता हा काळ त्यांच्याच आराधनेत व्यतीत करायचा  .अहो आपल्याला सुद्धा विश्रांती हवी म्हणून रात्र आणि दिवस दिले आहेत . शरीर थकते म्हणूनच रात्री विश्रांती घेतली कि प्रत्येक अवयव पुन्हा ताजातवाना होवून काम करू शकतो.
शेतीची कामे- पेरणी


आपल्या देशाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे .देवधर्म ,व्रते ह्यांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत .मुळात आपला देश हा शेतीप्रधान देश. पावसापूर्वी शेतकरी पेरणी , लावणी अशी शेतीची कामे हातावेगळी करतात आणि मग पुढे अश्विन महिन्यात त्याची कापणी होते .मग मधला काळ हा जास्तीतजास्त देव धर्मासाठी वापरला जात असे.

श्रावणात निसर्गचक्र फिरते आणि वसुंधरा पावसात न्हावून निघते ,अश्यावेळी मग घराबाहेर पडणे कमीच होते, कामेही कमी होतात त्यामुळे शरीराचे चलनवलन कमी होते, पचनसंस्था मंद होते ,अश्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक म्हणून वातूळ पदार्थ वर्ज आणि अतिशय हलका आहार घेणे इष्ट ठरते . ह्या दिवसात म्हणूनच उपवास आरोग्यदायी ठरतात. अशी वैज्ञानिक बैठक ह्यामागे आहे .              

गजर टाळ मृदुंगाचा

ह्या चार महिन्यात करायचे काय म्हणून मग शेतकरी वर्ग एकत्र येवून भजन , कीर्तन ,व्रत वैकल्ये ,उपवास ह्यात वेळ घालवतात . देवधर्मही घडतो आणि वेळही सत्कारणी लागतो . सर्वांनी ह्या उपक्रमासाठी एकत्र येण्याचे ठिकाण प्रामुख्याने गावातील देवळे . साहजिकच देवाची उपासना , एकत्र जमून ढोलकी ,वाद्यांच्या गजरात आरत्या ह्याला उधाण येते. मग अनेकांना आपल्या अंगी असलेल्या कला ,जसे एखादे वाद्य वाजवणे , प्रवचन करणे , सादर करण्यास हक्काचे व्यासपीठ मिळते .त्यानिम्मित्ताने सामाजिक उपक्रमात सर्वांचा सहभाग होतो .जनमानसातील संबंध घट्ट होतात ,सणांमुळे माणसे जवळ येतात. अश्याप्रकारे चातुर्मास उदयास आला असावा. त्यात आलेल्या उत्सवांमुळे सर्वत्र आनंदी वातावण तयार होते आणि ह्यामुळे क्षणभरासाठी प्रत्येक जण आपले दुखः ,यातना विसरतो आणि साधनेत रममाण होतो .विधात्याने प्रत्येक गोष्ट चपलख बसवली आहे ,आहार विहार ,रुतुचक्रे सर्वच त्याचा योग्य तो उपयोग आणि सन्मान ठेवलाच पाहिजे.


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.

antarnad18@gmail.com



Monday, 29 July 2019

दीपोत्सव

|| श्री स्वामी समर्थ ||





        आषाढ कृष्ण चतुर्दशीला आपण “दिव्याची अमावस्या ” म्हणून संबोधतो आणि त्यादिवशी दीप पूजन हि करतो. दीप हे मांगल्याचे प्रतिक आहे म्हणूनच शुभ प्रसंगात ओवाळताना आपण निरांजनाचा उपयोग करतो .आषाढ अमावास्येनंतर अनेकविध सणांनी नटलेला साजरा श्रावण सुरु होतो . भारतीय संस्कृतीला परंपरेचा इतिहास लाभला आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी विशिष्ठ उद्देश आहे आणि त्याचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे ,तो समजून आपण सण साजरे केले तर त्याचा आनंद आपल्याला खर्या अर्थाने उपभोगता येयील.

शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा 
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते 

हा श्लोक आपल्याला आपल्या बालपणात घेवून जातो , संध्याकाळी तिन्हीसांजा झाली कि आई देवाजवळ दिवा लावत असे . तिच्यासोबत आपण शुभं करोति ,मनाचे श्लोक , परवाजा म्हणत असू . मग घरातील सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करणे ह्याचे पालन आपण न चुकता करत असू .संस्कार लहानपणीच करायचे असतात कारण त्याची पाळेमुळे मनात खोलवर रुजतात आणि अखेरपर्यंत लक्ष्यात राहतात .घरातील वडील मंडळीना नमस्कार करायचा हे आपले नित्य कर्म कारण तेव्हा शिंगे फुटलेली नसतात .असो तर सांगायचे असे ह्या सर्वाचे पालन आपण आजवर करतच आहोत.
श्रावण सुरु होतो त्यावेळी घरात अनेक पूजा ,व्रते होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच ह्या सर्वाचा श्रीगणेशा आपण आषाढ अमावास्येला दीप पूजा करूनच करतो .त्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे ,नुसतेच दिवे नाही तर आपले मनसुद्धा घासून पुसून स्वच्छ करायचे .मनातील वाईट विचार, द्वेष ह्या सर्व गोष्टीना तिलांजली द्यायची आणि शुद्ध ,सात्विक मनाने दीपपूजन करायचे .
आपल्याला जी उर्जा ,समाधान ,सकारात्मक आनंद लहरी निरांजन किंवा समयीच्या ज्योतीमुळे मिळतील त्या टूबलाईट च्या प्रकाशातून मिळणार नाहीत. कारण तुपाच्या निरांजनातील ज्योत सात्विकतेचे प्रतिक आहे .देवासमोर निरांजन लावून ध्यानधारणा केली तर मनास निश्चित शांतता लाभतेच. निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले तर एकाग्रता वाढते असेही ऐकिवात आहे.

तर असे हे दीपपूजन का करायचे ? तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि  निराशेकडून सकारात्मकतेकडे नेणारा हा  दीप आणि म्हणूनच त्याचे पूजन करायचे. श्रावणापासून एक उत्चाहाचे ,आनंदाचे पर्व सुरु होते त्याचा श्रीगणेश ह्या दिपपूजनाने करायचा. घराची साफसफाई करून नीटनेटके करावे, संध्याकाळी दिवे लागणीस एका पाटाभोवती छानशी रांगोळी काढून पाटावर घरातील लहान मोठे सर्व प्रकारचे दिवे, निरांजने ,समई घासूनपुसून ठेवावेत . सर्व दिव्यांना हळदकुंकू , अक्षता फुले वाहून दीपप्रज्वलन करावे. गोडाचा नेवैद्य दाखवावा आणि आपल्या जीवनात शांतता , स्थैर्य ,समृद्धी येण्यासाठी मनापासून प्रार्थना करावी, ह्या दिव्यांच्या प्रकाशात आमचे जीवन उजळून निघावे, मनातील दुष्ट , वाईट विचारांचा विनाश व्हावा, आणि जीवन प्रकाशमान व्हावे ह्यासाठी मनोभावे नमस्कार करावा. काही ठिकाणी उकडलेल्या कणकेचे गोडाचे दिवे तसेच मातीचेही दिवे करण्याची प्रथा आहे .


विधात्यानेही विचारपूर्वक सृष्टीची रचना केली आहे.दिवस आणि त्यामागून येणारी रात्र. दिवसा सूर्यकिरणे आपल्याला मिळतात म्हणून सर्व जीवसृष्टी टिकून आहे . तेव्हा प्रकाशाचे अनन्यसाधारण महत्व आपल्याला विसरून कसे बरे चालेल .आम्हाला ऑफिस मधून यायला उशीर होतो ,वेळ नसतो असे अजिबात म्हणायचे नाही ,एक दिवस TV, whatsapp थोडावेळ नाही पाहिले तर जगबुडी नाही होणार पण आपल्या परंपरा जपत छान दीपपूजन केले तर आपले संपूर्ण कुटुंब पुढील वर्षात प्रगती नक्कीच करेल, ,प्रत्येकाचे जीवन प्रकाशमय होवून उजळून निघेल ,करून पहा.

       मंडळी , श्रावण सुरु झाला कि अनेक व्रते वैकल्ये ,सणवार येतात आणि ह्यात अभक्ष भक्षण म्हणजेच नॉनवेज खाण्यास मज्जाव आहे कारण ह्या सर्व खाण्याने तामसी वृत्ती वाढते आणि तामसी वृत्ती परमार्थास अनुकूल नाही, ह्या गोष्टीत सात्विकता नसल्यामुळे हे ४ महिने तामसी भोजन वर्ज करावे हे ह्यामागील शास्त्रीय कारण आहे. गेल्या काही वर्षात आपल्या सणांचा मुख्य उद्देश गायब होवून त्याला एक वेगळेच हिडीस स्वरूप येवू लागले आहे हे नव्याने सांगायला नको. सणांचा मुख्य उद्देश परमेश्वराचे पूजन करून त्याच्यात विलीन होणे हा असला तरी हल्ली मात्र सण किंवा कुठलीही पूजा म्हणजे अंगविक्षेप करून देवासमोर घाणेरड्या गाण्यांवर नाचणे इतकाच उरला आहे . 


आता हेच पहा, अनेक वर्षापासून चालत आलेल्या आणि आपल्या सात्विक प्रकाशाने डोळ्यास नेत्रसुख देणाऱ्या ह्या दिप पूजनास सुद्धा “ गटारी अमावस्या “ म्हंटले जावू लागले आहे. आपल्या रूढी परंपरांचा एकीकडे ह्रास होत चालला आहे तर दुसरीकडे विटंबना आणि त्यात आपल्यासारखी सुशिक्षित माणसे अग्रभागी आहेत हे सांगतानाही खेद होतो. शिक्षणाने आपण प्रगल्भ होतो मग आपणच सोशल मिडीयावर ,whatsapp वरती हौशीने “उद्या गटारीचा प्रोग्राम काय ?" असे विचारले तर कसे होईल ? काही वर्षाने आषाढी अमावस्या –दीपपूजन हे शब्द विस्मृतीत जावून “ गटारी अमावस्या “ हाच शब्द प्रचलित होईल कि काय अशी भीती आहे . आपल्या परंपरा, सण साजरे करताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर आणि तरच त्याची उद्दिष्टे सफल होतील. नाहीतर पुढे येणारा काळ आणि येणाऱ्या पिढ्यामध्ये सात्विकता कणभरही उरणार नाही .आपणच आपल्या आयुष्यातील ह्या तेजाला वंचित होवू त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून नक्कीच विचार व्हावा ,स्वतःला पटले तर इतरानाही पटवून द्यावे ,कधी दारू प्यायलाच मिळाली नाही अश्या थाटात व्याकूळ होवून दिप पूजनास अभक्ष भक्षण आणि दारू पिवून नको त्या रूढी निर्माण करू नये, आपण पुढील पिढ्यांना काय आदर्श ठेवणार आहोत?  आपण आपल्या मुलाबाळांना कसला वारसा देणार आहोत ? ह्याचा क्षणभर विचार करायची वेळ आत्ताच आहे मग ती निघून गेली तर आपल्या ओंजळीतून सद्भावना , विवेक सर्वच निघून जाईल .



मंडळी सारांश असा कि आपणही २१ व्या शतकात आहोत ,सर्वसाधारण माणसे आहोत ,आपल्यालाही भावभावना आहेतच कि, पण modernisation च्या नावाखाली आपल्या सणांना जे हिडीस स्वरूप येते आहे त्याला रोखणे आपल्याच हातात आहे .आजकालचे कॉर्पोरेट युग आहे ,आजकालची मुले म्हणतील आम्ही घरीच १० नंतर येतो मग कधी करणार हे सर्व ,ठीक आहे आल्यावर घरातल्यांनी केलेल्या पुजेचा मान ठेवून  नमस्कार तर नक्कीच करता येयील . तसेही जो देव आपल्याला अनंत हाताने भरभरून देत असतो त्याच्यासमोर एक क्षण उभे राहून दीपपूजन करण्यास एक मिनिट सुद्धा नसेल तर आपल्यासारखे अभागी आपणच.नक्कीच विचार करा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ,ह्या उक्तीला धरून आपण आपल्यापासूनच सुरवात करुया आणि साजरा करुया "दीपोत्सव ".

आपल्या सर्वाच्या आयुष्यात हा दीपोत्सव समाधान , आनंद आणि सात्विकता प्रदान करुदे आणि आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होवूदे हीच प्रार्थना.

ह्या लेखाचा उद्देश “ click ” झाला आणि एकाने तरी “ गटारी अमावस्या “ ह्या नावाचा अपप्रचार थांबवला तर लिहिण्याचे सार्थक झाले असे समजायला हरकत नाही.


लेख आवडला तर अभिप्राय जरूर पाठवा.


antarnad18@blogspot.in