Showing posts with label मला भावलेली व्यक्तिमत्वे. Show all posts
Showing posts with label मला भावलेली व्यक्तिमत्वे. Show all posts

Friday, 23 October 2020

फॅशनेबल

|| श्री स्वामी समर्थ ||

रश्मी सोबत तिच्या स्टुडीओ मध्ये


आपले व्यक्तिमत्व छान दिसावे असे प्रत्येकालाच वाटते .उत्तम पेहराव आणि त्याला साजेसे दागदागिने घातले तर आपले व्यक्तिमत्व अगदी खुलून दिसते. आज बदलत्या काळानुसार जिथे सगळेच बदलले आहे तिथे कपड्यांचे म्हणजेच “ फॅशन ” चे जग कसे बरे मागे राहील? 

स्त्रिया आणि फॅशन्स ह्यांचे घट्ट अतूट नाते आहे. प्रत्येक स्त्रीला आपण फॅशनेबल असावे असे वाटतेच. पूर्वी स्त्रिया सरसकट ९ वारी साड्या नेसत असत पण आता ९ वारी ची ६ वार झाली. पूर्वी बायकांचा जास्तीत जास्त वेळ घरातच जायचा पण आता स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आहेत ,स्वतःच्या पायावर उभ्या आहेत . शाळा ,महाविद्यालये ,कार्यालये इथे स्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. दिवसभर ट्रेन, बस चा कंटाळवाणा प्रवास करावा लागतो, म्हणून आता साडीवरून पंजाबी ड्रेस ,चुडीदार ,आधुनिक पेहराव जसे स्कर्ट, शर्ट अश्या सुटसुटीत पेहरावांकडे जास्ती कल दिसून येत आहे. 

आज फॅशन जगतात मोठ्ठीच क्रांती झाली आहे हे म्हणणे वावगे ठरू नये. जगभरात फॅशन चे एक वेगळे वर्तुळ आहे .अनेक Brands आधुनिक फॅशन चे कपडे design करून ह्यात उतरत आहेत. ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्यामुळे आता इथे रोज काहीतरी नवीन पाहायला मिळते आणि अनेक स्त्रियासुद्धा हे  क्षेत्र आपली करिअर म्हणून निवडत आहेत . अनेक महिला उद्योजकांनी ह्यात आपल्या अनुभवाचा आणि कलात्मकतेचा उपयोग करून विविध अत्याधुनिक कपडे बाजारात आणले आहेत . 


रश्मी अद्वैत पटवर्धन... हे नाव आज फॅशन च्या जगतात नवीन नाही . रश्मीने प्रामाणिक मेहनत , हुशारी आणि कलात्मकता ह्याचा सुरेख मेळ घालून ह्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. IT क्षेत्रात रमलेल्या रश्मीच्या मनात काहीतरी वेगळे करावे असे विचार घोळू लागले.
“Jwellery ” आणि “Fashion ” हि दोन्ही क्षेत्रे तिला खुणावत होती . “ Project Manager ” म्हणून कार्यरत असणार्या रश्मीने अखेर आपल्या मनाचा कौल घेतला आणि “ Fabrication ” हे आवडते क्षेत्र निवडले .2013 मध्ये पुण्यातील सदाशिव पेठेत “रश्मी फॅशन्स ” चा श्रीगणेशा झाला. नवीन क्षेत्र निवडले खरे पण त्यातील अनेक गोष्टी तिला अनभिद्न्य होत्या. ड्रेस वरील ओढण्याची विशेष आवड असल्याने सुरवातील ते बाजारातून विकत आणून त्यावर “Patch work ,handwork ”करून त्याला एक वेगळा लुक देवून त्याची विक्री करायला सुरवात केली. पुढे हैद्राबाद , जयपूर ह्या ठिकाणी स्वतः जावून रश्मीने उत्तम ,तलम अशी कापडे खरेदी करायला सुरवात केली. ग्राहकांना द्यायचे तर उत्तमच हा धडा तिने पहिल्या दिवसापासून गिरवला आणि त्यात आजवर खंड पडलेला नाही ,त्यामुळे रश्मी फॅशन्स हा Brand ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरला. काहीतरी उचलून ग्राहकांच्या माथी मारणे हे रश्मीच्या तत्वात कधीच बसले नाही .सुरवातीला विविध प्रकारची कापडे त्याचे design करणे ,ह्या सर्वात संपूर्ण वर्ष खर्ची घातले.

तुम्ही कितीही उत्तम काम करत असलात तरी कुठल्याही व्यवसायात सुरवातीला बर्याच सलग्न गोष्टी लागतात त्यातील प्रमुख आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपला माल ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवणार .म्हणतात ना आयुष्यात कुठलाही अनुभव फुकट जात नाही अगदी तसेच झाले .रश्मीला IT क्षेत्रातील तिच्या अनुभवाचा इथे फायदा झाला . 2014 मध्ये आपली स्वतःची वेबसाईट बनवून हे सर्व Unstiched कपडे तिने Online विकायला सुरवात केली आणि त्याला तिला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ४ वर्षे ह्या online marketing मुळे तिचा व्यवसाय आणि आत्मविश्वास वाढत गेला. 



रश्मीला नेहमीच वेगळेपणाचा ध्यास होता. अगदी स्वतःचे कपडे खरेदी करतानाही त्यात काहीतरी “हटके” असावे ह्याकडे तिचा कटाक्ष असे आणि तिच्या मैत्रिणी ,कार्यालयातील सहकारी ह्यांना ते खूप आवडत असत . आपण काहीतरी वेगळे करू शकतो आणि ग्राहकांना वेगळे देवू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात आला आणि ह्या गुणाचा तिला ह्या व्यवसायात खूप फायदा झाला. बाजारात मिळणाऱ्या सरसकट एकाच प्रकारच्या कपड्यातून काहीतरी वेगळे देण्यात ती यशस्वी झाली. तिने design केलेले कपडे हटके असल्यामुळे लक्ष वेधून घेवू लागले. मार्केट ट्रेंड ,नाविन्य , रंगसंगतीचे भान आणि तिची हटके designs ह्या सगळ्यामुळे अधिकाधिक ग्राहक तिच्याकडे आकर्षित होवू लागला. रश्मीच्या घरी तिच्या आईनेही साड्या तसेच लहान मुलांचे कपडे शिवणे हे व्यवसाय केले असल्याने तिला अगदी घरातूनच ह्याचे बाळकडू काही प्रमाणत मिळाले होते.ह्या सर्वामुळेच कपड्याच्या व्यवसायाकडे ती जास्ती आकर्षित झाली.


आज भारतात अनेक परदेशी, मोठे जागतिक ब्रांड आपली उत्पादने विकत आहेत . त्यांचे कपडे तितकेच महाग असूनही त्याला मोठ्या प्रमाणत ग्राहकवर्ग आहे. हे सागताना रश्मी सद्गतीत होवून म्हणाली अग आपल्याकडेही उत्तम कारागीर आहेत जे उत्तम प्रकारचे कशिदा काम करतात पण अजूनही म्हणावा तितका ग्राहकवर्ग तिथे ह्यास लाभत नाही. ह्या कारागिरांचे काम video च्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेकजण करतात पण तरीही अजून त्यातील कसब , त्यांची कारागिरी लोकांपर्यंत म्हणावी तितकी पोहोचत नाही ह्याची खंत वाटते . चांगल्या वस्तूला चांगले पैसेही मोजायला लागतात कारण त्याचा so called look तितकाच हटके असतो .नुसतेच महाग आहे म्हणण्यापेक्षा ते का महाग आहे ह्याचा विचार व्हायला पाहिजे. भारतात जी कलमकारी आहे, कलाकुसर आहे ती जगात कुठेच नाही पण तरीही ते अजून मागेच आहेत. मोठ्या जगतीत ब्रांड चे कपडे जितक्या कौतुकाने आपण वाटेल ते पैसे देवून विकत घेतो आणि मिरावतो त्याही पेक्षा जास्ती कौतुकाने आपले भारतीय कलाकुसर केलेले कपडे अभिमानाने मिरवले पाहिजेत असे वाटते आणि म्हणूनच इंडिअन एथनिक ब्रांड ला पुढे आणण्यासाठी रश्मी सतत प्रयत्नशील असते. 

तिच्याकडील ग्राहकास ईक्कत २०० ते ८०० रुपयापर्यंत विकत मिळते  आणि ते का ह्या रेंज मध्ये आहे हे समजावून सांगण्याकडे तिचा अधिक कल असतो. आपल्याकडे असणार्या विणकामात किती विविधता आहे हे ती आवर्जून सांगते ,जेणेकरून लोकांना त्याची माहिती व्हावी. प्रत्येक ग्राहकाचे बजेट वेगळे असते त्यामुळे आपल्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या बजेट प्रमाणे पण काहीतरी वेगळेपण असणारे कपडे खरेदी करण्याचा आनंद मिळावा ह्याकडे ती जातीने लक्ष देते. 

रश्मी भरभरून आपल्या प्रवासाबद्दल बोलत होती कारण “ रश्मी फॅशन्स  " तिने शून्यातून निर्माण केले आहे आणि तो सर्व प्रवास उलगडून  सांगताना ती पूर्णतः त्यात रमली होती. तिच्या बोलण्यात तिच्या व्यवसायाबद्दल समाधान तर होतेच पण ग्राहकांबद्द्ल होती ती कृतज्ञता .
कुठलाही व्यवसाय असो त्यात ग्राहकांची पोचपावती मिळाल्याशिवाय त्याला मूर्त स्वरूप येत नाही.
आज फॅशनच्या क्षेत्रात जिथे प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन येत आहे, तिथे आज तु ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी काय करतेस ह्या माझ्या प्रश्नावर रश्मी म्हणाली , हे सर्वस्वी एक आव्हान आहे पण आम्ही ते लीलया पेलले आहे. 

नवीन ट्रेंड्स शोधात राहणे हे ह्या क्षेत्रात टिकण्यासाठी गरजेचे आहे म्हणून स्वतःचे ब्लॉग तिने तयार केले . चहा किटली, टिकत्याकटो, जिनीचा दिवा ,टिंग नावाचा दिवा ,बंदिश कलेक्शन ज्यात सर्व musical motifs, सारेगमा caligraphi आहे हे सर्व तिचे स्वतःचे ब्लॉग खरच अप्रतिम आहेत आणि त्यावर रश्मी फॅशन्सच्या वेगळेपणाचा ठसा आहे. आपले स्वतःचे वेगळेपण जपणारे हे सर्व ब्लॉग ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. सतत वेगळेपण जपणार्या रश्मीला designer साड्या विकण्यात रस नाही का हे विचारल्यावर ती म्हणाली कि भविष्यात मी नक्कीच त्याचा विचार करीन ,किबहुना अनेकांनी ते सुचवलेली आहे पण त्यातही मी माझा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करीन. काहीतरी वेगळेपणा देवून रश्मीने आणलेले “ स्कर्ट्स ” ग्राहकांनी विशेषतः युथने उचलून धरले. त्यामुळे ह्यापुढे जे जे करीन त्यात काहीतरी खास ,हटके करीन आणि वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करीन हे तिने आवर्जून सांगितले.

IT क्षेत्रातील high salary देणारा जॉब सोडून आपले काहीतरी वेगळे सुरु करणे हा निर्णय खचितच सोप्पा नव्हता .पण रश्मीला तिच्या कुटुंबाने नुसताच पाठींबा नाही तर प्रोत्चाहन सुद्धा दिले .

कुटुंबाची स्वतःची जागा असल्याने तिला सुरवातीच्या काळात दुकानाचे भाडे द्यायला लागले नाही त्यामुळे तो पैसा तिला व्यवसायात वापरता आला . नोकरीमधील सेविंग मधून भांडवल उभे राहिले.  सतत वेगळेपणा जपायचा असेल तर  विविध कसब असलेले कारागीर लागतात आणि ते टिकत सुद्धा नाहीत ,त्यामुळे उत्तम कसलेल्या कारागिरांची शोधमोहीम सतत चालूच असते आणि ती चालूच राहणार ,त्याला पर्याय नाही . आपण व्यवसाय करत असताना मिळालेल्या कुटुंबाच्या प्रोत्चाहानामुळे रश्मीला मनाची उभारी आली आणि तिने नाविन्याचा जणू ध्यास घेत स्वतःला कामात झोकून दिले .

 निरनिराळ्या प्रदर्शांत भाग घेतला ,त्यात तिची सोबत केली ती तिच्या आईवडिलांनी . यजमानांनी सुद्धा त्यांची नोकरी सांभाळून तिला ब्लॉग करण्यात ,video ,फोटोशूट करण्यात मदत केली . सर्वांच्या मदतीमुळे व्यवसाय फुलू लागला आणि आनंद द्विगुणीत झाला. रश्मीचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. आज मागे वळून पाहताना तिला सर्व आरश्यासारखे स्वछ्य दिसतेय. चांगली वाईट आनंदाची उताराची सगळी वळणे पार करून इथवर आल्यावर खरतर ओंजळीत आनंदच आहे. झालेल्या परिश्रमांचे सार्थक झालेय आणि त्याचे सर्व श्रेय ती तिच्या कुटुंबीयांसोबत ,सहकार्री आणि ह्या प्रवासात सोबत असलेल्या ,प्रोत्चाहन देणाऱ्या प्रत्येकाला, सर्व ग्राहकांना ज्यांनी वेळोवेळी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली त्या सर्वाना देते .आपल्यातील अनेक मैत्रिणी रश्मी सारखीच व्यवसायाची स्वप्ने उराशी बाळगून आहेत ,कर्तुत्ववान आहेत त्यांना हवी आहे फक्त एक संधी .



Partywear साठी लागणारे ड्रेस design करण्याचा विचार का केला नाहीस ह्यावर हसून ती म्हणाली अग सगळीकडे सगळे करत बसण्यापेक्षा एकावर लक्ष केंद्रित करून त्यात आपला ठसा उमटवणे योग्य वाटले आणि ह्या प्रकारचे ड्रेससाठी बाहेर खूप option आहेत. त्यामुळे ह्यात काही करण्याचा मानस नाही. सगळा focus तिने casual, daily wear आणि cotton कलेक्शन वरती ठेवलाय . काहीतरी वेगळे देताना त्याचे महत्वही ग्राहकांना सांगावे लागते जसे स्क्रीन प्रिंट (50 रुपये मीटर)आणि ब्लॉग प्रिंट(२०० रुपये मीटर) ह्यातील फरक सांगावा लागतो. ते सांगितल्यावर मग आपण जे विकत घेतलय ते नक्कीच चांगले आहे हा विश्वास ग्राहकांना पूर्णपणे वाटतो .जो फील तुम्हाला अजरक चे कापड देयील तो फील तुम्हाला कॉटन किंवा स्क्रीन प्रिंट देवू शकणार नाही . कमी किंमत मोजून काहीतरी गळ्यात मारून घेण्यापेक्षा चारऐवजी दोन कपडे घ्या पण ते जास्त टिकतील आणि पैसा वसुल असतील.

एखादी गोष्ट वापरल्याशिवाय समजत नाही त्यामुळे कधीही quality मध्ये तडजोड करू नये. कमी घ्यावे पण दर्जेदार घ्यावे. आज लोक डोळसपणे खरेदी करतात, आजच्या युगात इंटरनेट वर सगळी माहिती आहे त्यामुळे लोकांचा खरेदी करतानाचा अवेअरनेस नक्कीच वाढलाय. त्यामुळे एकच गोष्ट २०० ते २००० रुपयापर्यंत मिळते ,पण त्यात quality काय आहे ते महत्वाचे असते.

आजकाल प्रसिद्धी माध्यमांना ऊत आलाय ,जिथेतिथे फसवणूक आहे. ९९ रुपयाला साडी म्हंटले कि लगेच बटण दाबून खरेदी न करता जरा थांबून डोळसपणे विचार केला पाहिजे म्हणजे फसवणूक होणार नाही ,हि विनंती रश्मी सर्वांनाच करते.

रश्मी सर्वांसाठी सर्व देण्याच्या प्रयत्नात quality मध्ये मात्र कधीही तडजोड करत नाही. पण येणारा ग्राहक उत्तम कापडामुळे नेहमीच संतुष्ट होवून खरेदी करतो. सर्वांसाठी सर्व मग त्यात पुरुष वर्ग आणि मुलेही आलीच कि ,त्यांच्यासाठी काय आहे ह्यावर रश्मी म्हणाली अग त्यांना विसरून कसे चालेल. पुरुषांसाठी सुद्धा वेगळे शर्ट आहेत तसेच रश्मी फॅशन्स च्या खास सिग्नेचर कलेक्शन वर आता मी जास्ती फोकस करणार आहे. पुण्यात थाटलेले तिचे दुकान आता अनेकांसाठी “ shopping spot ” झाले आहे. रोज ऑफिस ला जाण्यासाठी , लहानश्या छोटेखानी कार्यक्रमांसाठी लागणारे छानसे सुटसुटीत कुर्ते घेणारे ग्राहक वाढत आहेत. रश्मी कडून घेतलेला कुठलाही ड्रेस बाहेर “ कुठून घेतला? ”  हे लोक हमखास विचारतातच .अशी पोचपावती मिळते तेव्हा घेतलेले सगळे कष्ट भरून निघतात आणि पुन्हा नव्याने जोशात काम करण्याची स्फूर्ती मिळते हे सांगताना रश्मीचा आनंद ओसंडून वाहत होता .



www.https://www.rushmefashions.com

प्रदर्शनातील अनुभव सुद्धा बरच काही शिकवून जातात पण तरीही online विक्रीवर माझा  जास्ती भर आहे हे सांगताना रश्मी म्हणाली आज दुकानाचा व्याप वाढला असला तरी अजूनही मला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायचे आहे . मुंबई पुण्यात रश्मीने अनेक प्रदर्शने भरवली आहेत पण अजूनही इतर शहरातून सुद्धा प्रदर्शने भरवण्याचा मानस आहे. त्यासाठी ती प्रयत्नशील आहे.रश्मी फॅशन्स मधील बरेचसे ड्रेस कॉटन चे असले तरी चंदेरी ,इक्कत,लिनेन, टसर ,सिल्क ह्याचाही समावेश आहे.

रश्मीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. किती बोलू असे झाले होते तिला . भविष्यातील व्यवसायाची अनेक स्वप्न डोळ्यात दिसत होती. ती पूर्ण करण्यासाठी कंबर कसून कितीही कष्ट करायची तिची तयारी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . रश्मी आपल्यातीलच एक आहे. अगदी तुमच्या माझ्यासारखी . तिचा पुण्यातील स्टुडीओ तिने अगदी झक्कास सजवला आहे. "Happening Place " आहे ती. तेथील रंगीबेरंगी विविधतेने नटलेले कपडे आपल्याला मोहित करतात , तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील आनंद प्रत्येकाला आपलेसे करतो. तिच्या स्टुडीओतील माहोल सकारात्मक उर्जा निर्माण करतो . “ रश्मी फॅशन्स” मधील आपलेपणा आणि आदरातिथ्य आपल्याला क्षणभर तिथेच खिळवून ठेवते.

स्वप्न सगळीच बघतात , पण त्याचा पाठपुरावा करून मेहनतीने ती सत्यात उतरवायला लागतात नितांत परिश्रम , मेहनत आणि जिद्द . ह्या सर्वास जर प्रामाणिकपणाची जोड मिळाली तर त्यातूनच मग साकारते  “ रश्मी फॅशन्स ”.

आज मला भावलेल्या व्यक्तीमत्वांमधील “रश्मी पटवर्धन ” ह्या धडाडीच्या मैत्रिणीशी साधलेले हितगुज आपल्यासोबत शेअर करताना मला विलक्षण आनंद होत आहे. नाविन्याचा ध्यास असलेल्या आपण सर्वांनी “रश्मी फॅशन्स ” ला आवर्जून भेट द्या. आपल्याला हवे आहे त्याहीपेक्षा सुंदर असे तुम्हाला तिथे मिळेल ह्याची खात्री वाटते .

रश्मीला आपल्या सर्वांतर्फे तिच्या पुढील वाटचालीस मनापसून शुभेछ्या.


अस्मिता


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

Antaranad18@gmail.com


Thursday, 7 March 2019

एक कलात्मक प्रवास


|| श्री स्वामी समर्थ ||






                  आपले स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवणे कुणाला आवडत नाही ? मंडळी आजकाल आपण सर्वच आपली केशभूषा, वेशभूषा ,स्वतःचे व्यक्तिमत्व ह्यासाठी अत्यंत जागरूक असतो. आज अनेक स्थरांवर वावरणारा महिलावर्ग तर ह्यासाठी विशेष प्रयत्नशील दिसतो. चारचौघात आपले व्यक्तिमत्व खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि म्हणूनच आजकाल मोठमोठाल्या कंपन्यांची सौंदर्यप्रसाधने , आकर्षक कपड्यांची रंगीबेरंगी दुकाने सदैव ग्राहकांनी गजबजलेली दिसतात. रोज बदलणाऱ्या ह्या Fashion च्या स्पर्धेत टिकून राहणे हे एक आव्हानच आहे आणि असेच एक आव्हान समर्थपणे पेलणार्या “ सई रत्नपारखी ” च्या कलात्मक प्रवासाची आज ओळख करून घेवूया.


                  रोजच्या प्रवासासाठी सुटसुटीत म्हणून सलवार कमीज चा वापर मुख्यत्वे होतो. सई ने ह्यामध्ये “वारली “ ह्या प्रिंट चा सुबकतेने वापर करून अत्यंत आकर्षक कपडे बाजारात आणले आहेत. ह्यामध्ये सलवार कमीज बरोबरच स्टोल आणि टी शर्टस ची सुद्धा विविध रेंज पाहायला मिळते. वारली प्रिंट्स आणि हा व्यवसाय ह्याबाबत सई सोबत दिलखुलास गप्पा झाल्या. मंडळी , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून मोठ्या हिमतीने सई ने ६ वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरु केला आणि पाहता पाहता त्याला मूर्त स्वरूप आले. कॉम्पुटर क्षेत्रातील इंजिनियर असणार्या सईने सुरवातीला ह्याच क्षेत्रात काम केले पण पुढे संसार मुले ह्या व्यापात तिला आपल्या करीयरकडे पुरेसे लक्ष्य देता आले नाही. मुले हळूहळू मोठी होत गेल्यावर मग बराचसा मोकळा वेळ मिळू लागला आणि काहीतरी करायला हवे हि इच्छा मनी रुंजी घालू लागली. लहानपणापासूनच सई चा कलात्मकतेकडे ओढा होता. सुरवातीला जवळचे नातेवाईक ,मैत्रिणी ह्यासाठी कुर्तीवरती लहानलहान कलात्मक प्रिंट करून देणे ह्यास सुरवात झाली आणि बघता बघता हा व्याप तिच्याही नकळत वाढत गेला.


                   अगदी तुमच्या माझ्यासारखे आयुष्य असणार्या संसारी स्त्रीने घरून एखादा लघुउद्योग करायचा म्हंटले तर तिला सर्वप्रथम कुटुंबाकडून पाठींबा मिळणे अतिशय गरजचे असते. ह्याबद्दल बोलताना तिने आपल्या जोडीदाराचा 
श्री .हरीश रत्नपारखी ह्यांचा कौतुकाने उल्लेख केला. आपण ह्या कलेतून खूप काही मोठे करू शकतो आणि हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो हा विश्वास तिला त्यांच्याकडून मिळाल्याचे सांगताना ती सद्गदित झाली. त्यांच्या भक्कम पाठींब्या मुळेच ती उंच भरारी घेवू शकली. प्रदर्शने करायला सुरवात केली त्यावेळी आईवडील सासूसासरे, दीर ह्या सर्वानीच आपला खारीचा वाटा ह्यात उचलला ,त्यामुळे प्रपंचाचा भार हलका झाला आणि ती आपल्या व्यवसायाकडे पुरेसा वेळ देवू शकली .पण तरीही वेळ असेल तेव्हा आपले कुटुंब , स्वयपाकघर ह्या सर्व गोष्टी ती आजही जातीने सांभाळत आहे .एकंदरीतच आता सांसारिक जबाबदार्या आणि आपला व्यवसाय ह्याची खर्या अर्थाने सांगड घालणे तिला जमू लागलेय.

                   काहीतरी वेगळे कलात्मक करू पाहणार्या सईने “ वारली “ ह्या प्रिंट चीच निवड का केली किंवा किबहुना ती ह्याकडे कशी वळली ह्याबाबत सांगताना सई ला किती बोलू असे झाले होते. मुळातच वारली हि आदिवासी कला मला नेहमीच आकर्षित करते . केवळ त्रिकोण , रेषा आणि गोल ह्याचा उपयोग करून  मनमोहक चित्रांची निर्मिती म्हणजेच बहुश्रुत “ वारली प्रिंट्स”. ह्यातून तयार झालेले चित्र हे अत्यंत परिपूर्ण, सौंदर्याची लयलूट असणारे तरीही साधेसोपे आपल्या मनाचा ठाव घेणारे असे असते. ह्या सर्वांमुळे आकर्षित झालेल्या सईने हि कला प्रथम अवगत केली . महाराष्टाची हि प्राचीन कला मुखत्वे आदिवासी जमातीने पुढे आणली . आदिवासींचे आयुष्य, त्यांचे जीवन उलगडून दाखवणारी हि कलाकृती खरच हृद्यस्पर्शी आहे.

                    आपल्या ह्या व्यावसायिक प्रवासाबद्दल सई भरभरून बोलत होती. सुरवातीला हि सर्व प्रिंट्स ती स्वतः हाताने करत असे त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनाच्या तयारीसाठी तिला महिनाभर रात्रंदिवस मेहनत घावी लागत असे. प्रदर्शने ,त्यातील विक्री , ग्राहकांशी संवाद साधने ह्या सर्व गोष्टी करत असताना सई घडत गेली .ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि  वाढता पसारा ह्याचा ताळमेळ एकट्याने घालणे अशक्य झाले .आता सई आपल्याला हवी असलेली खास तिचा स्वतःचा ठसा असणारी प्रिंट्स हि छापून घेवू लागली . स्वतः बनवलेल्या कलात्मक प्रिंट्स वरती सई स्पेशल ठसा असण्यात तिने कुठलीही तडजोड केली नाही. प्रिंट्स बनवणे ,कुठली प्रिंट्स कुठल्या कपड्यावर छान दिसेल ,कपड्याचा रंग काय असायला हवा ह्या सर्वच गोष्टी ती आजही स्वतः करते. ह्या सर्वात तिच्यासोबत असलेल्या नलिनी ह्या तिच्या सखीची लाखमोलाची मदत होत असल्याचे ती आवर्जून सांगते.

                   अत्यंत हटके दिसणाऱ्या ह्या कलात्मक उत्पादनाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला . परदेशी असलेल्या आपल्या महिला नातेवाईकांना भेट देण्यासाठी आवर्जून अनेक लोक हे कपडे खरेदी करतात तसेच प्रदर्शनातसुद्धा काहीतरी वेगळे म्हणून लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय हे सांगताना सईचा चेहरा खरच आनंदाने फुलाला होता. काहीतरी वेगळे देण्याचा तिचा सतत प्रयत्न असल्यामुळे ह्या सर्व कपड्यात तोच तोच पणा कुठेही जाणवत नाही .तसेच सर्व कापडे ती स्वतः खरेदी करत असल्याने गुणवत्तेच्या निकषावर ती नेहमीच खरी उतरते आणि म्हणूनच उत्तम कापडाची निवड आणि वेगवेगळी रंगीबेरंगी प्रिंट्स, त्यांचे रंग ग्राहकांचे लक्ष्य वेधून तर घेतातच पण मिळते ती समाधानाची पावती.

                    पुणे मुंबई येथील प्रदर्शनातून तिला चोखंदळ ग्राहकांनी खूप छान प्रतिसाद दिला ,कौतुक त्याचबरोबर अभिप्राय आणि सूचना ह्यातून आज सई चा हा अनोखा प्रवास सातत्याने सुरु आहे.

                    हे सर्व करताना काही अडचणीही येतात, ह्या सर्व प्रिंट करताना प्रिंटींग युनिट वर अवलंबून राहावे लागते . हा सर्व माल प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचवणे ह्या मालाची योग्य व्यवस्था करणे हि कसरत कमी कष्टाची निश्चितच नाही. ह्या सर्वांमागे अतिशय कष्ट आणि टीमवर्क आहे . हे कपडे अगदी सर्व वयोगटातील स्त्रिया –मुली घालू शकतात. तरुण वर्गाच्या हल्ली   “ हटके " संकल्पनेत बसणारे हे सर्व ड्रेस आकर्षक आणि तसेच वेगळेपणाचा ठसा उमटवणारे आहेत. लहान मुलीसाठीही आता नजीकच्या काळात काही वेगळे देण्याचा प्रयत्न सई करू पाहते आहे. वारली प्रिंट्स ह्या एकाच कलेमध्ये अडकून न राहता मधुबनी ,इजिप्शियन कला ह्यातूनही काही कलात्मक पर्सेस ,कुशन कव्हर, चादरी वगैरे करण्याचा तिचा मानस आहे. 



 “ वारली ” हि आदिवासी कला जपण्याकडे सरकारचा कल निश्चितच आहे. ह्या कलेच्या प्रसारासाठीही सरकारचा नेहमीच प्रयत्न आणि पाठींबा वेळोवेळी दिसून येतोच. ह्या व्यवसायाने सईला खूप आनंद आणि जीवन जगण्याचा आत्मविश्वास दिला हे सांगताना सई म्हणते कि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीतून मोठे होणे, त्यात यश मिळणे ह्यासारखा दुसरा आनंद तो काय आणि तो तिने भरभरून लुटला आहे. गेल्याच महिन्यात “ आम्ही उद्योगिनी " सोबत सईची दुबई वारी सुद्धा झाली. आपल्या व्यवसायाला भारताबाहेर बाजारपेठ मिळावी ह्यासाठीचे तिचे हे पहिले पाऊल

Presentation in Dubai.

                   
आपल्या कलेच्या वेडाने आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगणार्या सई चा प्रवास अचंबित करणारा आहे . तुमच्या आमच्यामध्ये आणि आपल्या वाचक वर्गातहि अश्या अनेक सई आहेत ज्या एका संधीची वाट पाहत आहेत. त्या सर्वांना सई नक्कीच प्रेरणादाई ठरेल ह्यात शंकाच नाही. ह्या सर्वाना काय मार्गदर्शन करशील ह्या प्रश्नाला उत्तर देताना सई पार भूतकाळात गेली . कुठल्याही गोष्टीत एका रात्रीत यश मिळत नाही ,अनेक प्रकारचे अडथळे येतात ,कधी भांडवलाच प्रश्न तर कधी योग्य माणसांचा .ह्या सर्वात एखादा क्षण आपले मन कमकुवत करतो. अगदी त्याच क्षणी मन इतके घट्ट करायचे आणि सकारात्मक विचार करून पुढे जात गेले तर मार्ग मिळतोच . हताश ,निराश कधीच नाही .आजकालच्या भाषेत सांगायचे म्हणजे   " Give Up" करायचे नाही हे तिने स्वानुभवातून सांगितले . 

                      
 प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असते पण फार थोडे लोक आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत त्यात स्वतःला झोकून देतात आणि प्रत्येक प्रसंगाशी सामना करत यशस्वी होतात .आपल्या संसाराचा रथ यशस्वीपणे हाकताना आपला कलात्मक प्रवास  अगदी सातासमुद्रापलीकडे नेऊ पाहणार्या अश्या ह्या तरुण ,धडाडीच्या उद्योगीनिला माझ्यातर्फे आणि आपल्या सर्व वाचक वर्गातर्फे आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेछ्या. 


सईच्या “ अबंध आर्ट्स " चा कलात्मक प्रवास सप्तखंडात व्हावा आणि तिचा आनंद दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा, तिच्या कष्टांचे चीज व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.


लेख आवडला तर नक्कीच कळवा.

www.Antarnad18.blogspot.in
antarnad18.gmail.com

Monday, 31 December 2018

प्रवास एका अन्नपूर्णेचा......

||श्री स्वामी समर्थ ||




     
                 मराठी स्त्रीने जगाच्या कानाकोपर्यात आपली वेगळी ओळख, अस्तित्व निर्माण केलय..आपल्या कार्तुत्वाबरोबरच जपणूक केली आहे ती मराठी अस्मितेची....आज ओळख करून घेऊया अश्याच एका गृहकृत्यदक्ष त्याचबरोबर प्रचंड मेहनत आणि जिद्दीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणार्या, आपल्या मैत्रिणीची म्हणजेच दुबईच्या पेशवाह्या भारतीय उपहार गृहाच्या सर्वेसर्वा सौ. श्रिया जोशी हिची. श्रीयाची ओळख करून देताना मी अगदी सहजपणे मैत्रीणअसा उल्लेख केला ह्याचे कारण ती अगदी पहिल्या काही क्षणातच आपल्या मधुर वाणीने समोरच्याला आपलेसे करते आणि मैत्रीचे बंध अलगद निर्माण होतात.


तर मंडळी, मुळची पुण्याची असलेली श्रिया पूर्वाश्रमीची सुवर्णा गोडबोले. सचिन जोशीं यांच्याशी लग्नानंतर नोकरीनिम्मिताने दुबई पर्यंतचा प्रवास केला आणि मग तिथेच स्थायीक झाली. श्रीयाच्या माहेरी फार सणवार असे काही नव्हतेच त्यातच आईचे छत्र लहानपणीच हरवल्यामुळे तिच्यावर स्वयपाकघर सांभाळायची वेळ आलीच नाही .लग्नानंतर स्वयपाकातले फारसे काही येतही नव्हते आणि तितकी गोडीही नव्हती. परंतु सासरी मात्र बर्यापैकी सणवार होत असत. स्वयंपाकाचे प्राथमिक धडे तिने सासूबाईंच्या हाताखालीच गिरवले. तिने केलेले पदार्थ सर्व आवडीने खाऊ लागले आणि पाठीवर शाबासकीची थाप मिळत गेली त्यामुळे कालांतराने स्वयपाकात अधिकच रुची निर्माण झाली. श्रीया दुबईला गेल्यावर तिला खूप काही करावेसे वाटले पण  मुलगा ५ महिन्यांचा असल्याने सुरवातीच्या दिवसात पाककलेचे कौशल्य फक्त सचिनच्या डब्यापुरतेच मर्यादित राहिले. सचिनच्या डब्यातील रुचकर पदार्थ चाखल्यामुळे त्याच्या ऑफिस मधील काही लोकांनी श्रीयाला त्यानाही डबा देण्यासाठी आग्रह केला आणि मग अश्याप्रकारे डबे देण्याची कल्पना तग धरू लागली. पहाटे लवकर उठून ह्या डब्यांसाठी केलेली मेहनत पुढे इतकी फळाला येयील असे खुद्द श्रीयालाही माहित नव्हते .विविध पदार्थांना मिळालेल्या अभिप्रायांमुळे श्रीयाही उत्चाहाने काही नवीन पदार्थ आवडीने बनवू लागली.


सासुबाईनी दिलेली पाककलेची शिदोरी आणि त्यांचा आशीर्वाद फळास आला आणि ह्या डबे बनवण्याच्या मोहिमेतूनच पुढे " पेशवा " ची संकल्पना उदयास आली. साडेचार हजार स्क्वेअरफीट वरील पेशवाहे अगदी अस्सल पुणेरी नाव असलेले दुबईतील मराठी माणसाचे उपहारगृह आज मराठी तसेच अमराठी लोकांकडून अतिशय नावाजले गेले आहे . हे सुरु करताना आलेल्या विविध अडचणींना कसे तोंड दिले हे सांगताना श्रीया सद्गदित झाली. जागा मोठी ,चांगली मिळाली पण त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालणे आणि आतील सजावट तितकीच आकर्षक करणे ह्या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे होते .ह्यामध्ये मोलाची साथ तिचा मुलगा आणि पती सचिन जोशी ह्यांनी दिली हे सांगताना तिला भरून आले तसेच आज पेशवा चे संपूर्ण व्यवस्थापन आता सचिन जोशीच पाहतात हेही तिने नमूद केले. नुसतेच व्यवस्थापन कौशल्य नाही तर आपल्या पाहुण्यांचे उत्तम आदरातिथ्य तसेच वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचना श्री सचीन जोशी त्यांनी आवर्जून लक्ष्यात घेतल्या आहेत हे " पेशवा " मधील वाढलेल्या ग्राहकांच्या संखेवरून सहज ध्यानी येते. येथून नुसतेच सुग्रास भोजन नाही तर आनंदाचा ठेवा प्रत्येकाने घेऊन जावा ह्याकडे त्यांचे जातीने लक्ष असते ." पेशवा " हे श्रीयाचे बाळ आज ६ वर्ष पूर्ण होवून ७ व्या वर्षात पदार्पण करत आहे हे सांगताना तिला आणि लिहिताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.     
  
गणेश चतुर्थी.
 " पेशवा ” मधील रुचकर पदार्थांची चव चाखण्यासाठी आज जगभरातून लोक कौतुकाने येतात. मराठी माणूस दुबईत गेला आणि पेशवा मध्ये गेला नाही असे सहसा होत नाही, हे श्रीयाने अभिमानाने सांगितले. 
    मराठी माणसांबरोबरच दुबई आणि बाहेरच्या देशातील म्हणजे फ्रांस,जर्मनी ,युरोप,अमेरिका येथील खवैय्यानी इथे आवर्जून हजेरी लावली आहे .  
" पेशवा "घड्तानाचे अनुभव सांगताना श्रीयाने आवर्जून उल्लेख केला तो येथील स्थानिक मराठी लोकांचा . सहसा मराठी माणूस आपल्याच लोकांचा पाय खेचतो त्यांना पुढे जावू देत नाही असे म्हंटले ऐकले जाते पण श्रीयाचा ह्याबाबत अनुभव अगदीच भिन्न आहे .तिला येथील सर्वच मराठी भाषिक मंडळीनी मोलाची साथ दिली आणि देत आहेत.
        “ पेशवा हे नाव आज प्रामुख्याने पर्यटकांमध्ये चांगलेच नावाजले गेलेय. इथे येणाऱ्या अनेक टूर कंपन्या आपल्या प्रवाश्यांना पेशवाइथे खवैयेगीरीसाठी आवर्जून आणतातच. इथे जैन पदार्थही तितक्याच आवडीने खायला येणारा गुजराथी पर्यटकही पाहायला मिळतो . पेशवाची संपूर्ण व्यवस्था आता 4० हून अधिक सक्षम कर्मचारी सांभाळत आहेत. सर्व कर्मचारी वर्ग हा मुंबई , पुणे, कोल्हापूर , मालवण ह्या विविध प्रांतातील असून ह्यास एक मोठे कुटुंबच म्हंटले तर वावगे ठरायला नको. ह्या सर्वांची राहायची अगदी विझा(visa) ची सोयही इथे केली जाते.ह्या सर्व घरगुती वातावरणामुळे येथे सर्वच आपल्या घराप्रमाणे जीव ओतून काम करताना दिसतात आणि म्हणूनच पेशवा मध्ये प्रत्येकाला घरच्यासारखा फील येतो. 


दिवाळीचे मुख्य आकर्षण "किल्ला"
श्रेयाशी मनमोकळ्या गप्पा करताना तिच्यात असणार्या विविध पैलूंचीही ओळख होत गेली. कुटुंबाबद्दल अपार प्रेम आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि गोडवा असलेल्या श्रीयाने  हृषिकेश इथे जाऊन योगाचा महिन्याभराचा कोर्स केलाय आणि आता “ certified yoga teacher” झाली आहे. दुबईत आता तिने योगाचे क्लास सुद्धा सुरु केले आहेत. प्रवासाचीही आणि वाचनाची गोडी असल्यामुळे तिने पर्यटन आणि वाचन ह्याचा सुयोग्य मेळही आपल्या आयुष्यात घातला आहे . तिने लावलेल्या पेशवानामक रोपट्याचा आता डेरेदार कल्पवृक्ष झालाय. दुबई सोबतच अजून ५ देशात पेशवा च्या शाखा काढण्याचा मानस असून त्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.“ पेशवा मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते पण त्याचबरोबर गोव्यातील ,नागपुर कडील काही पदार्थही चाखायला मिळतात.
गोविंदा आला रे आला
पेशवामध्ये आवर्जून हळदीकुंकू, दहीहंडी ,गणेशउत्सव, दिवाळी अगदी दणक्यात साजरी केली जाते आणि दिवाळीचा फराळ सुद्धा इथे विक्रीसाठी ठेवला जातो .हे सर्व सणवार साजरे करताना सामाजिक बांधिलकी आणि पुढील पिढीस काही देता यावे म्हणून दिवाळीत किल्लाही केला जातो. हल्ली दिवाळीत किल्ला करणे हि गोष्ट जणू इतिहास जमाच झाली आहे. येथील स्थानिक लोक आपल्या मुलांना इथे मुद्दामून दिवाळीत किल्ला दाखवण्यासाठी घेऊन येतात .पेशवामध्ये एक मस्तानी हॉलआहे तिथे हे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि येथील सर्व स्थानिक लोक हौशीने सर्व कार्यक्रमात सहभागीही होतात .ह्या हॉल मध्ये स्थानिक लोकांचे बारसे ,हळदीकुंकू, लग्नाचा २५ वा वाढदिवस असे अनेक कार्यक्रम सुद्धा झाले आहेत. गणेश चतुर्थीला यथासांग पूजा ,गणेशास नेवैद्य ,आरती करून अगदी चांदीच्या ताटात मोदकांचा मेनू असलेला बेत असतो तोही अंगतपंगत म्हणजे भारतीय बैठक घालून. पेशवा च्या स्वयपाकघरात केल्या जाणार्या पदार्थात आजहि तुझा काही सहभाग असतो का ह्या प्रश्नावर उत्तर देताना श्रीया म्हणाली, आमचे सगळेच शेफ इतके उत्तम पदार्थ बनवतात कि पदार्थांची चव पाहण्यापलीकडे  मी अजिबात कश्यातही लुडबुड करायला जात नाही .अगदी एखादा वेगळा पदार्थ असेल किंवा गरज भासल्यास मात्र जरूर मार्गदर्शन करते.आमच्या गप्पा खूपच रंगल्या ,श्रीयाकडे अनुभवांची नुसती पोतडीच होती. तुझ्याच सारख्या किंवा कुठलाही लघु उद्योजकांना तू तुझ्या अनुभवातून काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले कि कुठलीही गोष्ट ठरवली तर ती करायचीच असा जणू ध्यास घेतला पाहिजे आणि बाकी सर्व सोडून त्याचा अक्षरशः पाठपुरावा केला तरच त्यात यश मिळते. अनेक गोष्टी एका वेळेस न करता फक्त एकाच गोष्टीत स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले पाहिजे .देवकृपेने तिचे सहयोगी सचिन देवधर आणि हृषिकेश देवधर यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभल्यामुळेच जोशी दाम्पत्य " पेशवा " नामक शिवधनुष्य समर्थपणे पेलवू शकले .त्याचबरोबर दुबई मधील सरकारी यंत्रणा ,स्थानिक लोक ह्यांनी पूर्ण सहकार्य केले .प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खवैया दडलेला असतोच असतो. आज पेशवामध्ये आपल्या खवैये गिरीची हौस पुरवायला देशेविदेशातून लोक आवर्जून येतात . भारतातून राजकारणाबरोबरच ,कलाक्षेत्र, चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी येथील अनेक पदार्थांची चव चाखून भरभरून दाद दिली आहे. अगदी अलीकडील काळात लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन ह्यांनीही पेशवा मध्ये हजेरी लावली होती.

मंडळी, कुठलाही व्यवसाय असा सहजासहजी नावारूपास येत नाही. त्यात आपला जीव ओतावा लागतो,अपार कष्ट घ्यावे लागतात. देहभान विसरून स्वतःला त्यात झोकून दिले तर आणि तरच यशाची गोडी चाखता येते हे नक्की. एका सर्वसामान्य कुटुंबातील एक गृहिणी पण घरातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद ,पतीची मुलाची साथ आणि आत्मविश्वास ह्या जोरावर तिने एक स्वप्न पहिले आणि नुसतेच पहिले नाही तर ते सत्यातही उतरवले ह्याचे आज प्रत्येक मराठी माणसास कौतुक आहे. मंडळी सातासमुद्रापलीकडे जाऊन जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करणारी श्रीया आज काहीतरी वेगळे करू पाहणार्या आपल्या सर्व भगिनींसमोर एक उत्तम उदाहरण आहे. आपल्यामधेही अश्या कित्येक श्रिया आहेत त्यांचीही स्वप्ने अशीच पूर्ण व्हावी ,त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा मिळावी ह्यासाठीच केला हा लेखन प्रपंच. आपल्या मराठी माणसांचे अस्सल पेशवा” अगदी नावाप्रमाणेच दुबईमध्ये आज दिमाखात उभे राहून पाहुण्यांचे स्वागतास सज्ज आहे. “ पेशवा मधील वातावरणात आहे आपल्या मातीचा, आपलेपणाचा सुगंध , इथे जपली आहेत माणसामाणसातील अतूट नाती आणि संवाद .इथे जातीपाती ,धर्मास थारा नाही .पेशवाचा एकच धर्म माणुसकीचा ,आपलेपणाचा .इथल्या आपलेपणाच्या झालरीमुळेच प्रत्येक पदार्थ खूपच चविष्ट ,रुचकर वाटतो . इथे रिवाज आहे तो आलेल्या प्रत्येकास त्याच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने ,आग्रहाने पोटभर खाऊ घालण्याचा. येथे भोजन करणारा जाताना भरभरून आशीर्वाद  आणि तृप्ततेची ढेकर देवून जातो ...ते पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच. 

                आज पेशवाभक्कम पाय रोवून उभा असल्यामुळे श्रीयाने पुढचे पाऊल पर्यटन क्षेत्रात ठेवले आहे. आता सध्या लहान लहान ग्रुप करून पर्यटनाची सुरवात केली आहे तसेच उत्तम दर्ज्याचे केशरही पेशवायेथे विक्रीस ठेवले आहे . मंडळी, आपल्या सर्व वाचकांच्या वतीने ह्या लेखाच्या माध्यमातून अतिथी देवो भव ह्याची पुरेपूर अनुभूती देणार्या  सौ. श्रीया ,श्री सचिन जोशी आणि पेशवाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि कौतुक तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या. 

             नवीन वर्षात म्हणजेच २०१९ मध्ये पेशवाआम्हा सर्व खवैयांसाठी नवनवीन उत्तमोत्तम ,चविष्ठ ,लज्जतदार पाककृती घेऊन येयील अशी आशा करुया.



लेख आवडला तर अभिप्राय जरुर कळवा.
antarnad18@gmail.com












Sunday, 26 August 2018

सप्तखंडातील भटकंती....... कधीही न संपणारी

|| श्री स्वामी समर्थ ||


“The world is a book, and those who don't travel only read one page.” 


मंडळी,
                   आयुष्यात प्रत्येकाच्या काहीना काही इच्छा आकांक्षा, उराशी बाळगलेली स्वप्न असतातच. काही वेळा आपली हि स्वप्न अनेक कारणांमुळे अपुरी राहतात ,पण काही भाग्यवान असतात जे आपल्या स्वप्नांचा ध्यास घेवून ती पूर्ण करण्यात यशस्वी होतात. 

                    आज मी आपल्याला अश्या एका व्यक्तीचा परिचय करून देणार आहे ज्यांनी आपल्या इच्छासोबत आपल्या वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यात यश मिळवले आहे.
सौ.मंजीरीताई..मोलाची साथ ..जीवनात आणि प्रवासात सुद्धा.

        मंडळी सप्तखंडातील ८२ पेक्षा जास्ती देशातील भटकंती करून आपले जीवन कृतार्थ ,अनुभव संपन्न करणारया श्री अरुण सबनीस यांच्याशी आज गप्पांचा योग आला. भटकंती हा त्यांचा अर्थात आवडता विषय आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने त्याविषयी आपले अनुभव सांगण्यात ते रमून गेले होते. बालपण बेळगाव मध्ये गेले पण वडिलांच्या सतत होणार्या नोकरीतील बदल्यांमुळे बडोदा, बलसाड ,नाशिक इथेहि काहीकाळ त्यांचे वास्तव्य झाले. ह्या सर्व काळात त्यांचे शिक्षण चालूच होते. मग पुढे उच्च शिक्षण आणि नोकरी निम्मित्ताने मुंबईस येणे झाले. आपल्याला हे भटकंतीचे वेड कसे लागले ह्या प्रश्नावर त्यांनी त्यांच्या बालपणीचा दृद्यद्रावक किस्सा सांगितला. वडिलांच्या तापट स्वभावामुळे लहानपणी त्यांच्यापाशी एखादा हट्ट तर सोडाच पण एखाद्या विषयावर संवाद साधणे हेही अवघड असायचे.



एकदा त्यांच्या कपाटात त्यांना इटलीमधील पोम्पेई ह्या 5000 वर्षापूर्वी ज्वालामुखीमुळे उध्वस्त झालेल्या शहराची काही पोस्ट कार्ड मिळाली .त्यांना जरा आश्चर्य वाटले कि वडिलांच्या कडे ह्या वस्तू कश्या. वडिलांनी त्यांच्या हातात हि कार्ड पाहिली आणि आपल्या मुलाच्या अचंबित चेहऱ्याकडे पाहताना म्हंटले “ खूप आवड होती भटकंतीची पण सर्व राहून गेले ”. हे कथन करताना अरुणकाका वडिलांच्या आठवणीने खूपच सद्गदित झाले होते. आजवर प्रपंच्याचा गाडा ओढताना वडिलांनी आपल्या मनातील ज्या सुप्त इच्छाना तिलांजली दिली होती त्यातील एक म्हणजे भटकंती. आजवर वडीलांचा फक्त तापट स्वभाव पाहणाऱ्या त्यांच्या मनास, आपले छंद बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणारया आणि त्यांच्याच सुखात आपले सुख मानणारया आपल्या वडिलांचा संवेदनशील स्वभाव स्पर्शून गेला. मुलाबाळांसाठी आयुष्य वेचणार्या त्यांच्या वडिलांना अशी पोस्ट कार्ड पाहूनच समाधान मानावे लागले होते.
Generations Together

आयुष्य हळूहळू पुढे सरकत होते .कालांतरानी रुपारेल कॉलेज मध्ये सायकोलोजी ह्या विषयात पदवी प्राप्त झाल्यावर काकांनी अनेक ठिकाणी उच्च पदांवर आपला कार्यभाग सांभाळला. वयाच्या 55 च्या आसपास आपल्या कौटुंबिक जबाबदार्यामधून मुक्तता मिळाल्यावर त्यांनी भटकंतीचा श्रीगणेशा केला. पहिला प्रवास अगदी जवळच महाबळेश्वर ,माथेरान ,लोणावळा. मग पुढे दिल्ली आग्रा, नेपाळ पाहत सर्व महाराष्ट ,भारत पिंजून काढला. वर्षभरातील लहान मोठ्या सुट्ट्यांचे कॅलेंडर बघून प्रवासाची आखणी ते आधीच करू लागले. सर्वात पहिली परदेशवारी 1990 साली SEA( South East Asia) मधील देशांची झाली आणि मग तिथून अव्याहतपणे अनेक देशांची भटकंतीची शृंखला गुंफली गेली. प्रत्येक ठिकाणचा नुसताच निसर्ग नाही तर तेथील संस्कृती, राहणीमान, जनजीवन नकळत आपल्यालाही प्रभावित करते. घराबाहेर पडल्यावर खर्या अर्थाने शिक्षण सुरु होते ते हे असे.

                 आपल्या प्रवासातील आठवणीना उजाळा देत त्यांनी भावलेला ,अचंबित करणारा किस्सा सांगितला. उझबेकिस्तान येथे पर्यटन करताना त्यांना भारतीय म्हणून मान मिळाला .त्यांच्या ग्रुप मधील चालू असलेला हिंदी संवाद तेथील एका मुलीने ऐकला .ह्या मुलीने हिंदी विषयाचा अभ्यास दिल्ली येथून केला असल्याने तिला हिंदी समजत होते . आपल्याकडे भारतातील पर्यटक आले आहेत हे ऐकून तेथील स्थानिक लोकांनी तेथील रीतीरीवाजाचा मान राखून त्यातील काहीना आपल्याकडील मौल्यवान वस्तू देवून गौरविले. आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडेल तिला आपल्याकडील सर्वात आवडणारी वस्तू भेट म्हणून देणे हा येथील रिवाज आहे. ह्या आपलेपणामुळे सर्वच मंडळी सद्गदित झाली होती. काही अनुभव खूपच रोमांचकारी होते .इटलीमध्ये काही प्रवासी महिलांचे हरवलेले passport, visa हे केसरीच्या सौ. सुनीला पाटील ह्यांनी अगदी सहजपणे अत्यंत अल्प काळात पुन्हा केले , हे सांगताना त्यांनी सुनीला च्या चेहऱ्यावर असलेल्या Winning Smile " चा आवर्जून उल्लेख केला. एक ना दोन ,काकांच्या अनुभवाची पोतडी असंख्य अनुभवांनी ओतप्रोत भरली होती, त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे मनात असूनही शक्य नाही. काही विशिष्ठ ठिकाणी कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. काकांनीही स्वित्झर्लंड, आईसल्यांड आणि न्यूझीलंड इथे पुन्हा जायची मनीषा बोलून दाखवली. त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा त्यांना अनेक अनुभवातून घेवून गेली. कैलास मानससरोवर येथे सरोवरात डुबकी मारून कैलासाकडे पाहून अर्ध्य देताना त्यांना आलेली आपल्या वडिलांची आठवण सांगताना त्यांच्यासोबत माझेही मन हेलावून गेले. त्यांच्या ह्या संपूर्ण जगप्रवासात अदृश्य रूपाने त्यांना भटकंतीची प्रेरणा देणारे त्यांचे वडील त्यांच्यासोबत असतील आणि त्यांच्या डोळ्याने हे नितांत सुंदर जग डोळे भरून पाहत असतील हे नक्की.



गेल्या ३० वर्षात ८२ पेक्षा जास्ती देशात पर्यटन करताना आलेल्या अनुभवांची शिदोरी त्यांना समृद्ध करून गेली. जीवनाची मुल्ये त्यांना मैलोमैल केलेल्या प्रवासातच सापडली. दुर्दम्य
इच्छाशक्ती, प्रवासाची उपजत असलेली आवड ,आणि समोर आलेल्या परिस्थितीला तक्रार न करता स्वीकारून पुढे जाण्याचा स्वभाव त्यांना जगप्रवासाचा आनंद लुटण्यास पूरक ठरला. ऑगस्ट 2000 मध्ये कैलास मानससरोवर यात्रेहून परतत असताना जीवावर बेतलेला प्रसंग खूपच हृदयद्रावक होता. त्यांची जीप उलटली पण ३५०० फुट दरीत गेली नाही हे अहोभाग्य आणि पूर्वपुण्याई. त्यात सहप्रवासी असलेल्या इटालीयन नर्स ने आपली कुठलीही बोलीभाषा येत नसतानाही सर्वांची प्रार्थमिक शुश्रुषा केली तो प्रसंग माणुसकीचे दर्शन घडवणारा होता.


नाबाद ८२ टूर्स च्या उंबरठ्यावर अजून त्यांचे पचमढी आणि चित्रकुट येथील धबधबा पाहायचे राहून गेले आहे . तसेच रशियातील मोस्को ते व्लाडिव्होस्टॉक ह्या मार्गावर अत्यंत जलदगतीने धावणारया सायबेरीयन रेल्वेतील प्रवासाचा रोमांचककारिक अनुभव त्यांची कन्या सौ. सुप्रिया पिळगावकर हिच्या सोबत  नजीकच्या काळात अनुभवायचा त्यांचा मानस आहे. गेल्या कित्येक वर्षात जगभरात प्रवास करताना त्यांचे सहप्रवासी होते त्यांचे कुटुंबीय ,मित्र मंडळी. कालांतरानी प्रवासातील झालेल्या ओळखीच्या लोकांनी त्यांचे कुटुंब मोठे केले. पण त्यांचा सर्वात लाडका सहप्रवासी ,त्यांची लाडकी नात म्हणजेच आज अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाचा विशिष्ठ ठसा उमटऊ पाहणारी श्रिया पिळगावकर. लाडक्या नातीबद्दल भरभरून बोलत असताना “प्रवासात ती माझी फारच काळजी घेते”  अशी प्रेमळ कबुलीही त्यांनी दिली.

No age bar for Travelling and Adventures

मंडळी ,जगभरातील पर्यटनाचा आनंद त्यांनी प्रामुख्याने केसरी टूर्स , वीणा वर्ल्ड, अनुभव यात्रा, ग्लोबस टूर्स, कॉस्मोस टूर्स ह्या पर्यटन संस्थांसोबत लुटला. आज त्यांचे वय ८० च्या उंबरठ्यावर आहे पण तरुणांना लाजवेल अशी धडाडी , जिद्द आहे आणि प्रवासाने त्यांना चिरतरुण ठेवले आहे ह्यात शंकाच नाही. अजूनही त्यांची भटकंती संपलेली नाही आणि ती कधीच संपणारही नाही.
प्रत्येकाला निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा आणि आयुष्याच्या संध्याकाळी करायचे तरी काय? असा प्रश्न भेडसावणार्या सर्वांसाठी अरुणकाकांची भटकंती नक्कीच प्रेरणा देवून जाईल . काकांनी आपली सेकंड इनिंग आपल्या भटकंतीमुळे कुणालाही हेवा वाटेल इतकी बहारदार केली. आपल्या हसतमुख स्वभावाने आणि लाघवी बोलण्याने ते कुणालाही क्षणात आपलेसे करून टाकतात तरीही सर्वात असून आपला रंग निराळा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ठ खास करून सांगावेसे वाटते.
A Proud Father with " लाडकी लेक आणि सहप्रवासी "


भटकंतीचे वेड असलेल्या सर्व पर्यटकांना काय सांगाल ह्या माझ्या प्रश्नावर हसून ते म्हणाले , अग प्रत्येक पर्यटकाने एक लक्ष्यात ठेवावे कि आपण कष्टाने मिळवलेला पैसा खर्च करून जेव्हा पर्यटनास घराबाहेर पडतो तेव्हा मुळात कुठल्याही गोष्टीची तक्रार करणे घरीच ठेवून यावे, प्रवासाचा खर्या अर्थाने आनंद घ्यावा आणि तो सह्प्रवाश्यानाही घेवू द्यावा, अनेक मित्र जोडावेत ,खाण्यापिण्याच्या जेवणाच्या कसल्याही तक्रारी करू नये, एकमेकांचे अनुभव ऐकावेत आणि त्यांना आपले परम मित्र करावे. एवढे केले कि प्रवास खर्या अर्थाने सुफळसंपन्न झाला असे समजायला हरकत नाही.


      खरच मंडळी ,पर्यटनाचा आणि त्यातील आलेल्या अनुभवांचा आनंद काकांच्या चेहऱ्यावर दुथडी भरून वाहत होता. आज जणू अनुभवांची , विचारांची सुरेल मैफल जमली होती कधीही न संपणारी. मी त्यांच्यापेक्षा सर्वार्थाने लहान असूनही त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. मंजिरी काकू यांनी केलेल्या उत्तम आदरातिथ्याने मी मनापसून भारावून गेले. खरच, पर्यटन आपल्याला नुसतेच जगायला शिकवत नाही तर जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देते. त्याचबरोबर नवीन ध्येये आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही. खरच जग इतके सुंदर आहे कि ते पूर्णपणे पाहायला, अनुभवायला एक जन्म खचितच अपुरा आहे. पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून आणि काकांपासून प्रेरणा घेवून सुरु करुया आपली भटकंती ....कधीही न थांबण्यासाठी.

काका तुमची हि सप्तखंडातील भ्रमंती सर्व वाचकांना प्रेरणादाई ठरेल यात तिळमात्र शंका नाही . आपल्या पुढील प्रवासासाठी माझ्या आणि सर्व वाचकांतर्फे मनापासून शुभेछ्या.

लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा
antarnad18@gmail.com