Monday, 23 April 2018

ज्योतिष- एक अनुभूती.



॥ श्री स्वामी समर्थ॥


मानवी जीवनावर परिणाम करणारे अंतराळातील ग्रह


ज्योतिष- एक अनुभूती.


मंडळी ,

       ज्योतिष हे पूर्वापार अनादि काळापासून चालत आलेले शास्त्र. प्रत्येक व्यक्तीस मग तो कुणीही असो आपल्या भविष्यात काय दडलय हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असतेच असते. ज्यांचा ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांना  काहीच सांगणे नाही.असो.

       तर अथांग महासागरा सारखे ह्या शास्त्रात जितके खोल शिराल तितके कमीच आहे. ज्योतिष शास्त्राचा नेमका उपयोग करून आपण आपले जीवन नक्कीच अधिकाधिक आनंदी करू शकतो, परंतु त्याचा नेमका उपयोग  कधी आणि कसा करायचा ह्याबाबत अनभिज्ञता दिसून येते. ह्या शास्त्रावर खूप पुस्तके, CD, ebook सर्व काही उपलब्ध  आहे ,तसेच ह्या शास्त्राची ओळख करून देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था हि आहेत. पण हे सर्व करून ,४ पुस्तके वाचून खरच ज्योतिषी होता येते का....तर नाही. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास , साधना, अध्यात्मिक बैठक आपल्याला जातकाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यास मोलाची ठरते. 

       एखाद्याच्या आयुष्यावर बोलणे खरच इतके सोप्पे आहे का ? अनेक वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत असूनही समोर आलेल्या प्रश्नकर्त्याच्या “मला नोकरी कधी मिळेल ? “ किंवा “माझा विवाह कशी होईल ? अश्या किंवा तत्सम प्रश्नाचे उत्तर अचूक देता आले नाही तर काय उपयोग ??

       आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना बरेचदा जीव मेटाकुटीला येतो, मन निराश, दिशाहीन होते आणि हा गुंता सोडवण्यासाठी बरेचदा आपण ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो. पण खरोखरच आत्यंतिक गरज असल्याशिवाय ह्या शास्त्राचा उपयोग करू नये. लोकांना हल्ली खूप कमी पेशन्स राहिला आहे ,चालायचंच हल्ली Instant चा जमाना आहे ना , ”त्यामुळे पी हळद हो गोरी “ ह्या उक्तीला धरून ज्योतिषाला आपल्या प्रश्नाचे त्वरित उत्तर पाहण्यास अगदी भंडावून सोडणारे कित्येक जण आपल्याही परिचयाचे असतील. ज्योतिष शास्त्राला जशी बंधने आहेत तसेच आपल्या प्रश्नांनाही मर्यादा असणे गरजेचे आहे. मुळात आपण ज्योतिषाला कुठला प्रश्न विचारत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे.


      एखाद्या मुलाचा अनेक वर्ष विवाह ठरत नसेल ,स्थळे पाहणे चालू असेल पण सुयोग्य जोडीदार मिळत नसेल आणि अश्यावेळी त्यांनी विवाहासंबंधी प्रश्न विचारला तर योग्य, परंतु त्याच्याच बरोबर आपल्या दुसरयाही मुलाची ,जो अजून शालेय शिक्षण घेत आहे त्याचीही “आलेच आहे तर त्याचीही पत्रिका जरा बघून घ्या .त्याच्या विवाहाचे काय “ असे सलग्न प्रश्न विचारणे अत्यंत चुकीचे आहे. जिथे तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न करून त्यानंतर ह्या शास्त्राची मदत घेतलीत तर अयोग्य नाही ,उलट अश्यावेळी हे शास्त्र तुम्हाला दैवी मार्गदर्शन करेल पण उगीच चाळा, timepass म्हणून ह्या शास्त्राकडे कदापि पाहू नका हि माझी सर्व जातकांना विनंती आहे. नसेल विश्वास त्यांनी तर वळूनही बघू नका पण त्याचबरोबर टिंगलहि करू नका ...सोडून द्या .जगात सर्वच गोष्टी सर्वाना पटल्याच पाहिजे असा कुणाचाच अट्टाहास नसावा.
      
       ज्योतिष शास्त्रात विवाह होईल का नाही हे ठरवणारे असंख्य योग आहेत .. त्यामुळे ह्या शास्त्राचा खरच गाढा अभ्यास असणे तितकेच आवश्यक आहे. माझ्या ओळखीचे एकजण मला म्हणाले कि माझ्या मुलाचा प्रेमविवाह होणार असे एकाने सांगितले आहे ,बघुया चिरंजीव आता काय दिवे लावतात शेवटी कलियुग आहे . मी म्हटले अहो ते सर्व ठीक पण प्रेमविवाहाचा योग आहे हे सांगणाऱ्याने आधी मुळ पत्रिकेत विवाहाचाच योग आहे का ते पाहिलंय का? सांगायचे तात्पर्य कि मुळात पत्रिकेत जर विवाहाचाच योग नसेल तर प्रेमविवाह कसा होईल ? बयाच लोकांना सवय असते समोरच्याला ज्योतिष येतंय ह्याची नुसती कुणकुण जरी लागली तरी त्याच्या मागे हात धुवून लागतात .अहो माझ जरा बघा ..अहो काय बघा? उगीच..खेळ आहे कि काय हा? . आज समाजातील घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे .विवाह ठरण्या पूर्वी अगदी पत्रिकेतील ३६ गुण जुळवून केलेली लग्नेही काही कालावधीनंतर न टिकणे हि एक समस्याच आहे. पत्रिकेत गुण मिलनापेक्षा ग्रह मिलन होणे गरजेचे आहे पण तेच न केल्याची काय परिणीती होते ते आपण पाहतोच आहोत.
       
      बरेच लोक दर दोन दिवसांनी कुठल्याना कुठल्या तरी ज्योतिषाच्या घराची पायरी चढताना आपण पाहतो ,ऐकतो. असे का होत असावे ? कारण पहिल्याने जे सांगितले त्याने कदाचित त्यांच्या मनाचे समाधान झाले नसावे.आणि समाधानाची त्यांची व्याख्या म्हणजे त्यांना सुखावणारी ,अपेक्षित असणारी उत्तरे.  आपण ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवायला जात आहोत तो ह्या शास्त्रातील पूर्णतः जाणकार आहे ह्याची खात्री पटवून मगच गेले पाहिजे, मुळात ह्या शास्त्रावर आपली श्रद्धा ,विश्वासही असायला हवा त्याचबरोबर ज्योतिषाबद्दल सुद्धा मनात कुठलाही संदेह नसावा मग पुन्हा पुन्हा अनेक जणांकडे जाऊन पत्रिका दाखवायची वेळच येणार नाही.  

     ह्या शास्त्राचा सखोल अभ्यासक ,जाणकार हा तुम्हाला अपेक्षित उत्तर सांगणार नाहीत तर तुमच्या नशिबात जे आहे ते खर सांगतील किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे  एखादी पत्रिका बघताना ती बघणाऱ्याच्या ज्ञानाचाही कस लागतोच .खरतर एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर ज्योतिषाने योगच नाही हे खरे सांगून टाकावे. जातकाचा अपेक्षाभंग, मानसिक त्रास जरूर होईल पण कालांतराने त्याचे मन घट्ट होवून तो आपल्या आयुष्यातील reality स्वीकारेल, तसेच अजून अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवणे तरी थांबवेल.  मुळात विवाह योग नसताना उगीचच तुमच्या पत्रिकेत गुरु लग्नस्थानात आला कि विवाह होईल हे सांगण्यात काहीच अर्थ नाही ,कित्येक वेळा गुरु लग्नी किंवा सप्तमेशावरून जाऊनही विवाह होत नाही आणि मग अश्यावेळी ह्या शास्त्रावरून प्रश्नकर्त्याचा विश्वासही उडू शकतो.  तुमचा विवाह येत्या २-३ वर्षात होईल अशी चुकीची उत्तरे दिल्याने समोरच्या आशाही वाढतात आणि तश्या घटना न घडल्यामुळे पुढे त्या व्यक्तीस जास्त त्रासदायक ठरू शकतात , त्यामुळे प्रामाणिक उत्तर देवून ह्या शास्त्राचा सन्मान वाढवावा असे माझे मत आहे.



पत्रिकेतील १२ स्थाने


“Stars Plays a major role in life” ग्रहतारे आपले काम करतच असतात .मुळात पत्रिका म्हणजे काय ? तर आपल्या जन्मवेळी अवकाशात असणाऱ्या ग्रहांची स्थिती म्हणजेच आपली पत्रिका. आणि ह्या पत्रिकेतील ग्रहांची मूळ कधीही बदलत नाही. त्यामुळे त्या पत्रिकेबद्दलचे भाकीतही कसे बदलेल हे साधे logic आहे. पत्रिका हि खाजगी आणि तितकीच अत्यंत पवित्र बाब आहे, दर दोन दिवसांनी कुणाला न कुणाला ती दाखवून त्याचा अवमानच होतो हे लक्ष्यात घ्या.
          
       सर्व साधारणपणे आपली कमाल आयुमर्यादा हि १२० वर्ष मानली जाते ह्यात प्रत्येक ग्रहाचा ठरलेला काल जसा चंद्र १० वर्ष , राहू १८ वर्ष ,मंगल ७ वर्ष , शनी १९ वर्षे याप्रमाणे असतो ह्याला आपण “ महादशा “ म्हणून संबोधतो. जेव्हा एखाद्याला मंगळाची महादशा आहे असे म्हणतो याचाच अर्थ तो ७ वर्षाचा कालावधी त्याच्या आयुष्यात मंगळाच्या अधिपत्याखाली असतो आणि त्या ग्रहाचे बलाबल पत्रिकेत कसे आहे त्याप्रमाणे त्याचा फलादेश असतो.
                   
                   सारांश असा कि ज्योतिष हे एक महान शास्त्र असून हा फावल्या वेळातील timepass चा विषय नक्कीच नाही. ह्या दैवी शास्त्राचा योग्य तो सन्मान ठेवून त्याचा मार्गदर्शन म्हणून आपल्या जीवनात उपयोग करून घेतला तर आयुष्यात अनेक गोष्टी टाळता येवू शकतात, अर्थात सांगणाराहि ह्या शास्त्रात माहीर ,उत्तम जाणकार हवा हे वेगळे सांगायला नकोच. योग्य प्रकारे ह्या शास्त्राचा आपल्या जीवनात उपयोग केलात तर हे शास्त्र तुमच्या आयुष्याचा उत्तम वाटाड्या होईल यात शंकाच नाही. 

                    एखाद्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करून खरोखरच यश नाही मिळाले आणि त्यानंतर ह्या शास्त्राचा आधार घेतलात तर अगदी योग्य perfect उत्तर मिळणार ह्यात शंकाच नाही ...अनुभूती घेवून बघा.


लेख आवडल्यास खालील पत्त्यावर नक्की अभिप्राय द्या

antarnad18@gmail.com

https://www.facebook.com/antarnad18/?ref=bookmarks




Monday, 16 April 2018

प्रवास एका वेगळ्या वाटेवरचा


॥ श्री स्वामी समर्थ॥

चेतन एका मनोरुग्णास भोजन देताना




प्रवास एका वेगळ्या वाटेवरचा....





      मंडळी,
           साधारणपणे शिक्षण पूर्ण झाले कि नोकरी ,पुढे त्यात जरा स्थैर्य आले कि दोनाचे चार हात म्हणजे लग्न आणि संसार..हुशश..झाली एकदाची जीवनाची इतीपुर्तता .असे चाकोरीबध्द जीवन जगणारा तरुणवर्ग आपल्याला परिचित आहे. पण आज आपण अश्या एका तरुणाचा परिचय करून घेणार आहोत कि ज्याने आयुष्यात आपली वेगळी वाट निवडली आहे आणि त्यावर त्याचा अविरत प्रवास सुरु आहे .

             समाजासाठी आणि स्वतःच्या समाधानासाठी काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या “चेतन अशोक पाटील “ह्या संवेदनाशील पण धाडसी तरुणाचे कार्य स्तुत्य तर आहेच पण इतराना प्रेरणा देणारेहि आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चेतनने रस्त्यावरील निराधार मनोरुग्णांसाठी काम करण्याचे ठरवले .मुंबई विद्यापीठातून २००४ साली पदवी घेतल्यावर त्याने वेगवेगळ्या NGO बरोबर काम करण्यास सुरवात केली. अशी वेगळी वाट , जी नक्कीच सोप्पी नाही , निवडावी असे वाटण्याचे कारण सांगताना  चेतन म्हणाला कि त्याच्या कॉलेज मध्ये त्याचा एक मित्र मनोरुग्ण होता आणि त्याच्याबरोबर तो NGO मध्ये जात असे. त्त्याच्याबरोबर कॅरम खेळणे ,त्याच्याबरोबर संवाद साधणे हे करत असताना त्याने ह्या आजाराचा बराच अभ्यास केला त्यातूनच त्याला ह्या लोकांसाठी आपणही काहीतरी करावे हि भावना जागृत झाली. चेतनने अनेक सामाजिक संस्था ,NGO मध्ये काम केले आहे.


ह्या मनोरुग्णांबद्दल चेतन कळवळून बोलत होता. आपण रस्त्यावर अनेक स्त्री पुरुष बघत असतो .मळकट कपडे ,घाणेरडे केस कित्येक दिवसात अंगाला पाणी न लागल्यामुळे शरीराला येणारी दुर्गंधी ,स्वतःच्याच विश्वात वावरणारे आपल्याच कोशात स्वतःला बंद करून घेतलेल्या ह्या लोकांचे भावविश्वच जणू कोलमडलेले असते .स्वताशीच कधी हसताना तर रडताना आपण त्यांना पाहतो तर कधी गटारातील पाणी पिताना रस्त्यावरील केराच्या टोपलीतील अन्न खातानाही आपण पाहतो. त्यांचा मानसिक तोल ढळलेला असतो जणू त्यांची वास्तव जगताशी सर्व बंधने तुटलेली असतात .
त्यांच्या अस्तित्वाशी कुणालाही काहीच पडलेली नसते, चालत्या बोलत्या प्रेतवत अवस्थेत कित्येक वर्ष ते असेच राहतात.


 चेतन रस्त्यांवरती फिरून अश्या मनोरुग्णांचा शोध घेत राहतो आणि असा एखादा रुग्ण मिळाला कि त्यांला घरी केलेले स्वतः बनवलेले जेवण घेवून जातो. साधारणपणे रोज त्याच जागेवर किंवा आसपासच हा रुग्ण त्याला रोज दिसतो .रोज जेवण देणाऱ्या माणसांची त्यांना हळूहळू ओळख पटते आणि त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागतो .काही दिवसांनी मग जवळच्या NGO मध्ये किंवा तत्सम सेवाभावी संस्थेमध्ये त्याची सोय केली जाते. तेथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग यांनी घेतलेल्या काळजीमुळे  तसेच योग्य ते औषधोपचार ह्याना ते प्रतिसाद देवू लागतात . त्यातील अनेकांना शारीरिक आजारही झालेले असतात . काही काळाने हा मनोरुग्ण उपचारांना प्रतिसाद देवू लागल्यावर हळूहळू संवाद साधू लागतो आणि मग अगदी स्वतःच्या घरचा पत्ताही त्याला सांगता येतो .NGO त्याच्या नातेवाईकांना कळवून त्याला त्यांच्या सुपूर्द करतात.

          ह्या आजाराबद्दल बोलताना चेतन पुढे म्हणाला कि हा आजार कुणालाही होऊ शकतो.
"Schizophrenia" म्हणजेच मानसिक आजार हा अंदाजे २५ ह्या वयोगटाच्या पुढेच आढळतो.लहान मुलांमध्ये ह्या आजाराचे प्रमाण आढळत नाही .मेंदूमधे "chemical imbalance"झाल्यामुळे प्रामुख्याने हा आजार बळावतो.असे आजार एखाद्या गोष्टीचा मनावर झालेला खोल परिणाम,स्ट्रेस,विलक्षण दडपण,घरातील अस्थिर वातावरण तर कधीकधी अनुवांशिक अश्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. असे रुग्ण एकदम शांत होतात तर कधी स्वतःशीच बडबड करतात. आपल्याला कुणीतरी मारणार आहे असे त्यांना भास होत राहतात .हि एक मनाची अवस्था आहे आणि अश्याप्रकारची लक्षणे आपल्यातील जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींमध्ये दिसली तर त्यांना वेडे न ठरवता त्यांना समजून घेवून वेळीच त्यांच्यावर योग्य उपचार केले तर त्यांचे आयुष्य वाचू शकते.कारण एकदा वेळ गेली तर असे रुग्ण घरातून निघून जाण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम पुढे त्यांच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबावरही होतोच. अश्या रुग्णांसाठी कुठल्या उपचार पद्धती आहेत का ह्यावर चेतन म्हणाला कि नक्कीच आहेत आणि NGO रुग्णांवर सर्वतोपरी उपचार करतेच. रुग्ण बरे होवून घरी गेल्यावरही त्यांच्या सर्व औषधांचा खर्चही NGO करतात कारण बरेचदा रुग्णांचे कुटुंबीय अनेक कारणांनी हा खर्च करण्यास असमर्थ असतात .

           हा आजार पूर्ण बरा होवून घरी गेलेल्या रुग्णांचे प्रमाण चांगलेच आहे हे सांगताना त्याने सांगितले कि बिहार मधील एक रुग्ण घरातून पळून गेला होता पण NGO च्या मदतीने पूर्ण बरा होवून स्वतःच्या सख्या बहिणीच्या लग्नाच्या अगदी आदल्याच दिवशी घरी पोचला तेव्हा घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता ,संपूर्ण गाव त्यास भेटायला आणि आनंद साजरा करायला आले होते.


आज चेतन रोज १० ते १२ मनोरुग्णांना स्वतःच्या हाताने बनवून जेवण देत आहे .त्याच्या घरूनही त्याला ह्या कार्यासाठी प्रोत्चाहन मिळाले आहे तसेच ज्यांना शक्य असेल ती मंडळी तांदूळ, डाळ, Biscuits अश्या प्रकारची मदत करत आहेत .
नोव्हेंबर २०१६ मध्ये चेतनने ह्या कार्यातील पुढचे पाऊल उचलत “प्रकाश फौंडेशन “ ह्या स्वतःच्या NGO ची स्थापना केली आहे. सध्यातरी स्वतःच्या उत्पन्नातून तसेच समाजातील अनेकांकडून ह्या कार्यात धान्य, फळे, biscuits ई. गोष्टींची मदत मिळत असल्याने हे कार्य घरूनच होत आहे. परंतु लवकरच ह्या उपक्रमास मूर्त स्वरूप येण्यासाठी कायम स्वरूपी जागा घेऊन तिथे १०-१२ रुग्णांची सोय होईल तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर ई सर्व गोष्टींसाठी लागणारी शासनाची मदत आणि आर्थिक पाठबळ ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
                      
                     अगदी आपल्यासारखेच आपल्यातलेच काहीजण, जे काही कारणामुळे आपले सर्वस्व हरवून बसले असले आहेत, त्यांची सेवाशुश्रुषा करुन त्यांना पुनश्च जीवन संजीवनी मिळवून देण्याचे जगावेगळे कार्य करत असणाऱ्या चेतन समोर मीच काय आपण सर्वच नतमस्तक व्हाल यात शंकाच नाही. प्रपंच, त्यातील भौतिक सुखे ,मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, ऐशोआराम ह्या सर्व सुखांवर स्वखुशीने तुळशीपत्र ठेवून ह्या मनोरुग्णांसाठी आयुष्य खर्ची करण्याचा निर्णय खचितच कौतुकास्पद आहे. मी NGO मध्ये काम केले आहे हे Certificate मिळवण्यासाठी काम करणारे अनेक आहेत .पण निस्वार्थीपणे स्वतःला ह्या कार्यात झोकून देणारे असंख्य चेतन तयार होणे हि काळाची खरी गरज आहे.


आपले अनुभव सांगताना चेतन सांगतो हे रुग्ण बरे झाल्यावर स्वतःच्या घरचा पत्ता सांगू शकतात आणि जेव्हा त्यांच्या कुटुंबाशी त्यांची पुन्हा गाठभेट होते तो क्षण खरोखरच इतका आनंदाचा असतो कि तो शब्दांकित करता येणे केवळ अशक्य आहे ,तो फक्त अनुभवायचा असतो. चेतनला ह्या कार्यांत मनापासून समाधान मिळत आहे. पण आज ह्या मनोरुग्णांसाठी असलेल्या NGO आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे हि खंत त्याने बोलून दाखवली.  मुळातच हा आजार मनात वाढत असताना कौटुंबिक स्थरावर आप्तस्वकीयांनी अश्या व्यक्तींकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेवून ह्यातून बाहेर पडण्यास मदत करावी आणि सामाजिक स्थरावरही एक सामाजिक बांधिलकी म्हणून अश्या लोकांशी तुसडेपणाने न वागता त्यांना मदत करावी असे आवाहन करताना त्याने सांगितले कि असे मनोरुग्ण आढळल्यास जवळच्या NGO किंवा तत्सम संस्थेत सूचना द्यावी जेणेकरून त्यांची पुढील व्यवस्था तिथे होवू शकेल .
                 मानसिक आजार हि समस्या गंभीर आहे पण हा आजार पूर्ण बरा होणार आहे आणि ह्यासाठी एक सामाजिक  बांधिलकी म्हणून सर्वांनी आपल्या परीने त्यात योगदान देण्याची गरज आहे.
                मंडळी, एखादी संकल्पना , मग ती कुठलीही असो ,त्याचा ध्यास घेवून ,त्याचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात उतरवणे हि सोप्पी गोष्ट खचितच नाही. चेतनने हे जगावेगळ्या कार्याचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे ,त्याला ह्या कार्यात हा लेख वाचणाऱ्या प्रत्येका कडून सर्वार्थाने मदत व्हावी तसेच त्याच्या “प्रकाश फौंडेशन “ ह्या संस्थेची संस्मरणीय वाटचाल व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना.

आपल्यापैकी कुणालाही कसल्याही प्रकारे ह्या कार्यास हातभार लावायचा असेल तर येथे संपर्क साधा.


Chetan Patil

Prakash  Foundation
Follow : facebook.com/prakash-foundation

ह्या लेखाचे अभिप्राय पाठवण्यासाठी





  














Friday, 13 April 2018

सेवा करा सेवेकरी व्हा


 ॥ श्री स्वामी समर्थ॥


   



      सेवा करा सेवेकरी व्हा



              गुरुविणा जीवनात कोण येयील कामी
              खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी
              जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती
              गुरुपदी घेवू चला क्षणभर विश्रांती.....

                            
                                   माझ्या आत्ते सासूबाई सौ. उषाताई आपटे यांनी सर्वप्रथम श्री. गजानन विजय ग्रंथ माझ्या हातात दिल्यामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. त्यांनतर अनेक ग्रंथांचे वाचन ईश्वरी कृपेने झाले. प्रत्येक गोष्टीची आयुष्यात वेळ ठरलेली असते त्याप्रमाणे माझ्या ह्या अध्यात्मिक प्रवासालाही तेव्हापासूनच सुरवात झाली. आज दत्तसंप्रदायात सेवेत असणारे लाखो भक्त आहेत. ७-८ वर्षापूर्वी अक्षरशः खेचून घेतल्यासारखा माझा श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाण्याचा योग आला आणि जीवन कृतार्थ झाले. माझा श्वास असणाऱ्या माझ्या गुरुंचा समाधी दिन असला तरी “ हम गया नही जिंदा है “ ह्या स्वामी महाराजांच्या वचनाचा प्रत्यय त्यांच्या सर्व भक्तांना आजही प्रत्येक क्षणी येत आहे. महाराजांविषयी मी पामर काय लिहिणार..खरतर “स्वामी “ ह्या एका शब्दातच जीवनाचा सखोल अर्थ दडलेला आहे.  तू सगळा अहंकार मीपणा सोडून तो स्वाहा करून त्याची आहुती देवून माझ्या चरणाशी ये आणि मग पहा मी तुझे जीवन कसे आनंदाने फुलवतो असे तर त्यांना त्याना आपल्या भक्तांना सांगायचे नसेल ना..

                                   स्वामी समर्थ ,गजानन महाराज ,साईबाबा ,गोंदवलेकर महाराज ,शंकर महाराज हि नावे जरी वेगळी असली तरीहि शक्ती ,गुरुतत्व एकच आहे ..आणि त्यांच्या लीला आपल्या सामान्य भक्तांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आहे खरतर हे आपले अहोभाग्या म्हंटले पाहिजे...स्वामीनी स्वतः सांगितले आहे अनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् “ म्हणजे जो माझी अनन्यभावे सेवा करेल त्याचा योगक्षेम अर्थात प्रपंच मी स्वतः चालविन.

 आजकालच्या आपल्या रुटीनमध्ये तासंतास नामस्मरण ,पूजा करणे शक्य नसले तरीही रोज आपल्या हातून काहीनाकाही सेवा करून आपला पुण्यसंचय झाला पाहिजे .”देवाचिये द्वारी उभा क्षणभरी “ ह्या युक्तीला धरून खरोखरच अंतर्मानापासून स्वामिना हाक मारून तर पहा तत्क्षणी धावून येतील ते, हा माझाच काय आपल्या पैकी कित्येक वाचकांचा अनुभव असेल. अहो ते द्यायलाच बसलेले आहेत फक्त आपल्याला घेता आले पाहिजे आणि त्यासाठी मनाचे शुद्धीकरणही हवे...अध्यात्माचे संस्कार आपल्या मनात खोलवर रुजायला हवेत..आपली मनापासून केलेली सेवा हि त्यांच्या चरणाशी रुजू होतेच होते.. हि सेवाही अपेक्षा विरहित असावी ..खरतर हे सर्व लिहायला सोपे आहे .प्रत्यक्ष्यात तसे होत नसले तरी प्रयत्न जरूर करावा  .शेवटी आपण सामान्य माणसे..प्रपंचातील अडचणीनी माणूस त्रस्त होतो आणि शेवटी परमेश्वर चरणी नतमस्तक होतो. ..कुठल्यातरी गोष्टीची मनी आस धरून सेवा करूच नये, महाराजाकडे भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक सुख मागावे हे मला इतक्या वर्षांच्या सेवेने समजले आहे.कुणाच्याही डोळ्यातून पाणी न काढता जगा परमेश्वर अनंत हाताने तुम्हाला द्यायलाच बसला आहे ..जीवनातील भोग हे शेवटी भोगूनच संपवायचे आहेत आणि ते भोग सुसह्य व्हावेत ह्यासाठी तर अध्यात्म आहे. आपल्याला कधी काय द्यायचे ते त्यांच्या इतके जास्ती चांगले अजून कुणास समजणार कारण त्यांनीच तर घडवले आहे आपल्याला ..अहो आपल्या बुद्धीची झेप असून ती कितीशी असणार आहे .ज्यांचे आपल्या श्वासावरही अधिराज्य आहे त्यांच्याकडे काय मागायचे .. आपण कितीही काही मागितले तरी स्वामी आपल्याला काय हवे आहे त्यापेक्षा जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देणार ह्यात तिळमात्रही शंका मनी असू नये.

                                   पण तरीही आपले त्यांच्याकडे मागणे अविरत चालूच असते...आपले सर्व अवयव धड आहेत मग अजून मागण्यासारखे काहीच राहिले नाही ...स्वामिनी सांगितले आहे “शेत पिकवून खा ..आयते बसून खाणाऱ्यानावर स्वामीची कृपा होणे कठीणच. .आपण लहान भांडे घेवून गेलो आणि नशिबात त्यापेक्षा जास्ती असेल तर ते भांडे ओतप्रोत भरून वाहू लागेल आणि मोठे भांडे घेवून गेलो तर वाटेल अर्धेही भरले नाही तेव्हा शेवटी त्या परमेश्वराकडे किती आणि काय मागायचे ह्यालाही मर्यादा हवीच कि. सर्वात महत्वाचे म्हणजे नखशिखांत असलेला मी पण गेला पाहिजे जो आपल्यात ओतप्रोत भरलेला असतो. अहं गेल्या शिवाय परमेश्वर प्राप्ती नाही हे निश्चित . ८४ लक्ष्य योनीतून मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि मिळालाच तर तो सार्थकी लागणे त्याहून कठीण ...संपूर्ण आयुष्य सेवेत राहून आपल्या मनावर चढलेली हि स्वार्थाची ,अहंकाराची पुटे नष्ट होयीपर्यंत आपली इहलोक सोडायची वेळ येते. मनुष्याने कायम साधनेत ,नामात राहावे..साधनेतून लागते ती समाधी आणि ती एकदा लागली कि आपण आपले राहातच नाही ..जन्माचे सार्थक होते आणि आनंदाची जणू समाधीच लागते, आनंदाचे डोही आनंद तरंग अशी मनाची अवस्था झालेल्या मनास सुख दुखाच्या ,मोहमायेचा सगळ्याचा जणू विसर पडतो आणि तिथेच भेट होते ती आपल्या सद्गुरूंची.

                                   इथे कुठलीही गोष्ट शाश्वत नाही ,आपला श्वासही आपल्या हाती नाही त्यावर सत्ता आहे ती सद्गुरूंची त्यामुळे जोवर तो श्वास चालू आहे तोवर सेवा चालू ठेवणे हेच आपल्या हाती आहे. आजकाल थोड्याश्या सेवेने सुद्धा आपल्याला खूप काही समजले आहे अश्या अविर्भात मंडळी वावरताना पाहून खरच मनास यातना होतात ....स्वामी हे २ शब्द म्हणायची सुद्धा खरतर आपली लायकी नाही ...परंतु लायक होण्यासाठी निस्वार्थीपणे सेवा करून मिळालेल्या संधीचे सोने करणे इतकेच आपल्या हातात आहे

                    स्वामींचा तारक मंत्र म्हणजे स्वमिभक्ताना स्वामिनी दिलेलं अभिवचनच आहे. नावाप्रमाणेच अत्यंत मनापासून हाक मारली तर ते आल्याशिवाय कसे राहतील...पद्मश्री सौ पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी त्यांच्या दैवी अलौकिक स्वरात गायलेला “स्वामी तारक मंत्र “ ऐकताना महाराज जणू आपल्यासमोर उभे ठाकले आहेत हि विलक्षण अनुभूती मिळते. त्यातील प्रत्येक शब्द भक्तांना “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “ ह्या वचनाची जणू ग्वाही देतो.
.
                                 माझ्या ह्या ब्लॉगची निर्मिती, हा मी स्वामींचा प्रसादच समजते...लेखणी माझ्या हाती असली तरी लिहून घेणारे स्वामीच आहेत ह्याचा क्षणभरही विसर नाही आणि म्हणूनच प्रत्येक लेख त्यांच्याच चरणी ठेवते ..आपल्याला ४ लोक येवून नमस्कार करायला लागतात तीच आपल्यासाठी खरी परीक्षेची वेळ असते...त्यामुळे आपल्यातील अहं जोपासला जातो आणि आपण जणूकाही महाराजच असल्याच्या अविर्भावात आपण वागू लागतो ..आपल्याला महाराजांच्या सर्व परीक्षात पास व्हायचे असेल तर “आपले महाराज फक्त एकच सद्गुरू श्री स्वामी समर्थ “ हि भावना मनात पक्की असुदे ....महाराज होण्याचा अट्टाहास न करता आपण उत्तम सेवेकरी कसे होवू ह्याचा विचार करुया आणि त्यासाठी जन्मभर सेवेतच राहूया.

                                 महाराजांचे पट्टशिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी आपल्या “गुरुस्तवन स्तोत्रात “ म्हंटले आहे माझ्याकडून कायेने,वाचेने आणि मनाने जी पापे झाली असतील ती माफ करून मला क्षमा करा ,तारा...आपल्या सेवा आपल्याला ह्या जन्म मृत्यच्या फेर्यातून बाहेर काढील यात कुठलीही शंका नको.



 आज स्वामी पुण्यतिथी आहे.. आपल्याला झेपेल, रुचेल आणि रोज सहज शक्य होईल    असा एखादा संकल्प मनाशी ठरवून त्याचे सातत्याने पालन करणे हीच आपल्या भक्तांची     महाराजाना आदरांजली ठरेल.

   मला ह्या जन्मी स्वामिसेवा करण्याची संधी त्यांनी दिली ,खरच माझा जन्म कृतार्थ झाला.     जे  जे झाले आहे आणि जे जे होणार आहे ते त्यांच्याच कृपेने ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्याकडे मागण्यासारखे खरच काहीच राहिले नाही इतके भरभरून त्यांनी दिले आहे ..मानसिक समाधान आणि रात्रीची शांत झोप ..अजून काय हवे ..

                                 सकाळी केलेली पूजा आपल्या उरलेल्या दिवसभराच्या दिनक्रमात दिसली पाहिजे .सकाळी पूजा करून आपण दिवसभरात कुणाला त्रास देत असू ,ट्रेन मध्ये बसायला जागा करून न देता ४थ्या सीट वरती आपली भगिनी कशी बसणार नाही , आपल्याकडे पैसे असतानाही दुसर्याचे देणे द्यायचे नाही ,आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा अवमान करत असू तर आपण कितीही सेवा केली तरी त्याला अर्थ उरणार नाही....प्रत्येक मनुष्यात आपण स्वामी पाहायला शिकले पाहिजे तरच काहीतरी बदल अपेक्षित आहे.
                                 चला तर मग  अंतर्मानापासून अनन्यभावे त्यांच्या चरणी समर्पित होवूया कारण महाराजांनीच भक्ताना आदेश दिला आहे...” सेवा करा सेवेकरी व्हा”.स्वामी समर्थ.

                                 माझ्या आयुष्यात ज्यांनी ह्या अध्यात्मिक मार्गाचे द्वार खुले करून दिले , ज्यामुळे  आज हा अविस्मरणीय आनंद मी अनुभवते आहे , त्या माझ्या सासुबाई सौ उषाताई आपटेह्यांना हा माझा लेख मी अर्पण करते ..



OR

antarnad18@gmail.com



Sunday, 8 April 2018

देवघरातील देवांना घेऊदे मोकळा श्वास..


 ॥ श्री स्वामी समर्थ॥




         देवघरातील देवांना घेऊदे मोकळा श्वास...



काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला भेटण्याचा योग आला.. घरातील देवघराकडे सहज लक्ष्य गेले. मनात असंख्य विचार आले ते तुमच्यासमोर मांडत आहे ...
       आपल्या वास्तूत देवघराला अनन्यसाधारण महत्व आहे... घराचे क्षेत्रफळ कसेही असो परंतु घरात देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणार नाही. देवघराचा आकार तसेच ते लाकडाचे कि संगमरवराचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे....पण त्यातील देवाचे स्थान हाच आजचा आपला विषय आहे.
        मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती त्यांचे फोटो देवघरात दिसले. अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री गेलो कि तिकडची आठवण म्हणून किंवा हौस, आवड म्हणून किंवा त्या देवतेवरील श्रद्धा काहीही म्हणा तेथील मूर्ती ,फोटो घेऊन येतो आणि घरी आल्यावर ती देवघरात ठेवतो. कधी कुणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती, देवीची फ्रेम, चांदीचे देवांचे चित्र असलेले नाणे देतात आणि आपण ते सरळ देवघरात ठेवतो. अश्या प्रकारे मग एकाच देवघरात एकाच देवतेचे अनेक फोटो, मूर्ती होतात...एकाच घरातील चार व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरुंचेही फोटो ,मूर्ती ह्यांचाही समावेश देवघरात असतो ...अश्या देवघराकडे पाहून असे वाटते कि खरच येथील देवांना तेथे मोकळा श्वास तरी घेता येत असेल का? त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्ती एकतर प्रचंड मोठ्या असतात कि मागचे देवच दिसत नाहीत किंवा इतक्या लहान असतात कि अगदी microscope  घेवूनच बघायला लागेल.
         बरेचदा विधिपूर्वक प्रतिष्ठापना न करता  देवघरात देव ठेवले जातात .घरात भिंतींवर इतरत्रही सद्गुरूंचे किंवा इतर देवांचे फोटो असतात. कधीकधी त्या देवांच्या फ्रेम , आरसे दुभंगलेले असतात...देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी रोज पूजाही होत नाही आणि झालीच तर देव गुदमरतील आणि त्यांचे मुखही दिसणार नाही इतकी भारंभार फुले त्यांना वाहिलेली असतात. त्या देवतेला ना कधी नेवैद्य दाखवला जात ना कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो. कित्येक वेळा आपल्या सद्गुरुंची जयंती, पुण्यतिथीहि माहित नसते, हि खेदाची बाब आहे.
         आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी अंघोळ करतोच पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणी हि लागत नाही. “अहो कुठे वेळ असतो हे सोपस्कार करायला आम्ही आमच्या कामातच परमेश्वर बघतो..”हि उत्तरे ऐकायला मिळतात ...पण मग तसे असेल तर मग घरात देवघर तरी कश्याला हवे ? सांगायचे तात्पर्य जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टाहास कश्याला आणि वंशपरंपरागत असलेले देव देवघरात असतील तर social media वरचा थोडा वेळ कमी करून देवपूजा जरूर करावी त्याने आपलेच आयुष्य सुसह्य आणि सुखकर होईल ह्यात तीळमात्रहि शंका नाही . हल्ली अनेक घरात देवांच्या so called antic मूर्ती पाहायला मिळतात आणि निरांजनाच्या ऐवजी zero चा bulb लावलेला असतो.  निरांजनाचे कार्य zero चा bulb खरच करेल का? मुलाचे लग्न झाले कि मुलगी सासरी येताना अन्नपूर्णा ,श्री गणेशाची मूर्ती घेवून येते म्हणजे पुन्हा देवघरातील देवांच्या संखेत वाढ ..आजच्या आधुनिक काळात आपली विचारसरणी आणि life style सुद्धा modest झाली आहे ,तेव्हा मुलीने सासरी येताना माहेरून देवांच्या ऐवजी उत्तम संस्कार आणावेत ज्यामुळे तिचाच संसार सुखाचा होईल असे मला वाटते.
             पूर्वीच्या काळी “देवघरासाठी” अगदी वेगळी खोलीच असे. तिथे सोवळे पाळले जात असे, पूर्वीचा काळ वेगळाच होता . आताच्या modern युगात सगळ्याच संकल्पना बदलत चालल्या आहेत. कुठलीही जागा घेताना किबहुना ती निश्चित झाल्यावर सर्वसाधारण व्यक्ती on a priority  Interior Designer  ला बोलावते. अर्थातच महिला वर्ग पुढाकार घेवून मग स्वयपाकघर व अन्य खोल्यातील Furniture ची रचना करण्यात गुतून जाते. सर्व सुशोभीकरण झाले कि मग उरलेल्या जागेत निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळते हुश्श.....पण मंडळी ,ज्या विधात्यामुळे आपल्याला ह्या वस्तूचा लाभ होतो आहे त्याचे स्थान वास्तुत सर्वप्रथम निश्चित करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे, पण आपण त्याबाबतीत उदासीन आहोत..एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या अज्ञानाचीही (जे आपल्याला प्रगल्भ ज्ञान वाटते ) भर असते ....बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तरदक्षिण देवघर ठेवले जाते .
              मंडळी, ईशान्य दिशा हि देवांची दिशा मानली आहे म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवघराचे योग्य स्थान इशान्य दिशेस असावे जेणेकरून आपण नमस्कार करताना आपले तोंड ईशान्य दिशेस येयील. परंतु तसे शक्य नसेल तर  देवघर हे उत्तरेपासून  पुर्वेपर्यंत कुठेही असले तरी चालते. कुठेतरी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अडगळीत देवघर ठेवू नये . ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे त्याची दृष्टी अमृततुल्य आहे तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे ह्याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
                     परमेश्वराचे अस्तित्व अणुरेणूत आहे...जसा भाव तसा प्रत्यय..देवाला आपल्यासारखा संवाद साधता येत नसेल तरी आपल्या चुकांची जाणीव तो आपल्याला करून देतोच देतो. अनेक जाणकारांशी ह्यावर चर्चा करताना  “ चुकीच्या जागेवर असणारे देवघर “ हेच घरातील अनेक समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले.
                     आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्या. त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजेनेच आपण सर्व गोष्टींचा श्री गणेशा करतो तो श्री गणेश , आपली कुलस्वामिनी , कुलदैवत ,अन्नपूर्णा , गोपालकृष्ण आणि आपले इष्ट दैवत याचा समावेश असावा. देवांच्या मुर्तीही सुबक असाव्यात ,शक्यतो मूर्ती ह्या पंचधातूच्या असाव्यात (त्यात शिसे आणि लोखंड नसावे कारण ते प्रेताचे प्रतिक मानले जाते) परंतु त्याला अमुक एक नियम नाही चांदीच्याही ठेवू शकता पण त्या अगदी लहान किंवा अगदी मोठ्या नसाव्यात. देवघरात देवांच्या मूर्तीची जागा सारखी बदलू नये तसेच देव आसनावर ठेवावेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज साग्रसंगीत पूजा करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही पण निदान रोज देवांवर हळद कुंकू आणि एखादे फुल धूप दीप उदबत्ती ,घंटानाद आणि एका लहानश्या वाटीत साखर ठेवली ,नित्याची प्रार्थना ,नामस्मरण केले तर देवघराचे मांगल्य तर वाढतेच पण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. रोजच्या TV वरील तासंतास चालणाऱ्या मालिका साठी जितका वेळ आपण देतो किबहुना त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ पुजेस लागतो. रोजच्या व्यवहारात आपण घरी येताना ब्रेड –बटर, भाजी , maggi न विसरता आणतो ना तितकाच किबहुना त्याहूनही कमी वेळ पुले आणायला लागतो..
               देवांची पूजा शक्यतो प्रातःकाळी मन प्रसन्न ठेवून करावी.  आपण देवळात दर्शनाला जातो तेव्हा तेथील देवांची पूजा झालेलीच असते ,नाही का?? तसेच घरातील देवांचेही आहे ..आरामात उठून पेपर वाचन चहा नाश्ता टीव्ही वरील सर्व कार्यक्रम (जे नंतरही पाहता येतात )पाहून त्यानंतर देवांचीं पूजा ,मग ती अगदी साग्रसंगीत का असेना,  केली तर अश्या घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होत असावी याचा विचार न केलेलाच बरा. देवघरातील देवांच्या मूर्तींमध्ये ती देवता आपल्या पूजेने, नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते...आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा हवी. दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्तीने करणे हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही लोकांची एकापेक्षा अधिक घरे आहेत त्यांनी ज्या वस्तुत आपण राहत नाही तिथे देवाची मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा.
               तसेच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा व्यवस्थित होत नसेल तर यथाशक्ती त्यांचे विसर्जन करावे .. ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्या मूर्ती ,फोटो पाटावर ठेवून त्यांची धूप दीप नेवैद्य( दही भाताचा) ठेवून पूजा करावी, विसर्जनाचे कारण देवास सांगावे आणि सन्मानाने नेवैद्या सकट वाहत्या पाण्यात (कुठल्यातरी नाल्यात ,माहीमच्या खाडीत नाही) यथाशक्ती विसर्जन करावे.
          
 वर्षातून एकदा आपल्या कुलदेवता व कुलदेवी यांच्या दर्शनास अवश्य जावे व कुळाचार पाळावेत. जेणेकरून आपल्या पुढील पिढीलाही आपले कुलदैवत ,कुलस्वामिनी,गोत्र ह्याची ओळख होईल. घरातील देवपूजा म्हणजे घरातील फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही आणि ते वेळ घालवण्याचे साधनही त्याहूनही नाही. ”बाबा आता काय तुम्ही retire झाला आहात तेव्हा देवपूजेत वेळ जाईल तुमचा .” ..असे न म्हणता खरतर आजकालच्या तरुण पिढीनेच ती करावी म्हणजे मन शांत एकाग्र राहील आणि दिवसभरातील Stress कधीही Stress वाटणारच नाही. करून तर पहा..रोजची देवपूजा हेच आपले मोठे Fixed Deposite आहे जे अखेरी उपयोगाला येणार आहे .
              
                खरतर , आपण so called option ला टाकलेली देवपूजाच आयुष्याच्या अखेरी आपल्याला तारणार आहे आणि त्याने दिलेले हे दोन हात शेवटी त्याच्याच समोर जोडून नतमस्तक व्हायचे आहे हे विसरू नका. शेवटी काय तर काळ कितीही बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना ,जसे घरातील देवघर व देवपूजा, ह्याशिवाय आपली वास्तू आणि पर्यायाने आपले आयुष्य हि अपूर्णच राहणार कारण देव आहेत , देव होते आणि देव राहणारच...शुभं भवतु. 

अभिप्रायासाठी

https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-350841195427839/?ref=bookmarks


OR

antarnad18@gmail.com