|| श्री स्वामी समर्थ ||
मंडळी,
अठरा वर्षापूर्वी माझ्या सासुबाईनी श्री गजानन विजय पोथी माझ्या हातात दिली. त्यानंतर काही दिवसांतच मला श्रीक्षेत्र शेगाव येथे जाण्याचा योग आला. शेगावच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि आयुष्यच बदलून गेले. स्वर्गीय आनंद कुठे असेल तर शेगावात संत गजानन महाराजांच्या पायाशी आणि त्या आनंदाची अनेक वेळा अनुभूती आली. शेगाव संस्थानातील शिस्तबद्ध कारभार , शांतता, भक्तांसाठी रात्रंदिन झटणारे सेवेकरी ह्या सर्वांचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील.
गेली ४५ वर्षा पेक्षाही जास्ती वर्ष शेगाव संस्थानाचा कारभार पाहणारे तेथील प्रमुख मा. श्री शिवशंकर पाटील उर्फ भाऊ ह्यांच्याशी प्रथम भेट माझ्या सासूबाईंच्या मुळेच झाली आणि त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शेगावला गेले तेव्हा तेव्हा होत राहिली .
अत्यंत प्रामाणिकपणे उभे
आयुष्य महाराजांच्या सेवेत व्यतीत केलेले भाऊ चालते बोलते महाराजच आहेत. वारकरी शिक्षण संस्था, इंजिनिअरींग कॉलेज, आनंद सागर प्रकल्प ह्या सर्वांचे योग्य नियोजन , निष्ठावंत सेवेकार्यांच्या मदतीने करताना पाहून अचंबित
व्हायला होते. त्यांची निर्णयक्षमता, शिस्त, धडाडी वाखाणण्याजोगी आहे. हे सर्व करत असताना आपण महाराजांचे फक्त एक सेवेकरी आहोत आणि सेवा करत राहणे हेच आपले काम हि भावना तसूभरही मनातून जात नाही. अतिसामान्य व्यक्तिमत्व असूनही सामन्यातील सामान्य राहणाऱ्या भाऊंकडे पाहिले कि वाटते उगीच नाही महाराजांनी त्यांची ह्या जागी नेमणूक केली .
पांढरे शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी वारकऱ्यांसाठी टोपी घातलेले भाऊ सेवेकार्यांच्या गर्दीत हरवून जातात. कुठेही मोठेपणाचा लवलेशही नाही. किती आणि कायकाय शिकायचे ह्यांपासून .संस्थानात चहा घेतला तरी दानपेटीत पैसे ठेवणारे
महाराजांचे हे सेवक ,अधिक काय बोलायचे त्यांच्या विषयी. कसलाही मोठेपणा , डामडौल, मी
पणाचा लवलेश शोधूनही सापडणार नाही. सतत आपल्या कामात गर्क असणार्रया भाऊना भेटायला
गेले असता ते जर वर्तमानपत्र वाचत असतील तर ते वाचता वाचताही आपल्याशी संवाद
साधतात .कुठले नमस्कार चमत्कार आवडत नाहीत त्यांना.
एक दोन वेळा त्यांनी
महाराजांचे अनुभव मला सांगितले आहेत ,त्यांच्या वाणीतून ते ऐकणे म्हणजे पर्वणीच
आहे. असो आज मी माझा त्यांच्याबद्दलचा एक जिवंत अनुभव सांगणार आहे. अशीच एकदा
शेगावला गेले होते. माझा मुलगाही माझ्याबरोबर होता. नेहमीप्रमाणे भाऊंची भेट झाली.
प्रसिद्धी माध्यमांपासून भाऊ नेहमीच दूर राहतात हे मला माहित होते तरीही का कोण जाणे
त्या दिवशी त्यांच्याजवळ हट्ट केला कि मला माझ्याबरोबर तुमचा फोटो हवाय. त्यांनी
हसून सांगितले अग इथे आपली भेट होतेच त्यात अजून फोटो कश्याला. तरी मी खूप आग्रह
केला म्हणून त्यांनी माझ्या आणि माझ्या मुलासोबत ३-४ फोटो काढले. मी निघाले तेव्हा
त्यांनी मला सांगितले एकच अट हे फोटो कुणास दाखवू नकोस. मी अर्थात हो हो म्हंटले .
संध्याकाळी पुन्हा एकदा महाराजांच्या गादीजवळ, समाधीशी जावून दर्शन घेतले आणि
शेगाव स्टेशन कडे निघालो.
माझ्या बरोबर त्या
वेळी कै. वसंतकाका गोगटे होते. शेगाव स्टेशनातून गाडी सुटली. रात्री १० च्या
सुमारास सर्वजण निजानीज करत असताना मला काही करमेना .मला सतत त्या फोटोंची आठवण
येत होती आणि का कोण जाणे गोगटे काकांना ते दाखवायला मी फार उत्चुक होते. भाऊना
दिलेल्या वचनाचा मला तासादोन तासातच जणू विसर पडला होता.
असो तर सांगायचे असे कि गोगटे काकांना सर्व हकीकत कथन करून ते फोटो दाखवायला कॅमेरा काढला.आणि पाहते तो काय पुढील मागील सर्व फोटो होते पण भाऊंच्या बरोबर काढलेले ते ४-५ फोटो गायब म्हणजे तिथे फक्त black negative दिसत होत्या. खर सांगू का..एका क्षणात मनी काय ते समजले..मनात चर्रर झाले..कुणी मला काही सांगायची गरजच नव्हती ,मी समजून चुकले... डोळ्यातून घळाघळा पाणी येवू लागले. मनापासून हात जोडले महाराजांना आणि वचन मोडल्याची माफी मागितली. अर्थात ती रात्र जागूनच काढली, झोप कशी लागणार ,मनातून खजील झाले होते. घरी आले ....रोजची कामे व्यवहार सुरु झाले त्या रात्री झोपले असताना स्वप्नांत येऊन भाउनी सांगितले “ मी सांगितले होते तुला फोटो कुणास दाखवू नकोस. ” रात्रभर बसून होते. मला त्यावेळी आणि आज हा अनुभव कथन करतानाही काय वाटत असेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी. आज भाउंच्या रुपात जणू महाराजांनी मला दर्शन दिले, माझ्याकडून वचन घेतले पण मी माझ्या बालबुद्धीने त्याची पूर्तता करू शकले नाही.

संत गजानन महाराजांचे
असे अनेक अनुभव घेऊन हा अध्यात्मिक प्रवास सुरु आहे. शेगावला तर प्रत्येकालाच
काहीतरी अनुभव येतोच येतो.
आयुष्यात मनाला
स्पर्शून गेलेला अनुभव मी अखेरच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. पुढील वेळी शेगावला
गेले तेव्हा भाऊना भेटले. का कोण जाणे त्या वेळी निघताना मला त्यांनी विचारले आज
फोटो नाही का काढायचा तुला ? मागे वळून पहिले आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी
करून दिली....भाऊंचे शब्द आठवले .. “ ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्या पलीकडे
आहेत ”.
हा लेख महाराजांच्याच रुपात मला भेटलेल्या भाऊना सादर अर्पण.
जय गजानन श्री गजानन.
जय गजानन श्री गजानन.
https://antarnad18.blogspot.in