||श्री स्वामी समर्थ ||
अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे | असो खलही केव्हडा तव कृपे सुमार्गी वळे |
उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||
उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||
मंडळी,
भारतभूमी हि संतांच्या सहवासाने ,पुण्यस्पर्षाने पावन झाली
आहे. संतसेवा करणारा परमेश्वर कृपेसहि पात्र ठरतो. संत हे ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्या
सेवेने आपण आपल्या षड्रिपूंवर ताबा मिळवू शकतो ,आपली मनोरथे पूर्ण होतात , त्यांच्या
स्मरणाने आपले जीवन उजळून निघते ,आपल्या इच्छा फलद्रूप होतात म्हणून त्यांना परिसाची
,कामधेनु, कल्पवृक्षाची उपमा दिली आहे.
अध्यात्म हा मानवी जीवनाचा आधार आहे. मनुष्यास संकटे आली कि
तो परमेश्वर चरणी धाव घेतो. शेवटी आपल्याला दिलेले दोन हात त्यालाच जोडायचे आहेत. “श्री
गजानन विजय”, “ गुरूलीलामृत ”, “ साई चरित्र ” , “दासबोध ” , “ भगवतगीता ” असे अनेक
ग्रंथ आहेत ज्यांच्या पुनश्चरणाने मन एकाग्र होवून मनास शांतता मिळते, आपल्या संकटातून
हळूहळू मार्ग दिसतो .वरील उल्लेखलेल्या आणि अश्या अनेक ग्रंथांचे नित्य वाचन
करणारे लाखो भक्त आहेत.
श्री गजानन लीलेचा | पार कधी न लागायाचा | अंबरीच्या चांदण्याचा | हिशेब कोणा न लागे कधी || |
एका जागी बसून अत्यंत श्रद्धायुक्त मनाने, विनम्रतेने
नतमस्तक होवून ,संपूर्णता शरणागत होवून ,एकनिष्ठ राहून ,कुठल्याही भौतिक सुखाची
लालसा न धरता ,केवळ सेवा हा भाव मनी ठेवून कुठल्याही ग्रंथाचे केलेलं वाचन म्हणजे “
पारायण ”.
आज आपण दासगणू महाराजांनी लिहिलेल्या जीवनरूपी सार असलेल्या“
श्री गजानन विजय “ ह्या ग्रंथाबद्दल जाणून घेवू.
दासगणू महाराजांनी संस्थानातील जुनी कागदपत्रे तपासून ,
त्यातील संदर्भाची पारख करून, महाराजांना त्यावेळी प्रत्यक्ष भेटलेल्या काही
व्यक्तींशी बोलून हा पवित्र ग्रंथ रचला. दासगणू महाराज रोज एक अध्याय लिहित असत आणि
संध्याकाळी तो मठात सर्वाना वाचून दाखवत असत . अश्याप्रकारे त्यांनी २१ दिवसात २१
अध्याय लिहिले. दासगणू महाराजांचा ह्या सेवेसाठी एक लहानसा सत्कार करायचे संस्थानाने
ठरवले. एका ताटात पाकीट , पंचा , श्रीफळ असे ठेवून त्यांना देवू केल्यावर दासगणू
महाराजांनी त्यातील फक्त पंचा घेतला आणि बाकी सर्व रक्कम शेगाव संस्थानाच्या
कार्यासाठी देवू केली तसेच ह्या पोथीचे सर्व हक्कही संस्थानास देवून टाकले. मंडळी
आपण थोडेसे लिखाण केले तरी त्यावर आपला हक्क सांगतो आणि दासगणू महाराजांनी बघा सर्व
हक्क संस्थानास देवून टाकले.
अपराध माझे गुरुवरा , आज सारे क्षमा करा | वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी || |
“ श्री गजानन विजय “ हा ग्रंथ एक अलौकिक सुखाचे भांडार आहे.
संतानी त्यांच्या शिकवणीतून आपले जीवन समृद्ध केले. माणसाने माणसाशी कसे वागायचे
ते शिकवले. माणसातच देव आहे त्याला अन्य कुठेही शोधू नका हि शिकवण सर्व संतानी
दिली.
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या हा रसाळ ग्रंथ आपल्याला
जीवनाची मूल्य शिकवणारा आहे. २१ अध्यायाचा हा मोदक रुपी प्रसाद आपले जीवन आनंदाने
उजळून टाकील यात कुठलाही संदेह नाही. २३ फेब्रुवारी,१८७८ रोजी ऐन तारुण्यातील
गजानन महाराज देविदास पातुरकर ह्यांच्या वाड्या समोर पडलेल्या उष्ट्या
पत्रावळीवरील अन्न खाताना प्रथम दिसले. अजानुबाहू असलेल्या महाराजांची कांती सतेज
होती ,मुखाने सतत ते “ गण गण गणात बोते ” म्हणत असत ज्याचा अर्थ प्रत्येक जीवात
परमेश्वर आहे असा आहे. महाराजांचा काहीही नेम नसे ,कधी ते मौनव्रत धारण करत तर कधी
भजन करत ,तर कधी शय्येवर नुसतेच पडून राहत असत. . मानवी जीवनाचे कल्याण करण्यासाठी
प्रत्यक्ष ईश्वरानेच त्यांना ह्या भूमीवर धाडले .धन्य ते शेगाव आणि तेथील निवासी ,
त्यांचे अहोभाग्य म्हणून त्याना ह्या गजानन रत्नाचा सहवास लाभला.
हा ग्रंथ आपल्याला प्रत्येक अध्यायात जीवनातील अमुल्य
गोष्टींची शिकवण देऊन जातो. प्रथम अध्यायात आपण जे अन्न फुकट घालवतो त्यावर एक
माणूस जेवू शकतो हि शिकवण महाराजांनी दिली. मंडळी विचार करा रोज आपल्या घरात किती
अन्न फुकट जाते ,नुसते ग्रंथ वाचून काहीही होत नाही त्यातील गोष्टी आपल्या आतमध्ये
भिनायला लागतात ,संतांची शिकवण आचरणात आणली तरच आपली प्रगती होईल अन्यथा सर्व
व्यर्थ आहे. असो. द्वितीय अध्यायात तिन्हीसांजेला महाराज त्यांचे निस्सीम भक्त
बंकटलाल ह्यांच्या घरी आले असता त्यांनी वेळ न दवडता सकाळी शिजवलेले अन्न प्रामाणिक
पणे महाराजांना वाढले. महाराजांनी तृप्त होवून आशीर्वाद दिला. पण त्यांचेच बंधू
इच्छाराम ने मात्र ४ माणसे जेवू शकतील इतके अन्न महाराजांसमोर ठेवल्यावर त्यांनी
ते ग्रहण केले आणि उलटी केली ,त्यातून आपण काय शिकतो तर शरीरास आवश्यक तेव्हडेच
खावे आणि जे खावे ते पचवावे ,समोर दिसते म्हणून अधाश्यासारखे न खाता कुठे थांबायचे
ते समजले पाहिजे. असे प्रत्येक अध्यायाचे चिंतन केले तर काहीना काही शिकवण आहेच.
जानराव देशमुखाला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
जलानेही जीवन दिले. जानकीराम सोनाराने विस्तव देण्यास नकार दिल्यावर, बंकटलालाने
चीलीमिवर धरलेल्या नुसत्या काडीनेही चिलीम पेटली. हे पाहून जानकीरामा तील अहंकार नष्ट
होवून तो महारजांच्या चरणी नतमस्तक झाला .
महाराजांचे असंख्य भक्त पण बंकटलाल , भास्कर पाटील ,
पुंडलिक भोकरे ह्यावर त्यांचा जास्ती लोभ. आपले मुल जाणते झाले कि आईनेही त्याला
दूर करावे हि शिकवण पितांबराला कोंडोलीला पाठवून दिली. नुसत्या महाराजांच्या नामस्मरणाने
तेथील वठलेल्या वृक्षास पालवी फुटली इतकी श्रद्धा बळकट असायला लागते.
ह्या ग्रंथातील कुठलाही अध्याय घ्या तो आपल्या जीवनाशी
निगडीत आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला त्या काळात घेवून जातो आणि ती कथन केलेली घटना
जणू आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असा भास होत राहतो. जीवनात अहंकाराला काहीही स्थान
नाही. अहंकारी व्यक्ती संतसेवेस आणि परमेश्वरी कृपेस कधीही पात्र ठरत नाही.
“ श्री गजानन विजय “ हा पवित्र ग्रंथ जिथे असेल तिथे
भूतप्रेत पिशाच्च ,कुठलीही बाधा फिरकतही नाही ,इतकी प्रचंड ताकद ह्यात आहे. हा
ग्रंथ म्हणजे प्रेमाचा अथांग महासागर आहे, तो वाचतानाही डोळ्यातून घळाघळा पाणी
येते . जीवन आनंदी करण्याचा सोपा उपाय म्हणजे ह्या ग्रंथाचे नित्य पठण, पण अर्थात
मनीचा भाव खरा हवा, समर्पणाची भावना हवी नाहीतर सगळच फोल आहे. ह्या ग्रंथाच्या
पठणाने घरात लक्ष्मीचा नित्य वास तर होतोच पण जीवनात अमुलाग्र बदल होवून जीवन
सुसह्य होते.
ह्या ग्रंथाचे पारायण एका दिवसात किंवा ३ ७ २१ दिवसातही
करता येते. दशमी ,एकादशी आणि द्वादशीला आणि गुरुपुष्य योगावर ह्या ग्रंथाचे जो मनापासून
पठण करेल त्यावर महाराजांची कृपा झाल्यास राहणार नाही असे प्रत्यक्ष दासगणू महाराजांनी
ग्रंथातच नमूद केले आहे. काहीही मागू नये त्यांच्याकडे आणि कुठल्याही गोष्टीची मनी
आस न धरता फक्त आणि फक्त सेवा हा भाव मनी ठेवून पारायण करावे ... आपण सेवा करत
राहावी ,महाराज आपले जीवन फुलवणार यात संदेह नसावा. कधी काय द्यायचे ते त्यांना
माहित आहे.
ह्या ग्रंथाच्या पठणास कुठलीही वेळ चालते. मला विचारलं तर
श्वास चालू आहे तोवर सेवा करत राहावी तीही निष्काम. सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही
पारायण करावे. काही वृद्ध व्यक्तीना खाली बसून जमत नाही त्यांनी खुर्चीवर बसून
करावे ,जसे जमेल तसे करावे. अहो ते आपल्याकडून पारायण करून घेत आहेत इथेच त्यांची
कृपा झाली असे समजायला हरकत नाही. कित्येक जण पोथी आणतात पण वाचन होत नाही. महाराज
माझ्याकडून आपण पारायण करून घ्या हा भाव मनी ठेवलात तर का नाही होणार पारायण ?
नक्कीच होईल. सर्वात शेवटी श्रद्धा किती खोल ते महत्वाचे.
झुणका भाकरीचा नेवैद्य |
मंडळी पारायण झाल्यावर महाराजांना चण्याच्या डाळीच्या
पिठाचा झुणका , कांदा ,ज्वारीची भाकरी , ओंजळभर मिरच्या ,असल्यास लोण्याचा गोळा
असा प्रसाद मनोभावे करावा .नाही जमल्यास शिरा करावा आणि तेही नाही जमले तर दुध
किंवा साखर ठेवावी. बघा महाराजांना सर्व स्थरातील लोकांना करता येयील असा झुणका
भाकरीचा नेवैद्य आवडतो , बासुंदी पुरीमध्ये त्यांचे चित्त नाही लागत . घरातील आणि
त्या दिवशी घरी आलेल्या सर्वाना द्यावा. आपल्याकडून महाराजांनी पारायण करून घेतले
म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी आणि माझे पारायण झाले हा अहंकार मात्र मनी कधीही
येवू देवू नये. मी हे केले ,मी ते केले ह्यातच आपण सर्व काही घालवून बसतो. म्हणूनच
जी काही सेवा करू ते त्यांच्याच चरणी ठेवावी म्हणजे आपल्याकडे अहंकार यायला काहीच
उरणार नाही. ग्रंथाच्या अखेरीला प्रत्यक्ष दासगणू महाराजांनीही आपल्याला हीच शिकवण
दिली आहे ,त्यांनी महाराजांना विनंती केली कि “ तुमच्याच प्रेरणेने मी तुमचे
चरित्र शब्दबद्ध केले ,तेव्हा आता माझी लाज तुम्हीच राखा. काही अधिक उणे झाल्यास माफ
करा लेकरास.”
मंडळी ,शेगावला गेल्या वर महाराजांच्या गादी समोर एकदातरी
अवश्य ह्या अभूतपूर्व ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेवून बघा. एकदा मी सकाळी
पारायण करायचे ठरवले आणि बोलताना सहज बोलून गेले कि मी काय इतके वर्ष पारायण करतेय
माझे अडीच त्तासातच पारायण होईल मग मी इतर कामे करीन. झाले दुसरा दिवस उजाडला.
सकाळी ७ वाजताच घरातील पूजा इत्यादी सर्व आटोपून मी पारायणास बसले. एक अध्याय
वाचला दारावरील बेल वाजली कुणीतरी आले, पुन्हा वाचायला बसले पुन्हा तसेच, त्या
दिवशी नको नको ती कामे माझ्या मागे लागली आणि नेमके त्याच दिवशी अनेक लोकही माझ्या
घरी आली .अगदी ४ वेळा काहीतरी विकायला आलेल्या विक्रेत्यांनीहि दरवाजा वाजवला. सर्वांची
उठबस करण्यात वेळ जात होता पण पारायणावर निष्ठा कायम होती, मग कितीही खंड पडूदे .दुपारी
३ वाजेपर्यंत ७-८ अध्यायच वाचून झाले ...मनात काय ते समजले ,माझी मलाच लाज वाटली
.माझे पारायण कसे अडीच तासात होते हे अहंकाराचे बोल आठवले आणि महाराजांच्या समोर
बांध फुटला ,पुन्हा आयुष्यात कधीही असे बोलणार नाही एकदा माफ करा असे बोलले आणि
पुन्हा वाचायला सुरवात केली . संपर्ण पारायण संध्याकाळी ७ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर
झुणका भाकरी ,शिरा असा प्रसाद केला आणि नेवैद्य दाखवला. खर सांगू का साई
चारीत्रातही एक वाक्य आहे “ आधी विचार मग उच्चार ” त्याची प्रचीती त्या दिवशी आली.
या गजाननरुपी जमिनीत | जे जे काही पेराल सत्य | ते ते मिळणार आहे परत | बहुत होऊन तुम्हांला || |
असेच एकदा शेगावला असताना महाराजांची पोथी घेतली आणि ती समाधीस लावून घ्यायला गेले
तेव्हा दर्शनाची मोठी रांग बघून मन खट्टू झाले. संध्याकाळ झाली होती परतीचा प्रवास
होता आणि गाडीची वेळ झाली होती .इतक्या गर्दीत मोठ्या रांगेत उभे राहिले असते तर
गाडी चुकली असती. तिथल्या सेवेकाराना मला सोडा हे सांगणे म्हणजे त्यांना त्यांचा
नियम मोडून डोक्यावर पाप ओढवून घेण्यासारखे आहे म्हणून गप्प उभी होते. पण इच्छा तर
प्रबळ होती. तेव्हड्यात तिथे एक अपंग गृहस्त आले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी
होत्या. सेवेकर्यांनी त्यांना वेगळ्या रांगेने दर्शनास सोडले, त्यांच्या पत्नी
त्यांना आधार देत होत्या आता त्यांच्या कुबड्या कोण धरणार ? त्यांनी माझ्याकडे
पहिले मी लगेच त्या धरल्या आणि सेवेकर्यांनी मलाही आत सोडले. त्या बाई आणि सेवेकरी
कुणालाच मलाही दर्शनास जायचे होते ते माहित नव्हते पण महाराजांनी ते ओळखले पण
दर्शनास जातानाही काहीतरी सत्कर्म करण्याची संधी देवूनच त्यांनी दर्शन दिले हे
महत्वाचे. ती पोथी ज्यांनी मला आणावयास सांगितली होती त्यांचीही इच्छयाशक्ती
तितकीच प्रबळ होती म्हणून त्यांच्या हाती हा ग्रंथ आला.
असे असंख्य अनुभव अगदी उठता बसता मलाच काय सर्वाना
क्षणोक्षणी येतात .प्रचीतीविना भक्ती नाही ,त्यामुळे महाराज प्रचिती देणारच पण
निव्वळ त्यासाठी भक्ती नको .अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे , ह्या ग्रंथाबद्दल अपार
आदर आहे ,महाराजांनी मला काय दिले हे मी शब्दबद्ध नाही करू शकत ,आपली प्रचीती
शेवटी ज्याची त्यांनी अनुभवायची. ह्या अधिक महिन्यात मी गजानन विजय पारायण अद्याप
तरी केले नाही पण हा लेख लिहिण्याची बुद्धी देवून त्यांनी मला सेवेची संधी दिली
आहे ,त्यासाठी मी महाराजंची सदैव ऋणी राहीन.
आमच्या घरी श्री गजानन महाराज प्रगट
दिनास गेली कित्येक वर्ष अत्यंत मनापासून , शुचिर्भूत होवून संपूर्ण प्रसाद
करणाऱ्या आमच्या शेजारच्या सविता काकू उर्फ “माई “ ह्यांना हा लेख मी समर्पित करते
,त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर महाराजांची कृपादृष्टी आहेच तशी तुम्हा आम्हा
सर्वांवर राहूदे अशी महाराजांच्या चरणी नम्र विनंती.
अभिप्रायासाठी संपर्क साधा खाली दिलेल्या संकेत स्थळावर
https://www.facebook.com/antarnad18/
https://antarnad18.blogspot.in