Wednesday, 4 July 2018

मधुमेह आणि लठ्ठपणा - करुया कायमचा रामराम

|| श्री स्वामी समर्थ ||


डॉ. जगन्नाथ दिक्षित



मंडळी ,     
      आजची आपली जीवनशैली पाहता घड्याळ आपल्यासाठी कि आपण घडाळ्यासाठी असा प्रश्न पडतो. कामाची बाराखडी जणू मागेच असते आपल्या. वाढती महागाई , खर्च ह्याचा ताळमेळ घालण्यासाठी पतीपत्नी दोघानाही नोकरी व्यवसाया निम्मिताने बाहेर जावे लागते. आज मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणार्यांच्या घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात. आपले आयुष्य आता ८.११ ची सकाळची लोकल आणि ७.१३ ची संध्याकाळची लोकल ह्या भोवतीच फिरत असते. आपण सर्वच आता जणू पैसे मिळवायची यंत्रच झालो आहोत ,पण हे सर्व करत असताना आपले दुर्लक्ष होते आहे ते आपल्या तब्येतीकडे. बराच वेळ घराबाहेर राहिल्यामुळे एकतर कार्यालयात असलेल्या कॅन्टीन मध्ये जेवणे किंवा मग जिथे असू तिथे जे मिळेल ते पोटात ढकलून तात्पुरती भूक भागवणे ह्याला पर्याय नसतो. वेळीअवेळी बाहेरचे खाणे,अपुरी झोप, जागरणे ,रोजच्या जीवनातील चिंता ह्या सर्वांचा दूरगामी परिणाम कळतनकळत आपल्या प्रकृतीवर नाही झाला तरच नवल. 
ह्या सर्वांमुळे आजकाल प्रामुख्याने वाढीस लागलेला आजार म्हणजे “ मधुमेह ” आणि लठ्ठपणा.


      मंडळी, एखादा आजार झाला मग तो कुठलाही असो, तो का झाला त्याहीपेक्षा तो पूर्ण बरा कसा होईल हे पाहणे सर्वात महत्वाचे असते. तुमच्या मनाची ताकद , सकारात्मक विचारसरणी असेल तर तुम्ही कुठल्याही आजारावर मात करू शकता ह्यात शंकाच नाही.

     मधुमेह झाला म्हणजे आपले जीवन संपले अश्या प्रकारची भीतीदायक विधाने ऐकायला येतात. पण आपले अर्धवट ज्ञानच फार धोकादायक असते. फक्त साखर खाल्याने मधुमेह होतो हा गैरसमज आहे ,त्यासाठी इ अनेक कारणेही असू शकतात.

आज मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि ह्याचे मुख्य कारण आपल्या जेवायच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, चिंता, शरीराला नसलेला पुरेसा व्यायाम , अनियंत्रित आहार आणि वाढणारे वजन. आम्हाला कुठे वेळ असतो चालायला?दिवसभर घरचे ऑफिसचे काम करून जीव मेटाकुटीला येतो अशी सर्वसाधारण वाक्ये कानी पडतात. आपल्याला वेळ नसतोच ,तो आपल्याला काढायला लागतो तेही आपल्या स्वतःच्या उत्तम भविष्यासाठी . थोडा विचार केलात तर आपल्याला रोज २-३ तास टीवी वरील मालिका, whatsapp, सोशल मिडिया ह्या सर्व गोष्टींसाठी वेळचवेळ असतो फक्त व्यायाम न करण्यासाठी आपल्याला अनेक सबबी अगदी सहज सुचतात.
लठ्ठपणाची कारणे

मंडळी , जिथे प्रश्न आहेत जिथे उत्तरेही आहेतच .मधुमेह झाला म्हणून घाबरून जायचे अजिबात काहीच कारण नाही. मधुमेहाबरोबरच लठ्ठपणा ज्याला आपण Obesity म्हणतो त्याचेही प्रमाण सर्वसाधारणपणे वाढीस लागलेले दिसून येते .Obesity itself is a Disease. आपले वजन वाढले कि मग आपोआपच अनेक आजार आपल्या आश्रयाला येतातच, त्यामुळे ह्या सर्वांवर वेळीच उपाय करणे उत्तम.
कै.(डॉ) श्रीकांत जिचकर ह्यांनी ह्या विषयावरती खूप संशोधन केले ,ह्यावर अनेक ठिकाणी  व्याख्यानेही दिली. भारतीय लोकांचे आहारशास्त्र ह्याचा अभ्यास करताना त्यांनी ह्या सर्वाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि एक ठोस प्रणाली आखली जेणेकरून आपण ह्या सर्वावरती मात करू शकतो. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या ह्या कार्याची धुरा औरंगाबाद येथील डॉक्टर श्री जगन्नाथ दिक्षित यांनी उचलली आहे. त्यांचे कुटुंब , सहकारी डॉक्टर यांनी त्यांना ह्या कार्यात मोलाचा पाठींबा दिला असल्याने ह्या कार्याने आज प्रचंड वेग घेतला आहे.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक Diet Plan करतो पण बरेच वेळा आपल्याला त्यात अपयश येते. मग काय मागचे पाढे ५५ असे म्हणून निराश होतो आणि काय व्हायचे ते होणार अशी मनाची चुकीची समजूत घालतो. मला सपूर्ण विश्वास आहे कि वरती उल्लेख केल्याप्रमाणे अनेक उपाय करून थकलेल्या सर्वाना हि संकल्पना रोगमुक्त करेल तेही पूर्णपणे.
           
           डॉक्टर दिक्षित यांचा Effortless weightloss  and Diabetes Prevention " अत्यंत वेगळा आणि साधा सोप्पा आहे. त्यासाठी आपल्याला एकही पैसा खर्च करायचा नाही हे सर्वात विशेष. थोडासा मनाचा ब्रेक आणि मनोनिर्धार आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर आपण सर्व आजारातून मुक्त होवू ह्यात शंकाच नाही.


प्रत्येकाला अगदी सहज जमेल अश्या ह्या diet program ची संकल्पना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी डॉ दिक्षित अनेक ठिकाणी स्वतः व्याख्याने देत आहेत. आज त्यांच्या बरोबर डॉक्टरांची एक टीम सुसज्ज आहे जी ह्या कार्याचा जोमाने प्रचार करत आहे. हजारो लोकांना ह्याचा फायदा होताना दिसत आहे .विनासायास वेटलॉस हि संकल्पना अत्यंत साधी प्रत्येकाला सहज करता येणारी आहे. डॉक्टरांची ह्या विषयावरील अनेक पुस्तके हि उपलब्ध आहेत. फेसबुक सारख्या सोशल मिडिया वरतीही ह्यासंबंधी माहिती उपलब्ध आहे.

“India free from Obesity and Diabetes ” ह्या मोहिमेत जास्तीतजास्त संखेने लोक आज सामील होत आहेत. आपल्या घरात किंवा शेजारी ,आपले आप्तेष्ट ,मित्र , ओळखीचे ह्या पैकी कुणालाही लठ्ठपणा किंवा मधुमेह हे आजार असतील तर डॉक्टर दिक्षित ह्यांच्या ह्या संकल्पनेची माहिती करून आपण ह्या आजाराला कायमचा रामराम ठोकू शकतो.


चालण्याला पर्याय नाही
        मंडळी ,आयुष्य खूप सुंदर आहे ,ते आनंदात घालवायचे आहे. आयुष्यभर अथक परिश्रमाने मिळवलेला पैसा हे सुंदर जग फिरण्यासाठी ,आपल्या हौसेमौजेसाठी वापरायचा कि त्यातून आयुष्याच्या अखेरीला हॉस्पिटलची बिले भरत राहायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवायची असेल तर फिजिकल फिटनेस अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची सुरवात ह्या क्षणापासूनच व्हयायला हवी.. आपला आहार कसा असावा आणि आपली जीवनशैली कशी असावी हे सर्व आपल्याच तर हाती असते. आजकालच्या so called modern जगात आपण आपल्या शरीर प्रकृतीचा ह्रास करून घेतला आहे.
परंतु चांगल्या गोष्टींसाठी कधीच उशीर होत नसतो. 
         
          डॉक्टर दिक्षित यांनी आपल्या व्याख्यानातून मधुमेहा बद्दल असलेले सर्व गैरसमज तर दूर केलच आहेत पण मुळात आपण नक्की बरे होवू शकतो आणि ह्या आजारास आपल्या आयुष्यातून पळवून लावू शकतो हा विश्वास दिला आहे .आज अनेक लोकांच्या ,डॉक्टरांनी सांगितलेला diet plan केल्यानंतरच्या, यशोगाथा वाचल्यावर मी तर डॉक्टरांच्या पुढे नतमस्तक झाले.
        
          मनात आले हजारो बरे झाले आणि लाखो बरे होणार आहेत ह्यासाठीच डॉक्टर जगन्नाथ दिक्षित नावाचा देवदूतच जणू आपल्यासाठी परमेश्वराने पाठवला आहे.


आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे...

चला तर मग आजच सुरवात करुया आणि “India free from Obesity and Diabetes ” ह्या मोहिमेत आपणही सहभागी होऊया.

ह्या लेखाद्वारे मी सर्वाना मनापासून आवाहन करत आहे कि आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्याही आनंदी, सुधृढ आयुष्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून अनेकांना ह्याचा फायदा होईल.


लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा.

https://www.facebook.com/antarnad18/

antarnad18.blogspot.in