Monday, 31 December 2018

प्रवास एका अन्नपूर्णेचा......

||श्री स्वामी समर्थ ||




     
                 मराठी स्त्रीने जगाच्या कानाकोपर्यात आपली वेगळी ओळख, अस्तित्व निर्माण केलय..आपल्या कार्तुत्वाबरोबरच जपणूक केली आहे ती मराठी अस्मितेची....आज ओळख करून घेऊया अश्याच एका गृहकृत्यदक्ष त्याचबरोबर प्रचंड मेहनत आणि जिद्दीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणार्या, आपल्या मैत्रिणीची म्हणजेच दुबईच्या पेशवाह्या भारतीय उपहार गृहाच्या सर्वेसर्वा सौ. श्रिया जोशी हिची. श्रीयाची ओळख करून देताना मी अगदी सहजपणे मैत्रीणअसा उल्लेख केला ह्याचे कारण ती अगदी पहिल्या काही क्षणातच आपल्या मधुर वाणीने समोरच्याला आपलेसे करते आणि मैत्रीचे बंध अलगद निर्माण होतात.


तर मंडळी, मुळची पुण्याची असलेली श्रिया पूर्वाश्रमीची सुवर्णा गोडबोले. सचिन जोशीं यांच्याशी लग्नानंतर नोकरीनिम्मिताने दुबई पर्यंतचा प्रवास केला आणि मग तिथेच स्थायीक झाली. श्रीयाच्या माहेरी फार सणवार असे काही नव्हतेच त्यातच आईचे छत्र लहानपणीच हरवल्यामुळे तिच्यावर स्वयपाकघर सांभाळायची वेळ आलीच नाही .लग्नानंतर स्वयपाकातले फारसे काही येतही नव्हते आणि तितकी गोडीही नव्हती. परंतु सासरी मात्र बर्यापैकी सणवार होत असत. स्वयंपाकाचे प्राथमिक धडे तिने सासूबाईंच्या हाताखालीच गिरवले. तिने केलेले पदार्थ सर्व आवडीने खाऊ लागले आणि पाठीवर शाबासकीची थाप मिळत गेली त्यामुळे कालांतराने स्वयपाकात अधिकच रुची निर्माण झाली. श्रीया दुबईला गेल्यावर तिला खूप काही करावेसे वाटले पण  मुलगा ५ महिन्यांचा असल्याने सुरवातीच्या दिवसात पाककलेचे कौशल्य फक्त सचिनच्या डब्यापुरतेच मर्यादित राहिले. सचिनच्या डब्यातील रुचकर पदार्थ चाखल्यामुळे त्याच्या ऑफिस मधील काही लोकांनी श्रीयाला त्यानाही डबा देण्यासाठी आग्रह केला आणि मग अश्याप्रकारे डबे देण्याची कल्पना तग धरू लागली. पहाटे लवकर उठून ह्या डब्यांसाठी केलेली मेहनत पुढे इतकी फळाला येयील असे खुद्द श्रीयालाही माहित नव्हते .विविध पदार्थांना मिळालेल्या अभिप्रायांमुळे श्रीयाही उत्चाहाने काही नवीन पदार्थ आवडीने बनवू लागली.


सासुबाईनी दिलेली पाककलेची शिदोरी आणि त्यांचा आशीर्वाद फळास आला आणि ह्या डबे बनवण्याच्या मोहिमेतूनच पुढे " पेशवा " ची संकल्पना उदयास आली. साडेचार हजार स्क्वेअरफीट वरील पेशवाहे अगदी अस्सल पुणेरी नाव असलेले दुबईतील मराठी माणसाचे उपहारगृह आज मराठी तसेच अमराठी लोकांकडून अतिशय नावाजले गेले आहे . हे सुरु करताना आलेल्या विविध अडचणींना कसे तोंड दिले हे सांगताना श्रीया सद्गदित झाली. जागा मोठी ,चांगली मिळाली पण त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालणे आणि आतील सजावट तितकीच आकर्षक करणे ह्या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे होते .ह्यामध्ये मोलाची साथ तिचा मुलगा आणि पती सचिन जोशी ह्यांनी दिली हे सांगताना तिला भरून आले तसेच आज पेशवा चे संपूर्ण व्यवस्थापन आता सचिन जोशीच पाहतात हेही तिने नमूद केले. नुसतेच व्यवस्थापन कौशल्य नाही तर आपल्या पाहुण्यांचे उत्तम आदरातिथ्य तसेच वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचना श्री सचीन जोशी त्यांनी आवर्जून लक्ष्यात घेतल्या आहेत हे " पेशवा " मधील वाढलेल्या ग्राहकांच्या संखेवरून सहज ध्यानी येते. येथून नुसतेच सुग्रास भोजन नाही तर आनंदाचा ठेवा प्रत्येकाने घेऊन जावा ह्याकडे त्यांचे जातीने लक्ष असते ." पेशवा " हे श्रीयाचे बाळ आज ६ वर्ष पूर्ण होवून ७ व्या वर्षात पदार्पण करत आहे हे सांगताना तिला आणि लिहिताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.     
  
गणेश चतुर्थी.
 " पेशवा ” मधील रुचकर पदार्थांची चव चाखण्यासाठी आज जगभरातून लोक कौतुकाने येतात. मराठी माणूस दुबईत गेला आणि पेशवा मध्ये गेला नाही असे सहसा होत नाही, हे श्रीयाने अभिमानाने सांगितले. 
    मराठी माणसांबरोबरच दुबई आणि बाहेरच्या देशातील म्हणजे फ्रांस,जर्मनी ,युरोप,अमेरिका येथील खवैय्यानी इथे आवर्जून हजेरी लावली आहे .  
" पेशवा "घड्तानाचे अनुभव सांगताना श्रीयाने आवर्जून उल्लेख केला तो येथील स्थानिक मराठी लोकांचा . सहसा मराठी माणूस आपल्याच लोकांचा पाय खेचतो त्यांना पुढे जावू देत नाही असे म्हंटले ऐकले जाते पण श्रीयाचा ह्याबाबत अनुभव अगदीच भिन्न आहे .तिला येथील सर्वच मराठी भाषिक मंडळीनी मोलाची साथ दिली आणि देत आहेत.
        “ पेशवा हे नाव आज प्रामुख्याने पर्यटकांमध्ये चांगलेच नावाजले गेलेय. इथे येणाऱ्या अनेक टूर कंपन्या आपल्या प्रवाश्यांना पेशवाइथे खवैयेगीरीसाठी आवर्जून आणतातच. इथे जैन पदार्थही तितक्याच आवडीने खायला येणारा गुजराथी पर्यटकही पाहायला मिळतो . पेशवाची संपूर्ण व्यवस्था आता 4० हून अधिक सक्षम कर्मचारी सांभाळत आहेत. सर्व कर्मचारी वर्ग हा मुंबई , पुणे, कोल्हापूर , मालवण ह्या विविध प्रांतातील असून ह्यास एक मोठे कुटुंबच म्हंटले तर वावगे ठरायला नको. ह्या सर्वांची राहायची अगदी विझा(visa) ची सोयही इथे केली जाते.ह्या सर्व घरगुती वातावरणामुळे येथे सर्वच आपल्या घराप्रमाणे जीव ओतून काम करताना दिसतात आणि म्हणूनच पेशवा मध्ये प्रत्येकाला घरच्यासारखा फील येतो. 


दिवाळीचे मुख्य आकर्षण "किल्ला"
श्रेयाशी मनमोकळ्या गप्पा करताना तिच्यात असणार्या विविध पैलूंचीही ओळख होत गेली. कुटुंबाबद्दल अपार प्रेम आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि गोडवा असलेल्या श्रीयाने  हृषिकेश इथे जाऊन योगाचा महिन्याभराचा कोर्स केलाय आणि आता “ certified yoga teacher” झाली आहे. दुबईत आता तिने योगाचे क्लास सुद्धा सुरु केले आहेत. प्रवासाचीही आणि वाचनाची गोडी असल्यामुळे तिने पर्यटन आणि वाचन ह्याचा सुयोग्य मेळही आपल्या आयुष्यात घातला आहे . तिने लावलेल्या पेशवानामक रोपट्याचा आता डेरेदार कल्पवृक्ष झालाय. दुबई सोबतच अजून ५ देशात पेशवा च्या शाखा काढण्याचा मानस असून त्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.“ पेशवा मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते पण त्याचबरोबर गोव्यातील ,नागपुर कडील काही पदार्थही चाखायला मिळतात.
गोविंदा आला रे आला
पेशवामध्ये आवर्जून हळदीकुंकू, दहीहंडी ,गणेशउत्सव, दिवाळी अगदी दणक्यात साजरी केली जाते आणि दिवाळीचा फराळ सुद्धा इथे विक्रीसाठी ठेवला जातो .हे सर्व सणवार साजरे करताना सामाजिक बांधिलकी आणि पुढील पिढीस काही देता यावे म्हणून दिवाळीत किल्लाही केला जातो. हल्ली दिवाळीत किल्ला करणे हि गोष्ट जणू इतिहास जमाच झाली आहे. येथील स्थानिक लोक आपल्या मुलांना इथे मुद्दामून दिवाळीत किल्ला दाखवण्यासाठी घेऊन येतात .पेशवामध्ये एक मस्तानी हॉलआहे तिथे हे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि येथील सर्व स्थानिक लोक हौशीने सर्व कार्यक्रमात सहभागीही होतात .ह्या हॉल मध्ये स्थानिक लोकांचे बारसे ,हळदीकुंकू, लग्नाचा २५ वा वाढदिवस असे अनेक कार्यक्रम सुद्धा झाले आहेत. गणेश चतुर्थीला यथासांग पूजा ,गणेशास नेवैद्य ,आरती करून अगदी चांदीच्या ताटात मोदकांचा मेनू असलेला बेत असतो तोही अंगतपंगत म्हणजे भारतीय बैठक घालून. पेशवा च्या स्वयपाकघरात केल्या जाणार्या पदार्थात आजहि तुझा काही सहभाग असतो का ह्या प्रश्नावर उत्तर देताना श्रीया म्हणाली, आमचे सगळेच शेफ इतके उत्तम पदार्थ बनवतात कि पदार्थांची चव पाहण्यापलीकडे  मी अजिबात कश्यातही लुडबुड करायला जात नाही .अगदी एखादा वेगळा पदार्थ असेल किंवा गरज भासल्यास मात्र जरूर मार्गदर्शन करते.आमच्या गप्पा खूपच रंगल्या ,श्रीयाकडे अनुभवांची नुसती पोतडीच होती. तुझ्याच सारख्या किंवा कुठलाही लघु उद्योजकांना तू तुझ्या अनुभवातून काय सांगशील ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले कि कुठलीही गोष्ट ठरवली तर ती करायचीच असा जणू ध्यास घेतला पाहिजे आणि बाकी सर्व सोडून त्याचा अक्षरशः पाठपुरावा केला तरच त्यात यश मिळते. अनेक गोष्टी एका वेळेस न करता फक्त एकाच गोष्टीत स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले पाहिजे .देवकृपेने तिचे सहयोगी सचिन देवधर आणि हृषिकेश देवधर यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभल्यामुळेच जोशी दाम्पत्य " पेशवा " नामक शिवधनुष्य समर्थपणे पेलवू शकले .त्याचबरोबर दुबई मधील सरकारी यंत्रणा ,स्थानिक लोक ह्यांनी पूर्ण सहकार्य केले .प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खवैया दडलेला असतोच असतो. आज पेशवामध्ये आपल्या खवैये गिरीची हौस पुरवायला देशेविदेशातून लोक आवर्जून येतात . भारतातून राजकारणाबरोबरच ,कलाक्षेत्र, चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी येथील अनेक पदार्थांची चव चाखून भरभरून दाद दिली आहे. अगदी अलीकडील काळात लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन ह्यांनीही पेशवा मध्ये हजेरी लावली होती.

मंडळी, कुठलाही व्यवसाय असा सहजासहजी नावारूपास येत नाही. त्यात आपला जीव ओतावा लागतो,अपार कष्ट घ्यावे लागतात. देहभान विसरून स्वतःला त्यात झोकून दिले तर आणि तरच यशाची गोडी चाखता येते हे नक्की. एका सर्वसामान्य कुटुंबातील एक गृहिणी पण घरातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद ,पतीची मुलाची साथ आणि आत्मविश्वास ह्या जोरावर तिने एक स्वप्न पहिले आणि नुसतेच पहिले नाही तर ते सत्यातही उतरवले ह्याचे आज प्रत्येक मराठी माणसास कौतुक आहे. मंडळी सातासमुद्रापलीकडे जाऊन जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करणारी श्रीया आज काहीतरी वेगळे करू पाहणार्या आपल्या सर्व भगिनींसमोर एक उत्तम उदाहरण आहे. आपल्यामधेही अश्या कित्येक श्रिया आहेत त्यांचीही स्वप्ने अशीच पूर्ण व्हावी ,त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा मिळावी ह्यासाठीच केला हा लेखन प्रपंच. आपल्या मराठी माणसांचे अस्सल पेशवा” अगदी नावाप्रमाणेच दुबईमध्ये आज दिमाखात उभे राहून पाहुण्यांचे स्वागतास सज्ज आहे. “ पेशवा मधील वातावरणात आहे आपल्या मातीचा, आपलेपणाचा सुगंध , इथे जपली आहेत माणसामाणसातील अतूट नाती आणि संवाद .इथे जातीपाती ,धर्मास थारा नाही .पेशवाचा एकच धर्म माणुसकीचा ,आपलेपणाचा .इथल्या आपलेपणाच्या झालरीमुळेच प्रत्येक पदार्थ खूपच चविष्ट ,रुचकर वाटतो . इथे रिवाज आहे तो आलेल्या प्रत्येकास त्याच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने ,आग्रहाने पोटभर खाऊ घालण्याचा. येथे भोजन करणारा जाताना भरभरून आशीर्वाद  आणि तृप्ततेची ढेकर देवून जातो ...ते पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच. 

                आज पेशवाभक्कम पाय रोवून उभा असल्यामुळे श्रीयाने पुढचे पाऊल पर्यटन क्षेत्रात ठेवले आहे. आता सध्या लहान लहान ग्रुप करून पर्यटनाची सुरवात केली आहे तसेच उत्तम दर्ज्याचे केशरही पेशवायेथे विक्रीस ठेवले आहे . मंडळी, आपल्या सर्व वाचकांच्या वतीने ह्या लेखाच्या माध्यमातून अतिथी देवो भव ह्याची पुरेपूर अनुभूती देणार्या  सौ. श्रीया ,श्री सचिन जोशी आणि पेशवाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि कौतुक तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या. 

             नवीन वर्षात म्हणजेच २०१९ मध्ये पेशवाआम्हा सर्व खवैयांसाठी नवनवीन उत्तमोत्तम ,चविष्ठ ,लज्जतदार पाककृती घेऊन येयील अशी आशा करुया.



लेख आवडला तर अभिप्राय जरुर कळवा.
antarnad18@gmail.com