|| श्री स्वामी समर्थ ||
आपले स्वतःचे व्यक्तिमत्व खुलवणे कुणाला आवडत नाही ? मंडळी
आजकाल आपण सर्वच आपली केशभूषा, वेशभूषा ,स्वतःचे व्यक्तिमत्व ह्यासाठी अत्यंत
जागरूक असतो. आज अनेक स्थरांवर वावरणारा महिलावर्ग तर ह्यासाठी विशेष प्रयत्नशील
दिसतो. चारचौघात आपले व्यक्तिमत्व खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि
म्हणूनच आजकाल मोठमोठाल्या कंपन्यांची सौंदर्यप्रसाधने , आकर्षक कपड्यांची
रंगीबेरंगी दुकाने सदैव ग्राहकांनी गजबजलेली दिसतात. रोज बदलणाऱ्या ह्या Fashion
च्या स्पर्धेत टिकून राहणे हे एक आव्हानच आहे आणि असेच एक आव्हान समर्थपणे पेलणार्या
“ सई रत्नपारखी ” च्या कलात्मक प्रवासाची आज ओळख करून घेवूया.
रोजच्या प्रवासासाठी सुटसुटीत म्हणून सलवार कमीज चा वापर
मुख्यत्वे होतो. सई ने ह्यामध्ये “वारली “ ह्या प्रिंट चा सुबकतेने वापर करून
अत्यंत आकर्षक कपडे बाजारात आणले आहेत. ह्यामध्ये सलवार कमीज बरोबरच
स्टोल आणि टी शर्टस ची सुद्धा विविध रेंज पाहायला मिळते. वारली प्रिंट्स आणि हा
व्यवसाय ह्याबाबत सई सोबत दिलखुलास गप्पा झाल्या. मंडळी , केल्याने होत आहे रे आधी
केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून मोठ्या हिमतीने सई ने ६ वर्षापूर्वी हा व्यवसाय
सुरु केला आणि पाहता पाहता त्याला मूर्त स्वरूप आले. कॉम्पुटर क्षेत्रातील
इंजिनियर असणार्या सईने सुरवातीला ह्याच क्षेत्रात काम केले पण पुढे संसार मुले
ह्या व्यापात तिला आपल्या करीयरकडे पुरेसे लक्ष्य देता आले नाही. मुले हळूहळू
मोठी होत गेल्यावर मग बराचसा मोकळा वेळ मिळू लागला आणि काहीतरी करायला हवे हि
इच्छा मनी रुंजी घालू लागली. लहानपणापासूनच सई चा कलात्मकतेकडे ओढा होता.
सुरवातीला जवळचे नातेवाईक ,मैत्रिणी ह्यासाठी कुर्तीवरती लहानलहान कलात्मक प्रिंट
करून देणे ह्यास सुरवात झाली आणि बघता बघता हा व्याप तिच्याही नकळत वाढत गेला.
अगदी तुमच्या माझ्यासारखे आयुष्य असणार्या संसारी स्त्रीने
घरून एखादा लघुउद्योग करायचा म्हंटले तर तिला सर्वप्रथम कुटुंबाकडून पाठींबा मिळणे
अतिशय गरजचे असते. ह्याबद्दल बोलताना तिने आपल्या जोडीदाराचा
श्री .हरीश रत्नपारखी ह्यांचा कौतुकाने उल्लेख
केला. आपण ह्या कलेतून खूप काही मोठे करू शकतो आणि हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो हा
विश्वास तिला त्यांच्याकडून मिळाल्याचे सांगताना ती सद्गदित झाली. त्यांच्या भक्कम
पाठींब्या मुळेच ती उंच भरारी घेवू शकली. प्रदर्शने करायला सुरवात केली
त्यावेळी आईवडील सासूसासरे, दीर ह्या सर्वानीच आपला खारीचा वाटा ह्यात उचलला
,त्यामुळे प्रपंचाचा भार हलका झाला आणि ती आपल्या व्यवसायाकडे पुरेसा वेळ देवू
शकली .पण तरीही वेळ असेल तेव्हा आपले कुटुंब , स्वयपाकघर ह्या सर्व गोष्टी ती आजही
जातीने सांभाळत आहे .एकंदरीतच आता सांसारिक जबाबदार्या आणि आपला व्यवसाय ह्याची
खर्या अर्थाने सांगड घालणे तिला जमू लागलेय.
काहीतरी वेगळे कलात्मक करू पाहणार्या सईने “ वारली “ ह्या प्रिंट चीच निवड का केली किंवा किबहुना ती ह्याकडे कशी वळली ह्याबाबत सांगताना सई ला किती बोलू असे झाले होते. मुळातच वारली हि आदिवासी कला मला नेहमीच आकर्षित करते . केवळ त्रिकोण , रेषा आणि गोल ह्याचा उपयोग करून मनमोहक चित्रांची निर्मिती म्हणजेच बहुश्रुत “ वारली प्रिंट्स”. ह्यातून तयार झालेले चित्र हे अत्यंत परिपूर्ण, सौंदर्याची लयलूट असणारे तरीही साधेसोपे आपल्या मनाचा ठाव घेणारे असे असते. ह्या सर्वांमुळे आकर्षित झालेल्या सईने हि कला प्रथम अवगत केली . महाराष्टाची हि प्राचीन कला मुखत्वे आदिवासी जमातीने पुढे आणली . आदिवासींचे आयुष्य, त्यांचे जीवन उलगडून दाखवणारी हि कलाकृती खरच हृद्यस्पर्शी आहे.
आपल्या ह्या व्यावसायिक प्रवासाबद्दल सई भरभरून बोलत होती.
सुरवातीला हि सर्व प्रिंट्स ती स्वतः हाताने करत असे त्यामुळे प्रत्येक
प्रदर्शनाच्या तयारीसाठी तिला महिनाभर रात्रंदिवस मेहनत घावी लागत असे. प्रदर्शने
,त्यातील विक्री , ग्राहकांशी संवाद साधने ह्या सर्व गोष्टी करत असताना सई घडत
गेली .ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि
वाढता पसारा ह्याचा ताळमेळ एकट्याने घालणे अशक्य झाले .आता सई आपल्याला हवी
असलेली खास तिचा स्वतःचा ठसा असणारी प्रिंट्स हि छापून घेवू लागली . स्वतः
बनवलेल्या कलात्मक प्रिंट्स वरती सई स्पेशल ठसा असण्यात तिने कुठलीही तडजोड केली नाही.
प्रिंट्स बनवणे ,कुठली प्रिंट्स कुठल्या कपड्यावर छान दिसेल ,कपड्याचा रंग काय
असायला हवा ह्या सर्वच गोष्टी ती आजही स्वतः करते. ह्या सर्वात तिच्यासोबत
असलेल्या नलिनी ह्या तिच्या सखीची लाखमोलाची मदत होत असल्याचे ती आवर्जून सांगते.
अत्यंत हटके दिसणाऱ्या ह्या कलात्मक उत्पादनाला लोकांकडून
भरभरून प्रतिसाद मिळाला . परदेशी असलेल्या आपल्या महिला नातेवाईकांना भेट
देण्यासाठी आवर्जून अनेक लोक हे कपडे खरेदी करतात तसेच प्रदर्शनातसुद्धा काहीतरी
वेगळे म्हणून लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलाय हे सांगताना सईचा चेहरा खरच
आनंदाने फुलाला होता. काहीतरी वेगळे देण्याचा तिचा सतत प्रयत्न असल्यामुळे ह्या
सर्व कपड्यात तोच तोच पणा कुठेही जाणवत नाही .तसेच सर्व कापडे ती
स्वतः खरेदी करत असल्याने गुणवत्तेच्या निकषावर ती नेहमीच खरी उतरते आणि म्हणूनच
उत्तम कापडाची निवड आणि वेगवेगळी रंगीबेरंगी प्रिंट्स, त्यांचे रंग ग्राहकांचे
लक्ष्य वेधून तर घेतातच पण मिळते ती समाधानाची पावती.
पुणे मुंबई येथील प्रदर्शनातून तिला चोखंदळ ग्राहकांनी खूप
छान प्रतिसाद दिला ,कौतुक त्याचबरोबर अभिप्राय आणि सूचना ह्यातून आज सई चा हा
अनोखा प्रवास सातत्याने सुरु आहे.
हे सर्व करताना काही अडचणीही येतात, ह्या सर्व प्रिंट
करताना प्रिंटींग युनिट वर अवलंबून राहावे लागते . हा सर्व माल प्रदर्शनाच्या
ठिकाणी पोहोचवणे ह्या मालाची योग्य व्यवस्था करणे हि कसरत कमी कष्टाची निश्चितच
नाही. ह्या सर्वांमागे अतिशय कष्ट आणि टीमवर्क आहे . हे कपडे अगदी सर्व वयोगटातील
स्त्रिया –मुली घालू शकतात. तरुण वर्गाच्या हल्ली “ हटके " संकल्पनेत बसणारे हे
सर्व ड्रेस आकर्षक आणि तसेच वेगळेपणाचा ठसा उमटवणारे आहेत. लहान मुलीसाठीही आता
नजीकच्या काळात काही वेगळे देण्याचा प्रयत्न सई करू पाहते आहे. वारली प्रिंट्स
ह्या एकाच कलेमध्ये अडकून न राहता मधुबनी ,इजिप्शियन कला ह्यातूनही काही कलात्मक
पर्सेस ,कुशन कव्हर, चादरी वगैरे करण्याचा तिचा मानस आहे.
Presentation in Dubai. |
आपल्या कलेच्या वेडाने
आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगणार्या सई चा प्रवास अचंबित
करणारा आहे . तुमच्या आमच्यामध्ये आणि आपल्या वाचक वर्गातहि अश्या अनेक सई आहेत
ज्या एका संधीची वाट पाहत आहेत. त्या सर्वांना सई नक्कीच प्रेरणादाई ठरेल ह्यात शंकाच
नाही. ह्या सर्वाना काय मार्गदर्शन करशील ह्या प्रश्नाला उत्तर देताना सई पार
भूतकाळात गेली . कुठल्याही गोष्टीत एका रात्रीत यश मिळत नाही ,अनेक प्रकारचे अडथळे
येतात ,कधी भांडवलाच प्रश्न तर कधी योग्य माणसांचा .ह्या सर्वात एखादा क्षण आपले मन
कमकुवत करतो. अगदी त्याच क्षणी मन इतके घट्ट करायचे आणि सकारात्मक विचार करून पुढे
जात गेले तर मार्ग मिळतोच . हताश ,निराश कधीच नाही .आजकालच्या भाषेत सांगायचे म्हणजे " Give Up" करायचे नाही हे तिने स्वानुभवातून
सांगितले .
प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असते पण फार थोडे लोक
आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत त्यात स्वतःला झोकून देतात आणि प्रत्येक प्रसंगाशी
सामना करत यशस्वी होतात .आपल्या संसाराचा रथ यशस्वीपणे हाकताना आपला कलात्मक
प्रवास अगदी सातासमुद्रापलीकडे नेऊ
पाहणार्या अश्या ह्या तरुण ,धडाडीच्या उद्योगीनिला माझ्यातर्फे आणि आपल्या सर्व वाचक
वर्गातर्फे आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेछ्या.
सईच्या “ अबंध आर्ट्स " चा
कलात्मक प्रवास सप्तखंडात व्हावा आणि तिचा आनंद दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा,
तिच्या कष्टांचे चीज व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
लेख आवडला तर नक्कीच कळवा.
www.Antarnad18.blogspot.in
antarnad18.gmail.com