||श्री स्वामी समर्थ ||
आपल्या वास्तूत देवघराला अनन्यसाधारण महत्व आहे... घराचे क्षेत्रफळ कसेही असो परंतु घरात देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणार नाही. देवघराचा आकार तसेच ते लाकडाचे कि संगमरवराचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे....पण त्यातील देवाचे स्थान हाच आजचा आपला विषय आहे.
मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती त्यांचे फोटो देवघरात दिसले. अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री गेलो कि तिकडची आठवण म्हणून किंवा हौस, आवड म्हणून किंवा त्या देवतेवरील श्रद्धा काहीही म्हणा तेथील मूर्ती ,फोटो घेऊन येतो आणि घरी आल्यावर ती देवघरात ठेवतो. कधी कुणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती, देवीची फ्रेम, चांदीचे देवांचे चित्र असलेले नाणे देतात आणि आपण ते सरळ देवघरात ठेवतो. अश्या प्रकारे मग एकाच देवघरात एकाच देवतेचे अनेक फोटो, मूर्ती होतात...एकाच घरातील चार व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरुंचेही फोटो ,मूर्ती ह्यांचाही समावेश देवघरात असतो ...अश्या देवघराकडे पाहून असे वाटते कि खरच येथील देवांना तेथे मोकळा श्वास तरी घेता येत असेल का? त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्ती एकतर प्रचंड मोठ्या असतात कि मागचे देवच दिसत नाहीत किंवा इतक्या लहान असतात कि अगदी microscope घेवूनच बघायला लागेल.
बरेचदा विधिपूर्वक प्रतिष्ठापना न करता देवघरात देव ठेवले जातात .घरात भिंतींवर इतरत्रही सद्गुरूंचे किंवा इतर देवांचे फोटो असतात. कधीकधी त्या देवांच्या फ्रेम , आरसे दुभंगलेले असतात...देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी रोज पूजाही होत नाही आणि झालीच तर देव गुदमरतील आणि त्यांचे मुखही दिसणार नाही इतकी भारंभार फुले त्यांना वाहिलेली असतात. त्या देवतेला ना कधी नेवैद्य दाखवला जात ना कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो. कित्येक वेळा आपल्या सद्गुरुंची जयंती, पुण्यतिथीहि माहित नसते, हि खेदाची बाब आहे.
आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी अंघोळ करतोच पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणी हि लागत नाही. “अहो कुठे वेळ असतो हे सोपस्कार करायला आम्ही आमच्या कामातच परमेश्वर बघतो..”हि उत्तरे ऐकायला मिळतात ...पण मग तसे असेल तर मग घरात देवघर तरी कश्याला हवे ? सांगायचे तात्पर्य जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टाहास कश्याला आणि वंशपरंपरागत असलेले देव देवघरात असतील तर social media वरचा थोडा वेळ कमी करून देवपूजा जरूर करावी त्याने आपलेच आयुष्य सुसह्य आणि सुखकर होईल ह्यात तीळमात्रहि शंका नाही .
हल्ली अनेक घरात देवांच्या so called antic मूर्ती पाहायला मिळतात आणि निरांजनाच्या ऐवजी zero चा bulb लावलेला असतो. निरांजनाचे कार्य zero चा bulb खरच करेल का? मुलाचे लग्न झाले कि मुलगी सासरी येताना अन्नपूर्णा ,श्री गणेशाची मूर्ती घेवून येते म्हणजे पुन्हा देवघरातील देवांच्या संखेत वाढ ..आजच्या आधुनिक काळात आपली विचारसरणी आणि life style सुद्धा modest झाली आहे ,तेव्हा मुलीने सासरी येताना माहेरून देवांच्या ऐवजी उत्तम संस्कार आणावेत ज्यामुळे तिचाच संसार सुखाचा होईल असे मला वाटते.
पूर्वीच्या काळी “देवघरासाठी” अगदी वेगळी खोलीच असे. तिथे सोवळे पाळले जात असे, पूर्वीचा काळ वेगळाच होता . आताच्या modern युगात सगळ्याच संकल्पना बदलत चालल्या आहेत. कुठलीही जागा घेताना किबहुना ती निश्चित झाल्यावर सर्वसाधारण व्यक्ती on a priority Interior Designer ला बोलावते. अर्थातच महिला वर्ग पुढाकार घेवून मग स्वयपाकघर व अन्य खोल्यातील Furniture ची रचना करण्यात गुतून जाते. सर्व सुशोभीकरण झाले कि मग उरलेल्या जागेत निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळते हुश्श.....पण मंडळी ,ज्या विधात्यामुळे आपल्याला ह्या वस्तूचा लाभ होतो आहे त्याचे स्थान वास्तुत सर्वप्रथम निश्चित करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे, पण आपण त्याबाबतीत उदासीन आहोत..एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या अज्ञानाचीही (जे आपल्याला प्रगल्भ ज्ञान वाटते ) भर असते ....बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तरदक्षिण देवघर ठेवले जाते .
मंडळी, ईशान्य दिशा हि देवांची दिशा मानली आहे म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवघराचे योग्य स्थान इशान्य दिशेस असावे जेणेकरून आपण नमस्कार करताना आपले तोंड ईशान्य दिशेस येयील. परंतु तसे शक्य नसेल तर देवघर हे उत्तरेपासून पुर्वेपर्यंत कुठेही असले तरी चालते. कुठेतरी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अडगळीत देवघर ठेवू नये . ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे त्याची दृष्टी अमृततुल्य आहे तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे ह्याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
परमेश्वराचे अस्तित्व अणुरेणूत आहे...जसा भाव तसा प्रत्यय..देवाला आपल्यासारखा संवाद साधता येत नसेल तरी आपल्या चुकांची जाणीव तो आपल्याला करून देतोच देतो. अनेक जाणकारांशी ह्यावर चर्चा करताना “ चुकीच्या जागेवर असणारे देवघर “ हेच घरातील अनेक समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले.
आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्या. त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजेनेच आपण सर्व गोष्टींचा श्री गणेशा करतो तो श्री गणेश , आपली कुलस्वामिनी , कुलदैवत ,अन्नपूर्णा , गोपालकृष्ण आणि आपले इष्ट दैवत याचा समावेश असावा. देवांच्या मुर्तीही सुबक असाव्यात ,शक्यतो मूर्ती ह्या पंचधातूच्या असाव्यात (त्यात शिसे आणि लोखंड नसावे कारण ते प्रेताचे प्रतिक मानले जाते) परंतु त्याला अमुक एक नियम नाही चांदीच्याही ठेवू शकता पण त्या अगदी लहान किंवा अगदी मोठ्या नसाव्यात. देवघरात देवांच्या मूर्तीची जागा सारखी बदलू नये तसेच देव आसनावर ठेवावेत.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज साग्रसंगीत पूजा करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही पण निदान रोज देवांवर हळद कुंकू आणि एखादे फुल धूप दीप उदबत्ती ,घंटानाद आणि एका लहानश्या वाटीत साखर ठेवली ,नित्याची प्रार्थना ,नामस्मरण केले तर देवघराचे मांगल्य तर वाढतेच पण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. रोजच्या TV वरील तासंतास चालणाऱ्या मालिका साठी जितका वेळ आपण देतो किबहुना त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ पुजेस लागतो. रोजच्या व्यवहारात आपण घरी येताना ब्रेड –बटर, भाजी , maggi न विसरता आणतो ना तितकाच किबहुना त्याहूनही कमी वेळ पुले आणायला लागतो..
देवांची पूजा शक्यतो प्रातःकाळी मन प्रसन्न ठेवून करावी. आपण देवळात दर्शनाला जातो तेव्हा तेथील देवांची पूजा झालेलीच असते ,नाही का?? तसेच घरातील देवांचेही आहे ..आरामात उठून पेपर वाचन चहा नाश्ता टीव्ही वरील सर्व कार्यक्रम (जे नंतरही पाहता येतात )पाहून त्यानंतर देवांचीं पूजा ,मग ती अगदी साग्रसंगीत का असेना, केली तर अश्या घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होत असावी याचा विचार न केलेलाच बरा. देवघरातील देवांच्या मूर्तींमध्ये ती देवता आपल्या पूजेने, नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते...आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा हवी.
दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्तीने करणे हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही लोकांची एकापेक्षा अधिक घरे आहेत त्यांनी ज्या वस्तुत आपण राहत नाही तिथे देवाची मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा.
तसेच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा व्यवस्थित होत नसेल तर यथाशक्ती त्यांचे विसर्जन करावे .. ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्या मूर्ती ,फोटो पाटावर ठेवून त्यांची धूप दीप नेवैद्य( दही भाताचा) ठेवून पूजा करावी, विसर्जनाचे कारण देवास सांगावे आणि सन्मानाने नेवैद्या सकट वाहत्या पाण्यात (कुठल्यातरी नाल्यात ,माहीमच्या खाडीत नाही) यथाशक्ती विसर्जन करावे.
वर्षातून एकदा आपल्या कुलदेवता व कुलदेवी यांच्या दर्शनास अवश्य जावे व कुळाचार पाळावेत. जेणेकरून आपल्या पुढील पिढीलाही आपले कुलदैवत ,कुलस्वामिनी,गोत्र ह्याची ओळख होईल. घरातील देवपूजा म्हणजे घरातील फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही आणि ते वेळ घालवण्याचे साधनही त्याहूनही नाही. ”बाबा आता काय तुम्ही retire झाला आहात तेव्हा देवपूजेत वेळ जाईल तुमचा .” ..असे न म्हणता खरतर आजकालच्या तरुण पिढीनेच ती करावी म्हणजे मन शांत एकाग्र राहील आणि दिवसभरातील Stress कधीही Stress वाटणारच नाही. करून तर पहा..रोजची देवपूजा हेच आपले मोठे Fixed Deposite आहे जे अखेरी उपयोगाला येणार आहे .
खरतर , आपण so called option ला टाकलेली देवपूजाच आयुष्याच्या अखेरी आपल्याला तारणार आहे आणि त्याने दिलेले हे दोन हात शेवटी त्याच्याच समोर जोडून नतमस्तक व्हायचे आहे हे विसरू नका. शेवटी काय तर काळ कितीही बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना ,जसे घरातील देवघर व देवपूजा, ह्याशिवाय आपली वास्तू आणि पर्यायाने आपले आयुष्य हि अपूर्णच राहणार कारण देव आहेत , देव होते आणि देव राहणारच...शुभं भवतु.
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वर Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच Follow वर Click करायला विसरू नका.