|| श्री स्वामी समर्थ ||
अनेक दिवसापासून मनात खूप विषय घोळत आहेत आणि त्यावर लिहावे आपले विचार मुक्तपणे मांडावेत असे वाटत होते म्हणूनच आजपासून “ विचार मंथन – भाग 1” आपल्यासमोर मांडताना खूप आनंद होत आहे. व्यस्त दिनक्रमातून जसा वेळ मिळेल तसे लिहिण्याचा मानस आहे. एकमेकांशी संवाद झाला पाहिजे आणि विचारांचे आदान प्रदान सुद्धा झाले पाहिजे त्यामुळे आपण सर्वांनी नुसते वाचन न करता तितक्याच मोकळेपणान आपले विचार माझ्या प्रत्येक लेखावर शब्दांकित करावेत अशी विनंती करत आहे. आज सोशल मिडिया ने अनेक उत्तम लेखक जन्माला घातले आहेत आणि त्यांच्यासाठी हे उत्तम व्यासपीठ सुद्धा आहे. ह्यापैकी एखादा विषय आपल्याही डोक्यात असेल किंवा आपण त्याच्याशी सहमत किंवा असहमत सुद्धा असाल. जे काही असेल ते .. . म्हणूनच अव्यक्त राहू नका व्यक्त व्हा. माझ्या ह्या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या शुभेछ्यांची आणि पाठिंब्याची नितांत गरज आहे कारण उत्तम वाचक नसतील तर सर्व व्यर्थ आहे.
ज्योतिष समुपदेशक तयार होण्याची गरज
आजच्या स्पर्धात्मक युगात पावलापावलावर आव्हाने आहेत . ह्या जीवघेण्या स्पर्धेत भलेभले गर्भगळीत होताना दिसतात. कधीकधी अगदी रोजचे जगणे सुद्धा असह्य होते. आपण साधी प्रापंचिक माणसे आहोत .आपले असूनअसून प्रश्न ते काय असणार तर महाविद्यालयीन प्रवेश , नोकरी , विवाह , संतती , घर , परदेशगमन ,वार्धक्य ,आजारपण ..संपली यादी . ह्यापलीकडे फार क्वचित आपल्या प्रश्नांची धाव असते . अनेकदा हे प्रश्न खूप गंभीर होतात आणि मग मार्गदर्शनासाठी आपली पाऊले ज्योतिषाच्या घराकडे आपल्याही नकळत वळतात .
एखाद्या जातकाची पत्रिका कधी बघावी ह्यालासुद्धा काही नियम आहेत . एखादा प्रश्न किंवा समस्या निर्माण झाल्याशिवाय उगीचच ह्या दैवी शास्त्राशी खेळू नये हे माझे स्पष्ट मत आहे. जसे अनेक स्थळ पाहूनही विवाह जमत नसेल तर विवाहासंबंधी प्रश्न विचारला तर ठीक पण मुलगा शालेय शिक्षण घेत असताना हा प्रश्न विचारणे निश्चितच अयोग्य ठरेल. एखाद्याच्या नोकरीत अजिबात स्थैर्य नसेल तर प्रश्न विचारणे योग्य पण उठसुठ मनात आले म्हणून आज हा ज्योतिषी उद्या तो असे करणे कितपत उचित होईल ह्याचा प्रत्येकाने विचार केलेला बरा. समस्या निर्माण झालेली नसताना उगीच प्रश्न विचारत राहणे म्हणजे ह्या शास्त्राचा अपमान केल्यासारखेच आहे. जातक आणि ज्योतिषी ह्या दोघांनाही ह्याचे भान असणे आवश्यक आहे.
एखाद्या वेळी समस्या खूपच गंभीर असते ज्याचे उत्तर त्वरित मिळणे आवश्यक असते जसे आवडलेली वास्तू विकत घेऊ का ? किंवा शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यायचा आहे , घरातील एखादी व्यक्ती निघून गेली आहे . अश्यावेळी प्रश्नकुंडली मांडून सुद्धा प्रश्नाचे उत्तर देता येते . पण अश्यावेळी प्रश्न विचारणारा जातक आणि प्रश्न पाहणारा ज्योतिषी ह्या दोघानाही तो प्रश्न पहायची तितकीच तळमळ किंवा त्याचे गांभीर्य असणे गरजेचे आहे .
काही लोकांना ज्योतिष शास्त्र हा चाळा वाटतो . हे दैवी शास्त्र आहे आणि ते मनुष्याच्या आयुष्यातील अनेक घटना कधी घडतील ह्याबाबत मार्गदर्शन करते. योग्य वेळी मनापासून प्रश्न विचारला तर उत्तर हमखास अचूक येणारच. आजही ह्या शास्त्राबद्दल हेटाळणी करणारे ,नावे ठेवणारे किंवा त्याबद्दल नकारात्मक बोलणारे महाभाग आहेत . पण कसे आहे सूर्य अस्तित्वातच नाही असे म्हंटले तरी तो उगवायचा राहणार आहे का? असो. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर सोडून द्यावी उगीच ज्या वाटेने जायचेच नाही त्या वाटेची चवकशी कश्याला ?
पण इतके असूनही आज समाज जागृती होत आहे आणि अनेक जण ह्या दैवी शास्त्राचा आधार आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेतानाही आपल्याला दिसतात . जातकाची आंतरिक तळमळ त्याला त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचवतेच हा अनुभव आहे .
आज समाजात ह्या शास्त्राच्या माध्यमातून जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. हिंदू धर्मात विवाह ,आपल्या रूढी परंपरा ह्यांना अनन्य साधारण असे महत्व आहे. आज विवाह संस्थेचे बुरुज कुठेतरी डगमगताना दिसतात . वयात आलेली मुलेच काय अगदी मुलीसुद्धा विवाहासंबंधी उदासीन दिसतात . मुलींच्या वाढत्या अपेक्षा , मुलीकडच्या लोकांचा मुलींच्या संसारात केलेला नको तितका हस्तक्षेप , मुलांची आर्थिक स्थिती ,एकंदरीत दोघांचीही मानसिकता ,रोजच्या आयुष्यातील जीवघेण्या स्पर्धेमुळे आलेले नैराश्य आणि त्यातून आलेली व्यसनाधीनता ह्या सर्वाचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम ह्यामुळे अनेक तरुण विवाहाबद्दल उत्सुक दिसत नाहीत . समाजासाठी आणि वंश वृद्धी साठीही विवाह आवश्यक आहे त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीला ज्योतिष समुपदेशनाची सर्वात अधिक गरज आहे. अगदी प्रेम विवाह असेल तरीही विवाह पूर्वी आणि तद पश्चात ज्योतिष समुपदेशन आवश्यक आहे. त्यांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाहि त्याची गरज आहे.
कुठल्याही प्रश्नासाठी आपण आधी प्रयत्न करावेत आणि मग त्यातूनही उत्तर मिळत नसेल तरच ह्या शास्त्राचा आधार घ्यावा उठसुठ नाही. कर्म हे सर्वश्रेष्ठ आहेच . ज्योतिष समुपदेशन किंवा ज्योतिषीय सल्ला आपल्याला नेमका का कश्यासाठी हवा आहे ह्याचा विचार मनात पक्का असेल तरच पुढे जावे. ह्या शास्त्राबद्दल तसेच ते कथन करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव मनात असला पाहिजे . नेमक्या कुठल्या प्रश्नासाठी आणि कुठल्या टप्प्यावर आपल्याला समुपदेशनाची गरज आहे हे ओळखून ह्या दैवी शास्त्राची मदत घेतली तर आपले जीवन समृद्धतेकडे वाटचाल करेल ह्यात दुमत नसावे.
आयुष्यात कधी न कधी तरी प्रत्येकाला समुपदेशकाची गरज लागते . ते फक्त ज्योतिष ह्या विषयासाठीच असेल असे नाही .कुणाशीतरी मनातले बोलले कि मन हलके होते हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे. After all Sharing Is caring. समुपदेशन हा माझा आत्माच आहे कारण गेली कित्येक वर्ष हे काम मी माझ्या जवळच्या लोकांसाठी करतेच आहे .आज ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून करण्याचाही विचार पक्का झाला म्हणून हा लेखन प्रपंच . आपल्या समुपदेशाने , सकारात्मक गोष्टी सांगून जेव्हा एखाद्याचे आयुष्य आनंदी होताना मी पाहते तेव्हा मिळणारे समाधान हे सगळ्याच्या पलीकडचे असते . Yes I am Worth Something असे फिलिंग येते . श्रीकृष्ण सुद्धा जगातील पहिला समुपदेशक होता ज्याने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून योग्य मार्गावर चालण्यास मदत केली ,योग्य निर्णय घेण्यास सहकार्य केले.
असो हा मोठा विषय आहे ह्यावर प्रत्येकाने नक्कीच विचारमंथन करणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्राला जश्या सीमा आहेत तश्या लेखनालाही त्यामुळे तूर्तास इथेच थांबते .
सौ . अस्मिता दीक्षित
ज्योतिष समुपदेशन / “ हसतखेळत ज्योतिष शिका कार्यशाळा “
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish