|| श्री स्वामी समर्थ ||
जन्माला आल्यापासून आपले शिक्षण सुरु होते . आपल्याला ह्या जीवनाची ओळख करून देणारी आई हि आपली पहिली शिक्षकरुपी गुरु . आईचे बोट धरूनच आपण आयुष्य नामक शाळेत प्रवेश करतो. आई उत्तम संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी आयुष्यभर झटते .
पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपण आयुष्याच्या शाळेत प्रवेश घेतो आणि शिकतच राहतो .हा प्रवास चौफेर अनुभव देणारा असतो म्हणूनच अनुभव हाच गुरु असे म्हंटले आहे. आपली सर्वांची नव ग्रहांशी मैत्री आहेच. बुध हा आकलन देतो तर गुरु ज्ञान . ह्या दोघांची सांगड घातली तर माणूस यशाच्या शिखरे नक्कीच चढेल .
आपल्याला आयुष्यात चांगल्या वाईटाची मूलतः पारख करून देणारे हे दोन ग्रह आपल्या पत्रिकेत ठाण मांडून बसले आहेत . आपण त्यांचा कसा उपयोग करतो ते आपल्या हातात आहे.
आपल्या आयुष्यात उत्तम शिक्षक मिळणे हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. मला माझ्या आयुष्यात अनेक गुरुजन लाभले आणि त्यांच्याकडून शिकतच मी प्रगल्भ होत गेले. माझे वडील माझे पहिले शिक्षक त्यांच्या कडक शिस्तीमुळे आम्हा मुलांचे उत्तम शिक्षण झाले हे म्हंटले तर वावगे ठरू नये. रोज लवकर उठणे लवकर झोपणे आणि रात्री झोपायच्या आधी काहीतरी दोन पानांचे चांगले वाचन करणे हि त्यांची शिस्त आम्ही आजही पाळतो . आपले वाचन चौफेर असले पाहिजे , निदान आपण ज्या कार्यक्षेत्रात आहोत त्याची इत्यंभूत माहिती तरी असलीच पाहिजे असा त्यांचा शिरस्ता असे.
आई वडील , शिक्षकच नव्हे तर घरातील लहान मुले सुद्धा आपल्याला खूप काही शिकवत असतात , त्यांच्या बाल बुद्धीने विचारलेले प्रश्न आपल्याला अनेकदा चिंतन मनन करायला भाग पाडतात . मी शाळेत असताना “ वडिलांची चिठ्ठी घेवून ये “ , “ पालकांना सांगा भेटायला बोलावले आहे “ किंवा वर्गाबाहेर उभे राहणे तत्सम प्रसंग सुदैवाने माझ्यावर आले नाहीत ह्याचे कारण घरातील बाबांचा दरारा आणि कडक शिस्त . असो.
वडील हाडाचे शिक्षण आणि तोच गुण माझ्यातही आला . मी माझ्या मुलांचे कधीही फाजील लाड केले नाही .अभ्यास केला नाही तर नापास व्हाल आणि आम्ही भरलेली फी फुकट जायील म्हणून आम्ही ओरडत नाही तर तुमचे आयुष्यातील एक सोन्यासारखे वर्ष फुकट जायील आणि ते परत येणार नाही ह्या काळजीने ओरडतो हे मी नेहमीच त्यांना समजावून सांगत असे.
ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेत योग लागतात आणि ते कुणाकडून मिळते आहे त्यासाठी भाग्य . उत्तमातील उत्तम शिक्षक मिळणे हे भाग्यात असावे लागते कधी कधी असे शिक्षक मिळूनसुद्धा आपण त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करू शकत नाही तेही आपले भाग्यच म्हंटले पाहिजे .
शिक्षण कुठल्याही शाखेचे असो ते शिकण्यासाठी तळमळ लागते तसेच ते शिकवणारा सुद्धा तितक्याच तळमळीने शिकवणार असेल तर मग अजून काय हवे. पण आजकाल उत्तम शिक्षक लाभणे दुरापास्त झाले आहे . आज इंटरनेट चे युग आहे. मार्केटिंग चे फंडे आहेत . जाहिरातींचा पाउस पडतोय . ह्या सगळ्यातून आपल्याला हवा असलेला कोर्स नक्की कसा शोधून काढणे हे कसब आहे .
क्षेत्र कुठलेही असो “ उघडा डोळे बघा निट “ ह्या उक्तीचा उपयोग कसोशीने करता आला पाहिजे. आज स्पर्धेचे युग आहे . अनेकदा खूप जास्ती फी असली कि हे उत्तम शिकवत असतील असाही समज होतो . मुळात मला काय शिकायचे आहे आणि ते का शिकायचे आहे ? घेतलेल्या ज्ञानाचा मी कसा आणि काय उपयोग करणार आहे ह्याबाबत आपली मते प्रामाणिक आणि मनाशी स्पष्ट असायला हवीत . कुठलेही ज्ञान फुकट जात नाही त्याचा कधीतरी पुढे आयुष्यात उपयोग हा होतोच . त्यामुळे ज्ञान देणारा आणि तो घेणारा दोघेही मोठेच आहेत .
अधिकाधिक ज्ञान ग्रहण करणे हे आपल्या हाती आहे. हे सर्व संपादन करण्याचे ग्रह ,महादशा असतील तर ते मिळत जाते . उत्तम गुरु लाभणे मग ते शैक्षणिक असो अथवा पारमार्थिक ते आपले भाग्यच म्हणायला पाहिजे. अनेकदा उत्तम शिक्षक / गुरु मिळूनही आपली बुद्धी भरकटत जाते आणि आपण त्यांच्यापासून दुरावतो . कधी कधी अहंकार सुद्धा ह्या गोष्टीना कारणीभूत असतो . आपली चंचल वृत्ती आपल्याला फुलपाखरासारखे भ्रमण करण्यास भाग पाडते . म्हणूनच आयुष्यात साधक बाधक विचार महत्वाचा .
मला लाभलेल्या अनेक शिक्षकांनी माझे आयुष्य समृद्ध केले आहे पण तरीही आयुष्यात मी ज्यांचा हात घट्ट पकडून ठेवला आहे , ज्यांनी मला जे दिसत नाही त्याच्याही पलीकडे पाहायला शिकवले आहे , ज्यांच्यामुळे माझी गाडी कधीच अकराव्या स्थानात थांबत नाही, त्या माझ्या गुरुमाऊली समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांच्या चरणी मी हि माझी लेखणी समर्पित करते आहे . आयुष्यभर त्यांचीच सेवा करण्यासाठी हि लेखणी माझ्या हातात त्यांनीच दिली आहे .
आमरण वारी घडे , सदैव तुमचे चिंतन राहूदे आणि अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्याच नावाचा प्रसार करण्यासाठी अविरत लेखन होवूदे , हे आज त्यांच्याकडे मागावेसे वाटते .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230