|| श्री स्वामी समर्थ ||
मनुष्य हा प्रापंचिक आहे आणि त्यातील संकटांनी तो बेजार झाला कि आपोआपच त्याची पाऊले गुरूंकडे , एखाद्या मठाकडे , देवळाकडे वळतात . अश्यावेळी त्या कोसळून पडलेल्या मनाला आधाराची गरज असते . सद्गुरूच आपला जीवनातील मोठा आधार आहेत . त्यांच्या जीवावर आपल्या उड्या आहेत . मठात गेले आणि महाराजांसमोर उभे ठाकले कि डोळ्यातून अश्रूंची धार लागते , किती सांगू आणि किती नको असे होऊन जाते, देहभान विसरून आपण त्यांच्या कानात सर्व काही सांगतो आणि क्षणात परमोच्च समाधानाच्या लाटेवर आरूढ होतो . मनातील घालमेल , जीवाची तगमग शांत होते कारण आपला विश्वास , श्रद्धा काम करू लागते “ ते आहेत “ आणि “ ते आहेतच “ ह्या दोन शब्दात आपले संपूर्ण जीवन गुरफटले आहे...महाराजांचे अस्तित्व आणि आपण जेव्हा एकच होतो तेव्हा होणारा हा दुग्ध शर्करा योग अविस्मरणीय आणि अनमोल भक्तीचा मेरुमणी ठरतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट करताना आत्मविश्वास दिसतो..स्वामी सेवे साठीच आपला जन्म आहे हे एकदा मनात ठाम झाले कि मग सर्वच सोपे होऊन जाते. हळूहळू षडरिपू कमी होऊन प्रापंचिक समस्यांचा दाह जाणवेनासा होतो आणि मग .” स्वामी माझा मी स्वामींचा “ अश्या अवस्थेत पुढील आयुष्य कसे व्यतीत होते ते आपले आपल्यालाही समजत नाही.
स्वामी जयंती असो अथवा पुण्यतिथी आपला एकही क्षण त्यांच्याशिवाय नाही . लेकराला आई जसे दूर करत नाही तसे एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि अखेरपर्यंत आणि पुढील अनेक जन्मही आपण आणि ते ..हे समीकरण कन्फर्म .मग ते करतील ते आणि नेतील तसे. त्यांच्या इच्छा आणि आपल्या एकच . नामस्मरणाचा आलेख जसजसा उंचावत जातो तसतसे भक्ती आणि श्रद्धा , विश्वास वाढत जातो . हा विश्वास अभेद्य ठेवणे हेच आपले काम . एक क्षण असा येतो कि काहीच नको असे वाटायला लागते . सगळ्यातून आपले मन विरक्त होऊन हळूहळू त्यांच्या चरणी स्थिरावत जाते . अध्यात्म हि आयुष्यातील खडतर परीक्षा आहे . दुक्ख गळ्यापर्यंत आल्याशिवाय देव दिसत नाही . सहज काहीच नसते तिथे . मजा बघा ..काहीतरी मिळवण्यासाठी ह्या वाटेवरून चालणारे तुम्ही आम्ही कालांतराने महाराजांच्या सेवेत इतके एकरूप होतो कि काय मागायचे आहे तेच विसरून जातो ....पण हा क्षण येण्यासाठी लागतो तो संयम .
अनेक वेळा आयुष्यात आजचा दिवस खूप त्रासदायक असतो , उद्याचा तर मृत्यू बरा असा असतो पण परवाचा दिवस सुखाची बरसात करणारा असतो , पण कित्येक वेळा असे दिसून येते कि आजच्या दिवसातील कष्टामुळे आणि उद्याच्या यातना सहन न झाल्यामुळे मनुष्य सुखाची पहाट पाहण्यापूर्वीच हात टेकतो हतबल होतो . म्हणूनच संयम हवा.
मोक्ष कुणी पाहिलाय ?? तुम्ही आम्ही कुणी ? पण तो मिळावा म्हणून होणारी कर्म शुद्धी आत्यंतिक महत्वाची आहे . हे केले तर नरक आणि हे केले तर मोक्ष ...मग बघा कुठल्या रस्त्याने जायचे ते ..मनुष्याने आपले कर्म उत्तम करत राहावे . आयुष्यातील असीम शांतता त्यांच्याच चरणाशी आहे , त्यांच्याच नामात आहे .
सद्गुरू कृपा हे आपल्या आयुष्याचे सार्थक आहे. सामान्यातील असामान्यत्व म्हणजे गुरुकृपा . म्हणूनच दासगणू म्हणतात “ वरदहस्त ठेवा शिरी , मी अनंत अपराधी “ . आपले कित्येक अपराध हि माय माऊली आपल्या पोटात घालते म्हणूनच ह्या परमोच्च आनंदाच्या चांदण्यात न्हाऊन निघायचे भाग्य आपल्या पदरात पडते . एखादा पदार्थ करायला जितके कष्ट अधिक तितका त्याचा गोडवा अधिक , त्याचप्रमाणे अध्यात्माचा आनंद समाधानाच्या शिखरावर नेणारा आहे. त्या शिखरावरून आपल्याला लाभतो तो वेगळा दृष्टीकोण , मन विशाल होते , माफी मागायला आणि माफ करायला आपण शिकतो . प्रत्येक क्षणी महाराज आपल्या समीप राहून आपल्याला घडवत असतात .
एकदा मी गोगटे काकांना विचारले कि मी सकाळी चूक केली तर लगेच संध्याकाळी मला शिक्षा होते असे का ? तर ते म्हणाले अग त्यांचे तुझ्यावर लक्ष्य आहे . तू पुन्हा चूक करू नये म्हणून ते तुला लगेच शिक्षा करतात .
आयुष्याच्या संध्याकाळी खरा सोबती म्हणजे सद्गुरू. सगळ्यातून आपला जीव काढून घेणे हे अजिबात सोपे नाही . 90 वर्षांच्या आजी सुद्धा आपल्या पाटल्या बांगड्या देणार नाहीत . आपल्या चिनीमातीच्या बरण्या जपून ठेवतील . सगळ्यात जीव गुंतलेला आहे आपला आणि त्यातून तो काढून सहजरित्या सद्गुरूंच्या पायाशी समर्पित होणे म्हणजे आपली सत्व परीक्षा आहे. संसार आहे ....सार पातळ असते ते आटत नाही . आपल्या इच्छा आकांक्षा काही केल्या संपत नाहीत , अजून हवे अजून हवे हि वृत्ती जाता जात नाही ,देणे मुळी आपल्याला माहितच नाही .फक्त घेणे हेच माहिती त्यामुळे अध्यात्म रुपी महासागरात आपली नाव सुरवातीला हेळकांडते आणि मग हळूहळू स्थिर होते ..
असा हा निर्भेळ आनंद देणाऱ्या आणि आपले आयुष्य मोक्षाकडे नेणाऱ्या सद्गुरू श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया . चैत्र महिन्यापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरु होते. अश्या ह्या चैत्रात येणारा महाराजांचा प्रगट दिन लक्ष लक्ष आशा मनात प्रज्वलित करतो . जगण्याची पुनश्च आस लागते . स्वामिसेवा करायला सुद्धा पूर्व पुण्याई लागते आणि जी ज्याला लाभली त्याच्या आयुष्याचे जणू सार्थक झाले . चैत्र वद्य त्रयोदशीला त्यांनी आपले अवतारकार्य संपवले. कसे जगावे आणि जगवावे ह्यासाठी संतानी मनुष्य देह धारण केला आणि आपल्यात वावरले . अपार कष्ट सहन केले. समाजसुधारणा, धर्म प्रेम जागृत केले. आजही स्वामी “ तारक मंत्रा” च्या रुपात भक्तांना भेटत असतात . “ अशक्य हि शक्य करतील स्वामी “ हे अभिवचन त्यांनी आपल्या भक्तांना दिले आहे .
महाराज हि प्रेरणा आहे , आत्मविश्वासाची देणगी आहे, सुखाची परिसीमा आहे, जीवनाची आनंदयात्रा आहे , जीवनाची इतिपुर्तता आहे . टाळ चिपळ्या , मृदुंगाच्या आवाजात विठ्ठलाचे स्मरण करत विठ्ठलाच्या नामात तल्लीन होणारा वारकरी आणि तारक मंत्र म्हणताना भावनाविवश होऊन आपल्या साश्रू नयनांनी सद्गुरूंच्या सेवेत रममाण झालेला भक्त एकच आहे. त्यांच्यात एकच तत्व आहे आणि ते म्हणजे गुरुतत्व .
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230