|| श्री स्वामी समर्थ ||
|
प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेणारा चंद्र
|
पत्रिकेतील ज्या भावात चंद्र गेला तिथे तुमच्या emotions, मन , भावना गेल्या हे लक्ष्यात ठेवायचे.
चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही . सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच परावर्तीत होवून पृथ्वीवर येतो ज्याला आपण चांदणे पडलेय असे म्हणतो. म्हणजे चंद्रकिरण हे खर्या अर्थाने सुर्याचेच किरण असतात . चंद्र आणि सूर्य जेव्हा पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात तेव्हा अमावास्या असते आणि पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी स्थिती असते त्याला पौर्णिमा म्हणतात . पृथ्वी हि वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत येताना सूर्याच्या आकर्षणामुळे तिला एक मोठी भरती आली आणि त्यात तिचा एक मोठा भाग तिच्यापासून वेगळा आला जो तिच्याभोवती फिरत राहिला . अशी चंद्राची जन्मकथा आहे.
शीतलता देणारा हा शुभ सात्विक ग्रह. सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे कारण तो मनाचा कारक आहे ज्याचा आपल्या विचारांवर ,मनावर प्रभाव असतो. आपली मानसिकता कशी असू शकेल हे चंद्रावरून समजेल. लग्नेश आणि बुध जर कमजोर असतील तरी चंद्र अधिक कमजोर होतो.
चंद्र मनाचा कारक आहे तसेच आईचाही .चंद्रमा मनसो जातः. चंद्रावरून भरती ओहोटी पण बघतात. समुद्र नद्या सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येतात. चंद्र शरीरातील पाण्याचा भाग तसेच पृथ्वीवरील जलतत्व नियंत्रित करतो.
चंद्र पत्रिकेत ज्या राशीत असतो ती आपली जन्मराशी दर्शवते आणि चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते. त्याचीच दशा आपल्याला जन्मस्थ असते जसे चंद्र जर आर्द्रा नक्षत्रात असेल तर आर्द्रा हे राहूचे नक्षत्र असल्यामुळे जन्मतः आपल्याला राहू दशा असणार . चंद्र कमजोर असेल तर सतत मनावर दडपण ,अनामिक भीती ,डिप्रेशन , मानसिक आजार , आत्मविश्वास कमी ,वृषभेत चंद्र उच्चीचा तर वृश्चिकेत निचीचा असतो. कर्क हि चंद्राची स्वतःची रास आहे .चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस असतो. आपण जो काही विचार करतो मग ते चांगले वाईट काहीही असो ते चंद्राच्या स्थितीवरून पाहतात. हा स्त्री प्रधान ग्रह आहे .शंकराची नित्य आराधना करावी. शुभ रत्न मोती आहे. चंद्रा सोबत केतू ,राहू, हर्शल, शनी हे ग्रह असतील तर ते चंद्राचे कारकत्व कमी करतात. चंद्राचे ह्या प्रत्येक पाप ग्रहा सोबत चे फलित वेगवेगळे आहे . चंद्र ६ ८ १२ ह्या त्रिकस्थानात तितकासा फळत नाही. चंद्राची दशा १० वर्षांची असते. रोहिणी , हस्त आणि श्रवण हि चंद्राची ३ नक्षत्रे आहेत.
पुरुषांच्या पत्रिकेत स्त्रीचा कारक ग्रह चंद्र आहे. आपल्या घरात आपली आई संतुष्ट आहे तर चंद्र चांगला आहे. आईला जर लहानपणापासून कष्ट आहेत तर चंद्र खराब आहे. मन भावना विचार चंद्राकडे आहेत , उत्चाह नाही, कायम निराशा , मानसिक भावनात्मक संतुलन नीट नाही. मन कोरडे . emotion खूप जास्ती किंवा खूप कमी. भाषेद्वारे ज्या भावना व्यक्त होतात त्या चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .
कमकुवत चंद्र असणार्या व्यक्ती कुणाच्याही प्रभावाखाली सहज येतात , चंचल मन , एकाग्रतेचा अभाव , स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम नाही . कश्यात मन न लागणे. कुठलाही विचार न करता प्रतिक्रिया देणे. सतत तणावाखाली ,उदासीनता ,थकणे , कश्यात रस नसणे. सतत नकारात्मक विचार मनात येणे, आपल्याच निरर्थक विचारात ,कोशात मग्न राहणे. मनातील विचार कुणाशीही न बोलणे , एकांतात बसून राहणे , वाचास्थान बिघडलेले असेल आणि नेप राहू हेही चंद्राच्या कुयोगात असतील तर प्रसंगी व्यसनाधीनता सुद्धा असते . हि सर्व चंद्र कमजोर असल्याची लक्षणे आहेत. बुध आणि लग्नेश कमजोर असतील तर अश्या व्यक्ती कुणाचीही प्रशंसा न करणे ,कारण मन अशांत. कुणाचे चांगले न पहावणे. कुणाचे वाईट झाले तर मनात आनंद होणे. छोटी सोच हि बिघडलेल्या चंद्राची लक्षणे आहेत .
कश्यातही सुख नाही.चंद्र बिघडला असेल तर राजयोग असतील तरी फायदा होत नाही. मानसिक आजार होतात तसेच .सतत confuse असतात . लहान सहान गोष्टीत निर्णय घेवू शकत नाहीत . इथे जायचे का तिथे समजत नाही. सतत मनाची घालमेल आणि दुसर्याशी कारण नसताना केलेली स्पर्धा , दुसर्याला पाण्यात बघणे .
सतत मनात भीती, fobia, enxeity, stress, व्यसने ,निद्रानाश.मानसिक आघात. गर्भाशयाचे प्रश्न तसेच मासिक पाळी वेळेवर न येणे ह्यासाठी चंद्र पाहावा कारण चंद्र हा शरीरातील जलतत्व दर्शवतो . तसेच harmonal imbalance सुद्धा शुक्र ,चंद्र ,बुध बिघडले असतील तर होवू शकतात. चंद्र राजयोगाला सुद्धा प्रभावित करतो. प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला कोण नेयील तर चंद्र.
पचनक्रिया कमजोर अर्थात शनी आणि गुरु पण पहिले पाहिजेत. चंद्र बिघडला असेल तर आई, घर , वाहनाचे सुखात कमतरता . चंद्र –मंगळ हा लक्ष्मी योग आणि चंद्र –गुरु हा गजकेसरी योग आहे. बुध –शुक्र योग सुद्धा विष्णू योग मानला जातो.
अभ्यासात मन लागत नाही , काहीच सुचत नाही करावेसे वाटत नाही , काही करण्यात आत्मविश्वास नाही , एकटेच बसून राहणे , अबोला ,विसरणे , फिट्स अश्या सर्व पत्रीका पाहताना आपले पाहिजे लक्ष्य हे चंद्राकडेच जाते . चंद्र म्हणजेच माणसाचे मन .
असा हा चंद्र पत्रिकेत शुभ ग्रहांच्या युतीत दृष्टीत असता व्यक्ती जग जिंकेल , मनात येणाऱ्या सर्व गोष्टी कार्यांत परावर्तीत करेल ,पण हाच चंद्र बिघडला तर हीच व्यक्ती कोलमडून पडेल. मनोविकाराना बळी पडेल. मध्यंतरी एका जातकाने आपल्या मुलासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी मला फोन केला होता . प्रश्न दोन दिवसांनी काय अजून 8 दिवसांनी पाहिला असता तरी चालला असता , त्यात गंभीर काहीच नव्हते . पण जातक स्वतः इतकं हायपर होता कि त्यांनी मला 5 मिनिटात अनेकदा फोन केला . माझा दिसरा फोन चालू होता म्हणून मी घेवू शकले नाही . पण त्यानाही ते समजत असेलच न कि फोन व्यस्त आहे. हि केस आहे चंद्र बिघडल्याची . लगेच हवे . मनात आले कि झालेच पाहिजे . विचार करण्याची कुवत नाही आणि राग नाकाच्या शेंड्यावर . असो .
मनाची हि अवस्था होण्यासाठी प्रामुख्याने चंद्र बिघडणे हे महत्वाचे कारण . चंद्र शनी युती , अंशात्मक असेल तर अधिक परिणामकारक , चंद्र हर्शल म्हणजे एकदम विक्षिप्त सतत मूड स्विंग होणे , चेहऱ्यावर पण सतत ताण , चंद्र राहू केतू सोबत असेल तर ग्रहण दोष असतो . चंद्र आणि बिघडलेला नेप हाही एक त्रासदायक योग आहे. चंद्र फारच बिघडला असेल त्यासोबत बुध सुद्धा तर मग मेंदूचे मनाचे असंख्य आजार , मानसिक रुग्ण होण्याची शक्यता असते. मुल होताना स्त्री च्या पत्रिकेत चंद्र सुस्थितीत असणे आवश्यक असते . म्हणूनच गर्भारपणात स्त्री ने आनंदी राहणे जेणेकरून गर्भावर चांगला परिणाम होतो.
चंद्र ग्रहण असेल तेव्हा मनोविकार असणार्या व्यक्तीत अनेक बदल दिसतात . त्या काहीश्या अधिक चिडलेल्या , घरातून निघून जाणे ई. अमावस्या पौर्णिमेजवळ सुद्धा त्यांच्या मनाची स्थिती अत्यंत वाईट असते. मनाचा बोजवारा उडाल्या मुळे अश्या व्यक्ती ह्या काळात काहीही करू शकतात , स्वतः जीव देऊ शकतात आणि दुसर्याचा घेवूही शकतात .
आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या भावात असतो ती आपली जन्मरास असते. चंद्राच्या जन्माच्या अनेक पौराणिक कथा वाचायला मिळतात. चंद्र हा कृष्णपक्षात क्षीण होत जातो . ज्यांचा जन्म अमावास्येच्या आसपास चा असतो ते जराश्या गोष्टीने सुद्धा त्रासलेले दिसतात आणि त्यांचा हा त्रागा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे हा संदर्भ विष्णू पुराणात आढळतो. समुद्रातील पाणी वास्तविक कमी अधिक होत नाही पण चंद्राच्या आकर्षणामुळे तसे वाटते. चंद्राच्या आकर्षणामुळे पाणी ओढलेले दिसते .
भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून त्यालाच कोजागिरीला ओवाळते. कालपुरुषाच्या कुंडलीत चंद्र हे मूळ मानले आहे आणि इतर ग्रह ह्या शाखा आहेत . जर चंद्राचे इतर ग्रहांशी योग चांगले नसतील तर शुक्र गुरु कितीही चांगले असतील तरी काहीही उपयोग नाही. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री हे एक विलक्षण कोडे आहे अगदी तसेच मनाचेही आहे. मानवी मनाचा थांगपत्ता लागणे कठीण असते .
विश्वाचा गाडा अखंड चालू ठेवण्याचे महान कार्य देवाने स्त्रीकडे सोपवले आहे. अखंड विश्वात जे जे सुंदर आहे पवित्र आहे, मंगल आहे ते स्त्रीमध्ये आहे .रवी हा आत्म्याचा तर चंद्र मनाचा कारक आहे. चंद्र मनाचा कारक असल्यामुळे त्याला बघून कविताही सुचतात . चंद्राच्या शीतल चांदण्यात जोडपे वैवाहिक आयुष्याची सुरवात करतात म्हणून मधुचंद्र . रामाने सुद्धा कौसाल्येकडे चांदोबा हवा खेळायला म्हणून हट्ट केला होता असा हा चंद्र जनमानसाचा लाडका आहे.
मातेचे सुख चंद्रापासून बघतात . प्रेमळपणा , संपत्ती ,नैराश्य , आनंद , शरीरावरील शिरा , शरीरातील जलतत्व ,कुटुंब प्रेम ,जलाशय , पर्यटन , नौकाविहार , फळे फुले , चांदी ,पेये , फळांचे रस , तसेच घशाचे आजार , स्वादुपिंड , स्तन , लाळ, दमा ह्यावर चंद्राचा अंमल आहे.
विसरणे , मानसिक कमकुवतपणा,मेंदूची क्रिया ,पुरुषाचा उजवा तर स्त्रीचा डावा डोळा , वेड लागणे , प्रवासाची आवड , तीर्थयात्रा , विवेक स्त्रीसुलभ लज्जा ,गौरवर्ण,अती चंचलता चंद्रावरून पहिली जाते.
चंद्र हा मोकळ्या आकाशात दुडूदुडू धावणारा आणि मनस्वी आहे. त्याला बांधून ठेवले कि तो हिरमुसतो .त्याला मुक्तपणे भटकंती आवडते आणि म्हणूनच तो एका राशीत जेमतेम सव्वादोन दिवस असतो . रोहिणी हे त्यांचे अत्यंत आवडते नक्षत्र आणि त्याच नक्षत्रात वृषभेत तो उच्च होऊन फळे देतो. वृश्चिक राशी हि खोल पातळ आहे जिथे मिट्ट अंधार असतो आणि म्हणूनच चंद्र तिथे निचीचा होत असावा , मुक्त आयुष्य जगायला आवडणाऱ्या कुणालाही खोल अंधार असणारे पाणी कसे आवडेल.
आपल्या मनाविरुद्ध घटना घडली ,अपेक्षाभंग , जवळच्या व्यक्तीने फसवले , प्रेमभंग , हातातोंडाशी आलेली नोकरी मिळाली नाही , अश्या अनेक अनेक घटनांमुळे आपल्याया त्रास होतो .आपल्याला म्हणजेच आपल्या मनाला आणि म्हणूनच चंद्रमा मनसो जातः असे म्हंटले आहे . मन दिसत नसले तरी आहे .
पत्रिकेतील चंद्राला बळ मिळण्यासाठी खालील उपाय सातत्याने करावेत.
उपात सातत्य हवे .
शांत राहणे शिकायला हवे. सतत बोलणे टाळावे. विचार कमी करणे.
ध्यान ,साधना हा सर्वोत्तम उपाय. रोज 30 मिनिटे तरी शुद्ध हवेत शांत बसणे.
लहानसहान गोष्टीत त्रास करून घेणे टाळणे. नकारात्मक बोलणे टाळावे.
संगीत गाणे ऐकणे जे शांत असेल. गाणे ऐकणे म्हणजे फक्त गाणे ऐकणे त्यात इतर गोष्टी नकोत .
मनमोकळे बोलणे आणि खळखळून हसणे. समझदार लोकांशी संभाषण करणे , लोकांचे ऐकणे.
आपले छंद जोपासणे. झाडांशी गप्पा मारणे. संगती चांगली हवी. वास्तूत सकारात्मक वातावरण हवे.
ओं नमः शिवाय जप करणे, शंकराची आराधना , अभिषेक करणे.
श्री स्वामी समर्थ , दत्तगुरू ह्यांचे नामस्मरण करावे. महामृत्युंजय जप.
पांढर्या वस्तूंचे दान जसे साखर , पाव , वह्या .तांदूळ , दुध, मिठाई करावे .
चंद्राचे व्यवसाय – ज्योतिषी , जनसंपर्क अधिकारी , HR , अत्तराचे व्यवसाय , दुधाची डेअरी , सुईण , पाण्याशी संबंधित व्यवसाय , मोत्याचे व्यापारी , औषधाचा व्यवसाय , शिक्षक , अध्यापक .
आपले मन कश्यात रमते आणि कश्यात नाही हा अभ्यास ज्याचा त्यानेच करायचा आहे.
पुढील लेखात आपण प्रत्येक राशीतील आणि नक्षत्रातील चंद्राचे फलित बघुया .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230