|| श्री स्वामी समर्थ ||
शेगाव हून आणलेल्या महाराजांच्या पादुकांची आज देवघरात प्रतिष्ठापना केली . त्यांच्या चरणाशी मला जागा मिळाली आहे आणि आता ती प्राण गेला तरी सोडणार नाही . आज मागे वळून पाहताना जाणवते कि पात्रता नसतानाही त्यांनी खूप खूप भरभरून दिले आहे . जीवनाला अध्यात्माची जोड मिळाली तर ह्यापेक्षा दुसरे काय अभिप्रेत आहे म्हणा. जीवन आनंदी आहे . अपेक्षाविरहित आहे , जे देत आहेत तेही खूप आहे आणि ह्याचा विसर क्षणभर सुद्धा नाही . गेले 8 दिवस काय करू आणि काय नको असे मलाच नाही तर, ज्यांच्या हृदयात महाराजांच्या प्रेमाची ज्योत तेवत आहे , त्या सर्वाना असेच झाले असणार . कधी एकदा पौर्णिमा येते आहे आणि महाराज आशीर्वाद द्यायला आपला हात माझ्या मस्तकावर ठेवत आहेत असे झाले आहे. म्हणूनच मुखाने सतत एकच प्रार्थना आहे..” वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ...” त्यांच्या एका प्रेमळ कटाक्षाची
प्रतीक्षा संपली आहे .
संपूर्ण घरात एक वेगळेच चैतन्य मी आज अनुभवत आहे. आज महाराज आले कि ते कुठे बसतील , मी त्यांच्याशी काय बोलणार ? त्यांना आवडणारे सगळे पदार्थ तर केलेच आहेत पण त्यांना काय आवडेल ? त्यांच्या आवडीची सर्व फुले , विडा नेवैद्य तयार आहे . एखादी गोष्ट राहून तर नाही ना गेली ? अश्या सर्व विचारांची भाऊ गर्दी आज मनात आहे. ह्या वर्षीची गुरुपौर्णिमा माझ्या नवीन वास्तूत होणार असल्याने विशेष उत्साह आहे . त्यांच्या पदस्पर्शाने आज माझी वास्तू पावन होणार आहे . गेले काही दिवस मला फक्त पादुकाच दिसत होत्या . महाराजांच्या चरणाची पूजा करताना प्रत्यक्ष त्यांचेच चरण समोर आले . मागे वडाचे झाड आणि समोर स्वामी . हे खरेच होते कि भास मला नाही माहिती पण त्यांचा स्पर्श मी अनुभवला हे नक्की. त्याचे काय संकेत आहेत ते समजण्याची कुवत माझ्या पामरात नाहीच नाही पण आज त्यांच्या सेवेत अखंड राहता यावे म्हणून आज पादुकांची प्रतिष्ठापना केली . आता अखंड विश्वात काहीही झाले तरी तिथून हलायचे नाही हाच निर्धार आहे. अखंड सेवा आणि नामस्मरण ह्यातील आनंद केवळ अविस्मरणीय आहे आणि मी तो प्रत्येक क्षणी लुटत आहे .
नामस्मरणाचे व्यसन लागले तर दुसऱ्यातील दोष आणि उणीदुणी दिसत नाहीत तर स्वतःच्याच चुका दिसायला लागतात हे त्याचे गमक आहे . आपल्यातील “ मी “ ची आहुती देण्यासाठी नामस्मरण हे औषध गुणकारीच म्हंटले पाहिजे .
पूर्वसुकृत चांगले असेल तरच गुरुसेवा घडते आणि गुरुही भेटतात ह्याचा दाखला महाराजांचे परमभक्त दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या रसाळ , समग्र ग्रंथात दिला आहे. महाराजांच्या भक्तांचे अनुकरण करायला सांगितले तर मी दोन भक्तांचे करीन एक म्हणजे गणू जवर्या आणि दुसरा म्हणजे निस्सीम भक्त बंकटलाल. गणू ची अपार भक्ती आणि श्रद्धा ह्यामुळे महाराज धावून आले आणि त्याला जीवनदान दिले . खरच त्यांच्याच जीवावर माझ्याही उड्या आहेत. आपल्या सर्वांच्याच आहेत म्हणा. बंकटलालासारखी निस्सीम भक्ती खरच विशेष आहे कारण महाराजांना ओळखण्याची दिव्य दृष्टी त्याला होती म्हणूनच त्याने संपूर्ण विश्वाची महाराजांशी ओळख करून दिली . तशीच आयुष्यातील चांगले वाईट गोष्टी आणि माणसे (कलियुग आहे बाबा ) ओळखायची दृष्टी महाराजांनी आपल्याला द्यावी हीच प्रार्थना .
महाराज आपल्यावर कधी प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छा कधी पूर्ण करतील हा विचार सुद्धा करू नये कारण त्यांना आपल्याला काय आणि कधी द्यायचे ते माहित आहे . ते आपले जन्मोजन्मी चे साथी आहेत म्हणूनच ह्याही जन्मात त्यांच्या सेवेचा लाभ आपल्याला मिळत आहे. ती सेवा अंतर्मनापासून करत राहणे हेच आपल्या हाती आहे.
काहीही झाले तरी आपला विठोबा घाटोळ होऊ द्यायचा नाही हा मनोमनी निश्चय करायचा आहे आज. निदान इतके तरी आपण करूच शकतो. सतत कसली तरी आसक्ती घेवून जगणारे आपले मन नामस्मरणात एकदा का रमले कि मागणे संपते आणि फक्त देणे उरते .
करोना नंतरचे जग बदलत आहे , कुणास ठाऊक उद्या त्याचा काका मामा भाऊ येयील पण आपण कष्टास मागे हटायचे नाही आणि महाराजांच्या भक्तांनी तर कश्यालाच घाबरायचे नाही. मनात कुठलाही कल्प विकल्प न आणता फक्त मनापासून सेवा करत राहणे हेच जीवनाचे उद्दिष्ठ असले पाहिजे . आपल्या श्वासावर विराजमान असलेल्या आणि आपल्या हृदयाची प्रत्येक धडकन असणारे आपले गुरु पाठीशी खंबीर असताना भीती कसली . आळशी माणसाचे तोंड सुद्धा बघू नये असे महाराजांनी भक्तांना सांगितले आहे. कष्ट करून शेत पिकवून खा हा आदेश देणार्या आपल्या महाराजांचे चरण स्पर्श आज आपल्या घराला होत आहे , हे अहो भाग्याचे लक्षण आहे.
त्यांच्या स्वागताच्या तयारीत आपण स्वतःलाही विसरलो आहोत . हीच तर खरी भक्ती आहे .महाराज हा एकच ध्यास आहे आणि ह्यालाच गुरुकृपा म्हणत असावेत. फक्त प्रचीती मिळावी म्हणून भक्ती नको तर ती करत राहायचे आहे कारण प्रचीती हि मिळणारच आहे पण फक्त त्यासाठी स्वामी स्वामी नको . मी महाराजांचा भक्त आहे हा अहंकार सुद्धा अजिबात नको . रोज नव्याने संकटे येणार आहेत पण काहीही झाले जीवनात कितीही वादळे येवुदेत आपण आपली त्यांच्या चरणाशी असलेली जागा सोडायची नाही .
जन्म मृत्युच्या फेर्यातून सोडवणारे आपले महाराज भक्तांच्या मनावर विराजमान आहेत . त्यांच्या सहवासात आपले जीवन व्यतीत होणे ह्यासारखे भाग्य दुसरे असूच शकत नाही . संतसेवेचे अपार पुण्य आहे , त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या महाराजांच्या सेवेतून क्षणभर सुद्धा उसंत नको हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .
रोजच्या दैनंदिन जीवनातून काही काळ तरी त्यांच्या सेवेत घालवून आपले जीवन कृतार्थ करणे हेच आपले परम कर्तव्य आहे. आज मी महाराजांना माझ्या हाताने भरवणार आहे , त्यांच्यासाठी विडा सुद्धा आणला आहे. त्यांच्या पायाला तेल लावणार आहे त्यांना डोळे भरून पाहणार आहे आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणार आहे . त्यांचे माझ्या घरातील अस्तित्व मी प्रत्येक क्षणी अनुभवणार आहे .
त्यांच्यामुळे माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्याला चार चांद लागले आहेत , आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर त्यांनी नेले आहे. उरलेल्या आयुष्यात माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी मला नामस्मरण , पारायण करण्याची संधी द्यावी .समाजासाठी काहीतरी चांगले करून , त्यांच्याच कृपेने मला असलेले ज्ञान इतरांना देवून मला इथून जायचे आहे. माझे मन आणि चित्त सदैव त्यांच्या चरणाशीच असावे आणि कुठल्याही क्षणी त्यांचा वियोग नको हेच आज मागायचे आहे . महाराजांच्या माझ्या आयुष्यातील आगमनामुळे माझ्या दुक्ख संकटांची होळी झाली , त्याची तीव्रता कमी झाली आणि माझे आयुष्य तेजोमय झाले म्हणूनच मी महाराजांना माझे बेस्ट फ्रेंड बनवले आहे . रोजच्या जीवनातील प्रत्येक मिनिटांचा आखो देखा हाल त्यांनाच सांगत असते , भाजी आणायला गेले , बँकेच्या कामासाठी गेले सर्व सर्व त्यांना सांगितल्याशिवाय चैन पडत नाही मला.
महाराज म्हणजे जीवन जगण्याची शक्ती , चैतन्य आणि भला मोठा विश्वास . नवीन कार्यशाळेचे आयोजन त्यांनाच विचारून , कुठे प्रवासाला जाणे त्यांना सांगून आणि आता हे माझे रुटीन झाले आहे कित्येक वर्षापासून . कुठलाही लेख त्यांच्या चरणी ठेवते मग जे कुणी वाचतील ते . इतक्या वर्षाच्या अध्यात्मिक प्रवासातून मला इतके समजले आहे कि सेवेत आपला जीव ओतावा लागतो तरच ह्या भक्तीतून ह्या देवाला पाझर फुटतो . लाखो लोक आज शेगाव शिर्डी अक्कलकोट गोंदवले इथे जाऊन महाराजांचे दर्शन घेत आहेत त्यांच्या पवित्र ग्रंथांची पारायणे करीत आहेत पण आपल्या भक्तीची , श्रद्धेची खोली तेच जाणतात .त्यांचे दर्शन हाही एक सुखद अनुभव असतो. जे होईल ते त्यांच्या इच्छेने आणि जे करतील ते आपल्या भल्यासाठी हा विश्वास सर्वांनी ह्या गुरुपौर्णिमेला वृद्धिंगत केला पाहिजे तसेच आपला संसार सुद्धा त्यांना समर्पित करावा .
आमरण वारी घडो आणि सदैव तुमचे चिंतन राहू दे , श्वासात श्वास आहे तोवर लेखन होत राहूदे हीच विनंती आहे. इतके वर्ष श्री गजानन विजय ग्रंथ वाचूनही प्रत्येक वेळी ग्रंथात नवीन काहीतरी ओवी दिसते म्हणजेच अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे बघा . गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्त जना .
अंतर्मानापासून त्यांना “ साद “ घालूया आणि “ प्रसाद रुपी “ आशीर्वाद मागुया तोही अगदी हक्काने प्रेमाने...
प्रसाद हा मज द्यावा देवा | सहवास तुझाची घडावा देवा ||
निशिदिनी तव मी नाम स्मरावे | विसर तुझा न पडावा देवा ||
हृदय मंदिरी तुला बैसवूनी | ज्ञान योग मज व्हावा देवा ||
हरिनामामृत निशिदिनी पाजुनी | जन्ममृत्यु चुकवावा देवा ||
आत्मसुखाची हीच विनंती | वियोग ना तव व्हावा देवा ||
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230