Thursday, 31 August 2023

मन कश्यात ???

 || श्री स्वामी समर्थ ||



संदीप खरे ह्यांचे सुंदर काव्य “ मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत...” कानावर पडले. इतके सुंदर काव्य रचणाऱ्या कवीचे मन किती कोमल मृदू असेल नाही . मग मी माझ्याच मनाचा शोध घेवू लागले ..माझे मन कश्यात असते किंवा कश्यात रमते ? गाणी ऐकण्यात ? प्रवास करण्यात ? स्वतःचे छंद जोपासण्यात कि आवडत्या पदार्थांवर ताव मारण्यात ? माझे मलाच हसू आले. मन कश्यात रमते त्याहीपेक्षा ते वास्तव जगतात नक्की कुठे असते ? हा प्रश्न योग्य वाटला. ज्योतिष समुपदेशन करताना प्रत्येक वेळी आपण पत्रिकेतील चंद्राची स्थिती पाहतो कारण चंद्र हाच करा आपल्या पत्रिकेचा “ करता करविता “ . मनाने हिरवा सिग्नल दिला कि आपण करत असलेल्या कामात जीव ओततो , समरसून जातो . मनाचा कौल मिळाला कि जग सुंदर वाटू लागते आणि मन प्रफुल्लीत होते पण हेच मन उदास झाले तर नाही नाही त्या व्याधी शरीर पोखरू लागतात आणि हेच जग निरस वाटू लागते अगदी जीवनाचा प्रवास संपवून टाकण्यापर्यंत विचारांची मजल जाते . अनेकदा मनावरील दडपण so called guilt सुद्धा त्याला कारणीभूत असते.


आज ह्या मनाबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न करुया . आजच्या जीवन शैलीचा विचार करता घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आपण सर्व कमी जास्त मानसिक तणाव घेत असतो किबहुना तो अपोआप येतच असतो . कार्यालय , घर , प्रपंच , आर्थिक घडी , मुलांची शिक्षणे त्यांचे विवाह ह्या सर्वातून प्रवास करताना आपल्या आयुष्याची संध्याकाळ कधी होते समजत नाही आणि ह्या सर्वच अगदी वयाच्या तरुण अवस्थेपासून आपल्यासोबत कित्येक वर्षाचा सहप्रवासी “ तणाव “ हा एक दिवस हळूहळू डोके वर काढू लागतो . मानसिक ताणताणाव शरीरावर एका रात्रीत प्रभाव टाकत नाही तर कित्येक वर्ष मनाच्या कोपर्यात दडलेला हा तणाव शरीराला आणि मनालाही असह्य झाला कि मगच त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात .

आज मनाच्या विविध अवस्थांचे कंगोरे बघुया .  आजचा प्रगत सोशल मिडीया आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवत आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोशल मिडीया मुळे सहजप्राय झाल्या आहेत . आपली एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्माण झालेले उत्कृष्ट मध्यम आहे. मग ती एखादी रचलेली चारोळी असो , लेखन असो , सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा असो किंवा सहलीची जाहिरात असो. अनेकांपर्यंत क्षणात पोहोचते . आपल्या अंगातील सुप्तगुणांना अनेकां कडून मिळालेली शाबासकीची थाप मनाला आनंद देते आणि कदाचित त्याचमुळे आता शेअरिंग वाढत आहे. कुठलीही गोष्ट मनात साचवून ठेवले कि आजार आलेच म्हणून समजा , पण त्या मनातील विचारांचा निचरा केला तर मन धबधब्यासारखे प्रवाहित होईल आणि आजारपणाचा लवलेश सुद्धा आपल्याला शिवणार नाही . पण आजकाल कुणाशी बोलायचे ते समजत नाही कारण नात्यातील विश्वास कमी होत आहे. 

आज दुक्ख , मनातील सल लपवून मी किती आनंदी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास सुरु आहे हेही प्रकर्षाने जाणवते . मनातील सल , एकटेपणा शेअर करायलाच पाहिजे . तो प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात असतो. मनमोकळे बोलणे , हसणे आपण विसरून गेलो आहोत .आपण जे काही आहोत जसे आहोत ते सर्वप्रथम आपण स्वतः स्वीकारले पाहिजे , ते लपवून ठेवले तर त्याचा त्रास आपल्यालाच कालानुरूप होणार आहे. जग पुढे जातंय , नवनवीन शोध लागत आहेत , वयोमर्यादा वाढत आहे पण माणसाच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी न होता वाढत चाललेला आहे आणि त्यातून अनेक मानसिक आजार जन्म घेत आहेत . कुणाशीही मोकळेपणाने न बोलणे, घुसमटत राहणे , नात्यातील संपणारा विश्वास त्यामुळे पोटातील शब्द ओठापर्यंत येत येत राहतात अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली दिसते . पूर्वीच्या लोकांकडे भौतिक सुखाची रेलचेल नव्हती पण समाधान होते . आज सर्व सुखे पायाशी असूनही डीमेंशिया , अल्झायमर , मधुमेह , हृदयरोग ह्यांचे प्रमाण अगदी लहान वयातील लोकांमध्ये सुद्धा वाढताना दिसतंय .आपले शरीर कमकुवत करणारा आणि झोप उडवणारी सुखे शेवटी काय कामाची नाही का? 

मानवी शरीरातील प्रगल्भ अवयव म्हणजे मेंदू . मेंदूवर संपूर्ण ताबा हा मनाचा असतो म्हणूनच मन शुद्ध सात्विक आणि सशक्त असेल तर मेंदू हा व्यवस्थित कार्यरत असणारच . अनेक आजारांचा उगम हा मनातूनच होत असल्यामुळे थोडक्यात आजारांचे मूळ मनातच आहे त्यामुळे मनाचे आरोग्य उत्तम असणे आपल्यासाठी अति अति महत्वाचे आहे. मन निरोगी नसेल स्वछ्य नसेल तर ते आजारपणाने घेरले जाते . आपला मेंदू हा अनेक केमिकल्स चे मिश्रण आहे आणि त्यांचा योग्य समतोल राखला गेला तर मेंदू सतेज असतो योग्यपणे कार्यरत होतो . एखाद्याशी भांडणे , प्रेमाची प्रीतीची भावना प्रगट करणे , काळजी करणे , एकमेकातील स्नेह वृद्धिंगत करणे ह्या अश्या विविध भावना जेव्हा प्रगट होतात तेव्हा त्याच्या मागे मेंदूतील विशिष्ठ रसायन काम करत असते . ह्या भावभावना जश्या कमी अधिक होतील तसे ह्या रसायनाची निर्मिती सुद्धा होत असते. आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे ह्या रसायनाच्या निर्मितीची प्रक्रिया कमी होते आणि म्हणूनच आपला स्ट्रेस वाढतो आणि त्याचे अगणित परिणाम मनावर आणि पर्यायाने शरीरावर होताना दिसतात . मेंदूतून स्त्रवणार्या ह्या रसांचा समतोल राखायचा असेल तर आनंदी जीवन शैली असणे गरजेचे आहे . घरातील नात्यातील मोकळेपणा , नात्यातील ओढ , एकमेकांसाठी जगणे आणि आणि नात्यातील विश्वास असेल तर जगण्याची मजा और असते आणि हेच सर्व आजकाल संपुष्टात आले आहे. एकमेकांकडे जावेसे न वाटणे , लहान सहन गोष्टीत अगदी घरातल्या घरात सुद्धा लपवाछपवी ह्यात नाती आणि माणसे हरवून गेली आहेत . पूर्वीचा काळ आणि माणसे सुद्धा साधी सरळ भोळी होती , पैशाने फार साधन नव्हती पण मनाची श्रीमंती खूप होती , कुटुंबात एकोपा होता , मोठ्यांना मान देणे , कुटुंबप्रमुखाचे निर्णय एकमताने मान्य होत असत. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबात अनेक कुटुंब प्रमुख निर्माण झाले. प्रत्येक जण आपापल्या पुरतेच जगतोता दिसतो आता . माझे मी बघीन त्याचे तो बघेल हीच भावना मनात खतपाणी घालायला लागली आहे. 

मन आनंदी ठेवण्यासाठी खूप मोठ्या खर्चाची गरज नसते लहान सहान घटना सुद्धा पर्वता इतकं आनंद देतात . जीवनाकडे बघण्याच्या संकल्पना आणि दृष्टीकोण आजकाल फार संकुचित झालाय आणि काहीतरी मिळवण्याचा सततचा ध्यास त्यासाठी जीवाची चाललेली सततची धडपड तसेच ह्या सर्वातून निर्माण होणारी असुरक्षित पणाची भावना ह्यामुळे मनाचा एकंदरीत समतोल नाही गेला तरच नवल.

पूर्वीचा काळ परत येणार नाही कदाचित नव तेच स्वीकारून पुढे जाणे सर्वार्थाने इष्ट ठरेल पण त्यातही पूर्वीचा एकोपा गोडवा निदान सणासुदीला किंवा समारंभातून जपला गेला पाहिजे. आजच्या पिढीतील मुलांना घरात चार पाहुणे यायची सवयच राहिलेली नाही. मग एकमेकांकडे राहायला जाणे तर फार दूर . अपवाद म्हणून आजही अनेक कुटुंब एकोप्याने नांदत आहेत नाही असे नाही पण हे उदा फार विरळ आहेत . आज सगळीकडे काहीतरी लपवण्याकडे कल असतो . घर घेतले गाडी घेतली कुणालाही सांगायचे नाही समजेल तेव्हा समजेल. पूर्वी असे नव्हते . आवर्जून सर्वांचे आशीर्वाद घेतले जात असत. सगळ्यांना मान देवून एखाद्या गोष्टीत सल्ला त्यांचे मत विचारले जात असे. कुणाची दृष्ट लागण्यासारखे कुणीही इथे मोठे नाही सगळे आपलेच असतात आणि राहतात . पण आजकाल मत्सर , विघ्नसंतोषी वृत्ती ,दुसर्याचे चांगले न पहावाने हे गुण वाढीस लागले आहेत ते निव्वळ हव्यासापोटी , सतत काहीतरी मिळवणे जे कधीच पुरे न पडणारे आहे. आणि मग त्यातूनच हि तुलना निर्माण होते . 

लहानपणी आपण खूप खेळायचो पण आता तेही विसरून गेलो आहोत त्यामुळे आता ट्रेन बस पकडायला सुद्धा दमछाक होते. गाणी ऐकणे , आपले छंद जोपासणे , पुस्तके वाचणे ,चित्रकला किंवा इतर गोष्टीत आपण दिवसातला काही वेळ तर नक्कीच देऊ शकतो त्यामुळे आपले मन आणि मेंदू सुद्धृढ राहील पण आपल्याला फक्त काम काम आणि काम ह्यातच मोठेपणा वाटतो. जीवनातील हे हलके फुलके आंनद जे तुमचे शारीरिक आणि मानसिक आजार दूर ठेवू शकतात पण दुर्दैवाने त्यालाच आपण मुकलेले आहोत .


आपले मन कश्यात आहे ते ओळखता आले पाहिजे. आपल्याला देवाने भरपूर वेळ दिलाय . रोजच्या जीवनशैलीतील जरासा वेळ आणि केलेला बदल सुद्धा आपल्याला आनंदाची कवाडे उघडून देयील. “ मी आनंदी आहे “ हे दाखवणे आणि “ मी खरच आनंदी आहे ”  ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . दाखवण्यापेक्षा खरच असणे निरोगी मनाचे लक्षण आहे. मी आनंदी नाही आहे , तरीपण ते दाखवत राहायचे कुणाला ? आणि कश्यासाठी ? त्यापेक्षा आपण आपल्याशी प्रतारणा न करता ते सत्य स्वीकारले तर आपण निश्चित आनंदी होऊ ह्यात दुमत नाही. प्रेमाचा दिखावा नको तर खरच ओलावा हवा .

आपल्या जीवनाचा लगाम आपल्या हातात असेल तेव्हाच खर्या अर्थाने आपण आनंदी होऊ , स्वछंदी पाखराप्रमाणे आकाशात इथून तिथे तिथून इथे मस्त भटकंती करू आणि जीवनाचा खरा आस्वाद घेवू . ह्याला काय वाटत आणि त्याला काय वाटत हे विचार खूप झाले आता मला स्वतःला काय वाटत हे महत्वाचे आहे . नकारात्मक लहरी आपल्याला त्रास देतात म्हणून नकारात्मक लोकांना दूर ठेवा , नकारात्मक मेसेज , घटना आणि अश्या प्रकारे बोलणारी लोक सुद्धा दूर असलेलीच बरी .जगातील सगळ्या घटना आपल्याला समजल्याच पाहिजेत हा नियम नाही. आपल्याला जे समजायला पाहिजे ते कळले कि पुरे , जराजाराश्या गोष्टीनी आपल्या इगो दुखावतो . सगळ्यांनी आपल्यालाच महत्व दिले पाहिजे आणि मी नसेन तर हे जग सुद्धा चालणार नाही माझ्याशिवाय सगळ्यांचे अडते  ह्या भ्रामक कल्पना विश्वातून बाहेर या. आपण जन्माला आलो त्याच्या आधीही हे विश्व होते आणि आपल्या नन्तर पण असणार आहे तेव्हा स्वतःला महत्व देवून “ मी “ पणा जोपासणे पुरे . जितके वास्तव लवकर स्वीकारू तितके अधिक आनंदी होऊ . आज हसणे विसरलो आहोत आपण . म्हणून तर हास्य क्लब ची निर्मिती झाली . पूर्वी कुठे होते असे. लोक मोकळ्या आकाशासारखी मोकळ्या मानाने जगत. विज्ञानाने प्रगती केली आपण चंद्रावर गेलो पण आपले मन कश्यात आहे ते अजूनही आपल्याला ओळखता येत  हे दारूण सत्य आहे.  मन मारून जगू नका . माझ्या एका मैत्रिणीला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात पण घालत नाही लोक काय म्हणतील ? मला कसे दिसेल ? आमच्या घरात सगळे ड्रेस साडी नेसतात . मी तिला म्हंटले लोक ? कुठली लोक? आणि तू घालायला सुरवात केलीस कि तुझ्या घरातील सुद्धा सर्व स्त्री वर्ग तुझी कॉपी करतील आणि घालतील. तू तुझे मन मारून अजिबात जगू नकोस.

लहानपणी आपण किती कला शिकलो मग मोठे झाल्यावर प्रपंचात अडकलो आणि विसरलो. शाळेत सुद्धा 8 तास सतत अभ्यास करून मेंदूवर ताण येऊ नये म्हणून चित्रकला , संगीत हे आपले सर्व शिकवले जात असे. आता नव्याने सुरवात करुया .


चला तर मग शोध घेवूया आपले मन नक्की कश्यात आहे ? जीवनातील अगदी जवळच असलेले अनेक आनंदाचे स्त्रोत नव्याने उमगतील.  करून पहा आणि अभिप्राय नक्कीच कळवा . 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Tuesday, 22 August 2023

लग्न भाव -प्रथम तुला वंदितो

 || श्री स्वामी समर्थ ||


धर्म त्रिकोणातील आणि एकंदरीत पत्रिकेतील सर्वात महत्वाचा भाव म्हणजे प्रथम भाव ज्याला तनु किंवा लग्न स्थान सुद्धा म्हंटले जाते . आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी राशी ह्या भावाची द्योतक असते. तसे पत्रिकेतील प्रत्येक भावाला अनन्यसाधरण असे महत्व आहे पण लग्नभाव आणि त्यातील ग्रह तसेच त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह इथूनच अभ्यास सुरु झाला पाहिजे आणि तसा तो झाला नाही तर फलादेश नक्कीच चुकणार . लग्न भाव म्हणजेच तनु स्थान , तनु म्हणजे शरीर आपण स्वतः .हा भाव दर्शवतो तो आपला मेंदू म्हणजेच आपली सोच . ती किती चांगली वाईट त्यावरून आपले आयुष्य असते. दिसणे आणि प्रत्यक्ष असणे ह्यातील फरक सूक्ष्म पणे दर्शवणारा हा भाव आहे. इथे सखोल अभ्यासाची आवश्यकता नक्कीच आहे. ज्याचा इथे अभ्यास कमी पडेल त्याला हि व्यक्तीच समजणार नाही. आपण सर्वच इथे एका विशिष्ठ उद्देशाने आलो आहोत आणि आपले काम झाले कि आपण जाणार आहोत . ते काम कुठले आणि कसे करणार त्याची उकल हा भाव करतो. 


लग्न भावापासून सुरु झालेला आपला प्रवास व्यय भावात पूर्ण होतो. लग्न भाव आपले विचार त्याच्या कक्षा दर्शवते. आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण , जीवनातील संकटांवर मात करण्याची त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता आपल्यात आहे कि नाही ? असल्यास किती आहे ? आपले व्यक्तिमत्व त्यातील बारकावे , एखाद्यावर छाप पडण्याची वृत्ती आणि आयुष्य स्वीकारण्याची मानसिकता ह्या सर्वच गोष्टी इथे आहेत . एखाद्या संकटाने गर्भगळीत होऊन आयुष्य संपवून टाकण्याची भाषा करतो कि पुन्हा उभे राहून स्वतःला “ लढ “ म्हणण्याची ताकद आहे हे दर्शवणार्या लग्न भावाची महती आहेच. आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा उगम लग्न भावाशीच असतो . कारण तिथे आपण “ स्वतः “ असतो . म्हणूनच हा भाव संघर्षाचा आहे , इथे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःला जागवण्याची जिद्द , धडपड आहे. लग्न भावात सर्वात महत्वाचा आहे तो मेंदू . आपले विचार आपले व्यक्तिमत्व तयार करत असतात आणि त्याची छाप आपल्या चेहऱ्यावर सुद्धा असतेच . त्यामुळे आपला राग लोभ मत्सर वेदना हाव भाव द्वेष आनंद उत्साह वासना सर्व काही इथे लपून राहत नाही त्या वेळोवेळी प्रगट करणारा हा भाव ज्याला आपल्या अभ्यासात खरतर मेरुमणी म्हंटले पाहिजे . लग्न बलवान असेल तर पत्रिकेचा दर्जा उंचावतो .लग्नेश आणि लग्नातील ग्रह आपली ओळख करून देत असतात . त्याच सोबत लग्न बिंदू सुद्धा महत्वाचा आहे. 


एकंदरीत काय तर तनु भाव राजस आहे पण अनेकदा त्याचा अपूर्ण अभ्यास आपल्याला योग्य उत्तराकडे नेऊ शकत नाही. 

प्रश्न कुठलाही असो तो कुणाचा आहे? जातकाचा आणि जातक कुठे आहे तर अर्थात “ लग्न भावात “ .

वाहन घ्यायचे आहे , विवाह करायचा आहे , संततीचा प्रश्न आहे, कर्ज घ्यायचे आहे, परदेशी जायचे आहे , व्यथा आहे , वेदना आहेत , उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण हे सर्व कुणाला ? तर जातकाला त्यामुळे आयुष्यातील कुठल्याही प्रश्नाचा उगम हा प्रथम भावातूंनच होणार म्हणून त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. एकदा हा भाव समजला कि जातक एखादे काम किंवा एखादी जबाबदारी निभावून नेऊ शकेल , ती क्षमता त्यात आहे का ? हे सहज लक्ष्यात येते .


म्हणूनच लग्न भावाला -प्रथम तुला वंदितो म्हंटले तर वावगे ठरू नये. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Friday, 18 August 2023

जा जी ले तेरी जिंदगी

 || श्री स्वामी समर्थ ||


आज देव आनंद ची गाणी ऐकत होते. त्यातील “ हम है राही प्यार के...” ऐकताना एकदम मस्त वाटत होते . मूड फ्रेश झाला. जुनी गाणी खरच आनंदाचा ठेवा आहेत . अनेकदा समुपदेशन करताना स्वतःला सुद्धा स्ट्रेस जाणवतो. अनेकांचे प्रश्न बरेचदा ते त्यांच्या मनाच्या बैठकीशी निगडीत असतात . त्यांची बैठक सुधारताना आपली मानसिक घडी विस्कटू न देणे हेही एक आव्हान असते . नाही म्हंटले तरी मनाचा स्वीच on आणि off करता येणे प्रत्येक वेळी अवघड असते शेवटी आपण सर्व माणसे आहोत आणि भावनाप्रधान आहोत .


बरेच लोकांचे प्रश्न त्यांच्यासाठी यक्षप्रश्न असतात आणि आयुष्यात मानसिक उलथापालथ करून जातात . मनाचा ब्रेक ज्याला लावता आला त्याने जग जिंकले असे म्हंटले पाहिजे . मन असते ते दिसत नाही पण संपूर्ण शरीरावर आणि आयुष्यावर अधिराज्य गाजवणारे मन फार विचित्र आहे. क्षणात काय करेल आपले आपल्यालाही समजत नाही. त्यावर ताबा मिळवणे कठीण त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात . मुळात आहे ती परिस्थिती स्वीकारणे ह्यापलीकडे अनेकदा आपल्या हातात काहीच नसते पण ती स्वीकारताना आपली मात्र दमछाक होते.


अनेक पत्रिका बघताना राहूच्या आणि शनीच्या दशेत हि मनाची झालेली दशा प्रकर्षाने जाणवते. मन सैरभैर होणे , निर्णय घेणे अवघड होणे तसेच आपल्याबद्दल जवळच्या लोकात , मित्रात लहान सहान शुल्लक गोष्टींमुळे झालेले गैरसमज आपले भावना विश्व कोलमडून टाकतात ते कायमचेच. आपण ज्यांच्या सोबत लहानाचे मोठे झालो , लहानपणी शाळेत एकमेकांच्या डब्यातील खाल्ले त्यानाही आपले मन समजू नये , त्यांनीही आपल्या बद्दल गैरसमज करून घ्यावेत अशी ग्रह स्थिती निर्माण होणे हे अजब आहे पण हाच तर आहे ग्रहांचा खेळ. हे गैरसमज आपल्या आयुष्यातील शांततेला सुरुंग लावणारे असतात .संथ असणार्या पाण्यात अचानक खडा पडून तरंग उठावेत तसे मनाचे काहीसे होते . 

अनेकदा हि परिस्थिती भीषण स्वरूप धारण करते आणि आपण एकाकी होऊन जातो . राहूच्या दशेत हे अनुभव 100% येतातच कारण राहू हा गैरसमज करण्यात माहीर आहे. मी हे केले नाही मला असे म्हणायचे नव्हते हे कुणाकुणाला सांगणार आपण . अनेकदा आपले मित्र जवळचे लोक आपल्याशी तुटक वागू लागतात , अचानक बोलणे सुद्धा बंद करतात आणि आपल्याला कळतच नाही नेमके झाले तरी काय ??? असो.

ह्या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे ह्यातून स्वतःला अलगद बाहेर काढून आपले मन विरक्त करणे . जो आपल्यासोबत असेल तो आपला. बस मध्ये सहप्रवासी कसे त्यांचा स्टोप आला कि उतरून जातात आणि आपणही जातो अगदी तसेच सगळ्यात असून कश्यात नसावे हा मूलमंत्र आयुष्याचा असला पाहिजे आणि आजकालच्या जगात तर पाहिजेच पाहिजे. आता भावना , इमोशन फार दिसत नाहीत . एकमेकांना धरून ठेवणे , त्यासाठी प्रयत्नशील राहणे ह्या भावना आता विरळ होत चालल्या आहेत. भावनाशुन्य व्यक्ती आजूबाजूला दिसतात आणि त्यात मग भावनांना पूर येणारी माणसे सहज वाहून जातात , त्यात आपले माणूस , आपलेपणा , मायेचा ओलावा शोधत राहतात आणि जास्तच दुखी होत जातात.


आजकाल स्वतःला आनंदी ठेवणे म्हणजे मोठे दिव्य आहे. जराजराश्या गोष्टीनी आपण निराश होतो , स्ट्रेस घेतो , ह्या मैत्रिणीचा फोन नाही आला , मला विचारले नाही , हे मला सांगितले नाही इतक्या लहान सहान गोष्टींचा उगीच बाऊ करतो कारण आपले मनाचे बंध कुठेतरी अडकलेले असतात , ज्या क्षणी ह्या सर्वातून आपण स्वतःची सुटका करून घेवू तो खरच सोन्याचा दिवस. एक क्षण असा येतो कि अश्या माणसांचा उबग येतो , ज्यांच्याशिवाय आयुष्य अर्थहीन वाटत होते तीच माणसे नकोशीच वाटायला लागतात . 


मध्यंतरी आमच्या इथे कुणीतरी गेले आणि सगळ्यांना माहित होते पण मला कुणीच नाही सांगितले तेव्हा मला फार वाईट वाटले. कुणाला विचारले कि मला का नाही बोललात तर उत्तर होते “ अग मला वाटले तुला माहित असेल ...” इतकी राजकारणी उत्तरे. असो. पण त्यावर माझ्या मुलाने मला सांगितले अग आई तुला जरी समजले असते तरी असा काय फरक पडणार होता , तू जाणार होतीस का? नाही ना? मग तुला आत्ता समजले आणि मग त्यात काय फरक पडतो . सोड ना. मला त्याचे हे उत्तर आणि स्पष्टीकरण मनापासून पटले. 


आता तर वाटते जितक्या गोष्टी आपल्याला कमी समजतील तितके आपण खुश आणि सुखी. आपण स्वतःचे भावविश्व निर्माण केले पाहिजे ते जमले पाहिजे म्हणजे ते जमवायचे आणि मग त्यात आपण आपली कंपनी एन्जोय करायची . हे एकदा झाले कि सगळच सोपे होऊन जाते. 

मन एकदा निराशेच्या गर्तेत सापडले कि ते पूर्वपदावर आणणे महा कठीण होते . पत्रिकांचा अभ्यास करताना चंद्रावर शनीची राहूची दृष्टी ,चंद्रासोबत होणारे शनी राहू केतू हर्शल नेप ह्यांचे कुयोग माणसाच्या मनाची बैठक पार ढिली करून टाकतात. आपण काही गोष्टी स्वीकारत नाही इथेच चुकते . प्रचंड नामस्मरण आणि योग साधना हा त्यावरील एकमेव उपाय आहे. एखाद्या गोष्टीचा इतकं वीट येतो कि शेवटी काहीच नको वाटते कारण त्या क्षणी आपण सत्य स्वीकारलेले असते आणि एकटे राहायला शिकलेलो असतो.

सगळे क्षणाचे सोबती आहेत , म्हणून फार गुंतणे नकोच . गुंतले कि अपेक्षा वाढतात आणि त्याच पुढे दुक्ख देतात . सर्वात महत्वाचे म्हणजे कुणाच्याही मागे लागणे आणि कुणालाही गरजेपेक्षा अधिक महत्व देणे बंद करा. आपले स्वतःचे महत्व आणि असणे महत्वाचे इतर असले तर आनंद नसले तरी आनंद हे धोरण ठेवा. इतरांना प्रेरणा मिळेल असे जीवन आपले नक्कीच आहे उगीचच आपण त्याचे कडबोळे करून ठेवतो . 

आयुष्य आहे तसे जगत राहणे ...शेवटी जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए... हेच जमले पाहिजे . 

जा जी ले तेरी जिंदगी.... ह्याची खरी सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230




 

 

  


Thursday, 10 August 2023

अष्टम स्थान -मृत्यू आणि मृत्यूसम पीडा

 || श्री स्वामी समर्थ ||

पत्रिकेतील प्रत्येक भाव तितक्याच तोलामोलाचा आहे आणि प्रत्येक भावाकडे विशिष्ठ असे कार्य दिलेले आहे. कुठलाही ग्रह नक्षत्र भाव राशी पूर्णतः चांगली किंवा वाईट नसते . असो. आज अष्टम भाव बघुया थोडक्यात . 

अष्टम भाव म्हणजे “ मृत्यू “ असा अनेकांचा समज असतो पण तसे आहे का तर नाही . मृत्यू आणि मृत्युसम पीडा ह्यात जमीन  आस्मानाचा फरक आहे. आपल्यापैकी सगळ्यांचाच अष्टम भाव हा दशा अंतर्दशा आणि विदशा ह्या स्वरूपात लागतच असतो मग आपण काय लगेच मरणार का? तर नाही. त्यामुळे मृत्यू म्हणजे “ निर्वाण “ ,आणि मृत्युसम पीडा ह्यात असणारा फरक समजून घेतला पाहिजे. अष्टम स्थान हे मृत्युसम पिडा देते , भ्रष्टाचार , वडिलोपार्जित संपत्ती , आपल्या आयुष्यातील गुप्त गोष्टी इथे आहेत. मग ते काहीही असो गुप्त प्रेमप्रकरण किंवा गुप्त आर्थिक व्यवहार . तसेच कालपुरुषाच्या कुंडलीत इथे वृश्चिक रास येते आणि शरीरातील गुप्तांगे इथे येतात जी आपण गुप्त, झाकून ठेवतो . समजतंय का? म्हणून आपल्या गुप्त गोष्टी जगासमोर येणार नाही ह्याची आपण काळजी घेतो . ज्या गोष्टी वाईट किंवा सहज सांगता येत नाहीत त्या सर्व ह्या अष्टम भावात येतात . असो . इथे मृत्यू सुद्धा आहे पण फक्त हे स्थान लागले तर मृत्यू येणार नाही पण मृत्युसम पिडा निश्चित येयील.

मृत्यू , जन्म आणि विवाह हे 3 पत्ते विधात्याने आपल्या हातात ठेवले आहेत . एखाद्या निष्णात अभ्यासू ज्योतिषाला त्याच्या साधनेमुळे एखाद्याचा मृत्यू जरी समजला तरी त्याने तो सांगू नये असे शास्त्र सांगते . आपल्याला मृत्यू कधी येणार ते माहित नाही म्हणूनच आपण आनंदात जगत आहोत .अनेकदा अज्ञानात सुख असते म्हणतात ते हे असे, कश्याला जाणून घ्यायच आहे आपल्याला आपला मृत्यू  ? अहो आजकालच्या जगात अनेक अनेक लोक रोज हजार मरणे मरत जगत आहेत हे येणाऱ्या पत्रीका बघून समजते . असो .

मृत्यू च्या वेळी वेगळी ग्रहस्थिती असते . अश्यावेळी षष्ठ जे आजारपण देते , अष्टम जे मृत्यूतुल्य पिडा देते आणि व्यय जे आपल्या शरीराचा अस्तित्वाचा व्यय करते ,त्याच सोबत अष्टम भावाचे अष्टम म्हणजे तृतीय भाव सुद्धा महत्वाचा असतो आणि अर्थात मारक स्थाने . ह्या सर्व भावांची आणि त्यातील ग्रहांची एकत्रित मोट बांधली जाते , तसेच ह्या भावांच्या दशा अंतर्दशा आणि विदशा आपली अखेर करतात त्यामुळे अष्टम भाव लागला कि मृत्यू हे आता विसरून जा.

शेवटी जन्माला आलेला प्रत्येक जीव आपला प्रवास , आपले इथले कार्य संपले कि जाणार आहे तेव्हा उगीच असल्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुद्धा घ्यायला जाऊ नका. जीवन फार सुंदर आहे. आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण आपला .पुढचे बघतील स्वामी , द्या त्यांच्यावर सोडून सर्व. आत्ताचा क्षण आनंदाने जगणे हेच केवळ आपल्या हाती आहे . सत्कर्म करा , सगळ्यांना मदत करा , राग रुसवे फुगवे ह्यांनी हाती काहीच लागणार नाही ,जळी स्थळी फक्त आपले महाराज दिसुदेत ...बस इतकं करा पुढचे सर्व सोपे होऊन जायील.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क – 8104639230


Saturday, 5 August 2023

त्याच्या अस्तित्वाला सलाम

 || श्री स्वामी समर्थ || 



आपल्यापैकी अनेक देवाला मानणारे आणि काही न मानणारे असतील. अनेक जण म्हणतील आमचा कर्मावर विश्वास आहे . बरोबर पण कर्म कोण करवून घेत आहे आपल्याकडून तर तोच जो वरती बसलाय . त्याला बघितलाय का कुणी ? नाही पण तो आहे . कुठे आहे ? ह्या आसमंतातील प्रत्येक अणुरेणूत आहे, आपल्या श्वासात आहे, आपल्या असण्या आणि नसण्यात सुद्धा तोच आहे. आपल्या प्रत्येक कृतीत , हालचालीत , हसण्यात बोलण्यात शब्दात सर्वत्र त्याचाच तर संचार आहे. ह्या लेखातील प्रत्येक शब्दात आहे , तुम्हाला वाचावे असे वाटावे ह्या भावनेत सुद्धा तोच आहे. 


लहानपणी आपल्यावर आई संस्कार करताना सांगत असे , बघ हा खोटे बोललास तर देवबाप्पा रागवेल तो शिक्षा करतो. अगदी हेच कुणीतरी आहे मग त्याला देव , ईश्वर काहीही म्हणा . अस्मिता. आपल्या आयुष्याला कुणाचातरी धाक आहे हेच ह्यातून आईला अभिप्रेत करायचे नसेल ना? वाटेल तसे वागून चालणार नाही कुणीतरी आहे ज्याने आपल्या आयुष्याचा सुकाणू हाती घेतला आहे. अस्मिता.त्याच्या अस्तित्वाची जाणीव तो वेळोवेळी आपल्याला करून देत असतोच . अस्मिता प्रगत जगात तर उलट ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवणार्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 

तुही बिगाडे तुही सवारे ...आजचा जन्म हा पूर्व जन्माचा आरसा आहे. पूर्वी कित्येक जन्मात केलेले अपराध चुकांची शिक्षा भोगण्यास आपण येतो आणि पुन्हा नवनवीन चुका करतो ..मग आहेच पुनरपि जननं पुनरपि मरणं. अनेकदा आपल्याला आपल्या चुकांचा , केलेल्या अपराधाचा पश्चात्ताप होतो आणि शेवटी एक मस्तक आणि दोन हस्तक आपण ह्याच ईश्वरी शक्तीसमोर जोडतो. संकट आले कि त्याचीच आठवण येते . अस्मिता. आपल्या आयुष्यातून ह्या दैवी शक्ती वजा केल्या तर आयुष्य शून्य होयील. एकदा मला महाराजांचा खूप राग आला काहीतरी मनासारखे झाले नव्हते. मनात आले आता उद्या सगळ्या पोथ्या जपमाळा विसार्जीतच करते . सकाळी उठल्यावर विचार आला कि हे सर्व केले तर मग माझ्याजवळ आणि घरात राहिले तरी काय ???? सर्व रिते होऊन जायील. महाराजांची क्षमा मागितली. ह्या अध्यात्माने आपले आयुष्य किती भारावून टाकलेले आहे ते बघा . आई सांगते ना देवाला हात जोड आणि त्याला म्हणावे मला चांगली बुद्धी दे म्हणजे तो आहे . अस्मिता. आईच्या आईने तिला शिकवले आता ती आपल्याला ,उद्या आपणही तिच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या मुलांना हेच शिकवणार आहोत कारण आपल्याला मनोमनी पटलेले आहे कि परमेश्वरी शक्तीचा ह्या जगतात , विश्वात संचार आहे आणि त्याची अनुभूती आपण प्रत्येक क्षणी अनुभवत आहोत . 

आम्ही बाई so called modern म्हणणारे भले भले ना रक्त तयार करू शकत ना पाऊस पाडू शकत , ना कुणाला जन्माला घालू शकत ना कुणाचा मृत्यू थांबवू शकत . अस्मिता.काहीच नाही आहे आपल्या हातात . आपल्याला थोडे फार जे काही त्याने दिलेले आहे त्याने आपण इतके मिजासखोर झालेलो अहो कि सगळेच त्याने आपल्याला बहाल केले असते तर आपली काय अवस्था झाली असती. अस्मिता. भारतात कायदा सुव्यवस्था आहे म्हणून सामान्य माणूस जगतोय . अस्मिता.कुणीतरी वाली आहे आपला जी भावनाच आपल्याला जागवते आधार देते अगदी तसेच आपल्या सर्वांच्या वरती आपल्यावर त्याचा वरदहस्त आहे म्हणून आपण आहोत . अस्मिता. वरवर कुणी काहीही म्हणूदेत पण मनोमन आपण त्याचे अस्तित्व स्वीकारले आहे आणि तेही 100%.

आयुष्यात त्याच्या असण्याची अनुभूती आपल्याला कधीतरी येतेच आणि मग डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागतात . कुठे आहे हा ईश्वर ? आपल्या अगदी जवळ आपल्या अवती भवतीच तर आहे. अस्मिता.आपला जन्म हा त्याच्या सेवेसाठीच झालेला आहे हा भाव मनात रुजला कि मग सगळेच सोपे होऊन जाते .

ईश्वराशी अनुसंधान आपण अनेक साधना , उपासनेतून करू शकतो . अस्मिता. त्याच्याशी घट्ट मैत्री करू शकतो , त्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व त्याच्या असण्यात आपले असणे आणि त्याच्या इच्छेत आपल्या इच्छा विलीन करण्यासाठी उपासना हा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे आणि त्या करून घेण्यासाठीच येत आहे श्रावण .अस्मिता.आपल्या उपासनेस आरंभ करण्यासाठी  सोन्यासारखा मास श्रावण मास . 


पुढील लेखात श्रावणातील उपासना .अस्मिता.पण त्या आधी ज्याची उपासना करायची त्याचे अस्तित्व तर मान्य झाले पाहिजे म्हणून हा लेखन प्रपंच . 

आपल्याजवळ कुणीच नसते तेव्हा तो मात्र आपल्या अगदी समीप असतो ..आपल्याला आधार देण्यासाठी हे कटू सत्य आहे .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


Wednesday, 2 August 2023

मुलांसाठी लक्ष्मण रेषा - बालाशिष स्तोत्र

 || श्री स्वामी समर्थ ||





मुले हे आपले अत्यंत नाजूक असे भाव विश्व असते . आपल्याला काहीही झाले तरी चालते पण मुलांना जरा खरचटले तरी दिवसभरात चार फोन असतात आपले घरी . मुलांचे संगोपन शिक्षण त्यांच्यासाठी आईबाप खस्ता काढतात , स्वतःला विसरून जगतात कारण मुले हेच त्यांचे विश्व असते . अनेकदा मुलांच्या आयुष्यात खडतर काळ येतो , त्यानाही संघर्षाला सामोरे जावे लागते , अचानक आलेली संकटे , शिक्षणातील अडथळे , मनासारखे यश न मिळणे ह्या गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो , अनेकदा मग त्यातूनच पुढे वाईट संगती , सतत घराबाहेर राहणे हे नकळत घडू लागते . असो .


आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे आयुष्य सुखाचे जावे , त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन त्यांना मार्ग मिळावा ह्यासाठी दत्तगुरुनी एका अत्यंत प्रभावी स्तोत्राची रचना केली आहे आणि ते म्हणजे “बालाशिष स्तोत्र “ . सहज सुंदर आणि तितकेच सोपे असे हे स्तोत्र मुलांच्या आईवडिलांनी कुणीही किंवा दोघांनीही रोज निदान एकदा तरी म्हणावे .हे मुलांची  रक्षा करणारे कवच  आहे. रोज एकदाच म्हणावे पण त्यात सातत्य ठेवावे . आपल्या वेळेप्रमाणे म्हणावे . कुठलेही स्तोत्र पठण किंवा उपासना मनापासून असेल तरच फळते . कसेतरी उरकून टाकल्यासारखे काहीच म्हणू नये निदान त्या देवतेचा अपमान तरी होणार नाही. कारण जिथे भाव नाही तिथे देव कसा बरे असेल ? कसलीही पिडा , अनारोग्य ,ग्रहपिडा किंवा भूतपिशाच्च पिडा , करणी बाधा , वाईट नजर अश्या अनेक दोषातून मुक्त करून मुलांचे रक्षण करणारे असे हे अत्यंत दुर्मिळ स्तोत्र आहे .

आपण मुलांसोबत 24 नसतो म्हणून ह्या उपासनेने त्यांचे रक्षण होते अर्थात हा विश्वासाचा प्रश्न आहे. मग आता हे म्हणून काय उजेड पडणार आहे आमचे चिरंजीव काय पहिले येणार कि काय ? तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे फळ मिळेल पहिले येणार नाहीत पण निदान अभ्यास तरी करतील. चौफेर उधळलेले मन शांत तरी होईल . आता प्रत्यक्ष दत्तगुरुनी आपल्या लेकरांच्या उद्धारासाठी , कल्याणासाठी रचलेल्या स्तोत्राविषयी शंका घेणे किंवा त्यावर उहापोह करणे अयोग्य होयील .असो.


कुठलीही उपासना शंका कुशंका घेवून करूच नये आणि केली तर फळाची अपेक्षा करू नये. शेवटी हे स्तोत्र म्हणजे आशेचा किरण आहे असे समजावे आणि वाचन सुरु करावे . आज गुरुवार आहे. गुरु म्हणजे ज्ञान , आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून आपल्या ज्ञानाच्या ज्योतीने आयुष्य प्रकाशमान करणारे गुरु . आजपासूनच म्हणायला सुरवात करा ..कुणी? तर सगळ्यांनी ..आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी , त्यांनी कुठल्या नको त्या गोष्टीत अडकू नये म्हणून, त्यांच्या यशासाठी आणि आनंदासाठी पालक हे नक्कीच करू शकतात . 


अनेक पत्रिका समुपदेशनासाठी येत असतात , मुलांचे प्रश्न असतात . मुले ऐकत नाहीत , उशिरा घरी येतात , कित्येक घरात आई एकटीच असते वडील नसतात , अश्यावेळी त्या माऊलीने रात्री बेरात्री मुलांना शोधायला जायचे कि गृहस्ती सांभाळायची ? कायकाय करायचे तिने , तिचाही जोडीदार सोडून गेलेला असतो कि तिला आयुष्याच्या मध्यावर , मुलांच्याच कडे बघून जगत असते ती ,अनेकदा मुलांना शिक्षणात किंवा अगदी प्रेमात सुद्धा अपयश येते आणि शिक्षण सोडून देतात हताश होतात . आजकाल वाईट संगतीत अडकणे फारच सोपे झाले आहे , व्यसने करणे जणू फ्याशन झाले आहे, आपल्या पालकांचा जराही विचार मुले करत नाहीत अश्यावेळी कुणाचा तरी आधार लागतो . अश्या अनेक पत्रिका पाहिल्यावर मनात आले कि हे स्त्रोत्र वाचून कदाचित अश्या पालकांना मार्ग मिळेल म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांना वाचायची इच्छा आहे जरूर वाचा अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही .

हे अत्यंत प्रभावी आणि अद्भुत स्तोत्र आहे, ज्यांच्या मनात शंका असतील त्यांनी अजिबात वाचू नका पण इतरांनी मात्र नक्कीच वाचा आपल्या पाल्यासाठी आणि त्याच्या उत्तम निरोगी आयुष्यासाठी .

हे स्त्रोत्र इथे देत आहे. हे एका कागदावर लिहून वाचायला सुरवात करावी , आपल्या वेळेप्रमाणे वाचावे 

कधी वाचावे – कधीही आपल्या वेळेप्रमाणे , ह्याला कसलेही नियम नाहीत . आता पाळी आली स्वतःची किंवा घरात कुणाची तर वाचू नका त्यासाठी मला फोन नको ह .काही गोष्टीत स्वतःचे विचार , तारतम्य असलेच पाहिजे .संकल्प सोडायचा का? तर हो . तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मिटेपर्यंत तरी निदान वाचन करावे. उद्यापन नाही , उपवास नाही . प्रश्न खूप झाले वाचन सुरु करा . youtube वर ऐकायला मिळेल ते उच्चार कसे असावेत ह्यासाठी ऐका पण त्यानंतर मात्र रोज स्वतः म्हणायचे आहे. येणार ..प्रयत्नांती परमेश्वर .

श्री गुरुदेव दत्त |

टीप : अत्यंत तळमळीने ,मनापासून म्हणणार्यालाच ह्या स्त्रोत्राचा निश्चित लाभ होईल ह्यात शंकाच नाही . नुसते वरवरचे काहीच उपयोगी येणार नाही .शेवटी भाव तिथे देव. 

शुभं भवतु  

“ बालाशिष स्तोत्र" 

स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन।।

मुञ्च मुञ्च विपद्भ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम्।।१।।

प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा।।

दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान्।।२।।

छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक्।।

त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम्।।३।।

सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।।

भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः।।४।।

दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः।।

इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य

दत्तपुराणांतर्गत

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः

बालाशिषः स्तोत्रह संपुर्णम.


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 




Tuesday, 1 August 2023

मन वढाय वढाय

 || श्री स्वामी समर्थ ||






मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे. कुणीही स्तुती केली कि ती व्यक्ती लगेच आपल्या “ Good Book “ मधेच जाते . तसेच यश सुद्धा माणसाला प्रिय आहे ते मिळाले कि सर्व जग सुंदर दिसू लागते आणि जगावेसे वाटते पण अपयश माणसाला पचवता येत नाही त्याला सामोरे जाणे कठीण असते . अपयश आले कि माणूस खचून जातो , नशीब चांगले असेल तर त्यातून कालांतराने बाहेर येतो नाहीतर मग व्यसने , चुकीचे मार्ग स्वीकारून दिशाहीन होतो.


देव सारखा रडवत नाही कधीतरी हसवतो सुद्धा . जिथे ऋतू , निसर्ग सुद्धा शाश्वत नाही तिथे आपले क्षणभंगुर आयुष्य ते काय ? जरा कुणी आपली स्तुती केली ,आपल्याला चांगले म्हंटले कि आपण आपली सुद्बुद बुद्धी जणू गहाण ठेवुन त्या व्यक्तीत गुंतत जातो आणि अनेकदा तिथेच फसतो. खरतर आपली वाहवा करणारे आपले खरच असतात का? हा आजकाल संशोधनाचा विषय आहे . आपली वाहवा ते नक्की कश्यासाठी करत आहेत हे एकदा तपासून बघा उत्तर सापडेल तुमचे तुम्हालाच.


खरतर आपले क्रिटिक , विरोधक आपले खरे मित्र असतात . राजकारणात विरोधी पक्ष जितका बलवान तितके सरकार काम अधिक करेल .तसेच विरोधक खरतर तुम्हाला तुमचीच ऋण बाजू दाखवून देतात ती स्वीकारली तर भले आपलेच आहे पण आपल्याला नेमका त्याचाच त्रास होतो . 


अनेकदा विचार करण्याची शक्ती आपण घालवून बसतो , जे समोर आहे तेच खरे असे समजतो पण ते भासमान असते आणि हे जेव्हा समजते तेव्हा ओंजळीतून आयुष्य पार निघून गेलेले असते . 

मन आपल्याशी सतत उन पावसाचे खेळ खेळत असते . आपल्या आयुष्यात आपण जे जे करतो ते मनाच्या निर्देशनामुळेच . आपल्या मनाला वाटले म्हणून पर्यटनाला गेलो , एखाद्या प्रदर्शनाला गेलो , एखादा पदार्थ केला , खाल्ला , एखादा कोर्स केला. जे जे आहे ते मनाच्या अवती भवतीच आहे . मनाविरुद्ध काहीही खपत नाही आपल्याला . कुठलीही लढाई मनापासून लढली जाते तेव्हाच यशश्री मिळते .


मनाला सतत काबूत ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न आपण करत असतो खरतर मन आपल्याला नाचवत असते. आपले मन किती अस्थिर असते हे मी वेगळे सांगायला नको. मनाचा कारक ग्रह चंद्र आणि तो आहे जल तत्वाचा त्यामुळे पाण्याच्या लाटांवर आपले मन सदैव हिंदकळत असते तेहि आपल्या नकळत .


अस्थिर मन अनेक व्याधिना मग त्या मानसिक असोत अथवा शरीरील जन्माला घालते . एखादी गोष्ट मनाने स्वीकारली तर आपण आनंदाने करतो . बघा रोज सकाळी उठायचा कंटाळा येतो पण शाळेची ट्रीप आठवा  त्या दिवशी घरात सगळ्यांच्या आधीच आपण उठून बसलेले असतो कारण मन. माझ्या मनात एखादा विषय आला कि लगेच लेख लिहिला जातो . सांगून सवरून जीवाचा आटापिटा करून ह्या गोष्टी होत नाहीत . 

मनात असेल तर ती गोष्ट सहजप्राय होते . एखाद्या शब्दानेही दुखावले जाणारे हे मन दिसत नाही पण असते . हे मन एखाद्याचे आयुष्य सावरू शकते त्याला जगायला स्फूर्ती देऊ शकते . मनाचे खेळ आजवर कुणास समजले नाहीत . आयुष्यभर एका छताखाली एका घरात राहणाऱ्या माणसांचे मन तरी कुठे आजवर कुणाला समजलेले आहे, पटतंय का? 

एखादी विचारधारा आपण स्वीकारतो तेही मनाचा कौल असेल तर आणि तरच . अनेकदा अति विचार हे सुद्धा आजारांचे आणि मनस्वास्थ्य ढासळण्याचे कारण असते. सुप्त विचार मनाची शांतता घालवतात , ते साठून राहिले नाही पाहिजेत . अनेकदा अविचार हे सुद्धा आपल्या आयुष्यातील अनेक वळणावर घातक ठरतात .

चुकीचा विचार  चुकीची संगत जवळ करतो. मनातील विचारांचे प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे उमटते ते आपल्या चेहऱ्यावर आणि सर्वप्रथम डोळ्यात . मन तरल कोमल असते ,सहज कश्याच्याही अधीन होऊ शकते म्हणूनच भाव भावना आणि त्यांचा अविष्कार मनाशी निगडीत आहे. 

अनेकदा मुले शाळा कॉलेज नंतर बाहेरच भटकत राहतात कारण त्यांना घराची ओढ नसते , स्वतःच्याच घरी यावेसे वाटत नाही कारण त्यांचे मन घरातील व्यक्तींबाबत आणि पर्यायाने वास्तूबाबत सुद्धा उदासीन असते . 

मनाची व्यथा समजणे कठीण आहे. एकदा का हे मन निराशेच्या गर्तेत अडकले कि व्यसनांचे मार्ग खुले होतात आणि माणूस सर्वस्व घालवून बसतो. आत्मविश्वास कमी होतो आणि जगण्याची उमेद नष्ट होते.  अनेकदा ह्या मार्गावरून परतणे अशक्य होते आणि आयुष्य हाताबाहेर जाते. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात मन अत्यंत महत्वाचे आहे आणि मनावर संयम ठेवायचा असेल तर अथक प्रयत्न करायला लागतात . आजकालच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात तर जिथे प्रत्येक क्षणी आपल्या व्यक्तिमत्वाचा कस लागत असतो तिथे तर नक्कीच. लहानपणी आपल्याला घरातील मोठी मंडळी मनाचे श्लोक शिकवीत असत . लहानपणी मनावर जे बिंबले जाते ते चिरकाल टिकते म्हणूनच संस्कार हे मुलांच्या मनावर कायमचे ठसले जावेत म्हणून लहानपणीच केले जातात .आयुष्यातील कठीण वळणावर निर्णय घेताना हे संस्कार उपयोगी येतात .

मन चंगा तो सबकूच चंगा  त्याप्रमाणे मनाला सतत ताजेतवाने ठेवण्याची गरज असते , ते क्षणात हस्ते तर क्षणात रुसते . 

आपल्याला ह्या भूतलावर परमेश्वराने विशिष्ठ कार्य करायला पाठवले आहे आणि ते पूर्ण झाले कि आपला इथला प्रवास संपणार आहे. कितीही डोके आपटा एका क्षणाचे किंवा एका श्वासाचे सुद्धा extension मिळणार नाही . कुणाला सोबत घेवून आलो नाही आणि सोबत घेवून जाणारही नाही. तेव्हा आपले एकटे मस्त आपल्याच धुंदीत जगणे , आपले स्वतःचे विश्व निर्माण करणे , भरपूर वाचन , आपले छंद आवडी निवडी जोपासणे आणि सगळ्या जगाला फाट्यावर मारून आपल्या चेहर्यावरची स्मित रेषा अजिबात न घालवणे हा उपक्रम चालू करा ..आपल्याच मनाचा लगाम हातून निसटून देऊ नका , तसे झाले तर आयुष्य खर्या अर्थाने जगायला सुरवात होईल......

अनेकदा पत्रिकेत चंद्र बिघडलेला असतो कधी राहू , केतू शनी हर्शल अश्या पापग्रहांच्या संगतीमुळे , कुयोगामुळे किंवा अन्य ग्रहयोगांमुळे सुद्धा तेव्हा आपल्या मनाची ताकद उपसनेद्वारे वाढवणे हेच उत्तम. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे पण तो किती करतात हे महत्वाचे आहे . 

चंद्राचा जप करा किंवा शंकराचा जप करा सांगितला तर अनेक प्रश लगेच येतील किती वेळा करायचा ? कधी करायचा ? मग प्रवासात करायचा का? पाळी आली तर करायचा का? एक ना दोन ....श्री स्वामी समर्थ हा एकच जप करा कधी कसा करा तर श्वासागणिक करा ..संतांची सत्ता अगाध आहे. 

रोज सकाळी “ हम को मन कि शक्ती देना... “ हि प्रार्थना ऐका नक्कीच फायदा होईल. आपले अनुभव शेअर करावेत .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230