|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात गुरुचे अनन्य साधारण असे महत्व आहे . गुरूंच्या समोर आपण नेहमीच नतमस्तक होतो . आपल्या शाळेतील शिक्षक आठवतात का ? शाळा सोडताना किती डोळे पाणावले होते त्यांना नमस्कार करताना .आई आपला प्रथम गुरु आणि पुढे आयुष्याच्या प्रवासात आपले आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून टाकणारे आणि समृद्ध करणारे असंख्य मार्गदर्शकरुपी गुरु आणि अर्थात आपले सद्गुरू . ह्या सर्वाना मनापासून अभिवंदन करत आजचा हा लेख त्या सर्वाना समर्पित करत आहे.
सगळ्यांना सगळे मिळालेले नाही , कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे आणि त्याची जाणीव असल्यामुळेच आपण परमेश्वराची शक्ती मानतो आणि जे अपूर्ण आहे त्याच्या पूर्णत्वासाठी प्रार्थना करतो. आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळाल्या तर ईश्वरी शक्तीचे अस्तित्व आपण कदाचित मानणार सुद्धा नाही . म्हणूनच “ जगी सर्व सुखी असा कोण आहे. “ त्या अपुर्णत्वा मधेच तो आहे. नवग्रहातील बलाढ्य ग्रह म्हणजे गुरु . काय वर्णन करावे त्याचे ,शब्दच अपुरे आहेत . आपले संपूर्ण आयुष्य त्यानेच तर व्यापले आहे. आपल्या पत्रिकेवर आणि अर्थात आयुष्यावर गुरु ग्रहाचा प्रचंड प्रभाव आहे. गुरु म्हणजे ज्ञानाची शिदोरी. गुरु पत्रिकेत बलवान असेल तर असंख्य दुक्खांची होळी होतेच आणि आयुष्य राजमार्गावर मार्गस्थ होते .
आशीर्वाद , प्रतिष्ठा , संपत्ती , नशीब , संतती , संस्कार , नैतिकता ह्या सर्वाचा कारक गुरु आहे. पत्रिकेत गुरूची स्थिती आपल्याला आयुष्यात कुठे आशीर्वाद मिळणार ते दर्शवते . गुरूची दृष्टी अमृततुल्य आहे.
महानायक श्री अमिताभ बच्चन ह्यांच्या षष्ठ भावात कर्क राशीचा गुरु आहे ज्याची दृष्टी दशम म्हणजे कर्म भावावर आहे . त्यांच्या आयुष्यात स्वतःचे राहते घर सुद्धा गहाण ठेवावे लागले इतकी अगतिक परिस्थिती आली पण दशम भावावरील गुरूच्या दृष्टीने त्यांना पुन्हा एकदा त्यांची dignity पद प्रतिष्ठा सन्मान आधीच्याही पेक्षा अधिक प्राप्त करून दिली . गुरूची दृष्टी पत्रिकेत ज्या भावावर असेल त्याचा अभ्यास केला तर , विशेष करून 9 वी , गुरूचा आशीर्वाद कसा फळत आहे ते समजेल. गुरु व्यय भावात असेल तर अष्टम भावावरील त्याची 9 वी दृष्टी तुम्हाला मृत्युच्या दाढेतून सुद्धा बाहेर आणण्यास समर्थ ठरेल.
षष्ठ भावातील गुरु षडरीपुंचा नाश करण्यासाठी आपल्याला मदत करेल. 2 5 9 11 ह्या भावांचा कारक गुरु असल्यामुळे त्या भावांचे काम तो करतच राहणार. काही ग्रंथात 12 वा भाव पण नमूद केलेला आहे . धनभाव शुक्राचा असला तरी कारक गुरु आहे म्हणूनच तिथे गुरु समृद्धता देयील . राजमार्गाने येणारा पैसा इथे आहे. दशम भावातील गुरु धन भावावर दृष्टी टाकून कुळाचा उद्धार करण्यास मदत करेल. षष्ठ भावावरील गुरूची दृष्टी रोजच्या जीवनात काम करण्यास मदत करेल . चरितार्थ चालवण्यास आणि उदरनिर्वाह करण्यास मदत करेल . पत्रिकेतील 5 9 वी दृष्टी जिथे आहे त्या भावाचे काहीतरी विशेष फळ आणि त्या भावांनी दर्शवलेल्या गोष्टींसाठी लागणारी गुरुकृपा तुम्ही नक्कीच अनुभवत असणार . व्यय भावातील गुरूची दृष्टी 4 तसेच 8 व्या भावावर राहील. चतुर्थ भाव म्हणजे आई , मानसिक शांती , सुखासीनता , वास्तू . अष्टम भाव वडिलोपार्जित संपत्ती , गूढ शास्त्र , नवर्याचे धनस्थान . ह्या सर्व गोष्टी मध्ये मांगल्य दिसून येयील. दशम भावावर गुरूची 5 9 वी शुभ दृष्टी असेल तर जातक नैतिक आणि अनैतिक तेच विचार करूनच कृती करेल , नैतिकतेच्या आधारावर कर्म करेल. लग्नातील गुरु स्वतःच्या प्रकृतीबद्दल प्रश्न निर्माण करेल . गेल्या जन्माचे पुण्य कर्म 5 वा भाव आणि ह्या जन्मातील पुण्य कर्म 9 वा भाव .ह्या जन्मात उत्तम कर्म केले तर पुढील जन्मात 5 व्या भावात चांगला ग्रह येयील. 9 वा भाव फक्त स्वतःची पुण्यकर्म नाहीत तर आपल्या पितरांची सुद्धा आहेत म्हणून 9 वा भाव पूर्वजांच्या आशीर्वादामुळे फळेल. तुमच्या संततीचे आचार विचार , वागणूक आणि संस्कार बघा तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील गुरु कसा आहे ते लगेच समजेल.
पत्रिकेत बुध आणि गुरु उत्तम असतील तर शैक्षणिक दर्जा सुद्धा अप्रतिम असतो ह्यात दुमत नसावे. पत्रिकेत गुरुचे शुभत्व असणे हे ईश्वरी वरदान आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये . गुरु शुभ असेल तर जीवन सुकर होते. शांतता लाभते समाधानी वृत्ती असते . ईश्वरी अनुसंधान , चिंतन , मनन , कृतज्ञता असते . पारमार्थिक सुखाचा अनुभव देणारे जीवन असते . पत्रिकेतील गुरु संपती देयीलाच पण समाधान देयील ज्याची खरी गरज आजच्या स्पर्धात्मक , धकाधकीच्या जीवनात आहे . आपल्याकडे सर्व आहे पण समाधान नाही . जीवाला सदैव कसल्या ना कसल्या चिंता , काळजी आहे.
सध्या गुरुचे भ्रमण मेष राशीतून होत आहे . मेष हि धर्म त्रिकोणातील राशी. गेले काही दिवस लोकांमध्ये नैराश्य होते . पण आता गुरु मार्गी आहे. गुरु म्हणजे जीवन जगण्याची प्रेरणा, आशावाद आणि सकारात्मकता . उमीद पे दुनिया कायम है....ह्या युक्तीला धरून भौतिक सुखाची लालसा न करता आपल्या सद्गुरूंच्या निरंतर सेवेत राहणे हे कधीही उत्तम. पारायण करुया , प्रदक्षिणा घालुया, नामस्मरण करुया, अन्नदान करुया, तीर्थयात्रेस जाण्याचे विचार मनात येणे ह्यालाही गुरूंची कृपा लागते . मला सद्गुरुंसाठी काहीतरी करायचे आहे याचाच अर्थ तुमचे मन आता व्यय भावाकडे प्रवास करू लागले आहे कारण तिथेच मोक्ष आहे आणि गुरूंची पाउले , जितक्या लवकर आपण त्यावर नतमस्तक होऊ तितके आपण सुखी समाधानी राहू . तुम्हा आम्हा सर्वांवर गुरुकृपा अखंड बरसत राहुदे . त्यांचा वरदहस्त लाभणे हीच खरी गुरुकृपा . आपल्या सर्व गुरुना माझा मनापासून साष्टांग नमस्कार .
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
संकल्प : 8104639230