Monday, 7 January 2019

" मधुरम "


|| श्री स्वामी समर्थ ||





                      आज आवर्जून लिहावेसे वाटले ते आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव “ जिव्हा ”. ह्याबद्दल.सृष्टीतील अनेक प्राण्यांपैकी मनुष्यप्राण्यास देवाने बहाल केलेली एक असामान्य देणगी म्हणजे “ बोलण्याचे सामर्थ्य ”. बोलण्यामुळे एकमेकांशी साधता येतो तो संवाद . बोलणे हे एकमेकांना जोडणारे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पण निसर्गाने दिलेल्या ह्या खास वरदानाचा आपण किती कौशल्याने वापर करतो ह्यावर आपले समाजातील ,कुटुंबातील स्थान ठरत असते. अनेक लोकांचे बोलणे इतके कमालीचे मधुर परंतु मुद्देसूद विषयाला धरून असते कि ऐकत रहावेसे वाटते. बोलण्यात प्रेम ,संयम, आत्मीयता असली कि ती व्यक्ती सहजच लोकप्रिय होवून जाते. काहिंचे बोलणे इतके हळू ,तोंडातल्या तोंडातच असते कि ते ऐकणे म्हणजे आपली परीक्षाच असते त्तर काहींचा आवाज इतका भसाडा आणि शब्द म्हणजे विखार असतो कि आता “ पुरे ” म्हणण्याची वेळ येते.  
      
         उत्तम लोकसंग्रह करण्यासाठी आपला आपल्या वाचेवर उत्तम ताबा असणे हे फार महत्वाचे असते. पण काहीजणांना ह्या वरदानाची काडीचीही किंमत नसते आणि म्हणूनच “ उचलली जीभ लावली टाळ्याला” ह्या म्हणी प्रचलित झाल्या असाव्यात. काही जणांचे बोलणे इतके अघळपघळ असते कि कुठून सुरु झाले आणि कुठे संपले ते त्यांचे त्यानाही उमजत नाही .आपल्या मनातील भावना ,विचारांचे आदानप्रदान आपल्या बोलण्यानेच होवू शकते .उत्तम बोलण्यासाही साधनेची पक्की बैठक असणे तितकेच गरजेचे .साधनेने संयम तर येतोच पण बोलण्यात सहजता ,कोमलता येते . अश्या वाणीची व्यक्ती समोरच्याच्या हृदयाचा ठाव न घेयील तरच नवल.

आपल्या घरातील संस्कार,शिक्षणाची उंची ,समोरच्याबद्दल वाटणारा आदर, आपल्या आवाजातील मार्दव ,लय सर्व काही आपल्या बोलण्यातून यथाशक्ती प्रगट होत असते. उत्तम वक्ता होणे हे एक कसब तर आहेच , त्यासाठी आत्मनिर्धार ,भक्कम साधना आणि गुरूंच्या आशीर्वादाची शिदोरी बरोबर लागतेच.

                     कुठे काय बोलू नये हे ज्याला समजले तो आयुष्याची अर्धी लढाई जिंकला  तसेच आपण कुणासमोर कुठल्या आवाजात बोलत आहोत ह्याचे भान अगदी सार्वजनिक जीवनातही अनेकांना नसते, मग विषय कुठलाही असो.

                     आपल्याला कधीच कुणाची गरजच भासणार नाही अश्या खोट्या आणि निरर्थक भावनेची मनात जपणूक करून जातायेता आपल्या जिभेची धार इतरांवर आजमावणारी, समोरच्याचा पाणउतारा करणारी माणसे आपल्याला पावलोपावली भेटतात .मंडळी आजकालच्या जीवनात “frustration” इतके वाढले आहे कि त्याचा परिणाम म्हणून असभ्य भाषेत बोलणे, टोमणे मारणे , दुसर्याचा जाहीर पाणउतारा करणे ,कमी लेखणे, दुसर्याचे मन दुखावेल असे बोलणे ,बढाया मारणे ह्या सर्व गोष्टी वाढीस लागलेल्या आपण प्रत्येक क्षणी पाहतोच. काही जणांचे बोलणे अक्षरश हृदयाचा ठाव घेते तर काहींचे ऐकूच नये असे वाटते . बर हे इतके करून बोलणार्याचे प्रश्न सुटत नाहीतच किबहुना ते अधिकच गंभीर होत जातात . आपल्या परखड, उद्धट आणि अत्यंत कटू बोलण्याने दुसरा किती दुखावला जातो ह्याची यत्किंचितही कल्पना त्यांना नसते .कालांतराने माणसे दुरावतात ,नाती तुटतात आणि शेवटी अशी माणसे जीवनात एकटी राहतात..आपल्या चुका लक्ष्यात येयीपर्यंत वेळ निघून गेलेली असते ..तीही कायमची .


आपल्या जीवनात कधी कोण उपयोगाला येयील आणि कधी कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही. तसेही मनुष्यप्राणी जन्मतःच “ गरज” घेऊन आला आहे. कितीही मोठा डॉक्टर असुदे त्याचे ऑपरेशन करायला त्याला दुसराच डॉक्टर लागतो . माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे आपले आत्ता आहे तीच परिस्थिती मरेपर्यंत राहील असा चुकूनही विचार करू नये . जिथे निसर्गही सतत बदलत असतो इथे आपल्या जीवनाचे काय ? आपल्या “वाचेवर ” संयम आणण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मनापासून प्रयत्न करायला हवेत .कारण नसताना सतत पाल्हाळ लावल्यासारखे निरर्थक बोलणार्यांची समाजात किंमत तर होतेच पण त्याचे पडसाद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही उमटतात . बोलण्यात उत्तम संस्कार व्हावेत म्हणून तर लहानपणी घरातील मोठी मंडळी आपल्याला मनाचे श्लोक ,शुभंकरोती ,रामरक्षा म्हणायला शिकवत असत .लहानपणी आपल्या जिभेला चांगले बोलण्याचे वळण लागावे हाच त्यामागील हेतू होता हे वेगळे सांगायलाच नको.

                 बोलण्यास अनेक कंगोरे आहेत .सकारात्मक बोलणे हेही तितकेच महत्वाचे असते .नकारात्मक बोलणार्या माणसांची आजारपणे पाठ सोडत नाहीत .काहींचे बोलणे अंतर्मुख करते ,विचार करण्यास भाग पाडते .आपण रागावलो आहोत हे दर्शवतानासुद्धा मोठ्या आवाजात बोलण्याची गरजच नसते. आपल्या शब्दसंपदा इतकी उत्तम असेल तर अगदी साध्या टोन मध्ये बोलून सुद्धा आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचू शकतात. शब्द हे “शस्त्र” आहे . शब्दांचा बाण एकदा सुटला कि सुटला ..तो समोरच्याच्या हृदयाला कायमची न भरून येणारी जखम करत असतो .आपल्या आवाजातील लय आणि उत्तम पण कमीतकमी शब्दात समोरच्याला खिळवून ठेवण्याची कला आहे , ह्यातूनच उत्तम वक्ते जन्माला येतात. विधात्याने जसे अनेक रंगाची निर्मिती केली आहे तशीच अनेक प्रकारची माणसेही जन्मास घातली आहेत. आयुष्याच्या प्रवासात त्यातील अनेक रंग आपल्या वाट्यास येणार हे निश्चित पण आपले मधाळ, संयमी, समजून घेणारे बोलणे असेल तर आपण अनेक माणसे जोडू शकतो आणि मग ह्या माणसांच्या गराड्यात जीवनाचा प्रवास सुखकर ,सुसह्य , आनंदी होतो .मंडळी उत्तम बोलण्याची शैली सर्वाना उपजतच असते असे नाही आपण प्रयत्नपूर्वक ती सुधारू शकतो .


उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे , बोलताना हळू आवाजात बोलण्याची स्वतःला प्रयत्नपूर्वक सवय लावून घेणे ,कमीतकमी शब्दात पाल्हाळ न लावता जास्तीतजास्त मतितार्थ पोहचवणे ,बोलण्यात उत्तम मार्मिक शब्दांची रेलचेल असणे ह्या सर्व गोष्टी आपण प्रयत्नाची कास धरली तर अशक्य नाहीतच. उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज असते.

                   शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे ..शब्द समोरच्याला आयुष्यातून उठवू शकतात,एखाद्याच्या मनावर कायमचा ओरखडा काढू शकतात आणि एखाद्याचे जीवन घडवूही शकतात. बोलण्याचे कौशल्य हि परमात्म्याची देणगी आहे आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य तो मान ठेवला पाहिजे.

तासंतास समोरच्याला एकाजागी खिळवून ठेवण्याचे कौशल्य आणि अभिजात शब्दसंपदा असणार्या ,आपल्या सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणार्या काही वक्त्यांचा उल्लेख न करता हा लेख पूर्ण होणार नाही .त्यातील काही म्हणजे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कलासृष्टीचा महामेरू अमिताभ बच्चन . प्रचंड सामर्थ्य असलेली शब्दसंपदा त्याचबरोबर बोलण्याची विशिष्ठ लय , मिस्कीलपणा, बोलण्यातील विनोदी शैली ह्यामुळे आपला असा खास श्रोतृगण त्यांनी तयार केला. वक्त्याचे बोलणे आतून आलेले ,तळमळीचे असले तर ते समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेते. खरेपणा त्यांच्या शब्दातून पाझरतो कारण ते त्या शब्दांइतकेच खरे आयुष्य जगलेले असतात. तिथे खोटेपणा, अहंकारास थाराच नसतो.

                    मंत्र मुग्ध होवून ऐकतच राहावे अशी देवाने निर्माण केलेली रत्ने आपल्या आजूबाजूला असतात, ती शोधता आली पाहिजे आणि त्यांच्यासारखा व्यासंग आपण आपल्या जीवनातही आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे .माणसे जोडण्यात जी मजा आहे ती तोडण्यात नाही ह्यात कुणाचेही दुमत नसावे . सर्वाना एकत्रित घेऊन केलेला जीवनरूपी प्रवास आनंददायी होईल ह्यात वादच नाही .


                    चला तर मंडळी “ केल्याने होत आहे रे ,आधी केलेची पाहिजे ” ह्या उक्तीला धरून येत्या नवीन म्हणजेच २०१९ मध्ये साधना करुया ती “ शब्दांची ”. मधुर वाणीने, मोजक्या शब्दात विनयाने आणि संयमाने केलेले भाष्य विधात्याने निर्माण केलेल्या मनुष्यरूपी विविध रंगाना आपलेसे करेल ह्यात शंकाच नाही. 
ह्या रंगात रंगून आपणही करूया आयुष्याचा खर्या अर्थाने “सोहळा ”.

लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा.

antarnad18.blogspot.com