Sunday, 30 January 2022

आनंद यात्रा

 || श्री स्वामी समर्थ ||



आज कित्येक दिवसांनी शेगाव ला जाण्याचा योग आला . शेगाव चे तिकीट महिनाभरापूर्वीच  काढले होते . खरतर तेव्हापासूनच मन शेगाव ला विहार करत होते . महाराज कसे असतील आपली प्रथम दर्शनी भेट झाल्यावर ते मला आणि मी त्यांना कायकाय विचारेन ,सांगेन ह्याचा आराखडा मनोमन बांधण्यात महिना गेला. मध्यंतरीच्या काळात करोना च्या पार्श्वभूमीवर अनेक उलट सुलट बातम्या येत होत्या . अनेकांनी न जाण्याचा सल्लाही दिला. पण जायचा बेत रद्द करावा असे क्षणभर सुद्धा मनात आले नाही .उलट जाण्याच्या निर्णयावर मी ठाम होते. कुठलीही शंका किंवा संदेह मनात नव्हता . 

महाराजांच्या दर्शनासाठी मी व्याकूळ होते . शेगावचा प्रवास अत्यंत सुखरूप झाला आणि मंदिरात प्रवेश झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कडेकोट बंदोबस्त होता . epass घेऊनच दर्शन होणार होते जो मला आधीच मिळाला होता . तसेही शेगाव म्हणजे कडक शिस्त हे समीकरण सर्वाना माहीतच आहे .भाऊंनी घालुन दिलेला शिस्तीचा वारसा , स्वछ्यतेचे पालन , संयम , इथला सेवेकरी वर्ग कसोशीने पाळतो . त्यांचे अनुकरण भक्तही करत असतात  कारण इथल्या प्रत्येक अणुरेणूत , स्पंदनात महाराजांचे अस्तीत्व अबाधित आहे.

प्रचंड शिस्तबद्ध असे आजचे दर्शन होते . करोनाचे सर्व निर्बंध पाळत एकाच रांगेतून समाधी आणि गादीचे दर्शन ,पुढे महाप्रसाद , देणगी आणि ग्रंथ खरेदी हे सर्व सुसूत्र पणे करणारे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. 

महाराजांच्या मंदिराचा कळस पाहूनच डोळे भरून आले होते . गेले कित्येक वर्षाचा माझा अध्यात्मिक प्रवास मी क्षणभरसुद्धा विसरले नव्हते जो  एखाद्या चलत चित्रपटा सारखा डोळ्यासमोरून तरळून जात होता. माझा पहिला शेगावचा प्रवास जसाच्या तसा समोर उभा राहिला. कित्येक प्रसंगातून महाराजांनी मला दिलेला मदतीचा ,विश्वासाचा हात , त्यांच्याशी केलेले  हितगुज कानात रुंजी घालत होते. महाराज आज दुध उतू गेले , आता मी भाजी आणायला जातेय , आज बँकेचे काम झाले नाही अश्या  माझ्या मनातील प्रत्येक लहान सहान गोष्टी  नित्यनेमाने महाराजांना सांगणारी मी कित्येकदा त्यांच्याशी भांडते सुद्धा तर कधी प्रेमाने केलेली झुणकाभाकर त्यांना खाऊ घालताना  महाराजांचा प्रेमळ स्पर्श अनुभवते सुद्धा . 

मंदिरातील वातावरण नेहमीप्रमाणेच भारावून टाकणारे होते. प्रत्येक भक्त महाराजांच्या एका कटाक्षासाठी आतुर झाला होता. जसजसे समाधी मंदिर जवळ येऊ लागले तसतसे मनाचा सगळा बांध फुटला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . समोरचे दिसे ना आणि स्वतःचे देहभान विसरून समोर पहिले तेव्हा मी महाराजांच्या समोरच उभी होते. सात जन्माचे पुण्य फळास आले आणि मी त्या दिव्य शक्तीत एकरूप झाले. कुठल्याही शब्दात ,भाषेत वर्णन करता येणार नाही अशी अद्भुत प्रचीती मिळाली . माझ्या गुरुंसमोर मी नतमस्तक झाले. त्यांच्या एका कृपेची अभिलाषी असणार्या मला “ मुली मी आहे ग तुझ्यासाठी “ हा विश्वास देणारे शब्द जणू कानावर पडत होते . आपण कुठे आहोत ह्याचे भान हरपत होते ,फक्त महाराजांची मूर्ती , त्यांचा चेहरा डोळे मनात साठवून ठेवत होते . हे काही क्षणच होते पण ते मला आजन्म पुरणारे होते . पुढे गादिच्या इथेही निस्सीम शांतता आणि महाराजांची आश्वासक दृष्टी अनुभवली . त्यांची नजर खूप काही सांगून जात होती पण ते सर्व समजण्याची पात्रता आपली नाही हेही मला उमगत होते . आपल्या सद्गुरूंचे दर्शन म्हणजे आनंदाचा ठेवा , सगळ्या सगळ्याच्या पलीकडे नेणारा त्यांचा आशीर्वाद त्यांचे चरण स्पर्श करताना जाणवल्याखेरीज रहात नाही . महाराजांची प्रेमळ नजर मी अनुभवत महाप्रसाद ग्रहण केला आणि कृतकृत्य झाले. 

मी गेलो ऐसे मानू नका ..भक्तीत अंतर ठेवू नका हे वचन भक्तांना देणारे महाराजांचे अस्तित्व आजही तेथील चराचरात आहे. ते अनुभवणे , त्यांच्यात विलीन होणे ह्यासारखे सुख आणि समाधान नाही . संसाराचे पाश तोडणे इतके सहज नाही कारण आपण प्रापंचिक माणसे आहोत किबहुना तसे करणे महाराजानाही अपेक्षित नाही , दिलेले कर्म करत असताना मनात क्षणभर महाराजांच्या विचारांची , त्यांनी घालून दिलेल्या  जीवनशैलीची ज्योत तेवत ठेवणे म्हणजेच त्यांची सेवा . महाराजांचे कितीही वेळा दर्शन घेतले तरी समाधान होत नाही . आज फक्त एका तासात महाराजांचे दर्शन पुनश्च्य नाही हे सहन न होण्यापलीकडे आहे.  पण हे सर्व सुद्धा आपल्याला काहीतरी सुचवत आहे , त्यातून आपण बोध घेतला तरच अशी वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही हेही खरेच आहे. 

आज शेगाव वेगळेच वाटले. माझ्या महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले मला रुचलेही नाही आणि सहन सुद्धा झाले नाही. शेगाव ची यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणी , काकड आरती , प्रदक्षिणा , श्री गजानन विजय  ग्रंथाचे पारायण , दर्शन ,आरती , महाप्रसाद , शेजारती आणि त्यानंतरचा विडा असा दिनक्रम शेगावी असतो . आजचे हे सर्व बदल म्हणूनच का होयीना पचनी पडणे अवघड होते. 

आयुष्य कसे जगायचे , समर्पण म्हणजे काय , निस्सीम भक्ती म्हणजे काय आणि उपासनेचे महत्व काय हे सर्वच मी अनेक वर्षापासून महाराजांच्या सेवेत राहून शिकत आले आहे . मला मिळालेल्या प्रचितीचा उल्लेख करून मी पामर माझ्यापरीने लेखन रुपी सेवा सद्भावनेने करत असते. 

शेगाव ची यात्रा आणि महाराजांचे दर्शन हा दुर्मिळ योग आहे आणि त्यातून मिळालेली प्रचीती भक्तांना माणूस म्हणून घडवत असतेच .जीवन जगताना ते कसे जगावे आणि जगवावे हा मोलाचा संदेश देणारी अशी हि  अद्भुत  “ आनंद यात्रा “ असते .ह्या यात्रेतून प्रवास करणारे सगळे आनंदयात्रीच असतात कारण  दर्शनाचा अनुभव सकारात्मकतेची सर्व दालने उघडी करून देणाराच ठरतो हा भक्तांचा विश्वास आहे. अध्यात्म हि रोजचे जीवन जगण्याची कला आहे. काहीतरी दिल्याशिवाय काहीच मिळणार नाही हेच तर अध्यात्म शिकवत असते .

अपराध माझे गुरुवार आज सारे क्षमा करा , वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ....साश्रू नयनाने मी आज मंदिरातून निघाले  ती आजवर त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आजन्म चालत राहायचे आहे हा मनाशी निर्धार करूनच . माझा फोटो मांडून बाजार मांडू नका हा संदेश सर्व भक्तांना त्यांनी दिला आहे . महाराज आजही प्रत्येक क्षणाला भक्तांना प्रचीती देत आहेत . त्याच्या कृपेचे अभिलाषी असणार्या प्रत्येक भक्ताने आपल्या कर्तव्यांचे कठोर पालन करणे अभिप्रेत आहेच . आपण सेवेत राहायचे आहे आणि आपण सेवेकरी आहोत ह्याचे भान तसूभर सुद्धा सुटता कामा नये .स्वतःला महाराज समजून आपला विठोबा घाटोळ होऊ द्यायचा नाही  हि खुणगाठ मनाशी बांधली पाहिजे.  महाराजांनी आणि त्यांचे गुरु श्रीस्वामीसमर्थ ह्यांनी मला आयुष्यात उभे केले आहे. सहज सोपे काहीच दिले नाही . प्रत्येक गोष्टीत तावून सुलाखून दिले पण जे दिले ते असामान्य दिले . आयुष्यातील परमोच्च आनंद , समाधान , रात्रीची शांत झोप  आणि त्यांचा वरदहस्त मी क्षणोक्षणी अनुभवत आहे त्यामुळे अजून काही मागण्यासारखे उरलेच नाही.  समर्पणाची भावना असल्याशिवाय सद्गुरू प्राप्ती होत नाही हे सोळा आणे सत्य आहे. 

आज शेगावची हि आनंदयात्रा मी अनुभवली आणि ह्या यात्रेतील प्रत्येक क्षण मी महाराजांसोबत  जगले ...हा सर्व ठेवा मला पुढील यात्रेपर्यंत निश्चितच पुरणारा आहे. 

अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे | असो खलहि केव्हडा तव कृपे सुमार्गी वळे |

उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish




 



















Sunday, 2 January 2022

विस्मृती ( वरदान ????)

 || श्री स्वामी समर्थ ||





देवाने आपल्याला विचार करण्यासाठी आणि विचार केलेल्या गोष्टी साठवून ठेवण्यासाठी मेंदू दिला आहे. पण आयुष्य प्रत्येक वेळी साधे सोप्पे नसतेच . प्रत्येक वळणावर आनंद ,दुक्ख कायकाय भेटीला येयील सांगता येत नाही. आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान माहित आहे पण भविष्याच्या उदरात काय दडलंय ते कुणालाच माहित नसते आणि म्हणूनच ते जाणून घ्यायची उत्सुकता अधिक असते.  हा मनुष्य स्वभाव आणि ह्या उत्सुकतेतूनच ज्योतिषा सारख्या दैवी शास्त्राचा जन्म झाला आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 

आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. मन चंगा तर सब कुछ चंगा नाही का? मनाची अदालत , मनाचा कौल सर्वात महत्वाचा असतो. परमेश्वराची करामत अवर्णनीय  आहे , त्याने आपल्याला  घडवले आहे , मनही दिले आणि आत्माही . तरीही आपल्याला  आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत हे काहीच माहित नसते . आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा आहे तो श्वास म्हणजेच वायुतत्व महत्वाचे आहे. वायूचा कारक शनी कधी आपल्या श्वासाचे बटन दाबेल सांगता येत नाही म्हणून ना भूतो ना भविष्यति..आत्ताचा क्षण जगा ,आनंद घ्या आणि द्या ..आपण सगळेच ह्या पृथ्वीवरचे सहप्रवासी आहोत , We are travellers here and one day our Journey will End. 

सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य असा एकमेव प्राणी आहे ज्याला परमेश्वराने अफाट बुद्धिमत्ता प्रदान केली आहे आणि म्हणूनच देवाच्या आपल्याकडून अपेक्षाही खूप आहेत . पण आपण त्याने दिलेल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करतो ? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आयुष्यभरात मिळवलेल्या आणि घालवलेल्या गोष्टींची गोळाबेरीज केली तर शून्यच येईल बरेचदा . दुख निराशा अपेक्षाभंग ह्या सगळ्याचे मणामणाचे ओझे मनावर घेवून जगत असतो आपण आणि ह्या सर्वाचा मनावर प्रचंड ताण येतो जो एका मर्यादेच्या बाहेर आपण सहन सुद्धा करू शकत नाही . 

हव्या त्या कॉलेज ला प्रवेश मिळाला नाही ,  प्रोमोशन नाही , हवी तशी सहचारिणी नाही , मुले आपले ऐकत नाहीत , परदेशी टूर ला जाता आले नाही , हवे तसे घर मिळाले नाही , हे झाले नाही आणि ते झाले नाही . भरमसाट अपेक्षा आणि त्या अपूर्ण राहिल्यामुळे पदरात पडलेली निराशा ह्यामुळे मनावर आणि मेंदूवर ताण येतो.  बरेचदा तो ताण विकोपाला जातो आणि मग मनाचे आजार जसे विस्मृती ,विसरभोळेपणा , एकांतवास ,कुणाशीच न बोलणे , शून्यात बघत राहणे इत्यादी . 

विस्मृती हा आजार आजकाल आपला पदर धरूनच चालत आहे . आजकालच्या so called fast life मुळे घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आपण मनात विचारांचे काहूर घेवून जगतोय . आज भाजी कुठली करायची , इस्त्रीचे कपडे आले का , दळण संपले का, उद्या प्रवासाला जायचं bag बरोबर आहे ना , सगळी बिले भरली का , औषधे संपली का , आज ऑफिस मध्ये मिटिंग आहे , रजेसाठी अर्ज स्वीकारला जायील का ? आज मोलकरीण नाही येणार देवा ..एक ना दोन ह्या विचारांच्या गर्दीत अगदी फ्रीज उघडला तरी कश्यासाठी उघडला तेच आठवत नाही अनेकदा , फोन हातात घेतला तर कुणाला करायचा होता ते विसरायला होते ...क्षणाक्षणाला गोष्टी विसरतो आपण. मग म्हणतो चंद्र बिघडला पण त्याला आपल्या रुटीन नेच बिघडवले आहे ,चंद्र पूर्वीही होता ,आजही आहे आणि उद्याही असणार आहे पण किती त्याच्यावर ताण ? तोही किती सहान करणार नाही का. 

आजकाल विस्मृती हि समस्या वाढत चालेलेली आहे ती मेंदूवर मनावर आलेल्या ताणामुळे . हा ताण आपण कमी करू शकतो , प्रत्येक आजाराचे मूळ हे आपल्यातच आणि आपल्या lifestyle मधेच दडलेले आहे . आपली मागील पिढी अतोनात कष्ट करूनही सुखी समाधानी होती . तेव्हा कुठे होता मधुमेह ? Think Think. आज आपण पैसे मिळवण्याची मशीन झालो आहोत ,ना  मुलांसाठी वेळ ना स्वतःसाठी .

आपण नियमित केलेली साधना , ध्यानधारणा , व्यायाम , योगा आपल्या शरीरावरची चरबी आणि मनावरचा ताण निश्चित हलका करेल पण आपण वेळ नाही ह्या गोंडस आवरणाखाली त्या झाकून टाकतो. आणि ज्या वेळी हे सर्व करण्याची उपरती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. 

विस्मृती हा मनाचा आजार आहे . अश्या लोकांना सकाळी काय खाल्ले ते आठवते पण मागचे काहीच आठवत नाही . आयुष्यात एखाद्या घटनेचा झालेला आघात सहन न होणे , अपयश ,अपेक्षाभंगाचे दुक्ख पचवता न येणे असे काहीही असू शकते  .मधेच आठवते मधेच नाही ,काहीतरी बोलतात संदर्भ सुद्धा देतात ,स्वतःच्याच कोशात हि माणसे असतात . आयुष्यातील चढ उतारातून आपली सुटका नाही हे खरे आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाने ग्रहतार्यांशी मैत्री करायची संधी प्राप्त झाली आणि प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे असतात हे समजू लागले. कुठलीही गोष्ट तसेच माणूस ह्या जगात perfect नाहीच आणि नाही .  चंद्र हा मनाचे प्रतिनिधित्व करणारा जल तत्वाचा कारक . जल म्हणजेच संवेदना , मन निराश होते म्हणजेच संवेदना ,भावभावना दुखावल्या जातात . 

ह्या सर्व गोष्टींवर खूप विचार केल्यावर एक जाणवले. विस्मृती म्हणजे ज्या घटनांचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो त्या सर्व हो हो अगदी सर्वच गोष्टींचा विसर पडण्यासाठी त्या गोष्टी , आयुष्यातील काही काळच आपल्या आयुष्यातून देवाने पुसून टाकला आहे, असा जर अर्थ घेतला तर तुमच्या लक्ष्यात येयील अश्या व्यक्तींच्या कुटुंबाला त्रास असू शकतो .आपले बाबा आपल्याला ओळखतच नाहीत हि मनाला असणारी टोचणी आहे , पण त्या व्यक्तीला आयुष्यात किती सुख आहे , काहीच आठवत नाही ,अशी माणसे त्यांच्याच कोशात आनंदात जगत असतात , नीट जवळून पहिले तर हेच दिसून येयील.

अश्या वेळी वाटते विस्मृती हा आजार कि त्या माणसाला परमेश्वराचे  मिळालेले वरदान ? असा वेगळा विचार मला करावासा वाटला . माझ्या ह्या विचारांशी कुणी सहमत असावे असा माझा आग्रह अजिबात नाही कारण प्रत्येकाचा विचार , दृष्टीकोण नक्कीच वेगळा आणि स्वागतार्ह आहे.

अस्मिता

फेसबुक पेज : @yashasweejyotish