|| श्री स्वामी समर्थ ||
आज कित्येक दिवसांनी शेगाव ला जाण्याचा योग आला . शेगाव चे तिकीट महिनाभरापूर्वीच काढले होते . खरतर तेव्हापासूनच मन शेगाव ला विहार करत होते . महाराज कसे असतील आपली प्रथम दर्शनी भेट झाल्यावर ते मला आणि मी त्यांना कायकाय विचारेन ,सांगेन ह्याचा आराखडा मनोमन बांधण्यात महिना गेला. मध्यंतरीच्या काळात करोना च्या पार्श्वभूमीवर अनेक उलट सुलट बातम्या येत होत्या . अनेकांनी न जाण्याचा सल्लाही दिला. पण जायचा बेत रद्द करावा असे क्षणभर सुद्धा मनात आले नाही .उलट जाण्याच्या निर्णयावर मी ठाम होते. कुठलीही शंका किंवा संदेह मनात नव्हता .
महाराजांच्या दर्शनासाठी मी व्याकूळ होते . शेगावचा प्रवास अत्यंत सुखरूप झाला आणि मंदिरात प्रवेश झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात कडेकोट बंदोबस्त होता . epass घेऊनच दर्शन होणार होते जो मला आधीच मिळाला होता . तसेही शेगाव म्हणजे कडक शिस्त हे समीकरण सर्वाना माहीतच आहे .भाऊंनी घालुन दिलेला शिस्तीचा वारसा , स्वछ्यतेचे पालन , संयम , इथला सेवेकरी वर्ग कसोशीने पाळतो . त्यांचे अनुकरण भक्तही करत असतात कारण इथल्या प्रत्येक अणुरेणूत , स्पंदनात महाराजांचे अस्तीत्व अबाधित आहे.
प्रचंड शिस्तबद्ध असे आजचे दर्शन होते . करोनाचे सर्व निर्बंध पाळत एकाच रांगेतून समाधी आणि गादीचे दर्शन ,पुढे महाप्रसाद , देणगी आणि ग्रंथ खरेदी हे सर्व सुसूत्र पणे करणारे नियोजन वाखाणण्याजोगे आहे.
महाराजांच्या मंदिराचा कळस पाहूनच डोळे भरून आले होते . गेले कित्येक वर्षाचा माझा अध्यात्मिक प्रवास मी क्षणभरसुद्धा विसरले नव्हते जो एखाद्या चलत चित्रपटा सारखा डोळ्यासमोरून तरळून जात होता. माझा पहिला शेगावचा प्रवास जसाच्या तसा समोर उभा राहिला. कित्येक प्रसंगातून महाराजांनी मला दिलेला मदतीचा ,विश्वासाचा हात , त्यांच्याशी केलेले हितगुज कानात रुंजी घालत होते. महाराज आज दुध उतू गेले , आता मी भाजी आणायला जातेय , आज बँकेचे काम झाले नाही अश्या माझ्या मनातील प्रत्येक लहान सहान गोष्टी नित्यनेमाने महाराजांना सांगणारी मी कित्येकदा त्यांच्याशी भांडते सुद्धा तर कधी प्रेमाने केलेली झुणकाभाकर त्यांना खाऊ घालताना महाराजांचा प्रेमळ स्पर्श अनुभवते सुद्धा .
मंदिरातील वातावरण नेहमीप्रमाणेच भारावून टाकणारे होते. प्रत्येक भक्त महाराजांच्या एका कटाक्षासाठी आतुर झाला होता. जसजसे समाधी मंदिर जवळ येऊ लागले तसतसे मनाचा सगळा बांध फुटला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . समोरचे दिसे ना आणि स्वतःचे देहभान विसरून समोर पहिले तेव्हा मी महाराजांच्या समोरच उभी होते. सात जन्माचे पुण्य फळास आले आणि मी त्या दिव्य शक्तीत एकरूप झाले. कुठल्याही शब्दात ,भाषेत वर्णन करता येणार नाही अशी अद्भुत प्रचीती मिळाली . माझ्या गुरुंसमोर मी नतमस्तक झाले. त्यांच्या एका कृपेची अभिलाषी असणार्या मला “ मुली मी आहे ग तुझ्यासाठी “ हा विश्वास देणारे शब्द जणू कानावर पडत होते . आपण कुठे आहोत ह्याचे भान हरपत होते ,फक्त महाराजांची मूर्ती , त्यांचा चेहरा डोळे मनात साठवून ठेवत होते . हे काही क्षणच होते पण ते मला आजन्म पुरणारे होते . पुढे गादिच्या इथेही निस्सीम शांतता आणि महाराजांची आश्वासक दृष्टी अनुभवली . त्यांची नजर खूप काही सांगून जात होती पण ते सर्व समजण्याची पात्रता आपली नाही हेही मला उमगत होते . आपल्या सद्गुरूंचे दर्शन म्हणजे आनंदाचा ठेवा , सगळ्या सगळ्याच्या पलीकडे नेणारा त्यांचा आशीर्वाद त्यांचे चरण स्पर्श करताना जाणवल्याखेरीज रहात नाही . महाराजांची प्रेमळ नजर मी अनुभवत महाप्रसाद ग्रहण केला आणि कृतकृत्य झाले.
मी गेलो ऐसे मानू नका ..भक्तीत अंतर ठेवू नका हे वचन भक्तांना देणारे महाराजांचे अस्तित्व आजही तेथील चराचरात आहे. ते अनुभवणे , त्यांच्यात विलीन होणे ह्यासारखे सुख आणि समाधान नाही . संसाराचे पाश तोडणे इतके सहज नाही कारण आपण प्रापंचिक माणसे आहोत किबहुना तसे करणे महाराजानाही अपेक्षित नाही , दिलेले कर्म करत असताना मनात क्षणभर महाराजांच्या विचारांची , त्यांनी घालून दिलेल्या जीवनशैलीची ज्योत तेवत ठेवणे म्हणजेच त्यांची सेवा . महाराजांचे कितीही वेळा दर्शन घेतले तरी समाधान होत नाही . आज फक्त एका तासात महाराजांचे दर्शन पुनश्च्य नाही हे सहन न होण्यापलीकडे आहे. पण हे सर्व सुद्धा आपल्याला काहीतरी सुचवत आहे , त्यातून आपण बोध घेतला तरच अशी वेळ पुन्हा आपल्यावर येणार नाही हेही खरेच आहे.
आज शेगाव वेगळेच वाटले. माझ्या महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले मला रुचलेही नाही आणि सहन सुद्धा झाले नाही. शेगाव ची यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणी , काकड आरती , प्रदक्षिणा , श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण , दर्शन ,आरती , महाप्रसाद , शेजारती आणि त्यानंतरचा विडा असा दिनक्रम शेगावी असतो . आजचे हे सर्व बदल म्हणूनच का होयीना पचनी पडणे अवघड होते.
आयुष्य कसे जगायचे , समर्पण म्हणजे काय , निस्सीम भक्ती म्हणजे काय आणि उपासनेचे महत्व काय हे सर्वच मी अनेक वर्षापासून महाराजांच्या सेवेत राहून शिकत आले आहे . मला मिळालेल्या प्रचितीचा उल्लेख करून मी पामर माझ्यापरीने लेखन रुपी सेवा सद्भावनेने करत असते.
शेगाव ची यात्रा आणि महाराजांचे दर्शन हा दुर्मिळ योग आहे आणि त्यातून मिळालेली प्रचीती भक्तांना माणूस म्हणून घडवत असतेच .जीवन जगताना ते कसे जगावे आणि जगवावे हा मोलाचा संदेश देणारी अशी हि अद्भुत “ आनंद यात्रा “ असते .ह्या यात्रेतून प्रवास करणारे सगळे आनंदयात्रीच असतात कारण दर्शनाचा अनुभव सकारात्मकतेची सर्व दालने उघडी करून देणाराच ठरतो हा भक्तांचा विश्वास आहे. अध्यात्म हि रोजचे जीवन जगण्याची कला आहे. काहीतरी दिल्याशिवाय काहीच मिळणार नाही हेच तर अध्यात्म शिकवत असते .
अपराध माझे गुरुवार आज सारे क्षमा करा , वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ....साश्रू नयनाने मी आज मंदिरातून निघाले ती आजवर त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आजन्म चालत राहायचे आहे हा मनाशी निर्धार करूनच . माझा फोटो मांडून बाजार मांडू नका हा संदेश सर्व भक्तांना त्यांनी दिला आहे . महाराज आजही प्रत्येक क्षणाला भक्तांना प्रचीती देत आहेत . त्याच्या कृपेचे अभिलाषी असणार्या प्रत्येक भक्ताने आपल्या कर्तव्यांचे कठोर पालन करणे अभिप्रेत आहेच . आपण सेवेत राहायचे आहे आणि आपण सेवेकरी आहोत ह्याचे भान तसूभर सुद्धा सुटता कामा नये .स्वतःला महाराज समजून आपला विठोबा घाटोळ होऊ द्यायचा नाही हि खुणगाठ मनाशी बांधली पाहिजे. महाराजांनी आणि त्यांचे गुरु श्रीस्वामीसमर्थ ह्यांनी मला आयुष्यात उभे केले आहे. सहज सोपे काहीच दिले नाही . प्रत्येक गोष्टीत तावून सुलाखून दिले पण जे दिले ते असामान्य दिले . आयुष्यातील परमोच्च आनंद , समाधान , रात्रीची शांत झोप आणि त्यांचा वरदहस्त मी क्षणोक्षणी अनुभवत आहे त्यामुळे अजून काही मागण्यासारखे उरलेच नाही. समर्पणाची भावना असल्याशिवाय सद्गुरू प्राप्ती होत नाही हे सोळा आणे सत्य आहे.
आज शेगावची हि आनंदयात्रा मी अनुभवली आणि ह्या यात्रेतील प्रत्येक क्षण मी महाराजांसोबत जगले ...हा सर्व ठेवा मला पुढील यात्रेपर्यंत निश्चितच पुरणारा आहे.
अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे | असो खलहि केव्हडा तव कृपे सुमार्गी वळे |
उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी ||
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment