|| श्री स्वामी समर्थ ||
“The world is a book, and those who don't travel only read one page.” |
मंडळी,
आयुष्यात प्रत्येकाच्या काहीना काही इच्छा आकांक्षा, उराशी
बाळगलेली स्वप्न असतातच. काही वेळा आपली हि स्वप्न अनेक कारणांमुळे अपुरी राहतात ,पण
काही भाग्यवान असतात जे आपल्या स्वप्नांचा ध्यास घेवून ती पूर्ण करण्यात यशस्वी
होतात.
आज मी आपल्याला अश्या एका व्यक्तीचा परिचय करून देणार आहे
ज्यांनी आपल्या इच्छासोबत आपल्या वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता
करण्यात यश मिळवले आहे.
सौ.मंजीरीताई..मोलाची साथ ..जीवनात आणि प्रवासात सुद्धा. |
मंडळी सप्तखंडातील ८२ पेक्षा जास्ती देशातील भटकंती करून
आपले जीवन कृतार्थ ,अनुभव संपन्न करणारया श्री अरुण सबनीस यांच्याशी आज गप्पांचा
योग आला. भटकंती हा त्यांचा अर्थात आवडता विषय आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने
त्याविषयी आपले अनुभव सांगण्यात ते रमून गेले होते. बालपण बेळगाव मध्ये गेले पण वडिलांच्या
सतत होणार्या नोकरीतील बदल्यांमुळे बडोदा, बलसाड ,नाशिक इथेहि काहीकाळ त्यांचे वास्तव्य
झाले. ह्या सर्व काळात त्यांचे शिक्षण चालूच होते. मग पुढे उच्च शिक्षण आणि नोकरी
निम्मित्ताने मुंबईस येणे झाले. आपल्याला हे भटकंतीचे वेड कसे लागले ह्या
प्रश्नावर त्यांनी त्यांच्या बालपणीचा दृद्यद्रावक किस्सा सांगितला. वडिलांच्या
तापट स्वभावामुळे लहानपणी त्यांच्यापाशी एखादा हट्ट तर सोडाच पण एखाद्या विषयावर
संवाद साधणे हेही अवघड असायचे.
एकदा त्यांच्या कपाटात त्यांना इटलीमधील पोम्पेई ह्या 5000
वर्षापूर्वी ज्वालामुखीमुळे उध्वस्त झालेल्या शहराची काही पोस्ट कार्ड मिळाली .त्यांना
जरा आश्चर्य वाटले कि वडिलांच्या कडे ह्या वस्तू कश्या. वडिलांनी त्यांच्या हातात
हि कार्ड पाहिली आणि आपल्या मुलाच्या अचंबित चेहऱ्याकडे पाहताना म्हंटले “ खूप आवड होती भटकंतीची पण सर्व राहून गेले ”. हे कथन करताना अरुणकाका वडिलांच्या आठवणीने
खूपच सद्गदित झाले होते. आजवर प्रपंच्याचा गाडा ओढताना वडिलांनी आपल्या मनातील ज्या सुप्त इच्छाना तिलांजली दिली होती त्यातील एक म्हणजे भटकंती. आजवर वडीलांचा फक्त
तापट स्वभाव पाहणाऱ्या त्यांच्या मनास, आपले छंद बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी
अहोरात्र झटणारया आणि त्यांच्याच सुखात आपले सुख मानणारया आपल्या वडिलांचा संवेदनशील
स्वभाव स्पर्शून गेला. मुलाबाळांसाठी आयुष्य वेचणार्या त्यांच्या वडिलांना अशी
पोस्ट कार्ड पाहूनच समाधान मानावे लागले होते.
Generations Together |
आयुष्य हळूहळू पुढे सरकत होते .कालांतरानी रुपारेल कॉलेज मध्ये सायकोलोजी ह्या विषयात पदवी प्राप्त झाल्यावर काकांनी अनेक ठिकाणी उच्च पदांवर आपला कार्यभाग सांभाळला. वयाच्या 55
च्या आसपास आपल्या कौटुंबिक जबाबदार्यामधून मुक्तता मिळाल्यावर त्यांनी भटकंतीचा
श्रीगणेशा केला. पहिला प्रवास अगदी जवळच महाबळेश्वर ,माथेरान ,लोणावळा. मग पुढे
दिल्ली आग्रा, नेपाळ पाहत सर्व महाराष्ट ,भारत पिंजून काढला. वर्षभरातील लहान
मोठ्या सुट्ट्यांचे कॅलेंडर बघून प्रवासाची आखणी ते आधीच करू लागले. सर्वात पहिली
परदेशवारी 1990 साली SEA( South East Asia) मधील देशांची झाली आणि मग तिथून अव्याहतपणे अनेक देशांची
भटकंतीची शृंखला गुंफली गेली. प्रत्येक ठिकाणचा नुसताच निसर्ग नाही तर तेथील
संस्कृती, राहणीमान, जनजीवन नकळत आपल्यालाही प्रभावित करते. घराबाहेर पडल्यावर खर्या अर्थाने शिक्षण सुरु होते ते हे असे.
आपल्या प्रवासातील आठवणीना उजाळा देत त्यांनी भावलेला
,अचंबित करणारा किस्सा सांगितला. उझबेकिस्तान येथे पर्यटन करताना त्यांना भारतीय
म्हणून मान मिळाला .त्यांच्या ग्रुप मधील चालू असलेला हिंदी संवाद तेथील एका
मुलीने ऐकला .ह्या मुलीने हिंदी विषयाचा अभ्यास दिल्ली येथून केला असल्याने तिला
हिंदी समजत होते . आपल्याकडे भारतातील पर्यटक आले आहेत हे ऐकून तेथील स्थानिक लोकांनी
तेथील रीतीरीवाजाचा मान राखून त्यातील काहीना आपल्याकडील मौल्यवान वस्तू देवून
गौरविले. आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडेल तिला आपल्याकडील सर्वात आवडणारी
वस्तू भेट म्हणून देणे हा येथील रिवाज आहे. ह्या आपलेपणामुळे सर्वच मंडळी सद्गदित
झाली होती. काही अनुभव खूपच रोमांचकारी होते .इटलीमध्ये काही प्रवासी महिलांचे हरवलेले passport, visa हे केसरीच्या
सौ. सुनीला पाटील ह्यांनी अगदी सहजपणे अत्यंत अल्प काळात पुन्हा केले , हे
सांगताना त्यांनी सुनीला च्या चेहऱ्यावर असलेल्या “Winning Smile " चा आवर्जून
उल्लेख केला. एक ना दोन ,काकांच्या अनुभवाची पोतडी असंख्य अनुभवांनी ओतप्रोत भरली
होती, त्या सर्वांचा इथे उल्लेख करणे मनात असूनही शक्य नाही. काही विशिष्ठ ठिकाणी
कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. काकांनीही स्वित्झर्लंड, आईसल्यांड आणि
न्यूझीलंड इथे पुन्हा जायची मनीषा बोलून दाखवली. त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा
त्यांना अनेक अनुभवातून घेवून गेली. कैलास मानससरोवर येथे सरोवरात डुबकी मारून
कैलासाकडे पाहून अर्ध्य देताना त्यांना आलेली आपल्या वडिलांची आठवण सांगताना
त्यांच्यासोबत माझेही मन हेलावून गेले. त्यांच्या ह्या संपूर्ण जगप्रवासात अदृश्य
रूपाने त्यांना भटकंतीची प्रेरणा देणारे त्यांचे वडील त्यांच्यासोबत असतील आणि
त्यांच्या डोळ्याने हे नितांत सुंदर जग डोळे भरून पाहत असतील हे नक्की.
गेल्या ३० वर्षात ८२ पेक्षा जास्ती देशात पर्यटन करताना
आलेल्या अनुभवांची शिदोरी त्यांना समृद्ध करून गेली. जीवनाची मुल्ये त्यांना
मैलोमैल केलेल्या प्रवासातच सापडली. दुर्दम्य
इच्छाशक्ती, प्रवासाची उपजत असलेली आवड ,आणि समोर आलेल्या परिस्थितीला तक्रार न करता स्वीकारून पुढे जाण्याचा स्वभाव त्यांना जगप्रवासाचा आनंद लुटण्यास पूरक ठरला. ऑगस्ट 2000 मध्ये कैलास मानससरोवर यात्रेहून परतत असताना जीवावर बेतलेला प्रसंग खूपच हृदयद्रावक होता. त्यांची जीप उलटली पण ३५०० फुट दरीत गेली नाही हे अहोभाग्य आणि पूर्वपुण्याई. त्यात सहप्रवासी असलेल्या इटालीयन नर्स ने आपली कुठलीही बोलीभाषा येत नसतानाही सर्वांची प्रार्थमिक शुश्रुषा केली तो प्रसंग माणुसकीचे दर्शन घडवणारा होता.
इच्छाशक्ती, प्रवासाची उपजत असलेली आवड ,आणि समोर आलेल्या परिस्थितीला तक्रार न करता स्वीकारून पुढे जाण्याचा स्वभाव त्यांना जगप्रवासाचा आनंद लुटण्यास पूरक ठरला. ऑगस्ट 2000 मध्ये कैलास मानससरोवर यात्रेहून परतत असताना जीवावर बेतलेला प्रसंग खूपच हृदयद्रावक होता. त्यांची जीप उलटली पण ३५०० फुट दरीत गेली नाही हे अहोभाग्य आणि पूर्वपुण्याई. त्यात सहप्रवासी असलेल्या इटालीयन नर्स ने आपली कुठलीही बोलीभाषा येत नसतानाही सर्वांची प्रार्थमिक शुश्रुषा केली तो प्रसंग माणुसकीचे दर्शन घडवणारा होता.
नाबाद ८२ टूर्स च्या उंबरठ्यावर अजून त्यांचे पचमढी आणि चित्रकुट
येथील धबधबा पाहायचे राहून गेले आहे . तसेच रशियातील मोस्को ते व्लाडिव्होस्टॉक ह्या मार्गावर
अत्यंत जलदगतीने धावणारया सायबेरीयन रेल्वेतील प्रवासाचा रोमांचककारिक अनुभव
त्यांची कन्या सौ. सुप्रिया पिळगावकर हिच्या सोबत नजीकच्या काळात अनुभवायचा त्यांचा मानस आहे.
गेल्या कित्येक वर्षात जगभरात प्रवास करताना त्यांचे सहप्रवासी होते त्यांचे
कुटुंबीय ,मित्र मंडळी. कालांतरानी प्रवासातील झालेल्या ओळखीच्या लोकांनी त्यांचे
कुटुंब मोठे केले. पण त्यांचा सर्वात लाडका सहप्रवासी ,त्यांची लाडकी नात म्हणजेच
आज अभिनय क्षेत्रात आपल्या अभिनयाचा विशिष्ठ ठसा उमटऊ पाहणारी श्रिया पिळगावकर. लाडक्या
नातीबद्दल भरभरून बोलत असताना “प्रवासात ती माझी फारच काळजी घेते” अशी प्रेमळ कबुलीही त्यांनी दिली.
No age bar for Travelling and Adventures |
मंडळी ,जगभरातील पर्यटनाचा आनंद त्यांनी प्रामुख्याने केसरी
टूर्स , वीणा वर्ल्ड, अनुभव यात्रा, ग्लोबस टूर्स, कॉस्मोस
टूर्स ह्या पर्यटन संस्थांसोबत लुटला. आज त्यांचे वय ८० च्या उंबरठ्यावर आहे पण
तरुणांना लाजवेल अशी धडाडी , जिद्द आहे आणि प्रवासाने त्यांना चिरतरुण ठेवले आहे
ह्यात शंकाच नाही. अजूनही त्यांची भटकंती संपलेली नाही आणि ती कधीच संपणारही नाही.
प्रत्येकाला निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा आणि
आयुष्याच्या संध्याकाळी करायचे तरी काय? असा प्रश्न भेडसावणार्या सर्वांसाठी अरुणकाकांची भटकंती नक्कीच प्रेरणा देवून जाईल . काकांनी आपली सेकंड
इनिंग आपल्या भटकंतीमुळे कुणालाही हेवा वाटेल इतकी बहारदार केली. आपल्या हसतमुख
स्वभावाने आणि लाघवी बोलण्याने ते कुणालाही क्षणात आपलेसे करून टाकतात तरीही सर्वात असून आपला रंग निराळा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ठ खास करून सांगावेसे वाटते.
A Proud Father with " लाडकी लेक आणि सहप्रवासी " |
भटकंतीचे
वेड असलेल्या सर्व पर्यटकांना काय सांगाल ह्या माझ्या प्रश्नावर हसून ते म्हणाले ,
अग प्रत्येक पर्यटकाने एक लक्ष्यात ठेवावे कि आपण कष्टाने मिळवलेला पैसा खर्च करून
जेव्हा पर्यटनास घराबाहेर पडतो तेव्हा मुळात कुठल्याही गोष्टीची तक्रार करणे घरीच
ठेवून यावे, प्रवासाचा खर्या अर्थाने आनंद घ्यावा आणि तो सह्प्रवाश्यानाही घेवू
द्यावा, अनेक मित्र जोडावेत ,खाण्यापिण्याच्या जेवणाच्या कसल्याही तक्रारी करू
नये, एकमेकांचे अनुभव ऐकावेत आणि त्यांना आपले परम मित्र करावे. एवढे केले कि
प्रवास खर्या अर्थाने सुफळसंपन्न झाला असे समजायला हरकत नाही.
खरच मंडळी ,पर्यटनाचा आणि त्यातील आलेल्या अनुभवांचा आनंद
काकांच्या चेहऱ्यावर दुथडी भरून वाहत होता. आज जणू अनुभवांची , विचारांची सुरेल
मैफल जमली होती कधीही न संपणारी. मी त्यांच्यापेक्षा सर्वार्थाने लहान असूनही
त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. मंजिरी काकू यांनी केलेल्या उत्तम आदरातिथ्याने
मी मनापसून भारावून गेले. खरच, पर्यटन आपल्याला नुसतेच जगायला शिकवत नाही तर जीवनाकडे
पाहण्याची वेगळी दृष्टी देते. त्याचबरोबर नवीन ध्येये आणि ती पूर्ण करण्याची
जिद्दही. खरच जग इतके सुंदर आहे कि ते पूर्णपणे पाहायला, अनुभवायला एक जन्म खचितच अपुरा आहे. पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून आणि काकांपासून
प्रेरणा घेवून सुरु करुया आपली भटकंती ....कधीही न थांबण्यासाठी.
काका तुमची हि सप्तखंडातील भ्रमंती सर्व वाचकांना प्रेरणादाई ठरेल यात तिळमात्र शंका नाही . आपल्या पुढील प्रवासासाठी माझ्या आणि सर्व वाचकांतर्फे मनापासून शुभेछ्या.
लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा
antarnad18@gmail.com