Friday, 17 August 2018

अशी पाखरे येती

|| श्री स्वामी समर्थ ||


एकमेकांसोबत राहूनच  होतो जीवनाचा खर्या अर्थाने सोहळा.




                     रंगीबेरंगी पाखरांसारखी किलबिलाट करणारी अनेक  स्वभावाची माणसे आपल्या आयुष्यात अनेक टप्प्यांवर भेटत जातात त्याविषयी थोडेसे. आयुष्यात माणसांचे जाणेयेणे अविरत चालूच असते. आजकालच्या आधुनिक जगतात तर सोशल मिडिया मुळे रोज नवीन चेहरे रोज नवीन व्यक्तींशी परिचय होत असतो , पण माणसांच्या गराड्यात असूनही कधीतरी आपण एकटेच असल्याची भावना उफाळून येते...कधीकधी माणसांचा कंटाळाही येतो , आजूबाजूला कुणीही नको ,जरावेळ शांत एकटेच रहावेसे वाटते  ..स्वतःच्या विचारात स्वतःच्याच विश्वात ..पण मग त्या एकटेपणाचाही कंटाळा येतो आणि पुन्हा आपण सभोवतालच्या माणसात रुंजी घालू लागतो .शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणूनच देवाने कुटुंबव्यवस्था निर्माण केली असावी. माणसाचे मन मोठे विचित्र..त्या मनास कधी कोण भावेल सांगता येत नाही .


             
             एखादी व्यक्ती आपल्याला सहज भावते .आजकालच्या परिभाषेत सांगायचं तर click होते जणू,मग तिच्याशी तासंतास कुठल्याही विषयावर गप्पा होतात, पुन्हापुन्हा भेटीची ओढ लागते , मनास हुरहूर लागते ,एकत्र घालवलेले क्षण अस्वस्थ करतात ,ह्यात वयोमर्यादाही नसते, आपल्याला त्या व्यक्तीचा सहवास आवडू लागतो..का? ह्याला खरच उत्तर नसते .पण आपण त्या व्यक्ती सोबत एकरूप होवून जातो...उलटपक्षी काही जण इतके गूढ असतात कि त्यांचे अस्तित्व सुद्धा नकोसे वाटते, त्यांच्या असण्याने किंवा त्यांच्या नुसत्या विचारानेही अस्वस्थ व्हायला होते ,कदाचित त्यांचा ORA आपल्याला खचितच disturbing वाटतो. एखादी व्यक्ती इतकी खेळकर ,आनंदी स्वभावाची ,मनमिळावू असते कि तिच्या नुसत्या विचारानेही आपण सुखावतो आणि अश्या माणसांच्या सहवासात आपले आयुष्य फुलत जाते. कधीकधी एखाद्या व्यक्ती भोवती असलेले ज्ञानाचे ,अध्यात्माचे वलय इतके प्रभावशाली असते कि त्यांना भेटल्यावर आपण त्यांच्यासमोर आपोआपच नतमस्तक होतो.
      
              बरेचदा खूप मित्र मैत्रिणी असूनही मनातले बोलायला आपण नेमके एखाद्याच मित्राची किंवा मैत्रिणीची निवड करतो कारण त्यांचे अस्तित्व ,त्यांची मैत्री आपल्याला विश्वास ,मोठा दिलासा देवून जाते .कधीकधी खूप वर्ष एकाच घरात राहिलेली माणसे समांतर रेघांसारखी जगत राहतात ,ती एका छताखाली जरूर असतात पण त्यांची मने मात्र कधीच एक होत नाहीत. कार्यालयात जिथे आपण ८-१० तास एकत्र घालवतो अगदी तिथेही तरतर्हेची माणसे अवतीभवती असतात..त्यातली काहीच आपली होवून जातात ..काहींच्या बरोबर आपले आयुष्यभराचे बंध जुळतात ,तर काही फक्त ओळखीचेच राहतात, काहींच्या बरोबर चहाच्या गप्पांच्या फेरी झडतात तर काहींच्याबरोबर जातायेता नुसते एक निसटते हास्य. आयुष्याच्या ह्या प्रवासात कुठल्या वळणावर कोण भेटेल हे खरच सांगणे अशक्य आहे. अगदी तासाभराच्या प्रवासातील सह्प्रवासीही कधीतरी आयुष्यभराचे सोबती होवून जातात ..शेवटी नात्यांच्या ह्या रेशीम गाठी कुठे जुळून येतील ह्याचा नेम नाही हेच खरे...कधीकधी                 आपल्या खास मित्रांमध्ये लटकी भांडणे होतात पण काही नाती, माणसे आवर्जून जपावीशी वाटतात,,त्यांच्यापुढे आपले सर्व अहंकार गळून पडतात कारण त्यांचे आयुष्यातील असणे त्या अहंकारापेक्षा फार फार मौल्यवान असते. काही जणांशी सलोखा वाढतो ,ओळख वाढवावीशी वाटते आणि मग त्यांच्यासोबत घालवलेले क्षण  ..सगळ आयुष्यच बदलून टाकतात..ते भेटणे ,ते बोलणे , ते पाहणे सार काही मनास भिडत जाते आणि मग त्याच्या किंवा तिच्याशिवाय आपले अस्तित्वच जणू अधुरे राहते.

                काही माणसांचे अस्तित्व , त्यांचे विचार ,प्रभावी व्यक्तिमत्व आणि बोलण्याची शैली आपल्याला अंतर्मुख करते. बरेच वेळा आपण सहज बोलून जातो “ मी अमुक अमुक व्यक्तीला follo करते किंवा त्यांना मानते ”, यातून अभिप्रेत असलेला अर्थ हाच आहे कि आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाने , विचारांनी प्रभावित झालेले असतो आणि म्हणूनच त्यांच्या विचारांचे अनुकरण करू पाहतो.
                आयुष्यात नाती जपताना कधीकधी आपली आणि समोरच्याचीहि दमछाक होते. काही व्यक्तींचा, त्यांच्या असण्याचा इतका त्रास असतो कि बरेचदा आपण मनाविरुद्ध त्यांना आपल्या पासून दूर ठेवतो.

                  काही माणसात आपल्याला आपलेच प्रतिबिंब पाहायला मिळते त्यावेळी “ तू अगदी सेम २ सेम माझ्याचसारखी किंवा माझ्याचसारखा आहेस ” असे शब्दोच्चार नाही निघाले तरच नवल.

                एखाद्याबरोबर मैत्रीची वीण इतकी घट्ट होते कि त्या ओळखीचे जन्मोजन्मीच्या नात्यात रुपांतर व्हायला वेळ नाही लागत. काही आपल्याला समृद्ध करतात तर काहीना आपण...काही ओळखी आपल्याला आयुष्यात उंचच उंच भरारी घ्यायचे बळ देतात..“ मी आहे ” हा एकच दिलासा देणारा शब्द आपल्याला आयुष्यातील अनेक चढउतार आणि आव्हाने पेलायचे सामर्थ्य देतो.तर अशीही आपल्या भोवती रुंजी घालणारी असंख्य पाखरे ज्यांच्यामुळे आपला आयुष्याचा प्रवास सुखकर होतो ,त्यांचा आदर करणे ,त्यांना जीवापाड जपणे हे आपले परमकर्तव्य आहे.

                 मंडळी, आकाशात स्वच्छंदी विहार करणारी पाखरहि कायम थव्याने विहार करत असतात किबहुना ह्यातून निसर्गही आपल्याला “सर्वांनी एकत्र राहा” हाच संदेश देत असावा.

                 ह्या थव्यासोबत नाही राहिलो तर आपण एकलकोंडे ,एकाकी होवून जातो आणि मग एकटेपणातून निर्माण होणारे शारीरिक आणि प्रामुख्याने मानसिक आजार आपल्याला हतबल करतात . हल्ली परदेशस्थ भारतीयांची संख्या वाढत आहे ,मुले नोकरी निम्मिताने परदेशी जातात आणि तिथलीच होवून जातात. मग आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांचे वयस्कर आईवडील ज्यांच्या पंखात आता कुठलीच झेप घेण्याचे बळ उरलेले नसते त्यांना अतिशय एकटेपणा येतो. अश्यांना सोबत करून ,त्याना त्यांचे वय विसरून जगण्याची प्रेरणा देणे हे आपले सर्वांचेच उद्दिष्ट असायला हवे नाही का?

                  माणसे मग ती कशीही असोत त्यांच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे हेच शेवटी सत्य आहे. पैशांनी श्रीमंत होणे खूप  सोपं आहे पण घट्ट विणलेल्या नात्यांनी आयुष्य समृद्ध करणे कठीण...पण अशक्य नाही ..माझ्या आयुष्यात अशी असंख्य माणसे माझ्या जगण्याला निम्मित झाली तशीच सर्वांच्या आयुष्यात येवुदेत आणि प्रत्येकाचे आयुष्य परिपूर्ण होवूदे हीच प्रार्थना.

माझ्या आयुष्यातील सर्व पाखरांना ,त्यांच्या असण्याने माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला आणि आयुष्याचा एक सोहळा झाला , हा लेख समर्पित.....

अभिप्राय कळवा

antarnad18@gmail.com