|| श्री स्वामी समर्थ ||
मंडळी ,आपल्या घरात मुलांना चातुर्मास म्हणजे काय ? असे
विचारले तर आपणच चक्रावून जाऊ अशी उत्तरे मिळतील. त्यात मुलांची तरी काय चूक म्हणा
,कारण कलियुगात अनेक कारणांनी ह्या गोष्टी आता काळाच्या पडद्याआड जातील कि काय अशी
भीतीच आहे. आपले सण , रूढी ,परंपरा जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे . नुसते
तेव्ह्डे करून न थांबता त्याचा वारसा आपल्या पुढील पिढ्यांकडे सुद्धा सुपूर्द केला
पाहिजे. आपल्या पुढील पिढ्या ह्या गोष्टी किती उत्चाहाने करतील ह्याबद्दल बरेचदा
शंका व्यक्त केली जाते ,म्हणूनच आपण करत असलेली व्रत ,वैकल्ये ,उपवास आणि तत्सम
गोष्टींचा आपल्या जीवनाशी, मानसिकतेशी आणि आरोग्याशीही किती जवळचा संबंध आहे
ह्याचे महत्व त्यांना पटवून दिले पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट डोळसपणाने केली पाहिजे
हेही महत्वाचे .कधीकधी एखाद्या गोष्टीची अर्धवट माहिती असताना आपणही आंधळेपणाने
काही गोष्टी करत असतो म्हणून डोळसपणा महत्वाचा . आता हेच पहा संध्याकाळी अंधार
झाल्यावर नखे कापू नये हे आईने, आजीने सांगितले म्हणून आपणही आपल्या मुलांना
सांगतो .पूर्वी आजच्या इतके शहरीकरण झाले नव्हते ,गावातून वीज नव्हती आणि अंधार
झाल्यावर घासलेट चे दिवे ,मेणबत्या लावल्या जात ,त्याचाच काय तो मिणमिणता प्रकाश
,मग अश्या तुटपुंजा प्रकाशात नखे कापताना कुठे लागू नये म्हणून ती दिवसा कापावीत
हा उद्देश पण आपण उगीचच त्याला परंपरा वगैरेची वेष्टने देतो आणि मग नवीन पिढी
विश्वास ठेवत नाही ह्याची खंत करतो .
चातुर्मास हा आषाढी
म्हणजेच देवशयनी एकादशी पासून सुरु होतो आणि कार्तिकी एकादशीस समाप्त होतो. आषाढी
एकादशीस देव निद्रिस्त होतात म्हणून त्यास देवशयनी एकादशीही म्हणतात पुढे कार्तिकी
शुद्ध एकादशीस देव उठतात असा हा चातुर्मास. देवानाही विश्रांती हवीच कि पण मग आता
भक्तांनी करायचे काय ?
भक्तांनी ह्या काळात आपल्या आराध्याची जास्तीत जास्त सेवा
करायची . परमात्मा झोपला म्हणून
आपण हतबल न होता हा काळ त्यांच्याच आराधनेत व्यतीत करायचा .अहो आपल्याला सुद्धा विश्रांती हवी म्हणून
रात्र आणि दिवस दिले आहेत . शरीर थकते म्हणूनच रात्री विश्रांती घेतली कि प्रत्येक
अवयव पुन्हा ताजातवाना होवून काम करू शकतो.
शेतीची कामे- पेरणी |
आपल्या देशाला
सांस्कृतिक परंपरा लाभली आहे .देवधर्म ,व्रते ह्यांची पाळेमुळे
खोलवर रुजली आहेत .मुळात आपला देश हा शेतीप्रधान देश. पावसापूर्वी शेतकरी पेरणी , लावणी अशी शेतीची
कामे हातावेगळी करतात आणि मग पुढे अश्विन महिन्यात त्याची कापणी होते .मग मधला काळ
हा जास्तीतजास्त देव धर्मासाठी वापरला जात असे.
श्रावणात निसर्गचक्र फिरते आणि वसुंधरा पावसात न्हावून
निघते ,अश्यावेळी मग घराबाहेर पडणे कमीच होते, कामेही कमी होतात
त्यामुळे शरीराचे चलनवलन कमी होते, पचनसंस्था मंद होते ,अश्यावेळी आपल्या
आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक म्हणून वातूळ पदार्थ वर्ज आणि अतिशय हलका आहार
घेणे इष्ट ठरते . ह्या दिवसात म्हणूनच उपवास आरोग्यदायी ठरतात. अशी वैज्ञानिक बैठक
ह्यामागे आहे .
गजर टाळ मृदुंगाचा |
ह्या चार महिन्यात करायचे काय म्हणून मग शेतकरी वर्ग एकत्र
येवून भजन , कीर्तन ,व्रत
वैकल्ये ,उपवास ह्यात वेळ घालवतात . देवधर्मही घडतो आणि वेळही सत्कारणी
लागतो . सर्वांनी ह्या उपक्रमासाठी एकत्र येण्याचे ठिकाण प्रामुख्याने गावातील
देवळे . साहजिकच देवाची उपासना , एकत्र जमून
ढोलकी ,वाद्यांच्या गजरात आरत्या ह्याला उधाण येते. मग अनेकांना
आपल्या अंगी असलेल्या कला ,जसे एखादे
वाद्य वाजवणे , प्रवचन करणे , सादर करण्यास हक्काचे व्यासपीठ मिळते .त्यानिम्मित्ताने
सामाजिक उपक्रमात सर्वांचा सहभाग होतो .जनमानसातील संबंध घट्ट होतात ,सणांमुळे माणसे जवळ येतात. अश्याप्रकारे चातुर्मास उदयास आला
असावा. त्यात आलेल्या उत्सवांमुळे सर्वत्र आनंदी वातावण तयार होते आणि ह्यामुळे
क्षणभरासाठी प्रत्येक जण आपले दुखः ,यातना
विसरतो आणि साधनेत रममाण होतो .विधात्याने प्रत्येक गोष्ट चपलख बसवली आहे ,आहार विहार ,रुतुचक्रे
सर्वच त्याचा योग्य तो उपयोग आणि सन्मान ठेवलाच पाहिजे.
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
antarnad18@gmail.com