Monday, 15 July 2019

अजि सोनियाचा दिनु

|| श्री स्वामी समर्थ ||


मी गेलो ऐसे मानू नका                              हम गया नही जिंदा है



       प्रपंच करावा नेटका, पण तो करताना जर त्याला गुरूसेवेचा परीस स्पर्श लाभला तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही हा प्रत्यक्ष अनुभव मी गेले कित्येक वर्षे घेते आहे. माझ्या घरी दीड दिवसाच्या गणपतीची यथासांग पूजा ह्या व्यतिरिक्त फारसे देवदेव करणारे कुणीच नाही . पण माझ्या सासूबाई कै. उषाताई ह्यांच्यामुळे मला 1999 मध्ये शेगावला जाण्याचा योग आला आणि जीवन गजाननमय होवून गेले. इतके वर्ष सातत्याने महाराजांच्या सेवेचा लाभ मिळणे हीच त्यांची असामान्य कृपा मी समजते. पुढे २०१३ मध्ये अक्कलकोटला जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून ह्या दोन्हीही गुरूंच्या सेवेने माझ्या जीवनास खरा अर्थ प्राप्त झाला , हे पुर्वसंचीता शिवाय होणे नाही हे नक्की
वटवृक्ष..अक्कलकोट समाधी मंदिर


आज गुरुपोर्णिमा. गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला खरतर मला शब्दच सापडत नाहीत कारण ह्या अलौकिक शक्ती आपल्या आकलनाच्याहि पलीकडे आहेत. त्यांचे नित्य स्मरण ,मानसपूजा आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर जीवन व्यतीत करणे हेच आपले इतिकर्तव्य आहे असे मी समजते . आज मागे वळून पाहताना वाटते कि महाराजांनी मला काय दिले ? तर सर्वप्रथम त्यांनी मला स्वतःच्या चुकांची जाणीव करून दिली . आपण रोज कुठेना कुठेतरी चुकतच असतो ,कुणालातरी शब्दाने ,मनाने दुखवत असतोच .इतरांपेक्षा वेगळे ,शहाणे समजत असतो आणि ह्यालाच म्हणतात “ अहंकार ”. आपल्यात षडरिपू ठासून भरलेले आहेत .कितीही करा आपला अहंकार जाता जात नाही . एखाद्या संपूर्ण दिवसाचे अवलोकन केले तरी जाणवेल कि प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःचे महत्व अबाधित ठेवतो. मी हे केले आणि मी ते केले हे शब्द सर्वश्रुत आहेत . आपली ह्या “ मी ” शिवाय बात नाही आणि ह्या “ मी ” पासून सुटकाही नाही . म्हणूनच अध्यात्माची कास धरणे आपल्याला क्रमप्राप्त आहे किबहुना हे जितके लवकर करू तितके जीवन सुखप्रद होईल ह्यात शंकाच नाही कारण “ मी ” ला दूर केल्याशिवाय गुरुचरण लाभणार तरी कसे?


शेगाव श्री गजानन महाराज मंदिर

अध्यात्माचा मार्ग खचीतच सोप्पा नाही .इथे “ पी हळद हो गोरी ” हे समीकरण लागू पडत नाही आणि हीच ह्या मार्गाची खरी मेख आहे. अध्यात्म आणि गुरुसेवा आपल्याला संयम शिकवते. आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि एकदा त्याची सवय झाली कि मग प्रथम स्वतःच्या चुका दिसतात आणि त्या निरपेक्षपणे स्वीकारण्याची, त्याची पुनरावृत्ती न करण्याची सवय लागते . आपण केलेली नित्याची सकाळची पूजा ,साधना आपल्या उर्वरित दिनचर्येत दिसली नाही तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. नामस्मरण , ध्यानधारणा , पोथीचे पारायण , प्रदक्षिणा अश्या अनेक माध्यमातून आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करत असतो. कालांतराने आपल्यातही अमुलाग्र बदल होत जातो . आपल्या प्रत्येक कृतीवर महाराजांचे लक्ष्य आहे हि भावना मनात असते आणि त्यामुळे दुष्कृत्ये घडत नाहीत किबहुना ती घडू नयेत हि अपेक्षा असते . आपण फार साधी माणसे आहोत. प्रापंचिक जीवनात आपल्याला अनेक संकटे बेजार करतात आणि मग अश्यावेळी आपण निराश होऊन  गुरुचरणी धाव घेतो. गुरुसेवा कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाहीत पण प्रत्येक गोष्टीत महाराजांना वेठीस न धरता प्रयत्नांची कास धरावी .सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि त्या घडाव्यात असा अट्टाहास हि असू नये. महाराज त्रिकालज्ञानी आहेत त्यामुळे आपली एखादी इच्छा भविष्यात आपल्यालाच त्रासदायक होणार असेल तर ते ती कशी पूर्ण करतील ? त्यामुळे महाराज जे करतील त्यातच आपले हित आहे हे जाणून आपली इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करावी. दासगणू विरचित, अत्यंत रसाळ असा श्री गजानन विजय ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा ठेवाच आहे जणू . २१ अध्यायाची शिदोरी आपल्याला जीवनातील मुल्ये शिकवते. पारायण करताना डोळ्यासमोर  शेगाव उभे राहते. महाराजांच्या मठास प्रदक्षिणा घालण्यास अनन्यसाधारण महत्व आहे . अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री जावून पोथ्या , महाराजांचे फोटो असणार्या अनेक गोष्टींचा संग्रह करतो पण त्याहीपेक्षा त्यांचे घर हृदयात करणे हे सर्वात महत्वाचे आहे ,आपल्या अंतर्मनात ते किती खोलवर उतरले आहेत ,आपल्याला ते किती समजले आहेत हे महत्वाचे,हे जर आपल्याला समजले तर आपली जीवनरूपी नौका पैलतीरी जाणार ह्यात शंकाच नाही.

गजानन महाराजांचे लाडके गणराज

अगदी लहानसहान गोष्टीनी आपण भयभीत होतो , हतबल होतो आणि महाराजांना वेठीस धरतो. कश्यासाठी ? माझा मुलगा चांगल्या मार्कांनी पास होवूदे ..आता ह्यात महाराज काय करणार ? त्याने उत्तम अभ्यास केला असेल तर तो नक्कीच पास होणार ,पटतंय ना? जरा काही खुट्ट झाले कि महाराजांना नवस बोललाच म्हणून समजा, स्वतः कुठलाही प्रयत्न न करता काहीच हाती लागणार नाही. पण आपल्याकडून संपूर्ण प्रयत्न केल्यावर मग महाराजांना हक्काने ,प्रेमाने साद घातली तर ते आपल्या लाडक्या भक्तांसाठी धावत आल्याशिवाय राहत नाहीत ह्याची प्रचीती आजही येते.
पण उठसुठ प्रत्येक अडचणीत प्रयत्न न करता महाराजांना नवस बोलणे (अर्थात तो पुढे पूर्ण होईल ह्याची कसलीच शाश्वती नाही )  हे खरच उचित आहे का? त्यापेक्षा त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत राहणे आणि आपले भोग भोगूनच संपवणे ह्यासारखे शहाणपण नाही. स्वामीनी भक्तांना आश्वासन दिले आहे कि “ अशक्य हि शक्य करतील स्वामी ” पण ते त्यांना वाटले तर. प्रत्येक गोष्टीत माप आपल्याकडेच कसे झुकेल ? दुसर्या कुणालातरी दुखवून स्वामी आपली झोळी कशी भरतील ? कारण ते तर सर्वांचेच आहेत. म्हंटलेच आहे ना “ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ”. दासगणुनी संपूर्ण गजानन विजय ग्रंथात पदोपदी अत्यंत सुरेल रचना केल्या आहेत जसे “ संतांच्या जेजे येयील मनी ते ते येयील घडोनी , भरोसा त्यांच्या चरणी ठेवूनी स्वस्थ राहावे ”, “ श्री गजानन लीलेचा पार ना कधी लागायचा ,अंबरीच्या चांदण्याचा हिशेब ना कोणा लागे कधी ” .अश्या ह्या ओव्यांनी भरलेल्या ह्या रसाळ .अद्भुत ग्रंथाचे वाचन करताना अश्रूंच्या धारा वाहू लागल्या नाही तरच नवल.

गुरु योग्य असेल तर गुरुसेवा कधीच वाया जात नाही.पण गुरु कश्यासाठी करायचे हेच कित्येकांना समजत नाही असे दिसते . कित्येक वेळा मला गुरु करायचे आहेत ,कसे करायचे ? असे प्रश्न वाचनात येतात. भौतिक सुखांच्या लालसेने कुठल्याही गुरूंची सेवा निष्फळ ठरेल. अमुक एक गोष्ट मिळवण्यासठी गुरुसेवा करू नये ती होणारही नाही .गुरुसेवेचा उगम हा गुरुंवरील उत्कट प्रेम ,मनातील तळमळ आणि प्रचंड विश्वास ह्यातच आहे .गुरुसेवेने मिळते ते आंतरिक समाधान ,जगण्याची लढण्याची उमेद .पण आपण भौतिक सुखाच्या लालसेने जपमाळ हाती घेतो . खरतर सतत काहीनाकाही त्यांच्याकडे मागुच नये . न मागताही वेळ आली कि महाराज सर्वच देणार आहेत ह्याची खात्री उरी असावी ,संतसेवा करत राहावी आणि त्यात कधीही संदेह ,कल्पविकल्प ,अविश्वास नसावा. कित्येक वेळा आम्ही इतके करतो तरी आम्हाला काहीच फळ मिळत नाही असली विधाने ऐकायला मिळतात. प्रत्येकाने आपले कर्म प्रथम तपासून पाहावे ,आत्मपरीक्षण करावे मग आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतात . संचित , क्रियमाण आणि प्रारब्ध ह्यातून आपली सुटका नाही पण ते भोगण्याची शक्ती गुरुसेवा नक्कीच प्रदान करते . आपल्याला सगळ्याची घाई असते . दोन दिवस जप झाला नाही तर लगेच आपला संयम जातो आणि आपण पूर्वपदावर येतो . संयम ठेवणे हीच तर अध्यात्माची पहिली पायरी आहे . महाराज रोज आपली परीक्षा घेणार अगदी प्रत्येक क्षणी पेपर लिहायला बसवणार पण कधीतरी त्यात आपण नक्कीच पास होणार हा आपला विश्वास असला पाहिजे. घ्या किती परीक्षा घ्यायची ती पण आपले चरण सोडणार नाही असे जो म्हणेल तोच तरेल .


हम गया नही जिंदा है 
आपल्यातील “ मी ” जितका दूर जाईल तितके स्वामीचरण जवळ येतील. महाराजांनीही सांगितले आहे रोज पोथ्या घेवून बसू नका उत्तम कर्म करत राहा .वर्षातून एकदाच पारायण करा आणि उरलेले ३६५ दिवस ते आचरणात आणा. आपण काय करतो ? सुज्ञास सांगणे नलगे. गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायात महाराज उष्ट्या पत्रावळीवर जेवले त्यावरून त्यांना सूचित काय करायचे होते ? टाकून दिलेल्या भोजनावर सुद्धा एकजण जेवू शकतो . आपण काय करतो पारायण करतो .दुसर्या दिवशीपासून पुन्हा येरे माझ्या मागल्या ..रोज घरात अन्न , फळे कित्येक गोष्टी कचर्याच्या डब्यात जातात . मग त्या परायणातील नेमके काय समजले आपल्याला ?  समजले तरी वळले का? अगदी सणासुदीलाही आपल्याकडून घरातील वृद्धाना बोल लावले जातात मग आपल्या आणि आपल्या पुढील पिढ्यांचे सण खरच आनंदात जातील का? बघा आपले उत्तर आपल्यालाच मिळेल ?म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे अध्यात्माचा मार्ग अत्यंत कठीण आहे. गुरुकृपा होण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी नीतीने आचरण केले पाहिजे. गुरुकृपा वगैरे ह्या फार दूरच्या गोष्टी आहेत त्याआधी अध्यात्मातील अनेक कसोट्यांवर आपण खरे उतरलो पाहिजे. गुरुसेवा करत असताना एक दिवस असाही येतो किबहुना तो महाराज आणतात कि जिथे लोक आपल्या सेवेकडे पाहून आपल्यालाच नमस्कार करू लागतात . हाच क्षण महत्वाचा कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात . आपण ह्या मोहास बळी पडलो आणि एक भक्त आहोत हे विसरून स्वतःला महाराज समजू लागलो कि त्या क्षणापासून आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक अधोगती सुरु झालीच म्हणून समजा. आपण एक सेवेकरी आहोत  ह्याचे भान प्रत्येक क्षणी असणे गरजेचे आहे, चरणास घट्ट मिठी मारायची ती महाराजांच्या आपल्या नाही ह्याची जाणीव आपल्याला असायलाच हवी आणि ती  इतरांना नसली तर ती आपण करून द्यायला नको का? तसे झाले नाही तर आपला  विठोबा घाटोळ (गजानन विजय अध्याय ३) होण्यास वेळ लागणार नाही. 


प्रसाद हा मज द्यावा देवा सहवास तुझाची घडावा देवा 


महाराजांनी भक्तांना सांगितलेच आहे “ माझा फोटो ठेवून बाजार मांडू नकोस ”. स्वामी समर्थांचा तारक मंत्र नावाप्रमाणेच भक्तांना तारतो . मनाच्या गाभ्यातून ,तळमळीने त्यांना हाक मारली तर महाराज आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात . अनुभव घेवून पहा. महाराजाना काहीही नको आहे आपल्याकडून , त्यांना आस आहे ती खर्या भक्तीची .प्रपंचात आपण किती गोष्टीचा संचय करतो, ह्या सर्व गोष्टी इथेच ठेवून अखेरच्या प्रवासाला जायचे आहे हे माहित असूनही .म्हणूनच स्वामी भक्तांना सांगत असत अरे किती साठवशील ? हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ,जितके साठवशील तितकी इच्छा वाढतच जाईल . त्यापेक्षा सेवा कर पण निस्वार्थीपणे .मेवा खाण्यासाठी नाही. सेवा केलीस तर जीवन समृद्ध होईल आणि सद्गती मिळेल .
अध्यात्माचा प्रवास सोपा नसला तरी ज्याने त्याची अवीट गोडी चाखली त्याचे जीवन सार्थकी लागतेच. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनाहि अध्यात्मिक बैठक असेल तर वाचासिद्धी प्राप्त होते आणि अचूक निदान करण्याची क्षमताही. नावे आणि रुपेही जरी वेगळी असली तरी हि शक्ती एकच आहे आणि त्यावर शंका घेणारा दुर्दैवीच. ह्या संत विभूतींनी जरी देह ठेवला असला तरी, प्रचीती आणि दृष्टांत देवून त्यांच्या अमरत्वाची ग्वाही आजही मिळतेच आहे. स्वामी समर्थांचे भक्तांना आश्वासन आहे “ हम गया नाही जिंदा है ” आम्ही कुठेही गेलो नाही इथेच आहोत आणि जो अनन्य भावाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवेन. त्याचप्रमाणे शेगाव निवासी संत गजानन महाराजांनीही “ मी गेलो ऐसे मानू नका ,भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका ,मी आहे येथेच
” असे अभिवचन दिले आहे
.आज खरच गहिवरून आले आहे कारण मला त्यांनीच जीवनात उभे केले आहे. पहिल्या क्षणापासून मला ते देतच आले आहेत. ह्या विलक्षण आणि असमान्य शक्तींना माझा साष्टांग दंडवत. त्यांना आपल्याकडून काहीच नको आहे ,हवे आहे ती खरी भक्ती. मी कित्येक वेळा जप,पोथी वाचन काहीच करत नाही कारण कधीकधी प्रापंचिक गोष्टीत जास्ती लक्ष्य द्यावे लागते. आपली साधना आपल्यापाशीच, ती कुणाला दाखवण्यासाठी आणि खोट्या अहंकाराचे ढोल वाजवण्यासाठी करणे कधी जमलेच नाही . जेव्हा जेव्हा सेवा करायची मग तो जप असो कि प्रदक्षिणा किंवा वाचन ते सद्भावनेने आणि अंतकरणाने तरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचते . 



अक्कलकोट ...अन्नछत्र..


मानसपूजा करतानाही महाराज दृष्टांत देतात ,पण प्रामाणिक भावना मनात असायला हवी आणि खर्या भक्तांची आस ते ओळखतातच. त्यांच्याकडे काहीच मागायचे नाही त्यांना सगळे माहित आहे. मला इतकेच समजते कि आपण जितके साधे सरळ सोपे जीवन जगतो अगदी तशीच सहजसुंदर सोप्पी साधी निर्मळ मनाने केलेली भक्तीच महाराजांना अपेक्षित असते आणि तीच त्यांना भावते .दिखावेपणा , ढोंगीपणाने सद्गुरुप्राप्ती केवळ अशक्य. भक्तांला नेहमीच गुरुचरणांची आस असावी .ज्याला गुरु लाभले आणि गुरुसेवेची संधी लाभली त्यांचा जन्म सार्थकी लागला .मला गुरुसेवेची संधी मिळाली आणि जीवन कृतार्थ झाले .असे कित्येक लेख लिहूनही गुरूंच्या बद्दलच्या माझ्या भावना मला आजवर कधीच सांगता आल्या नाहीत हे माहित असूनही हा लेखनप्रपंच.आज गुरुपोर्णिमा ..आज त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्यायचे तरी काय कारण आहे हे सर्व त्यांचेच तर आहे. पण तरीही आजन्म अखंड नामस्मरण करत त्यांच्या नामाचा प्रसार करत राहणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. .शेवटी एकच मागणे आहे “ माझी राखा तुम्ही लाज ,आहे एक मागणे आज. अपराध माझे गुरुराया आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी .



      गुरुविणा जीवनात कोण येयील कामी , खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी |
        जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती , गुरुपदी घेवू चला क्षणभर विश्रांती ||



गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll



सर्वाना गुरुपोर्णिमेच्या मनापासून शुभेछ्या.


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.