|| श्री स्वामी समर्थ ||
मौन ? छे छे हे काय
भलतच , काहीही करायला सांगा पण गप्प बसायला सांगू नका कारण बोलणे हा आमचा
जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही प्रत्येक क्षणी बजावणारच . गमतीचा भाग सोडा पण
खरच आहे कि नाही हे आपल्या सर्वाना लागू ? सगळे गालातल्या गालात हसत आहेत . अहो
आपल्या भावना व्यक्त करायला ,संवाद साधायला बोलणे तर हवेच कि ,फक्त ते प्रमाणात आणि
मुद्देसूद , विषयाला धरून हवे हा मुद्दा आहे. ध्वनीप्रदुषणाबद्दल अनेक लेख आपणा वर्तमानपत्रातून
वाचत असतो . आपल्याकडील अनेक प्रदुषणा
पैकी सर्वात महत्वाचे आणि आवर न घालता येणारे प्रदूषण म्हणजे “ ध्वनी प्रदूषण ”. शहरात
तर गाड्यांच्या होर्न चे प्रदूषण प्रमाणाबाहेर आहे.
स्वयपाकघरात काम करत असताना हातातून साणशी जरी खाली पडली तरी तिचा आवाज सहन होत नाही. घरात TV सुद्धा मोठा झाला तर घरातील मोठ्या मंडळींचे डोळे मोठे होतात . अर्थात बरेचदा काही जेष्ठ मंडळीना कमी ऐकायला येते त्यामुळे तेच TV मोठा ठेवतात हा अपवाद असू शकतो . घराबाहेर पडले कि ध्वनीचे, आवाजाचे साम्राज्य सुरु होते .वाहने , रस्त्यावरील विक्रेते , ट्राफिक , रिक्षावाले , भाजी मंडई .न संपणारी यादी आहे. ट्रेन मध्ये तर आम्ही बायका इतके बोलत असतो जसे काही नाही बोललो तर आम्हास TC येवून दंड ठोठावेल. गप्प राहणे ,कमी बोलणे आणि कधी काय बोलणे किंवा न बोलणे हे सर्व ज्याला जमले तो जिंकला .उदाहरण द्यायचे झाले तर. हळदीकुंकू किंवा इतर कुठल्याही ठिकाणी समारंभास अनुपस्थित व्यक्तीबद्दल बरीच चर्चा रंगलेली असते ,पण सगळेच त्यात भाग नाही घेत . सगळे सगळ्यांना माहित असते पण काही गप्प राहून “ मी त्यातला नाहीच ” असे राहून “ काय सांगता ?” असा प्रश्नार्थिक चेहरा ठेवून त्यातून सहज निसटतात . सगळ्यात राहून आपला रंग वेगळा हे त्यांना जमते. सोसायटीच्या मिटिंगला तेच .नेहमीची ४-५ डोकीच बोलणार आणि बाकीचे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थितप्रद्न्य अवस्थेत श्रोत्याची भूमिका बेमालूनपणे निभावणार आणि कुठलाही वाईटपणा घेणार नाही . हेच चित्र सर्वत्र असते. तर हे सर्व असे आहे .
सारांश सतत कानावर पडणारा हा आवाज,ध्वनी अनेक आजार निर्माण
करणारा असतो. सर्वात मोठा आजार म्हणजे डोकेदुखी. कुठेतरी शांत ठिकाणी निघून जावेस
वाटतंय अशी वाक्य म्हणूनच ऐकायला मिळतात .
असो विषयांतर नको. आपल्याला २ मीन सुद्धा मौन पाळता येत नाही मग आपले ऋषीमुनी कसे वर्षानुवर्ष मौन पाळून जप ,साधना करत असत याचा विचार करुया . मौन पाळण्याचे अनेक फायदे आहेत. कमी बोलण्याने आपण आपली शक्ती वाचवतो. बोलण्याचा वेळ विचार करण्यात सत्कारणी लागल्या मुळे आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतात . आपल्या उतावळ्या स्वभावावर थोडा धरबंद येतो. कमी आणि चुकीचे बोलणे टाळल्यामुळे माणसे कमी दुखावली जातात . मौनव्रताचा फायदा म्हणजे आपण आपल्याच विश्वात रममाण असतो ते जरा बाहेर येवून दुसर्याचा विचार करायला शिकतो .मन शांत होते , अनेक गुंते सुटतात, मार्ग सापडतात आणि जीवन सुखकर होते. सतत चालू असणार्या जिभेस आराम मिळतो.व्यर्थ जाणारी शक्ती सत्कारणी लावता येते .
खरतर आपल्या भावना सांगण्यासाठी नेहमीच शब्दांची गरज नसते . एकदा माधवराव
पेशव्यांच्या मातोश्रींनी रमाबाईना सांगितले ,” आपण स्त्रिया नुसत्या वाट पाहत
असतो नाहीतर टिपे गाळत असतो. सर्वाना आपल्या डोळ्याच्या धाकात ठेवायला शिकले
पाहिजे. ” डोळ्यांनी बोलण्याचे कसब आपल्याला जमले पाहिजे .खरतर ती कला आपल्याला
उपजतच आहे फक्त त्याचा वापर अधिकांश रित्या केला पाहिजे. अनेक
ज्योतिषाना हि कला अवगत असणारच कारण त्यांच्याकडे येणारा जातकास काय बोलू आणि काय
नको असे होवून गेलेले असते ,प्रश्नांची सरबत्ती त्यामुळे आपोआपच मौनव्रताची साधना
घडत असते.
मौन ज्याला जमले तो आयुष्याची लढाई जिंकला . केल्याने होत
आहे रे आधी केलेची पाहिजे . चला “ श्रावणमास ” सुरूच आहे . सुरवात करुया
“मौनव्रतास ”.
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .
antarnad18@gmail.com