Sunday, 4 August 2019

“ शाश्वत आनंद ”

|| श्री स्वामी समर्थ ||


                          


आयुष्यात जसे योग्य आचारविचार , वागणे ,सामाजिक बांधिलकी अनेक गोष्टींचा सुयोग्य मेळ घालायला लागतो, अगदी तसेच त्याहीपेक्षा जास्ती आपल्या आरोग्याचा विचार करायला लागतो . ह्या सर्वाची एकत्रित होड बांधण्याची सुवर्णसंधी म्हणजे चातुर्मास . परमेश्वरी आराधना ,साधना ,व्रत, नामस्मरण करण्यासाठी चातुर्मासाच अतिमहत्त्वाचा .

हिंदू संस्कृतीत श्रावण मासास पवित्र मानले गेले आहे . उन्हाळा संपून सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे तप्त झालेली धरणी शांत होते आणि सृष्टीही विविध रंगानी कात टाकल्यासारखी फुलते .हे संपूर्ण वातावरण अध्यात्मिक साधनेस ,उपासनेस परिपूर्ण ,पोषक असेच असते . ह्या काळात सिंहावलोकन करून आपले गुणदोष स्वीकारूया आणि त्या दोषांचे परिमार्जन करुया . त्यासाठी परमेश्वरी आराधना ,भक्ती ह्यासारखा नामी आणि जालीम उपाय दुसरा नाही. सेवेअंती आपलीच आपल्याशी नव्याने भेट होईल हे नक्की.

यथासांग पूजन

ह्या उपासनेतून आपल्याला देणगी मिळेल ती “संयमाची ” . आयुष्यात जो संयम ठेवतो तोच जिंकतो .आयुष्यात अनेक चढ उतार ,नानाविध प्रलोभने येतात पण मनावर ,इंद्रियांवर ,आणि मुखत्वे जिभेवर जो संयम मिळवतो तो निश्चितच निरोगी आयुष्य जगू शकतो. चातुर्मासात अनेक लोक नानाविध संकल्प करतात .आपल्याला प्रिय असलेल्या भगवंतासाठी अनेक व्रतेही करतात .आपणही एखादा संकल्प नक्कीच करा पण तो दुसरे करतात म्हणून नाही तर स्वतःच्या मानस पटले तर आणि तरच आपण जे व्रत ,संकल्प करणार आहोत ते मनोभावे ,मनापासून केला तर फळ नक्कीच मिळणार पण त्याचबरोबर मी हे केले आणि ते केले ह्याची  वाच्यताही न करणे महत्वाचे . आपल्या आराध्यावर आपण संकल्प करून जणू काही उपकारच करत आहोत असा भाव जराही येवू देवू नये . मनी योजलेला संकल्प पूर्णत्वास नेण्याची विनंती, आर्जव भगवंतास करून संकल्प करावा . शेवटी आपला “ मी ” घातकच नाही का?
नामस्मरण 


आपली अध्यात्मिक प्रगती व्हावी , विचारांची बैठक नीट बसावी ,मन शांत व्हावे आणि शरीर आणि मनाची योग्य सांगड घालता यावी ह्यासाठी आपल्या जीवनशैलीत चपलख बसेल  झेपेल ,रुचेल आणि पटेल असा संकल्प केलात तर तो नक्कीच पूर्णत्वाला जायील.उगीचच कुणीतरी दुसरा करतो म्हणून मी रोज एक हजार जप करीन असे अजिबात करू नये .                                                         
चातुर्मासात आपल्या इष्ट देवेतेसाठी एखादा आवडीचा पदार्थ सोडवा किवा त्याचेच दान करावे ,ह्यातून आपण सोडून द्यायला शिकतो . काहीजण एक वेळेस जेवतात तर काही एकदा जेवून संध्याकाळी फलाहार घेतात . आपल्या प्रकृतीस जे झेपेल तेच करावे . सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी आणि आवश्यक तेव्हडेच बोलावे म्हणजे आपले जास्तीतजास्त लक्ष ध्यानाकडे, नामस्मरणा मध्ये केंद्रित होते. कमीतकमी बोलण्याने बोलण्यावरही नियंत्रण येते ,कुणाची निंदा अपशब्द आपोआपच टाळले जातात . सूर्यनमस्कार घालूनच दिवसाची सुरवात करावी .आजकाल आपल्या जीवन पद्धतीला हे मानवणारे नाही तरीही प्रयत्न करून एखादा दिवस मौनव्रत करावे आणि अनुभव नक्कीच शेअर करावा.  हॉटेल आणि मॉल मध्ये जेवणे आपले नित्याचेच झाले आहे त्याला पूर्णविराम देता आला तर उत्तमच कारण अशक्य काहीच नाही . आपली स्वतःची कामे स्वतःच करावी जसे आपले जेवणाचे ताट धुवून ठेवणे, कपडे धुणे ,घरातील  इतर कामे जी आपण इतरवेळी  नाही करत .काहीतरी दानधर्म करावा. 

सात्विकता


काही वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडता येत नाही मग त्यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीस किंवा गरजूस दर सोमवारी साखर किंवा धान्य दान करावे हे ,निसर्गाचेही देणे लागतो आपण त्याची जपणूक करणे हेही आपले कर्तव्यच आहे म्हणून तुळशीच्या रोपाचे दान करावे. एक उदाहरण झाले तत्सम काहीही करावे जे आपल्याला सुचेल. एखाद्या गरजू व्यक्तीस एकवेळचे तरी भोजन, शिधा द्यावा . एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणास मदत करणे हे तर पुण्याचेच काम. शक्यतो जेवणाच्या वेळा पाळाव्यात आणि अर्थातच सात्विक आहार घ्यावा. कुटुंबातील सर्वांनी दिवसातून एकवेळचे जेवण एकत्र करावे त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार होवून भावनिक बंध घट्ट होतात. आपल्या एखाद्या माहेरवाशिणीस आवर्जून जेवायला बोलवावे ,त्यानिम्मित्ताने तिला माहेरी येत येयील. नाहीतर हल्ली माहेर आणि सासर एकाच शहरात ,त्यात सर्वांच्या नोकर्या अगदी व्यस्त आयुष्य त्यामुळे येणेजाणे कमीच होते .कुणाचीही निंदा करायची नाही ह्याची मनात खुणगाठ बांधायची.

ग्रंथाचे पारायण

श्रावण महिन्यात जास्तीतजास्त “ श्रवण ” करावे. कानावर सतत काहीतरी चांगले विचार पडावेत ज्याचे चिंतन ,मनन व्हावे. त्यासाठी कीर्तन , भजन ,प्रवचन ऐकण्याची संधी सोडू नये . रोज आपल्या मनात असते पण ते प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी म्हणजे रोज चालणे ,धावणे ह्या गोष्टीना सुरवात करावी आणि त्यात सातत्य ठेवावे. तात्पर्य काय तर एखाद्या अश्या गोष्टीस सुरवात करावी जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणील. नामस्मरणाने परमेश्वरा समीप जाता येते आणि ईश्वरी कृपेची प्राप्त होईल. कुठल्यातरी धार्मिक ग्रंथाचे जसे  “ गुरुचरित्र ”, “ श्री साई चरित्र ”, “ श्री गजानन विजय ” ह्या ग्रंथांचे पारायण करावे.  सामुदायिक उपासनेस सुद्धा महत्व आहे त्यामुळे एकत्र येवून चक्रीपारायण करावे. आपल्या कुलस्वामिनीचा जप करून ,श्रीसूक्त म्हणावे . अनेकजण ह्या काळात नर्मदा परीक्रमाही करतात .वरील नमूद केलेल्या गोष्टींपैकी किमान एखादीतरी गोष्ट करून शाश्वत आनंदाची दालने खुली करावीत. ह्याहीपेक्षा आपल्याला काही चांगले सुचले तर तेही आचरणात आणावे. जे कराल त्यात सातत्य असावे.

थोडक्यात काय तर समर्पण म्हणजेच “चातुर्मास ”. 



लेख आवडला तर जरूर अभिप्राय कळवा.


antarnad18@gmail.com