|| श्री स्वामी समर्थ ||
पयोदधिधृतं चैव मधु च शर्कारायुतम |
पंचामृतं मयानीतं स्नानार्थ प्रतीगृह्यताम ||
कुठल्याही पूजेतील मुख्य उपचार म्हणजे “पंचामृत ”.
त्याशिवाय पूजा अपूर्णच .पंचामृत हे दुध ,दही ,तूप , मध आणि शर्करा एकत्र करून
केले जाते. ह्यातील प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ठ प्रमाण आहे. पंचामृतातील
प्रत्येक घटकास शास्त्रीय ,अध्यात्मिक कारणही आहे. पूजा म्हणजेच सात्विकता.
पंचामृत हे सात्विकतेचे प्रतिक आहे. ह्यातील दुध हे शुभ्रतेचे
प्रतिक आहे जे आपले चरित्र , जीवन शुभ्र
असावे हेच सुचवते. आपण नेहमीच चांगले कर्म करत राहावे ,पवित्र आणि शुद्ध मनाने
परमेश्वरी सेवेत राहावे. दुध हे वात्सल्या चे प्रतिक आहे. दही
हे स्नेहांकित आहे
,प्रवासास जाताना दही हातावर ठेवण्याची प्रथा आहे. दूर जाणार्या व्यक्तीचा स्नेह
दुरूनही राहावा हि त्यामागील भावना . दह्यात दुसर्याला बदलण्याची क्षमता आहे .
प्रवासास जाणार्या व्यक्तीने जायील तिथे आपल्या संस्कृतीचा प्रसार करावा . परदेशी
अनेक प्रलोभने असतात पण ह्या सर्व रंगात रंगुनही आपला रंग म्हणजेच आपली संस्कृती
,अस्तित्व टिकवून ठेवण्याचा उद्देश ह्यामागे आहे . ज्याप्रमाणे दही दुधाचे
परिवर्तन करू शकते त्याचप्रमाणे अल्पसंखेत असणारी चांगल्या विचारांची ,सद्विवेक
बुद्धी जागृत असणारी माणसे जगात परिवर्तन करू शकतात. आपल्याप्रमाणे दुसर्याला
सात्विक बनवणे हा उद्देश असणारे दही परमेश्वर चरणी म्हणूनच वाहिले जाते.
तूप दाखवी रूप हे अगदी खरे आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे,आपण एकटे एकटे नाही
जगू शकत. आपल्या भोवतीच्या प्रत्येक नात्यामध्ये मायेची उब ,स्निग्धता नसेल तर
जीवनातील रस निघून जातो .पण नात्यांमध्ये स्नेह ,वात्सल्य असेल तर आपण संकटांचे डोंगरही
पार करतो. म्हणूनच तुपातील स्निग्धता स्नेहाचे प्रतिक आहे. आजकाल आहारतज्ञ सुद्धा
रोज एक चमचा तूप खा असे सांगतात, आपल्या शरीरात ते वंगण म्हणून कार्य करते आणि
हाडांना बळकटी देते . बुटी पार्लर मध्ये सुद्धा घरच्याघरी पंचामृताचे फेशिअल
करायला सांगतात . पंचामृतातील सर्व गुणांमुळे त्वचा उजळते. तर अश्या ह्या बहुगुणी
तुपाचा समावेश पंचामृतात आहे.
मधात गोडवा आहे .आपण कित्येक वेळा एखाद्याच्या
बोलण्याचा उल्लेख मधाळ बोलणे असाही करतोच. पण नुसता गोडवा नाही तर मध शक्तिवर्धक
आहे. आयुर्वेदातील अनेक चाटणे हि मधातून घेतली जातात. आपल्याला सामर्थ्यवान बनायला
हे शक्तिवर्धक मध उपयुक्त ठरते . आजकाल पंचामृताचा साबण सुद्धा मिळतो.
सरतेशेवटी जिवनात अवीट गोडी निर्माण करणारी शर्करा म्हणजेच साखर. जीवनात गोडवा
नसेल तर जीवन बेचव, निरस होवून जायील . पण नुसतेच गोडगोड बोलणारी माणसे विनाशासाठी
कारणीभूत ठरतात. म्हणूनच “ दुग्द्शर्कारा “ हा शब्द प्रचलित आहे . जसे दुधात साखर
विरघळली तरच दुधाला गोडवा निर्माण करते त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीत आपला “ मी ”
जोवर पूर्णपणे मिसळून विरून जात नाही तोवर त्याची कृपा होणे निव्वळ कठीणच .
तर अश्या ह्या बहुगुणी पंचामृताच्या सेवनेने आपले आरोग्य उत्तम राहते.
आणि म्हणूनच ह्या पंचामृताचा अभिषेक प्रत्येक पूजेत अग्रभागी असतोच.
पंचामृताचे सर्वमान्य प्रमाण खालील प्रमाणे .
एक कप दुध , चार चमचे दही , दोन चमचे तूप , एक चमचा मध आणि एक चमचा साखर .
विशेष सूचना : घरच्या दुधाचे दही लावावे ,ऐन वेळी बाजारातून
अमूल किंवा अन्य पावडरीच्या दुधाने बनवलेले दही ह्यात वापरू नये .