||श्री स्वामी समर्थ ||
माणसाचे मन हे मोठे विचित्र आहे ,ते क्षणात सुखाच्या
शिखरावर जाते तर दुसर्या क्षणाला दुक्खाच्या खाईत जाते. ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे
आपल्या आयुष्यात सुद्ध सुख आणि दुक्ख पिंगा घालत असते. आपल्याला जीवनात अनेक माणसे
भेटत जातात . हि माणसे अनेक स्वभावाची असतात . त्यातील काही आपल्याशी जवळीक साधतात
तर काही कायम नुसती ओळखीचीच राहतात . माणसे हि आयुष्यातील खरी संपत्ती मानते मी
आणि म्हणूनच जर आपल्याला माणसे समजली ,त्यांचे स्वभाव समजले तर त्यांच्याशी कसे
वागायचे ह्याची सूत्रे समजतात आणि मग पुढे सगळेच सोपे होवून जाते . म्हणूनच माणसांचा
अभ्यास हवाच हवा. सकारात्मकता हि जीवन जगताना महत्वाची असते ती असेल तर आयुष्यातील
सगळे चढउतार आनंदाने पार होतात . अशी माणसे नेहमीच चांगला विचार करतात कारण
त्यांच्यात असतो तो आशावाद. ह्याउलट जराश्या संकटांनी हवालदिल झालेली माणसेही
असतात कारण त्यांच्यात असते ती नकारात्मकता . ह्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि
कुठलेही पाऊल टाकायला हिम्मत राहत नाही. लोभ ,मोह , माया , मत्सर ह्यापलीकडेही
चांगला विचार करता येतो हे त्यांना माहितच नसते . अश्या नकारात्मक प्रभावाखाली
असणार्या व्यक्तींचा AURA बिघडलेला असतो . सततच्या नकारात्मक विचारांच्या
प्रभावामुळे त्यांचे अस्तित्व सुद्धा नकोसे वाटते .अश्या व्यक्तींचा सहवास किंवा
संपर्क आपल्यातील सकारात्मकता बिघडवू शकतो हे नक्की.
तर अश्या ह्या सर्व व्यक्ती आणि वल्लींचा अभ्यास करुया.
ह्या अभ्यासात आपल्याला ज्योतिष शास्त्र नक्कीच मदतीला येते. आपल्या संपर्कात
येणार्या आजूबाजूच्या व्यक्तींचा , त्यांच्या वागण्याचा अभ्यास केला तर त्यांच्या
व्यक्तिमत्वाचा आपल्याला अंदाज येवू शकतो आणि मग त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा
ह्याचा अंदाज येतो.
तसे पहिले तर आपला पूर्ण दिवस सुद्धा अनेक आनंद ,व्यथा
घेवून येतो. प्रत्येक वेळी आपण चांगल्या मनस्थिती मध्ये असूच असे नाही .अश्या
मानसिक स्थितीत मग आपल्याला कुठलीच गोष्ट आनंद देत नाही किबहुना त्याचा आनंद आपण
घेवू शकत नाही त्याउलट उत्तम मानसिक स्थितीत आपण लहानसहान गोष्टीनी सुद्धा आनंदी
होतो .माणसाच्या शारीरिक गरजा आहेत तश्याच मानसिक गरजसुद्धा असतात . आपल्या
मनासारखे होते तेव्हा आपण खुश असतो हे ओघानेच आले पण मनाविरुद्ध घटना घडून सुद्धा
तारतम्य बाळगणे,मनावर ताबा ठेवणे हे कौशल्य ज्याला जमले तो जिंकला.
आपल्या इंद्रियामार्फत आपण सुख दुक्ख अनुभवू शकतो. आपली
मानसिक स्थिती चांगली नसेल तर कुठल्याही गोष्टीचा आस्वाद जसे उत्तम पदार्थाची चव
सुद्धा त्यावेळी आनंद देणार नाही. आपले मन सर्व काही भोगत असते. आपल्या मनासारख्या
घटना मनाला आनंद देतात तर मनाविरुद्ध विचार आपल्याला मनाला त्रास देतात .
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ,तो एकटा राहू शकत नाही
म्हणूनच पर्यायाने तो कळपाने राहतो आणि त्यातूनच कुटुंबव्यवस्था उदयास आली आहे.
आपल्या मनातील विचारांचे आदानप्रदान म्हणजेच संवाद होणे हि माणसाची मुलभूत गरज
आहे. कुणाशीतरी बोलले कि बरे वाटते ,मोकळे वाटते हा अनुभव आपण सगळे नेहमीच घेतो.
लोकांत मिसळून राहणे हि आपली गरज आहे. आपल्या चांगल्या कृतीला दाद देताना
वडीलधार्या मंडळींनी पाठीवरून हात फिरवला तर किती बरे वाटते. आपल्या चांगल्या
कामाची कुणी दखल घेवून चारचौघात त्याची स्तुती केली तर अंगावर रोमांच उभे राहतात
.आपले कौतुक करणारी , शाबासकी देणारी आणि प्रोत्चाहन देणारी मंडळी आजूबाजूला असली
कि आयुष्याच्या गाडीला वेग येतो . नवनवीन कल्पना सुचतात ,सकारात्मकता जागृत होते
आणि पर्यायाने मनासारख्या घटना घडल्याने आयुष्य आनंदी होते जगावेसे वाटते. म्हणूनच
माणसे हि अमूल्य संपत्ती जपलीच पाहिजे .आपल्या आवडत्या व्यक्तींशी संपर्कात राहणे
आपल्याला मनापासून आवडते. ज्यांच्याशी आपले जेमतेम जमते त्यांना घेवूनही आयुष्याचा
प्रवास करावाच लागतो त्यांना वगळून चालत नाही. नातेसंबंध टिकवायला कधी आपल्याला तर
कधी समोरच्याला तडजोड करावी लागते. कधीतरी आपल्याला आपल्याच कोशात राहायला आवडते म्हणजेच
एकांत प्रिय वाटू लागतो . कधीतरी शांत बसून आपल्याशीच संवाद साधला तर आपल्या चुका
आपल्याला सुद्धा उमगतात .वय कितीही पुढे गेले तरी आपल्याला प्रेमाची ,आपुलकीची गरज
भासतेच कदाचित उतार वयात शरीर थकलेले असते तेव्हा ह्याची जास्ती गरज असते. संसार
झालेला असतो , मुलानातवंडांच्या गोकुळात आपण असतो . अश्यावेळी कुणीतरी जवळ बसावे
आपले ऐकावे त्याचेही सांगावे अश्या शांत शांत क्षणांची गरज असते. आयुष्यात
प्रत्येक पायरीवर आपण स्वतंत्र उपभोगत असतो ,आपल्या पद्धतीने जीवन जगता आले पाहिजे
. आपल्या विचारांचा आणि कृतीचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असायला हवा , आपल्याला
मानसन्मान मिळाला पाहिजे ,आपले निर्णय आपलेच असले पाहिजेत तसेच जीवन जगताना असलेले
आपले स्वातंत्र अबाधित असले पाहिजे , परावलंबी जीवन नको ह्या सर्व भावना आपल्यात
असतातच आणि त्या पूर्ण झाल्या किंवा तसे जीवन आपल्याला जगायला मिळाले कि जीवनाचा
खरा आस्वाद आपल्याला घेता येतो. कुणीतरी सतत आपल्याला terms dictate करत राहणे
आवडत नाही आपल्याला.
आपल्यातील अध्यात्मिक जीवन जगणार्यांच्या गरजा वेगळ्या
असतात . त्यांना मनन ,चिंतन , साधना ह्यासाठी स्वतःचा असा वेळ हवा असतो त्यात
कुणाची लुडबुड नको असते. सतत शिकण्याचा ध्यास त्यांना आसतो त्यातून ते आपली
बौद्धिकता प्रगत करत असतात .त्यांच्या शिकण्याने त्यांच्यात नवीन उर्जा सतत
प्रवाहित राहते .जीवनात येणारी अनुभूती त्यांना प्रगल्भ करत जाते.
मनोरंजन , मित्रांशी गप्पा ह्यातून मिळणारा आनंद तसेच चालणे
, व्यायाम ह्याची गरज ह्या सर्व गोष्टी मनासारख्या होणे आवश्यक असते. आपले छंद
जोपासायला लागणारा वेळ मग त्यात वाचन असो अथवा घरातील बाग फुलवणे, एखाद्या मुकबधीर
मुलांच्या शाळेत शिकवून सामाजिक बांधिलकी जपणे किंवा आपले छंद जोपासणे हे त्या
त्या वेळी आवश्यक असते आणि ते पूर्ण करणे हि बाबा सुद्धा मन आनंदी करते.
मानसिक शारीरिक गरजा पूर्ण झाल्या तर तेच निरास जीवन छान
वाटू लागते. प्रत्येक वेळी ह्या गरजा वेगवेगळ्या असतात जे घरातील कामे संपवून
ठराविक लोकल धावपळ करून पकडली . जागा मिळाली म्हणून शांतपणे आपण बसलो आहोत पण
त्याचवेळी शेजारील व्यक्ती फोनवर जोरजोरात बोलत असेल तर आपली उरलीसुरली शांतताही
भंग होयील आणि आपला त्रागा वाढेल. त्यावेळी आपल्याला असलेली शांततेची गरज पूर्ण
होणार नाही .
अगदी खरे सांगायचे तर प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची अशी
space हवी असते. कधीतरी आपण आपली स्वतःची कंपनी सुद्धा njoy करतोच कि. व्यक्त होणे
हि सुद्धा आपली एक गरज आहे तसेच कुणीतरी आपल्याला विचारावे ,आपली मते ऐकावीत
,आपल्याला मोठेपणाही द्यावा ह्या सर्व गोष्टींचे अभिलाषी आपण असतोच.
आयुष्यातील transperancy महत्वाची असते. आयुष्यातील वयाच्या
वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक गरजा असतात आणि त्या पूर्ण होणे हि आपली माफक गरज असते.
ह्या सर्व गरजा पूर्ण होताना आपण सुखावतो .
ज्योतिषशास्त्रातील ग्रह , नक्षत्रे आपल्याला ह्या अभ्यासात
निश्चितपणे मदत करतात . आपल्याला प्रत्येक ग्रहाची मुलभूत कारकत्वे माहित आहेत .
ज्योतिष शास्त्र आणि मनुष्याची मानसिकता ह्याचा घनिष्ठ संबंध आहे आणि ग्रह आपली
मानसिकता दाखवतात . एखादी घटना घडली कि त्याचा उहापोह करण्यापेक्षा त्यामागील
कारणमीमांसा करण्याची म्हणजेच कुठली मानसिकता होती म्हणून एखादी घटना घडली हा
अभ्यास आवश्यक आहे.
चंद्रमा मनसो जातः . चंद्राला आईची उपमा दिली आहे. कारण
आईची माया चंद्र माणसात जागृत करतो. चंद्र प्रभावित व्यक्ती ह्या मायाळू किंवा
ममतेची गरज असणार्या असतात आणि म्हणून त्या सोशिक , शांत ,प्रेमळ असतात
.दुसर्यांवर सतत मायेचा वर्षाव करत असतात .चिडणे हा त्यांचा स्वभाव नसतो .
रवी हा अधिकार प्राप्तीसाठी उतावळा असतो , मान्यता , अधिकार
,पद भूषवणे हे त्याला आवडते . स्वतंत्र विचार आणि स्वातंत्र त्याला हवे असते आणि
स्वभावही हेखेखोर ,गर्विष्ठ असतो . मंगळ हा काहीसा उतावळा ग्रह ,सतर्क असतो कारण
त्याला नेहमी सुरक्षितता हवी असते. मनाविरुद्ध काही घडले कि आवडत नाही ,कुणाचे
ऐकूनही घेत नाहीत .
मिथुन रास हि सगळ्यात मिसळू वागणारी कारण संवादाची गरज
मिथुनेत खूप आहे त्यामुळे त्यांना लेखन ,बोलणे ह्या माध्यमातून सतत संवाद साधने
आवडते.
म्हणूनच ग्रह , नक्षत्रे ह्यांची तत्वे समजली तर समोरच्या
व्यक्तीवर कुठल्या तत्वाचा प्रभाव व्यक्तीवर अधिक आहे हे समजते आणि ह्या तत्वांनी
व्यक्तीमध्ये कुठल्या गरजा उत्पन्न केल्या आहेत हेही समजते.
चंद्र , लग्नेश ,लग्न ,लग्नातील ग्रह ,राशीस्वामी आणि रवी
ह्यातून आपली मानसिकता दर्शवतात .
अग्नीतत्व प्रधान व्यक्तीना स्वतंत्र हवे असते म्हणून
मनाविरुद्ध काहीही झाले कि उफाळून येतात . स्वातंत्र प्रिय , प्रतिष्ठा , मानमरातब
, कौतुक , सन्मान ह्याचे अभिलाषी असतात . नेतृत्व करायला आवडते, त्यांना नवीन
आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र मत असते आणि ते मांडणे
त्यांना आवडते. पण प्रत्यक्ष व्यवहारात वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी कुठली गोष्ट
प्रत्यक्षात झाली नाही म्हणजे त्यांनी केलेली एखाद्या चांगल्या कामाची प्रशंसा
झाली नाही , कौतुक झाले नाही , त्यांच्या कर्तुत्वाला कामाच्या ठिकाणी किंवा घरत
वाव मिळाला नाही , त्यांचे मत विचारातच घेतले नाही तर मग अश्या व्यक्ती रागाने
उफाळून उठतात .त्यंनी केलेल्या कामाचे श्रेय दुसर्याला दिले गेले ,किंवा
त्यांच्यातील नेतृत्वगुणाला वाव मिळाला नाही ,मुद्दामून त्यांना डावलले गेले किंवा
त्याना मनाविरुद्ध तडजोड करायला लागली तर त्यांना ते सहन होत नाही मग त्यांची
मानसिकता बिघडली तर नवल ते काय ? अग्नी हा झुंजणारा आहे. त्यांना स्वातंत्राची आवड
आहे, स्पष्टवक्तेपणा , नेतृत्व ,कौतुक होणे अपेक्षित असते ,नुसते बसून अश्या
व्यक्ती नाही राहू शकत ,रटाळ आयुष्य आवडत नाही ,शारीरिक आणि मानसिक शक्ती आणि
उर्जा हि इतर तत्त्वांपेक्षा अफाट आहे. अहंकार ,गर्व सुद्धा ठासून भरलेला आहे
त्यामुळे ह्या उत्चाहाला साजेसे आयुष्य आणि संधी त्यांना मिळाल्या तर ते सुखी
असतात पण ह्याउलट झाले कि त्यांना संधी मिळूनही डावलले गेले किंवा नेतृत्व गुण
असूनही तशी संधी मिळाली नाही ,त्यांच्या गुणांची कदर झाली नाही ,त्यांचे मत
लक्ष्यात घेतले नाही ,त्यांच्या कामाचे कौतुक झाले नाही तर अश्यावेळी अश्या वेळी
व्यक्ती अस्वस्थ होतात आणि त्यामुळे अश्या लोकांना तसाच जोडीदार मिळायला हवा
नाहीतर आयुष्य उदास होईल म्हणजे तो म्हणेल आपण कुठेतरी ट्रेकिंग ला जाऊ आणि ती नको
म्हणेल .अश्यावेळी विसंवाद होवू शकतील.
पृथ्वीतत्व म्हणजे स्थिरावणे .अश्या वृषभ ,कन्या आणि मकर राशीचे
लोक स्थिरावतात. त्यांना सुरक्षितता लागते . मानसिक , शारीरिक आणि आर्थिक सर्वच
प्रकारच्या सुरक्षिततेला ते प्राधान्य देतात . त्यांना सहसा बदल नको असतो आणि
मानवातही नाही ,चौकटीतले आयुष्य ते जगत असतात .पृथ्वीचा गुण ती सर्व साठवते
त्यामुळे संग्रह करत राहतात . अश्या लोकांकडे ठोस अशी माहिती असते .सतत आधार
लागतो. ह्यांच्या जीवनात अस्थिरता आली किंवा रोजच्या जीवनात बदल आले किंवा
वास्तवता जिथे कमी होते तिथे ह्या लोकांचा जीव गुदमरेल त्यांना ते मानवणार नाही .
वास्तवापेक्षा कल्पनांना जास्ती वाव आहे तिथे ह्यांचे जमणार नाही कारण ते
practical असतात .त्यांना कुठे रिस्क घ्यावी लागली तर त्यांना ती स्थिती पचवणे
कठीण जाते.
वायुतत्व म्हणजे बुद्धिमान राशी मिथुन तूळ आणि कुंभ ह्या
आहेत .वायू नावाप्रमाणेच एका जागी स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टीची
आवड जसे मैत्री ची , संवादाची आवड असणे ,विचार करणे , तर्क लावणे ,चिंतन करणे
,एखाद्या गोष्टी शिकणे ,समतोल पणा असणे, बदल घडवणे जसे शनीची दशा असेल किंवा शनी
ज्या स्थानातून जात असेल त्या स्थानाच्या संबंधी मोठे बदल घडतात कारण शनी हा
वायूतत्वाचा ग्रह आहे. कन्या राशीतील सर्व नक्षत्रे हि वायुतत्वाची असल्यामुळे ती
बुद्धिमान राशी आहे. वायू एकाजागी राहत नाही. त्यामुळे आहे तिथे न थांबता
परिस्थितीतून मार्ग काढणे , शेअर करा आणि पुढे जाणे हे वायू शिकवतो. अश्या
लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळाला नाही किंवा अत्यंत कोरड्या व्यक्तींसोबत
त्यांना राहावे लागले किंवा जिथे चिंतन ,मनन विचारला बुद्धीला खाद्य नाही असे
निरास आयुष्य जगायला लागले किंवा एकटेपणा आला किंवा फक्त भावनिकता असलेल्या
व्यक्तींशी जुळवून घ्यायला लागले जिथे बुद्धीचा दूरपर्यंत विचारच नाही तिथे अश्या
व्यक्ती अस्वस्थ होतील.
जलतत्व म्हंटले कि भावना आल्या. हळुवारपणा , संवेदना ,
प्रेमळपणा , एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती , कौटुंबिक ओढ ,एकमेकातील बंध ,नाती
जपणे टिकवणे आणि फुलवणे , आपल्याला कुणीतरी आपले म्हणणे आणि आपणही दुसर्याला जीव
लावणे ,आपले छंद जोपासणे कारण कुठल्याही गोष्टीतील रस हा आपल्याला चंद्र शुक्र आणि
जलराशीच देतील.तार अश्या ह्या गोष्टी हि जलतत्वाच्या लोकांची मानसिक गरज असते आणि
ह्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत किंवा त्यांना अगदी कोरडे आयुष्य जगायला लागले
जिथे भावनिकता नावालाही नाही किंवा हेवेदावे , एकटेपणा ,वियोग सहन करायला लागला ,
नातेसंबंध तुटले ,दुरावले तर त्यांना अस्वस्थ वाटेल.
अश्या विविध मानसिक गरजा
प्रत्येक तत्वाच्या व्यक्तीत असतात आणि त्या जर आपल्याला ओळखता आल्या किंवा
आपण त्या अंशतः पूर्ण करू शकलो तर ती व्यकी आपल्याबरोबर सुखी राहते किंवा ह्या
गरजा त्या व्यक्तीच्या पूर्ण झाल्या तर व्यक्ती सुखी राहते अन्यथा ती व्यक्ती दुखी
राहते.
ह्या चार तत्वानुसार आपण व्यक्तीच्या काय गरजा असतील ते
आपल्याला समजले पण ह्या गरजा किती अंशी पूर्ण होतील हे समजणे सुद्धा महत्वाचे आहे.
अग्निप्रधान व्यक्ती हि गर्विष्ठ ,अहंकारी असेलच पण प्रत्येकवेळी
तो गर्व लोकांना समाजाला दिसून येयीलच असे नाही कारण त्यांना मानमरातब , वरचे पद
मिळाल्याने त्यांचा अहंकार सुखावला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचे हे पेहलू
असूनही समोर येणारच नाहीत .हा गर्व सुखावतोय पण जेव्हा अश्या व्यक्ती ना मान मिळत
नाही ,त्यांना डावलले जाते ,त्यांच्या नेतृत्वगुणाची वाहवा होत नाही अश्यावेळी
ह्या व्यक्तींचा संताप होयील आणि तो समोर येयील.
आपल्याला व्यक्तीच्या गरजा समजल्या पण त्या कितपत पूर्ण
होतील आणि त्यांचा एकंदरीतच जीवनातील सुख आणि दुक्खाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय
असेल ? ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ह्यासाठी आपण चंद्र , लग्न आणि
चतुर्थस्थान विचारात घेऊया. पत्रिकेतील प्रत्येक भाव आपल्याला सुख दुख देतातच.
आपल्या ओळखीत अनेक व्यक्ती असतील ज्या श्रीमंत असतील , सुखाची सर्व आयुध जसे पैसा
, मोठे घर ,वाहन सर्व काही असले पण रात्रीची झोप नसेल आणि त्याउलट एखादी गरीब
कष्टाळू व्यक्ती जी जेमतेम पोटापुरते मिळवत असेल
ती मात्र पडल्यापडल्या शांत झोपत असेल आणि आनंदी असेल. त्यामुळे जीवनात सुख
आपल्यात किती भिनवून घेवू आणि आपला दृष्टीकोन कसा बनवतो ह्यावर आपले जीवन किती
आनंदी किंवा दुखी होईल ते ठरते .
प्रामुख्याने चंद्र , चतुर्थस्थान आणि लग्नस्थान . ज्यांच्या पत्रिकेत हि स्थाने
चांगली सुस्थितीत असतात त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण निश्चितपणे
सकारात्मक असतो . ह्याउलट ह्यातील जास्तीत जास्त ग्रह बिघडले तर आयुष्य असमाधानी
असते म्हणजे विचार त्यानुसार असतात .
चंद्र – चंद्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह असल्याने चंद्राचा
परिणाम आपल्यावर आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीवर सर्वाधिक होतो. जलतत्वाचा ग्रह
असल्याने भावनांशी जवळीक साधतो. समुद्रातील भरती ओहोटी चंद्राचा पृथ्वीवरील ताण
वाढल्याने होतो.
पाण्याला स्वतःचा रंग नाही त्यात जो रंग टाकाल तसा त्याचा
रंग होतो. चंद्रावर इतर ग्रह आणि राशी , नक्षत्रांचा परिणाम लवकर होतो.जन्माच्या
आधी आईच्या गर्भातून आपण गरजा घेवून जन्मतो तसेच पुढे जन्मल्यावर प्राप्त
परिस्थिती , अनुभव ह्यातून तयार होतात .गर्भाच्या वाढीवर चंद्राचा अंमल आहे. आईच्या
संस्कारांनी आणि जवळच्या माणसांनी केलेले संस्कार आपल्यावर असतात . आपल्या मानसिक
जडणघडणीत चंद्राचा प्रभाव सर्वाधिक आहे. चंद्र सुस्थितीत असेल तर माणसाचे जीवन कसे
असेल त्याचा अंदाज येतो. चंद्राला राशीबल हवे . तसेच इतर ग्रहांशी होणारे योग
बघितले तर चंद्र शुभ आहे कि पापाग्रहांचा परिणाम आहे ते समजेल. चंद्रावर होणारे
इतर ग्रहांचे योग व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करत असतात . चंद्राचे पत्रिकेतील
स्थान , त्याचे नक्षत्र देवगणी किंवा मनुष्यगणी असेल ,चंद्राचे शुभग्रहांचे योग
किंवा परिणाम होत असतील आणि पत्रिकेतील गुरु जो जीवनात समाधान देणारा ग्रह आहे
त्याचा चंद्राशी होणारा योग ह्या सर्वातून चंद्राची स्थिती आणि त्या व्यक्तीची
मानसिकता समजते.
चंद्र जर ६ ८ १२ मध्ये असेल त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल
जे व्यक्तीत तामसी वृत्ती देतो .चंद्र राशीबली नसेल तर चंद्र बिघडला असेल आणि
अश्या व्यक्तीच्या मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत , जीवनात प्रतिकूल वातावरण निर्माण
होते आणि व्यक्तीला खूप तडजोडी कराव्या लागतात . म्हणून बिघडलेला चंद्र हा संघर्ष
देतो.
चतुर्थस्थानाला सुखस्थान म्हणतात . घरात आपल्याला छान वाटते
,कारण घर प्रिय असते. घराशी आपली नाळ जोडलेली असते , घरात आपली माणसे आपली वाट
पाहत असतात . आपल्या मनातील अंतरंग ,विचार ,आपल्या मनावर झालेले संस्कार ,सुख आणि
दुक्खाच्या कल्पना आणि ती वाटून घेण्याची वृत्ती ,झोप ,घराबाबत असणारी मानसिक ओढ
ह्या गोष्टी चतुर्थ स्थानावरून पाहतात .
दशमस्थान म्हणजे मध्यानीचा सूर्य त्याउलट चतुर्थस्थान हे
पायाखाली दडलेले आकाश आहे जे दिसत नाही. समाधान दर्शवणारी कर्क रास नैसर्गिक
कुंडलीत चतुर्थात येते आणि म्हणूनच समाधान दर्शवणारा गुरु हा कर्क राशीत उच्चीचा
होतो. नैसर्गिक शुभग्रह येणे हे मानसिकतेच्या दृष्टीने चांगले असते . नैसर्गिक
पापग्रह चतुर्थात असमाधानी करतात कारण ते हाव निर्माण करतात . आपण आयुष्यात किती
सुखाची चव चाखू शकतो आणि आपण सुख लोकांना किती वाटू शकतो हे महत्वाचे आहे. कारण जो
स्वतः सुखी असेल तोच इतरांना सुखी ठेवू शकतो.
लग्नस्थान म्हणजे आपण स्वतः आणि आपल्यातील सुख आणि दुख होय.
माझा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हे लग्नावरून ठरते आणि त्यामुळे मी लोकांपुढे
कसा प्रोजेक्ट करीन हे सुद्धा लग्नावरून ठरतात. लग्न सुस्थितीत असेल त्यावर शुभ
ग्रहांचा परिणाम असेल तर व्यक्ती आनंदी , उत्साही , समंजस असेल. तिचा जीवनाकडे पाहण्याचा
दृष्टीकोण सुद्धा सकारात्मक असेल.
बाह्य जगाचे परिणाम आपल्यावर कसे होतील हे चतुर्थस्थान आणि
चंद्रावर अवलंबून असते आणि आपण बाह्य जगाशी कसे व्यक्त होवू हे आपल्या लग्न
स्थानाशी संबंधित असते . लग्न आणि लग्नेश सुस्थितीत असेल तर व्यक्ती आनंदी असेल.
आशावाद असतो. लग्नेश बिघडला तर अश्या व्यक्तींचा स्वतःशीच द्वंद्व, संघर्ष चालू
असते. चंद्र ,चतुर्थस्थान आणि लग्नाबाबत जास्तीतजास्त घटक सुस्थितीत असतील तर
अश्या व्यक्तींच्या आयुष्यातील गरजा आणि सुख मिळण्याची शक्यता अधिक असते.
अश्याप्रकारे आपल्याला जागवणार्या आणि आपले आयुष्य समृद्ध
करणार्या व्यक्तींच्या स्वभावाचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या
स्वभावाचा अधिक परिचय होईल आणि नाती
वृद्धिंगत होतील ह्यात शंकाच नाही .
शेवटी एकमेकांना समजून घेणे ,जगणे आणि जगवणे हेच तर जीवन
आहे नाही का? आज माणसे घट्ट धरून ठेवण्याची गरज आहे आणि ज्याला हे जमले तोच
आयुष्याचा आस्वाद खर्या अर्थाने घेवू आणि देवूही शकेल.
लेख आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका .
antarnad18@gmail.com
No comments:
Post a Comment