|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष शास्त्राचा प्रसार गेल्या काही दशकात खूप वेगाने होताना आपण पाहतो आहोत .हे अथांग महासागरासारखे शास्त्र आहे आणि त्यातील एकेक थेंब म्हणजे अमृतघन आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर बोलणे म्हणजेच भविष्य कथन करणे हि खचितच सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठी वरवरचा अभ्यास उपयोगी पडत नाही तर संशोधन , एखाद्या विषयाच्या गाभ्यापर्यंत जाण्याची चिकित्सक वृत्तीही आवश्यक असते.
“पी हळद हो गोरी “ हि तत्व इथे लागू पडत नाहीत .इतकी प्रस्तावना करण्याचे कारण कि आज घरोघरी हि विद्या पोहोचली आहे पण त्यातील खरे अभ्यासक फारच कमी आहेत . सोशल मिडिया वर आज हे शास्त्र प्रचलित आहे आणि ज्ञान देण्याचे काम इथे अनेकजण करताना दिसतात . आज ह्या शास्त्राचे असंख्य अभ्यासक आहेत पण खेदाची गोष्ट अशी कि आज ह्या शास्त्रावर गंभीर आरोप केले जातात किंवा त्याला हिणवले जाते.
“ अंतर्नाद “ ह्या माझ्या ब्लॉग वरील “ मला भावलेली व्यक्तिमत्व “ ह्या सदरात आज माझे शिक्षक आणि स्नेही श्री. वरदविनायक खांबेटे ह्यांची ओळख करून देताना मला मनापासून आनंद होत आहे.
“ विद्यार्थी हेच माझे खरे गुरु “ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या माझ्या ह्या शिक्षक मित्राची ज्योतिष शास्त्राचीच नाही तर अध्यात्मिक बैठक सुद्धा तितकीच पक्की आहे. आज खांबेटे सरांशी गप्पा मारण्याची दुर्मिळ संधी मला अनपेक्षितपणे प्राप्त झाली. तुमच्या माझ्या मनात असणार्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मनासारखी मिळाली ह्याचा आनंद आहे .
कंपनी सेक्रेटरी आणि LLB ह्या पदव्या असणाऱ्या खांबेटे सरांनी गुरूगृही राहून ब्रम्ह्कर्माचे आणि तत्वज्ञानाचे अध्ययन केले आहे. सरांचा मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्याचा व्यासंग दांडगा असून संबंधित वाचन त्याचे आजही सुरु असतेच. त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास सुद्धा असून जातकाची मानसिकता जाणून घेण्याकडे त्यांचा सर्वाधिक कल असतो.
मुळात पारंपारिक ज्योतिष शास्त्राचे चे गाढे अभ्यास असूनही त्यांनी बृहत पाराशरी आणि इतर पाश्चात्य पद्धती आणि अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यासही केला. त्याचसोबत कृष्णमुर्ती आणि भाव नवमांश पद्धतीसुद्धा खुल्या दिलाने स्वीकारत त्याच्या अभ्यासाचीही जोड दिली. अनेक पद्धतींची योग्य ती सांगड घालून फलादेश करता येतो हा त्यांचा अनुभव आहे.
ज्योतिष शास्त्राबद्दल ओढ किंवा त्यात पदार्पण तुमच्या आयुष्यात कसे झाले ह्यावर त्यांनी सांगितले कि अगदी सुरवातीच्या काळात “ दत्त ज्योतिष विद्यालयाचे अनिरुद्ध वर्तक “ ह्यांच्याकडे कृष्णमुर्ती पद्धतीचे काही वर्ग त्यांनी घेतले त्यातूनच श्री विजय हजारी ह्यांच्याशी ओळख झाली. सुरेश शहासने ह्यांच्याकडेही त्यांनी कृष्णामुर्तीचे धडे गिरवले. आपल्या ह्या सर्व गुरुंबद्दल खांबेटे सर अभिमानाने सांगत होते. एखादा विषय शिकताना उत्तम गुरु लाभणे हि गुरुकृपा आहेच पण आपल्याला स्वतःलाही त्यात अपार कष्ट घ्यावे लागतात . वैयक्तिक अभ्यास , चिंतन मनन संशोधन तुम्हाला ह्या शास्त्रात अधिक परिपूर्ण करते हे त्यांनी आवर्जून सांगितले.
फलादेश सांगताना तुमचा अनुभव तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जातो. ज्योतिष हा विषय आपल्याला आयुष्यभरासाठी पुरून उरणारा आहे. हा विषय ६-८ महिने कुठल्या क्लास मध्ये विशेषतः कमर्शिअल क्लास मध्ये शिकण्याचा नाही हे सांगताना ते पुढे म्हणाले कि इथे संयमाची आवश्यकता आहे. स्वतःला झोकून देऊन सखोल अभ्यास करण्याची वृत्ती लागते. फुल जसे अलगद उमलते अगदी तसेच ज्योतिष आपल्या अंतरंगात उमलत जाते आणि म्हणूनच ह्या सर्वासाठी संयम महत्वाचा असतो.
खांबेटे सर आत्मीयतेने भरभरून बोलत होते . स्वतःला मिळणारी अनुभूती हे ह्या शास्त्राचे गमक आहे.
शास्त्र शिकण्यासाठी गुरु महत्वाचा आहेच पण सर्वात महत्वाचा तो परमेश्वराचा आशीर्वाद आणि कृपा . श्री. व. दा.भट सर , श्री. श्री. भट सर , श्री गजानन तेंडूलकर , श्री. य के प्रधान अश्या महान तत्वज्ञानाचे ग्रंथ अभ्यास पूर्ण आहेत त्याचा अभ्यास आणि मनन चिंतन करताना शास्त्राचे अनेक पदर त्यांना उलगडत गेले.
खांबेटे सरांशी गप्पा मारताना मी सुद्धा माझ्याही नकळत खूप काही शिकत होते. ह्या शास्त्राची अनुभूती घेण्यासाठी अथक परिश्रम लागतात .मुळात “ मी म्हणजेच अहं ” ह्याचा सर्वार्थाने त्याग करायला लागतो, समर्पणाची भावना लागते तरच पुढे वाट दिसेल . ह्या सर्व प्रवासात त्यांना अनेक विद्वान ,अभ्यासक ह्या शास्त्रातील अनेक नामवंत भेटत गेले पण त्यातील खरे अभ्यासक कोण आणि नामवंत कोण ह्याची ओळख त्यांना त्यांच्या साधनेने करून दिली. निष्णात ज्योतिषांचे मार्गदर्शन त्यांना घडवत गेले.
“ पुस्तके वाचून आणि क्लास मध्ये ज्योतिष येत नाही पण मनाच्या गाभ्यातून जेव्हा हे शास्त्र अनुभूती द्यायला लागते तेव्हा तुम्ही ह्या शास्त्राच्या अधिक निकट जाता आणि तेव्हाच तुम्हाला फलिताचा आनंद घेता येतो “ हि जेष्ठ ज्योतीर्विंद श्री व दा भट ह्यांच्याकडून मिळालेली शिकवण उराशी धरूनच खांबेटे सरांचा प्रवास आजही चालूच आहे.
नवीन अभ्यासकांना काय मार्गदर्शन कराल ह्यावर सर म्हणाले कि कुंडलीला गुरु माना म्हणजेच ती अनुभूती देईल. पत्रिका सोडवताना स्वतःचा अनुभव, मनन चिंतन सर्वात महत्वाचे असते. आजकाल इंस्टट चा जमाना आहे पण हा नियम इथे लागणार नाही. अनेक कुंडल्यांचा अभ्यास , त्यांचा संग्रह करण्याची सवय आणि त्यावर नियमांची सिद्धता पडताळून पाहण्याची सवय लावून घेणे महत्वाचे आहे . ह्या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून ज्योतिष विकसित होत जाते. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभूतीचे ज्ञान हे बावनकशी सोन्यासारखे असते आणि ह्यातून ज्योतिषी घडत जातो .
ग्रंथ हे गुरु मानून आणि मनन चिंतन आणि अनुभव हि त्रिसूत्री उत्तम ज्योतिषी जन्माला घालते .प्रत्येक ग्रहांचे कारकत्व येते कुठून , नियम कसे होतात अश्या अनेक गोष्टींची उकल करणे हि अभ्यासाची दिशा आहे .कृष्णमुर्ती आणि पारंपारिक , भाव नवमांश पद्धत ह्या सर्व पद्धती शिकवणाऱ्या खांबेटे सरांच्या ज्ञानगंगेचा लाभ आजवर अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. पारंपारिक ज्योतिष हा आपला पाया आहे त्यामुळे ते शिकणे हे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्राबरोबर वास्तू , मंत्रशास्त्र , ह्या विषयांचे आकलन असणार्या खांबेटे सरांनी आज पूर्णतः पारंपारिक आणि कृष्णमुर्ती पद्धती ह्यावर भर दिला आहे.
अत्यंत प्रतिभावान अभ्यासू अश्या खांबेटे सरांनी धनु राशीत गुरु असताना “नक्षत्र “ ह्या विषयावर व्याख्यान दिले आणि अभ्यासकांची दाद मिळवली. अत्यंत उद्बोधक असणार्या ह्या व्याख्यानाला सर्व स्थरातून उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यातून प्रेरीत होऊन “ कोदंड पुनर्वसू “ हे स्वतःचे youtube channel खांबेटे सरांनी सुरु केले. कुठलेही कमर्शिअल उद्देश मनात न ठेवता वेगळा दृष्टीकोन अभ्यासकांना देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न वाखाणण्याजोगा आहेच. अभ्यासकांना वेगळा दृष्टीकोन मिळेल ह्यासाठी ते प्रयत्नशील असतात . ज्योतिष अभ्यासकांना प्रेरणा देणारे आणि सखोल अभ्यास करायला प्रवृत्त करणारे हे “ कोदंड पुनर्वसू “ अल्पावधीतच ज्योतिष वर्तुळात प्रसिद्ध झाले आहे ते इथे हाताळलेल्या वेगळ्या विषयांमुळे.
खांबेटे सरांशी संवाद साधत असताना अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालू लागले. विज्ञान विषयाचे अफाट ज्ञान असतानाही ह्या विषयाकडे वळणाऱ्या खांबेटे सरांचा ह्या शास्त्रावर जराही विश्वास नव्हता ,पण कुटुंबात वडील आजोबा ह्यांची ज्योतिषशास्त्राची बैठक पक्की होती. अप्रत्यक्षपणे हा विषय सतत कानावर पडत असे. कालांतराने ह्या विषयाची आवड निर्माण झाली,
जीवनात काही अनुभव आले आणि ग्रहांसोबतचा हा प्रवास सुरु झाला जो आजतागायत आहे.
वाचनाची प्रचंड आवड असणारे खांबेटे सर म्हणतात कि नुसतीच ज्योतिष शास्त्राची ढीगभर पुस्तके आणि क्लास करून ज्योतिष येत नाही तर ग्रहांशी मैत्री करायला लागते. त्यांनाशी संवाद साधायला लागतो तरच ह्या विषयाच्या गाभ्यापर्यंत जाता येते . अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करताना ह्या शास्त्राचा पाया हा पंचमहाभूतांवर आधारित आहे ह्याची उकल झाली आणि अभ्यासाला एक परिपक्वता आली. संपूर्ण ज्योतिष शास्त्राची निर्मिती हि पंचमहाभूतातूनच झाली आहे. श्री श्री भट आणि श्री.(कै) विलास देव ह्यांचा पंचमहाभूतांचा अभ्यास दांडगा होता हे सांगताना ज्योतिष शास्त्र , मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. ह्या तिन्ही शास्त्रांची गुंफण असल्यामुळे फक्त ज्योतिष ह्या पासून वेगळे करता येणार नाही.
एकंदरीत गप्पा रंगल्या आणि त्यातून श्री खांबेटे ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे पदरही उलगडत गेले. माझ्याही विचारांना चालना मिळत होती. श्री खांबेटे ह्यांचा ज्योतिष व्यासंग दांडगा आहेच पण त्याच सोबत अध्यात्म , मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण ह्या विषयांवर सुद्धा त्यांची उत्तम पकड आहे.
ह्या सर्वाचा एकत्रित परिपाक त्यांना अचूक फलादेशापर्यंत घेवून जातो हे गुपित आजच्या संवादातून अलगद उमगले.
ह्या शास्त्राने आपल्याला काय दिले ह्यावर बोलताना सर म्हणाले कि प्रत्येकाला थोडासा दंभ किंवा अहंकार असतोच पण शास्त्राचा अभ्यास आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून बघायला प्रेरित करतो. अहंकाराची पुटे कमी होण्यास ह्यामुळे मदत होते . आपल्या क्षणभंगुर आयुष्याची जाणीव होते . व्यक्ती तितक्या प्रकृती , आपल्यासकट प्रत्येकात काही उणीवा आहेत ह्याची जाणीव होते. स्वतःचा SWOT Analysis करायला व्यक्ती शिकते आणि त्यातून आपण आपले व्यक्तिमत्व अधिक चांगल्या रीतीने घडवू शकतो. पुढील भविष्यातील घटनांचा मागोवा ह्या शास्त्राद्वारे घेता येतो. स्वतःचा व्यक्तिमत्व विकास , येऊ घातलेल्या संकटांची नांदी आधीच समजली तर त्यातून मार्ग काढण्याची धैर्याने सामोरे जाण्याची तयारी करता येते. जातकाच्या आयुष्यात तुम्ही सांगितलेल्या फालादेशावरून आनंद निर्माण झाला तर ते समाधान कोटी रुपयापेक्षा खूप महत्वाचे असते . सरांचा प्रत्येक शब्द अनमोल होता आणि मी जीवाचा कान करून तो ऐकत होते . सरांशी साधलेला संवाद मलाही अंतर्मुख करून गेला.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार असतात पण ज्योतिष शास्त्रासारखा वाटाड्या त्यातून तुम्हाला नक्कीच मार्गस्थ करू शकतो. आपल्यातील सुप्त गुणांची जाणीव करून देतो ,जीवन सुसह्य होते. ह्या शास्त्राच्या माध्यमातून जातकाचे भविष्य कथन करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने आपली निवड केली आहे हि भावना सुद्धा समाधान देणारी असते.
अनेक लोक समाजात ह्या शास्त्रावरून वितंडवाद करताना दिसतात त्यामुळे ह्या शास्त्राची खरच गरज आहे का? ह्यावर सरांनी नक्कीच आहे हे ठामपणे सांगितले. आजच्या तरुण पिढीनेही ह्याचा जरूर अभ्यास करावा कारण हे एकमेव शास्त्र तुमच्या पुढील आयुष्यातील घटनांबद्दल आधीच सूचना देते .
त्याहीपलीकडे कर्मवाद सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ग्रह आपल्याला सिग्नल देतात भविष्यातील ,कठीण किंवा चांगल्या काळाची पूर्वसूचना देणारे हे एकमेव शास्त्र आहे कारण ते काळाचा , कालगणनेचा अभ्यास करते .
ह्या शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला फायदाच होणार आहे. पण इतके सगळे असले तरी आज समाजात ज्योतिष शास्त्रा बद्दल अनेक समज गैरसमज आहेत , अनेक लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे त्यांचा ह्या शास्त्रावरचा विश्वास उडतो. शास्त्र बरोबरच असते कदाचित सांगणारा ज्योतिषी परिपक्व नसतो त्यामुळे भविष्य कथन हे सोपे नाही .एखाद्याच्या आयुष्यावर बोलताना आपलाही तितकाच अभ्यास असल्याशिवाय बोलूच नये हे सरांनी आवर्जून सांगितले.
जे उत्तम आहे आश्वासक आहे ते मिळवण्यासाठी पराकाष्ठाचे प्रयत्न करावे लागतात . समुद्राचा तळ गाठावा तसा ह्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो.
ज्योतिष शास्त्राचे आज समाजात असलेले स्थान ह्यावर त्यांनी चिंता आणि खेद व्यक्त केला. आजकाल कुणीही ह्या शास्त्रात येतंय , ह्या शास्त्राचे गांभीर्य समजून न घेता भविष्य कथन केले जाते , मग ते चुकते आणि लोकांचा ह्या शास्त्रावरचा विश्वास उडायला लागतो. आज घरोघरी ज्योतिषी आहेत , सोशल मिडीया सुद्धा आज प्रगत असल्यामुळे ह्या शास्त्राची माहिती देणारे अनेक क्लास व्हिडीओ youtube channel वरती अगदी सहज उपलब्ध आहेत . त्यामुळे सहज सोपे मिळवण्याकडे कल अधिक आहे . स्वतः चिंतन मनन करून स्वतःचे नियम सिद्ध करणे किंवा असलेले नियम का आहेत ह्याची कारणमीमांसा करणे हे होतच नाही . पूर्वीच्या काळी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास का गुरूगृही होत असे पण त्याआधी वेदांचा अभ्यास ,अध्यात्म ह्याची बैठक पक्की होत असे. त्यामुळे जे ज्ञान मिळत असे ते बावनकशी सोन्यासारखे आणि समृद्ध होते.
आजच्या काळात समाजात ह्या शास्त्राची खूप अवहेलना होत आहे ते सांगताना सर म्हणाले कि आज कुणीही यावे आणि ज्योतिष सांगावे असे चित्र आहे जे वेदना देणारे आहे . कुणीही काहीही छातीठोकपणे सांगते आणि त्या अनुषंगाने होणारी लोकांची होणारी आर्थिक आणि मानसिक फसवणूक अटळ आहे. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून मग ह्या महान शास्त्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो आणि विश्वास उडतो. दहा ज्योतिष्यांच्या घराचे उंबरठे लोक झिजवू लागतात कारण समाधान देणारे उत्तर कुठूनच मिळत नाही . म्हणूनच आज ह्या शास्त्राचा खरा व्यासंग असणार्या लोकांना आज हे शास्त्र सिद्ध करताना पराकोटीच्या अग्निदिव्यातून जायला लागत आहे.
आज इंस्तंट चा जमाना असल्यामुळे कमी वेळात खूप काही शिकण्याकडे कल असतो ,दुसरे म्हणजे Easy Money आकर्षित करत असतो . त्यामुळे आज खरे ज्योतिष बाजूलाच राहिले आहे. ज्योतिष शिकण्यासाठी सुद्धा आज चांगल्या प्रतीची आकलनशक्ती , वैचारिक बैठक असावी लागते , त्याचसोबत उत्तम तर्कबुद्धी असावी लागते ,अध्यात्मिकता, बौद्धिक विचार, स्मरणशक्ती लागते आणि चिंतन मनन करण्याची वृत्ती आणि दृष्टीकोन लागतो.
थोडक्यात कुणीही यावे आणि ज्योतिष सांगावे ह्यामुळे ह्या शास्त्राचा अपमान होत आहे ह्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. भारतीयांना अत्यंत अभिमान वाटावा आणि गौरव करावा असे हे प्राचीन शास्त्र आहे आणि त्याचा अनमोल ठेवा आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला सुपूर्द केला आहे .त्याचा योग्य तो मान ठेवणे ते जतन करून आपल्या पुढील पिढीला सुपूर्द करणे हे आपले कर्तव्यच आहे. सर्वात मुख्य म्हणजे ज्योतिष हे निस्पृह पणे अभ्यासता आले पाहिजे. ह्या शास्त्राबद्दल तळमळ तर हवीच पण त्याच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी जिद्द सखोल अभ्यास आणि झोकून देण्याची वृत्ती आवश्यक आहे हे सरांनी नमूद केले.
आज ज्योतिष शास्त्रात पदव्या सहज प्राप्त करता येतात आणि लोकांनाही ह्या उपाध्या लाऊन घ्यायला खूप आवडते.पण ह्या शास्त्रात शोर्टकट नाहीत . सखोल ज्ञान काहीच नसते . गेले कित्येक वर्षात आपल्या समाजात जीवनशैलीत अनेक बदल होत गेले त्यामुळे ज्योतिष शास्त्राच्या परिभाषा सुद्धा काळाच्या ओघात बदलत चालल्या आहेत . जुने तेच पकडून न ठेवता नाविन्याचा स्वीकार करायला शिकले पाहिजे . पूर्वीच्या लोकांचे प्रश्न आणि आजकालच्या लोकांच्या समस्या ह्यात खूपच फरक आहे त्यामुळे ज्योतीष अभ्यासकांनी सुद्धा बदलत्या काळानुसार बदलत जाणारे ज्योतिष स्वीकारले पाहिजे .
मला हे शास्त्र का शिकायचे आहे ह्याचे उत्तर शास्त्राच्या प्रत्येक अभ्यासकाने आज निदान स्वतःपुरते तरी मिळवले पाहिजे. अनेक शास्त्र शिकून एक ना धड भराभर चिंध्या असे न करता एकच शास्त्र पूर्णपणे घोटवावे . ह्या शास्त्राचा अभ्यास करताना सतत चिंतनशील असावे लागते , आलेली अनुभूती त्यावरचा स्वतःचा अभ्यास करत राहिले कि ज्योतिष रक्तात मुरत जाते .
ज्योतिष हि एक साधना आहे आणि त्याचा वसा आयुष्यभरासाठी घ्यावा लागतो . असे झाले तरच आपण ज्योतिषमय होऊ शकतो आणि अनुभूतीच्या आनंदाचा खरा आनंद उपभोगू शकतो. अनुभूती अनुभव देते त्याला चालेंज करता येत नाही . ह्या शास्त्राचा प्रवास अखंड आहे आणि त्यात आपला व शास्त्राचा मान ठेवताना मर्यादांचे पालन भान ठेवावे लागते , पैशाचा मोह बाजूला ठेवावा लागतो . निव्वळ पोटापाण्याचा धंदा म्हणून ह्या शास्त्राकडे पाहिले तर शास्त्र अनुभूती देणार नाही. नवीन अभ्यासकांना त्यांनी दिलेला हा सल्ला नक्कीच उपयोगी पडेल . संपूर्ण हयात गेली तरी हे शास्त्र संपूर्णपणे उलगडणार नाही इतका त्याचा आवाका मोठा आहे. शिक्षक नियम शिकवतील , पण जो आपल्या अंतरंगाला हात घालेल तो शिक्षक गुरु मिळणे हे दुर्मिळ आहे.
असे गुरु लाभले तर आपल्यावर खरच गुरुकृपा झाली असे समजायला हरकत नाही .
खांबेटे सर म्हणजे ज्ञानाचा अखंड स्त्रोत , तळमळीने शास्त्र शिकणारा आणि ह्या शास्त्रावर मनापासून प्रेम आणि त्याचा आदर सन्मान करणारा उपासक आहे. . आज त्यांच्या ह्या ज्ञानाच्या पोतडीतून बरच काही मिळवल्याचे समाधान मला लाभले . समाजहितासाठी आज अश्या असंख्य “ विनायकांची “ गरज आहे . ह्या शास्त्राला उत्तुंग शिखरावर नेऊन आपल्या पूर्वजांनी दिलेला हा अमोल ठेवा जपणाऱ्या, वृद्धिंगत करणाऱ्या ज्या काही बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती आहेत त्या यादीत खांबेटे सरांचे नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होऊ शकणार नाही .द्यायचे तर सर्वोत्तम हा मानस ,शास्त्राची धुरा अखंड वाहणाऱ्या ह्या मनस्वी साधकासमोर मी नतमस्तक आहे.
ज्योतिष शास्त्राच्या अखंड महासागरातील हा “ राजहंस “ म्हंटला तर वावगे ठरायला नको .ह्या शास्त्राच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेला सत्याचा वसा कालांतराने कल्पवृक्षाचे स्वरूप धारण करेल ह्यात कुठलीच शंका नाही.
श्री. वरदविनायक खांबेटे ह्यांना “ विनायकाचा “ आणि गुरुंचा वरदहस्त लाभला आहे ,हे त्यांच्यासोबत झालेल्या संवादातून जाणवत गेले. ज्योतिष हि नुसतीच साधना नसून ती एक तपश्चर्या आहे . अश्या ह्या तपस्वी साधकासोबत झालेल्या संवादातून मला अनेक अनमोल मोती मिळाले , विचारांची अनेक दालने खुली झाली .आज त्यांनी मला इतका वेळ दिला त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे.
आज आपल्या channel च्या मार्फत खरे शास्त्र जनमानसा पर्यंत पोहोचवण्याचे काम अत्यंत तळमळीने ते करत आहेत आणि पुढील पिढीसाठी हा एक मोठा आदर्शच आहे.
श्री. खांबेटे सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी , त्यांच्या youtube channel साठी माझ्याकडून आणि अंतर्नाद च्या सर्व वाचकांकडून मनापासून शुभेछ्या.
अस्मिता
antarnad18@gmail.com
#अंतर्नाद#वरदविनायक#तपस्वी#साधक#राजहंस#कोदंडपुनर्वसू#वरदहस्त#संवाद#अनुभूती
कोदंड पुनर्वसू ला जरूर भेट द्या.
https://www.youtube.com/channel/UCVwYu9TZL_oivdRSul6v19Q