|| श्री स्वामी समर्थ ||
एखादी व्यक्ती खूप भाग्यवान आहे असे आपण नेहमी म्हणतो. शेवटी भाग्य म्हणजे नेमके काय ? आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट त्या त्या वेळेत मिळणे किंवा होणे म्हणजेच भाग्य , अशी सुटसुटीत व्याख्या आपल्याला करता येयील. चांगल्या संस्कारित कुटुंबात जन्म होणे ,उत्तम शिक्षण , योग्य वेळेत विवाह होणे , सुविद्य पत्नी मिळणे , पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे , आवड असलेल्या क्षेत्रात नोकरी मिळणे, आपल्या व्यवसायातील प्रगती , मुले चांगली गुणी निपजणे , आयुष्याची संध्याकाळ चांगली जाणे हे सर्व उत्तम भाग्य असल्याचीच लक्षणे म्हंटली पाहिजेत . इतकेच कश्याला अगदी रोजच्या जीवनात सुद्धा पावसाने थैमान घातले असतानाही आपल्याला गाडी किंवा बस मिळणे , रोजचे जीवन जगताना लहान सहन गोष्टीतला आनंद जसे सकाळचे वृत्तपत्र वाचताना आले घातलेला वाफाळलेल्या चहाचा कप समोर येणे , आनंदाने देवपूजा करणे , आवडत्या दोस्तांसोबतची एखादी मस्त संध्याकाळ . ह्या सर्व गोष्टी भाग्यानेच घडत असतात .
पत्रिकेतील नवम स्थानाचा अधिपती म्हणजेच आपल्या पत्रिकेतील “ भाग्येश ग्रह “. भाग्याची साथ असेल तर माणूस आयुष्यात मोठी झेप घेऊ शकतो . मी काहीतरी करू शकतो , माझी स्वप्ने पूर्ण करू शकतो हि भावना मनात निर्माण होण्यासाठी सुद्धा लग्नेश आणि चंद्रासोबत भाग्येश चांगला असणे आवश्यक असते . भाग्याने साथ दिली नाही तर सगळी स्वप्ने मनातच विरून जातात .
पत्रिकेत भाग्येश कुठला ग्रह आहे आणि तो कुठल्या भावात आहे तसेच तो शुभ ग्रहांच्या दृष्टीत युतीत आहे कि पापग्रहांच्या हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
भाग्य स्थान हे आपल्या पत्रिकेतील धर्म त्रिकोणात येते . भाग्य स्थानावरून आपले गुरु , आपली अध्यात्मिक प्रगती , धर्मनिष्ठा , दूरचे प्रवास , परदेशगमन , धार्मिक यात्रा , कृष्णमुर्ती पद्धतीत वडील सुद्धा ह्याच स्थानावरून पहिले जातात कारण पिताही गुरुसमान आहे . भाग्य स्थान हे लक्ष्मी स्थान आहे आणि त्यातील ग्रह आपण पूर्व जन्मातून काय घेऊन आलो आहोत तेही दर्शवते .
भाग्येश ग्रहाची उपासना हि नेहमीच फलदायी ठरते . भाग्येश मंगळ असेल तर गणपतीची उपासना , चंद्र असेल तर शंकराची आराधना अश्याप्रकारे उपासना करता येतात . तसेच त्या ग्रहाची दाने सुद्धा करता येतात . पंचांगात हि सर्व माहिती “ ग्रहशील “ चक्रात दिलेली आहे.
भाग्येशाची उपासना तुमचे आयुष्य Uplift करते , एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. चला तर मग तुमच्या पत्रिकेतील भाग्येश ग्रह बघा आणि त्याची मनापासून उपासना करून खरे भाग्यवंत व्हा.
अस्मिता
#अंतर्नाद#भाग्येशग्रह#नवमस्थान#उपासना#लग्नकुंडली#दाने#धर्मत्रिकोण
No comments:
Post a Comment