|| श्री स्वामी समर्थ ||
सर्वत्र होणारे श्री गणरायाचे आगमन सुखाची आनंदाची बरसात करत आहे. लहान थोर सगळ्यांच्याच हृदयावर विराजमान असणारा लाडका बाप्पा घराघरातून विराजमान होत असल्यामुळे एक मंगलमय वातावरण तयार झाले आहे.
ह्याच विनायकाचा आशीर्वाद घेऊन दुसरे महिला अधिवेशन १२ सप्टेंबर , २०२१ रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हे अधिवेशन भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि स्मार्ट Astrologer ह्या पुण्यातील नामांकित संस्थांनी आयोजित केले होते.
स्त्री म्हणजे दुर्गा ,स्त्री म्हणजेच सरस्वती ,स्त्री म्हणजे पार्वती आणि कालीसुद्धा. स्त्री हि आदिशक्ती जगन्माता आहे आणि वेगवेगळ्या रुपात ती आपल्याला भेटत असते. भारतीय परंपरेतील स्त्रीच्या कर्तुत्वाचा आलेख खूप मोठा आहे . झाशीची राणी , आई जिजामाता , रमाबाई रानडे , मदर तेरेसा आणि अलीकडच्या काळातील श्रीमती इंदिरा गांधी , श्रीमती प्रतिभाताई पाटील, श्रीमती सुषमा स्वराज, श्रीमती लता मंगेशकर ,अश्विनी भिडे ,कल्पना चावला अशी कित्येक नावे घेता येतील. असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे स्त्रीने आपल्या ज्ञानाचा , विचारांचा आणि कर्तुत्वाचा ठसा उमटवला नाही.
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। कवियत्री बहिणाबाई चौधरी
सणांचा उत्सवांचा माहोल असल्यामुळे चैतन्यमय वातावरणात अधिवेशनाची सुरवात झाली. माया ताईंनी सर्वांचे अभिवादन केले आणि स्वागताध्यक्षा सौ. पुष्पलताताई शेवाळे ह्यांचा अल्प परिचय करून देऊन स्वागत केले. काही व्यक्तिमत्व इतकी उत्तुंग असतात कि त्यांचा परिचय करून देताना आपणच निशब्द होतो त्यातील एक म्हणजे पुष्पाताई. त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सर्वांचे स्वागत करून श्री व सौ केंजळे ह्यांच्या गौरीकैलास संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आणि शुभेछ्या दिल्या. सौ. ज्योती जोशी ह्यांनी दीप प्रज्वलन केलेली व्हीडीओ क्लिप पाठवून अधिवेशनाला “ Go ahead “ दिला. श्री व सौ केंजळे ,त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले.
ह्या अधिवेशनाच्या उद्घाटक सौ . ज्योती ताई ह्यांचा सत्कार समारंभ पार पडला . गौरीकैलास संस्थेच्या संस्थापक श्रीमती जयश्री पवार ह्यांचा सौ पुष्पलता शेवाळे ह्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. श्रीमती जयश्री ताई पवार ह्यांचे हि आशीर्वाद आपल्याला आणि अधिवेशनाला लाभले .तर अश्या ह्या थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमास सुरवात झाली.
सौ. ज्योती ताई ह्यांचा अल्प परिचय मायाताई नी करून दिला. खरतर ज्योती ताईचे कार्य इतके मोठे आहे कि ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. आज Amazon वरती असलेली त्यांच्या पुस्तकाची प्रचंड मागणी हि आम्हा मराठी भाषिकांना अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्योतीताई ह्यांच्या उद्बोधक भाषणानंतर मायाताई ह्यांनी सौ गौरी केंजळे ह्यांचा परिचय करून देताना त्यांनी त्यांच्या संस्थेबद्दल माहिती देण्याबद्दल विनंती केली. गौरी केंजळे ह्यांनी आपल्या संस्थेचे नामकरण आणि त्याचा आजवरचा प्रवास ह्याबद्दल विस्तृत माहिती दिली.
श्रीमती जयश्री पवार ह्यांचा सौ पुष्पाताई सत्कार करताना |
सौ. हीना ओझा आणि सौ . वैशाली अत्रे ह्यांची अधिवेशनाला शुभेछ्या दिल्या .स्त्रियांना व्यासपीठावर कधीच फारसा वाव दिला जात नाही हे नेहमी पाहण्यात येते म्हणून महिलांसाठी खास असे अधिवेशन असावे असे मला नेहमी वाटायचे आणि आज हि इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान सौ. हीना ओझा ह्यांनी बोलून दाखवले. सौ. सुनिता ताई पागे ह्यांनी आपल्या सुश्राव्य मधुर आवाजात सर्वांचे अभिवादन करताना अधिवेशनाला शुभेछ्या दिल्या. सुनीताताई ह्या नुसत्या ज्योतिष शास्त्र , Taro Card ह्यातच प्रगत नाहीत तर त्या अत्यंत क्रिएटीव्ह आहेत हे त्यांच्या e magzine वरून लक्ष्यात येतेच . भावनाविवश झालेल्या श्री कैलास केंजळे ह्यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले.
बुधवारीय व्याख्यानमालेचे अर्ध शतक पार केलेल्या सर्वेसर्वा आणि सर्वश्रुत सर्वांच्या आवडत्या
सौ. जयश्रीताई बेलसरे ह्यांनी त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले. गेली ३० वर्षे ज्योतिष विश्वात कार्यरत आणि २५ वर्षे ज्योतिर्विद महासभेत दर शनिवारी निःशुल्क व्याख्यानांचे आयोजन केले . ह्या संस्थे तर्फे 13 ज्योतिष भूषण पुरस्कार प्रदान केले. सर्वात विशेष म्हणजे करोनाच्या अत्यंत वाईट काळात 2020 मध्ये त्यांनी zoom च्या माध्यमातून अधिवेशने घ्यायला सुरवात केली आणि जणू काही हे विश्वची माझे घर ह्या उक्तीला धरून ज्योतिष परिवार एकत्र आणला.
जयश्री ताईंनी संपूर्ण केंजळे परिवाराचे स्वागत केले. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या केंजळे कुटुंबियांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला कौटुंबिक स्वरूप आले . ग्रह आणि त्यांचे व्यवसाय ह्यांची सुरेख सांगड घालताना जयश्री ताई म्हणाल्या कि ज्योतिषाने आपला प्राण विषयात ओतला तर त्यातील गाभ्यापर्यंत नक्कीच जाता येयील.
अधिवेशन ५ सत्रांमध्ये संपन्न झाले. आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या दिल्लीच्या आचार्य रेखा डागर ह्यांनी अनेक संस्थांची उच्च पदे भूषवली आहेत . लाल किताब च्या अनुषंगाने काय दान करावे अथवा न करावे ह्याबद्दल विशेष मार्गदर्शन त्यांनी केले. . दलाई लामा ह्यांची भेट होण्याचे सौभाग्य प्राप्त झालेल्या , सौ. सुनीली जानी पवार(मुंबई) ह्यांनी साडेसाती ,शनी ,कर्माचा सिद्धांत , गोचर शनीचे पत्रिकेतील भ्रमण , पत्रिकेतील चंद्राची स्थिती ह्याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.
विद्याविभूषित आचार्य सौ. सर्वेश गुप्ता ह्यांनी Taro Cards बद्दल माहिती दिली. ह्या सत्राच्या अध्यक्षा सौ. स्मिता गिरी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. स्मिताताईंचा शापित कुंडली ह्या विषयाबद्दलचा अभ्यास खूप सखोल आहे. भारतातील अनेक ठिकाणाहून एकत्र आलेल्या सर्व महिला ज्योतिष अभ्यासकांना एकत्र आणण्याचे कार्य दादांनी केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. ह्या सत्रात मोलाचे मार्गदर्शन करून ज्ञानदान दिलेल्या सर्वांचे त्यांनी अभिष्टचिंतन केले.
अधिवेशनाच्या तिसऱ्या सूत्राचे संचालन सौ. श्वेता बोकील ह्यांनी केले. त्या गेल्या ५ वर्षापासून ज्योतिष शास्त्राची सेवा करत आहेत आणि अष्टकवर्गाचा अभ्यास तसेच आधुनिक पद्धतीने ग्रहमिलन , गुणमिलन हेही त्यांच्या अभ्यासाचे विषय आहे. मुंबईच्या डॉ. रिटाबेन गांधी ह्यांनी मोबाईल न्यूमेरोलॉजी ह्या विषयाबद्दल बद्दल आपले विचार मांडले .
ह्या सत्राची सांगता मुंबईच्या डॉ. सौ अरुणा जानी ह्यांच्या वक्री ग्रह त्यांच्यात कशी फळे देतात त्याचे सुंदर विश्लेषण केले. ग्रहांच्या मार्गी, स्तंभी आणि वक्री अवस्थातून त्यांनी आपल्याला प्रवास घडवला. पत्रिकेतून मुळच्या वक्री असलेल्या ग्रहावरून गोचरीचा वक्री ग्रह भ्रमण करताना राजयोगाची फळे मिळतात असे अनेक अनुभव सिद्ध नियम सर्वांच्याच ज्ञानात भर टाकणारे ,चिंतनशील बनवणारे होते. वक्री ग्रहाचा गत जन्माशी कसा संबंध असतो हे विषद करताना त्यांनी प्रत्येकाला ह्याबद्दलचा एक वेगळा दृष्टीकोण, विचार दिला. जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्व विषद करताना त्यांनी गुरूच्या वक्री स्थितीवर सुद्धा भाष्य केले . गुरूबद्दल चर्चा चालू असताना ह्या २ ओळी आठवल्या .
गुरुविणा जीवनात कोण येयील कामी , खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी |
जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती , गुरुपदी घेऊ चला क्षणभर विश्रांती ||
व्यासपीठावरील आणि उपस्थित सर्व गुरुतुल्य व्यक्तींना माझा साष्टांग नमस्कार .
दिल्लीच्या आचार्य भावना भाटिया ह्यांनी लाल किताब प्रमाणे ग्रहांचा आयुष्य मर्यादेवर होणारा प्रभाव विषद केला .आपल्या विचारांचे आदान प्रदान करणारा सुंदर मंच ,हे व्यासपीठ दादांनी दिले त्यामुळे वर्षातून एकदोनदा सर्व जण भेटत राहतात ह्यासाठी त्यांनी दादांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील आचार्य गीतू मिरपुरी ह्यांनी क्रिस्टल थेरपी बद्दल माहिती दिली. आचार्य प्रीती दवे ह्यांनी वास्तुशास्त्राची माहिती देताना आपल्याला ज्योतिषशास्त्राची सखोल माहिती नसली तरी विषय आवडीचा आहे हे सांगताना वास्तूचे काही उपाय सांगितले. ह्या सत्राची पूर्तता सौ संजीवनी मुळे ह्यांनी आपल्या सुश्राव्य व्याख्यानाने केली. सर्व व्याख्यात्यांचे आभार मानून त्या म्हणाल्या आज आम्हाला अनेक विषयातील ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याबद्दल आनंदच वाटतो.
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सूर्याशी || संत मुक्ताबाई
चौथ्या सत्राची सुरवात रायपुर च्या प्रज्ञा त्रिवेदी ह्यांनी मानसिक समस्या आणि ग्रहयोग ह्या विषयावरील विवेचनाने केली. मुंबईच्या मनीषा किणी ह्यांनी फुलांच्या फ्रिक्वेन्सीचा आपल्या मानसिकतेशी कसा संबंध आहे आणि त्यांचा वापर करून आपण मानसिक समस्यांना तिलांजली कशी देऊ शकतो ह्याची माहिती दिली. हा एक वेगळाच विषय आणि त्याची माहिती आज मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार .
पुण्याच्या अंजली पोतदार “ मृत्यू पुत्र – केतू “ हा एक हटके विषय सर्वांसमोर मांडला . केतूचे पत्रिकेतील प्रत्येक स्थानातील अभ्यासपूर्वक भ्रमण त्यांनी घडवले . केतूचे व्यक्तिमत्व समोर उभे केले. ह्या सत्राची सांगता अध्यक्षा सौ. सुनिता साने ह्यांनी केली. हे सत्र विशिष्ठ्य पूर्ण झाले हे सांगताना त्या खरच निशब्द झाल्या होत्या. त्यांनी सर्व आयोजकांचे आभार मानले.
अधिवेशनाच्या अखेरच्या सत्राने खास रंगत भरली. डॉ सौ. सविता महाडिक आणि सौ. मालती शर्मा ह्या विशेष सत्राच्या परीक्षक आणि अध्यक्षाही होत्या.
ह्या सत्रात “ उपयुक्त ज्योतिष सूत्र “ ह्या विषयावर चार मिनिटात आपले विचार मांडायचे होते . अनेक ज्योतिष प्रेमींनी ह्यात सहभाग घेतला. ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये 1000 , द्वितीय रुपये 750 आणि तृतीय रुपये 500 असे जाहीर झाले.
राजनंदा वर्तक ह्यांनी प्रथम पारितोषिकाचा मान पटकावला . द्वितीय पारितोषिक मुग्धा पत्की आणि हर्षदा देशपांडे ह्यांच्यात विभागून देण्यात आले. तृतीय पारितोषिक योजना गायकवाड ह्यांना देण्यात आले. सर्व विजेत्यांचे कौतुक आणि अभिनंदन.
अधिवेशन नेहमीप्रमाणेच शिस्तबद्ध झाले. सौ गौरी केंजळे ह्यांनी सर्वांचे आभार मानून ह्या कार्यक्रमाची सांगता केली. कितीही दमली तरी सुरवातीपासून अधिवेशनाच्या शेवटपर्यंत असलेला टवटवीत चेहरा म्हणजेच गौरी . श्री दादा शेवाळे ह्यांनीही सर्वांचे अभिवादन केले . सर्वांच्या उपस्थितीमुळे हे अधिवेशन आठवणीत राहील हे आवर्जून सांगितले.
आज ह्या अधिवेशनाने आम्हाला माहेरी आल्याचा फील दिला. सगळ्या नणंदा , भावजया , लेकी सुना एकत्र येऊन सद्गुणांची देवाणघेवाण करताना दिसल्या. स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभारलेल्या ह्या व्यासपीठाने प्रत्येक स्त्रीमधील सुप्तगुणांना व्यक्त होण्याची संधी दिली. आज उपस्थित सर्वच व्याख्यात्या इतक्या महान आहेत कि त्यांचे वर्णन करायला माझी शब्दसंपदा कमीच पडेल.
रोजचे जीवन जगताना ,संसारिक जबाबदाऱ्या पेलताना आपल्या आवडत्या छंदांना आत्मविश्वासाचे पंख लावून मुक्त विहार करायला देणाऱ्या ह्या व्यासपीठासमोर आणि सर्व आयोजकांसमोर मी नतमस्तक.
माझ्यातील लेखिकेला आपले विचार लेखनाच्या माध्यमातून मांडण्याची हि संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या लाडक्या दादांचे मनापासून आभार मानते. आपल्यासारखे दर्दी वाचक आहेत म्हणून लेखकाच्या लेखनाला न्याय मिळतो. एकमेकांचे पाय खेचणे हे चित्रच नेहमी समाजात दिसते. पण प्रत्येकातील सुप्त गुण ओळखून त्यांना पुढे आणण्यासाठी धडपड करणारे हे जगावेगळे ,अत्यंत प्रेमळ ,निरपेक्षपणे आपले काम करत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे “ दादा शेवाळे “. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी माणसे आज विरळाच आहेत . पण दादा मात्र प्रत्येकाच्या मागे खंबीर उभे राहतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आजचा हा सोहळा पार पडला.
मोत्याच्या माळेतून एकेक मोती ओघळत जावा तसे आजचे एकेक व्याख्यान होत होते. अनेकविध विषयांचे ज्ञान एका छताखाली देऊ पाहणारे हे गुरुकुल आहे. सर्व कार्यकारी मंडळाचे आणि आयोजकांचे मनापासून कौतुक. ज्योतिष ह्या विषयापुरते मर्यादित न राहता इतर अनेक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या आपल्या मैत्रीणीना इथे आमंत्रित करावे असे आयोजकांना सुचवावेसे वाटते.
आजच्या अधिवेशनाला मायेचा सुगंध निश्चित होता . प्रत्येकाचा विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन वाखाणण्याजोगा होता. आपलेपणाची झालर असलेले हे अधिवेशन खूप काही देऊन गेले. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते पण प्रत्येक स्त्री सुद्धा आपल्या सखीच्या मागे उभी राहून तिला यशाची शिखरे पादाक्रांत करायला मदत करू शकते हेच बाळकडू आज मिळाले . अत्यंत सुरेल , शिस्तबद्ध आयोजन ह्या गोष्टी नजरेतून सुटणार नाहीत . अभ्यासू सख्यांच्या ज्ञानगंगेत मने चिंब भिजून गेली. एकाच व्यासपीठावर व्यासंगी ,उत्तुंग व्यक्तिमत्व एकत्रित असल्यामुळे व्यासपीठ “ गुरुकुल “ झाले होते. दिवस भुर्रकन उडून गेला आणि सांगतेचा क्षण जवळ आला.
आजचे अधिवेशन स्त्री शक्तीचा जागर करणारे, स्त्री च्या कर्तुत्वाला सलाम करणारे ,स्त्रीयांच्या एकजुटीचे महत्व सांगणारे ठरले. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असतेच पण त्याहीपलीकडे प्रत्येक स्त्रीने आपले अस्तित्व सिद्ध केले पाहिजे ,आपल्यातील कलागुणांना आपणच हेरले पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केले पाहिजे. थायलंड ,सिंगापूर आणि अन्य देशात ९०% पेक्षा अधिक स्त्रिया विविध क्षेत्रात कार्यरत आहेत . जी स्त्री एका जीवाला जन्म देऊ शकते ती यशाची अगणित दालने उघडू शकते ,तिला काहीच अशक्य नाही. आजच्या सगळ्या आठवणी पुढील अधिवेशनापर्यंत चिरकाल स्मृतीत दरवळत राहतील.
आज सणासुदीच्या दिवसामुळे अनेक सख्या ह्या कार्यक्रमाला हजेरी लाऊ शकल्या नाहीत , त्यांच्यासाठी खास हा “ आंखो देखा हाल “ जेणेकरून मी काहीतरी गमावले “ ह्याची हुरहूर त्यांना वाटायला नको. अधिवेशनाची सांगता होताना सगळेच सद्गदित झाले.
आपल्या सर्व सख्यांचे हे व्यासपीठ आपले हक्काचेच आहे म्हणूनच एक क्षण मानत आले कि उपस्थित आणि अनुपस्थित सर्व सख्यांना जणू हे व्यासपीठ “ या सख्यानो या “ असेच तर म्हणत नसेल...
आपण सर्वच पुन्हापुन्हा असेच भेटत राहणार आहोत आणि प्रत्येक वेळी इथून जाताना आयुष्य एक वेगळ्याच उंचीवर नेणार आहोत .
संकलन : सौ.अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
antarnad18@gmail.com