|| श्रीस्वामी समर्थ ||
प्रत्येकाची खूप स्वप्ने असतात . पण ती सत्यात उतरवण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती , मेहनत लागते. सहज सोप्पे काहीच नसते पण अविश्रांत परिश्रमाने यशश्री खेचून आणता येते.
“ मला भावलेली व्यक्तिमत्वे “ ह्या “ अंतर्नाद “ वरील सदरात आज अश्याच एका धाडसी , अभ्यासू मित्राची ओळख करून देणार आहे ज्याने आयुष्यातील वाटा चोखंदळपणे निवडल्या आणि आपल्या ध्येय पुर्तीकडे यशस्वी वाटचाल केली.
स्वतःच्यातील सुप्त गुण ओळखेपर्यंत कधीकधी आपले अर्धे आयुष्य निघून जाते. आजची पिढी खूप सक्षम , समंजस, हुशार आणि कर्तुत्ववान आहे. पण ह्या गुणांचे चीज होण्यासाठी स्वतःलाही त्यात झोकून द्यावे लागते. अश्याच एका “ समाजाला काहीतरी वेगळे देऊ पाहणाऱ्या “ पुण्याच्या श्री. सौरभ नाफडे " ह्यांचा परिचय करून देताना आज मनापासून आनंद होत आहे.
ज्योतिष शास्त्र तसेच इतरही काही माहितीपूर्ण सदर सादर करणारे “ वस्तुस्थिती “ हे youtube chanel सुरु करून त्याने आजच्या तरुण पिढीसमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आज त्याच्या कडूनच त्याच्या ह्या प्रवासाबद्दल ,त्याच्याबद्दल आणि त्याच्या ह्या हटके chanel बद्दल अधिक जाणून घेऊया .
सौरभचा ज्योतिष शास्त्राचा प्रवास हा 2009 सुरु झाला. श्री वदा भट सरांची पुस्तके वाचून ह्या शास्त्राच्या अभ्यासाचा श्रीगणेशा झाला. ह्या शास्त्राबद्दल त्याच्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले आणि ह्या क्षेत्रात आपल्याला काय करता येईल अश्या सर्व विचारातून अभ्यास पुढे गेला. 2016 नंतर त्याच्या ज्योतिष शास्त्र शिकण्याच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने गती आली . ह्या क्षेत्रातील एक उत्तुंग आदर्श व्यक्तिमत्व , अभ्यासक सौ. शिल्पाताई अग्निहोत्री ह्या त्याला गुरु म्हणून लाभल्या आणि खरे शिक्षण सुरु झाले. गेली ५ वर्षे ह्या शास्त्रातील त्याचे अध्ययन , चिंतन , मनन ह्यामुळे अभ्यास परिपक्वतेकडे गेला . ज्योतिष आणि वास्तुचाही अभ्यास करत असताना आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे हि भावना त्याच्या मनात रुंजी घालत होती. आयुष्यात सगळ्यात महत्वाचे काय असते तर आजचा आत्ताचा क्षण . आज ह्या क्षेत्रात काय घडामोडी घडत आहेत , काय वेगळेपण आहे ह्या सर्वाचा विचार करताना आपण ह्या शास्त्राच्या अभ्यासकांना , त्यांच्या विचारांना चालना देणारे ,अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले पाहिजे ह्या विचारांनी प्रेरित होत असतानाच “ वस्तुस्थिती “ ची संकल्पना आकारास आली . अल्प काळातच अभ्यासकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या ह्या त्याच्या chanel बद्दल सांगताना सौरभ भरभरून बोलत होता. त्याचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी मीसुद्धा उत्सुक होतेच.
“ Present moment is inevitable “ ह्या सूत्राला धरून,ज्योतिष शास्त्रात आज काय घडामोडी संशोधन होत आहे ,त्याचा जवळून आढावा घेणारे , वर्तमानाशी संबंधित असणारे तसेच नवीन ज्योतिष शिकणार्यांसाठी काय देता येयील ह्याचा विचार “ वस्तुस्थिती “ मध्ये केलेला दिसतो. भविष्य घडवायचे असेल तर वर्तमान काळाचे भान ठेवून जगता आले पाहिजे.
ज्योतिष विशारद , ज्योतिष पंडित , वास्तूविशारद असलेल्या सौरभ ने ज्योतिष आणि वास्तू ह्यांचा एकत्र मेळ घालून एका वेगळ्या दृष्टीने पत्रिकेचा अभ्यास करता येतो का , वास्तू आणि ज्योतिषीय संकल्पनांमध्ये काही समान संदर्भ सूर सापडतो तसेच ज्योतिष ग्रंथांमध्ये सुद्धा वास्तूच्या नियमांवर प्रकाश टाकला आहे का ह्यासाठी चे संशोधन अजूनही तो करत आहे. दिशा आणि ग्रह ह्यांचा एकमेकांशी असलेला संदर्भ त्यांचे परिणाम आणि त्याचा पत्रिकेत मिळणारा अनुभव हा विषय गहन आहे आणि त्याचाही अभ्यास सौरभ अनेक वर्ष करत आहे. तसेच जैमिनी सूत्रे , वास्तूच्या 45 देवतांचा वैदिक संदर्भ ह्याचाही अभ्यास चालू आहे. मानवी जीवनाशी ह्या सर्वाची सांगड घालता येते का हा
“ वस्तुस्थिती “ चा प्रमुख उद्देश आहे. ज्योतिष शास्त्रातील संकल्पना सुलभ साध्या सोप्या शब्दात कथन करणे जेणेकडून हा विषय सहज उलगडेल. लहान विषय घेवून एखादा मोठा गाभा समजावून सांगणे ह्याकडे ह्या chanel चा अधिक कल असल्यामुळे हे chanel सर्वार्थाने “ हटके “ झाले आहे. योग्य विषयाची निवड , त्याची बांधणी ,त्या समाविष्ट असणार्या गोष्टी ह्या सर्वच अद्भुत आहेत.
आदिशक्ती ज्योतीर्विद्यालात अनेक गोष्टीत सहभाग असणार्या सौरभ ला तिथे शिकवण्याचीही संधी मिळाली . अत्यंत प्रामाणिक पणे अध्ययन करणाऱ्या सौरभ साठीच नाही तर त्याच्या सर्व चाहत्यांसाठी
“ वस्तुस्थिती “ हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे हे नक्की ,त्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन.
सौरभ इतक्या गोष्टी एकावेळी कश्या सहजतेने करतो हे माझ्यासाठी एक अप्रूप आहे. पण प्रत्येक गोष्ट मी का करत आहे आणि कुठवर करणार आहे ह्याबद्दलचे त्याचे विचार अत्यंत स्पष्ट असतात . कुठलीही गोष्ट तळमळीने करणे त्यात जीव ओतणे ह्या त्याच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या कामात दिसतेच.
ह्या क्षेत्रात काम करत खूप पुढे गेलेल्या सौरभ ला “ स्वतःची संस्था “ स्थापन करण्याचे मनसुबे आहेत का ? ह्या माझ्या प्रश्नावर त्याने सांगितले सध्या तरी अनेक प्रोजेक्ट हातात असल्यामुळे त्याबद्दल विचार नाही.
ज्योतिष शास्त्र हे प्रत्येकाने शिकावे असे मला वाटते कारण मानवी जीवनाशी त्याचा नजीकचा संबंध आहे. ज्योतिषाचा अभ्यास हा आपली विचारसरणी , जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ह्यात अमुलाग्र बदल घडवते हे सांगताना सौरभ ने अनेक उदाहरणे दिली .आपल्या बाबत जे घडतंय त्याला सर्वार्थाने आपणच जबाबदार आहोत त्याचा दोष इतर कुणाचाच नसून स्वतःचाच आहे हे मान्य करण्याची वृत्ती ह्या अभ्यासामुळे मिळते. स्वतःच्याच आयुष्यातील घटनांचा मागोवा घेताना त्या का घडल्या ह्याचे उत्तर मिळू शकते. परमेश्वराच्या निकट जाण्यासाठी ह्या शास्त्राचे अध्ययन उपयोगी पडते हे सांगताना सौरभ म्हणाला कि जीवन कसे जगायचे हे ह्या शास्त्रानेच मला शिकवले म्हणून मी त्यासमोर नतमस्तक आहे.
आजच्या नवीन अभ्यासकांना तू काय सांगशील ह्यावर “ काहीच जमत नाही म्हणून मग आता मी ज्योतिषी होतो” असे न करता ह्या शास्त्राचे सखोल अध्ययन ,तळमळ, वेदांचा अभ्यास ह्या सर्व गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची मनोधारणा , जिद्द ,कष्ट करायची तयारी आणि सर्वात मुख्य म्हणजे संयम हवा हे आवर्जून सांगितले. चार सहा महिन्याच्या अभ्यासाने फलादेश करणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे कारण ह्यात फलादेश चुकू शकतो आणि पर्यायाने जातकाचा ह्या शास्त्रावरचा विश्वास उडू शकतो. ह्या शास्त्रात अजून खूप अभ्यास करण्याला वाव आहे आणि त्यातील गोष्टींची समाजाला वेळोवेळी जाणीव करून देऊन समाज जागृती करण्याचीही नितांत आवश्यकता आहे.
सौरभ तळमळीने सांगत होता कि हे शास्त्र महान आहे त्यामुळे अयोग्य शिष्याला ते शिकवले सुद्धा जाऊही नये. उगीचच शिष्यांची कुमक तयार करण्यात काहीच अर्थ नाही. तळमळीने शिकणारे आणि शिकवणारे महत्वाचे आहेत . हे शास्त्र शिकवताना स्वतःची उपासना , आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण आणि गुरूंची उपासना अतिशय महत्वाची आहे. कुठेही शिका पण जो ह्या शास्त्राचा गाभा तुमच्यासमोर ठेवील तोच खरा शिक्षक असेल.
सध्याची पिढी संशोधनात एक पाऊल पुढेच आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीने हे शास्त्र नक्कीच अभ्यासावे .
आजकाल ह्या शास्त्रात खूप फसवणूक होताना दिसते ह्यावर काय सांगशील ह्यावर सौरभ म्हणाला ह्यावर खूप बोलण्यासारखे आहेच पण प्रत्येकाने डोळसपणे विचार करणे सर्वात महत्वाचे आहे. भूतकाळात जो रमला तो भविष्य घडवू शकत नाही पण जो आत्ताचा क्षण परिपूर्णतेने जगतो त्याचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.
कुठल्याही ज्योतिषाकडे सल्ला मागायला न जाता विचार विनिमय करायला जाणे सर्वात उत्तम म्हणूनच प्रत्येकाने ह्या शास्त्राचे अध्ययन करावे. अश्यावेळी भावनाविवश होण्यापेक्षा प्रक्टिकल अप्रोच ठेवला तर चांगलेच होईल. वाट्टेल तितके पैसे देऊन रत्न घेण्यापेक्षा उपासना वाढवा त्याचा प्रत्यय जास्ती लवकर येयील.
तुझ्या गुरु सौ. शिल्पाताई ह्यांच्या बद्दल काय सांगशील ह्यावर सौरभ सद्गदित झाला . त्यांच्या सारख्या गुरु लाभणे हे माझे भाग्यच आहे कारण त्या नुसत्याच उत्तम शिक्षक अभ्यासक नाहीत तर त्यांच्या अध्यात्मिक बैठक उत्तम आहे. त्या सर्वश्रेष्ठ उपासक असल्यामुळेच जीवनातील नितीमुल्ये , अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे , काय सोडून द्यायचे अश्या अनेक गोष्टीत त्यांचे अनमोल मार्गदर्शन नेहमीच मिळत असते. त्यांना ज्योतिषाबद्दल अतिशय कळकळ ,उर्मी आहे म्हणून त्या ह्या क्षेत्रात अविस्मरणीय काम करत आहेत.
स्वतःच्या ज्योतिष वाटचालीबद्दल काय सांगशील ह्यावर त्याने अजूनही मी अभ्यासक आहे , अजूनही खूप काही वाचायचे आहे. अध्ययन करायचे आहे. अध्यात्मिक स्थर वाढवायचा आहे. प्रत्येकाने अभ्यासाला लागा कारण एका जन्मात शिकण्यासारखे हे शास्त्र नाही इतका ह्याचा आवाका मोठा आहे.
ज्योतिष शास्त्राचे अध्ययन करणाऱ्या प्रत्येकाने ह्या शास्त्राविषयी जाज्वल्य अभिमान ठेवला पाहिजे म्हणजे ह्या शास्त्राला नावे ठेवणार्यांची संख्या आणि अश्या घटना ह्यांना खिळ बसेल हे सांगताना सौरभ म्हणाला स्वतःचे ज्ञान वाढवणे हे सर्वात उत्तमच.
भविष्यातील योजनांबद्दल काही विचार केला आहे का ह्यावर त्याने आम्ही काही इंजिनिअर मित्र मिळून पुढे एखादी संस्था काढण्याचा विचार करूही. आपल्या परंपरा , रूढी संस्कार , ग्रंथ ह्यावर आपले उज्ज्वल भविष्य आहेच पण प्रत्येकाने ह्यात योगदान दिले पाहिजे. आपल्या चालीरीती , ऋषीमुनींनी आपल्याला वेद ,पुराण आणि अनेक शास्त्र ह्यांच्या रुपात दिलेल्या देणगीचा योग्य तो मान ठेवला पाहिजे.
सौरभ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे आणि त्याच्याशी गप्पा मारताना हे ज्ञानाचे दालन माझ्यासाठी देखील खुले झाले . भाषेवर उत्तम प्रभुत्व असणार्या सौरभने अनेक प्राचीन ग्रंथ सुद्धा अभ्यासले आहेत . सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिष हे काळानुसार बदलले पाहिजे कारण जातकाचे प्रश्न हे सुद्धा काळानुसार बदलत असतात आणि ह्याचे भान ज्योतिष अभ्यासकांनाअसणे आवश्यक आहे. नुसती विद्यार्थ्यांची झुंबड तयार न करता त्यातून हुशार ज्योतिषी कसे तयार होयील हा एक मोठा चालेंज आहे असे त्याने आवर्जून सांगितले. इतका मोठा विषय समजावून घेणे आणि समजावून सांगणे हीसुद्धा एक साधनाच आहे. हा विषय समाजाच्या आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी हिताचा असल्यामुळे त्याचे गांभीर्य लक्ष्यात आले पाहिजे.भविष्य कथन करणाऱ्या प्रत्येकाला साधना ,उपासनेची बैठक अत्यावश्यक आहे. सौरभ च्या आजवरच्या यशाचे गमक म्हणजे नुसतेच पुस्तकी पांडित्य नाही तर त्याने स्वतः चौकटीच्या बाहेर जाऊन संपादन केलेले ज्ञान . शास्त्राचा अभ्यास करण्याची तळमळ, परिपूर्णतेकडे जाण्याची धडपड ,स्वतःचे दिलेले योगदान ,मनन ,चिंतन हेच आहे. शास्त्रातील एखादा नियम सिद्ध झाला पण तो कसा झाला त्याची कारणमीमांसा करण्याची जिज्ञासू वृत्ती ,डोळसपणे एखाद्या पत्रिकेचा केलेला अभ्यास ह्या सर्वांमुळे त्याचा व्यासंग वाढला आहे.
आज त्याच्या गुरु सौ. शिल्पाताई ह्यानाही अभिमान वाटेल अशी प्रशंसनीय कामगिरी त्यांनी केली आहे त्याबद्दल त्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. गुरुशिष्य परंपरेला साजेल अश्या ह्या व्यक्तिमत्वाचा शास्त्राच्या अभ्यासातील प्रवास तुमच्यासमोर उलगडून दाखवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
“ वस्तुस्थिती “ आज प्रत्येक ज्योतिष प्रेमींचा हृदयापर्यंत पोहोचत आहे. आजवर झालेली 40 व्याख्याने ,एकापेक्षा एक उत्तम वक्ते , त्यांनी हाताळलेले विषय ,त्याची मुद्देसूद मांडणी , उत्तम संकलन ह्यामुळे ज्योतिषप्रेमींच्या अपेक्षा वाढत आहेत. भविष्यात अंकशास्त्र आणि तत्सम विषयावरील व्याख्यानांचाही आस्वाद “ वस्तुस्थिती “ वर ज्योतिष अभ्यासकांना घेता येणार आहे.
जीवनात खूप काही हटके करता येते किबहुना तसाच प्रयत्न प्रत्येकाचा असला पाहिजे ह्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीसमोर सौरभने घालून दिला आहे . एखादी कल्पना मनात येणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . अभ्यासू वृत्ती , परिश्रमाची जोड जीवनात यशश्री खेचूनआणतेच ह्याचे “ वस्तुस्थिती” पेक्षा हटके उदाहरण असूच शकत नाही . मी ज्ञान संपादन करत आहेच पण त्याहीपेक्षा 16 आणे खरे ज्ञान हातचे काहीही राखून न ठेवता भरभरून देत आहे त्याचा आनंद आणि समाधान सौरभच्या बोलण्यातून जाणवत होते. समाधान हि आयुष्यात खरच खूप मोठी गोष्ट आहे. समर्पणाची भावना असेल तर प्रत्येक कलाकृती माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जाते.
आज सौरभ ने आपल्याला सगळ्यांना खरच हटके ज्ञान दिले ,त्याच्या डोळ्यांनी ज्योतिषा कडे पाहताना नवा दृष्टीकोन लाभला. नुसतेच पुस्तकी पांडित्य नाही तर त्यावर स्वतःचा अभ्यास , संशोधन ,चिंतन ,सातत्य किती आवश्यक आहे हे अनुभवता आले.
“ वस्तुस्थिती “ काहीतरी वेगळे देऊ पहात आहे .आम्हा सर्व ज्योतिष अभ्यासकांसाठी आपल्या ह्या मराठी माणसाचे ज्ञानप्रद chanel हि अभिमानाची गोष्ट आहे. जनमानसातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . “ वस्तुस्थिती “ च्या यशाचे मानकरी ह्या उपक्रमात सहभागी असणारे सर्व वक्तेही आहेत .त्यांच्यामुळे ह्या chanel चे वेगळेपण जाणवल्याशिवाय रहात नाही . अनुभव घेण्यासाठी ह्या chanel ला अवश्य भेट द्या आणि अभिप्राय सुद्धा कळवा .
आपण आयुष्यभर प्रवास करताच असतो .पण एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो. जीवन समृद्ध करतो आणि नवा दृष्टीकोन सुद्धा देतो. जीवन जगताना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे ,काहीतरी मिळवणे आणि प्रत्येकाच्या स्मृतीत राहील असे काम करणे हीच तर आनंदी जिवनाची गुरुकिल्ली आहे. आज शिक्षक दिनाच्या निम्मित्ताने ह्या गुरु शिष्यांबद्दल लिहिताना मला अनेक गोष्टी नव्याने उलगडल्या हे आवर्जून सांगावेसे वाटते. कुटुंबवत्सल सौरभशी झालेल्या दिलखुलास गप्पा रंगत गेल्या.आपल्यातील एक मराठी मुलगा काहीतरी वेगळे करत आहे त्याचा एक मराठी भाषिक म्हणून मला अभिमान आहे.
प्रत्येकाला जीवनात अशीच आनंदाची ध्येयपूर्ती करणारी “ हटके “ वाट मिळूदे आणि त्यावरील त्यांचा प्रवास ज्ञानाची अनेक दालने खुली करणारा असो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. सौरभच्या “वस्तुस्थिती” आणि पुढील ज्योतिषमय वाटेसाठी खूप शुभेछ्या. हा प्रवास आनंदयात्राच आहे आणि ह्यात आपण सगळेच त्याचे सह प्रवासी आहोत. " वस्तुस्थिती " सर्वाना मार्गदर्शक ठरणार आहे ह्यात दुमत नाही.
अस्मिता
antarnad18@gmail.com
#अंतर्नाद#वेगळ्यावाटा#ध्येय#ज्योतिषमय#वस्तुस्थिती#वास्तुशास्त्र#चिंतनशील#नव्यापिढीलाआदर्श
तुम्हालाही अशीच वेगळी वाट निवडायची असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करा.
श्री. सौरभ नाफडे ( वास्तू ज्योतिष )
scnaphade@gmail.com
website : www.vastustithi.com
Khupach chaan
ReplyDeleteअस्मिता ताई खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏🙏
ReplyDelete