Sunday, 26 April 2026

शरणागती

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्य ओंजळीतून निघून जाताना देवाची आठवण येते. आयुष्याच्या संध्याकाळी सगळा अहंकार नेस्तनाबूत होतो. आपण किती हतबल आहोत ह्याची मनोमनी जाणीव होते आणि खात्रीही पटते . मोठ्या गुर्मीत वावरणारे आपण आयुष्यभर ह्याला कमी लेख त्याची निंदा कर , संपत्तीचा अभिमान , पैशाचा माज , आपल्या कर्तुत्वाचा गर्व अश्या अनेक गोष्टीतून कधी बाहेरच येत नाही. पण एकदा तरी तो आपल्याला आपली जागा दाखवतो आणि ती अश्या प्रकारे दाखवतो कि बस्स..

आपण एकटे येणार आणि एकटे जाणार पण हे माहित असूनही आपल्या अणुरेणूत भिनलेला आहे प्रचंड महाकाय अहंकार . आपण सगळे एकाच बोटीतील प्रवासी आहोत . खोट्या पाशात अडकलेले आणि मोह माया हेच जग समजणारे. जगण्याची खरी लज्जत काय आहे ते आपल्याला दाखवते ते अध्यात्म जेव्हा दुक्ख संकटे गळ्यापर्यंत येतात आणि आपल्याच असहाय्यतेची जाणीव होते. ना रक्त तयार करू शकत आपण ना पाऊस पाडू शकत , पडलेला पाऊस ना थांबवू शकत . कुणाचा जन्म ना मृत्य काहीच हाती नसतानाही इतका अहंकार जन्मभर आपल्या सोबत प्रवास करत असतो. 

जीवन बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण , सेवाभाव . ह्यामुळे आपल्याला नवीन जीवन प्राप्त होते. नामस्मरण जीवनाचा आणि पर्यायाने आपलाही कायापालट करत , आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते आणि समर्पणाची भावना निर्माण झाली कि तो आपल्या मागे अनंत हाताने उभा राहतो त्याची प्रचीती सुद्धा येऊ लागते.

ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . अध्यात्मात गेल्यावर मागे वळून पाहायचे नाही कारण आता त्यांच्या शाळेत नाव घातले आहे .मग त्यांच्यावर निस्सीम भक्ती आणि सेवा करत रहायची. आपल्याला काय कधी द्यायचे ते तेच ठरवतील. 

आपल्या कर्माचा कारक शनी आहे आणि म्हणून दशम भावात त्याची नेमणूक आहे जो कर्माचा भाव आहे. आपल्या कर्माचा लेखाजोखा त्याच्याकडे प्रत्येक क्षणी आहे कारण तो आपल्या आतच आहे. आपली कर्म आणि ग्रह हे एकमेकांना पूरक आहेत . ग्रह कर्माची फळे देण्यास बांधील असतात त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही दोष असेल तर तो आपलाच आहे. 

हनुमान जयंती हा समर्पणाचा दिवस आहे. हनुमानाकडे काय मागायचे ?????? जशी तुझी श्री रामावर श्रद्धा आहे तुझ्या आयुष्यात आणि हृदयात त्यांचे स्थान आहे तसेच माझ्याही मनात माझ्या गुरूंचे महाराजांचे स्थान असुदे. माझी श्रद्धा बळकट होवूदे आणि जीवन त्यांच्याच चरणी समर्पित होवूदे.

इतके मागायचे आणि श्री हनुमान कसे रामाचे भक्त आहेत तसे आपणही आपल्या सद्गुरूंचे निस्सीम भक्त होण्यासाठी त्यांच्या चरणी शरण जायचे. कसलीही चिंता काळजी उरणारच नाही कारण आपला प्रपंच ते चालवणार मग आपल्या हाती उरलेच काय ? चिंता आपल्याला जाळत असते तीच निघून गेली कि आपण भक्तीमध्ये आपला जन्म घालवायला मोकळे .

आयुष्यात असा क्षण येतो जिथे कुणीच आपले रहात नाही त्यावेळी आधार असतो तो प्रत्यक्ष परमेश्वराचा जो चराचरात आहे. प्रश्न आहे तो त्याचे अस्तित्व मान्य करण्याचा आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर अहंकार विरहित जीवन जगण्याचा . जगण्याचा आनंद प्रत्येक गोष्टीतून मिळायला लागतो. नुसते घेणे नाही तर देणेही होवू लागते . त्याच्या भरवश्यावर जीवन जगण्याची कला आत्मसात केली आणि शरण गेलो तर आयुष्यात काहीही कमी नाही.

इथून काहीच घेवून नाही जायचे आपल्याला त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत आणि पुढील प्रवासात त्याचा हात घट्ट धरून ठेवायचा आहे. त्यांचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही आणि जीवन सुकर होते.

एकदा का मनाने आपण त्यांचे झालो कि क्षणोक्षणी प्रचीती देणारे तेच आहेत आणि त्याची दिव्य अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे .   आपला अहंकार मुळापासून उखडून टाकण्यासाठी परिस्थितीही तेच निर्माण करतात आणि भक्तिमार्गाकडे आपले मन आपल्याही नकळत ओढले जाते हि त्यांचीच लीला आहे. 

फक्त अंतर्मनापासून आपल्या चुकांची कबुली आणि शरणागती आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकेल ह्यात शंका नाही. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .

हनुमान चालीसा अंतर्मानापासून पठण केली तर त्याचे शुभ परिणाम मिळतीलच. धैर्य , आयुष्य जगण्यासाठीचे बळ, आत्मविश्वास सगळ्यात वृद्धी होईल. 

हनुमान चालीसा म्हणण्यापूर्वी श्री रामाचा जप करायला विसरू नये कारण प्रत्यक्ष हनुमानाने सांगितले आहे जिथे राम आहे तिथे मी आहे. तसेच मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन शेंदूर मिश्रित तेल त्याच्या पायावर अर्पित करावे .

जय जय जय हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव कि नाई |

जय हनुमान 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

असेही एक वादळ

 || श्री स्वामी समर्थ ||


परवा एक स्त्री पत्रिका दाखवताना स्पष्ट म्हणाली , मी खूप सहन केलय आता मात्र मी ह्यांच्यासोबत राहू शकणार नाही. मी तिला म्हंटले आपण दोघांच्याही पत्रिका बघुया आणि मग विचार करू तर म्हणाली विचार झालाय करून माझा . एकदम तप्त वातावरण झाले होते . असो. 

दोघांच्याही पत्रिका बघितल्या . घटस्फोट होईल अशी मूळ ग्रहस्थिती नव्हती . विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि संतती सुद्धा होती. आर्थिक स्थैर्य होते , कुणाचे बाहेर काही प्रकरण नव्हते मग कारण काय तेही समजेना. तिचे म्हणणे असे कि नवरा घरात वेळ देत नाही . इतक्या कारणावरून कुणी वेगळे होते का. पण ऐकून घ्यायची मनस्थिती नव्हती . 

सध्याची त्यांची ग्रहस्थिती हि अर्थात बरी नव्हती , एकमेकांच्याबाबत संशय घेणारा राहू नाक खुपसत होता आणि मंगळ जरा जास्तीच प्रबळ होवून हमरीतुमरीवर आलेला होता. आता त्या जातकाची ऑफिस ची परीक्षा होती आणि त्या लेखा परीक्षेत तो पास झाला तर पुढे हुद्दा आणि पगार दोन्ही वाढणार होते . गेले दोन वर्ष घर काम सर्व सांभाळून तो अभ्यास करत होता पण हिचे काहीतरी भलतच .

सांगायचे तात्पर्य असे कि हे रामायण गोचर ग्रहस्थिती विकोपास गेल्याने घडत होते आणि ते कालांतराने शांत होणार होते ते समजत होते पण तोवर हिला धीर धरणे आवश्यक होते . नवरा सतत घराबाहेर असतो , घरात कुठल्याही गोष्टीत लक्ष नाही , निट जेवत नाहीत , अश्या अनेक रोजच्या जीवनातील न संपणाऱ्या कुरबुरी ती सांगत असताना एक जाणवले कि तिचा त्याच्यावर राग नाही प्रेमच आहे . आपले माणूस सतत डोळ्यासमोर असावे असेच तिला वाटते पण सहवास लाभत नाहीय आणि संवाद सुद्धा हरपला आहे त्यामुळे ती कंटाळली आहे. खरेतर संसाराला इतकी वर्ष झाल्यावर असा पोरकट पणा शोभत नाही . मनोमन हसायला येत होते . काही दिवस थांबून मग बघूया असे सांगून तात्पुरती तरी मी तिची बोळवण केली. म्हणाली आज काय आणि उद्या काय फरक नाही पडणार मी होणार वेगळी माझे ठरले आहे असे म्हणत फोन ठेवला ..ठेवला कसला आपटला .

सप्तम स्थानाशी राहूचा संबंध आणि षष्ठ भावाची अंतर्दशा .अनेक ग्रहस्थिती त्यांना एकमेकांपासून दूर ठेवत होत्या पण म्हणून घटस्फोट होईल असे नाही. मुळात त्यांच्यात एकोपा , सहजीवनाचा आनंद देणारे आणि घेणारे ग्रहमान होते म्हणून तर संसाराची गाडी इथवर आलेली होती. त्यामुळे अश्या वेळी ग्रहस्थिती बदलायची वाट बघणे हा एकच उपाय होता . काही महिन्यांनी तिचाच फोन आला म्हणाली आम्हाला नवीन घर घ्यायचे आहे दोघांच्याही नावावर . ह्यांचा पगार वाढलाय आणि आता आम्हाला कर्ज पण मिळतंय . मला काही विचारायची गरज लागली नाही . अंतर्दश बदललेली होती. फोन ठेवताना तिचा स्वर सद्गदित झालेला जाणवला . थोडक्यात निभावले म्हणायचे.

कधीतरी जीवनात नात्यांमध्ये वादळ येते , पण ते येते आणि जाते , त्या मधल्या काळात संघर्ष असतो , पण म्हणून नाती तोडायची नाहीत हे एकदा मानाने ठरवले कि सगळे सोपे होवून जाते . 

आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलते आणि नवनवीन आव्हान सुद्धा घेवून येते . संसाराला काही वर्ष झाली कि तो लोणच्यासारखा मुरतो असे म्हणतात आणि नवरा बायको एकमेकांच्या सारखे दिसतात असेही ऐकले आहे . जीवनात गोडवा तेव्हाच टिकून राहतो जेव्हा उतरत्या काळात सुद्धा आपण आपल्या जोडीदाराचा हात सोडत नाही. संसार म्हणजे तडजोड आणि अर्थात संयम सुद्धा .

शुभं भवतु . 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

घटस्फोट

 || श्री स्वामी समर्थ || 

विवाह हि घटना आयुष्याला खर्या अर्थाने अर्थपूर्ण करणारी , जीवनात प्रीतीचे , सौख्याचे रंग भरणारी आहे. हे रंग प्रीतीचे असतील तर सौख्य प्राप्ती होयील पण अनेकदा ते जीवनात वैफल्य आणणारे असतात . आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे . त्याला आधुनिक काळातील अनेक गणिते कारणीभूत आहेत . मुलांचे वैचारिक , आर्थिक स्वातंत्र आणि संपलेला संयम हि प्रमुख कारणे वाटतात . दिल्या घरी तू सुखी राहा हा आईचा पाठवणी करताना दिला जाणारा मंत्र जणू काळाच्या पडद्याआड गेल्याचे जाणवते .

विवाह सुखासीन होण्यासाठी दोघानाही सारखीच मेहनत आणि योगदान असले पाहिजे . अनेकदा दोन्ही कडील घरच्या मंडळींचे नको त्या गोष्टीत नाक खुपसणे कारणीभूत ठरते. विचारांचे अति स्वातंत्र सुद्धा भोवते .

आज ह्याबाबत काय ग्रहस्थिती असावी ह्यावर विचार करुया .

सप्तम भाव हा प्रणयाचे अंकुर फुलवणारा भाव आहे . धाक दाखवून जबरदस्ती करून मिळणारे प्रेम खर्च प्रेम असते का? म्हणूनच ह्या भावात पापग्रहांचे काहीच काम नाही . इथे चंद्र शुक्र ह्या कोमल ग्रहांचा अंकुश हवा . मंगळ काही अंशी हवा कारण तो आकर्षण प्रणय दाखवतो . पण पापग्रहांच्या विळख्यात सप्तम भाव आणि सप्तमेश मात्र त्यांचे मूर्त स्वरूपाच हरवून बसतील.  लग्नी मंगळ ,सप्तमात वक्री हर्शल ,सप्तमात वक्री मंगळ तसेच शुक्र हर्षल युती ,शुक्र लग्नी सप्तमात हर्शल , शुक्र आणि सप्तमेश वक्री ,सप्तमेशाची हर्शल ची युती हि ग्रहस्थिती बोलकी आहे.


पंचमातील गुरु थोडा व्यभिचार दर्शवतो . लग्नात शनी हर्शल युती , हर्शल वक्री केतू सप्तमात तसेच सप्तमात नेप म्हणजे गोंधळ. प्रणयाचा राजा शुक्र कृत्तिका नक्षत्रात वाईट फळे देतो.  सप्तम स्थानातील गुरु अशुभ फळे देतो, स्थानहानी करतो. शुक्राच्या किंवा स्त्री राशीतील गुरु अशुभ फळे देतो. पुनर्विवाह , विवाह न करणे होऊ शकते. शुक्र हा गुरूचा नैसर्गिक शत्रू आहे. २ आणि ७ हि शुक्राची स्थाने आहेत इथे गुरु अशुभ फळे देतो .सप्तम स्थानात धनु राशीचा गुरु असेल तर वैवाहिक जीवनात तीव्र असमाधान पाहायला मिळते.

सप्तम स्थान शुभ कर्तरीत चांगले पण पाप कर्तरीत वाईट . ६ ८ १२ चे भावेश ७ मध्ये नकोत .अशुभ फळे देतात . केंद्र कोणाधीपती म्हणजे ५ 9 चे भावेश ७ मध्ये उत्तम. लग्नेश सप्तमात असता पत्नीच्या अधीन राहतात. सप्तम स्थानापासून ६ ८ १२ स्थानातील पापग्रह त्रासदायक असतात .सप्तम स्थानाचे  षष्ठ म्हणजे व्ययस्थान , अष्टमस्थान म्हणजे धनस्थान आणि बारावे म्हणजे षष्ठ स्थान . षष्ठेश अष्टमेश युती सप्तम स्थानात .सप्तमेश व्ययेश युती व्ययात वाईट .शुक्राचे सर्व योग अभ्यासावेत जसे अस्तंगत ,वक्री . शुक्राच्या सप्तमात शनी मंगळ ,शनी राहू ,रवी शनी ,मंगळ हर्शल ,रवीहर्शल अशुभ. सप्तम स्थान शुभ कर्तरीत चांगले पण पाप कर्तरीत वाईट . ६ ८ १२ चे भावेश ७ मध्ये नकोत .अशुभ फळे देतात . केंद्र कोणाधीपती म्हणजे ५ 9 चे भावेश ७ मध्ये उत्तम. लग्नेश सप्तमात असता पत्नीच्या अधीन राहतात. सप्तम स्थानाचा विचार करताना केंद्रातून होणारे योग पण पाहावे लागतात .त्याकडे केलेले दुर्लक्ष्य हि ज्योतिषाची मोठी चूक ठरेल. अनेक स्त्रियांच्या पत्रिकेत लग्नातील पापग्रहांमुळे वैधव्य आलेले दिसते . धन स्थानात  किंवा  व्ययात जर मंगळ असेल तर सप्तमातील शनीशी होणार्या षडाष्टक योगामुळे वैवाहिक जीवनात संकटे निर्माण करेल. सप्तम स्थान दुषित असेल आणि चतुर्थात पापग्रह असतील तरी वैवाहिक जीवनात वादळे येतात .

जीवनात वादळे येतात तेव्हा नेमके कारण शोधणे कठीण जाते किबहुना एक कारण असूच शकत नाही तसेच विवाह मोडताना सुद्धा सर्वांगीण विचार केला तर एकमेकांवर आग पाखडून चालत नाही कारण चुका दोघांच्याही असतात फक्त त्या मोठ्या मानाने स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याची परिणीती सहजीवन दुभंगण्यात होते. 

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

भाग्योदय

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रत्येक स्थान हे महत्वाचे असते . आज आपण भाग्यस्थानाचा विचार करुया. भाग्य आणि लाभ ह्यात नेमके कोण मोठे हा प्रश्न पडतो. कर्म सगळेच करतात पण कर्म करताना यशाच्या शिखरावर जाणारे काहीच असतात. कर्मासोबत मिळते ती नशिबाची साथ म्हणूनच भाग्य हे अधिक महत्वाचे आहे. भाग्याची साथ असेल तर लाखातून एकाची निवड होत असते. इथे भाग्याची महती समजते. 

पत्रिकेतील प्रत्येक स्थान हे कुणाना कुणाचे तरी भाग्य स्थान आहे. कर्माचे भाग्यस्थान हे षष्ठ स्थान आहे. स्पर्धात्मक यश ६ व्या स्थानावरून बघतात. कुठल्याही गोष्टी चा दर्जा सुधारण्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्याची आणि  वास्तूमध्ये  नाविन्य येण्याची गरज असते. बाजारातील सशक्त स्पर्धेमुळे ह्या गोष्टी होवू शकतात. पूर्वी मारुती कार होती आता कितीतरी नवीन गाड्या आहेत.electronic ने बाजी मारल्यामुळे जाहिराती सुधारल्या . स्पर्धा हि निरोगी असेल तर कर्माचे भाग्य हे उजळताना दिसते.म्हणजेच षष्ठ स्थान चांगले असेल तर कर्म हे चांगले होताना दिसेल. 

लाभाचे भाग्यस्थान हे सप्तमस्थान.लाभाचा विचार करताना संसार सुखाचा होईल जर मिळालेला जोडीदार हा समंजस, विचारी ,योग्य निर्णय घेणारा ,प्रोत्चाहन देणारा असेल तरच . धंद्याची भरभराट कधी होईल जेव्हा तुमचा भागीदार चांगला असेल .तुम्ही एखादी गोष्ट उत्तम कधी करु शकता जेव्हा तुमच्या मागे एखादी व्यक्ती ठामपणे उभी असेल तेव्हाच. ह्या सर्व व्यक्ती सप्तमावरून पाहतो. व्यय हे मोक्ष स्थान आहे. व्यय स्थानाचे भाग्य अष्टमस्थान आहे. मृत्यपश्चात मोक्ष मिळतो .मोक्ष मिळण्यासाठी मृत्य यावा लागतो जो कुणालाच नको असतो पण मोक्ष तर हवा असतो . मृत्यूची स्थिती हि तुमच्या पुढील जन्माची सुरवात असते. अपघाती मृत्यू किंवा रोग होवून येणारे मृत्यू हे मोक्ष मिळण्यास अपयशी ठरतात. उलट सर्व सुखे उपभोगुन अध्यात्माकडे जाणारा माणूस मोक्ष प्राप्त करतो. मृत्यू च्या वेळची स्थिती हि पुढील जन्माचा भाग्योदय दर्शवत असते म्हणून.म्हणून पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी आधीच्या जन्मी मरण चांगले मिळणे आवश्यक आहे. लग्नाचे भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. नवम स्थान म्हणजे पिता , वंशवेल , धर्म त्रिकोण जो तुमच्या वंशाचा त्रिकोण आहे. भाग्य म्हणजे तुमचे वडील ,पंचम म्हणजे तुमचे आजोबा ,लग्न म्हणजे तुमचे पणजोबा आणि भाग्य म्हणजे पुन्हा खापर पणजोबा ,पुन्हा पंचम म्हणजे खापर खापर पणजोबा अशी हि मालिका लग्न पंचम आणि भाग्यातून चालू असते. धर्म त्रिकोण हा पितरांचा असून पितर दोष हा धर्म त्रिकोणावरून बघितला जातो. नवम स्थानातील केतू हा पितर दोषाचा कारक ग्रह आहे. नवम स्थान शुभ असेल तार दोष नसणाऱ्या कुटुंबात जन्म मिळतो आणि हे तुमचे भाग्य म्हणावे लागेल कारण दोषी वंशात जन्म मिळाला तर प्रथम ते दोष निवारण करायला लागतात आणि त्यानंतर तुमची कर्म गती चालू होताना दिसते. चांगले कुटुंब आणि वंश चांगल्या भाग्य स्थानामुळे मिळते. धन स्थानाचे भाग्य स्थान हे दशम स्थान किंवा कर्म स्थान आहे. उत्तम धनलाभ किंवा अर्थार्जन हे दशमस्थान चांगले असेल तरच मिळतो . 

तृतीय स्थान म्हणजे प्रगती, भावंडे , शेजारी . त्याचे भाग्य स्थान म्हणजे लाभ स्थान . आपल्या हाताखाली असणार्या लोकांनी चांगले काम केले त्यांच्याशी तुमचे चांगले tuning असेल तर यश मिळते. म्हणजेच लाभस्थान चांगले हवे तरच नेत्रदीपक यश मिळते. 

चतुर्थ स्थानाचे भाग्य स्थान हे व्यय स्थान आहे. व्यय स्थान हे खर्चाचे , गुंतवणुकीचे स्थान आहे. चतुर्थ स्थान हे जमीन जुमला ,वाहन ,घर ह्याशी संबंधित आहे. आजची चांगली गुंतवणूक हि चांगला जमीन जुमला तसेच सुख आणि आनंद मिळवून देत असतो . पैसा खर्च झाल्यावर सुख मिळतो , आयुष्यातील सगळ्या सुखांसाठी चांगला पैसा खर्च करावा लागतो आणि त्याची योग्य गुंतवणूक असेल तरच तो योग्य वेळी हाताशी येतो. खर्च किती चांगल्या रीतीने करत आहात त्यावर मिळणारे सुख अवलंबून आहे. खर्च अवास्तव झाला तार निराशा दुक्ख पदरी येते. पंचम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे लग्न स्थान .पंचम स्थान म्हणजे संतती ,विद्या पुढील जन्म . ह्या स्थानाचे भाग्य म्हणजे आपण स्वतःच . आपली प्रगती आपल्याच हातात असते.आपले शिक्षण आपणच करायचे आहे. संततीचे भाग्य सुद्धा आपणच आहोत .संतती वर चांगले संस्कार केलेत ,त्यांना चांगले वळण लावले तर म्हातारपणी हीच संतती तुम्हाला सुख देयील तुमचा आधार होईल.संततीच्या मागे खंबीर उभे राहायला लागते. संततीची गुणवत्ता हि आई वडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते.संतती वाढताना आपला वाटा त्यात खूप मोठा आहे. षष्ठ स्थान हे अनारोग्याचे स्थान आहे. त्याचे भाग्य स्थान म्हणजे धनस्थान .आरोग्य बिघडण्यास कारणीभूत तोंडाचा मोठा वाटा असतो . जी व्यक्ती आपल्या खाण्यावर ताबा मिळवते तिचे आरोग्य चांगले असते. म्हणून आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या हव्यात त्यावर आपले नियंत्रण हवेच.

सप्तम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे तृतीय स्थान. सप्तम स्थान हे काम त्रिकोणातील महत्वाचे स्थान . धन स्थान आणि सप्तम स्थान हे जोडीनेच असतात. अर्थार्जन चांगले झाले म्हणजेच अर्थ त्रिकोणात स्थिरता आली कि सप्तम स्थानाचा उदय होतो. तृतीय स्थान पराक्रम दाखवतो . जोडीदाराचा भाग्योदय कधी होणार त्याच्यात चांगले कर्तुत्व करून दाखवण्याची धमक असले का हे ह्या स्थानावरून सूचित होतात . तसेच उत्तम जोडीदार कधी मिळेल हाही विचार आपल्या स्वतःच्या तृतीय स्थानावरून केला जातो. 

अष्टम स्थानाचे भाग्य स्थान हे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान .मृत्यू कधी होतो जेव्हा शरीरात बिघाड होतो तेव्हा . जेव्हा चतुर्थ स्थानात बिघाड होतो तेव्हा मृत्यू होतो. नवम स्थानाचे भाग्य स्थान हे पंचम स्थान आहे. नवम स्थान हे खरे भाग्य स्थान.पंचम स्थानावरून संततीचा बोध होतो. हिंदू धर्मात पितरांना मोक्ष मिळण्यासाठी संततीचे आगमन सांगितले आहे. आपल्याला गती देणारा मुलगा हवासा वाटतो . काही जणांच्या भाग्यात उत्तम संतती असते .त्यामुळे त्यांचे म्हातारपण सुखात जाते. संततीमुळे आपला खरा भाग्योदय होतो कारण पंचम स्थान हे आपल्या भाग्य स्थानाचे भाग्यस्थान आहे. 

आपल्या पत्रिकेतील मूळ भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. जातकाच्या नशिबाचा पाया म्हणजे भाग्यस्थान . वारसाहक्काने जातक कुठल्या कुळात जन्माला आला आहे ते ह्या स्थानावरून समजते ,पूर्ण कुंडलीची बैठक ह्या स्थानावर अवलंबून आहे. अध्यात्मिक प्रगती ,मनाचे अंतरंग ,भूतकाळातील अनेक जन्माचा हा लेखाजोखा आहे. भाग्यस्थान जेव्हा कमजोर असते तेव्हा अनेक जन्मातील पुण्याची शिदोरी संपली आहे आणि पापाची पुढे आली आहे हे समजायला हरकत नाही. ह्या स्थानातील ग्रह जातकाच्या पापपुण्याचा हिशोब सांगत असतात.निसर्ग कुनाद्लीतील गुरूची धनु रास इथे येत असल्यामुळे तो ह्या स्थानाचा कारक ग्रह सुद्धा आहे.

त्यामुळे एखाद्याचे भाग्य पाहताना गुरूचाही विचार इथे होणे गरजेचे आहे.भाग्य ज्या स्थानाभोवती फिरते त्याचा कारक ,पालक ,चालक ,मालक गुरूच आहे. गुरु हा जीवकारक असल्याने मनुष्यास जिवंत ठेवण्यास कारणीभूत असतो . ज्या वेळी गुरु गोचरीने ६ ८ १२ मधून जात असतो तेव्हा भाग्य कमी पडते आणि अशुभ घटनांना सामोरे जायला लागते. गुरु का केंद्र कोणातून किंवा त्याच्या आवडत्या स्थानातून जात असतो तेव्हा शुभ फळे देतो ,भाग्य साथ देते. गुरुचे पत्रिकेतील स्थान हि तुमची खरी संपत्ती म्हणावी लागेल म्हणून गुरूचा विचार प्रथम झाला पाहिजे. गुरु चांगला असेल तर आयुष्यात संकटे कमी असतात. इतर ग्रह आणि सर्व शुभ स्थाने हि गुरूच्या दृष्टीत जितकी असतील तितकी अधिक चांगली नशिबाची साथ अधिक लाभेल. गुरु पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान आणि ज्या ग्रहांसोबत असतो ते ग्रह अधिक सक्षम आहेत असे दिसून येयील. त्या स्थान प्रभावित होताना दिसेल. भाग्य म्हणजे भाग्य स्थानाची स्थिती आणि गुरु. ज्या ज्या वेळेस पाहिजे त्या गोष्टी मिळत जाणे म्हणजे भाग्य हि सोपी साधी सरळ व्याख्या आहे. 

प्रत्येक गोष्ट पटकन होणे किंवा मिळणे , बँकेची कामे , रोजच्या व्यवहारातील कामे जलद होताना दिसतात ते भाग्यवान असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . 

एखाद्या व्यक्तीकडे अमाप पैसा असतो पण त्यांची कामे होत नाहीत आणि एखादी व्यक्ती हातावर पोट घेवून जगते तिची सगळी कामे सुरळीत होत जातात त्यांना भाग्याची साथ मिळते .

पत्रिकेत गुरु कोणात असताना म्हणजे १ ५ ९ मध्ये असताना व्यक्ती भाग्यवान असतो हे नक्कीच कारण हि स्थाने गुरूला मानवताना दिसतात. ग्रहाला ते स्थान मानवले पाहिजे ग्रह त्या स्थानात आनंदी राहिला पाहिजे. गुरु जर मित्रांसोबत असेल आणि आवडत्या स्थानात असेल तर उत्तम फळे देतो. 

गुरु लग्नी असता धन कमी असेलही पण असामान्य कौशल्य आणि बुद्धी असते त्या वेगळेपणावर आपले अस्तित्व सिद्ध करते. गुरु पंचमात असेल तर स्वतःची संतती आणि शिक्षण हे त्याचे वैभव असते. गुरु भाग्यात असेल तर भाग्य प्रबळ असते.त्याला सर्व कार्यात यश मिळते .त्याला दैवी शक्तीची साथ लाभते आणि घराणे सुद्धा कीर्तिमान असते. धर्मत्रिकोणातील गुरु धर्माचे आचरण करायला प्रवृत्त करतो. त्याने धर्माविरुद्ध कृत्य केले तर ते अशुभ असते. ज्या स्थानात गुरु असतो त्या स्थानातून २ नंबर चा पैसा मिळत नाही. तो १ नंबर च्या व्यवसायात दाखवून धंदा करायला लागतो.

गुरु प्रत्येक स्थानात फुलतो.ग्रह ज्या स्थानात आहे तिथे कसा चांगले काम करेल हा विचार करायला पाहिजे. अर्थ त्रिकोणातील गुरु म्हणजे २ ६ १० मधला गुरु पैसा मिळवण्यासाठी चालवत असतो.हि व्यक्ती पैसा कसा मिळेल ह्याकडे चित्त असते. धनस्थानातील गुरु सिझन प्रमाणे व्यवसाय करू शकते. १० मधील गुरु शारीरिक कष्टाची कामे करून वरती येतो . लेबर पासून अधिकारी होताना दिसतो. षष्ठातील गुरु जीवनातील सुलभता कमी देते .पुण्याचा अभाव असल्यामुळे गुरु षष्ठात असतो. 

तृतीय स्थानात गुरु असेल तर. तृतीय स्थान म्हणजे प्रवास , शेजारी , भावंडे ,अंगातील कलागुण ,छंद. येथील गुरु जगापेक्षा वेगळ्या आवडी असतात. प्रवासातून पैसे मिळतो. सप्तम स्थानातील गुरु परदेशी जावून भाग्योदय करताना दिसतो. लाभतील गुरु मनुष्य संग्रह खूप करतो ,समाजसेवा ,माणसे जोडणे आवडते.

४ ८ १२ पैकी गुरु चतुर्थात चांगला. चतुर्थ स्थात गुरु उच्च शिक्षणाची संधी देतो. १२ व्या स्थानात असेल तर प्रत्येक गोष्ट पैसे देवून त्याग करून मिळवावी लागते.गुरु अष्टमात असेल तर भाग्योदयास अवघड जातो. भाग्योदयासाठी प्रयत्न कष्ट करावे लागतात. १२ व्या स्थानातील गुरु जन्म ठिकाणापासून दूर जावून भाग्योदय करतो. भाग्यवान कुंडलीत गुरु स्वगृहीचा किंवा उच्चीचा असतो.

कर्क राशीतील गुरु हा चंद्रावर अवलंबून असणारा असतो. कर्क राशीत गुरु ज्ञानपिपासू असतात , बुद्धीची झेप मोठी असते. धनु आणि मीन राशीतील गुरु सल्ले देणे हे काम करते. सिंह राशीतील गुरु चांगला असतो पुण्यसंचय असावा लागतो. रविसोबत असणारा गुरु चांगला असतो.अशी व्यक्ती अधिकार संपन्न असते. मंगळाच्या राशीतील गुरु क्रांतिकारक असतात. वर वाहील तसे काम करण्याचे धाडस असते. गुरु शिवाय भाग्य आकारास येत नाही.

भाग्येश जर लग्नात असेल तर गत जन्मीची पुण्याई असते.कुलाचाराचे पालन करावे लागतात .श्राद्ध कर्म करावी लागतात.

भाग्येश पंचमात असेल तर ज्ञानाची कास धरणारी व्यक्ती असेल. भाग्येश भाग्यात उत्तम संधी मिळतात.भाग्येश धनस्थानात असेल तर पैसा मिळतो ,कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत गाजत असते. भाग्येश दशमात घेतलेल्या कार्यात यश मिळतो. २ ६ १० मधील भाग्येश स्वार्थी असतो. भाग्येश सप्तमात असता भाग्योदय विवाहानंतर होतो. भाग्येश लाभत असेल तर थोड्या प्रयत्नात अधिक यश. उठबस चांगल्या ठिकाणी असते, भाग्येश चतुर्थात असेल तर साधन कुटुंबात जन्म होतो . भाग्येश ६ मध्ये असेल तार शत्रूशी झुंजावे लागते. भाग्येश १२ मध्ये असेल तर नशिबावर अवलंबून राहू नये. भाग्येश अष्टमात असता भाग्योदय सहज होत नाही .वडिलांच्या पश्चात भाग्योदय होतो. कुणाचे तरी मरण हे त्याचे सुख होते. भाग्येश तृतीयात असता कमी त्रासात गोष्टी मिळतात. प्रत्येक गोष्ट शारीरिक त्रासाने ,बुधीमत्ताने करावे लागते. भाग्येश ३ र्या स्थानात असेल तर भाग्यासाठी झुंज द्यावी लागते. भाग्यस्थानात रवी चंद्र मंगळ गुरु भाग्य चांगले असते. शुक्र शनी राहू बुध हे भाग्य कमी असते. चंद्र भाग्यात असेल तार तीर्थाटन होते. मंगळ भाग्यात असेल तर कुळातील कृत्य करतो. भाग्यात शुक्र चांगला नाही आयुष्याची दिशा नाही . बुध भाग्यात भाग्योदय करत नाही . बुद्धी असल्याने अनेक प्रश्न पडतात आणि अधर्मी राहते.

पत्रिकेतील भाग्य भाव हा किती महत्वाचा आहे हे वरील विवेचनावरून लक्ष्यात येतेच. भाग्याला दोष देत राहणारी माणसे नशीब घडवू शकत नाहीत . भाग्य भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा आहे आणि त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी जसे उपासना , मोठ्यांचा आदर केला तर हे स्थान अधिक बळकट होईल आणि भाग्योदय होईल.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Curse (शाप)

 || श्री स्वामी समर्थ ||




जीवन म्हणजे संघर्ष आहेच आहे .व्यवसायात आपल्याला अनेकदा संघर्ष करावा लागतो , कष्टाला पर्याय नसतो. एका व्यवसायातील दोन व्यक्तींमध्ये पराकोटीची स्पर्धा होती . त्यातील एक देवभक्त आणि कष्ट करून आपले नित्याचे जीवन जगत होती. दुसरीही देवभक्त होती पण ती आपल्या कामापेक्षा दुसर्या व्यक्तीच्या 

यशावर खार खात होती. इर्षा करून काहीही मिळत नाही. इतरांना त्याच्याबद्दल काहीबाही वाईट सांगणे, त्याच्या मागे त्याची निंदा करणे ,अपमानित करणे हे कित्येक वर्ष चालू होते पण पहिल्या व्यक्तीने मात्र आपले वागणे बदलले नाही कारण देवावर श्रद्धा आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास .


एक दिवस ह्या गोष्टींचा अतिरेक झाला कारण दुसर्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीबद्दल फारच वाईट उद्गार काढले जे त्या व्यक्तीला खूप लागले. मन दुखावले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले. पण त्याने काहीही न करण्याचा प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला फक्त देवाला जे काही आहे ते सांगितले. 


काही दिवस असेच गेले पण त्या नंतर मात्र स्थिती बदलली . टीका , निंदा करणाऱ्या त्या व्यक्तीचा व्यवसाय थांबला, अर्थात अर्थार्जन थांबले , कुटुंबाची अनेक प्रकारे वाताहत झाली आणि सगळे जीवन उध्वस्त झाले. 


ह्या जगात परमेश्वरी शक्ती नक्कीच कार्यरत आहे फक्त ती आपल्याला दिवस नाही . ती एकदाच हिशोब करते पण तो असा करते कि आयुष्यातील सगळा आनंद हिरावून घेते . आपण जगतो पण प्रेतवत . प्रत्येक वेळी दुष्मनी केलीच पाहिजे का ? कश्यासाठी ? आपल्या नशिबात आहे ते मिळणार आपल्याला . जो तो आपापले नशीब घेवून जन्माला आलेला आहे आणि त्याचे इथले कार्य संपले कि जाणार , त्यात तुम्ही आम्ही काहीही बदल करू शकत नाही.


आपण जे काही कर्म करतो , वावगे बोलतो, निंदा करतो , कुणाला फसवतो , पैशाचा चुकीच्या मार्गाने विनियोग करतो , कुणाला त्रास देतो त्याचे जगणे असह्य करतो , समाजात कुणाबद्दल त्याच्या मागे काय काय बोलतो तेही आपली लायकी नसताना ते स्वामी कड्या नजरेने पाहत असतात पण वेळ आल्याशिवाय ते त्यावर आपे मत देत नाहीत . ज्या वेळी ते आपली केस हाती घेतात आणि सोटा उगारतात तेव्हा मात्र आपल्याला पळता भुई थोडी होते . प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे आहे . सारखेच कष्ट करणाऱ्या दोन व्यक्तींचे जीवन वेगवेगळे असते कारण त्यांचे पूर्वकर्म तसे असते. 


कुणाला त्रास देवून आपले चांगले होत नाही तर पुढील संकटांची ती नांदी असते. ह्या सर्वाची कल्पना असूनही आपल्या हातून त्या केल्या जातात कारण तेच आपले प्राक्तन असते. इथे उपासना प्रचंड कार्य करत असते . उपासक असणारी मंडळी ह्या मार्गाला कदापि जाणार नाहीत . 


प्रत्येक कृती किंवा काम करताना त्याच्या परिणामांची भीती आपल्याला असली पाहिजे जर त्यामुळे कुणाचे नुकसान होणार असेल. एक वेळा जेवा पण कुणाचे शाप तळतळाट घेवू नका . ते आपल्याला उद्वस्त करतात . प्रत्येक व्यक्तीला त्याची देवता ज्याची तो उपासना करतो ती तारत असते त्यामुळे आपण बरे आपले काम बरे हा व्यवहार असावा. निंदा करताना एखाद्याला अपमानित करताना किंवा समाजात त्याला बेअब्रू करताना खूप मजा येते , आसुरी आनंदही होतो पण कोण माझे काय वाकडे करणार ह्या प्रश्नाला योग्य वेळ आली कि परमेश्वर उत्तर दिल्याशिवाय राहात नाही . एखाद्याची टिंगल करणे , ग्रुप करून त्याला एकटे पाडणे , घरी आलेल्याला अपमानित करणे ह्या सारख्या गोष्टी अत्यंत वाईट रीतीने बुमरंग होवूनच परत येत असतात .


कुणाची त्याच्यामागे निंदा करून , अपशब्द वापरून तसेही काहीच मिळत नाही. ह्या अपयशाकडे नेणाऱ्या पायर्या आहेत आणि ह्या कृत्यामुळे आपण आपल्या स्वतःलाच संपवत असतो . एखाद्याला दुखावणे म्हणजे त्याच्यातील परमेश्वराला दुखावणे. इतके प्रगल्भ विचारांचे म्हणवणारे आपण पण प्रत्यक्षात मात्र. असो . सुज्ञास सांगणे न लगे. 


आपल्याला देवाने दोन हात दिले आहेत ते कष्ट करून आपलेच आयुष्य साकारण्यासाठी . २४ तास आणि दोन हात ह्याचे गणित जमले कि आयुष्य आनंदी होणारच सर्व काही मिळणारच आणि तेही आपल्या नशिबात आहे तितकेच. कुणाची निंदा करून आपण आपलीच कर्म वाढवून घेत असतो जी फेडायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो .ह्या चक्रातून आपली सुटका नसते.


एखाद्याचा शाप आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो हे लक्ष्यात आणून देण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

जीवनाला सोन्याची झळाळी देणारे “ गुरुपुष्य “

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी ,उपासनेसाठी ,साधनेसाठी आणि शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य

योग  २३ एप्रिल २०२६ रोजी “ गुरुपुष्यामृत योग “ आहे. 


शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा “ गुरुपुष्य “ म्हणजेच “ गुरुपुष्यामृत “ योगाची निर्मिती होते .ज्योतिष शास्त्रातील काही असामान्य योग आहेत त्यापैकी हा एक . शनी आणि गुरु दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग .दोघेही साधक व उपासक . दोघेही विरक्तीचे ग्रह पण त्यातही फरक आहेच . शनीला प्रपंचाची फारशी ओढ नाही पण गुरुचे तसे नाही . प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करा आणि आपली इतिकर्तव्ये पूर्ण झाली कि परमार्थाचे धडे गिरवा हे सांगणारा गुरु आहे. दोन्ही ग्रहांची शिकवण एकच पण शिकवण्याचे मार्ग वेगळे.

गुरूच्या सेवेचे अनन्यसाधारण असे फळ आहे. गुरुविना जीवन ते काय . ते परीक्षा घेतील पण अभाळा इतके पदरात टाकतील. शनी तर आपला मित्रच आहे . पण हा सखा जरा शिस्तप्रिय आणि कडक , न्यायी आहे. 

ह्या दोन्ही ग्रहांचा शुभयोग असताना केलेली साधना अत्युतम फळ प्रदान करेल ह्यात शंकाच नाही.  गुरुपुष्य योगावर सोने खरेदी करतात . ह्या सोन्यासारखेच तेजपुंज आपले आयुष्य देखील व्हावे म्हणून साधना करणेही आवश्यक आहे. गुरुपुष्य योगावर दान अवश्य करावे ,सोने जमले नाही तर चण्याची डाळ आणावी पण ती गुरुपुष्य योगातच .गरिबास गुळ गहू द्यावा .जमेल तितके नामस्मरण करत दिवस आनंदात घालवावा .

दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात “ गुरुपुष्यामृता” ची महती सांगताना ह्य योगावर जो अनन्यभावे श्री गजानन विजय ह्या पोथीचे पारायण करेल त्याच्या कसल्याही असोत यातना त्याचे निरसन होयील अशी ग्वाही दिली आहे . श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या लीला शब्दांकित केलेला श्री गजानन विजय ह्या पवित्र , रसाळ ग्रंथांचे पारायण गजानन भक्त गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून करतात . ह्या ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात श्री दासगणू महाराज लिहितात ..जो ह्या अमृततुल्य ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या दिवशी तसेच गुरुपुष्य योगावर करील त्याच्या अवघ्या मनोकामना खचितच   होतील पूर्ण .कसल्याही असोत यातना त्या निरसन होतील. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात प्रचंड ताकद आहे .आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते हे नक्की , अनुभव जरूर घ्यावा.


आपल्याला सगळे काही हवे असते पण त्यासाठी कष्ट परिश्रम करायची तयारी नसते. इंस्तंट चा जमाना आहे ना ,धीर म्हणून नसतो आपल्याला. पण अध्यात्मात तसे चालत नाही. शनी सगळ्याला विलंब करतो ,आपली प्रत्येक क्षणी परीक्षा बघतो ,त्याच्या परीक्षा कठोर असतात पण त्या देता देताच आपण आपल्याही नकळत घडत जात असतो.


पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे . पुष्य म्हणजे पोषण करणारा .हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे ,सकारात्मकता , उर्जा देणारे आहे पण तरीही हे विवाहास वर्ज्य मानले आहे . ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते.

ह्या योगावर केलेले जप , ग्रंथ पोथी वाचन ,पारायण ,तप , ध्यान धारणा , दान मोठे फळ देते .कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्री गणेशा ह्या योगावर केला तर यश नक्कीच मिळते . भगवंताची आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात . ह्या योगावर केलेली श्री महालक्ष्मीची साधना सुद्धा विशेष फलदायी होते. गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते म्हणून ह्या योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण , जपजाप्य केले जाते.

शनी अत्यंत न्यायी आहे ,जसे कर्म तसे फळ म्हणूनच शनी कर्मप्रधान आहे .जीवन  कसे करायचे ते शिकवणारा ग्रह आहे . शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा मिलाफ होणारा हा शुभदिन सर्व शुभ गोष्टींसाठी उत्तम दिवस आहे . शनी आणि गुरु हे दोन्ही विरक्त , साधक असल्यामुळे ह्या योगावर विवाह मात्र वर्ज आहे. ह्या दोन्ही ग्रहांना विवाहाचे वावडे आहे म्हणून ह्या योगावर नवीन आयुष्याची सुरवात करू नये .


आपले आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असते . कधी हे बदल आपल्या पथ्यावर पडतात म्हणजे शुभ असतात तर काही बदल आपल्याला कठीण वळणांवर आणतात . प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपल्या हाती असते आणि अश्यावेळी अध्यात्म , उपासना मनुष्याला मदत करते.

“गुरुपुष्यामृत ” योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे . प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा , इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरुपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून साधनेस आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजेच “ गुरुपुष्य ”.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गुरुपुष्य एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेवून येणारे असुदे हीच गुरु आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

अवतीभवतीचा अनमोल आनंद

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवन आनंदाने ज्याला जगता येते तो खरा माणूस . आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असे जगले पाहिजे . आनंद येणार पाठोपाठ दुख्ख वेदना सगळे येणार , कारण त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्याच समजत नाही . संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवस सुद्धा सगळा आपल्या मनासारखा जात नाही . पण म्हणून आपण जगणे सोडून द्यायचे का ? नाही . पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो , कुणी एखाद्या शब्दाने दुखावलेले तर तेच तेच धरून व्यथित होतो आणि तेच जीवनभर आठवून आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना पोरके होतो. 


ह्या क्षणभंगुर आयुष्याचे जिथे माझे काहीही नाही आणि इथेच मला सगळे ठेवूनही जायचे आहे ते जेव्हा खर्या अर्थाने समजेल आणि ते आपल्या कृतीतून वागण्या बोलण्यातून इतरानाही जाणवेल तेव्हा आपल्या जीवनाचा सोहळा झाला म्हणून समजा . मातीतून आलो पण अनेक चुकीचे शब्द आणि चुकीच्या वागण्यातून सर्व मिळवलेले आपणच माती मोल करतो . हो हो आपण स्वतःच . म्हणूनच प्रत्येक शब्द कृती हि विचारपूर्वक केली पाहिजे. 


घरातील भौतिक सुखे म्हणजे परमार्थ नाही कारण ते तुम्ही घेतलेले नाम सुद्धा तुम्हाला कधीही मिळवून देत नाही . समाधान मात्र इतके मिळेल कि ओंजळ अपुरी पडेल. माणसाने समाधान कश्यात आहे त्याचा सातत्याने शोध घेतला पाहिजे . गेलेला क्षण पुन्हा येत नाही कारण पुढे जात राहणे हा प्रत्यक्ष सृष्टीचाच नियम आहे ...मग आपण कोण तो बदलणारे , नाही का. 


एखाद्या लहान मुलाने आपल्याला दिलेले निरागस स्मितहास्य अहो किती पराकोटीचा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण असतो तो. पण आपण मात्र हा असा वागला तो असे बोलला , ह्याने हे केले त्याने ते केले नाही ह्यातच जन्मभर अडकून राहतो . काय जपायचे आणि काय सोडायचे तेच समजत नाही हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. सोडायला शिका .


लहान सहान गोष्टीतील आनंद शोधता आला पाहिजे आणि तो जगताही आला पाहिजे. आज जे सोडून द्यायचे आहे तेच हृदयाशी कवटाळून बसलो आहोत आणि मग त्या अपिरीमित वेदना आपल्याला दीर्घकालीन आजार देत आहे . मागील पिढ्यात होते का मधुमेह सारखे आजार पण आज तरुण मुलांना सुद्धा हृदय विकार होताना ऐकतो पाहतो . 


लहान सहान गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. पण आम्ही खूप शिकलेले आहोत आम्हाला कोण शिकवणार अहो प्रत्यक्ष ब्रम्हदेव खाली आला तर त्यालाही स्ट्रेस देवून परत पाठवू इतका स्ट्रेस आम्ही घेवून जगतोय . द्यायची सवय कधी लागणार आपल्याला , आम्ही फक्त सगळे गोळा करणार . सर्व ज्ञान आम्हाला आहे दुसर्याला काय कळतंय अश्या अविर्भावात जगणे हीच पराभवाची पहिली पायरी आहे. इतरांच्या साठी जागून पाहिले आहे का कधी ? 


साधे पाणी मिळायचे मारामार अन्न खूप दूर राहिले असे जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे त्यांनी काय करायचे ? कधीतरी विचार करा आणि केलात तर समजेल देवाने किती भरभरून दिले आहे पण त्याची काडीचीही किंमत नाही आपल्याला आणि म्हणूनच वेळ आली कि त्याची किंमत त्याला आपल्याला करून द्यावी लागते  


कधी पटकन एखाद्या फळ विक्रेत्याला जवळ असलेला उसाचा रस देवून बघा , कुणाला चहा तर कुणाला काही खायला  देवून बघा . उन्हाळ्याने त्रासलेले आहेत आज तरीही सगळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हातून आपले काम करत आहेत त्यांना ह्या तुमच्या एका लहानश्या मदतीमुळे किती सुख मिळेल त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.


आनंद हा देण्यात आहे घेण्यात नाही हे जेव्हा समजेल तेव्हा जीवन समजेल. एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला देणे बंद केले तर काय होईल ? कितीही नारळ वाढवा त्याच्यासमोर काहीही देणार नाही तो मग आम्ही हताश होवू ...पटतंय ना? त्यामुळे खरा माणूस तोच जो आपल्या कुवती ऐपती प्रमाणे देण्यातील आनंद मिळवतो आणि जीवनाचा सोहळा करतो. अश्या लोकांना परमेश्वर न मागता सुद्धा अनेक गोष्टी बहाल करत असतो. 


आयुष्य हि त्याचीच देणगी आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य सन्मार्गाने जगणे आणि इतरानाही प्ररणा मिळेल असे काहीतरी करून जाणे हेच आयुष्याचे इप्सित असले पाहिजे . पण आपण हेवेदावे मत्सर कुणाला पाण्यात पहा , कुणाची निंदा करा ह्यातच अडकून पडलेले असतो . 


एखादी अगदी साधी सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला असाध्य होते तेव्हा परमेश्वराचे अस्तित्व किती मोलाचे आहे ते जाणवू लागते . लहान सहान गोष्टीतील आनंदाला पारखे होणे हेच खरे दुर्भाग्य आहे. आपल्याला काय मिळाले नाही त्याचेच गाणे आपण गात असतो पण जे मिळाले आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते . तेही मिळाले नसते तर काय केले असते हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही . 

कटू आठवणी येत जात असतात पण तेच आयुष्य नाही. 


अखंड आयुष्यात सुखाचे वारे वाहत असतातच त्याचा आस्वाद घ्या तेव्हाच दुखाची झळ पोहोचणार नाही . दुख सहन करायची क्षमता शेवटी सुखाचेच क्षण देत असतात , नाही का?

जीवन जगण्यासाठी आहे तेही आनंदाने . कुणाचे वाईट चिंतून आपल्याला तरी काय मिळणार आहे ? कुरबुरी , तक्रारी , निंदा , मत्सर , हेवेदाने , अति लोभ ह्यात गुंतून पडणे हे केवळ दुर्भाग्य म्हंटले पाहिजे .ज्याला जीवन जगण्याची कला उमगली तो तर आनंदाने जगेल आणि इतरानाही आनंद देयील ...आज नक्कीच विचार करा ....


मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लावणे त्याहून कठीण ...


श्री स्वामी समर्थ  


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 7 January 2026

नैतिक अनैतिकतेच्या पलीकडील राहूचे जग

 || श्री स्वामी समर्थ || 

राहुने आपल्या तन मनावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. सतत मोबाईल वर दिसणार्या व्यक्तीच्या पत्रिकेत सध्या राहू सक्रीय आहे हे समजायला हरकत नाही. राहू दशा चालू झाली कि व्यक्ती अनेक प्रलोभनात अडकत जाते . youtube , इन्स्टा , whatsapp हेच त्याचे जग होते . ह्यात होणारी स्कॅम सुद्धा राहुचीच मेहेरबानी आहे. ह्या सर्व माध्यमांचा गरजेपुरता वापर केला तर उत्तम पण आज आपण ह्यामुळे संवाद विसरत चाललो आहोत . एकमेकांशी मोकळ्या गप्पा मारायला वेळ नाही आपल्याला किबहुना ते आता out dated म्हणायला हरकत नाही . आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात त्यांना सगळी माहिती असते किबहुना ती त्या आवर्जून घेत गोळा करत असतात . राजकारण खेळणे , इथले तिथे करणे , गैरसमज पसरवणे जे मुद्दामून केले जातात , गरज नाही तिथे नाक खुपसणे ह्यात राहूच आहे. राहू म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते . अनेकदा चार लोक एका गोष्टीला वाईट म्हणू लागली कि अर्थात त्यांच्या अनुभवावरून  पाचवा सुद्धा त्या शृंखलेत सामील होतो आणि त्याला वाईट म्हणू लागतो (अनुभव नसताना ).असो हा मनुष्य स्वभाव आहे. आयुष्यातील सगळे चढ उतार आपल्याला राहू दशेतच बघायला मिळतात . रंकाचा राव करणारा राहू जनमानसाला जबरदस्त प्रभावित करणारा जणू खलनायक आहे . खेकडा जसा दगडाला घट्ट धरून असतो अगदी तसाच राहू आपल्या मेंदूचा ताबा घेतो . 


म्हणूनच आज राहुविषयी अधिक जाणून घेवूया . प्रत्येक वेळी अभ्यासातून , संशोधनातून आणि अनुभवातून आपल्याला राहूचे अनेक नवनवीन कंगोरे उलगडत जातात आणि आपण सुद्धा विस्मयचकित होवून जातो. अनैतिकता हा राहूचा स्वभाव निश्चित आहे पण अनेकदा चांगल्या ग्रहांच्या युतीत संपर्कात येवून तो आपल्याला एक वेगळा दृष्टीकोन सुद्धा देवू शकतो . अनैतिक गोष्टी घडवण्यात राहुचेच master mind असते पण अनेकदा ते कोण घडवते तेच समजत नाही . आपल्या संपर्कात असणार्या व्यक्तीत राहू लपलेला असतो पण त्यातील कोण आपला आणि कोण आपला नाही ह्याचा पत्ता आपल्याला काही करून न लागणे हीच राहू दशा आहे. म्हणूनच राहू दशेत व्यक्तीने कमीतकमी लोकांच्या संपर्कात राहावे , समाजात कमी मिसळावे , डोळसपणे जगावे , आंधळा विश्वास इथे कामाचा नाही . कुठेही अंध विश्वास ठेवून सही करू नये , कुणालाही जामीन राहू नये .

राहुकडे शीर आहे , डोळे कान नाक घसा सगळी इंद्रिये आहेत त्यामुळे राहू दशा अंतर्दशेत व्यक्तीला हे करू कि ते करू असे होवून जाते , जे जे दिसते ते सर्व हवे असते तसेच व्यक्तीतील passion वाढते , विचारांच्या कक्षा रुंदावतात पण हे सर्व पचवता मात्र येत नाही कारण त्याच्याकडे शरीरच नाही . विचारांना नुसते पंख फुटून उपयोग नाही ते प्रत्यक्षात तर आले पाहिजेत जे येत नाहीत . मला खूप काही करायचे आहे पण त्या कल्पना सत्यात उतरत नाहीत . त्यातून हाती येते ते मात्र  वैफल्य .

राहू व्यक्तीचा कल्पनाविस्तार वाढवतो , आशा अपेक्षा फुलवतो पण पुढे सर्व संभ्रम असतो . त्या सत्यात उतरवणे जमतेच असे नाही . राहूच्या दशेच्या अंतिम टप्प्यात अनेकदा व्यक्ती पूर्वपदावर आलेलीही दिसते . प्रचंड धाडस , काळी जादू वगरे प्रकार सुद्धा राहूच . 

राहू अत्यंत हुशार आहे पण मंगळ आणि राहूच्या हुशारीत फरक आहे. राहू होत्याचे नव्हते करणारा आहे . अचानक आकस्मित , अकल्पित सुद्धा . मंगळ योद्धा आहे तो सरळ लढेल पण राहू कट करण्यात माहीर आहे . त्याच्यासारखा दुसरा कुठलाही ग्रह ह्यात त्याच्या जवळपास सुद्धा नाही . हेर खात्यातील किंवा हेरगिरी करणाऱ्या लोकांचा राहू बलवान असतो .

एखादे अनुमान लावणे अनेक तर्क वितर्क करणे म्हणजे राहू. कलियुगाचा बादशाह राहू आहे. 


सोशल मिडिया , इंटरनेट चे युग अवतरले ते राहूमुळे . राहुने जग जवळ आणले . टेक्नोलॉजी राहुकडे . स्मार्टफोन म्हणजे राहूच . बघा आज प्रत्येक जण फोन मध्ये डोके खुपसून बसलेला असतो. ज्यांचा राहू पत्रिकेत सक्रीय आहे ते काम असो अथवा नसो फोन laptop ह्या माध्यमात सतत दिसतात . राहुने आपल्या तन मनावर ताबा मिळवला आहे.  राहुने आपले विश्व जग बदलुन टाकले आहे . विशेष करून रात्री उशिरापर्यंत मुले काय सगळेच फोन घेवून बसलेले असतात . इन्स्टा म्हणजे सुद्धा राहूच . आपण गोष्टी एका क्लिक वर विकत घेतो अनेकदा फसतो सुद्धा . मी एकदा फुले ठेवयाची एक कुंडी मागवली जेव्हा ती प्रत्यक्षात घरी आली तेव्हा ती इन्स्टा वरती दिसत होती त्यापेक्षा खूप लहान होती . दिसणे आणि प्रत्यक्ष असणे ह्यातील फरक राहुने शिकवला त्या दिवशी मला . भ्रमित करणारा राहू , मुले अभ्यास करत नाहीत , काढून घ्या कि त्यांचे मोबाईल. करतील अभ्यास . बघा प्रयत्न करून . फोन काढून घेणे म्हणजे माश्याला पाण्यातून बाहेर काढण्यासारखे आहे. असो. राहुने तंत्रज्ञान दिले आहे पण त्याचा किती आणि कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे , पटतंय का?


व्यसनं राहुकडेच आहेत . राहू बरोबर असलेल्या इतर ग्रहांचे विशिष्ठ राशीतून होणारे योग हे व्यसने देतील आणि त्यातून बाहेर येणे अत्यंत अवघड होयील . राहू धुवा आहे त्यामुळे सिगरेट चे व्यसन , नशिल्या पदार्थांचे व्यसन राहू देतो . पण काही वेळा हा अध्यात्मिक प्रवास सुद्धा घडवतो . राहुकडे दृकश्राव्य मध्यम आहे . आपल्याला जे दिसते आणि जे दिसत नाही त्यातील पडदा म्हणजे राहू . जे दिसत नाही त्याचे दर्शन देणाराही राहू म्हणूनच त्याला अध्यात्माचा कारक म्हंटले जाते . साधना नामस्मरणाने हा मधला पडदा दूर होण्यास मदत होते . शत्रूंचा नाश करणारा राहूच आहे जर पत्रिकेत षष्ठात असेल. हि राहूची सर्वात उत्तम स्थिती आहे. राहुला कंट्रोल करण्यासाठी हनुमान चालीसा नित्य पठण करावे. नाग सर्प ह्यांचे प्रतिक राहूच आहे त्यामुळे पत्रिकेतील कालसर्प दोष राहूच दर्शवतो . राहूच्या दशेत गूढ विद्या , मंत्र तंत्र , ज्योतिष शास्त्राचे शिक्षण उत्तम होते . राहू संशोधन करवतो . 

राहूचा दोष कमी करण्यासाठी माता दुर्गा ची उपासना , हनुमान चालीसा , शंकराला अभिषेक करावा.


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230

प्रणयाचे वारे जेव्हा वाहू लागतात....

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष हे प्रचीती देणारे शास्त्र आहे . अनुभव मिळाला कि अभ्यास आणि विश्वास दोन्हीही वृद्धिंगत होतो. आज राहूचे शततारका नक्षत्र आहे . त्या दोघांना विवाह करायचा होता म्हणून आज समोर पत्रिका आल्या . दोन्ही बघून त्यांना पहिलाच प्रश्न विचारला आपले आपले जमवले कि काय शुक्र राहू युती दोघांच्याही पत्रिकेत प्रणयाचे संकेत देत होती . इतकेच नाही ते प्रेम वयातील बराच मोठा फरक सुद्धा पार करू पाहत होती. 

मुलगा संस्कारित पण अजूनही विवाह योग नव्हता पण मुलगी वयाने खूप लहान असूनही त्यांचे जमले. जमले म्हणजे काय जमले तर हे निव्वळ आकर्षण दुसरे काहीही नाही. मुलाच्या मनात ह्याबद्दल भीती शंका कुटुंबाचा विचार होता हे पाहून मला खरतर बरे वाटले. तिला मंगळ आणि त्यात शनीचा प्रतियोग . मी म्हंटले हि जराजराश्या कारणाने हि चिडणार आणि भरपूर अपेक्षा घेवून येणारे हे प्रेम क्षणात रौद्ररूप धारण करणार ह्यात शंकाच नाही. दोघांचीही लग्ने भिन्न. मुलीचे कुटुंब आणि सुखस्थान दोन्ही बिघडलेले . मुलीला मंगळ आणि मुलाला नाही . त्यात भर म्हणून शुक्र राहू अंशात्मक युती . मुलाच्याही पत्रिकेत अंशात्मक शुक्र राहू युती त्यात शुक्र अस्तंगत .

प्रेमात सगळे माफ असते ह्या युक्तीला धरून वयातील फरक त्यांच्या प्रेमात पडलेल्या दृष्टीने दृष्टीआड केला होता ते समजले. मुलगा जितका विचारी तितकीच ती अल्लड आणि समंजस पणा कोसो दूर असणारी . 

शुक्र राहू प्रणयाची आसक्ती देते पण अनेकदा समोरच्या कडून फसवणूक सुद्धा . असो फार खोलात न शिरता मी त्यांना म्हंटले अहो इतक्या अल्लड वयाचा मोठा फरक आहे . तुम्ही स्वतःही तापट आहात कसे होणार पुढे. गुण सुद्धा जुळत नव्हते. म्हंटले पुढील वर्षी तुमचा विवाहाचा योग नक्की आहे पण हे प्रकरण पुढे घेवून जबू नका . इथे सोयरिक झाली तर कुठून लग्न केले असे होणार त्यामुळे कुटुंबाला सुद्धा त्रास मतभेत . कश्याला ओढवून घेता संकटे . ह्यावर जितक्या लवकर पूर्णविराम देता येयील ते बघा आणि कोरी पाटी करून पुढे जा . पुढील वर्षी तुमचा विवाह योग नक्कीच आहे. शनी सुद्धा आता मार्गी आहे. जिथे सुरवाती पासून मन साशंक आहे तिथे पुढे काय होणार . असो.

विवाह हा सुखासाठी असो , आयुष्याचे ते एक आनंदाचे पान आहे पण पुढे ते पानच फाटले तर काय . म्हणून प्रत्येक गोष्टीचे निराकरण आधीच झाले पाहिजे . वयातील मोठा फरक, आणि एकंदरीत पत्रिका पाहून हे प्रेम नसून आकर्षण आणि क्षणिक भूल होती हे स्पष्टच दिसत होते . प्रेमाचे वारे वाहू लागतात तसे तेच वारे पुढे कुठे उडून जातील दिशाहीन होतील सांगता येणार नाही.

प्रेमाची भावना त्याग पण करायला शिकवते . ती असेल तर संसार टिकवण्या मागे कल असतो. संसारात वाद असतात पण ते पेल्यातील असावे , संसार मोडणारे नसावेत आणि म्हणूनच त्याला मनाची परिपक्वता लागते जी ह्या मुलीत येणार कुठून .काही दिवसातच आकर्षण संपून जायील जेव्हा खर्या संसाराला सुरवात होईल आणि मग स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप करायची वेळ येयील . काही दिवसात हे विसरून जायला होयील हे नक्की कारण मुळातच हे आकर्षण आहे. असो.

राहूची ताकद प्रचंड असते , त्याचे आकर्षण सुद्धा तितक्याच ताकदीचे असते मती गुंग होते आणि विचारांची कवाडे बंद होतात . आज राहुचेच नक्षत्र आहे आणि राहू शुक्र रुलिंग ला आहेत . वैवाहिक सुखाचा शुक्र राहूच्या अंशात्मक युतीत दोघांच्याही पत्रिकेत आहे. 

कुणी कितीही काहीही म्हणा हे दैवी शास्त्र आहे जे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहे. त्याचा योग्य वेळी केलेला उपयोग आनंदाची अनेक दालने उघडून देतो . तुमचा विश्वास आहे कि नाही ह्यावर ग्रहतारे आकाशात नाहीत त्यांना तुमच्या विश्वासाशी काहीही घेणे देणे नाही ते त्यांचे काम करतात म्हणजेच तुमच्याच कर्माची चांगली वाईट फळे तुमच्या पदरात टाकतात .

आज एक विवाह आणि दोन आयुष्य वाचवण्याचा मनापासून प्रयत्न केला . पोटतिडकीने त्यांना समजावून सांगितले . शेवटी ज्योतिषी हा पण माणूस आहे आणि पत्रिका नेहमी तळमळीने सदिच्छेने पाहाव्या असे वाटते . 

स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि म्हंटले आता तुम्हीच त्यांना चांगली बुद्धी द्या .

शुभं भवतु 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

कसे आहेत माझ्या पत्रिकेतील ग्रह ?

 || श्री स्वामी समर्थ ||


आज ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जगभर अनेक अभ्यासक करत आहेत , रोज नवनवीन शोध सुद्धा लागत आहेत . आज आपण खूप वाचतो (अनेकदा आपल्याला असलेले ज्ञान हे अर्धवट असते हे आवर्जून सांगावेसे वाटते ), ऐकतो आणि आपली मते त्या वरून तयार करतो. आपली पत्रिका म्हणजे जन्मस्थ आकाशात असलेल्या ग्रहस्थितीचे प्रतिबिंब जे बदलत नाही . आपल्या पत्रिकेत शुक्र इथेच का आणि शनी तिथेच का हा अभ्यासाचा विषय आहे कारण ते आपले पूर्व प्रारब्ध आहे. अतिशय मनापासून जर ज्योतिष शास्त्राचा खोलवर विचार आणि अभ्यास केला तर आपल्या आयुष्यातील अनेक गणिते सुटायला निश्चित मदत होईल. एखादी घटना आयुष्यात का घडली ह्याचा मागोवा घेता येयील किंवा भविष्यात काय घडू शकते आणि कधी त्याचा अंदाज येयील . हा अभ्यास अत्यंत सखोल आहे त्यामुळे वरवरचे वाचन इथे चालणार नाही , ह्यात फलादेश चुकण्याचीच भीती अधिक आहे. पृथ्वीपासून कित्येक मैल दूर असणारे ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत आहेत इथेच आपण त्या ग्रहांची ताकद ओळखून त्यांना सलाम केला पाहिजे. त्या ग्रहांची बोली शिकलो आणि त्यांचे कारकत्व समजून घेतले तर जीवन सुकर होईल. 


व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे मिथुन राशीचे ह्या आठवड्यातील भविष्य असे आहे हे सगळ्या मिथुन राशी वाल्यांना लागु होईल का तर अर्थात नाही कारण ते मेदनिय भविष्य आहे . प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे आहे. प्रत्येक ग्रहाचे थोडक्यात पण महत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे ग्रह तुमच्या पत्रिकेत कसे आहेत हे तुमचे तुम्हालाच समजेल आणि ज्ञानप्राप्ती सुद्धा होईल. 

रवी हा सृष्टीचा निर्माता आहे .पितृसुखाचा कारक आहे. आयुष्य , अधिकार , राजकारण , रक्तदोष , पित्तविकार ,आरोग्य सोने अग्नी तीर्थयात्रा रवीच्या अमलाखाली येतात . रवीचा अंमल हृदयावर आहे. नेत्र तसेच शरीरातील शिरा ह्यावर रविचा अंमल आहे. रवी सर्व प्राणीमात्रांचा प्राणवायू आहे. शरीरातील शक्ती आणि प्रतिकार शक्तीचा कारक रवी आहे. नितीमत्ता , अलौकिक ,ईश्वरभक्ती , उच्च विचार  , सात्विकता ,अंतर्ज्ञान , अंतर्स्फुर्ती , मनाचा खंबीरपणा ,स्पष्टपणे बोलणे ,तर्कशुद्धता , स्थिर स्वभाव , ध्यानधारणा , धैर्य ह्याचा कारक रवी आहे. 

ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच  “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीत भ्रमण करून म्हणजेच एक संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे. सूर्यामुळे आपल्याला सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा  कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.

आपल्या उदय आणि अस्तामुळे एकाच दिवसात ३ भिन्न अवस्था दाखवणारा रवी आपल्याला भिन्न राशीतून प्रवास करत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सुद्धा दाखवतो. चैत्र वैशाखात रवी नेतून मेषेत येतो त्यावेळी पृथ्वी सूर्याच्या निकट आलेली असते म्हणून आपल्याला असह्य उन्हाळा जाणवतो.काही काळाने रवी मेषेतून वृषभेत आणि पुढे मिथुनेत जातो . कर्केत गेल्यावर जणू असह्य उन्हाळ्याचा त्याला पश्चाताप होवून तो धरती आणि सृष्टी जलमय करतो .पुढील प्रवास करत कन्येतून तुलेत आपल्या नीच राशीत येतो तेव्हा सृष्टी आणि निसर्ग सुद्धा  आनंदाने डोलू लागतो.


सूर्याच्या भोवती सर्व ग्रह एका कक्षेत आपापल्या गतीने फिरत असतात ज्याला आपण क्रांतीवृत्त म्हणतो . सूर्याचे अस्तित्व अबाधित आहे आणि म्हणूनच तो राजा आहे. आता हा राजा पत्रिकेत चांगला असेल तर अर्थात राजासारखी राहणी , मानमरातब , सरकारी नोकरी , प्रसिद्धी , MBA चे उत्तम प्रशिक्षण , नेतृत्व , सरकारी यंत्रणा , वडिलोपार्जित धंदा , खाद्य पदार्थांचा धंदा , वडिलांचे सौख्य प्राप्त होते . रवी आत्मकारक आहे आणि रवी पत्रिकेत चांगला असेल तर प्रकृती उत्तम असते अनेक आजार बरे होऊ शकतात . मनोधर्य किंवा मनाची उमेद व्यक्तीकडे असते . सूर्योदय झाला कि उजाडते आणि ते आपण आपल्या डोळ्यानीच पाहतो त्यामुळे आपल्या डोळ्यातील तेज दृष्टीचा कारक सुद्धा रवी आहे. सूर्याची आराधना केली , गायत्री मंत्राची नित्य उपासना केली आणि सूर्याला सकाळी अर्घ्य घातले तर सूर्य बलवान होण्यास मदत होते . रवी म्हणजे इच्छाशक्ती , आत्मिक बळ , नितीमत्ता , अधिकार गाजवण्याची वृत्ती , नावलौकिक , प्रतिष्ठा , स्पष्ट बोलणे , परखड पणा , घमेंड , खंबीर , धोरणी , बेपर्वाई, न्यायी , दाता . रवी हा आत्मविश्वास देणारा ग्रह आहे. तो कमकुवत असेल तर कुठल्याही कार्यात यश येणार नाही किंवा आत्मविश्वासात कमतरता भासते आणि असुरक्षित वाटत राहते .  रवीची ऋण बाजू म्हणजे नको तितका पराकोटीचा अहंकार आणि उद्धटपणा . रवी कमकुवत असलेल्या व्यक्तींची जराशी स्तुती सुद्धा त्यांचा अहंकार फुलवते . ग्रह बलवान असेल तर अश्या खोट्या स्तुतीला कधीच भुलणार नाही तसेच टीकेला पण खिलाडू वृत्तीने घेतील.  पण कमकुवत ग्रह जराश्या स्तुतीने व्यक्तीला हवेत नेयील. 


ज्या घरात चंद्र गेला तिथे तुमच्या emotions, मन , भावना गेल्या हे लक्ष्यात ठेवायचे. चंद्र हा शीतल नैसर्गिक शुभ ग्रह सर्वाना हवाहवासा वाटणारा , कवी मनाला भुरळ पाडणारा आहे . चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही . सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच परावर्तीत होवून पृथ्वीवर येतो ज्याला आपण चांदणे पडलेय असे म्हणतो. म्हणजे चंद्रकिरण हे खर्या अर्थाने सुर्याचेच किरण असतात . चंद्र आणि सूर्य जेव्हा पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात तेव्हा अमावास्या असते आणि पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी स्थिती असते त्याला पौर्णिमा म्हणतात . पृथ्वी हि वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत येताना सूर्याच्या आकर्षणामुळे तिला एक मोठी भरती आली आणि त्यात तिचा एक मोठा भाग तिच्यापासून वेगळा आला जो तिच्याभोवती फिरत राहिला . अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या भावात असतो ती आपली जन्मरास असते. चंद्राच्या जन्माच्या अनेक पौराणिक कथा वाचायला मिळतात. चंद्र हा कृष्णपक्षात क्षीण होत जातो . समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे हा संदर्भ विष्णू पुराणात आढळतो. समुद्रातील पाणी वास्तविक कमी अधिक होत नाही पण चंद्राच्या आकर्षणामुळे तसे वाटते. चंद्राच्या आकर्षणामुळे पाणी ओढलेले दिसते .

भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून त्यालाच ओवाळते. कालपुरुषाच्या  कुंडलीत चंद्र हे मूळ मानले आहे आणि इतर ग्रह ह्या शाखा आहेत . जर चंद्राचे इतर ग्रहांशी योग चांगले नसतील तर शुक्र गुरु कितीही चांगले असतील तरी काहीही उपयोग नाही. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री हे एक विलक्षण कोडे आहे. 

विश्वाचा गाडा अखंड चालू ठेवण्याचे महान कार्य देवाने स्त्रीकडे सोपवले आहे. अखंड विश्वात जे जे सुंदर आहे पवित्र आहे, मंगल आहे ते स्त्रीमध्ये आहे .रवी हा आत्म्याचा तर चंद्र मनाचा कारक आहे.

मातेचे सुख चंद्रापासून बघतात . प्रेमळपणा , संपत्ती ,नैराश्य , आनंद , शरीरावरील शिरा , शरीरातील जलतत्व ,कुटुंब प्रेम  ,जलाशय , पर्यटन , नौकाविहार , फळे फुले , चांदी ,पेये , फळांचे रस , तसेच घशाचे आजार , स्वादुपिंड , स्तन , लाळ, दमा ह्यावर चंद्राचा अंमल आहे. विसरणे , मानसिक कमकुवतपणा,मेंदूची क्रिया ,पुरुषाचा उजवा तर स्त्रीचा डावा डोळा , वेड, प्रवासाची आवड , तीर्थयात्रा , विवेक स्त्रीसुलभ लज्जा ,गौरवर्ण,अती चंचलता  चंद्रावरून पहिली जाते.

चंद्र मनाची स्थिती दर्शवतो , वनस्पती , पाणी , खाद्यपदार्थ , आई ह्यावर अंमल करतो. पौर्णिमा आणि अमावस्या प्रमाणे मनाची स्थिती सुद्धा आनंदी आणि दुखी असते. मन किती प्रकारे आणि कश्या प्रकारे सतत बदलत राहते हे चंद्राच्या पत्रिकेतील स्थितीवरून ज्ञात होते . चंद्र चांगला असेल तर व्यक्ती कुठल्याही परीस्थित शांत राहून विचार करेल, वेळ बदलण्याची वाट बघेल पण चंद्र कमकुवत असेल तर जराजराश्या गोष्टीनी सुद्धा सगळे घर डोक्यावर घेईल. एखाद्या वेळी ट्रेन उशिरा आली तर व्यक्ती शांत बसून पेपर वाचेल पण एखादी सतत येरझार्या घालेल , १० वेळा ट्रेन आली का ते डोकावून बघत राहील. चंद्र बिघडला तर कश्यातच रस नसतो , व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगते . चंद्रमा मनसो जातः म्हंटले आहेच . चंद्र कमकुवत असेल तर व्यक्ती मानसिक विकारांना बळी पडते तसेच व्यसनाच्या आहारी सुद्धा जावू शकते .

आज आपण रवी आणि चंद्र ह्या दोन ग्रहांच्या काही छटा पहिल्या . बघा तुमच्या पत्रिकेत हे दोन ग्रह कसे आहेत ? चंद्र आणि रवी कुठल्या भावात आहेत त्यावर राहू केतू शनी मंगल ह्यांच्या दृष्टी आहे का? चंद्र वृषभ राशीत आणि रवी मेष राशीत उच्च फळे देतो. लहानपणापासून डोळ्यांचे विकार दृष्टीदोष आहे म्हणजे रवी कुठेतरी बिघडला आहे अश्या प्रकारे ह्या दोन ग्रहांचा अभ्यास करा. पुढील लेखात पुढचे दोन ग्रह घेवूया .


सूर्यमालिकेत रवी राजा आणि चंद्र राणी मानले तर बुध हा राजकुमार आहे. पण तो किशोर वयातील आहे. बुध म्हणजे शब्द , भाषा , वक्तृत्व त्यामुळे बुध ज्यांचा चांगला असतो ते बोलण्यात हुशार , अनेक भाषा जाणणारे बोलणारे असतात . शब्दांच्या कोट्यां करणारे आणि नकलाकार असतात . म्हणूनच बुधाला ग्रहांत बिरबल म्हंटले आहे . अत्यंत हजरजबाबी असतात . उत्तम सवांद शैली असणारे. चिरतरुण व्यक्तिमत्व असणारा आणि हुशार , उत्कृष्ठ स्मरणशक्ती आणि असामान्य शब्द सामर्थ्य . पण किशोरवयीन असल्यामुळे थोडासा अल्लड आणि कधी बालिश सुद्धा . बुध प्रधान व्यक्ती त्यांचे वय चोरतात म्हणजे ५० वर्षाचा माणूस ४५ चा दिसेल. कन्या राशीत बुध उत्तम फलित देतो. बुध आणि सोबत गुरु सुद्धा पत्रिकेत चांगले असतील तर व्यक्तीची शैक्षणिक पात्रता उत्तम असते , उच्च शिक्षण होते . बुध विष्णूचे प्रत्यक असल्यामुळे बुधाचे उपाय म्हणून विष्णूची आराधना , जप , सत्यनारायण व्रत करता येते . बुधाच्या राशी निसर्ग कुंडलीत 3 6 ह्या भावात येतात . 6 व्या भावावरून आपण आपले पोट पाहतो. आपले वितभर पोट आणि पोटाची भूक आपल्याला काम करायला लावते. बुधाकडे हात आणि बाहू आहेत . पाहिलेत ना काम करण्यासाठी आपल्याला तृतीय भावातील हात आणि बहु लागतात . तृतीय भाव पराक्रम आहे. पराक्रमाने , कर्तुत्व गाजवून आपण आपले पोट भरतो आणि काम करण्यासाठी हात लागतात . बुध हा नर्व्हस सिस्टीम दर्शवतो , बुधाकडे पृथ्वीतत्व आहे आणि आपली त्वचा ( पृथ्वीला जसे आवरण असते ). आपल्या त्वचेला एक प्रकारचा सुगंध असतो जसा पहिला पाऊस पडला कि मातीचा सुगंध येतो तसाच . बुधाला चंद्राने बिघडवले तर स्कीन म्हणजे त्वचेचे आजार होवू शकतात . चंद्र बुध मनाचे चांचल्य दर्शवतो. बुधाकडे थोडे नपुंसत्व आहे. म्हणूनच पंचम भावात बुधाच्या राशी किंवा पंचमेश बुधाच्या राशीत असेल तर संतती साठी पत्रिका अभ्यासावी लागते अर्थात त्याचसोबत जीवकारक गुरु सुद्धा. बुधाची मिथुन राशी तृतीय भावात येते जिथे करार मदार , लेखणी आहे , जाहिरात क्षेत्र . बुध दूत आहे म्हणूनच सगळी प्रसार माध्यमे तृतीय भावावरून पहिली जातात . शिवाजी महाराजांच्या काळात दूत खलिता घेवून इथून तिथे जात असत. थोडक्यात इथली बातमी तिथे ( दोन्ही अर्थाने ) हा बुध त्यात प्रवीण आहे. एखादा फालतू बडबड किंवा अर्थहीन बोलत असेल तर त्याचा बुध बिघडलेला आहे आणि एखादा मार्मिक , वैचारिक बैठक असणारा बोलत असेल तर त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते , लिखाण वाचावेसे वाटते . बुध ठीक करण्यासाठी विष्णूची पूजा जप करावा .

राजाच्या राज्याला सेनापती मंगळ ह्याची नितांत गरज आहे . जोश , उत्साह , लढाऊ वृत्ती , आरे ला कारे करण्याची प्रवृत्ती , असामान्य धैर्य आणि शौर्य , नेतृत्व , अग्नीतत्व त्यामुळे भडका उडणे ( अनेकदा स्वभाव ) , शक्तीचे प्रदर्शन त्यामुळे समुद्रात पोहणारे , अग्निशामक दल , अनेक खेळ , पोलीस यंत्रणा , सैन्य दल , सर्जन ह्या क्षेत्रात  काम करणाऱ्या लोकांचा मंगळ नक्कीच महत्वाचा आहे. श्री गणेश , हनुमानाची पूजा  करावी . श्री गणेशाची आणि हनुमानाचे पूजन उपयुक्त होईल. मंगळ स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक मानला आहे. मंगळ हा अनेकदा अमंगळ करणारा असू शकतो जर तो राहू शनी ह्या ग्रहणी दुषित असेल तर . सुस्थितीत असलेला मंगळ स्वतःवर ताबा मिळवेल उठसुठ चिडणार नाही. भावनांवर विजय मिळवेल. रक्ताचा कारक असल्यामुळे BP , रक्तदाब , असुरक्षित पणाची भावना मनात येते. मंगळाकडे अजिबात धीर नाही तर तो प्रत्येक गोष्टीत अधीरता दर्शवतो. सेनापती ला इतकेच माहित आहे कि समोर शत्रू आहे आणि त्याचा निपात करायचा आहे. त्यामुळे तो फारसे डोके न चालवता कृती करतो तीही क्षणाचाही विलंब न लावता . असे हायपर पेशंट अनेकदा आपल्यालाच त्रास करून घेतात .रक्ताचा कारक असल्यामुळे राक्तासंबंधी आजार . मंगळाची पत्रिका हा विषय तर अत्यंत चुकीच्या दृष्टीने मांडला जातो. मंगळाच्या मुलामुलीत दोष आहे असे काही नसते , त्यांनी विवाह करू नये असे तर अजिबात नाही. बुधाच्या मिथुन आणि कन्या राशीतील मंगळ तितकासा धाडसी नसतो. शनी मंगल युती हि घातक , त्रासदायक मानलेली आहे .हनुमान चालीसा , गणपती स्तोत्र म्हणावे.  


शक्र हा आयुष्यातील सर्व आनंदाची बरसात करणार ग्रह आहे .  वक्तशीरपणा , निट नेटके राहणे , टापटीप राहणीमान , पेहराव , दागदागिने , कविता करणे , प्रवासाची आवड , प्रत्येक गोष्टीत असणारी सकारात्मकता आणि आकर्षण . शुक्राचार्य हे ऋषी होते आणि ते दैत्यांचे गुरु होते . ते शिवाचे भक्त होते. शिवाची प्रखर साधना करून त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली ह्या कथा  आपण वाचतो ऐकतो . शुक्र आयुष्यातील passion आवड दर्शवतो तसेच कामसुखाच कारक सुद्धा शुक्रच आहे. शुक्र हा  नैसर्गिक शुभग्रह आणि जलतत्व आहे. शुक्र म्हणजे महालक्ष्मी . प्रसिद्धी सुद्धा शुक्रा मुळे मिळते . वाहन सौख्य , अनेक विध भौतिक सुखांची प्राप्ती , संतती , सर्व प्रकारची रत्न शुक्राकडे आहेत . सर्व कला सुद्धा शुक्राकडे आहेत जसे चित्रकला , रांगोळी , स्वयपाक , कलाकुसर ई. नाटक , सिनेमा , चेहऱ्यावरील लज्जा , सुगंधी द्रव्ये आणि पेय , प्रवास आणि पर्यटन संस्था , बागायती , छानछोकी , नित्नेतके राहणे , तारुण्य , उत्साह , समाधान शुक्राच प्रदान करतो. व्यसने बिघडलेला शुक्र तर पेर्म प्रकरणे शुक्र मंगळ .


गुरु सुद्धा शुक्रसारखाच नैसर्गिक शुभग्रह आहे. ज्ञान , वेदांत , वेद , ज्योतिष ,अध्यात्म  गुरूकडे आहे . गुरु हा जीवकारक  असल्यामुळे संततीचा कारक ग्रह सुद्धा गुरु आहे.  बँक , अपर संपत्ती , चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती गुरूकडे आहे. गुरु हा राजमार्गाने जाणारा असल्यामुळे राजमार्गाने मिळवलेला पैसा गुरु देयील.   

गुरु म्हणजे भव्य दिव्य. विद्या , ज्ञान , नवनिर्मिती , धर्म , धार्मिकता , अंतर्मन , अध्यात्मिकता , रूढी परंपरा .

गुरु बलवान असेल तर शिक्षण क्षेत्र , मंदिर मठ ह्या सारख्या धार्मिक ठिकाणी नोकरी , न्याय व्यवस्था , बाल सुधार केंद्र , डॉक्टर , दवाखाना , पुरोहित , कीर्तनकार , विश्वस्थ , ट्रस्टी .वकिली , दूरचे प्रवास , परदेशी कंपन्या. आपल्याला ऐनवेळी मदत मिळते ती गुरूमुळे . मानसन्मान , समाजकार्य , गुरु व्यवहारी नाही पण त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. , देवघर , पूजा , पोथी वाचन , नामस्मरण , समाधान , मांगल्य , परोपकार , उच्च विचार , प्रगल्भता .

गुरु हा प्रसरणशील आहे . संयमी सात्विक आहे. प्रापंचिक आयुष्यात संयम लागतो .न्यायी आहे आणि समाधानी आहे.संकटात दुसर्याला मदत करणारा आणि आस्तिक सर्वाना बरोबर घेवून जाणारा आहे. 

शनी आणि राहू केतू ह्यांच्याबद्दल अनेक वेळा लिहून झाल्यामुळे पुन्हा त्यांचा उल्लेख करत नाही. 

आपल्या पत्रिकेतील ग्रह आपल्याला समजले तर आयुष्य सोपे होते , दिशा मिळते . आपण कुठे उभे आहोत आणि कुठवर जाणार आहोत ह्याचे मार्गदर्शन करणारे हे ग्रह आहेत . त्यांच्या अभ्यास आयुष्य दिशाहीन होण्यापासून वाचवतो हे नक्की .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

प्रत्येक पत्रिका म्हणजे एक आव्हान

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिका म्हणजे आपल्या स्वतःचा आरसा आहे. आपल्या पत्रिकेतून आपले संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित होत असते. आपल्या सवयी , आवडी निवडी , देहबोली , शिक्षण , आयुष्यातील चढ उतार , आपला जीवनाकडे ,प्रत्येक व्यक्ती आणि घटनेकडे  बघण्याचा दृष्टीकोन , हार जीत , आर्थिक उलाढाली , आशा निराशा , स्थित्यंतरे अश्या अनेक अनेक गोष्टींचा बोध पत्रिका आपल्या समोर आणते . म्हणूनच पत्रिका हि अत्यंत पवित्र मानली जाते . 

एक पत्रिका म्हणजे एक अखंड आयुष्य म्हंटले तर वावगे ठरायला नको. ज्योतिष हा एक व्यासंग आहे. प्रचंड खोल जावूनही अनेकदा काहीही हाती लागत नाही अश्यावेळी निराश न होता पुन्हा उडी मारावी लागते अगदी तसेच हे शास्त्र आहे. आपण ग्रंथातून शिकलेले , वाचलेले अनेक नियम , सूत्रे ह्यांचा अभ्यास करून ते जेव्हा पत्रिकेला लावतो तेव्हा ते कसे लावायचे हे समजले नाही तर सर्व फोल आहे. अर्थ त्रिकोणातील कन्या राशीतील शुक्र हा कदाचित वैवाहिक सौख्यात उणीव देयील पण आर्थिक स्थिती मजबूत करेल. वंध्या राशी किंवा ग्रह पंचमात विशेष बहरणार नाहीत आणि संततीचा प्रश्न निर्माण करतील . तृतीय भाव हा नेहमीच घटस्फोटाचा कसा असू शकेल ? कारण तो काम त्रिकोणातील प्रथम भाव सुद्धा आहे. 

चतुर्थ आणि भाग्य भावाच्या दशा उच्च शिक्षण प्रदान करतील पण नोकरी देतील का? IT मध्ये असलेल्या व्यक्तीला ९ १२ ची दशा काय देयील? प्रगती कि अधोगती ? त्यामुळे ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. आपण कितीही ग्रंथ वाचले , सोशल मिडिया कोळून प्यायलो तरी जोवर आपल्याला स्थिर बुद्धीने समोरच्या पत्रिकेतील ग्रहांचा जातकाने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने  मागोवा घेता येत नाही तोवर आपले ज्ञान तुटपुंजे आहे हे लक्ष्यात आले  पाहिजे आणि ते खुल्या दिलाने मान्यही करायला पाहिजे. हेच अंतिम सत्य आहे . 

आज पत्रिका दाखवून विवाह केले जातात मग ते काही काळाने कोर्टाची पायरी कशी चढताना दिसतात . म्हणूनच ह्या शास्त्राचा अभ्यास हा सतत केला पाहिजे . वेगवेगळे पेहलू , दशा काय फळ देयील हे अभ्यासता आले पाहिजे . आपल्याच आयुष्याचा वेगवेगळा खेळ वेळोवेळी मांडणारे ग्रह त्यांची बोलीभाषा समजली पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधता आला पाहिजे . सरसकट एकच नियम सगळीकडे लागत नाही . शुक्र दशा २६-२८ वर्षाच्या मुलाला आणि ७० वर्षाच्या माणसाला तेच फळ देयील का? शुक्र षष्ठात असेल तर दोघानाही आता तुमचे वैवाहिक जीवनाचे बारा वाजणार हे आपण सांगू शकू का? नाही . 

उत्तम फोडणी , धने जिरे पावडर , नेमके मीठ तिखट , नारळ कोथिंबीर घालूनही आमटी जेव्हा खाणार्याच्या चेहर्यावर अपेक्षित तृप्तता देत नाही तेव्हा आपले प्रमाण चुकले हे समजले पाहिजे ते मोठ्या मनाने स्वीकारताही आले पाहिजे. 

शास्त्राचा अभ्यास करताना अध्यात्माची जोड असेल तर व्यासंग द्विगुणीत होतो. त्यातील मेख समजू लागते कारण गुरुकृपा . कुठलीही विद्या आत्मसात होण्यास गुरुकृपा हवी , आपली स्वतःचीही शिकण्याची  तळमळ असली पाहिजे . आपल्या चुका मोठ्या मानाने स्वीकारण्याचे धाडस सुद्धा हवे. पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याची जिद्द हवी .

इथे कुणीही परिपूर्ण नाही , सगळे चुकतात आणि चुकत राहणार पण त्यातून शिकण्याची वृत्ती हवी . सगळ्या गोष्टीना जशी मर्यादा आहे तशी ह्या शास्त्राला सुद्धा . पण सतत मनन चिंतन करून अगदी ध्यास घेवून केलेला अभ्यास अचूक फलादेशा पर्यंत नेऊ शकतो . 

आज फलज्योतिष , उद्या कृष्णमुर्ती , परवा जैमिनी असे न करता एकाचीच कास धरावी पण त्यात पारंगत व्हावे असे मला वाटते. गोचर ग्रहस्थितीचा अभ्यास हा महत्वाचा आहे. सकाळी उठल्यावर पंचांग पहिले पाहण्याचा सराव असला पाहिजे. गोचर ग्रह , वक्री मार्गी अस्तंगत ग्रहांच्या अवस्था , ग्रहांचे राशी परिवर्तन , नक्षत्र ह्या सर्वावर लक्ष्य हवे . आपले स्वतःचे नियम सूत्र सुद्धा अनुभवातून तयार होत असतात . मुळात पत्रिकेत विवाहाचा योग नसेल तर लग्नी गुरु आला सप्तमातून गुरु रविचे भ्रमण विवाह देयील हे सांगून जातकाला खोटी आशा दाखवू नये . जे आहे ते आहे . कुठेतरी आयुष्यात कोपरा रिता आहे म्हणून देवाचे महत्व आहे आपल्या आयुष्यात . एखादी गोष्ट घडली नाही म्हणून आयुष्य संपत नाही आपला श्वास सुद्धा थांबत नाही. देव जगवतो आपल्याला तशी कारणे सुद्धा समोर आणतो जगण्याचे बळ देतो आणि ज्योतिषाने जातकाला उपासनेच्या माध्यमातून जगायला शिकवावे असे वाटते. पुढे महाराज समर्थ आहेत सर्व बघायला.

पैसा मिळण्याचे , केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून ह्या कडे पाहू नये हे माझे मत आहे. एखादा घटस्फोट आपण जेव्हा वाचवतो तेव्हा मिळणारे समाधान हे मिळालेल्या मानधना पेक्षा कित्येक पटीने मोठे असते . घटस्फोट झाला म्हणजे ती दोघे वाईट असतात का? नाही तर चुकीच्या व्यक्तीला बरोबर ठरवून ( जो त्यांचा भ्रम असतो )ते एकत्र आलेले असतात असे म्हणूया हवे तर .  

वर्षभर अभ्यास करून शेवटच्या ३ तासात विद्यार्थी  जे जसे आठवेल तसा पेपर सोडवणार तेव्हा ते ३ तास खरे . मग मी किती क्लास लावले वगैरे विसरा . अगदी तसेच इतके ग्रंथ वाचून समोर पत्रिका आल्यावर जर अचूक उत्तर शोधता आले नाही तर सर्व फोल आणि हे उत्तर शोधायला अपार कष्ट आहेत . साधना , अध्ययन ह्याचा एकत्रित मेळ तर्कापर्यंत नेत असतो आणि त्यात सिहाचा वाटा म्हणजे गुरुकृपा . 

ग्रहांचे अंश , नक्षत्राचे चरण , त्याच्या जवळ असणारे शुभ अशुभ तारे , दृष्ट्या इतर बारकावे गुरुकृपेशिवाय समजणे अशक्य . प्रत्येक वेळी राहू शनीवर बिल नाही फाडू शकत आपण . गोड गोड चंद्र सुद्धा आयुष्याची जी वाट लावतो ती कुणा इतर क्रूर ग्रहालाही जमत नाही . 

ज्योतिष शिकणे हे तप आहे. हि एक साधना आहे , इथे समर्पण लागते . ग्रह असे फिरवतात आपल्याला कि बस , नाही समजली असे वरवर वाटत असले तरी वास्तवात पत्रिका उलगडत नाही आणि अचूक उत्तर सापडणे हे एक आव्हान होते  हे नक्की . प्रत्येक पत्रिका म्हणजे ज्योतिषा साठी आव्हान आणि शिकण्याची संधी सुद्धा . गुगली टाकणाऱ्या पत्रिका आयुष्यात येतात ते कसोटीचे क्षण असतात अश्या वेळी आपला अभ्यास जो आपल्याला परिपूर्ण वाटत होता तो किती खुजा आहे हे समजते.

ह्या सन्मानीय शास्त्रास आणि शास्त्राच्या सर्व अभ्यासकांना सादर अभिवादन .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

स्मर्तगामी

 || श्री स्वामी समर्थ ||


अनेकदा आपले मन वैफल्य ग्रस्त होते , निराश होते तर कधी फुलपाखरासारखे इथून तिथे आनंदाने नाचत असते . मनाच्या अवस्थेवर आपण विहार करत जीवन जगत असतो . हि मनाची अवस्था फक्त एकाच ठिकाणी स्थिर होते आणि ते म्हणजे आपल्या गुरूंच्या चरणाशी आणि म्हणूनच आपल्या गुरूंच्या चरणाशी क्षणभर विसावा मिळण्यासाठी त्यांच्या चरणाशी जागा मिळण्यासाठी त्यांचे अखंड स्मरण करत राहावे लागते .

एकही क्षण त्यांच्या स्मरणाशिवाय गेला तर तो वायाच गेला असे समजावे. स्मर्तगामी ह्याचा अर्थच मुळी ज्याचे स्मरण केल्यावर इतर सर्व गोष्टींचे विस्मरण होते असा आहे . इतर गोष्टींचे विस्मरण झाले कि अपोआप त्यांचेच स्मरण होते . त्यामुळे अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करत राहणे  म्हणजेच प्रपंच करून पारमार्थिक जीवन जगण्यासारखे आहे .

उद्या दत्त जयंती आहे . उद्यापासून सगळ्याचे विस्मरण करण्याचा मनापासून प्रयत्न करून फक्त त्यांचे स्मरण करत राहण्याचा दृढ निश्चय करुया . जीवनाचा खरा अर्थ आणि आपल्या जन्माचे आणि जगण्याचे प्रयोजन त्यांनाच माहित आहे आणि ते आपल्याला कळते जेव्हा त्यांचे चरणाशी जाण्याची बुद्धी होते.

नुसते शरीराने रांगेत उभे राहणे आणि चाफा वाहणे म्हणजे दत्त जयंती नाही तर चांगले मनात विचार रुजवणे , ते जागृत ठेवून त्यात इतरानाही समाविष्ट करून घेणे हेच ह्या दिवसाचे गमक आहे.

त्यांच्यात एकरूप होण्यासाठी मनापासून प्रयत्न करुया . तारक मंत्र , नाम ह्या सर्वातून त्यांच्या सहवासात राहणे हेच जीवन आहे आणि ते समजते जेव्हा दुक्ख गळ्याशी येतात . किती दिवस सुखी असल्याचा मुखवटा घालून फिरणार आपण . किती दिवस मत्सर , सुडाच्या भूमिकेतून इतरांना त्रास देणार आपण , विचार करा . जानराव देशमुखाला  महाराजांच्या चरणाला स्पर्श कलेल्या  पाण्याने जीवन लाभले ते आपल्याला का नाही तारणार . ते आपलेच तर आहेत .

हम गया नाही जिंदा है, मी गेलो ऐसे मानू नका , भक्तीत अंतर करू नका हे वचन भक्तांना देणारे आपले महाराज आजही ह्या क्षणी आपल्या अवती भवतीच आहेत . त्यांना ओळखण्याची ताकद देते ते नामस्मरण , म्हणूनच नामाचे महत्व आहे.

जगातील प्रारब्धातील सर्व द्क्खाची होळी करणारे, सगळ्या व्याधी , निराशा , त्रास सगळ्याचे विस्मरण व्हावे आणि चित्त त्यांच्या चरणाशी एकरूप व्हावे ह्यासाठी प्रयत्नशील राहूया .प्रचंड ताकद नामात आहे.

उद्यापासून जीवन त्यांना समर्पित करून त्यांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करून , त्यांच्यावर सर्व भर सोपवून निर्धास्त राहूया . महाराज आपले वाईट करतील का? विचारा प्रश्न आपल्याच मनाला , बघा काय उत्तर मिळते आहे ते. आले ना चेहऱ्यावर हसू ?

प्रचीती विना भक्ती नाही आणि भक्ती केल्याशिवाय प्रचीती मिळणार नाही. सोळा आणे खरी भक्ती त्यांना अपेक्षित आहे . ती केली तर जीवनात आनंदाचा मळा ते फुलवल्याशिवाय राहणार नाहीत .

कुठलीही शंका नको आणि भय तर त्याहून नको. ते आहेत आणि ते आहेतच . महाराज आजपासून मला सर्व गोष्टींचे विस्मरण होवूदे आणि तुमच्याच नामस्मरणात जीवन व्यतीत होवूदे हेच मागणे आहे.

सर्वाना दत्त जयंतीच्या मनापासून शुभेछ्या .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

एकटेपणा

 || श्री स्वामी समर्थ ||


अनेकदा मुलांची लग्न होतात ती आपापल्या घरी जातात किंवा परदेशी स्थायिक होतात . कालांतराने जोडीदार आपल्या पुढील प्रवासाला निघून जातो आणि वाट्याला  येतो तो एकांत किंवा एकटेपणा . आपण ओढवून न घेतलेला परिस्थिती मुळे आलेला एकटेपणा अनेकदा असह्य होतो. माणूस हा समाज प्रिय आहे आणि माणसांशिवाय तो राहू शकत नाही . वय वाढत जाते तसे एकटेपणाची भीतीही वाटू लागते . कुणीतरी बोलायला लागते आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी समोर कुणीतरी हवेच .

अनेकदा हा एकटेपणा परिस्थिती मुळे आलेला नसतो तर तो आपण आपल्या स्वभावामुळे , अहंकारी वर्तनाने ओढवून सुद्धा घेतलेला असतो. आयुष्यातील एकटेपणा हे आपल्या माजोरी स्वभावाला शनीने दिलेलं प्रत्युत्तर असते जे समजायला खूप वेळ लागतो . आपल्या ऐन उमेदीच्या काळात आपण अनेक गोष्टी करत असतो , शरीरसंपदा उत्तम असते , आर्थिक पाठबळ असते . अर्थात सगळी सुबत्ता असते तेव्हा खुपदा आपल्याला कुणाचीच गरज नाही अश्या अविर्भावात आपण वावरू लागतो तेही आपल्याही नकळत . पैशाची नशा आणि आयुष्यातील यश आपल्याला बेधुंद करते , आपण सर्वाना कमी लेखू लागतो , मी म्हणजे कोण हि भावना मोठ्या वेगात आपल्यात शिरू लागते , पण हे सर्व खुजे असते आणि ते आपल्या लक्ष्यात येते जेव्हा वेळ निघून गेलेली असते.

पैसा हा प्राप्त परिस्थितीनुसार सगळ्यांकडे कमी जास्ती असतो पण तो असतो. कुणाकडे कमी आहे म्हणून त्याला कमी लेखण्याचा मूर्ख पणा आणि माजोरीपणा भविष्यात आपल्याला भोगावा लागतो. माणसात माणुसकी किती आहे त्यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरते निदान माझे तरी तसे मत आहे. संपत्ती मिळवावी पण माणुसकी आणि आपले जमिनीवरील पाय मात्र कधीही सोडू नये.

आपले कर्म करत असताना कारण नसताना उगीच कुणाला दुखवू नये कारण त्यांनी आपण आपलीच कर्म वाढवून घेत असतो. कुणाला कमी लेखणे , हिणवणे , त्याच्या उणीवांवर बोट ठेवून त्याला दुखावणे हे शिक्षित असल्याचे लक्षण नक्कीच नाही.

आयुष्याच्या शेवटी शनी सगळे हिशोब करतो तेव्हा ह्या सगळ्याचे फळ पदरात जसेच्या तसे नव्हे तर दाम दुपटीने  घालतो आणि ते म्हणजे “ एकटेपणा “ .  सगळ्यांना आयुष्यभर दुखावलेस ना बस आता एकटाच असेच कदाचित त्याला म्हणायचे असेल. शेवटी आपण माणसासाठी तरसतो , आपण बोललेले कठोर शब्द , केलेल्या चुका आणि केलेले अपमान आपले आपल्यालाच खात राहतात , झोप उडते ती कायमची .

शनी आपल्या कष्टांचे फळ सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही . मोठी घरे , महागड्या वस्तू वाहने सर्व भौतिक सुखे प्रदान करेल पण त्या घरात नुसतेच फर्निचर असेल आणि सोबत जीवघेणा एकटेपणा . काय उपयोग ह्या सर्वाचा जेव्हा आपल्या सोबत कुणीच नसावे तेही अश्यावेळी जेव्हा आपल्याला माणसाची सर्वात अधिक गरज असते.

आजवर जितके आयुष्य जगले आणि पाहिले त्यातून एकच निष्कर्ष काढला तो म्हणजे कुठल्याही गोष्टीचा माज नको , आपण काहीही घेवून आलेलो नाही आणि नेणारही नाही. इथे क्षणाचे सोबती आहोत त्यामुळे कुणाला कमी लेखू नका , दुखवू नका. असा हा जीवघेणा एकटेपणा फार वाईट असतो . जे अनुभवत आहेत त्यांना हे नक्कीच पटेल. साधे घर असावे पण माणसांनी भरलेले असावे .  

आपल्या चुकीच्या कर्माचे फळ म्हणून मिळालेला एकटेपणा ओढवून घेवू नका . आयुष्य फार सुरेख आहे आणि ते उपभोगण्यासाठी जोडलेली नाती , मित्र टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करा . कधी दोन पावले मागे या पण माणसे जोडून ठेवा .

शेवटी आपल्याला अंतिम प्रवासाला जाताना चार माणसे लागतात आणि ती जोडण्याची कला अवगत असणे हेच खरे जीवन आहे.


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

पुर्णत्वाकडे नेणारा प्रवास

 || श्री स्वामी समर्थ ||


आजकाल जातक पत्रिका मार्गदर्शनासाठी आले कि पहिली ५-६ वाक्ये ऐकून ज्योतिष शास्त्राच्या क्लास ला गेल्या सारखे वाटते . माझे अमुक लग्न आहे , माझा शनी इथे , मंगळ नीच आहे, माझी चंद्र दशा आहे. मनात येते इतके अनुभव संपन्न असल्यावर ज्योतिषाकडे जायची गरजच काय . आणि मग तसे विचारले कि मग म्हणतात नाही कुठेतरी काही वाचण्यात येते वगैरे वगैरे मला थोडेसे ज्ञान आहे. आणि हे “ थोडेसे “ च आपली वाट लावते .

कुठल्याही गोष्टीत आज पाहिले तर सगळे अर्धवट अर्धवट आहे आपले . कुठलाही विषय संपूर्ण अभ्यासलेला नाही आणि मग अर्धवट काहीतरी ऐकून बोलून तशी मनोधारणा करून घ्यायची . कुठेतरी काहीतरी अफवा ऐकून एखाद्या व्यक्तीबद्दल सुद्धा मते बनवणे किंवा बनवून देणे घातक आहे. रोजच्या जीवनातील अत्यंत साध्या गोष्टी झाडांना कुठेतरी वाचून ऐकून खते आणून घालणे , आज जाहिरातींचे युग आहे त्यामुळे अनेक गोष्टी ह्या पुरेशी माहिती न घेताच आणल्या जातात. जसे वेगवेगळे मसाले , केसांचे तेल आणि बरेच काही . 

प्रत्येक गोष्टीत आपण संशोधन करायची आवश्यकता नाही आणि ते होणेही नाही पण ज्या रोजच्या जीवनातील निगडीत गोष्टी आहेत त्या तर पूर्ण माहिती असल्याच पाहिजेत . कुणीतरी काहीतरी सांगतो म्हणून आपण माणसे सुद्धा चांगली वाईट किंवा खूप चांगली खूप वाईट अशी ठरवतो ज्याने आपलेच नुकसान होते. इतरांच्या पापात आपल्याही नकळत आपण सहभागी होत जातो . आपण स्वतःच्या अनुभवावरून ह्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत. 

ज्ञान हे परिपूर्ण असावे मग ते कुठल्याही गोष्टीतील असो. सोशल मिडिया प्रगत आहे पण त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आहे का? काहीतरी व्यायाम प्रकार पाहून ते १०० वेळा केले तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होवू शकतात . आपला आहार , व्यायाम अन्य गोष्टी आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे ठरत असतात . आपण किती चालू शकतो काय पचवू शकतो हे आपले आपल्यालाच माहित असते .

असो सांगायचे तात्पर्य असे कि अर्धवट ज्ञान घातक असते. मला तर वाटते अध्यात्म , नामस्मरण हे महत्वाचे आहे . नाम हे रोजच्या जीवनातील अंग असलेच पाहिजे कारण नाम आपल्याला घडवत असते. आपण तरी स्वतःला पूर्ण कुठे  समजले आहोत ? विचारा प्रश्न स्वतःलाच बघा काय उत्तर मिळते . आपले सद्गुरू , इष्ट काहीच समजले नाही आपल्याला . 

रोज महाराजांना खंडीभर फुले अर्पण करतो , पूजा अर्चना , प्रसाद कश्याचीही कमतरता नसते पण त्यांनी सांगितलेली जीवनातील सूत्रे ? त्याचा अभ्यास अपुरा आहे आपला . कितीवेळा आपण दुसर्याला आपल्या शब्दांनी , कृतीने दुखावतो . समोरच्याने आपल्यासाठी काय केले आहे हे क्षणात विसरतो .विचार करा आपणही आपल्या गुरूंच्या साठी जे काही केले आहे ती भक्ती गुरुही विसरले तर आपले काय होयील ?? कारण त्यांच्याच मुळे तर आपले अस्तित्व , जीवन आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालणे हेच आपल्या जीवनाचे प्रथम उद्दिष्ट आहे. ह्या सगळ्याचे  पूर्णतः अवलंबन खरच करतो का आपण ???? उत्तर नाही असेच आहे. 

आपण स्वतःशी नाही खोटे बोलू शकत हे नक्की. अध्यात्मात सांगितल्याप्रमाणे जीवनाची सूत्रे आणि आपले जीवन ह्याचा काडीचाही संबंध नसतो म्हणूनच आपल्याला अजून पुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास करायचा आहे जो अनंत आहे. 

षडरिपूना सोडणे इतके सोपे असते तर अजून काय हवे होते . गुलाबजाम समोर ठेवले तर मी खाणार नाही असे ठरवून बघा . लगेच खाणार आपण . ना मनावर ताबा न कृतीवर . सगळेच अपूर्ण आहे.

आपल्या घरातील सगळ्यांची मने कुठे समजतात आपल्याला तर इतरांची समजतील . कुठलाही विषय असो अथवा व्यक्ती आपल्याला असलेली माहिती अर्धवट , अपूर्ण कित्येकदा चुकीची असते आणि त्यावर आपण आपली मते बनवून त्या व्यक्तीबद्दल मनोधारणा करून घेणे तर अजूनच घातक असू शकते. 

मनाची अस्थिरता , कमकुवत स्थिती ह्या वरून समजते . आपला स्वतःचा सखोल अभ्यास हवा मग वस्तू असो अथवा व्यक्ती , आणि तो असेल तर आपला दृष्टीकोन योग्य होण्यास मदत होते .कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून जेव्हा आपण कुठलीही गोष्ट किंवा मत बनवतो तेव्हा आपण स्वतःच्या कमकुवत अस्थिर मनाचे प्रदर्शन मांडत असतो.

नामस्मरणाचा पाऊस पाडून सुद्धा आपली मनोवृत्ती चंचल का असते ? चिंता का करतो आपण ? आपल्या गुरूंच्या वरती विश्वास का डळमळीत होतो ? कि तो कधी नव्हताच ? त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे ना आपण ? मग तरीही शंका कुशंका का भेडसावत आहेत आपल्या मनाला ? एखादी गोष्ट होणार का नाही हा संदेह मनात का असतो ? का नाही आपण हो हे नक्की होणारच असे म्हणत ? जर आणि तर मध्ये आयुष्य जाणार का आपले ?

मोह सुटत नाही आणि द्वेष मत्सर ह्या भावना जात नाही. मिळणार काय पण हे करून ? ह्या सर्वाचे प्रतिबिंब म्हणजे आपली प्रकृती जी मग पुढे ढासळत जाते .

आज आपली शरीरसंपदा जपण्यासाठी सात्विक विचार आणि कुठल्याही चुकीच्या विचारांपासून दूर राहण्याची गरज आहे. आजारांचे मूळ विचारात आहे .मी कालपासून आज पुढे कसे आयुष्य नेत आहे हे पाहिले तरी खूप आहे. शेजारी कुठली भाजी केली आहे आणि कुणाचे लग्न ठरले का , नोकरी मिळाली नाही म्हणून अमुक तमुक आजकाल घरातच असतो ह्या बातम्या माहिती करून घेण्याची मनोवृत्ती सोडली नाही तर आपली अधोगती होणार हे नक्की. 

जीवन क्षणभंगुर आहे. दिवसातील २४ तास ह्याच जीवनाचा स्वर्ग करण्यासाठी ईश्वराने दिले आहेत . आपल्या मनातील दुषित विचारांना तिलांजली देण्यासाठी प्रचंड वाचन आणि नामस्मरणाची आवश्यकता आहे. वेळच वेळ आहे आपल्याकडे आणि तो नको त्या गोष्टीत जात आहे. 

मला किती गोष्टींची पूर्ण माहिती आहे? स्वतः तसेच घरातील आणि नित्य व्यवहारातील किती माणसे पूर्णपणे समजली आहेत आपल्याला ? विचारा प्रश्न स्वतःलाच . उभा जन्म गेला तरी आपले गुरु सुद्धा आपल्याला समजत नाहीत , ते समजले तर भक्ती ला आपण करत असलेल्या सेवेला चार चांद लागतील . सहमत ..


तुमच्या आमच्या ह्या पूर्णत्वाकडे नेणाऱ्या प्रवासासाठी शुभेछ्या . भेटत राहू ह्या प्रवासात अधून मधून .

अपूर्णत्वाकडून  पुर्णत्वाकडे आपले आपल्यालाच जायचे आहे त्यासाठी प्रयत्नशील राहूया .


श्री स्वामी समर्थ 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

मी अत्यंत व्यस्त आहे ....हे म्हणणे हेच आपले दुर्भाग्य आहे .

 || श्री स्वामी समर्थ ||

२०२६ मध्ये अनेक गोष्टी करण्याचे मानस आपले सर्वांचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे वाटते ते खंडित झालेली संवादाची शृंखला . मोबाईल , कॉम्पुटर ह्या माध्यमांशी आणि ह्या माध्यमांच्या माध्यमातून होणारे संवाद ह्यानेच आपले आयुष्य आज व्यापलेले आहे . एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चहा घेत टाळ्या देत दिलखुलास संवाद मित्रांसोबत कधी केला होता आठवावेच लागेल.  सध्या संवाद दूर राहिला आहे आणि एकमेकांपासून सर्व लपवण्याकडे कल असतो.  आजकाल कुणी कुणाच्या घरी जात नाही . लोकांना टाळतो आपण . का? कश्यासाठी ?? .एकमेकांना “ मी किती सुखी आहे “ हा मुखवटा घालून आपल्या सुखी नसलेल्या आयुष्याचे गोडवे रसभरीत वर्णन करणारे आपण किती केविलवाणे दिसतो , सुखाचे प्रदर्शन करत आपले दुक्ख लपवण्याचा निरर्थक प्रयत्न करत का जगतोय आपण ? असे वागणारे आपले नातेवाईक , मित्र पाहिले कि मन वेदनांनी भरून येते. कश्याला हवा हा सर्व देखावा . जे आहे ते आहे . पण मनमोकळे बोलावे मनातील शैल्य सांगावे आणि दुक्ख हलके करावे असे खरच बोटाच्या अग्रावर मोजण्या इतके लोक राहिले आहेत .

पूर्वीचा नात्यातील मोकळेपणा , खेळकर पणा कुठेच दिसेनासा झाला आहे. मनातील गोष्टी जोवर बोलल्या जात नाहीत तोवर आपण खळखळून हसणार सुद्धा नाही आणि मनमोकळे रडणार सुद्धा नाही . नात्यातील दुरावा , मत्सर , संशय , कुणाचीही प्रगती न बघवणे , सर्व गोष्टीत गुप्तता हे आज समाजाचे चित्र आहे . 

आज प्रवास करताना कुणी एकमेकांच्या कडे मान वर करून बघत सुद्धा नाही. सगळे मोबाईल घेवून बसलेले त्यात शिक्षित अशिक्षित सगळेच असतात . ह्या सर्व electronic माध्यमांचा आपल्या शरीर मन बुद्धी ह्यावर नकारात्मक परिणाम होत आहे . मेंदू पोखरला जात आहे . विचार प्रवाहित होण्यापेक्षा  साचले जात आहेत आणि त्यामुळे अनेक नानाविध आजार आपले आपणच जन्माला घालत आहोत .

आवश्यक्ता नसेल तर मोबाईल चा वापर टाळा. मोबाईल नव्हते तेव्हाही जगत होतो कि आपण . एकमेकांना भेटत होतो आता whatsapp च्या माध्यमातून बोलणे होते . प्रत्यक्ष भेटी खाणे गप्पा हे whatsapp च्या माध्यमातून अशक्य आहे त्याचा आनंद क्षणिक असतो. प्रत्यक्ष भेट आपल्याला जगवते .  

जीवनशैली बदलणे अतिशय आवश्यक आहे आणि हाच २०२६ चा संकल्प असला पाहिजे जो आपल्याला आजारांच्या पासून दूर आणि आपल्याच माणसांच्या जवळ आणेल.  धबधब्या सारखे बोलले पाहिजे . आपल्याच लोकांपासून पळून जात आहोत आपण . आपण आपल्या पासूनही दूर जात आहोत . जेवणाच्या टेबलावर पण मोबाईल. काही लोकांच्या घरी सतत टीव्ही चालू असतो कारण घरात संवाद नसतो . 

एकमेकांशी बोलणे हि आपली काळाची गरज आहे. आनंदी जीवनाची तीच खरी गुरुकिल्ली आहे. मनातील विचार मनातून बाहेर पडले तर मन हलके होईल सगळी औषधे बंद होतील. एकमेकांसाठी जगता आले पाहिजे . ह्या सर्व मिडीया आणि आधुनिक तंत्रज्ञानावर राहूची सत्ता आहे. जग जवळ येत आहे पण आपण एकमेकांच्या पासून दुरावत आहोत . घरात निवांत सगळे मिळून चहा जेवण घेणे शेवटचे कधी केले होते ते आठवा तेही मोबाईल जवळ न ठेवता ... आठवा बर ..तुमचे उत्तर तुम्हालाच मिळेल . 

आज ३-४ वर्षाच्या मुलांना चस्मा आहे. तरुणाई BP च्या गोळ्या घेत स्ट्रेस मध्ये जगत आहे. माणसाचा माणसाशी संवाद महत्वाचा आणि तो करायचा असेल तर  Restrict Screentime हा एकमेव पर्याय आहे. मी सतत कामात असतो मला वेळ नसतो हे म्हणणे म्हणजे काही श्रेष्ठत्व नाही आणि ह्यात कसलाच मोठेपणा हि नाही. पैसा मिळवण्यासाठी व्यस्त आणि आयुष्याच्या शेवटी हाच पैसा आपणच निर्माण केलेल्या आजारांच्यावर घालवायचा . मग गोळाबेरीज काय . मिळवले तरी काय आपण ? 

ना मुलांसाठी वेळ न कुटुंबासाठी ना स्वतःच्या छंदांसाठी , आनंदासाठी ....वेळेने जणू आपल्याला वेढा घातल्यासारखे आपण आज उद्या परवा नुसते जगत आहोत .नुसते दिवस वर्ष पुढे पुढे जात आहे आणि एक दिवस हे आयुष्य असेच संपूनही जाणार आहे . आपण आपल्यासाठी जगतच नाही आहोत . भावना नाहीत पैसे मिळवायची मशीन झालो आहोत . “ मला वेळच नसतो “ हे सांगताना आता पुन्हा नव्याने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे अशी आज अवस्था आहे. अनेक आजार उंबरठ्यावर आहेत . कमी वयातील तरुणाई मुक्त पणाने जगायचे सोडून मानसिक क्लेश , EMI चे दडपण , नोकरी टिकवण्याची धडपड , पोटाला सात्विक अन्न नाही , दिसेल ते हवे तेव्हा खायचे , अपुरी झोप ह्यात अडकलेली आहे . कुठे जायचं आहे नक्की आपल्याला आणि काय मिळवायचे आहे. पैसा वैभव गरजेपुरते हवे कुणाला दाखवायला नको. आणि ह्या गरजा वाढवल्या कुणी ? आपणच. स्पर्धा कुणाशी आणि कश्याला ??? ह्याने हे केले मग मी पण त्याच्या दोन पावले पुढे जाणार हे सर्व कश्यासाठी ?कश्याला हा अट्टाहास ? भावनारहित आयुष्य तसेही उपयोगाचे नाही . 

२०२६ एकमेकांसाठी वेळ द्या . मोबाईल आणि इतर माध्यमातून भेटी नकोत प्रत्यक्ष भेटी वाढवा , दिलखुलास हसा आणि हसवा , आपले छंद , प्रवास , देवदर्शने आणि त्यासोबत हरवलेल्या प्रेमाला शोधा . मैत्री जपा त्याला खतपाणी घाला आणि २०२६ मध्ये स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुद्धा कसे बहरेल ह्यासाठी प्रयत्नशील रहा .

घर काम कार्यालय ह्या विषचक्रातून स्वतःला सोडवा आणि आयुष्य नव्या अर्थाने जगायला सुरवात करा . 

घरात प्रत्येकाने आपला screentime restrict करा . आपण सगळेच संवाद विसरलो आहोत त्याचाच पुनश्च हरिओम करायचा आहे. सुरवात करुया आजपासून अगदी ह्या क्षणापासून ..एकमेकांच्या सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आयुष्य जगायला बळ देतात .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Tuesday, 6 January 2026

2026 – समृद्धतेकडे वाटचाल

|| श्री स्वामी समर्थ ||

 प्रत्येक वर्ष अगदी प्रत्येक दिवस नवीन आशा घेवून येत असतो . 2026 काही दिवसात सुरु होईल. नवीन वर्षात मी हे करणार मी ते करणार असे अनेकविध संकल्प करण्यास आपली सुरवात झालेली आहेच. आता हे किती काळ टिकतात ते आपल्यालाही माहित आहे . जेव्हा एखादी गोष्ट करायची असते त्यासाठी नवीन वर्ष सुरु होण्याची वाट कश्याला बघायची ? सुरु करायचे लगेच . विचार मनात येतो तो क्षण म्हणजेच संकल्पाचा मुहूर्त. असो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हे वर्ष कसे आहे ते बघुया . सोशल मिडीया वरती “ ह्या ४ राशीना दिलासा मिळणार “, “ ह्या ३ राशी धनवान होणार “ , “ ह्या राशीनी सावध व्हावे ..” हे असले सगळे वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा नामस्मरण करा .

कुणाच्याही शब्दात आणि विचारात किती अडकायचे ते आपले आपण ठरवायचे असते . सोशल मिडीया वर राहूचे राज्य आहे. राहू दिशा देऊ शकतो आणि दिशाहीन सुद्धा करू शकतो. आपली बुद्धी आणि मन स्थिर ठेवून नामात स्वतःला गुंतवून घ्यावे हे उत्तम. असो. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मात असलेल्या लोकांनी मागे वळून पाहायचे नाही . ग्रहांना आपले काम करू देत आपण आपले करुया . अवकाशातील चंद्र सूर्य मंगल हि मंडळी आपले शत्रू नाहीत हे नक्की . तेही आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य समृद्धेकडे वाटचाल करत असते . ज्योतिष शास्त्र हे एक गहन शास्त्र आहे जे आपल्याला आपल्याच जन्माची कथा आणि व्यथा दोन्हीही उलगडून सांगणारे आहे . त्याचा सकारात्मक अभ्यास आणि विचार करता आला पाहिजे. विचार सकारात्मक ठेवलेत तर सर्व काही सकारात्मक घडेल ह्यात शंकाच नाही. म्हणून मी नेहमी म्हंटले मला कुणाच्याही पत्रिकेत वाईट काहीच कधीच दिसताच नाही. आशेचा किरण पत्रिकेत असतोच आणि तो शोधणे हेच ज्योतिषाचे काम असते. पुढील वर्षात गुरु मिथुन , कर्क आणि सिंह ह्या ३ राशीतून भ्रमण करणार आहे .

सध्या गुरु ११ मार्च पर्यंत वक्री अवस्थेतून मिथुन राशीत भ्रमण करत आहे . आपण घाईघाईत कामाला बाहेर पडतो आणि काहीतरी वस्तू घरात विसरलो म्हणून पुन्हा घरी येतो वस्तू घेतो आणि घराबाहेत पडतो . राहिलेले काम गुरु पूर्ण करूनच पुढे जाणार आहे . हीच वक्री अवस्था आहे, प्रत्येक लग्नाला गुरु वेगवेगळी फळे देणार आणि प्रत्येक पत्रिकेला सुद्धा . आपल्या वयक्तिक पत्रिकेतील ग्रहांची बैठक पाहिली आणि त्याला गोचर लावले तर अचूक उत्तर मिळतेच . अष्टम स्थान हे मानसिक त्रास देणारे आहे. ह्या भावातून जेव्हा राहू किंवा शनी सारखे ग्रह गोचर भ्रमण करतात तो काल आत्यंतिक त्रासाचा असतो . कुठून काय समस्या निर्माण होईल सांगता येत नाही पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असाच तो काळ असतो . त्यात हनुमान चालीसा आपली साधना उपासना ह्या सर्वच मानसिक मोठा आधार मिळतो म्हणून त्यात वाढ करावी . नामस्मरण काश्यावरही मात करण्याची ताकद ठेवते ते सतत करावे. वर्षात येणारी चंद्र आणि सूर्य ग्रहणे महत्वाची असतात , त्या काळात मोठे निर्णय घेतले तर चुकण्याची शक्यता असते. ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मूळ पत्रिकेतील चंद्राच्या पुढे आणि मागे ८-८ अंश शनी असतो तो काळ खरा साडेसातीचा असतो . त्यांनी शनी उपासना करावी . जे करायचे ते भावयुक्त . बुध आणि शुक्राच्या लग्नांना गुरु फारसा प्रभावशाली ठरत नाही . कुठला ग्रह आपल्यावर कृपा करतो ???? तर त्याचे उत्तर सगळेच ग्रह करतात असे आहे.

ग्रह हे आपल्या कर्माची फळे देण्यास बांधील असतात त्यामुळे तुम्ही दर चार मिनिटांनी खा खा खात असाल आणि पुरेसा व्यायाम झोप नसेल तर तुमची पचनसंस्था बिघडणार , मधुमेहाला आमंत्रण नक्कीच . मग ह्यात दोष कुणाचा ग्रहांचा कि आपला ? अर्थात आपला त्यामुळे उठ सुठ ग्रहांच्यावर बिल फाडणे बंद झाले पाहिजे. आपल्या आयुष्य वर्तमानात जगायला शिकले पाहिजे कारण वर्तमानातील प्रत्येक क्षण तुमचे भविष्य समृद्ध करत असतो . माझा मुलगा १० वी मध्ये चांगले मार्क मिळवेल का? हे सांगायला ज्योतिषी कश्याला पाहिजे बर . विचार करा . वर्षभर तो काय अभ्यास करतोय ते तुमच्यासमोर आहे त्यावरून तुम्हीही अंदाज करू शकता. साडेसाती शनी राहू केतू मंगळ ह्या ग्रहांचा नको तितका धसका घेण्याचे मुळात काहीच कारण नाही . तेही आपले आणि चंद्र रवी गुरु शुक्रही आपलेच आहेत .

अनेक वेळा गोड बोलणारा मित्र आपल्या मागून वार करत असतो आणि जो वाईट वाटत असतो तोच संकटात धावून येतो हे अनुभव आपल्याला रोज येतात . आयुष्य जगायला धाडस लागते , एखादे काम अगदी नोकरीला रोज जायचे तर अंगात ताकद लागते आणि ती प्रदान करणारा मंगळ आहे त्यामुळे मंगळ वाईट नाही. शनी एखाद्या गोष्टीला विलंब लावतो कारण तो विलंब आपल्याच भल्यासाठी असतो हा का नाही विचार करत . सगळे आपल्या मनासारखे वेळेत झाले कि आपण खुश , पटतय का ? अहो एखाद्याचा विवाह उशिरा झाला कारण आधी झाला असता तर कदाचित मोडला असता म्हणून ग्रहांनी तो उशीर केला असा सकारात्मक विचार करा तर आणि तरच आयुष्य सुखी होईल . गुरु हा बुधा सारख्या बौद्धिक राशीत वक्री होवून आलाय म्हणजे तो राहिलेली सर्व कामे मार्गी लावणार हे नक्की मग त्यासाठी आपण आपली कर्म शुद्ध केली पाहिजेत . आपले आचरण चांगले असेल तर देव मदत करेल , नुसते बसून राहिलो ग्रहांच्या भरवश्यावर तर कसे होणार ? कर्क राशीत गुरु उच्च होणार मग साधना सुद्धा उच्च करा कि . नाम वाढवा , सतत काहीतरी मागे लावून घ्या .

स्वतःसाठी फालतू विचार करण्यासाठी वेळ शिल्लक ठेऊच नका .

१. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य घालून शांतपणे गायत्री मंत्र म्हणावा . आपल्या श्वासाकडे लक्ष्य केंद्रित करावे . श्वास लयबद्ध असतो त्यावर लक्ष ठेऊन शांतता अनुभवावी .
२. रोज निदान एकदा श्री रामाचा जप करून एकदा तरी हनुमान चालीसा म्हणायचीच काहीही झाले तरी .
३. १ जानेवारी पासून रोज एक श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय वाचायचा २१ दिवसात एक पारायण होईल महिन्यातून एक असे १२ महिन्यात १२ पारायणे होतील. का नाही महाराज आपल्यावर कृपा करणार निश्चित करणार .
४. रोज किंवा दर शुक्रवारी श्री सुक्त म्हणून घरच्या घरी देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचेच . ते कुंकू डबीत भरून ठेवायचे आणि रोज थोडे पाण्यात घालून फुलाने घरभर शिम्प्दायाचे पूजा झाली कि. घरात सकारात्मक लहरी उर्जा निर्माण होईल. घरात प्रसन्न वाटेल. आशावाद वाढेल .
५. रोज श्री स्वामी समर्थ जप करायचा न चुकता
६. श्री स्वामी कृपा तारक मंत्र म्हणायचा . हे सर्व कसे किती वेळा म्हणायचे ते आपल्या वेळेनुसार सोयीने म्हणायचे कारण आपण प्रापंचिक माणसे आहोत . कामे सोडून केले तर महाराजाना ते आवडणार नाही. ह्या सर्वांच्या मुळे आपला आत्मविश्वास वाढेल . उमीद पे दुनिया कायम आहे. सारखे ज्योतिष ज्योतिष न करता सद्गुरू कृपा कशी होईल ते बघा त्यासाठी प्रयत्नशील राहा. महाराजांच्या हाताखाली सर्व ग्रह आहेत ते आपले मन आणि हित दोन्ही जाणतात . त्यांना हे करा ते करा सांगायची गरज नाही . त्यांना हवे ते आणि तेच देतील तेही योग्य वेळी . आपले हित त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने खडे न फोडता आपली साधना वाढवा . नेहमी काहीतरी हवे म्हणून नाम न घेता त्यांच्यासाठी फक्त भक्ती म्हणून नाम घ्या कारण त्याचा परिणाम अधिक उत्तम होयील. भक्ती अपरंपार अमर्यादित हवी त्यातून साधना घडते आणि साधक तयार होतो. भक्ती मात्र शुद्ध खरी हवी . ह्या वर्षी शनी महाराज संपूर्ण वर्ष मीन राशीतच भ्रमण करतील आणि जुलै नंतर चार महिने वक्री अवस्थेत राहतील. राहू आणि केतू ५ डिसेंबर २६ पर्यंत अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत भ्रमण करणार आहेत . इतर ग्रह त्यांच्या गतीनुसार प्रत्येक महिन्याला मार्गस्थ होतील.

पुढील वर्षी २०२६ हे रवीच्या अमलाखाली आहे असे मानले तर सूर्याची उपासना अधिक फलदायी ठरेल. मुळातच सूर्य हा दाता आहे . गायत्री मंत्राशिवाय दिवस सुरु करूच नये . सोशल मिडीया वरील वाचन ज्ञानात भर घालणारे आसवे आणि काहीतरी वाचून ते नियम आपल्या स्वतःच्या पत्रिकेला लावणे तेही शास्त्राची ओळख नसताना हे सर्वार्थाने घातक आहे. येणारे वर्ष सर्वांच्यावर गुरूंचा वरदहस्त असणारे आहे त्यामुळे कुठल्याही शंका न घेता सेवेत राहा. मनात कल्प विकल्प आणू नका. देव झेपेल तितकेच दुक्ख देतो . नकारात्मक वाचन करू नका . आपण फार साधी माणसे आहोत आपले काहीही वाईट होत नाही आणि होणारही नाही. प्रचंड उर्जा , आशावाद आणि सकारात्मकता ह्यांनी भरलेले हे नवीन वर्ष आपल्या दरवाज्यावर दस्तक देत आहे त्याचे तितक्याच उत्साहात , मोकळ्या मनाने दिलखुलास पणे स्वागत करुया. मी नेहमीच म्हणते मला कुणाच्याही पत्रिकेत वाईट दिसतच नाही ,

अगदी हाच दृष्टीकोन ठेवून म्हणूया... अब जो भी होगा सब अछ्या ही होगा. सद्गुरू आपले महाराज कधीतरी आपले वाईट होऊ देतील का? नाही ना . मग झाले तर हाच विश्वास उराशी घेवून नवीन वर्षात एकमेकांचा हात धरून पदार्पण करुया . विश्व प्रार्थना करुया. परमेश्वरा मानवजातीचे , अखंड विश्वाचे ,सर्व प्राणीमात्रांचे भले कर , सगळ्यांना बुद्धी दे. नोकरी व्यवसाय उत्तम चालू राहूदेत . आर्थिक विवंचना नको आणि मिळालेल्या लक्ष्मीचा सदुपयोग होवूदे . चांगली बुद्धी प्रदान करण्यासाठी नवीन वर्ष आणि रोजचा दिवस पूजा करताना गणपती स्तोत्र म्हणावे म्हणजे मन शांत होते आणि दिवसभरासाठी सकारात्मक उर्जा मिळते. जसा विचार कराल तसे होईल त्यामुळे सोच बदलो .

मनातील जर तर किंतु परंतु काढून टाका . महाराजांना फक्त भक्ती हवी आहे . ज्याने ह्या अखंड विश्वाची निर्मिती केली तो तुमच्या शिरापुरीवर लाडू पेढ्यासाठी फिदा होणार नाही , तुमच्या एका साडी चोळीमुळे प्रसन्न होणार नाही. मनापासून हाक मारून तर बघा , हाकेला “ ओ “ नक्कीच येणार . ह्याच विश्वासावर आपल्या भक्तांचा जीवन प्रवास आहे हे निश्चित मग वर्ष दिवस कुठलाही असो. स्वामी माझा मी स्वामींचा येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी उत्तम आरोग्य , सद्बुद्धी , आर्थिक स्थैर्य , कौटुंबिक आनंद आणि सोहळे , इच्छा मनोकामना , संकल्प पूर्तीचे , अधिकाधिक अध्यात्मिकता , भक्तीभाव , सकारात्मकता , समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची बुद्धी ह्या सर्वांनी परिपूर्ण असुदेत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संतांच्या जेजे असेल मनी तेते येयील घडोनी , भरवसा त्यांच्या चरणी ठेऊन स्वस्थ राहावे . प्रापंचिक जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर आहे तेच आयुष्य अधिक उत्तम होईल ह्यात दुमत नसावे .

सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230