|| श्री स्वामी समर्थ ||
रोजच्या जीवनात जरा आजूबाजूला नजर टाकली तर दिसून येते कि प्रत्येक जण काहीना काही मिळवायच्याच मागे आहे. मनाची शांतता कुठेतरी हरवून सतत काहीना काही शोधत ,जीवाच्या आकांताने कश्याच्यातरी मागे सतत पळत आहे. नक्की काय आणि किती मिळवायचे असते माणसाला. किबहुना उभ्या आयुष्यात एका जीवाला लागते तरी काय आणि किती ? आपण काहीच घेऊन आलो नाही आणि इथून काही नेणारही नाही हे सर्व अगदी सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट असूनही मिळवायची आसक्ती काही थांबत नाही . आज एक गाडी आली कि काही दिवसांनी दुसरी मग तिसरी . आपण कधी विचार केला तर समजेल एका देहाला कीती कपडे , चपला , घड्याळे , सौंदर्य प्रसाधने एक ना दोन अश्या किती अनगिनत गोष्टी आहेत ज्या हव्यासापोटी आपण घरात आणून ठेवल्या आहेत आणि आता त्याची नुसती अडगळ झाली आहे. दिवसागणिक घरातील क्लटर वाढतंय पण आपला जमवण्याचा हव्यास संपता संपत नाही .
मुंबई पुण्यासारख्या प्रगत शहरात आता सर्व काही हाकेच्या अंतरावर मिळते . सोशल मिडीया वरील आपला वावर त्यातील मोहात टाकणाऱ्या असंख्य जाहिराती आपल्या मनाला भुरळ पाडतात . मग नको असणार्या गोष्टी सुद्धा विकत घेतल्या जातात कधी गरजेसाठी तर कधी दिखाव्यासाठी . माणूस एकदा ह्या विष चक्रात सापडला कि मग ह्या So Call Online Shopping च्या क्रेझ मधून आपण सहजासहजी बाहेर येऊ शकत नाही . माणसाने आपली गरज ओळखली पाहिजे आणि अंथरूण पाहूनच हातपाय पसरले पाहिजे हे कटू सत्य आहे. कधी कधी कुणाला तरी दाखवायला म्हणून किंवा कुणीतरी एखादी वस्तू घेतली मग मी पण त्याही पेक्षा अधिक किमतीची घेणार ..कश्यासाठी ? कुणाला दाखवायचे आहे हे सर्व ? हा हव्यास कधीतरी अंगलट सुद्धा येऊ शकतो. श्री स्वामी समर्थांनी सुद्धा म्हंटले आहे कि हव्यास म्हणजे अग्नीत तुपाची धार . कश्यासाठी हे सतत सगळे जमवायचे ? किती आणि कुणासाठी ? हे सर्व न संपणारे आहे . कुठे थांबायचे हे माणसाला समजले तर तो अधिक सुखी होईल. आपल्या गरजा सीमीत ठेवा हे सांगायला करोनाला सुद्धा यावे लागले आहे . आता निदान त्यावरून तरी आपण शहाणे झालो पाहिजे नाहीतर सर्वनाश कुणीही थांबऊ शकणार नाही हे नक्कीच .
मोठेपणा ,मानमरातब , हायफाय संस्कृती , दिखाऊपणाची हौस ,श्रीमंतीचे प्रदर्शन करताना आपण स्वतःचे खरे अस्तित्व सुद्धा विसरून जातो. ह्या शोऑफ करण्याच्या नादात आपण साधे सोपे सहज सुंदर आयुष्य जगणे सुद्धा विसरून जातो .ह्या खोल गर्तेतून मग मनाला वाटले तरी बाहेर येऊ शकत नाही . कधी कधी तर परतीचा मार्ग सुद्धा बंद होतो . म्हणूनच आपण वेळीच सावरले पाहिजे. उठसुठ प्रत्येक गोष्टीतील हव्यास सीमित ठेवला पाहिजे.
एकामागून एक प्रॉपर्टी ,जमीन विकत घेणे ,नको तितका पसारा वाढवणे आणि मग त्यातून नकळत आलेला अहंकार जोपासणे . आज समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांसाठी जसे कुष्ठरोगी किंवा मतीमंद मुले , वृद्धाश्रम ,अंधशाळा अनेक स्थरांतून मदतीचे हात पुढे येत आहेत . उगीचच एकामागून एक घरे किंवा गाड्या विकत घेत भौतिक सुखाचा उद्रेक करण्यापेक्षा आपण अथक परिश्रमाने मिळवलेल्या लक्ष्मीचा अश्या संस्थांसाठी , अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी उपयोग केला तर ते पुण्याचे काम ठरेल नाही का? आपली हौस मौज करू नये असे अजिबात नाही पण एका मर्यादेपर्यंतच. आपल्या संपत्तीचा विनियोग अश्या सेवाभावी कामातून केला तर अध्यात्मिक सेवा ,पुण्याचे काम घडेल. हेच पुण्य शेवटच्या क्षणी आणि पुढील जन्मी सुद्धा उपयोगी येयील हे निर्विवाद सत्य आहे.
प्रत्येकाचे जीवन वेगळे आहे त्यामुळे कुणाच्या आयुष्याशी तुलना करणे अर्थहीन आहे. तुलना केली कि मग न संपणारी भौतिक सुखाची लालसा मागे लागते . म्हणूनच प्रत्येकाने आपली समाधानाची व्याख्या ठरवली पाहिजे .व्यर्थ गोष्टींच्या मागे धावणे निरर्थक वेळ घालवण्यासारखेच आहे. हि जीवघेणी स्पर्धा कश्यासाठी हा प्रश्न कधीतरी आपण स्वतःला मनापासून विचारला तर त्याचे उत्तर आपल्याला मिळेलच . दुसर्याच्या आयुष्याशी अकारण केलेली तुलना आपल्याला फार खुजे करते , आपल्याच नजरेतून आपल्याला कमी करते . आपण स्वतःला फार लहान समजायला लागतो आणि अकारण दुक्ख ओढवून घेतो. आपल्या पूर्व संचीताप्रमाणे मिळालेला हा जन्म आहे तो सार्थकी लावणे हेच आपले कर्म आहे. जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगता जगता जीवनाचा सोहळा कधी होतो ते आपले आपल्यालाच समजत नाही .
करोनाने गेली दोन वर्ष आपल्या आयुष्याची सगळी गणितच बदलून टाकली . प्रत्येक वळणावर नवीन आव्हाने आहेत आणि प्रत्येक दिवस सारखा नाही हेच तर त्याला सुचवायचे नसेल का ? जीवनात किती चढ उतार आहेत . पैशाचा ओघ सुद्धा सतत कायम नसतो त्यामुळे अनाठायी खोट्या दिखाव्यासाठी केलेले खर्च अंगलट येवू शकतात आणि म्हणूनच कुठे थांबायचे ते समजले पाहिजे. हव्यास टाळता आला पाहिजे .कारण हव्यास आपल्या आनंदाला ओहोटी लावतो. शेवटी आहे तेच गोड वाटायला लागते . तात्पर्य काय तर समाधानाची व्याख्या आपण ठरवली पाहिजे आणि समाधानाने आलेला प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगला पाहिजे .
ज्योतिष शास्त्राचा विचार करता पत्रिकेतील शुक्र हा भौतिक, ऐहिक सुखाचा कारक आणि हव्यास वाढवणारा राहू . राहू प्रलोभनात फसवतो . मनुष्य जन्माचे महत्वाचे कारण “ Desire “ हेच आहे. कुठलीतरी इच्छा अपूर्ण राहिली म्हणून ती पूर्ण करण्यासाठीच आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो . पुनरपि जननं ,पुनरपि मरणं.
सौ अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment