Wednesday, 23 March 2022

विचार मंथन -2-- Clutter

 || श्री स्वामी समर्थ ||



घर म्हंटले कि अडगळ आलीच. कधी न कधीतरी एखादी वस्तू लागतेच जसे मेणबत्ती ,कंदील . ह्या गोष्टी रोज लागत नाहीत पण दिवे गेले तर ह्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त होते आणि त्या वस्तू मिळाल्या नाहीत तर आपण घर डोक्यावर घेतो म्हणून त्या हव्यात . असेच हे हवे ते हवे म्हणून आपल्या घरात “ Clutter “ साठत जाते. अनेकदा खूप महागाईच्या गोष्टी आपण हौसेने खरेदी केलेल्या असतात त्या टाकून देणे जीवावर येते . अनेक गोष्टीत आपला जीव गुंतलेला असतो जसे आजीची गोधडी , खास मैत्रिणीने दिलेला बटवा ,घरातील पिढीजात अनेक वस्तू . 

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब व्यवस्था होती आणि वास्तू हि मोठ्या असत त्यामुळे माजघर , बैठकीची खोली , अडगळीची खोली , न्हाणीघर अशी घरांची रचनाच असे. त्यावेळी नको असणार्या पण कधीतरी लागणाऱ्या वस्तूंची रवानगी अडगळीच्या खोलीत होत असे. आता शहरात माणसाला राहायला जागा नसते तिथे हि अडगळ ठेवणार कुठे हा यक्ष प्रश्न निर्माण होतो. 

वास्तू शास्त्रा प्रमाणे  6 महिने एखादी वस्तू वापरली नाही तर ती फेकून द्यावी नाहीतर वास्तू दोष निर्माण होतो.  त्याचसोबत घरात बंद पडलेल्या वस्तू जसे बंद घड्याळे , बंद पडलेली विजेची उपकरणे, टाईपरायटर अश्या वस्तू एकतर चालू करून ठेवा आणि वापरा किंवा सरळ फेकून द्या , नाहीतर ह्या  वस्तूच Clutter निर्माण करतात .

राहत्या घरात जो प्रकार नेमका तोच आपल्या मनात सुद्धा असतो. आपले मन हे असंख्य आठवणींचे आणि विचारांचे जणू आगर असते. चांगल्या वाईट अगणित आठवणी अगदी तश्याच्या तश्या तिथे असतात . सुख आणि दुक्खाचे क्षण आयुष्यात फेर धरून असतात . चांगल्या आठवणी पुन्हापुन्हा सौख्य प्रदान करतात पण वाईट क्षण भूतकाळात घेऊन जातात म्हणूनच अश्या स्मृतींना उजाळा देणे नकोच वाटते . बरेचदा ह्या आठवणींचे Clutter तयार होते आणि आपण वर्तमानातील आनंदाला आपण पारखे  होतो. म्हणूनच जशी घराची साफसफाई करणे आवश्यक असते तसेच वेळोवेळी मनातील विचारांची अडगळ दूर करणे तितकेच गरजेचे असते . डोक्यात आणि मनात काहीही ठेवायचे नाही ,विसरून जायचे सगळे , माफ करून टाकायचे सगळे , वाईट विचार आले कि लगेच कट करायचे हे सर्व सांगणे सोपे असते .पण प्रत्यक्ष्यात तितकेच अवघड . पण तरीही जाणीवपूर्वक ते केले पाहिजे म्हणजे मग तू मला 10 वर्षापूर्वी असे बोलला होतास अशी विधाने ऐकायला येणार नाहीत. 

आठवणी आपली पाठ सोडत नाहीत . कुठले विचार मनात ठेवायचे आणि कुठल्या विचारांना  तिलांजली द्यायची हा आपला Choice असायला हवा , हो ना? मनातले हे विचार जर आपल्याला त्रासदायक ठरत असतील ,आजारपण देत असतील तर हवेतच कश्याला ते आपल्या आसपास ? त्या विचारांना  दूर सारून मनात नवीन सकारात्मक विचारांसाठी जागा केली पाहिजे. 

वर्षानुवर्षे आपण एकाच पठडीत जगत असतो , तोच रस्ता तीच माणसे ,सगळ तेच असते .त्यामुळे मनातील विचार सुद्धा ह्याच विषचक्रात अडकत जातात . मन हे चंचल आहे. माणूस सतत कसला न कसला तरी विचार करतच असतो . आपले विचार आपल्याला घडवत असतात . मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर दिसते म्हणतात ते खोटे नाहीच . जो भूतकाळात रमला तो भविष्य घडवू शकत नाही म्हणूनच मनात हि अडगळ जमा करून द्यायची नाही . 

आयुष्यात काहीही झाले तरी Show Must Go On . मनातली विचारांची वादळे कधी कधी उग्र स्वरूप धारण करतात आणि आपल्या तब्येतीवर त्याचा खोलवर परिणाम होतो. मन आजारी पडले कि मग शरीर सुद्धा आजारी पडते . ह्या सर्वामुळे आपला Aura सुद्धा बिघडत जातो , आत्मविश्वास कमी होतो , जगायची जिद्द सुद्धा ,म्हणूनच मनातली हि अडगळ दूर करा ...आत्ताचा क्षण हा Inevitable आहे तोच सर्वार्थाने उपभोगणे हेच आपल्या हातात आहे आणि तेच करणे हितावह आहे. 

चला तर मग  घरातल्या नको असलेल्या  वस्तू आणि मनातील नको असणारे विचार दूर सारून , मोकळ्या आकाशाखाली मनसोक्त , आनंदी मनाने नवीन वर्षाच्या स्वागतास सिद्ध होवुया .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  







 


No comments:

Post a Comment