Tuesday, 29 July 2025

भयगंड ( फसवणूक )

 || श्री स्वामी समर्थ ||


माणसाच्या मनाला अनेक विध कंगोरे आहेत . एका क्षणात असंख्य विचार मनात प्रवाहित असतात . कधी मन आनंदाच्या पंखावर स्वार असते तर कधी दुक्खाच्या गर्तेत अडकते आणि निराश होते . आपण मनात करत असलेल्या विचारातून आपले व्यक्तिमत्व सुद्धा घडत असते . 

भूतकाळात एक पाऊल आणि भविष्याचा नको तितका विचार करणाऱ्या व्यक्ती आजच्या वर्तमानातील असंख्य सुखद क्षणांना पारख्या होतात , त्याचा खरा आस्वाद त्या घेवूच शकत नाहीत . असो 

ह्यापलीकडे आजकाल महत्वाचा प्रश्न अनेकदा विचारला जातो तो “ मला भीती वाटते “ . एकदा का हि भीती मनात शिरली कि जाता जात नाही किबहुना आपणच तिला कवटाळून बसतो.  अनेकदा ट्रेन उशिरा असतील कुठे अपघात झालेला असेल किंवा अचानक हिंसा घडल्या तर घरी परतणाऱ्या व्यक्ती घरी येयीपर्यंत आपल्या मनात भीतीचे काहूर  उठतात पण ते त्या प्रसंगापुरतेच. सतत वाटत राहणारी भीती वेगळे.

परवा एका अतिशय उच्चशिक्षित ,अत्यंत सुशिक्षित घरातील स्त्रीची पत्रिका बघितली. तिला सतत घरात रहायची भीती वाटते असे म्हणाली. कुठे बाहेर जायची भीती वाटते , घरात एकटे राहूच शकत नाही , गाडी चालवायची भीती वाटते . मी तिला म्हंटले जन्मापासून वाटते आहे का अशी भीती तुला ? म्हणाली नाही . म्हणजेच हि गोष्ट कुठल्यातरी ग्रहस्थितीमुळे घडली आहे. बरोबर ना? पटले तिला . चला मग आता हे का घडते आहे ते बघूया आणि त्यातून मार्ग काय काढायचा तेही बघुया .


पत्रिका उघडली कि ग्रह आपल्याशी बोलायला लागतात आणि आपल्या उत्तरापर्यंत नेतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे . आता भीती म्हंटली कि शनी , राहू कुठेतरी पत्रिकेत डोके वर काढत असणार ते आता सोशल मिडीयावरून मिळालेल्या अफाट आणि अगाध ज्ञानामुळे तुमच्या लक्ष्यात आले असेलच .


मीन लग्न आणि चंद्र राहू युती कर्क राशीत . राहुसोबत चंद्र म्हणजे चंद्राला अर्थात मनाला लागलेले ग्रहण . मन चंगा तो सबकुछ चंगा. राहू ने अंशात्मक युती करून चंद्राला विळखा घालून अनामिक भीती ,चिंता , भयगंड , मनावरचे दडपण , बेचैनी, असुरक्षित भावना , मनाची अस्थिरता ह्या सगळ्या गोष्टीना खतपाणी घातले . सध्या चंद्राचीच दशाही चालू आहे . चंद्राच्या अंशात्मक युतीतील राहू सुद्धा तितकीच फळे देणार . 

गुरु शनी आणि केतू चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे तेही ह्या दशेत फळ देणार . मीन लग्न सप्तम भावात गुरु शनी अंशात्मक युती त्यामुळे लग्नेशासोबत असलेला शनी मनाची कधीतरी उदासीनता वाढवणार . तृतीयेश शुक्र नेप च्या युतीत वृश्चिक राशीत . चंद्र आणि राहू बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात आणि बुध अस्तंगत . अनेक दिवसापासून ह्या व्यक्तीला वर्टिगो चा त्रास सुद्धा सुरु आहे.

चंद्रावरील अनेक ग्रहांचे कुयोग ह्यामुळे झोपेचे खोबरे , मनातील विचारांची न संपणारी घालमेल व्यक्तीला सकारात्मक विचारांपासून परावृत्त करणारी आहे. तिला म्हंटले तू आई आहेस आणि आईला घाबरायची परवानगी नाही. आज पासून कात टाकल्यासारखी मरगळ झटकून पुन्हा उभी राहा. सगळे मनातील विचार झटकून टाकण्याचा मनापासून प्रयत्न कर . माझा फोन ठेवलास कि देवासमोर दिवा लाव आणि त्याला प्रार्थना कर , म्हणावे माझ्या मदतीला धावून ये मला ह्या स्थितीतून बाहेर काढायला तूच मदत करशील हा विश्वास डगमगू देवू नकोस आणि एक ब्रम्हास्त्र हाती घे ते म्हणजे “ हनुमान चालीसा “

भूत पिशाच निकट नही आवे , महाबीर जब नाम सुनावे...... ह्यावर प्रचंड निष्ठा ठेव , आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना कर आणि रोज कमीतकमी ७ वेळा हनुमान चालीसा म्हण . सुरवात तर कर . आपण डॉक्टर कडे जातो आणि औषध आणतो  हे औषध घेतले कि बरी होणार हा विश्वास ९९% असतो तेव्हाच ते औषध १% देवून आपल्याला बरे करते . विश्वास नसेल तर सर्व फोल आहे. 

तिला का कोण जाणे विश्वास वाटला कारण फोनवर आवाज आता बर्यापैकी बदलला होता . मी तिला म्हंटले हि परिस्थिती आयुष्यभर थोडीच राहणार आहे . पावसाला संपला पुन्हा उन्हाळा , काय शिकवतो आहे निसर्ग आपल्याला ? चला आता कामाला लागा , बिनधास्त राहा .

थोडी हसली आणि म्हणाली नक्की म्हणीन मी. मलाही खूप बरे वाटले. गेले अर्धा तास जीव तोडून तिला अनेक उदा देवून तळमळीने सांगत होते त्याचे चीज झाल्यासारखे वाटले. 

हनुमान चालीसा नित्य म्हणा. हनुमान चालीसा आपल्याला प्रचंड उर्जा देणारी आहे, कुठल्याही कामात यश हे मिळणारच , एखादा ढेपाळलेला सुद्धा उठून कामाला लागेल इतकी प्रचंड ताकद ह्यात आहे पण म्हणणार कोण ? आम्हाला सगळे आयते हवे . असो म्हणती तर त्याचे अलौकिक गुण मात्र अनुभवता येतील हे निश्चित . आयुष्य कधी भीती , दडपण , शंका कुशंका , मानसिक अस्वस्थता काहीही अंशतः राहणार नाही . 


शेवट मात्र सुखाचा नव्हता . फोन ठेवताना म्हणाली ताई मी आजवर २५ हजार दोन वेळा कसल्या कसल्या शांती करण्यात घालवले. पण माझ्या मनाच्या स्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही. मी स्तंभित झाले हे सर्व ऐकून. असो. उपासना करायला खर्च नाही त्या फुकट आहेत पण अट एकच आंतरिक शक्तीने प्रामाणिक पणे जीव ओतून समर्पणाच्या भावनेने त्या कराव्या लागतात तर आणि तरच त्या फलीत देतात . पण आम्हाला सर्व इंस्तंट हवे असते. नामस्मरण म्हणायला कष्ट आहेत ती साधना करायला मनाची बैठक लागते ती आम्ही नाही करणार . मग फसा असेच आणि कष्टाने मिळवलेली लक्ष्मी अशीच करा बरबाद .

काय बोलावे ते कळेना. मी तिला म्हंटले कुणाचे तरी देणे होते ते दिले आता विसर आणि हनुमान चालीसा म्हण . पौर्णिमेच्या चंद्राकडे बघ त्याला ओवाळ त्याला प्रार्थना कर म्हणावे मला मानसिक ताकद दे. चंद्राची दशा म्हणजे पंचमाची दशा .

हनुमान चालीसा म्हणायला सुरवात कर . राहू संभ्रमित करतो , अनामिक भीतीने मन ग्रासते , केतू सुद्धा मानसिक गोंधळ , भीती निर्माण करतो ह्या गोष्टी कमी होतील ह्यावर विश्वास ठेव.  मीन लग्न पंचमात चंद्र राहू युती . कालपुरुषाच्या कुंडलीत चंद्र चतुर्थाचा कार्येश आणि चतुर्थ भाव दर्शवतो . म्हणून तिला घरात  भीती वाटते , वाहन चतुर्थावरून पाहतो तिला गाडी चालवायची भीती वाटते . असो 

एखाद्या कारणासाठी जेव्हा कुणी आपल्याला उपाय सांगतात तेव्हा ते नुसती नांदी बैलासारखी मान डोलावू नका . त्याचा अर्थ ते उपाय करून नक्की काय होईल , उपाय सांगणाऱ्या ज्योतिषाचा अभ्यास किती आहे ह्याचा शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या . अत्यंत कष्टाने मिळवलेले पैसे असे अनाठायी गेले कि वाईट वाटते, मनात म्हंटले ह्या पैशाचे अन्नदान केले असते तरी फळले असते , समाधान देवून गेले असते. 

आपण जेव्हा कुठल्याही शांती करतो किंवा त्या सुचवतो तेव्हा त्या योग्य आहेत ह्याची खातरजमा पुन्हा पुन्हा करून पहावी . ज्योतिष हा खरोखरच अथांग सागर आहे ....दोन चार कार्यशाळा करून ज्योतिष कथन करता येत नाही किबहुना तसे करूही नये. दोन चार भाकिते खरी झाली कि सगळे येते आहे असेही नाही . उपासना भक्कम असायला हवी तेव्हा ज्योतिष येयील . 

अशी कुठलीही गोष्ट नाही ज्यातून मार्ग मिळणार नाही , तो शोधावा लागतो इतकेच . तसेच कुठलीही गोष्ट सुद्धा शाश्वत नाही , सुख दुख येत जात राहणारच त्यालाच जीवन म्हणतात . चढ उतार येणार , उतरताना पुन्हा चढणार आहोत हे लक्ष्यात ठेवले तर उतारावर भीती शंका मनात येणार नाहीत . हेही दिवस जातील ...हे मनात रुजले पाहिजे . 

मी तिला म्हंटले रस्त्यावरील गोर गरीब लोकांची तर घरे नाहीत काय आयुष्य असेल विचारही करू शकत नाही आपण त्यांना नाही ती भीती वाटत . असो . त वरून ताकभात . काही काळ आयुष्यातील बरा वाईट आला तर लगेच जगबुडी होत नाही . उलट असे प्रसंग आपल्याला शिकवून जातात , उपासनेचे महत्व आपल्याला ह्याच काळात पटते आणि आपण उत्तम उपासक होतो . 

माझ्या मैत्रिणीच्या मुलाचे दोन वर्षात नक्की लग्न होईल हे एका महाभागाने सांगितले. सांगायला वाईट वाटते पण आज तो मुलगा ह्या जगातच नाही . असो . आपल्या वरती परमेश्वराची अगाध सत्ता आहे , त्याच्या डोक्यावर जावून बसायचा प्रयत्न भूतलावर कुणी करू नये.  

आज चंद्राचे हस्त नक्षत्र आहे .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

 







No comments:

Post a Comment