Tuesday, 18 June 2019

" बालमोहनची मुले हुशार "

|| श्री स्वामी समर्थ ||



बालमोहनचे सर्वेसर्वा ...कै. परमपूज्य श्री. दादासाहेब रेगे.



बालपणीचा काळ सुखाचा . नुसत्या बालपणीच्या आठवणी आल्या तरी तासंतास आपण त्यात रमून जातो. बालपण म्हंटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर आपल्याही नकळत येते ती आपल्या शाळा . आपल्या शालेय जीवनाचा एकंदरीतच आपल्या उर्वरित आयुष्यावर खूपच मोठा पगडा असतो किबहुना आपले आयुष्य घडवण्यात शालेय जीवन , शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये.


आपल्या शाळेला आणि शिक्षकांना आपल्या हृदयात , मनाच्या कोपर्यात खास असे स्थान असते. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शाळेचा उल्लेख जरी झाला तरी कृतज्ञतेने ऊर भरू येतो . शाळेचे दिवस फुलपाखरासारखे असतात, लहान कोवळे , निष्पाप वय असते ते , छक्के पंजे माहित नसतात, २ + २ = ४ हे जितके सोप्पे तितकेच सगळे आयुष्य सोप्पे वाटत असते त्या वयात . ह्या काळात आपल्याला घडवणारे असंख्य हात असतात जसे आई बाबा ,घरातील इतर पण त्यात मोलाची कामगिरी करतात ते आपले शिक्षक.

बालमोहनचे मुख्य प्रवेशद्वार


आज रस्त्यातून जाताना शाळेची बस दिसली. शाळेच्या नव्याकोर्या युनिफोर्म मधील लहानलहान मुले रांगेत बसमध्ये चढत होती ,त्याचसोबत त्यांच्याबरोबर असणार्या पालकांची अनेकविध सूचनांना सलाम ठोकत त्यांचा किलबिलाट सुरु होता. हे सर्व दृश्य नकळत मला भूतकाळाच माझ्या  शाळेत घेऊन गेले. मोरपीसासारखे रंगीबेरंगी दिवस होते ते .माझी शाळा दादरची “ बालमोहन विद्यामंदिर”.कायम अभिमान वाटतो नाव सांगताना. बालमोहन आणि परमपूज्य कै. दादासाहेब रेगे हे एक समीकरण होते. दादांनी आपले सर्व आयुष्य मुलांच्या हितासाठी वेचले. शालेय शिक्षण घेऊन आपल्या ध्येयाकडे झेप घेताना मुले जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असली तरी त्यांच्या व्यक्तीमत्वातून , आचारविचारातून "बालमोहन " ची ओळख झाली पाहिजे . थोडक्यात मुले हा शाळेचा आरसा असली पाहिजेत . त्यावेळी मुलांना खरोखरच शिक्षकांबद्दल आत्मीयता , तळमळ आणि आदरयुक्त भीती होती.

सामुदायिक प्रार्थना

११ वाजता शाळेची सुरवात प्रार्थनेने होत असे. सर्व आपापल्या जगी उभे राहून प्रार्थना म्हणत असत . उशिरा आलेले सर्व विद्यार्थी खालीच उभे राहून प्रार्थना म्हणून मग आपापल्या वर्गात जात असत . शाळेत एक प्रकारची शिस्त होती पण दशहत नव्हती. शाळेचे वातावरण शिक्षक आणि शाळेविषयी असलेल्या आपुलकीने भारावून गेलेले असायचे.


वरती उल्लेख केल्या प्रमाणे दादासाहेबांचे जातीने सर्वत्र लक्ष्य असायचे. पल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे आणि शाळेचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात त्याने आत्मविश्वासाने प्रवेश केला पाहिजे हा त्यांचा मानस असे. त्यावेळी मुले आणि शिक्षक ह्यांचे बंध अगदी घट्ट असायचे. काहीही अडले तर शाळा सुटल्यावर त्या विषयाच्या शिक्षकांना निसंकोच पणे विचारायला मुले कचरत नसत. त्यावेळी वेगळे Academic Counsellor वगैरे असा काही प्रकार नव्हता किबहुना असे शब्दही त्याकाळी प्रचलित नव्हते . 

अद्ययावत  वाचनालय


शिक्षणाशी नाते अगदी Transperant असायचे. अभ्यास केला नाही किंवा गृहपाठ झाला नाही तर पालकांची चिठ्ठी आणणे हा शिरस्ताच होता. अभ्यासातील शिस्तीसोबत मौजमजाही असायची . चैत्र महिन्यात तळमजल्यावरील लहान हॉल मध्ये रांगेत उभे राहून सर्वाना आंबे डाळ आणि पन्हे मिळत असे. कधीतरी शिक्षकांची नजर चुकवून पुन्हा रांगेत उभे राहून काही शूरवीर पुन्हा त्यावर यथेच्छ ताव मारत असत. कलिंगडाची चंद्रकोर सुद्धा मिळत असे

अभिमानास्पद क्षण


आमच्या शाळेला मैदान नसल्यामुळे शारीरिक शिक्षणाचा तास  आमचा शिवाजीपार्क वर होत असे. धावणे आणि अन्य स्पर्धाही तिथेच मोठ्या उत्चाहात पार पडत असत . आमच्या सर्वांचा श्वास असणारी “ वार्षिक सहल ” म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची. दिवाळीची आणि नाताळची सुट्टी अश्या मोठ्या सुट्ट्या असायच्या पण त्याचसोबत श्रावण महिन्यात कधी कधी अर्धा दिवस सुट्ट्यांची खैरात असायची. दिवाळीच्या सुट्टीत घरचा अभ्यास असायचा . त्यासाठी वेगळी वही करून अभ्यास त्यात तारीख वाराप्रमाणे करून वही छान सजवून आणायची हा नियम असायचा . वर्गातील उत्कृष्ठ वहिला मग बक्षीस असायचे. बक्षीस म्हणून २०० / १०० पानी वहीच असायची पण ते वय इतके निरागस होते कि त्या वयात बक्षीस काय मिळाले आहे त्यापेक्षा मला बक्षीस मिळाले हा आनंद जगजेत्ता झाल्याहून कमी नसायचा.

दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास 


त्यावेळी अगदी अगदी माफक दरात सहली निघत असत जेणेकरून सर्वाना येता यावे. त्या सहलीचे प्लानिंग आमच्या लहानश्या मेंदूत १५ दिवस आधी ठरत असे त्यात अगदी बस मध्ये कुणी कुणासोबत बसायचे आणि कुठले कपडे घालायचे काय खाऊ सोबत न्यायाचा ....एक ना दोन जंगी तयारी असायची. त्या सहलीच्या आठवणी अजूनही मनात घर करून आहेत. काय अविस्मरणीय दिवस होते ते .
शाळेला २ सुट्ट्या असायच्या एक छोटी सुट्टी आणि एक मोठी. कधीकधी गृहपाठ केला नसेल तर मग त्या छोट्या सुट्टीत डबा खावून मोठ्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडायचा .
आमच्या शाळेसमोर एक माणूस ज्याला आम्ही “ बुवा ” म्हणायचे तो गाभुळलेल्या चिंचा, बोरे , आवळे ह्याचे दुकान मांडून बसायचा .शाळा सुटल्यावर त्याचे दुकान दिसेनासे होईल इतका मुलांचा घेराव त्याला पडत असे . त्या काळात इतकी महागाई नव्हती त्यामुळे शाळेत अगदी चारआठ आण्याला बटाटा वडा मिळत असे. त्यावेळी CCD वगैरे चैनीचे प्रकार नसत .कधी आम्ही मैत्रिणी ठरवून डबा न आणता शाळेच्या कॅन्टीन मधील पदार्थांवर ताव मारत असू आणि मग  बाहेर जावून सुट्टीत पेप्सीकोला खाणे म्हणजे आमच्यासाठी आनंदोत्सव असायचा. किती लहानलहान गोष्टीत आभाळाइतका आनंद दडलेला असायचा जो आम्ही भरभरून जगलो आणि तो मुठीत आला कि
“ युरेका ” म्हणत आभाळ ठेंगणे व्हायचे.

कमी पैशातील मोठ्ठा आनंद


शाळेत प्रत्येक वर्गात मोठा फळा असायचा आणि त्यावर रोज वर्गातील मुलांची उपस्थिती त्यात मुले किती मुली किती असे विभाजन असायचे . समोर मध्यभागी रोज एक वेगळा सुविचार लिहिला जात असे. प्रत्येक वर्गात एक “ Monitor ” असायचा . बहुतेक वेळा तो वर्गातील हुशार विध्यार्थी / विद्यार्थिनी असे.
आपल्या वर्गातील आपल्या बालगोपाळ मंडळीवर तो दिमाखात चालून हुकमत गाजवत असे. पण ते तितकच असायचे कारण त्या वयात नको ते राजकारण मनास शिवलेले नसायचे त्यामुळे ते सर्वच सुखद होते.


प्रत्येक शाळेत असतो तसा आमच्याही शाळेत गणवेश होता . पण वाढदिवसाच्या दिवशी मात्र ह्या गणवेशाला सुट्टी मिळायची.
वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस घातला कि सगळ्या शाळेला कळायचा आपला वाढदिवस .मग पहिल्या तासाला वर्गशिक्षक वाढदिवसाच्या शुभेछ्या देत आणि टाळ्यांच्या गजरात मग सर्व मुलांना गोळ्या ,चोकलेट वाटायचा कार्यक्रम पार पडत असे.

शालेय जीवनातील सोबती..वर्गातील  बाके 



शाळेत बाकावर बसायच्या जागांचीही कधीकधी अदलाबदली होत असे.पण शाळेत सर्व मुलांना सारखीच वागणूक असायची . पैशाच्या , श्रीमंतीच्या , गरिबीच्या ,हुशारीच्या भिंती कधीच आम्हा मुलांमध्ये आल्या नाहीत .शाळेतील नियम सर्वाना सारखेच असायचे , आवडता नावडता हा प्रकार नसायचा . शाळेतील वार्षिक कार्यक्रमही मोठ्या उत्चाहात पार पडत असत. त्यात असणार्या नाटकातून भाग घेणे मग त्यासाठी लागणारी वेशभूषा  ह्या गोष्टी सर्व गोष्टींची जय्यत तयारी असायची . दहीहंडी सारखे सण सुद्धा मुले साजरी करत असत . एकंदरीतच सगळ्याच गोष्टीत शिस्त असली तरी ती हवीहवीशी वाटणारी असायची . तेव्हा प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक हि चैन परवडणारी नव्हती . वर्गशिक्षक २-३ विषय सुद्धा शिकवत असत . एका ओळीत ८ शब्द लिहायचे 9 वा शब्द आला कि तो पुढील ओळीत गेला पाहिजे ,लिहिताना समास सोडला पाहिजे हा शिरस्ता असायचा . आजही लिहिताना  ओळीत 9 वा शब्द आला कि पुढील ओळीत लिहिला जातो इतका खोलवर पगडा मनावर आजही आहे. आपली सर्वच मुले जगात पुढे यावीत आणि एक उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख असावी ह्यासाठी शाळेतील शिक्षकांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही इतके मोठे आहे. त्याकाळात बालमोहनची मुले इतकी टापटीप , शिस्तीत असायची कि गमतीने लोकही “ अरे हा बालमोहन छाप ” दिसतोय असे म्हणत असत. त्या वेळी बालमोहन विद्यामंदिर आणि पार्ले टिळक विद्यालय ह्या दोन शाळा अग्रेसर होत्या . दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कुठल्या शाळेची किती मुले पहिल्या ५० मध्ये आली हि चुरस असायची .


 हि स्पर्धा असली तरी ती “ Healthy Competition ” असायची. वर्ष निघून गेली ,दहावीची परीक्षा झाली . शेवटच्या दिवशी सेन्डोफ झाला तेव्हा क्षणभर बेघर झाल्यासारखे वाटले . शाळेतील शेवटचा दिवस अजूनही आठवतो अगदी तसाच्या तसा. आम्ही सर्व घरी जाताना किती वेळा मागे वळून पाहत होतो . आपला ह्या वास्तुबरोबरचा प्रवास इथवरच होता ह्या विचारांनीही मन बेचैन झाले होते, पण म्हणतात ना “ show must go on ” .शाळा संपली ,एक पर्व संपले . अधून मधून शाळेत एक फेरी व्हायची. जुने शिक्षक भेटले कि त्यांच्या चेहऱ्यावर ओळख दिसायची. पुढे पुढे कार्यबाहुल्यामुळे भेटी कमी होत गेल्या पण शिक्षकांबद्दलचा आणि शाळेविषयीचा आदर किंचितही कमी नाही झाला.बाह्यजगात वावरताना शाळेत झालेले चांगले संस्कार पावलोपावली कामी आले. त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे.


जगाच्या कानाकोपर्यात असणार्या बालमोहन च्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा जाज्वल्य अभिमान असणार ह्यात दुमत नाही  
“ मी बालमोहन ची विद्यार्थिनी आहे ” हे सांगताना काय अभिमान वाटतो तो शब्दांकित करता येणे निव्वळ कठीण आहे.  माझ्या मुलासोबातही पुन्हा मी १० वी पर्यंत शाळा जगले पण आमच्या वेळची सर काश्यालाच नाही हे पदोपदी जाणवले. काळासोबत शिक्षण पद्धती बदलत गेल्या ,नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात रुजल्या , शाळेचा विस्तार झाला . आता आमच्या शाळेत मराठी सोबत इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण आहे. पण आजही माझ्या डोळ्यांना माझी शाळा पूर्वीसारखीच दिसते आणि दिसत राहील . कधीतरी वाटते आपल्याच वर्गात जावून आपल्या बाकावर थोडावेळ निवांत बसावे. मला खात्री आहे हा लेख प्रत्येक वाचकाला आपल्या शाळेत घेऊन जायील कारण आपल्या सर्वांचेच शाळेशी असणारे बंध अतूट असतात .


आज समाजात वावरताना तसेच कार्यालयाच्या ठिकाणी मिळणारे यश ,सन्मान ह्या सर्वाची नाळ शाळेशी जोडली गेली आहे. आयुष्याने पुढील टप्पा गाठला पण शाळेच्या आठवणी मनात चिरतरुण राहिल्या .शाळेचे आणि शिक्षकांचे योगदान इतके अमूल्य आहे कि कश्यानेही त्याची भरपाई होवूच शकणार नाही .

एक कुटुंब


 “ बालमोहनची मुले हुशार ” असे शब्द कानी पडतात तेव्हा आम्ही सर्व आजी माजी विद्यार्थी  शाळेतील शिक्षकांच्या आणि शाळेसमोर अक्षरशः नतमस्तक होतो.  माझे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि आयुष्य उत्तम संस्कारांनी समृद्ध करणाऱ्या माझ्या शाळेला आणि सर्व शिक्षकांना ह्या लेखाद्वारे  त्रिवार वंदन.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा.

Wednesday, 12 June 2019

“ संगती संग दोषेण ”



|| श्री स्वामी समर्थ ||




             एखाद्या व्यक्तीबद्दल मत ठरवणे तितकेसे सोप्पे नाही , पण तरीही कधी तशी वेळ आलीच तर त्या व्यक्तीची “ संगत ” पहा. ५०% काम तिथेच होईल. आपली संगत आपल्या व्यक्तिमत्वाचा काही अंशी तरी भाग असतेच . लहानपणापासून आपल्यावर घरातील मोठी मंडळी उत्तम संस्कार करत असतात जेणेकरून पुढील आयुष्यात आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची पारख करता यावी. कित्येक कुटुंबांमध्ये सकाळी “ कराग्रे वसते लक्ष्मी ” पासून ते संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर “ शुभंकरोती , मनाचे श्लोक , परवाजा ” म्हणण्याची पद्धत पिढ्यान पिढ्या पासून चालत आली आहे. 


संध्याकाळी प्रार्थना म्हणून घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून मगच जेवायला बसणे हि रीत आजही घरोघरी दिसते. काही जणांना हे ओल्ड फ्याशन  जरूर वाटेल पण आपल्या संस्कृतीचे ,रूढी  आणि परंपरा ह्यांचे जतन करणे आणि हा वसा पुढील पिढ्यास सुपूर्द करणे हे आपले परम कर्तव्य आहे . पूर्वी एकत्र कुटुंब होते घरात सदैव कुणीनाकुणी असायचे .घरातील वडीलधार्यांचे ऐकायचे हे वेगळे सांगायला लागत नसे. पूर्वी घराला कुलूप म्हणून नसायचे कधीच. पण बदलत्या काळाप्रमाणे जीवन गतिमान झाले, गरजा वाढल्या आणि स्त्री पुरुष दोघेही नोकरी व्यवसायानिम्मित्त घराबाहेर पडू लागले. अनेकविध कारणानी एकत्रकुटुंब पद्धतीचा ह्रास झाला आणि मग मुलांना “ पाळणाघरात /CRUSH ” ठेवायची वेळ आली.
दिवसातील ८-१० तास मुले पालकांपासून विभक्त झाली . आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असतोच असतो. पालक मुलांना त्यांच्या संपर्कात राहावे म्हणून मोठे मोबाईल आणून देतात आणि त्यांना संपूर्ण जग खुले होते . त्यात जर नको त्या मुलांची संगत त्यांना लागली तर लहानपणीच नको असलेल्या गोष्टी त्यांना समजायला वेळ हा कितीसा लागणार.


आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपली “ संगत ” फार मोलाची ठरते . ती आपल्याला शिखरावर सुद्धा नेऊ शकते आणि नेस्तनाबूत सुद्धा करू शकते. आपल्या आजूबाजूला असणार्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावरही असतोच.


एखाद्या चांगल्या घरातील निर्व्यसनी मुलाचे मित्र कदाचित काही प्रमाणत व्यसनी असू शकतात. पण ह्या संगतीचा परिणाम म्हणून आयुष्यात कुठल्याही कारणाने आलेल्या नैराश्यामुळे त्यालाही एखादे व्यसन लागू शकते हे नाकारता येणार नाही. परंतु अश्या वेळी प्रगल्भ विचारांची संगत असेल तर तो आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहू शकेल. म्हणूनच शेवटी संगत महत्वाची. वाईट संगतीचा परिणाम आपल्या मनावर विचारांवरही खोलवर होत जातो आणि आपल्या आयुष्यात मग कुकर्मांची जणू शृंखलाच तयार होते..कुसंगतीसारखा दुसरा आजार नाही जो आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकतो. आजकाल महाविद्यालयीन परिसरात एक चक्कर टाकली तर कोवळ्या वयातील मुलीही सर्रास सिगरेट ओढताना दिसतात. आजची पिढी आधुनिक विचारांची ,हुशार ,इन्टरनेट युगातील आहे पण चुकीच्या संगतीने त्यांचे आयुष्य वेगळ्याच वळणावर जाण्याची भीती वाटते खरतर .त्याचबरोबर सोशल मिडिया आणि इतर प्रलोभने आहेतच भर घालायला . 
आंब्यांच्या पेटीतील एखादा कुसका आंबा संपूर्ण पेटी नासवतो अगदी तसेच आपली संगत फार महत्वाची .अगदी शालेय जीवनापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत. चांगले अभ्यासू मित्र मिळाले तर आपल्यालाही अभ्यासाची गोडी लागते , चांगल्या आचार विचारांचे आदानप्रदान होते, आयुष्याच्या शिखरावर जायची उमेद निर्माण होते आणि वाईट संगत लागली तर मग सगळा मार्गच चुकतो . 



अभ्यासातून लक्ष्य उडते आणि मग टिवल्याबावल्या ,नको ती व्यसने ,धंदे , मुलींची छेड काढ ,घरी खोटे सांगून सिनेमाला जा अश्या एक ना दोन वाईट गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते आणि आपण त्यात अडकत जातो आणि आयुष्य उध्वस्त होते ,आईवडिलांचे संस्कार पार धुळीस मिळतात आणि परतीचा मार्ग धूसर होत जातो . हेच कश्याला पुढे महाविद्यालयात आणि नोकरीच्या ठिकाणीही जिथे आज खूप स्पर्धा आहे तिथे नको त्या राजकारणात आपण ओढले जातो .अत्यंत शिस्तीत ,मेहनतीने प्रामाणिक पणे काम करणारी एखादी व्यक्ती ह्या षडयंत्राला बळी पडते .करणारे राहतात नामानिराळे आणि चांगले सज्जन भरडले जातात म्हणूनच आपली उठबस कुणासोबत असायला हवी ह्याचा अभ्यास असला पाहिजे , माणसे वाचता आली पाहिजेत .सुरवातीला जड जातेच पण हळूहळू ओळख होते.
आपले स्वतःचे आप्तेष्ट , कुटुंब सुद्धा यातून सुटलेले नाही . आपल्या जवळच्या लोकांमध्येही छल कपट करणाऱ्या व्यक्ती असतात . आपल्याला काहीतरी कुणाबद्दल मनात काहीबाही भरवून आपले मन कलुषित करतात . म्हणूनच “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ” ह्या रूढी समर्पक वाटतात . अश्या व्यक्तींची संगत , सहवास असला तर मग “ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ” अशी स्थिती निर्माण नाही झाली तरच नवल . अनेकविध प्रलोभने असलेल्या ह्या आधुनिक जगात आपल्या पाल्यासाठी प्रत्येक पालकाने जागृत राहिले पाहिजे. आपल्या मुलाचे/मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ह्याची माहिती असलीच पाहिजे म्हणजे पुढील अनर्थ टाळता येयील. आजकाल शाळेतील मुले सुद्धा “Instagram ” वरती वावरताना दिसतात. इंटरनेट ने संपूर्ण जग जवळ अगदी घरात आले आहे पण त्याची एक दुसरीही बाजू आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला चांगल्या कामासाठी उपयोग करता आला पाहिजे.




म्हटलेच आहे ना “सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " त्याप्रमाणे आपली संगत चांगलीच असली पाहिजे ,चांगल्या संगतीत चांगल् विचार रुजतात ,आयुष्यात मोठी झेप घेण्यास पाठबळ मिळते आणि आयुष्य फुलत जाते .ती नसेल तर मती भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही .दूर कश्याला जा ,whatsapp वरती एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचे मेसेजचा अभ्यास करा . त्यांनी पाठवलेल्या मेसेज वरून सुद्धा त्यांची आवड आणि वृत्ती लक्ष्यात येते . लहानपणी आईला “ शुभंकरोती “ शिकवायला लागते पण वाईट गोष्टी फार लवकर आत्मसात होतात ,त्या शिकवायला लागत नाहीत. एकदा वाईट संगत लागली कि माणूस हिप्नोटाईझ झाल्यासारखा त्यात वाहवत जातो आणि नको त्या किनार्याला लागतो. आपल्यासोबत असणार्या लोकांच्या विचारांचा , त्यांच्या Vibration चा परिणाम आपल्या मनावर , विचारावर आणि एकंदरीत सर्वच आयुष्यावर होत असल्याने आपली संगत आणि आपली उठबस कुणासोबत असली पाहिजे हे ज्याचे त्याने ठरवायचे कारण त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.वाईट आणि चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात आपण क्षणात भरकटले जाण्याची जास्ती शक्यता असते . त्याउलट उत्तम संगत आपल्याला आयुष्यात आपल्या ध्येयापर्यंत नेते आणि आईवडिलांनी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज होते. 



आयुष्य फार सुंदर आहे आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपली “ संगत “ पुनः पडताळून पाहणे ह्याला पर्याय नाही.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा

www.antarnad18.blogspot.in





Wednesday, 5 June 2019

आनंदी आयुष्याची " गुरुकिल्ली "

|| श्री स्वामी समर्थ ||

Good Morning....Dosto


               जीवनशैली बदलली आणि आपली नाळ घड्याळाशी जोडली गेली. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा पूर्ण करताना जनसामान्यांची दमछाक होवू लागली. हल्ली भौतिक सुखांची बरसात म्हणजेच जीवन हे जणू समीकरण झाले आहे. मात्र ह्या सगळ्यात दुर्लक्षित होत गेले ते शारीरिक स्वास्थ. आजकाल पंचविशीत सुद्धा मधुमेह आणि बिपी च्या तक्रारी असणारी तरूण मंडळी आढळतात. सोशल आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या प्रभावामुळे लहान मुलेसुद्धा मैदानी खेळ विसरत चालली आहेत. सर्वत्र लिफ्ट असल्याने आता जिने चढणे इतिहासजमा होते आहे आणि जेव्हा कधी जिने चढायची वेळ येते तेव्हा कित्येकांची पुरती दमछाक होते. तरुण पिढीला आजकाल प्रचंड मोठे कार्यक्षेत्र खुणावत आहे त्याचबरोबर परदेशातील नोकरीच्या संधीही अफाट आहेत पण ह्या सर्व “ so called Rat Race " मध्ये तरून जायचे असेल तर मानसिक समतोल तर हवाच पण शरीरस्वास्थ्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे . 


Walk It Out ...Talk It Out..सिर्फ नाम हि काफी है.

 मुंबईसारख्या शहरात ठरलेल्या वेळेची लोकल पकडणे हे एखादी विजय पताका फडकवण्या पेक्षाही महत्वाचे झाले आहे. “आम्हाला कुठे व्यायामासाठी वेळ आहे ” अशी वाक्य सतत कानावर पडतात . अगदी खरे आहे आजकालचे जीवन पाहता खरच कुणालाच वेळ नसतो..पण मंडळी वेळ काढायचा असतो तोही स्वतःसाठी . आपल्याला निरोगी आयुष्य आणि आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवायची असेल तर अगदी आत्ता ह्या क्षणापासून आपण निदान अर्धा तास तरी व्यायामासाठी वेळ दिलाच पाहिजे. नाहीतर आपण मिळवलेल्या पैशाचा उपभोग आपल्यालाही घेता येणार नाही.


मंडळी , चालणे हा त्यातल्या त्यात सर्वात साधा सोप्पा, बिनपैशाचा उपाय आहे. आणि त्याचे फायदेही अमर्याद आहेत. ह्याचे महत्व जाणून आजकाल कित्येक सामाजिक संस्था  वेळोवेळी “ Marathon ” चे आयोजन करून जनजागृतीही करत आहेत .अश्या स्तुत्य उपक्रमास जनसामान्यांकडून भरभरून प्रतिसादही मिळत आहे . आबालवृद्ध सर्वांमध्ये अतिशय वेगाने फोफावणारे मधुमेह, बिपी ह्यासारखे आजार हि चिंतेचीच बाब आहे आणि त्यासाठी अनेक फिटनेस “Counselor” सुद्धा ह्यात खारीचा वाटा उचलत आहेत.


" नवरात्री  " Celebration with Walk Group Friends


           आज परिचय करून घेवूया आपले घर संसार सांभाळून ह्या उपक्रमात स्वतःला झोकून देणार्या “ नेहा येवले वैशंपायन " हिचा. “My Work Is My Passion” असे अभिमानाने सांगणारी नेहा गेली 12 वर्ष यशस्वी " Psychotherapist म्हणजेच मनोचिकित्सक " म्हणून कार्यरत आहे. नेहाला लहानपणापासून व्यायामाची अजिबात आवड नव्हती पण शाळेत मात्र पैसे वाचवण्यासाठी ती नियमित चालत जात असे .

                रोज भेटणाऱ्या नवीन लोकांकडून माझेही ज्ञान आणि अनुभव वृद्धिंगत होत गेले असे सांगताना ती म्हणाली हा माझ्यासाठीही एक मोठ्ठा “Learning Experience” आहे .नेहा भरभरून आपले अनुभव सांगत होती....माझ्याकडे येणाऱ्या Clients बरोबर संवाद साधल्यावर आणि दिलेल्या टिप्स मुळे  अमुलाग्र बदल होऊ लागले , ते आपले आयुष्य आनंदाने आणि स्वतंत्र विचाराने आणि अधिक आत्मविश्वासाने व्यतीत करताना पाहून मला कृतकृत्य वाटते हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते.

     
          सध्याची जीवनशैली आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार ह्यावर काय सांगशील ? हा माझा प्रश्न तिला अजिबातच नवीन नव्हता. आधुनिक काळात जीवन कितीही गतिमान झाले असले तरी प्रत्येकाने स्वतःसाठी किमान वेळ काढून व्यायाम , मग तो कुठलाही असो जसे चालणे ,पोहणे , सायकलिंग ई. , केलाच पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातील “Happy Harmones” अधिक प्रमाणत कार्यक्षम होवून आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते. मनास ताजेतवाने वाटून मनातील नकारात्मक विचारांचे परिवर्तन सकारात्मकतेकडे होवू लागते आणि आपला सर्वांगीण विकास होतो. मनातील निराशा ,मरगळ निघून जाते आणि आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला आपण समर्थपणे तोंड देवू शकतो . 


Popular School Event " Walk To School "

                मी प्रत्येकाला किमान एक तास तरी काहीतरी व्यायाम करा असे आवर्जून सांगते ज्यामुळे आपले " स्ट्रेस हार्मोन " कंट्रोल होवू शकतात . सुरवातीला कदाचित आपल्याला त्रास होईल पण एकदा आपल्या मनास आणि शरीरासही व्यायामामुळे होणारे फायदे दिसू लागले कि मग कुणीच आपल्याला काहीच सांगायची गरज नाही . किबहुना मग आपण इतरांना व्यायामाचे महत्व पटवून द्यायला लागतो. सकाळी लवकर उठून चालणे किंवा इतर कुठलाही व्यायाम केला तर आपला संपूर्ण दिवस आनंदात, सकारात्मक विचारांनी व्यतीत होईल ह्यात शंकाच नाही . बर चालणे हा तर अगदी साधा सोप्पा उपाय आहे ज्यासाठी पैसेही खर्च करावे लागत नाहीत कि कसली साधने आवश्यक नाहीत . गरज फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे मनोबल..अत्मानिर्धार ..एकदा  आपल्या मनास ह्या सर्वाचे अखेरपर्यंत होणारे फायदे “ Click " झाले कि मग आपण अत्यंत निरोगी आयुष्य जगू शकतो .आजचे जीवन अत्यंत चुरशीचे , स्पर्धात्मक आहे. रोजच्या आयुष्यातील  “ Stress ” चा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर सतत होतच असतो .पण आपल्याला ह्या सर्वातून दिसणारा आशेचा एकमेव किरण म्हणजे नियमित केलेला व्यायाम हाच होय .


Friends Forever.....Lets Walk Together

           
     चालण्याचा व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी “ Walk It Out  Talk It Out ” हा अनोखा ग्रुप करावा हि संकल्पना कशी सुचली ह्यावर नेहा म्हणाली,सुरवातीला मी फक्त “Anxiety ,Depression ” मध्ये असलेल्या माझ्या पेशंट साठी ग्रुप सुरु केला होता . मानसिक आरोग्य आणि व्यायाम ह्याचा अत्यंत जवळचा संबंध असून त्यामुळे मानसिकतेमध्ये होणारे अमुलाग्र बदल , वाढीस लागणारी सकारात्मकता आणि पर्यायाने बरे होणारे मानसिक आजार ह्या गोष्टीनी माझे लक्ष वेधले आणि मग पुढे मी ह्या ग्रुप चे रुपांतर करून  “मानसिकता आणि व्यायाम ह्याचा सुरेख मेळ घालणारा ग्रुप सुरु केला” फेसबुक सारख्या सोशल मिडिया तसेच आता whatsapp ह्या माध्यमातून ह्याचा प्रचार जोमाने सुरु आहे . ह्या ग्रुप चा मुख्य उद्देश फक्त चालणे नसून एकमेकांशी आपले  अनुभव शेअर करून इतरानाही प्रेरित करणे हा आहे  ..आपले अनुभव सांगा आणि एकमेकांशी संपर्कात रहा हा उद्देश असल्यामुळे ग्रुप चे नाव अत्यंत समर्पक वाटते. ह्या ग्रुप मुळे माझ्या स्वतःच्याही आयुष्यात अनेक बदल होत गेले हे नेहाने आवर्जून सांगितले  .चालायला येणार्या लोकांचा एकमेकांशी परिचय  होवून चांगल्या ग्रुप ची बांधणी होत गेली .प्रत्येकाला उत्तम मित्र मैत्रिणी मिळाल्या आणि रोजच्या चालण्यात आनंद निर्माण झाला. एकमेकांच्या ओढीने जास्तीतजास्त लोक प्रेरित होवू लागले त्यामुळे ह्या ग्रुप चा मूळ उद्देश सफल झाला.


Move On ...with Energy , Strength ,Happiness


                 उत्तम आयोजन असलेला म्हणजेच "Well Organised " असा  हा भारतातील एकमेव ग्रुप आहे हे सांगताना ह्या ग्रुप चा सर्व प्रवास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता जणू. इथे कुठलीही इर्षा नाही पण प्रेरणा नक्कीच आहे .
मंडळी ,आपण लहानपणी अनेक मैदानी खेळ खेळतो आणि मग जसजसे वय वाढते तसे खेळ ,व्यायाम ह्याकडे अभ्यासामुळे किंवा इतर गोष्टींमुळे दुर्लक्ष्य होते ते कायमचेच आणि मग तरुणपणी अगदी एक किलोमिटर चालणे किंवा इमारतीचे  ४ जीनेही चढायला आपल्याला त्रासदायक होते . आजच्या तरुण पिढीला काय संदेश देशील ह्यावर नेहा म्हणाली कि आपल्याला लहानपणापासून आवडणारा खेळ खेळणे हे सर्वात उत्तम, त्याचबरोबर चालणे ,धावणे , पोहणे ह्यासारखे व्यायाम सुद्धा आवश्यक आहेत . त्यासाठी विविध ग्रुप जॉईन करावेत जेणेकरून एकमेकांच्या ओढीने आपण ह्यात सातत्य ठेवू शकतो. चालण्याचा सराव होऊ लागला कि आपली शारीरिक क्षमता नक्कीच वाढते .नेहाकडे येणाऱ्या महिला पेशंट मध्ये depression ,Stress , anxiety किंवा नात्यातील ताणताणाव ह्यातून आलेला stress ह्याचे प्रमाण अधिक आहे .ह्या सर्वामुळे शरीरामध्ये " Harmonal Imbalance " होतो पण नियमित व्यायाम हा त्यावर रामबाण उपाय आहे .ह्या सर्वामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते...


Happiness All Over


 मधुमेहाच्या रुग्णांना सुद्धा नियमित व्यायाम हा संजीवनी सारखाच काम करतो .नियमित व्यायामामुळे मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते. अनेकजण नियमित व्यायामामुळे मधुमेह मुक्त झाले आहेत.आजकाल नात्यातील गुंतागुंत आणि रोजच्या जीवनातील चिंता ह्यामुळे होणारया मानसिक आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे . Counsellor च्या मदतीने आपण ह्यातून मार्ग काढू शकतो ,मनमोकळे बोलण्याने मनावरील ताण निघून जातो ,आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यास मदत होते . Counsellor बरोबरील संवाद हा नेहमीच गोपनीय असल्यामुळे आपण निर्भयपणे बोलू शकतो आणि आपल्या समस्यांचा गुंता सोडवू शकतो. मनावरील दडपण कमी झाले कि खरतर कुठल्याच औषधांची गरज भासत नाही . मंडळी ,माणूस मनाने आजारी झाला कि शरीरानेही आजारी पडतो, त्यामुळे मन शांत निरोगी ठेवणे महत्वाचे आहे .योग्य Counselor च्या मदतीने आपल्या आयुष्याला एक किक मिळते आणि  आनंदी आयुष्याचा पुनश्च हरिओम होतो.


                  अनेक शारीरिक व्याधी बर्या करणारा आणि सर्वांगास व्यायाम मिळवून देणारा साधा सोप्पा व्यायाम म्हणजे " चालणे " हा होय .चालल्याने आपल्याला अधिक उर्जा ,सकारात्मक दृष्टीकोन मिळतो. प्रातःसमयी निसर्गाच्या सानिध्यात चालल्यामुळे मन आनंदी होते. हि उर्जा आपल्याला सर्व कसोट्यांवर खरे उतरण्यास उपयोगी येते आणि दिवस आनंदात जातो. चालणे हा कधीही कुठेही करता येणारा सोप्पा व्यायाम आहे .त्याला वेळेचेही बंधन नाही . आपल्या कार्यालयात दुपारच्या जेवणानंतर सुद्धा काही वेळ चालता येयील. शक्य असेल तिथे कुठलेही वाहन न वापरता चालत जाण्याचा प्रयत्न करावा. चालण्याने वजनही आटोक्यात येते. रोजचा नियमित व्यायाम आणि त्याचबरोबर सकस आहार घेतला तर  वाढलेल्या वजनाच्या तक्रारी संभवणार नाहीत ह्याच शंकाच नाही


मंडळी, नेहा म्हणजे आनंदाचा ,प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे .तिच्या सोबतचा संवाद मलाही खूप काही शिकवून गेला.


Neha ..Full on with Energy & Positive Attitude

                  

आपल्या “ आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ” कुठली ह्यावर नेहा म्हणाली प्रत्येकाला आनंदी राहण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत जसे आपल्या आजूबाजूची माणसे आणि घडणाऱ्या घटना, परिस्थिती ह्यांचा स्वीकार केला पाहिजे. भोवतालच्या सर्व माणसांचे वागणे बोलणे आपल्याला रुचेल असेही नाही पण तरीही त्यांना खुबीने सांभाळता आले पाहिजे .आपल्या मनावर संयम ठेवायला शिकले पाहिजे. इतरांवर आणि स्वतःवर सुद्धा विश्वास असणे गरजेचे आहे .वाहत्या पाण्याप्रमाणेच आयुष्य सुद्धा सतत पुढे नेता आले पाहिजे .

मंडळी , खरतर हा विषय खूप मोठा आहे .नेहाच्या बरोबरील संवाद आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच . ह्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन नियमित व्यायामास प्रारंभ केला आणि आपल्या आजारांवर मात केली तर ह्या लेखाचा मानस सुफळ संपूर्ण झाला असे समजण्यास हरकत नाही. 
विधात्याने बहाल केलेलं हे आयुष्य चिंता करून आजारी पडून घालवण्यात काय अर्थ आहे . चला तर मग रोज नियमित व्यायाम करून “ Happy Harmones ” चा डोस घेण्यास सुरवात करुया कारण उत्तम आरोग्य आणि आणि आनंदी आयुष्यासाठी “ नियमित व्यायाम ” हीच खरी गुरुकिल्ली आहे.

             नेहा सोबतचा संवाद खूप काही सांगून गेला.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून आपणही सर्व आज अगदी आत्तापासून आपल्या शारीरक आणि मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्याल अशी आशा करते. 

नेहाने ह्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी तिचे कौतुक आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या.

नेहाने सुरु केलेल्या फेसबुक ग्रुपसाठी लिंक खाली दिली आहे . नक्की जॉईन करा



फेसबुक ग्रुप 
https://www.facebook.com/groups/735669633168365/

नेहाशी संवाद साधण्यासाठी

Neha  Yeole
Counsellor , Psychologist
KKonnection Counselling & Psychotherepy
Raja Mantri Road, DP Road , Opp. Gharkul Lawns ,
Erandwane , Pune
Maharashtra  411052
Contact : 07755922237

https://g.co/kgs/F9qEpH

Facebook group
https://www.facebook.com/kkonnectioncounsellingandpsychotherapy/

लेख आवडल्यास जरूर कळवावे
antarnad18@gmail.com