Tuesday, 18 June 2019

" बालमोहनची मुले हुशार "

|| श्री स्वामी समर्थ ||



बालमोहनचे सर्वेसर्वा ...कै. परमपूज्य श्री. दादासाहेब रेगे.



बालपणीचा काळ सुखाचा . नुसत्या बालपणीच्या आठवणी आल्या तरी तासंतास आपण त्यात रमून जातो. बालपण म्हंटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर आपल्याही नकळत येते ती आपल्या शाळा . आपल्या शालेय जीवनाचा एकंदरीतच आपल्या उर्वरित आयुष्यावर खूपच मोठा पगडा असतो किबहुना आपले आयुष्य घडवण्यात शालेय जीवन , शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये.


आपल्या शाळेला आणि शिक्षकांना आपल्या हृदयात , मनाच्या कोपर्यात खास असे स्थान असते. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शाळेचा उल्लेख जरी झाला तरी कृतज्ञतेने ऊर भरू येतो . शाळेचे दिवस फुलपाखरासारखे असतात, लहान कोवळे , निष्पाप वय असते ते , छक्के पंजे माहित नसतात, २ + २ = ४ हे जितके सोप्पे तितकेच सगळे आयुष्य सोप्पे वाटत असते त्या वयात . ह्या काळात आपल्याला घडवणारे असंख्य हात असतात जसे आई बाबा ,घरातील इतर पण त्यात मोलाची कामगिरी करतात ते आपले शिक्षक.

बालमोहनचे मुख्य प्रवेशद्वार


आज रस्त्यातून जाताना शाळेची बस दिसली. शाळेच्या नव्याकोर्या युनिफोर्म मधील लहानलहान मुले रांगेत बसमध्ये चढत होती ,त्याचसोबत त्यांच्याबरोबर असणार्या पालकांची अनेकविध सूचनांना सलाम ठोकत त्यांचा किलबिलाट सुरु होता. हे सर्व दृश्य नकळत मला भूतकाळाच माझ्या  शाळेत घेऊन गेले. मोरपीसासारखे रंगीबेरंगी दिवस होते ते .माझी शाळा दादरची “ बालमोहन विद्यामंदिर”.कायम अभिमान वाटतो नाव सांगताना. बालमोहन आणि परमपूज्य कै. दादासाहेब रेगे हे एक समीकरण होते. दादांनी आपले सर्व आयुष्य मुलांच्या हितासाठी वेचले. शालेय शिक्षण घेऊन आपल्या ध्येयाकडे झेप घेताना मुले जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असली तरी त्यांच्या व्यक्तीमत्वातून , आचारविचारातून "बालमोहन " ची ओळख झाली पाहिजे . थोडक्यात मुले हा शाळेचा आरसा असली पाहिजेत . त्यावेळी मुलांना खरोखरच शिक्षकांबद्दल आत्मीयता , तळमळ आणि आदरयुक्त भीती होती.

सामुदायिक प्रार्थना

११ वाजता शाळेची सुरवात प्रार्थनेने होत असे. सर्व आपापल्या जगी उभे राहून प्रार्थना म्हणत असत . उशिरा आलेले सर्व विद्यार्थी खालीच उभे राहून प्रार्थना म्हणून मग आपापल्या वर्गात जात असत . शाळेत एक प्रकारची शिस्त होती पण दशहत नव्हती. शाळेचे वातावरण शिक्षक आणि शाळेविषयी असलेल्या आपुलकीने भारावून गेलेले असायचे.


वरती उल्लेख केल्या प्रमाणे दादासाहेबांचे जातीने सर्वत्र लक्ष्य असायचे. पल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे आणि शाळेचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात त्याने आत्मविश्वासाने प्रवेश केला पाहिजे हा त्यांचा मानस असे. त्यावेळी मुले आणि शिक्षक ह्यांचे बंध अगदी घट्ट असायचे. काहीही अडले तर शाळा सुटल्यावर त्या विषयाच्या शिक्षकांना निसंकोच पणे विचारायला मुले कचरत नसत. त्यावेळी वेगळे Academic Counsellor वगैरे असा काही प्रकार नव्हता किबहुना असे शब्दही त्याकाळी प्रचलित नव्हते . 

अद्ययावत  वाचनालय


शिक्षणाशी नाते अगदी Transperant असायचे. अभ्यास केला नाही किंवा गृहपाठ झाला नाही तर पालकांची चिठ्ठी आणणे हा शिरस्ताच होता. अभ्यासातील शिस्तीसोबत मौजमजाही असायची . चैत्र महिन्यात तळमजल्यावरील लहान हॉल मध्ये रांगेत उभे राहून सर्वाना आंबे डाळ आणि पन्हे मिळत असे. कधीतरी शिक्षकांची नजर चुकवून पुन्हा रांगेत उभे राहून काही शूरवीर पुन्हा त्यावर यथेच्छ ताव मारत असत. कलिंगडाची चंद्रकोर सुद्धा मिळत असे

अभिमानास्पद क्षण


आमच्या शाळेला मैदान नसल्यामुळे शारीरिक शिक्षणाचा तास  आमचा शिवाजीपार्क वर होत असे. धावणे आणि अन्य स्पर्धाही तिथेच मोठ्या उत्चाहात पार पडत असत . आमच्या सर्वांचा श्वास असणारी “ वार्षिक सहल ” म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची. दिवाळीची आणि नाताळची सुट्टी अश्या मोठ्या सुट्ट्या असायच्या पण त्याचसोबत श्रावण महिन्यात कधी कधी अर्धा दिवस सुट्ट्यांची खैरात असायची. दिवाळीच्या सुट्टीत घरचा अभ्यास असायचा . त्यासाठी वेगळी वही करून अभ्यास त्यात तारीख वाराप्रमाणे करून वही छान सजवून आणायची हा नियम असायचा . वर्गातील उत्कृष्ठ वहिला मग बक्षीस असायचे. बक्षीस म्हणून २०० / १०० पानी वहीच असायची पण ते वय इतके निरागस होते कि त्या वयात बक्षीस काय मिळाले आहे त्यापेक्षा मला बक्षीस मिळाले हा आनंद जगजेत्ता झाल्याहून कमी नसायचा.

दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास 


त्यावेळी अगदी अगदी माफक दरात सहली निघत असत जेणेकरून सर्वाना येता यावे. त्या सहलीचे प्लानिंग आमच्या लहानश्या मेंदूत १५ दिवस आधी ठरत असे त्यात अगदी बस मध्ये कुणी कुणासोबत बसायचे आणि कुठले कपडे घालायचे काय खाऊ सोबत न्यायाचा ....एक ना दोन जंगी तयारी असायची. त्या सहलीच्या आठवणी अजूनही मनात घर करून आहेत. काय अविस्मरणीय दिवस होते ते .
शाळेला २ सुट्ट्या असायच्या एक छोटी सुट्टी आणि एक मोठी. कधीकधी गृहपाठ केला नसेल तर मग त्या छोट्या सुट्टीत डबा खावून मोठ्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडायचा .
आमच्या शाळेसमोर एक माणूस ज्याला आम्ही “ बुवा ” म्हणायचे तो गाभुळलेल्या चिंचा, बोरे , आवळे ह्याचे दुकान मांडून बसायचा .शाळा सुटल्यावर त्याचे दुकान दिसेनासे होईल इतका मुलांचा घेराव त्याला पडत असे . त्या काळात इतकी महागाई नव्हती त्यामुळे शाळेत अगदी चारआठ आण्याला बटाटा वडा मिळत असे. त्यावेळी CCD वगैरे चैनीचे प्रकार नसत .कधी आम्ही मैत्रिणी ठरवून डबा न आणता शाळेच्या कॅन्टीन मधील पदार्थांवर ताव मारत असू आणि मग  बाहेर जावून सुट्टीत पेप्सीकोला खाणे म्हणजे आमच्यासाठी आनंदोत्सव असायचा. किती लहानलहान गोष्टीत आभाळाइतका आनंद दडलेला असायचा जो आम्ही भरभरून जगलो आणि तो मुठीत आला कि
“ युरेका ” म्हणत आभाळ ठेंगणे व्हायचे.

कमी पैशातील मोठ्ठा आनंद


शाळेत प्रत्येक वर्गात मोठा फळा असायचा आणि त्यावर रोज वर्गातील मुलांची उपस्थिती त्यात मुले किती मुली किती असे विभाजन असायचे . समोर मध्यभागी रोज एक वेगळा सुविचार लिहिला जात असे. प्रत्येक वर्गात एक “ Monitor ” असायचा . बहुतेक वेळा तो वर्गातील हुशार विध्यार्थी / विद्यार्थिनी असे.
आपल्या वर्गातील आपल्या बालगोपाळ मंडळीवर तो दिमाखात चालून हुकमत गाजवत असे. पण ते तितकच असायचे कारण त्या वयात नको ते राजकारण मनास शिवलेले नसायचे त्यामुळे ते सर्वच सुखद होते.


प्रत्येक शाळेत असतो तसा आमच्याही शाळेत गणवेश होता . पण वाढदिवसाच्या दिवशी मात्र ह्या गणवेशाला सुट्टी मिळायची.
वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस घातला कि सगळ्या शाळेला कळायचा आपला वाढदिवस .मग पहिल्या तासाला वर्गशिक्षक वाढदिवसाच्या शुभेछ्या देत आणि टाळ्यांच्या गजरात मग सर्व मुलांना गोळ्या ,चोकलेट वाटायचा कार्यक्रम पार पडत असे.

शालेय जीवनातील सोबती..वर्गातील  बाके 



शाळेत बाकावर बसायच्या जागांचीही कधीकधी अदलाबदली होत असे.पण शाळेत सर्व मुलांना सारखीच वागणूक असायची . पैशाच्या , श्रीमंतीच्या , गरिबीच्या ,हुशारीच्या भिंती कधीच आम्हा मुलांमध्ये आल्या नाहीत .शाळेतील नियम सर्वाना सारखेच असायचे , आवडता नावडता हा प्रकार नसायचा . शाळेतील वार्षिक कार्यक्रमही मोठ्या उत्चाहात पार पडत असत. त्यात असणार्या नाटकातून भाग घेणे मग त्यासाठी लागणारी वेशभूषा  ह्या गोष्टी सर्व गोष्टींची जय्यत तयारी असायची . दहीहंडी सारखे सण सुद्धा मुले साजरी करत असत . एकंदरीतच सगळ्याच गोष्टीत शिस्त असली तरी ती हवीहवीशी वाटणारी असायची . तेव्हा प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक हि चैन परवडणारी नव्हती . वर्गशिक्षक २-३ विषय सुद्धा शिकवत असत . एका ओळीत ८ शब्द लिहायचे 9 वा शब्द आला कि तो पुढील ओळीत गेला पाहिजे ,लिहिताना समास सोडला पाहिजे हा शिरस्ता असायचा . आजही लिहिताना  ओळीत 9 वा शब्द आला कि पुढील ओळीत लिहिला जातो इतका खोलवर पगडा मनावर आजही आहे. आपली सर्वच मुले जगात पुढे यावीत आणि एक उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख असावी ह्यासाठी शाळेतील शिक्षकांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही इतके मोठे आहे. त्याकाळात बालमोहनची मुले इतकी टापटीप , शिस्तीत असायची कि गमतीने लोकही “ अरे हा बालमोहन छाप ” दिसतोय असे म्हणत असत. त्या वेळी बालमोहन विद्यामंदिर आणि पार्ले टिळक विद्यालय ह्या दोन शाळा अग्रेसर होत्या . दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कुठल्या शाळेची किती मुले पहिल्या ५० मध्ये आली हि चुरस असायची .


 हि स्पर्धा असली तरी ती “ Healthy Competition ” असायची. वर्ष निघून गेली ,दहावीची परीक्षा झाली . शेवटच्या दिवशी सेन्डोफ झाला तेव्हा क्षणभर बेघर झाल्यासारखे वाटले . शाळेतील शेवटचा दिवस अजूनही आठवतो अगदी तसाच्या तसा. आम्ही सर्व घरी जाताना किती वेळा मागे वळून पाहत होतो . आपला ह्या वास्तुबरोबरचा प्रवास इथवरच होता ह्या विचारांनीही मन बेचैन झाले होते, पण म्हणतात ना “ show must go on ” .शाळा संपली ,एक पर्व संपले . अधून मधून शाळेत एक फेरी व्हायची. जुने शिक्षक भेटले कि त्यांच्या चेहऱ्यावर ओळख दिसायची. पुढे पुढे कार्यबाहुल्यामुळे भेटी कमी होत गेल्या पण शिक्षकांबद्दलचा आणि शाळेविषयीचा आदर किंचितही कमी नाही झाला.बाह्यजगात वावरताना शाळेत झालेले चांगले संस्कार पावलोपावली कामी आले. त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे.


जगाच्या कानाकोपर्यात असणार्या बालमोहन च्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा जाज्वल्य अभिमान असणार ह्यात दुमत नाही  
“ मी बालमोहन ची विद्यार्थिनी आहे ” हे सांगताना काय अभिमान वाटतो तो शब्दांकित करता येणे निव्वळ कठीण आहे.  माझ्या मुलासोबातही पुन्हा मी १० वी पर्यंत शाळा जगले पण आमच्या वेळची सर काश्यालाच नाही हे पदोपदी जाणवले. काळासोबत शिक्षण पद्धती बदलत गेल्या ,नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात रुजल्या , शाळेचा विस्तार झाला . आता आमच्या शाळेत मराठी सोबत इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण आहे. पण आजही माझ्या डोळ्यांना माझी शाळा पूर्वीसारखीच दिसते आणि दिसत राहील . कधीतरी वाटते आपल्याच वर्गात जावून आपल्या बाकावर थोडावेळ निवांत बसावे. मला खात्री आहे हा लेख प्रत्येक वाचकाला आपल्या शाळेत घेऊन जायील कारण आपल्या सर्वांचेच शाळेशी असणारे बंध अतूट असतात .


आज समाजात वावरताना तसेच कार्यालयाच्या ठिकाणी मिळणारे यश ,सन्मान ह्या सर्वाची नाळ शाळेशी जोडली गेली आहे. आयुष्याने पुढील टप्पा गाठला पण शाळेच्या आठवणी मनात चिरतरुण राहिल्या .शाळेचे आणि शिक्षकांचे योगदान इतके अमूल्य आहे कि कश्यानेही त्याची भरपाई होवूच शकणार नाही .

एक कुटुंब


 “ बालमोहनची मुले हुशार ” असे शब्द कानी पडतात तेव्हा आम्ही सर्व आजी माजी विद्यार्थी  शाळेतील शिक्षकांच्या आणि शाळेसमोर अक्षरशः नतमस्तक होतो.  माझे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि आयुष्य उत्तम संस्कारांनी समृद्ध करणाऱ्या माझ्या शाळेला आणि सर्व शिक्षकांना ह्या लेखाद्वारे  त्रिवार वंदन.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा.