Wednesday, 12 June 2019

“ संगती संग दोषेण ”



|| श्री स्वामी समर्थ ||




             एखाद्या व्यक्तीबद्दल मत ठरवणे तितकेसे सोप्पे नाही , पण तरीही कधी तशी वेळ आलीच तर त्या व्यक्तीची “ संगत ” पहा. ५०% काम तिथेच होईल. आपली संगत आपल्या व्यक्तिमत्वाचा काही अंशी तरी भाग असतेच . लहानपणापासून आपल्यावर घरातील मोठी मंडळी उत्तम संस्कार करत असतात जेणेकरून पुढील आयुष्यात आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची पारख करता यावी. कित्येक कुटुंबांमध्ये सकाळी “ कराग्रे वसते लक्ष्मी ” पासून ते संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर “ शुभंकरोती , मनाचे श्लोक , परवाजा ” म्हणण्याची पद्धत पिढ्यान पिढ्या पासून चालत आली आहे. 


संध्याकाळी प्रार्थना म्हणून घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून मगच जेवायला बसणे हि रीत आजही घरोघरी दिसते. काही जणांना हे ओल्ड फ्याशन  जरूर वाटेल पण आपल्या संस्कृतीचे ,रूढी  आणि परंपरा ह्यांचे जतन करणे आणि हा वसा पुढील पिढ्यास सुपूर्द करणे हे आपले परम कर्तव्य आहे . पूर्वी एकत्र कुटुंब होते घरात सदैव कुणीनाकुणी असायचे .घरातील वडीलधार्यांचे ऐकायचे हे वेगळे सांगायला लागत नसे. पूर्वी घराला कुलूप म्हणून नसायचे कधीच. पण बदलत्या काळाप्रमाणे जीवन गतिमान झाले, गरजा वाढल्या आणि स्त्री पुरुष दोघेही नोकरी व्यवसायानिम्मित्त घराबाहेर पडू लागले. अनेकविध कारणानी एकत्रकुटुंब पद्धतीचा ह्रास झाला आणि मग मुलांना “ पाळणाघरात /CRUSH ” ठेवायची वेळ आली.
दिवसातील ८-१० तास मुले पालकांपासून विभक्त झाली . आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असतोच असतो. पालक मुलांना त्यांच्या संपर्कात राहावे म्हणून मोठे मोबाईल आणून देतात आणि त्यांना संपूर्ण जग खुले होते . त्यात जर नको त्या मुलांची संगत त्यांना लागली तर लहानपणीच नको असलेल्या गोष्टी त्यांना समजायला वेळ हा कितीसा लागणार.


आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपली “ संगत ” फार मोलाची ठरते . ती आपल्याला शिखरावर सुद्धा नेऊ शकते आणि नेस्तनाबूत सुद्धा करू शकते. आपल्या आजूबाजूला असणार्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावरही असतोच.


एखाद्या चांगल्या घरातील निर्व्यसनी मुलाचे मित्र कदाचित काही प्रमाणत व्यसनी असू शकतात. पण ह्या संगतीचा परिणाम म्हणून आयुष्यात कुठल्याही कारणाने आलेल्या नैराश्यामुळे त्यालाही एखादे व्यसन लागू शकते हे नाकारता येणार नाही. परंतु अश्या वेळी प्रगल्भ विचारांची संगत असेल तर तो आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहू शकेल. म्हणूनच शेवटी संगत महत्वाची. वाईट संगतीचा परिणाम आपल्या मनावर विचारांवरही खोलवर होत जातो आणि आपल्या आयुष्यात मग कुकर्मांची जणू शृंखलाच तयार होते..कुसंगतीसारखा दुसरा आजार नाही जो आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकतो. आजकाल महाविद्यालयीन परिसरात एक चक्कर टाकली तर कोवळ्या वयातील मुलीही सर्रास सिगरेट ओढताना दिसतात. आजची पिढी आधुनिक विचारांची ,हुशार ,इन्टरनेट युगातील आहे पण चुकीच्या संगतीने त्यांचे आयुष्य वेगळ्याच वळणावर जाण्याची भीती वाटते खरतर .त्याचबरोबर सोशल मिडिया आणि इतर प्रलोभने आहेतच भर घालायला . 
आंब्यांच्या पेटीतील एखादा कुसका आंबा संपूर्ण पेटी नासवतो अगदी तसेच आपली संगत फार महत्वाची .अगदी शालेय जीवनापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत. चांगले अभ्यासू मित्र मिळाले तर आपल्यालाही अभ्यासाची गोडी लागते , चांगल्या आचार विचारांचे आदानप्रदान होते, आयुष्याच्या शिखरावर जायची उमेद निर्माण होते आणि वाईट संगत लागली तर मग सगळा मार्गच चुकतो . 



अभ्यासातून लक्ष्य उडते आणि मग टिवल्याबावल्या ,नको ती व्यसने ,धंदे , मुलींची छेड काढ ,घरी खोटे सांगून सिनेमाला जा अश्या एक ना दोन वाईट गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते आणि आपण त्यात अडकत जातो आणि आयुष्य उध्वस्त होते ,आईवडिलांचे संस्कार पार धुळीस मिळतात आणि परतीचा मार्ग धूसर होत जातो . हेच कश्याला पुढे महाविद्यालयात आणि नोकरीच्या ठिकाणीही जिथे आज खूप स्पर्धा आहे तिथे नको त्या राजकारणात आपण ओढले जातो .अत्यंत शिस्तीत ,मेहनतीने प्रामाणिक पणे काम करणारी एखादी व्यक्ती ह्या षडयंत्राला बळी पडते .करणारे राहतात नामानिराळे आणि चांगले सज्जन भरडले जातात म्हणूनच आपली उठबस कुणासोबत असायला हवी ह्याचा अभ्यास असला पाहिजे , माणसे वाचता आली पाहिजेत .सुरवातीला जड जातेच पण हळूहळू ओळख होते.
आपले स्वतःचे आप्तेष्ट , कुटुंब सुद्धा यातून सुटलेले नाही . आपल्या जवळच्या लोकांमध्येही छल कपट करणाऱ्या व्यक्ती असतात . आपल्याला काहीतरी कुणाबद्दल मनात काहीबाही भरवून आपले मन कलुषित करतात . म्हणूनच “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ” ह्या रूढी समर्पक वाटतात . अश्या व्यक्तींची संगत , सहवास असला तर मग “ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ” अशी स्थिती निर्माण नाही झाली तरच नवल . अनेकविध प्रलोभने असलेल्या ह्या आधुनिक जगात आपल्या पाल्यासाठी प्रत्येक पालकाने जागृत राहिले पाहिजे. आपल्या मुलाचे/मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ह्याची माहिती असलीच पाहिजे म्हणजे पुढील अनर्थ टाळता येयील. आजकाल शाळेतील मुले सुद्धा “Instagram ” वरती वावरताना दिसतात. इंटरनेट ने संपूर्ण जग जवळ अगदी घरात आले आहे पण त्याची एक दुसरीही बाजू आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला चांगल्या कामासाठी उपयोग करता आला पाहिजे.




म्हटलेच आहे ना “सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " त्याप्रमाणे आपली संगत चांगलीच असली पाहिजे ,चांगल्या संगतीत चांगल् विचार रुजतात ,आयुष्यात मोठी झेप घेण्यास पाठबळ मिळते आणि आयुष्य फुलत जाते .ती नसेल तर मती भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही .दूर कश्याला जा ,whatsapp वरती एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचे मेसेजचा अभ्यास करा . त्यांनी पाठवलेल्या मेसेज वरून सुद्धा त्यांची आवड आणि वृत्ती लक्ष्यात येते . लहानपणी आईला “ शुभंकरोती “ शिकवायला लागते पण वाईट गोष्टी फार लवकर आत्मसात होतात ,त्या शिकवायला लागत नाहीत. एकदा वाईट संगत लागली कि माणूस हिप्नोटाईझ झाल्यासारखा त्यात वाहवत जातो आणि नको त्या किनार्याला लागतो. आपल्यासोबत असणार्या लोकांच्या विचारांचा , त्यांच्या Vibration चा परिणाम आपल्या मनावर , विचारावर आणि एकंदरीत सर्वच आयुष्यावर होत असल्याने आपली संगत आणि आपली उठबस कुणासोबत असली पाहिजे हे ज्याचे त्याने ठरवायचे कारण त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.वाईट आणि चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात आपण क्षणात भरकटले जाण्याची जास्ती शक्यता असते . त्याउलट उत्तम संगत आपल्याला आयुष्यात आपल्या ध्येयापर्यंत नेते आणि आईवडिलांनी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज होते. 



आयुष्य फार सुंदर आहे आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपली “ संगत “ पुनः पडताळून पाहणे ह्याला पर्याय नाही.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा

www.antarnad18.blogspot.in