|| श्री स्वामी समर्थ ||
हिमालय
लहान मोठे सगळ्यांनाच वेड लावणारा असा हा हिमालय .आशिया खंडातील सर्वात
मोठी पर्वतांची शृंखला आणि जगातील सर्वांत
उंचच उंच पर्वतरांग.
संस्कृत भाषेत हिम म्हणजे बर्फ असा उल्लेख आढळतो. माउंट एव्हरेस्ट हे त्यातील
सर्वोत उंच शिखर. हिमालयाच्या प्रभावामुळे भारतातील उप खंडावर वरून राजाची कृपा
आहे तसेच उत्तुंग शिखारांमुळे भारतातील उपखंड उबदार राहण्यासही मदत होते. गंगा ,ब्रम्हपुत्रा ,सिंधू ,झेलम , बियास ,सतलज अश्या अनेक पवित्र
नद्यांचे उगमस्थान हिमालायाच्याच कुशीतून झाले आहे.हिमालयाची विशालता ,भव्यता पाहताना आपण खूप
लहान असल्याची जाणीव होते. हिमालय एका तपस्व्या
सारखा भासतो आणि तुम्हाला शांत ,संयमी बनवतो. हिमालयाची ओळख म्हंटली कि
डोळ्यासमोर येतात ती बर्फाच्यादित हिमशिखरे. परमेश्वराने निसर्गाची निर्मिती हि
मनुष्य जीवनाला पूरक ठरेल अशीच केली आहे. पावलोपावली जसा निसर्ग बदलतो अगदी तसेच
आपले जीवनही .त्यामुळे ज्याला निसर्ग समजला त्याला जीवनही कळले.
पण मंडळी ह्या सर्वच्या पलीकडे जावूनही हिमालयाची आज वेगळी ओळख ह्या
लेखाद्वारे तुम्हाला करून देण्याचा लहानसा प्रयत्न आहे. योग्यांना
त्यांच्या प्रज्ञाचक्षूच्या विकासासाठी हिमालय मदत करतो व त्यांचे आत्मचिंतन दृढ
करतो. संस्कृत भाषेतील महाकाव्यं हिमालयालाच मदतीला बोलावतात. आपल्या उत्तम
गुणसंभाराने विश्वाला संमोहीत करणारा हिमालय इतिहासाला आपली दखल घ्यावयास लावतो , भूगोलालाही आपल्या प्रसादमयतेची साक्ष जतन करावयास शिकवतो.
हिमालय हे सुरक्षिततेचे आगर आहे. आत्मज्ञानाचे भांडार आहे , अक्षय तत्वाशी असलेल्या ह्या हिमालयातील निसर्गहि तितकाच
विलोभनीय आहे. ज्यांनी हिमालयाला आपला “मी” चिकटवला ते हिमालयच झाले. परमशांतीचा आणि तृप्ततेचा उगम
म्हणजे साक्षात हिमालय. द्वेषातील
शत्रुत्व गैर असल्याचे हिमालय सांगतो. त्याच्या जवळील औषधी वनस्पतींनी रोगनिवारणही
करतो. हिमालय म्हणजे शिवतत्त्वाचे अधिष्ठान. आपल्या आश्वासकतेतून आशीर्वाद देताना
मूकपणाने हिमालय जणू सांगतो, परमात्म्याला आठवत, मनात साठवत आपले जीवन ईश्वरमय
करून टाकण्यातच कल्याण आहे.
पर्यटन हे विविध हेतूने केले जाते . कधी फक्त सुट्टी म्हणून ,कधी निसर्गाच्या सानिध्यात ,भटकंती आणि मग त्याचबरोबर
निवांतपणा मिळावा म्हणून तर कधी देवदर्शनासाठीही . हिमालयाच्या कुशीत असलेल्या
ह्या सर्व तीर्थांचे प्रत्येकाचे असे एक विशिष्ट स्थान आहे. पुराणकाळापासून
ऋषीमुनी हिमालयात जावून वर्षानुवर्षे साधना ,तप करत ह्याचा उल्लेख आपण वाचतो ऐकतो..खरच
चारधाम यात्रा ,अमरनाथ यात्रा ह्या
तर आनंदाने करायच्याच आहेत ,मनासारखे देवदर्शनी होणार आहे पण ह्या ठिकाणाचे स्थान महत्व
जर आपण समजून घेतले तर ह्या सर्व यात्रां करण्याचा आपल्या सर्वांचा आनंद नक्कीच
द्विगुणीत होईल.
कुठलाही प्रवास आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो आणि ह्या सर्व अनुभवांची
शिदोरी घेवून आपण आयुष्याची वाटचाल करत असतो नाही का? प्रापंचिक जीवन जगताना
त्याला जर थोडी पारमार्थिक विचारांची ,साधनेची जोड असेल तर आयुष्यात येणाऱ्या चढ
उताराना आपण न घाबरता, डगमगता तोंड देवू शकतो ,मार्ग काढू शकतो . अध्यात्माच्या ह्या वाटचालीकडे प्रवास
म्हणजे सुखी जीवनाची जणू नांदीच. अध्यात्मामुळे विचाराना एक चांगली बैठक मिळून
विचार परिपक्व होण्यास मदत होते. ह्या सर्वाची गरज खरतर आजच्या तरुण पिढीलाही आहे
कारण आजचे कॉम्पुटर युग स्पर्धात्मक आहे
आणि प्रत्येक दिनी आम्हा युद्धाचा प्रसंग . नुसतेच देवदर्शन नाही तर स्वतःला आणि परमेश्वरालाही ओळखा
आणि त्याच्या कणाकणात भरलेल्या अस्तित्वाला आपला सलाम कराल ,एक उच्च कोटीचे अध्यात्मिक
अनुभव घ्याल तसेच एक वेगळा अध्यात्मिक दृष्टीकोण देणारा अनुभव मिळाला
आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यातून जेव्हा चारधामच्या यात्रांना निघतो तेव्हा
मनात खूप काही असते , तिथे गेल्यावर काय करू नी काय नको असेही होवून जाते नाही.
आपल्या घरातही देव्हारा असतो त्यातीलही देवांना रोज तितक्याच श्रद्धेने आपण
नमस्कार करत असतोच पण तरीही चारधाम किंवा
कुठल्याही धार्मिक ठिकाणी जावून आपण दर्शन घेण्यास तेव्हडेच उत्सुक असतो. मला तिथे
गेल्यावर अनेक अनुभव आले जणू काही देवच भेटला असे आपण म्हणतो कारण त्या पवित्र
भूमीतील ,तिथल्या अणुरेणूत
असलेल्या त्या मांगल्याचा तेथील पवित्रतेचा आणि वातावरणातील स्फंदनांचा ,सकारात्मक उर्जेचा एकत्रित
होणारा परिणाम जणू त्या परमेश्वरी शक्तीचे दर्शन घडवतो आणि मग “आनंदाचे डोही आनंद तरंग” अशीच मनाची अवस्था होते .
तेथील संपूर्ण वातावरण ,वारा ,नद्यांच्या पाण्याचा
खळखळाट एक दिव्य अध्यात्मिक अनुभूती देवून जातो. मन प्रफुल्लीत करणारा ,आपल्या त्याच जीवनाला एक
वेगळा दृष्टीकोन देवून नव्याने जीवन जगण्यास प्रवृत्त होवून आपण परतत असतो .कधीतरी
आयुष्यात प्रत्येकाला शांततेची ,आपल्यातील परमेश्वरी शक्तीला शोधून नतमस्तक होण्याची गरज
भासतेच. इतकेच नव्हे तर अश्या अध्यात्मिक जिथे तेथील देवतेचा प्रत्यक्ष वास
सर्वत्र जाणवत असतो अश्या ठिकाणी आपलीही आपल्याला नव्याने ओळख नाही झाली तरच नवल.
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण निसर्ग ,तेथील शांतता अनुभवतो .पण जेव्हा एखाद्या
धर्मस्थळी जातो तेव्हा तिथे नुसतेच दर्शन
नाही तर कित्येक वर्षाची शोधात असलेली शांतता मिळते आणि मग हे क्षण असेच स्तब्ध राहावेत असेच
वाटते. हिमालयाच्या कुशीत असलेल्या ह्या सर्व ठिकाणांचे प्रत्येकाचे असे एक
अस्तित्व ,वलय आहे ,प्रत्येक ठिकाणचे
स्थानमहत्व पुन्हा अर्थात वेगळे .आत्मशांतीला आपल्यात सामावून घेऊन विश्वकल्याणासाठी तिला
प्रक्षेपित करण्याचे सार्मथ्य हिमालयात आहे. हिमालयाची यात्रा ही आत्म्याला शांती, पुष्टी व तुष्टी
देणारी आत्म-यात्राच. युगानुयुगे अगदी निशब्द , निश्चल राहिलेल्या
हिमालायास पर्वतराज म्हणून देवताही त्याचा अनुनय करतात. सूर्यालाही आपल्या
रश्मींची माला त्याच्या चरणी समर्पित करावीशी वाटते.
उत्तराखंडातील अलकनंदा नदीच्या काठी असलेल्या आणि हिमशिखरावर विराजलेले
बद्रीनाथ मंदिर. श्री विष्णूंचे स्थान म्हणून गौरवलेल्या ह्या मंदिराची स्थापना
श्री रामचंद्रांनी केली .बद्रीनाथांच्या दर्शना आधी केदार नाथांचे दर्शन करण्याची
प्रथा आहे. केदारनाथ इथे पूर्वापार खूप बर्फ आणि पाऊस पाहायला मिळतो.
ऋषींच्या तपस्येमुळे प्रसन्न होवून प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले आणि
ज्योतिर्लिंगा च्या रुपात तिथे सदैव वास करीन असे वरदान दिले. यामुनोत्रीस यमुना ,गांगोत्रीस गंगा ,केदारनाथ ला मंदाकिनी आणि
बद्रीनाथ ला अलकनंदा ह्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ,एक निर्मल वातावरण शांतता
देतात.
हिमालयाच्या सानिध्यातील चारधाम च नाही तर
काश्मीर पासून पुढे अमरनाथ ला जातानाहि हिमालयाची नव्याने ओळख होत जाते. हिमालय
आपले आयुष्य संपूर्णतः कसा बदलून टाकतो हा अविस्मरणीय अनुभव शब्दांकित करता येणार
नाही तो प्रत्येकाने स्वतःच अनुभवायचा आहे .
मनाजोगते देवदर्शन, गंगास्नान आणि
त्याचबरोबर अध्यात्मिक साधना ,ह्याचा सुरेख मेळ. शांत वातावरणात आणि निसर्गाच्या
सानिध्यात आपल्या मनाची शुद्धता होते .आपल्या आतल्या आवाजाशी नकळत केलेला संवाद एक
रोमांचकारी अनुभव देतो . खरच नुसतेच पर्यटन नाही तर किती गोष्टी अनुभवायच्या आहेत
एकाच ठिकाणी. प्रापंचिक जीवनास अध्यात्माची जोड हवी हेच तर हिमालयाला सुचवायचे
नसेल ना?
हिमालय दर्शन करून आल्यावर सर्व ठिकाणचे मनासारखे दर्शन तर झालेच पण मलाही हि
मी नव्याने उमगले...पुन्हा अगदी फ्रेश झाले, तेथील वातावरणात जाणवलेल्या दैवी शक्तीच्या वास्तव्याचा परिणाम चिरकाल आनंद
देणारा आहे आपणही नक्कीच ह्या सर्व रसांची अनुभूती घेवून तृप्त व्हा.
अस्मिता
antarnad18@gmail.com
No comments:
Post a Comment